या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजाची नियंत्रक शक्ती शिक्षेच्या रूपाने सर्वांच्या प्रत्ययास येते. समाजाला आवडणारी कृत्ये व समाजाला नावडणारी कृत्ये व त्यांना मिळणारी बक्षिसे व शिक्षा ह्यांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. विशेष दैवतवादावर आधारलेल्या मताला हल्ली वाङ्मयात 'धर्म' म्हणतात; व ह्या स्थळी त्याला आपण 'संप्रदाय' म्हटले आहे. सांप्रदायिक दृष्ट्या जे समाजाला पर्यायाने संप्रदायाला- आवडते त्याला 'पुण्य', व जे नावडते त्याला 'पाप', अशा संज्ञा आहेत. इतर लौकिक व्यवहारात, विशेषतः जेथे समाजाची दंडयंत्रणा कामी येते, अशा वेळी न आवडणाऱ्या कृत्यांना 'गुन्हा' किंवा 'अपराध' म्हणतात. समाजात दुष्कृत्यांना दंडण्यासाठी पुष्कळ संस्था असतात. सत्कृत्यांना उत्तेजन देणाऱ्या संस्था त्या मानाने कमी असतात. तिसरी जोडी चांगले-वाईट, 'सत्-असत् ह्या शब्दांनी सूचित केली आहे. ह्या प्रकारात कृत्य व त्यामागची बुद्धी ह्यांचा विचार केलेला असतो; व बहुतेक वेळी फक्त एका समूहापुरतीच दृष्टी मर्यादित न ठेविता ती बरीच व्यापक असते. ह्यालाच नीतिविचार म्हणतात. पाप व पुण्य हे प्रत्येक समाजाच्या सांप्रदायिक मतावर अवलंबून असते; गुन्हा किंवा निरपराधित्व त्या-त्या वेळच्या कायद्यावर अवलंबून असते; पण 'सत्' व 'असत्' हे शब्द जे मूल्य दर्शवितात, त्यात मनुष्यसमाजाचा खोलवर विचार केलेला असतो, व ते बऱ्याच अंशी विशिष्ट समाज व विशिष्ट काळ ह्यांपुरतेच मर्यादित नसते. सांप्रदायिक पापपुण्यविचार, दंडनीतीतील अपराधविचार वरील प्रकारच्या सद्सद्विवेकाच्या जितके जवळ येतील, तितके जास्त जास्त व्यापक होऊ लागतात व आचारांचे स्तोम कमी-कमी होऊ लागते. सदसद्विचारसुद्धा दिक्काल निरपेक्ष नसतो - का पुढे पाहू. पण त्याआधी समाजात जी मूल्ये तयार होतात, ती कोणासाठी व त्यांचे कार्य काय, हे थोडक्यात समजावून घेणे अवश्य आहे.
 मनुष्य नेहमी समूहात राहिलेला आहे. एकाच वेळी निरनिराळ्या समूहांत त्याला निरनिराळे स्थान असते. ते स्थान असणाऱ्याकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात. वयःपरत्वे व्यक्तीला जास्त जास्त समूहांतून स्थान मिळत जाते, आणि निरनिराळ्या भूमिका वठवाव्या लागतात. ह्या भूमिका वठवितानाच

७६

।। संस्कृती ।।