या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. सोडवणार हे प्रश्न?

 खाली वेगवेगळ्या प्रकारची काही कोडी दिली आहेत. ती सोडवण्यासाठी गणिताचं फारसं ज्ञान आवश्यक नाही - पण गणिताला आवश्यक असलेली तर्कप्रणाली लागेल. शाळकरी मुलांना (आणि कदाचित त्यांच्या आई-वडिलांना !) ही सोडवायला अवघड जाऊ नयेत.

प्रश्न १ : वय ओळखा

 घरोघर फिरून खेळणी विकणारा विक्रेता एका घरी गेला. घरातली मालकीण म्हणाली, “तुम्ही जर माझ्या तीन मुलांची वये ओळखलीत तर मी तुमच्याकडून खेळणी घेईन-"

 “बरं बाईसाहेब, सांगा तुमचं कोडं !" विक्रेत्याने आव्हान स्वीकारलं.

 "माझ्या तीनही मुलांच्या वयांचा गुणाकार ३६ होतो - अर्थात् वयेही पूर्णाकात मोजायची. त्यांच्या वयांची बेरीज शेजारच्या घराच्या नंबराइतकी होते.”

 विक्रेता शेजारच्या घराचा नंबर पाहून आला. जरा वेळ डोकं खाजवून म्हणाला, "बाईसाहेब, एवढी माहिती पुरेशी नाही. आणखी माहिती सांगा."

घरमालकीण म्हणाली, “माझी सर्वात मोठी मुलगी उत्तम पेटी वाजवते." त्यावर तो विक्रेता आनंदाने उद्गारला, “मग बाईसाहेब तुमच्या