या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १३५
 

मला झोप लागली. फराळ केला म्हणजे मी व आमच्या दिंडीतल्या एका मुलीने. बाकीच्या बायका मागून बसणार होत्या. पंढरपूरपर्यंत हाच कार्यक्रम असे. ताईला भूक लागायची. ती संध्याकाळचे लवकर खायची, मी पण तिच्याबरोबर माझे उरकीत असे. बाकीच्या बायांचे मागून व्हायचे. काहींचा उपवासाचा फराळ, काहींचा खरकटा फराळ, काहींचे नुसते दाणे व साबुदाणे असे पाच बायका व पंचवीस प्रकार असतात. सकाळच्या जेवणाची हीच रीत. काहींचा साधा सोमवार, काहींचा आळणी सोमवार, काहींचा कडकडीत सोमवार, काही दुपारी जेवणाऱ्या तर काहींचा सोमवार संध्याकाळी सुटणारा, आणि ह्याशिवाय पुरुष असत त्यांच्यासाठी संध्याकाळी निराळे फराळाचे व्हावयाचे. ही सर्व भानगड व त्यापासून उत्पन्न होणारे चौपट काम दिवसभर चालून त्या बायका कशा करीत ते त्यांच्या त्याच जाणत. पंढरपूर जवळ येत चालले तसतसे रोजच्या उन्हाने सर्वांची तोंडे काळवंडून सुकली, रोजच्या श्रमाने ग्लानी आली. बहुतेक सर्वांचेच पाय दुखत होते; पण रोजच्या कामाची कोणी फारशी कुरकूर केली नाही. त्यातल्या त्यात म्हाताऱ्या होत्या त्यांची जपणूक विशेष करीत. कोणी आजारी पडले तर औषध देत. त्यांचे कष्ट व आनंदी स्वभाव पाहून मला भारी आश्चर्य वाटे.
 पहाटे साडेचार वाजता उठलो. अंधारात कंदिलाच्या उजेडात सर्व प्रात:कृत्ये आटोपली. एकीने आडाचे पाणी काढावे, एकीने अंग धुवावे, एकीने लुगडे धुवावे असे पाळीपाळीने, घाईघाईने स्नान केले, आडाला हातरहाट होता एक व आंघोळी करणारे बायका-पुरुष होते शंभर! खूपच धादल आणि गर्दी झाली. मी मारे कपडे धुण्याच्या व अंगाला लावायच्या साबणाच्या वड्या आणल्या होत्या! त्या परत नेऊन ठेवल्या त्या पुण्याला परत आल्यावर काढल्या. अंधारात वेणीफणी करणे व कुंकू लावणे माझ्या अगदी लहानपणापासून अंगवळणी पडले होते; त्यामुळे गैरसोय वाटली नाही. माझे सर्वांच्या आधी आटोपले व आता आज पादुकांचे दर्शन करावे म्हणून सामान मोटारीत टाकून मी निघाले. पालखी चांगली अर्धा मैल आमच्या उताराच्या पुढे होती. गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला चालल्या होत्या. एका मोठ्या वावरात पालखी उतरली होती. भोवती हजारो माणसांचा मुक्काम होता. बिहाड गुंडाळण्याची तयारी चालली होती. काही बैलगाड्या व लोक मार्गी लागले होते. इतर भल्या पहाटे न्याहारीचे