दुष्काळविषयक विनंतीपत्रक मेहेरबान पुणे, मुंबई वगैरे ठिकाणचे सभासद यांस वि. वि. समाजाचे हुकुमावरून आपणांस विनंतीपूर्वक असे कळविण्यांत येते की, समाजाचे मार्फत "व्हिक्टोरिया बालाश्रम स्थापन केले आहे. घरांत दुष्काळपीडीत लोक आपली मुलें सोडून जाऊ लागले आहेत व त्याप्रमाणे इंदापूर, मिरज व तासगांवकडील ब्राह्मणजात खेरीजकरून बाकी सर्व जातींतील कित्येक अनाथ लोक आपली मुलेबाळे घेऊन जमले आहेत. कधी कधी दोन दोन तीन तीन दिवसांचे उपवास काढून त्यांची हाडे मात्र उरली आहेत. शिवाय त्यांचे वस्त्रावांचून इतके हाल झाले आहेत की, त्यांचे येथे वर्णन करण्यास मला दुःख वाटतें. यावरून आपण सर्व सभासदांनी व इतर दयावंत गृहस्थांनी कृपाळू होऊन, आपल्या शक्तीनुसार कांही ना कांहीं तरी, ही जाहिरात पाहतांच मदत पाठविण्याची त्वरा केल्यास आपण आपले कर्तव्यकर्म अशा वेळी बजावल्याचें श्रेय होणार आहे. -समाप्त- ता. १७ माहे मे. सन १८७७ इ. आपला सेवक, जोतीराव गोविंदराव फुले, स. शो. स. चिटणीस. (ज्ञानप्रकाश, २४ मे १८७७)
पान:Samagra Phule.pdf/२७८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही