या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(चौदा) महात्मा फुले : समग्र वाङ्मय नव्या भारतीय समाजरचनेच्या स्थापनेस आवश्यक असलेली, मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांनी आवेशाने सांगितली. या गोष्टीला आज महत्त्व आहे. जोतीराव फुले यांचे इंग्रजी शिक्षण शालान्त परीक्षेपलीकडे गेले नव्हते. इंग्रजी विद्यारूपी वाघिणीचे दूध जन्मतः जे वाघ नाहीत त्यांना कितीही मिळाले तरी त्यांचे नरव्याघ्र बनू शकत नाहीत. इंग्रजी विद्येमध्ये पारंगत झालेले व विद्यापीठामध्ये उच्च पदव्या संपादन केलेले शेकडो सुशिक्षित भारतात झाले. परंतु ते जन्मतः नरव्याघ्र नव्हते. त्यात थोडेच नरव्याघ्र होते. त्यांनीच आधुनिक युगाला आवाहन देणारे आणि परंपरागत मध्ययुगीन समाजरचनेला उखडून टाकणारे समाजक्रांतीचे विचार, एकाकी राहण्याची पर्वा न करता, घोषित केले. या नरव्याघ्रांच्या घोषणांनी एकोणिसावे शतक हादरत होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्याच्या स्थापनेनंतर ती जुनी समाजरच आता त्याच विचारांच्या शक्तीमुळे खिळखिळी होऊन कोलमडू पाहत आहे. या पहिल्या नरव्याघ्रांचे जोतीराव फुले हे अग्रणी म्हणून शोभतात. जोतीरावांचा विचार हा मानवी स्वातंत्र्याकडे व समतेकडे नेणारा विचार होता हे रहस्य त्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांना फारच उशिरा उमगले. “गुलामगिरी' या त्यांच्या पुस्तकाची अर्पणपत्रिका त्यांचा उद्देश सूचित करते. “गुलामगिरी" या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीची अर्पणपत्रिका पाहावी. निग्रो गुलामांना मुक्त करण्याकरिता आत्मार्पणपूर्वक आंदोलन चालविणाऱ्या लोकांना “गुलामगिरी' हे पुस्तक त्यांनी अर्पण केले आहे. भारतातील परंपरागत समाजसंस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हणजे जोतीबा फुले होत. अशा बंडाची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली ? भारतातील परंपरावादी समाजसंस्थांची व या समाजसंस्थांच्या नियमधर्माची पकड हजारो वर्षे येथील जनमनात पक्की बसलेली होती. या ठिकाणी सामाजिक जन्मसिद्ध उच्चनीच भाव हे ईश्वरी संकेताने व माणसांच्या पूर्वकर्माने निर्माण झालेले आहेत, म्हणून यांच्याविरुद्ध प्रयत्न करणे, हे महापाप आहे अशी समजूत होती. या महापापाची म्हणजेच अपवित्रतेची भीती येथील जनमानसात कायम घर करून बसली होती. ही खोलपणे सहस्रावधी वर्षे रुजलेली भीती घालविणारी जबरदस्त प्रेरणा जोतीबा फुले यांना कुठून मिळाली? जोतीबा फुले यांच्या महात्मतेचे रहस्य जाणण्याकरिता या प्रश्नाचा उलगडा करणे, ही आज अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. जोतीबा फुले यांना जी भयंकर सामाजिक बंधने दिसली, ती तोडण्याचे जबरदस्त शिक्षण त्यांना कुठून प्राप्त झाले, याचे उत्तर शोधणे म्हणजेच त्यांच्या महात्मतेच्या रहस्याचा शोध घेणे होय. नवीन ध्येयांचा प्रत्यय आल्याशिवाय, नवीन प्रकारच्या सामाजिक उद्दिष्टांचा अर्थ समजल्याशिवाय, परंपरागत सामाजिक संस्था नष्ट करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकत नाही. केवळ विनाशाकरिता विनाश, म्हणून विनाशाकरिता प्रवृत्त होणे