पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सह्याद्री ह्या प्राचीन गटांच्या वैविध्याने, विशेषतः इतरत्र कोठेही न आढळणाऱ्या जीवजातींनी, खरोखरच नटलेला आहे. सह्याद्रीवर सरीसृपांच्या १८७ जाती आहेत, त्यातल्या निम्म्या फक्त इथेच सापडतात; बेडकांच्या शंभर जाती आहेत, त्यातल्या ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० आपल्याच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती फक्त सह्याद्री व लंकावासी आहेत आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. अर्वाचीनांपैकी सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. सह्याद्रीचे जैविक ऐश्वर्य हिमालयाच्या तुलनेने कमी. तरीही इथल्या हजारो जीवजाती केवळ भारतात सापडणाऱ्या आहेत. उलट हिमालयात अशा निखळ भारतीय जीवजाती जवळ-जवळ नाहीतच. कारण आपला हिमालय पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगला देश, चीन, ब्रह्मदेश यांना जोडून आहे. थोड्याच पक्षी जाती, ५३, केवळ भारतापुरत्या मर्यादित आहेत. यातल्या १७ अंदमान-निकोबारात आहेत; १४ सह्याद्रीपुरत्य आहेत, आणखी १५ सह्याद्री व भारतात इतरत्र सापडतात. तुलनेने ५३ पैकी केवळ ४ जाती भारतातील हिमालयापुरत्या मर्यादित आहेत. वसंत बापट म्हणतात, "भव्य हिमालय तुमचा- अमुचा, केवळ माझा सह्यकडा". भारताची जीवसृष्टीही वसंत बापटांच्या सुरात सूर निश्चितच मिळवेल. विज्ञानाला, कायद्यांना ठोकरणारा असंतुलित विकास ह्या भारताची सार्वभौम संपदा, खास आपल्याच अशा वन्य जीवजाती, तसेच पाळीव पशूंची, शेतीतली, बागायतीतली जनुकीय संसाधने सगळीकडे फैलावलेली आहेत; वनांत, तसेच नद्यांत, सड्यांवर, शेती, बागायतीतसुद्धा. ह्यांना टिकवण्यासाठी केवळ राखीव जंगलांत, अभयारण्यांत नव्हे तर पश्चिम घाटभर सर्वत्रच जैवविविधतेला अनुकूल असा परिसर जोपासायला हवा. ह्यासाठी पश्चिम घाटाचा आर्थिक विकास करताना शास्त्रीय माहिती नीट विचारात घेऊन सम्यक धोरणे आखायला हवीत. दुर्दैवाने आपल्या आजच्या कुशासन प्रणालीत माहितीचा, ज्ञानाचा,, विज्ञानाचा सुयोग्य वापर होतच नाही. सह्याद्रीची आर्त हाक! २०