या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न १९ विदूषक : सावकार तरी कर्ज देऊन, सोईनेच तगादा बसवून फेड करून घेतात, परंतु जोशासारखे घाबरे करून, मोठ्या उतावळीने घेत नाहीत बा! स्त्री : तुम्ही असें करा, मी सांगते ते तुम्ही कोण एखाद्या शिंप्याजवळून दोन दिवसाच्या बोलीने धोतर जोडा जांगड कुणब्याला दाखवायापुरती आणा व तो रुपये घेऊन आला म्हणजे मी त्यास असे सांगेन की तूं रुपये मजजवळ दे म्हणजे मी हे रुपये जोशीबुवाकडे कोणाच्या हाती पाठवून देते, कारण त्यांनी तुझी वाट बरीच पाहिली खरी, परंतु त्यांना तर ब्राह्मण सांगण्याची फारच जलदी होती, असे सांगून मी त्यापासून रुपये आपल्याजवळ घेऊन ठेवीन, मग तुम्ही दामू दाजीबास द्या, अथवा जांगड कायम करा. विदूषक : बाई !!! किती तरी एकल्या पोटासाठी लबाड बोलावें! जोशी : योजना तर फारच उत्तम आहे, पण तूं रुपये आपल्याजवळ घेऊन ठेवल्यास किमपि कमी करूं नको बरें? स्त्री : वाः! मी बायको कोणाची तुमची ना? असे कसे होईल, मी तो आल्याबरोबर, त्याला घाबरा करून पाहिजे असल्यास आधी रुपये मजजवळ घेऊन, मग त्यास उतरूं लागेन याविषयी तुम्ही काळजी करूं नका. विदूषक : कुणब्याजवळून आधी रुपये घेऊन, मग त्यास उतरू लागेन म्हणे. वाः केव्हढी ही भूतदया की जिचा पारच लागत नाही! जोशी : बरे तर, तूं हुशार आहेस, आता याविषयी मला काळजी करणें नलगें. तू तें काम करशील. स्त्री : काय हो? हा कुणबी घरचा काही सधन आहे काय? असल्यास त्याजकडून अशीच दोन तीन भोजने काढा. जोशी : तू म्हणतेस तसे काही नाही, हा जर घरचा सधन असता, तर मी त्यास सांगून असें पांच वेळ ब्राह्मणभोजन घालण्याचा पाया रचला असतां आणि त्यांचे घरी मला हरीविजय वाचीत बसण्याची काय हरकत होती? बरें, कदाचित हे त्याचे कर्ज फिटेल तर पुढे याविषयी पाहाता येईल; परंतु तूं त्याला असे सांग की, आज रात्री तू आमच्या येथेच निजावयास ये; कारण उद्या प्रातःकाळी भांडी वगैरे घासून देण्यास आमच्या येथे मोलाचा गडी बोलविला नाही आणि हेही त्यास सांग की आम्ही मोलकरी बोलवला असतो, परंतु त्या सर्व कृत्याला दहा रुपये पुरे होतील किंवा न होतील हीच आम्हाला मोठी काळजी येऊन पडली आहे. विदूषक : अहो सर्व माळ्या कुणब्यांनो! तुम्ही या संवादास मनन करून वाचाल अथवा ऐकाल, तर खचित तुम्ही असें सिद्ध कराल, की आपल्या घरावर दरवडा पडला (तरी) पुरवेल पण ब्राह्मण जोशांवर भरवंसा ठेवणे आपल्या स्वप्नी सुद्धां नको!