या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



परिपूर्ती / ५३
 

 मुलांचा खेळ संपला होता. तिघेजण फाटकाशी उभी होती. गौरी बोलत होती, “माधव, तू इथे उभा रहा. मी चंदूला पोचवून येते बरं का?" तिने चंदूला दहा पावलांवर असणा-या त्याच्या घराच्या फाटकाशी पोचवले. "नीट जा हं चंदू. धावू नकोस. पडशील वाळूवर." असे त्याला बजावून ती परत आली, माधवचा हात धरला आणि म्हणाली, “चल महाद्या, तुला पोचवते." आणि तो महादेव पण मुकाट्याने तिचा हात धरून चालू लागला. मी हसत गुणगुणले, “गौराई आमुची बाळाई, सकरुबा आमचा जावाई."