या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अस्तित्व कबूल केले. ज्याला सांप्रदायिक देवकथित धर्म म्हणतात, तो त्या त्या समाजातील धर्म होता; व त्याला देवाचे अधिष्ठान देऊन तो बळकट करावयाचा प्रयत्न झाला, इतकेच. एकमेकांशी भांडणाऱ्या, माझाच माल चांगला आहे अशी स्पर्धा करणाऱ्या सांप्रदायिकांना उच्चतम धर्म सापडला असेल, असे म्हणवत नाही. विशेषेकरून त्यांनी सांगितलेली व आचरिलेली जी तत्त्वे आहेत, त्यांपेक्षा चांगले जगात इतर समाजात दिसून येते; म्हणून हा दावा मान्य होणे शक्य नाही.
 बुद्धानेही आचाराचे अंतिम नियम सांगितले, पण ते जन्मोजन्मी पारखून, विचार करून, असा बौद्धधर्मीयांचा समज आहे. जगातले दुःख कमी करण्यासाठी बुद्धाने धर्म सांगितला. ह्या धर्माचा मुख्य पाया अतीव कारुण्य हा आहे. व्याधी, जरा व मृत्यू ही मानवदेहाबरोबरच जन्माला आली आहेत. ती नाहीतशी होणे शक्य नाही. पण त्यांमुळे उत्पन्न होणारे दुःख कमी करणे किंवा अजिबात नाहीसे करणे शक्य आहे. तो मार्ग म्हणजे जगावरील आसक्ती सोडून जगात वावरणे व अंती संसारचक्रापासून पूर्ण मोक्ष मिळविणे. सर्व भूतमात्रांबद्दल कारूण्य व दया ही ह्या संप्रदायाचा गाभा आहेत. पण आसक्ती असणारे प्रेम वा भक्ती मग ती कितीही निःसीम असो, - ह्या संप्रदायाला मान्य नाही. ह्याबद्दल एक सुंदर गोष्ट बौद्धवाङ्मयात सांगितली आहे. पुष्कळ शिष्य होते; त्यांपैकी पुष्कळ (मोग्ग्लायनासारखे) बुद्धादेखतच कैवल्यपदापर्यंत पोहोचले. बुद्धाला न विसरणारा साधाभोळा असा आनंद नावाचा त्याचा शिष्य होता. तो नेहमी म्हणे, "भगवन, आपण कित्येकांना कैवल्यपदापर्यंत पोहोचविले मी मात्र रात्रंदिवस आपल्याजवळ राहून आहे तिथेच. असे का?" बुद्ध म्हणाले, "वेळ आली म्हणजे सांगेन." पुढे भगवान मृत्युशय्येवर पडले, तेव्हा आनंद शेजारीच ओक्साबोक्शी रडत होता. भगवानांनी त्याला जवळ बोलाविले व विचारले, "आनंदा, का मी रडतोस?" तो म्हणाला, "हे काय विचारणे? आपणांशिवाय ह्या जगात राहणार कसा?" भगवान म्हणाले, "ह्यामुळेच बरे आनंदा, तु कैवल्यपदाचा अधिकारी झाला नाहीस." बुद्धाचे तत्त्वज्ञान व हिंदूंचे तत्त्वज्ञान ह्यात फरक

९६

।। संस्कृती ।।