या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहा


सीता


 सीता. एक स्वप्न, एक शल्य किती जुने ? आठवते तेव्हापासूनचे. समोर रामविजयाची पोथी मी अक्षरे लावून लावून मोठ्याने वाचते आहे. आई अर्थ सांगते आहे. पोथीतून कुठचा कथाभाग मनात रुजला, ते काही आठवत नाही. फक्त एक पचंड पुस्तक, त्यातील मोठी अक्षरे आणि दर अध्यायाच्या आरंभीचे पानभर चित्र एवढे आठवते. पहिल्याने सीता हे नाव वाचले आणि ह्या-ना-त्या निमित्ताने ते सारखे आजही माझा पाठपुरावा करीत आहे.
 माझ्या आजीचा आवाज गीड नव्हता, पण तिची गाणी फार गोड. ती सीता-सैंवर म्हणायची, "कोण तूझ्या मनात येतो सांगे गो सीते ।....बाई तो काय नव्हे ग....."
 मला ते गाणं पाठ म्हणता आलं नाही, व नंतर पुढे कुठे आढळलेही नाही. पुण्याला कोणीतरी 'राघव कोमलतनू गडे ग राघव कोमलतनू । कमलपृष्ठसम... हे शिवधनू' हे गाणे म्हणायचे.
 विठोबा - अण्णांचे असावे की काय, असे वाटते. पण तेही संबंध कुठे सापडले नाही.
 लहानपणीच्या गाण्याचाच आशय शाळेत वामन पंडितांनी ऐकविला. परत सीतास्वयंवर, परत रावणाची फजिती. 'हळुहळु अमलांगी गोरटी राजबाळी, जवळजवळ आली डोलते घोसबाळी' हे सीतेचे वर्णन. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
 हे होते आहे तो संस्कृत सुरू झालेले. वाल्मीकि रामायणातले श्लोक, नंतर कालिदास, नंतर भवभूतीचे उत्तररामचरित. शिकवायला एक असामान्य

।। संस्कृती ।।

४५