हे पान प्रमाणित केलेले आहे.

९२ / गंगाजल


 ह्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचानक दोन प्रसंगी, दोन तर्‍हानी मिळाले. एझुपेरी नावाच्या फ्रेंच लेखकाने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घरदार सोडून अमेरिकेत स्थायिक होण्यास निघालेल्या लोकांचे वर्णन केले आहे : “(लिस्बनमध्ये जुगार खेळताना पाहिलेली) ही माणसे बोटीवर मला परत दिसली. ती सर्व अमेरिकेला निघालेली होती. बोट एका खंडातून दुसऱ्या खंडाला जायला निघाली होती. माल कोणता? - ज्यांची मुळे तुटली आहेत, अशा ह्या झाडांचा. ज्यांशिवाय अगदी चालायचेच नाही, एवढ्याच वस्तू मी आपल्याबरोबर घेतल्या होत्या. पण ही माणसे खिशात हात घालून आपल्या नावाची कार्डे -आपल्या व्यक्तित्वाची उरलीसुरली फुटकी निशाणी- शोधशोधून काढीत होती. आपण कोणीतरी आहोत, हा खेळ ती परत खेळत होती. आपल्याला काहीतरी अर्थ आहे, ही समजूत टिकविण्यासाठी ती आपली ओढाताण करीत होती. 'तुम्हांला माहिती आहे का? मी तो अमका- तमका.' असे ती म्हणत होती. 'मी अमक्या गावचा, त्या तमक्याचा मित्र, तुम्हांला माहीत आहे ना तो?' आणि मग ती दुसऱ्याला निरनिराळे लांबलचक इतिहास ऐकवीत होती : कोठच्यातरी मित्राचा, कोठच्यातरी केलेल्या कामाचा. ज्यांमध्ये काही अर्थ नाही व कोणाला स्वारस्य नाही, अशा काहीतरी लांबलचक हकीकती ती सांगत बसत... आपण खरेच परतणार आहो, असा एक विचित्र खेळ ती मनाशी खेळत होती.

 "माणूस शेजारी गेले आहे की सातासुद्रापलीकडे गेले आहे, ह्याला महत्व नसते. एखाद्या मित्राची वाट पाहत असावे, त्याचे येणे लवकर होऊ नये, अशा वेळी त्याचे आपल्या मनातील अस्तित्व हे शरीराने त्याच्या जवळ असण्यापेक्षासुद्धा तीव्रतेने जाणवते. मी सहारात होतो, त्या वेळी माझे आपल्या घरावर जेवढे प्रेम होते, तेवढे इतर केव्हाही नव्हते. सोळाव्या शतकात खलाशी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या टोकाशी वाऱ्याच्या भिंतीतून आपली गलबते नेत-नेत वर्षे मोजीत होते, तेव्हा ते आपल्या प्रियेच्या जितके जवळ होते, तितके कोणीही जवळ नसेल. त्यांचे प्रयाण ही त्यांच्या परत येण्याची सुरुवात होती. जायच्या दिशेने जेव्हा ते शिडे उभारीत, तेव्हा खरोखर त्यांची परतीची तयारी चाललेली असे. ब्रिटनीच्या बंदरातून प्रियेच्या घरी जाण्यासाठी सगळ्यांत जवळचा रस्ता आफ्रिकेच्या केप हॉर्नवरून गेलेला होता. आता ह्या बोटीवरून जाणारी माणसे ब्रिटनीच्या त्या खलाशासारखी होती; पण कोणीतरी त्यांची ब्रिटनीमधली प्रियाच हिरावून