या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. असे मुळीच नाही. पण तरीही ती एका तऱ्हेने 'निवड' असते; कारण त्या एका मार्गाशिवाय इतर मार्गांनी जाण्याची शक्यता असते. मार्गांची अनेकता व त्यांतील एकाची ( यदृच्छया का होईना) निवड ही माणसाची वैशिष्ट्ये होत. ह्याखेरीज मानवाने काही सांस्कृतिक गरजा निर्माण केल्या आहेत. वर काही मूलभूत गरजा सांगितल्या, त्या काही दृष्टींनी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. चार लोकांनी चांगले म्हणावे, चार लोकांसारखे वागावे, मोठ्यांचे अनुकरण, हुकमत गाजवून काहींचे का होईना पुढारीपण असावे अशी इच्छा, वगैरे आणखी कितीतरी अशा गरजा आहेत की, त्या समाजात राहण्यामुळे, सांघिक जीवनामुळे निर्माण झालेल्या आहेत. ह्याही गरजा मूलभूत व इतर प्राणी व मनुष्य ह्यांना साधारणच आहेत. पशुपक्ष्यांमध्येही वरील सर्व तऱ्हांच्या गरजांपासून उत्पन्न होणाऱ्या क्रिया, प्रतिक्रिया दिसून येतात. ज्यांना सांस्कृतिक गरजा म्हटले, त्या ह्यांखेरीज निराळ्याच व मनुष्याला विशिष्ट, इतर प्राण्यांना नाहीत, अशा असतात. संस्कृती म्हणजे संचय. संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाला श्रीमंत करणारी भूतकाळाची कर्तबगारी. जे-जे म्हणून मागील पिढीकडून मिळालेले असेल, - घरे दारे, रस्ते, शहरे, द्रव्यसंचय, इमारती, समाजसंस्था, दैवते, श्रद्धास्थाने, हे सर्वच संस्कृत मोडते. त्याचप्रमाणे संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाभोवती भूतकाळाचा पडलेला पाश, स्वैर वागण्याला पडलेल्या मर्यादा, नवीन कल्पना, नवीन प्रयोग ह्यांची गळचेपी करणारे पिशाच्च. सांस्कृतिक गरजा किंवा इच्छासुद्धा तीव्र असतात. त्यांची पकड इतकी घट्ट असते की, प्राणी म्हणून असलेल्या मनुष्याच्या मूलभूत गरजांचाही विसर पडतो. जीवशास्त्र सांगते की, जगणे, मैथुन, प्रजोत्पादन ह्या जीवसृष्टीच्या तीन गरजा आहेत. पण माणूस धर्मासाठी, प्रेमासाठी, देशासाठी, अपमान झाला म्हणून, पावित्र्याचा भंग झाला म्हणून प्राण चुटकीसारखे देतो व घेतोही. इंद्रियनिग्रह करून कडकडीत ब्रह्मचर्य पाळतो व प्रजोत्पादन करावयाचे नाकारतो. फार काय, जैन धर्मातील कित्येक लोक उपास करून भुकेने तडफडून प्राणही सोडतात. मोक्ष हा पुरुषार्थ तर सर्वस्वी सांस्कृतिक गरज आहे. आपल्याकडे जे चार पुरुषार्थ

।। संस्कृती ।।

८५