या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगदी तोच प्रकार आचार व त्याचे मूल्यमापन ह्यांच्या मुळाशी असतो. अमका चांगला का, ह्याचे ज्ञान होण्याच्या आधीच समाजधर्माचे आकलन त्याला झालेले असते. आईबाप, भावंडे, कुटुंबातील इतर माणसे, शेजारी- पाजारी, सवंगडी ह्या सर्वांनी मिळून सामाजिक मूल्ये व्यक्तीच्या गळी उतरविलेली असतात. व्यक्तीचा देह परंपरागत रितीने तयार केलेल्या अन्नावर पोसतो, तर व्यक्तीचे मन परंपरागत आचार विचार आत्मसात करून विकसित होत असते. लहानपणचे संस्कार म्हणजे मनाची प्रकृतीच होऊन जाते. ज्या अंतःकरणाच्या प्रवृत्ती प्रमाण म्हणून कालिदास सांगतो. त्या ह्या अशा विचार करण्याची शक्ती येण्याच्या आतच तयार झालेल्या असतात. काही व्यक्तींच्या जीवनात सामाजिक मूल्यांबद्दल विचार करण्याचा प्रसंगच येत नाही. पण बऱ्याच व्यक्तींना कधी-ना-कधी तरी समाजाची अपेक्षा व व्यक्तीगत आकांक्षा ह्यांमध्ये विसंगती जाणवते; व मग सामाजिक मूल्यांच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार सुरू होतो.
 समाजाच्या मूल्यांचे ज्ञान व स्वीकार व्यक्तीकडून कसा होतो, हे आपण थोडक्यात पाहिले. सामाजिक मूल्यांची उत्पत्ती होते कशी, ह्याचे उत्तर संपूर्णतया देण्याचे हे स्थान नव्हे; पण त्याचा विचार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 'सामाजिक मूल्ये ही एकदा बनली: कशी कोण - जाणे!' असे म्हणण्याचे कारण नाही. ती सदैव नवनवी बनत असतात. जुनी नष्ट होतात, किंवा बदलत जात असतात. आजच्या समाजात ज्या क्रिया चाललेल्या आहेत, तशाच पूर्वीही चालत असल्या पाहिजेत, हे तर सर्व शास्त्रीय ज्ञानाचे व संशोधनाचे सूत्र आहे. आज जशी मूल्ये बनताना आपण पाहतो, तशीच क्रिया अव्याहत चालत असली पाहिजे. मूल्ये फक्त समाजजीवनातच उत्पन्न होऊ शकतात. मनुष्याचे लहान मूल एकाकी वाढणे शक्य नाही. पण कोणी जनावराने एखादे मूल वाढविले, किंवा एखाद्या मुलाला जनसंपर्कापासून दूर एखाद्या खोलीत कोंडून घालून वाढविले, अशा गोष्टी झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने वाढलेला मानव मनुष्याचे म्हणून म्हटले जाणारे कोणतेच व्यवहार करू शकत नाही. त्याला दोन पायांवर चालता येत नाही, की शब्दोच्चार करता येत नाही. व्यक्ती व तिचे व्यक्तित्व ही फक्त समाजजीवनात उत्पन्न होऊ शकतात. 'मी'चा उगम 'आम्ही'तून होतो.

।। संस्कृती ।।

६७