या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. उत्तर सापडलं ?

 लेखांक १ मध्ये एक कूट प्रश्न दिला होता : एका कागदावर अनेक देश असलेला नकाशा रंगवायला कमीत कमी किती रंग लागतील? शेजार-शेजारचे देश म्हणजे ज्यांची सीमारेषा काही भागात एकरूप होते असे - वेगळ्या रंगाने रंगवणे आवश्यक आहे.

 पाच रंग हे काम करायला पुरे आहेत. पण चारच रंग पुरतील का? प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असं आहे. हे उत्तर अिलिनॉय युनिव्हर्सिटीच्या हाकन (Haken) आणि आपेल (Appel) ह्या गणिततज्ज्ञांनी शोधून काढलं. त्यासाठी त्यांना कंप्यूटरचा आसरा घ्यायला लागला. कंप्यूटरने हे गणित सोडवायला १२०० तासांचा अवधी घेतला.

 कुठलंही गणित - लहान किंवा मोठे - सोडवताना मानवी मेंदूला ‘होय’, ‘नाही’ अशा प्रकारचे अनेक तर्कसंगत निर्णय घ्यावे लागतात.

 आपेल आणि हाकन ह्यांनी हाती घेतलेल्या गणितात असे दहा अब्ज निर्णय घ्यावे लागणार होते ! म्हणून कंप्यूटरची आवश्यकता भासली.

 ह्या प्रश्नाचे ह्याहून सुटसुटीत उत्तर सापडेल असंही काही गणिततज्ज्ञांना वाटतं.

 अशी घडी घालता येईल ? :

 समजा, तुमच्याकडे ऐसपैस पण तलम कापडाचा एक टॉवेल आहे. त्याची एक घडी घातली, की त्याचे क्षेत्रफळ निम्मं आणि जाडी दुप्पट होते.