या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८ / परिपूर्ती
 

मागे सरून, हात जोडून, डोळे मिटून क्षणभर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून आसू ओघळलेले दिसले. त्यांनी उपरण्याने डोळे पुसले. “प्रभू! ठाकूरजी! मर्जी तुझी!' असे म्हणून ते बाहेर गेले. बाहेर ‘दयित' सेवक हात जोडून उभे होते. “जा, दारुशोधार्थ जा, यंदा नव्या घटाची स्थापना करायची!” अशी आज्ञा त्यांनी दिली व जड पावलांनी ते मंदिरातून परतले. इतर सेवायतांचे डोळे थोड्याशा उत्सुकतेने व करुणेने त्यांच्याकडे लागले होते. ज्या वर्षी नव्या मूर्ती बसतात त्या वर्षी भितरेछ महापात्र मरतात असा सर्वांचा समज आहे. (१९५० साली नव-कलेवर वर्ष होते व उत्सव आटपल्यावर भितरेछ महापात्र मेले अशी माहिती ओरिसा सरकारच्या माहितीखात्याने प्रसिद्ध केली आहे.) दारु म्हणजे लाकूड. देवतांच्या मूर्तीचे लाकूड काही विशिष्ट गुणधर्म व चिन्हे असलेल्या कडुलिंबाच्या झाडाचे असावे लागते. फार प्राचीन काळी जगन्नाथ हा शबर लोकांचा देव होता व तो त्यांनी गप्त ठिकाणी ठेवला होता. माळव्याच्या इंद्रद्युम्न राजाच्या विद्यापती नावाच्या पुरोहिताने शबरराजकन्येचे प्रेम संपादून देवाचे गुह्यस्थान हडकून काढले व मग इन्द्रद्युम्न राजाने देवाची जगन्नाथ ह्या नावाने पुरी येथे स्थापना केली अशी कथा आहे. विद्यापतीने शबरराजकन्येशी लग्न केले. त्याचे वंशज ते दयित (दैत्य?) सेवायत. हे दैत लोक जगन्नाथाला आपला वंशज मानतात. रथोत्सवाचे वेळी व स्नानपूर्णिमेनंतर देव त्यांच्या स्वाधीन असतात. देवाचे नवे विग्रह करण्याचे कामही त्यांचेच असते. भितरेछ महापात्राची आज्ञा मिळाल्यावर सर्वजण मिळून जवळच असलेल्या काकतपूर गावी मंगलादेवीच्या दर्शनाला गेले. तेथे एका सेवायताच्या अंगात देवीचा संचार होऊन झाडे कुठे आहेत ते कळले. मग तेथे जाऊन सोन्या- चांदीच्या कु-हाडीचे पहिले घाव घातल्यावर झाडे तोडून रथात ठेवली व वाजतगाजत पुरीला आणली. तीनही झाडांचे जाड बुंधे देवळाच्या आवारात नेऊन 'विश्वकर्मा' नावाच्या वंशपरंपरा मूर्ती घडविणाऱ्या सेवायतांच्या हवाली करण्यात आले. आता अवधी थोडा उरला होता. स्नानपूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आषाढ सुरू होतो. (उत्तरेकडे महिना आपल्याकडच्यासारखा अमावास्यान्त नसून पौर्णिमान्त असता.) तो वेळी देवतांना रंगरंगोटी चालते. त्याच्या आत मूर्ती घडल्या पाहिजेत. मर्तीचे शिल्प काही मोठे से कठीण नव्हते. मूर्ती लवकरच तयार झाल्या व