या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १३३
 

दिंडीचे व्यवस्थापक व भजनी मंडळी गुरुजींशी संभाषण करीत होती. त्यांचे शब्द कानांवर पडत होते. शेजारच्या थोरल्या पडवीत दिंडीच्या मालकीणबाई मराठे बाया मंडळींकडे जरा लवंडल्या होत्या. त्या व त्यांची बहीण आळंदीहून दिंडी काढीत व भजनी मंडळीच्या जेवण्या-राहण्याची सर्व व्यवस्था करीत असे कळले. आज ताईने मला त्या फक्त दाखवल्या, मग पुढे त्यांची-माझी चांगली ओळख झाली. थोड्या वेळाने दिंडीवाले उठून गेले व आता लवकरच पालखी येणार म्हणून बायकाही उठून तयारीला लागल्या. इतक्यात तुतारी ऐकू आली, पाठोपाठच भजनाचा गजरही कानी आला व आम्ही बि-हाड सोडून सडकेच्या कडेला जाऊन उभ्या राहिलो. निरनिराळ्या दिंड्या भजन करीत चालल्या होत्या. आमची दिंडी आली व संतांची पायधूळ मस्तकी घेऊन इतर बायांप्रमाणेच मी पण दिंडीत शिरले, भजन चालू होते, “ऐसी कळवळ्याची जाति करि लाभावीण प्रीती..." सांगणे सोपे, पण होणे शक्य आहे का? का नाही? सगळ्या आयांची प्रीती अशीच नसते का? मुलांकडून काही मिळेल म्हणून असते ती? परवा जाऊबाईंच्या अंगणात मांजराने पिल्लू मारले म्हणून ती चिमणी तडफडत होती- सारखा आक्रोश करीत होती. तिची प्रीती काय लाभावर आधारलेली होती? प्रीती काय विचार करून आणता येण्यासारखी चीज आहे? ती जन्माला येते ती काय आम्हाला विचारून, परवानगी घेऊन येते? ती न विचारता हृदयाच्या धाग्या-दोऱ्यात स्वत:ला विणून घेते आणि मनुष्य आयुष्याचा मार्ग आक्रमीत असता ह्या धाग्याची ओढाताण होत असते- कित्येक अजिबात तुटून जातात व माणसे रक्तबंबाळ हृदयाने शेवटी म्हणतात, “सोडव, देवा, आता." आयांचीच का? सगळीच प्रीती लाभावीण असते, म्हणूनच तर त्यातून दुःख निर्माण होते.
 इतक्यात माझ्या शेजारच्या बाईने मला हालवले. “ही पाहा बाई पचारती घेऊन उभी आहे. जागजागी उभ्या आहेत बाया पालखीला ओवाळायला." माझी तंद्री भंगली. मी पाह लागले. सबंध रस्ता माणसांनी फुलून गेला होता. दोन्ही बाजूनी ज्ञानबा-तुकारामाच्या नावांचा घोष चालला होता. दिंडीतल्या लोकांच्या भजनाने, टाळ-मृदंगाने जग नादमय झाले होते. आम्ही गाव ओलांडन रस्त्याला लागलो. चालण्याचा वेग जरा जास्त झाला. सूर्य अभ्राच्छादित होता. वारा धों-धों वाहत होता व उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण धुंद झाले होते. आळंदी, पुणे, सासवड, वगैरे डोंगराळ मुलूख