या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मग हा नियम वापरून कुठल्याही दोन अपूर्णांकाचे छेद समान करणं शक्य आहे ना ? 2/3 आणि 4/7 यांची तुलना करूं. दोन्ही अपूर्णांकांचे छेद 3 x 7 = 21 करणं शक्य आहे.

  म्हणून 2/3 = 2/3 x 7/7 = 14/21

  व 4/7 = 4/7 x 3/3 = 12/21

आता हे अपूर्णांक '21' या एकाच उंचीच्या ठोकळ्यावर उभे राहिले! मग 14/21 हा 12/21 पेक्षा मोठा आहे हे समजतं.

पूर्णाक व अपूर्णांकाची तुलना करताना पूर्णांकाचा छेद 1 असतो. म्हणजेच 3 = 3/1, 12 = 12/1 हे ध्यानात ठेवा.

2/3 हा 4/7 पेक्षा मोठा आहे हे आपण दाखवलं. गणिताच्या भाषेत 2/3 > 4/7 म्हणजेच 2/3 हा 4/7 पेक्षा मोठा आहे असंही लिहितात. >, < या चिन्हांचा मनात घोटाळा होत असेल तर एक लक्षात ठेवा. > किंवा < ही खूण वापरताना मोठा आकडा नेहमी कोनाच्या आत, आरामात बसतो तर कोनाचे टोक बिचाऱ्या छोट्या आकड्याला टोचत असतं.

अक्षरांचे गणित किंवा बीजगणित

अक्षरांचे गणित जरा वेगळे दिसलं तरी अवघड नसतं. आकड्यांची मोठमोठी व क्लिष्ट गणितं सोपी करण्यासाठीच अक्षरांचं गणित शोधून काढलेलं आहे. यात म', 'न', 'क्ष', ‘ग’ अशी अक्षरं संख्यांच्या ऐवजी वापरली जातात. 12म म्हणजे 12 X म. तसच न² म्हणजे न X न. जसे 4² = चाराचा वर्ग = 4 x 4. किंवा क्ष³ = क्ष चा घन = क्ष x क्ष x क्ष. (तीन वेळा क्ष)

अक्षरांचे गणित किंवा बीजगणित
११