पान:Shuddha Maraat’hii Kosha (IA in.ernet.dli.2015.366358).pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांहीं शब्द वर्ज करून उतारा आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. हे त्याच्या कोशाच्या प्रस्तावनेतल्या पुढील भागावरून स्पष्ट होते:- "कोणी असे ह्मणेल कीं, पूर्वीचा एवढा मोठा कोश हातांत वागविण्याजोगा लहान झाला कसा? तर असे समजावे की पूर्वीच्या कोशांत ज्यांचा नेहमीच्या भाषणांत उपयोग नाहीं असे फार अवघड जे शास्त्रीय संस्कृत शब्द होते ते व ज्यांचा अर्थ सहज मनात येतो असे लाक्षणिकार्थावांचून असलेले साधारण मराठी शब्द ते, हे सर्व गाळून टाकल्यामुळे हा कोश हातात वागविण्याजोगा झाला आहे. " ह्या कोशाशिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी वगैरे प्राचीन ग्रंथ वाचणारांच्या उपयोगाचा हंस* नांवाचा दुसरा एक कोश केला आहे. तो मात्र सदरी निर्दिष्ट केलेल्या कोशापेक्षा विशेष महत्त्वाचा आहे. ह्या दोन्ही कोशांच्या प्रती मिळत नाहींत.

ह्या शिवाय आणखी मराठी भाषेचे ३ कोश आहेत. ते तिनीही कमजास्त प्रमाणानें मोलस्वर्थच्या कोशाचे अनुकरणरूप आहेत. ते इंग्रजी न जाणणारांच्या उपयोगाचे नाहींत.

पूर्वी झालेल्या मराठी कोशांच्या सदरील विवेचनावरून ह्या कोशाच्या आवश्यकतेचा एक अंशाने त्यांच्या दुर्मिळताजन्य मराठी कोशाचा अभाव लक्षांत येईलच. ह्या शिवाय मोरोपंतादि कवींची काव्ये वाचणारास (विशेषेकरून हा प्रसंग इंग्रजी किंवा संस्कृत न जाणणारांस असतो ) प्रस्तुत कोशासारखे दुसरे साधन नसल्यामुळे प्रसंगविशेषीं सदरहू काव्यांचे वाचन सोडून द्यावे लागते असा अनुभव आहे. हे जाणून व स्वतः अनुभवून आह्मी ती अडचण काढून टाकावी ह्मणून प्रस्तुत कोश लिहिण्यास प्रारंभ केला व ईश्वरकृपेने योग्य साहाय्य मिळून आह्मी आज मराठी शब्दार्णवांतून पार आलों आहों. मागच्यांत अमुक होते किंवा नव्हते याचा विचार करीत न बसतां हा ज्या रीतीनें लोकोपयोगी होईल असें आह्मांस वाटले त्या रीतीचें ह्यांत अवलंबन केले आहे. हा लोकाश्रयास कितपत पात्र होईल ह्यांचे अनुमान करितो न आल्यामुळे शब्दांच्या व्युत्पत्तीची चिकित्सा जितकी करावयास पाहिजे होती तितकी केली नाही. उदाहरणार्थ- 'सिंह' ह्या शब्दाची व्युत्पत्ति 'हिंस' या धातूपासून हा शब्द निघाला व त्यांतील अक्षरांचा विपर्यास अमुक तर्‍हेनें झाला असें लिहून द्यावयास पाहिजे होती. त्याप्रमाणेच 'महशूर' हा मूळ फारशी 'मशहूर' शब्दाचा अपभ्रंश आहे असें सांगावयास पाहिजे होते. तथापि अमुक भाषेतून हा शब्द निश्वयेकरून आला हे मात्र (सं) (फा) इत्यादि संज्ञांनी दर्शविले आहे. असे करण्याचें व पूर्ण व्युत्पत्ति न देण्याचे कारण हे की केवळ शब्दार्थजिज्ञासूंस व्युत्पत्तीची अपेक्षा नसते व संपूर्ण व्युत्पत्ति दिली असती तर ग्रंथ फार प्रचंड होऊन त्याच्या ठिकाणी दुर्वहत्व व बहुमूल्यत्व हे बाह्य दोष आले असते. वर सांगितलेल्या संज्ञांनी निदान तो मूळ अमुक भाषेतला शब्द आहे हे तरी समजेल.

हा कोश पहातांना कित्येक शब्दांपुढे (सं). (फा), इत्यादि संज्ञा सांपडणार नाहीत; तर हे शब्द कोठचे अशी शंका येईल त्यास ते शब्द देशी आहेत असे समजावें.

  • हा कोश शास्त्रीबोवांचे शिष्यवर्गापैकी कोणी पुनः छापून प्रसिद्ध करतील तर त्यांत त्यांची गुरुभक्ति दिसून येईल व लोकोपयोग होईल.