सत्सार, नंबर १ सत्यशोधक समाजांतील शूद्र सभासदांचे अनेक गृहस्थांबरोबर संभाषण झालें, त्यापैकी थोडथोड्या मुद्याच्या गोष्टी येथें घेतल्या आहेत, त्या आमचे सूज्ञ विचारशील वाचकांपुढे सादर करितों. शूद्र-प्रश्न- ज्या वेळीं पुण्यांत पंडिता रमाबाईनें येऊन हिंदुधर्मप्रतिपादक अनेक व्याख्यानें दिलीं, त्या वेळीं मला यांच्या व्याख्यानांची फारशी थोरवी वाटली नाही. कारण हिंदु धर्माचे उत्पादकांनी स्त्री व शूद्रादि अतिशूद्र जातीवर कोणकोणत्या प्रकारच्या अगी पाखडून त्यांजवर अनेक प्रकारचे जुलमी लेख केले, हें बिचाऱ्या गाई बापुड्या पंडिता रमाबाईस माहीत कोठून ! परंतु त्यांनी विलायतेस जाऊन हिंदु व ख्रिस्ती धर्माची तुलना केल्यामुळे त्यांस हिंदु धर्माचा हेकड व पक्षपातीपणा दिसून आल्याबरोबर त्यांनी हिंदु धर्माचा धि:कार करून ख्रिस्ती धर्माचा अंगिकार केला किंवा कसे ? याविषयी सर्वांनी आपली खात्री करून घ्यावी, म्हणून आपण पंडिता रमाबाईस परत हिंदुस्थानांत बोलावून घ्याल, तर फार लोकांचे डोळे उघडणार आहेत. व अशा शोधक साध्विनीस पहाण्याची कित्येकांस फार इच्छा झाली आहे. ब्राह्मण-उत्तर- त्यांच्या घरगुती पत्रावरून असे दिसून येतें कीं, त्या आतांशी ब्रह्मधर्माचा बारीक शोध करीत आहेत व त्या थोड्याच काळांत परत हिंदुस्थानांत येतील असे मला वाटतें. शूद्र- मुख, बाहू, जांग आणि पद यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रास जन्म देणारें ब्रह्म म्हणावें, किंवा अति लाजिरवाण्या पक्षपाती ग्रंथ करणाऱ्या मनूस जन्म देणाऱ्यास ब्रह्म म्हणावें, अथवा तुमच्यांतील कित्येक तर्कबाजांनी या सर्व सृष्टिउत्पन्नकर्त्या आदिकारणास दिलेलें ब्रह्म नाव म्हणावे. यांतून तुम्हा ब्रह्मसमाजाचें खास ब्रह्म कोणते, हें तरी एकदाचे कळू द्या ? ब्राह्मण- आम्हां ब्रह्मसमाजाचे ब्रह्म म्हणजे त्याला जातिभेद वगैरे काही नाहीं. तें निराकार परब्रह्म आहे. शूद्र- ज्यापेक्षां तुम्ही ब्रह्मसमाजियन जातिभेद मानीत नाहीं, त्या अर्थी आपण सर्व ब्रह्मींनी प्रथम एकंदर सर्व मांगमहारांस ब्रह्मी करून त्या आपल्या ब्रह्मसमाजांत, सामील करून का घेत नाही ?
पान:Samagra Phule.pdf/४०६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही