या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सत्यवती एका प्रकारे कुरुकुलाचा संहार घेऊनच जन्माला आली होती. जिच्यामुळे महाभारताचे युद्ध शक्य झाले, अशा ह्या असामान्य सौंदर्यवतीचे हे अगदी सामान्य, कर्तव्यशून्य व प्रवाहपतित आयुष्य. त्याचबरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, सत्यवतीला कोठच्याही तऱ्हेने जबाबदार धरता येत नाही. ती एक अपाप, अश्राप असे दैवगतीचे कारण होती. ह्यापलीकडे तिने आपणहून असे काहीच केले नव्हते. तिने आपण होऊन कोणाचा द्वेष केला नाही व कोणावर प्रेमही केले नाही. द्वेष आणि प्रेम ही स्वतंत्रांनाच शक्य असतात. तिच्यासारख्या सर्वस्वी परतंत्रांना नसतात. आपण परतंत्र आहो हे तरी बिचारीला जाणवले होते की नाही, कोण जाणे!
 सत्यवतीच्या मानाने सत्यवतीच्या सुनांचे आयुष्य जास्तच करूण वाटते. सत्यवतीच्या रूपाने काहींना भुरळ घातली. कोळ्याची मुलगी असून काही वर्षांपुरती का असेना राणी झाली. तिचे आयुष्य परतंत्र असूनसुद्धा पुढच्या पिढीतील लेखकांना तिच्याबद्दल काव्यमय भाषेत लिहावेसे वाटले. बिचाऱ्या अंबिका-अंबालिकांची आठवण मात्र कोणालाच झाली नाही. आपल्या थोरल्या बहिणी बरोबर विवाह-मंडपात त्या मिरवत होत्या. प्रत्येकजण जमलेल्या राजांपैकी कोणाला तरी माळ घालणार होती. पण भीष्माने तिघींनाही पळवून आणले. पळवून नेण्यामधे मानहानी नाही. कारण पळवून नेणारा हिकमती व शूर असावा लागे. पण भीष्माने त्यांना पळवले होते ते आपल्या दुर्बळ, आजारी भावासाठी, स्वतःसाठी नव्हे.
 आजारी विचित्रवीर्याचे लग्न इतक्या तातडीने करण्यात दोन उद्देश होते. एक, लग्न झाले तर मरायच्या आत मुले होण्याचा, निदान राण्यांना गर्भ राहण्याचा संभव होता. दुसरे, राजा मुलाशिवाय मेला, तरी लग्नाच्या बायका म्हणजे हक्काचे शेत. त्यांच्याकडून शेतमालकाच्या नावावर म्हणजे नवऱ्याच्या नावावर संतती उत्पन्न करून घेणे शक्य होई. हाच तो बीजक्षेत्रन्याय.
 लग्न झाल्यावर विचीत्रवीर्य काही वर्षे जिवंत होता. पण त्याला संतती झाली नाही; आणि शेवटी दिराशी संबंध ठेवूनच विधवा राण्यांना संतती उत्पन्न करावी लागली. आपल्या सासूला कुमारवयात मुलगा झालेला आहे.

।। संस्कृती ।।

५७