या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६ / परिपूर्ती
 

ते गाणारे निघून गेल्यावर समजले की, इतका वेळ आपण पावसात चाललो होतो म्हणून! पालखीच्या वाटेवर पाच वेळा रंगण व बहधा रोज भारुडे होतात. गोल रंगण पाहण्यासाठी व भारुडे ऐकण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातून विशेष गर्दी लोटते. पालखी ठरलेल्या एका मोठ्या वावराच्या मध्यभागी नेतात. पालखीभोवती रंगण पाहणारे स्त्री-पुरुष हजारोंनी बसतात. त्यांच्यावाटली १०-१५ फूट जागा मोकळी सोडतात व त्याच्याभोवती समस्त भजनी वारकरी मंडळी आपापल्या दिंडीत टाळ वाजवीत “ज्ञानबा तुकाराम” वा “जय जय विठोबा रखुमाई'चा गजर करीत उभी असतात. मोकळ्या वर्तुळातून दोन्ही घोडे तीन किंवा पाच खेपा भरधाव घालून देवाच्या पालखीसमोर येऊन देवापुढे मान वाकवून निघून जातात. मग खेडेगावातील आलेले लोक ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे दर्शन करतात व दिंडीतील मंडळी मनमुराद खेळ खेळतात. कुणी तालावर भजन करात नाचतात, कोणी झिम्मा खेळतात, कोणी फुगड्या खेळतात, कोणी खा- खो, बेडूक उडी वगैरे खेळतात. बायका आपापसात फेर धरतात. क्वचित बायका-पुरुष मिळून फुगडी व झिम्मा चालू असतो. पुरुषांच्या खेळात बायकांना फारसा वाव नसतो, कारण त्यांचे खेळ खूप झपाट्यान व आडदांडपणे चाललेले असतात. खो-खोच्या खेळात व पटापट ओणव्या गड्यावरून उड्या मारीत जाताना किती पडतात, पण नांगरलेल्या वावरात विशेष लागत नाही. शेवटी सर्व दिंडीवाले नाचत, फेर धरीत, उड्या मारीत पालखीभोवती प्रदक्षिणा करतात व पालखी हलते. भारूडही मोकळ्या वावरातच होते. भारूड हा एक लोकनाट्याचाच प्रकार आहे. भारूडात वेदान्त, पण तो निरनिराळ्या भूमिकांनी सांगितलेला असतो. भारूड करणारेही बहुधा ठरलेले असतात. “अहो, मी राजाचा जोशी" अशी सुरुवात करून, चाळिशी घालून, दोन फूट परिघाचे पागोटे चढवून, जोशाचे सोंग संपले की तोच माणूस "हमामा पोरा हमामा" म्हणून पागोटे फेकून क्षणात वेश बदलून दुसऱ्या भारूडास सुरुवात करतो. प्रत्यक्ष एकनाथांच्या शब्दाखेरीज इतर शब्द व हावभाव खूपच असतात व पुष्कळदा अश्लालतेच्या कळस होतो. शब्दापेक्षाही हावभाव अतिशय अश्लील असतात. हे नाट्य अर्ध्या तासापेक्षा जास्त चालत नाही. बायका-पुरुष सर्व ऐकतात, पोटभर हसतात, रस्त्याला लागली की सर्व विसरतात. धार्मिक उत्सवात कामुक प्रतीके व लोकनाट्य अतिप्राचीन काळापासून चालत आली आहेत.