या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले, त्यांचा संघर्ष झाला. हळूहळू त्यांच्यातूनच नवे मोठमोठे संघ निर्माण झाले. हे नवीन समाज घडणीच्या दृष्टीने गुंतागुंतीचे झाले. अनेक दैवते, अनेक वर्ग, अनेक मानववंश एकत्र होऊन हे समाज बनलेले होते; व त्यांच्याचपासून आजच्या निरनिराळ्या समाजांची उत्पत्ती झाली.
 संस्कृतीच्या प्रथमावस्थेतील मानवी संघ व सध्याच्या बऱ्याचशा वन्यजमाती ह्यांच्या समाजाची घडण काही बाबतीत बरीच साधी असते. समाजातल्या उच्चनीचपणाचा जवळजवळ अभाव असल्यामुळे व समाज लहान व एकसंध असल्यामुळे बरेचसे नियम सर्वांना लागू पडतील असे होते. बहुधा स्त्रियांसाठी निराळे नियम बऱ्याच वन्य समाजांतही आढळतात. पण निरनिराळे संघ एकत्र येऊन जे मोठमोठे समाज बनले, त्यांची घडण मात्र फारच गुंतागुंतींची झाली. त्यातही निरनिराळे वर्ग, जाती, मानववंश एकत्र आल्यावर जे नियम झाले, त्यांतील फारच थोडे सर्व समाजाला लागू पडतील असे झाले. मनुस्मृती वाचीत असताना हे ध्यानात येते की, त्यातील बहुतेक नियम त्रैवर्णिकांचे आहेत. चौथ्या वर्णात ज्या असंख्य जाती-जमाती होत्या, त्यांच्याबद्दल जे नियम आहेत, ते फक्त त्या सर्वांनी त्रैवर्णिकांशी कसे नमून वागावे, ह्याबद्दलचे आहेत, त्यामुळे प्रत्येक जातीच्या अंतर्गत व्यवहाराबद्दल काही वाद झालाच, तर त्या जातीच्या वृद्धांना बोलावून परंपरागत आचार काय आहेत, हे समजावून घेऊन नंतर तो वाद राजदरबारी निकालात निघे. भारतात एक समज होता असे गृहीत केले, तर निरनिराळ्या प्रदेशांत व निरनिराळ्या जमातींच्या रीतिरिवाजांत जी विविधता आढळते, ती इतर कोठेही सापडणे अशक्य आहे. सामाजिक मूल्ये चिरंतन तर नाहीतच, पण सांप्रत काळीसुद्धा प्रत्येक जमातीत ती निरनिराळी आहेत, असे दिसून येईल. ह्याची उदाहरणे देण्याचीसुद्धा आवश्यकता नाही, इतकी ती सर्वांच्या माहितीची आहेत. उत्तरेकडे नात्यातल्या नात्यात लग्न करणे गैर समजतात. तर दक्षिणेकडे आतेमामेभावंडाचे व मामा भाचीचे लग्न होणे ही नित्याचीच गोष्ट आहे. ओरिसात व बंगालात ब्राह्मण मासे खातात, तर दक्षिणेत ब्राह्मणशाकाहारी असतात. केरळातील स्त्रिया पूर्वी उरोभाग झाकीत नसतः तरी त्या भारतातील इतर स्त्रियांइतक्याच विनयवती होत्या.

८०

।। संस्कृती ।।