हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ७४ / गंगाजल

बनवाबनवी आहे. सत्त्वपरीक्षा का काय म्हणतात, तसला हा लुटूपुटीचा खेळ आहे, हे त्या बिचार्‍या सिंहाला उमगले नाही. देवदारु-वृक्षाचे रक्षण करीत-करीत एक दिवस भुकावलेल्या स्थितीत म्हातारपणामुळे तो मेलेला असणार.

 जितके राजाचे जीवन सफल झाले, तितकेच सिंहाचे असफल झाले होते. त्याने किती व्यावहारिक उपदेश राजाला केला होता, -अगदी जीव तोडून केला होता. पण राजाने तो ऐकिला नाही. एवढेच नव्हे, तर उपदेश न ऐकिल्यामुळे त्याचा प्राण तर नाहीच गेला, पण एका कवीने गावे एवढे यश त्याला मिळाले. देवांनी जयजयकार केला; पुत्रप्राप्ती झाली. म्हणजे पर्यायाने सिंहाचा उपदेश हीन दर्जाचा ठरला. ह्या सगळ्या खटाटोपात गाय हातची गेली, ती गेलीच. सर्व प्रकारे सिंह नागविला गेला. मरताना तो मनाच्या अतृप्त अवस्थेत, वासनामय परिस्थितीत मेला. ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘देहास्तमानी' त्याचे सर्व ‘संकल्पविहंगम' नव्या जन्माची, वासनापूर्तीची वाट पाहत शतकानुशतके बसलेले होते.

 शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला. सन १७४८ मध्ये आपल्या भारतीय सिंहाचा बेंथम नावाच्या एका ब्रिटिश कुटुंबात जेरेमी नावाने जन्म झाला. हा मुलगा फार हुषार निपजला. बापाच्या मनात त्याने वकील व्हावे असे होते, पण त्याने वकिली न करिता कायदा व कायद्याची तत्त्वे ह्यांचा अभ्यास केला. तो तर्कशास्त्रात फार पारंगत झाला. आपला भारतीय सिंहही तसाच होता, हे वाचकांना ठाऊक आहेच. त्याने नीतितत्वांचा व आचरणशुद्धतेचा फार खोल व तार्किक विचार केला. त्याच्या मते सत व असत हे क्रियेचे गुण परिणामानेच पारखता येतात. जे परिणामी चांगले, ते चांगले. सदगुणासाठी सदगुण (कोणाच्या फायद्यासाठी, कोणाचे बरे होण्यासाठी नव्हे), हे तत्त्व तो मूर्खपणाचे मानीत असे. ज्या आचरणाने पुष्कळांना पुष्कळ सुख मिळेल, ते आचरण नीतिदृष्ट्या श्रेष्ठ, असा सिद्धान्त त्याने प्रतिपादिला. 'अल्पस्य हेतोर्बहू हातुमिच्छन विचारमूढः प्रातिभासि मे त्वम्' (थोड्यासाठी पुष्कळांच्या कल्याणाचा नाश करणारा तू मला मूर्खच दिसतोस), ह्या सिंहाच्याच उक्तीचे रूपांतर म्हणजे बेंथमचा सिद्धान्त आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. बेंथमने पैसे व्याजी देण्याच्या पद्धतीचा वरील तत्वानेच पुरस्कार केला. कायदे करावयाचे, ते बहतांच्या बहुत कल्याणासाठी करावे, उगीच अमक्या एका सदगुणाच्या पालनासाठी नव्हे,