या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१५ परिशिष्ट २ महात्मा फुले यांच्याविषयीचा पत्रव्यवहार या परिशिष्टात महात्मा फुले यांच्याविषयीची चार पत्रे छापली आहेत. जोतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली आणि त्या समाजात सभासद म्हणून प्रवेश देताना काय केले जात असे याची माहिती देणारे पत्र तुकाराम हनमंत पिंजन यांचे आहे. “पुरोगामी सत्यशोधक" या त्रैमासिकाच्या (वर्ष ३, अंक १ ) जानेवारी ते मार्च १९७७ च्या अंकात ते प्रथम प्रसिद्ध झाले आहे. (पृ. ४८-४९ ) श्री. पिंजन यांनी हे पत्र ११ जुलै, १९२३ रोजी लिहिलेले आहे आणि त्याची मूळ प्रत डॉ. आर. एम. पाटील यांनी त्यांच्या संग्रहातून डॉ. बाबा आढाव यांना उद्धृत करण्यास अनुमती दिली होती. नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद यांनी बडोद्याचे दिवाण रामचंद्र विठोबा धामणसकर यांना जोतीरावांसंबंधी लिहिलेली तीन पत्रे मामा परमानंदांचे चरित्रकार श्री. पु. बा. कुलकर्णी यांच्या “मामा परमानंद आणि त्यांचा कालखंड” या १९६३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून (पृ. ४८३-४८७) घेतलेली आहेत. जोतीराव पक्षघाताने आजारी असताना त्यांनी चाळीस वर्षे सातत्याने केलेल्या सार्वजनिक कार्याबद्दल त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा तीस रुपये द्यावेत असे मामा परमानंदांनी बडोद्याचे दिवाण रामचंद्र विठोबा धामणसकर यांना लिहिलेले आढळते. एका समकालीन सुधारकाने जोतीरावांच्या कार्याबद्दल व्यक्त केलेले मत या दृष्टीने मामा परमानंदांचे ३१ जुलै, १८९० चे पत्र महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने मामा परमानंदांनी केलेली सूचना सयाजीराव गायकवाडांच्या विचाराधीन असतानाच जोतीरावांचे निधन झाले. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई हयात असेपर्यंत आणि यशवंतराव फुले यांचे शिक्षण पुरे होईपर्यंत सयाजीराव गायकवाड दरमहा काही रक्कम सावित्रीबाईंना पाठवीत असत.