या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महान गणिती 'गाऊस'
७५


शाळेतली चमक :

 गाऊस दहा वर्षांचा असतानाची गोष्ट. शाळेत मास्तरांनी वर्गातल्या मुलांना खालील प्रकारचा प्रश्न घातला :

 १ + २ + ३ + ........ + १०० = ? म्हणजे एकापासून शंभरपर्यंतच्या सर्व आकड्यांची (पूर्णांक) बेरीज किती?

गाऊसःगणितातील युगकर्ता

 त्यावेळी अशी पद्धत होती की मास्तरनी प्रश्न दिला की ज्याला तो प्रथम सुटेल त्याने पाटीवर लिहून पाटी टेबलावर ठेवायची. त्यानंतर ज्याला सुटेल त्याने उत्तर मांडून पाटी त्या पाटीवर ठेवायची. अशा तऱ्हेने हळूहळू शिक्षकांच्या टेबलावर पाट्यांचा ढीग रचला जाई.

 मास्तरांचं गणित मांडून होतं न होतं तोवर गाऊसची पाटी त्यांच्या टेबलावरती आलीसुद्धा ! बाकीची मुलं तासभर गणित करत बसली होती आणि शिक्षक अविश्वासाने, स्वस्थ बसलेल्या गाऊसकडे पाहात होते. शेवटी सर्वांच्या पाट्या आल्यावर मास्तरांनी गणितं तपासली. केवळ गाऊसचं उत्तर बरोबर होतं !

 गाऊसने हा प्रश्न एक सोपी पद्धत वापरून चुटकीसरशी सोडवला.