या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली, नीतीविना गती गेली! गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. उद्देश, शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूनें हा पुढील ग्रंथ रचिला आहे. शूद्र शेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐषआरामी असल्याचे योगाने, ब्राह्मण कामगारांकडून नाडले जातात. त्यांपासून त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगानें आपला बचाव करिता यावा असा हेतू आहे, म्हणून ह्या ग्रंथास "शेतकऱ्याचा असूड' असे नांव दिले आहे. वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करूं लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक लोक आपले शेतकीचें काम सांभाळून बागाइती करूं लागले, ते माळी व जे हीं दोन्हीही करून मेंढरें, बकरी वगैरेचे कळप बाळगूं लागले, ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आतां या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्त बेटी १- व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व कांही होतें. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत. आतां पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायानें सोडून उदरनिर्वाहास्तव नानातऱ्हेचे धंदे करूं लागले. ज्यांजवळ थोडेबहुत अवसान आहे ते आपली शेती संभाळून रहातात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडे नागडे व भुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाहीं, ते देश सोडून जिकडे जिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटें व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटीं पेनशनें घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीनें पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुलें, ज्यांस विद्येची गोडीच नाही अशी, त्यांची थोड्याच काळांत बाबूके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नांवानें पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनी शिपायगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, 9 शूद्रांचे कुलस्वामी जेजुरीचे खंडेराव यांनी शूद्र (कुणबी) कुळांतील म्हाळसाई व धनगरांतील बानाबाई अशा दोन जातींतील दोन स्त्रिया केल्या होत्या, यावरून पूर्वी कुळवाडी व धनगर यांचा आपसांत बेटीव्यवहार होत असे.