या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





१८. महान गणिती ‘गाऊस?

 ‘गणित म्हणजे सर्व विज्ञानांची राणी' हे विधान करणारा एक महान गणिती होता - ३० एप्रिल १७७७ मध्ये जन्मलेला कार्ल फ्रेडरीख गाऊस. 'Men of Mathematics' या प्रसिद्ध गणितज्ञांबद्दलच्या पुस्तकाचा लेखक जेरिक टेंपल बेल याने गाऊसला ‘गणितज्ञांचा राजकुमार’ अशी पदवी बहाल केली आहे. अनेक शास्त्रज्ञ गाऊसला आर्किमिडिस आणि न्यूटन यांच्या मालिकेत बसवतात. गणितावरील पुस्तकात गणितज्ञांबद्दलही माहिती यावी ह्या हेतूने गाऊसबद्दल थोडी माहिती येथे देत आहे.

मुलाचे पाय पाळण्यात :

 अनेक मोठे गणितज्ञ लहान वयातच आपली प्रतिभा दाखवतात. गाऊस ह्या नियमाला अपवाद नव्हता. तो स्वतः विनोदाने म्हणे, ‘मी बोलायच्या आधी मोजायला शिकलो !’ त्याचे वडील माळी, गवंडी अशा तऱ्हेची अंगमेहनतीची कामं करीत. एक दिवस ते काही तरी हिशेब मांडत बसले होते, आणि लहानगा गाऊस ते पाहात होता. त्यांचा हिशेब होतो न होतो तोच त्यांना एक बारीक आवाज ऐकू आला, ‘बाबा ! तुमचं उत्तर चुकलं, ते अमुक अमुक असायला पाहिजे !’ बाबांनी हिशेब तपासला आणि आपल्या पोराचे म्हणणे बरोबर आहे हे त्यांना दिसून आलं.

 त्यावेळी ते पोर तीन वर्षाचं देखील नव्हतं.