या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरिबांनाही हजारोंनी ठार मारिले, हद्दपार केले, कुटुंबियांची ताटातूट करून अपार दुःख दिले. त्यांच्या मते त्यांनी अंतिम धर्म शोधून काढला आहे. धर्म म्हटला की, त्या धर्माचे रक्षण करणारे, त्या धर्माचे स्मृतिकार, टीकाकार, उपदेशक निर्माण होणारच. हे सर्व मिळून मूळच्या लवचिक कल्पनांना एका पोलादी चौकटीत बसदितात; व मग त्या धर्माच्या क्षुद्रतम यमनियमांविरुद्ध बोलणे पाप ठरते. पृथ्वीच्या ज्या विभागावर ख्रिस्ती धर्मासारख्या एकेश्वरी पंथाचा पगडा होता, त्या युरोपातच कम्युनिस्ट मतप्रणाली उगम पावली, ही ऐतिहासिक घटना लक्षात ठेविली पाहिजे. ख्रिस्ती पंथाची विचारसरणी कम्युनिस्टांनी तंतोतंत उचलिली आहे. कम्युनिस्ट हा एक घट्ट बांधलेला, परस्परांशी बंधुभाव असलेला पृथ्वीव्यापी सघ बनला आहे. ह्या संघाच्या आतील व्यक्तींची आचारधर्माची बंधने वैदिकांनाही लाजवितील इतकी कडक आहेत; तर संघाबाहेरच्या व्यक्तींच्या विषयीचे वर्तन रानटी लोकांचे परसंघाविषयी असते, त्यापेक्षाही द्वेषाचे आहे. साम, दाम, भेद व दंड ह्यांपैकी काहीही वापरून कम्युनिस्ट नसलेल्यांना कम्युनिस्ट करावयाचे, हा संघाबाहेरच्या लोकांविषयीचा त्यांचा एकमेव दृष्टिकोण आहे. कम्युनिस्टांच्या मते त्यांना अत्युच्च मूल्य, परमधर्म सापडलेला आहे. जगाचा इतिहास व सध्याचे मानवी समाज ह्यांच्या परिशीलनाने मार्क्स, एंगेल्स वगैरे द्रष्ट्यांना ह्या मूल्याचे दर्शन झाले. त्यांच्या मते हा धर्म सार्वजनिक म्हणजे सर्व मानवजातीला लावण्यासारखा आहे. तो सार्वदेशिक म्हणजे सर्व परिस्थितीत उपयुक्त आहे; व सार्वकालिक म्हणजे सर्व काळी उचित असा आहे. एकदा साध्य ठरले, म्हणजे साधनांच्या नैतिक मूल्यांची चिकित्सा करणेही कम्युनिस्टांना पसंत नाही येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. समताधिष्ठीत मानवसमाजाची निर्मिती होण्यास कष्टजीवी लोकांच्या हाती सत्ता गेली पाहिजे; पण एकदा असा मानवसमाज निर्माण झाला, म्हणजे कोणीच सत्ताधारी राहण्याचे कारण नाही, अशी मार्क्सची कल्पना होती. पण आता तिचा उच्चार होताना ऐकू येत नाही.

९८

।। संस्कृती ।।