पान:Shuddha Maraat’hii Kosha (IA in.ernet.dli.2015.366358).pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सं) ह्मणजे काय ? ( फा ) ह्मणजे काय ? व वर सांगितलेले देशी शब्द ह्मणजे काय ? हे सांगणे अवश्य आहे. बहुतेक पाश्चात्य व तदनुरोधाने कितीएक इकडील विद्वानही असे हणतात की हिंदुस्थानच्या वायव्य सीमेकडून आर्य लोक इकडे आले व त्यांनी आपल्याबरोबर संस्कृत भाषा इकडे आणिली. त्याप्रमाणेच महाराष्ट्री, मागधी, इत्यादि भाषा त्या त्या देशाच्या होत. हे त्यांचे ह्मणणे आमच्या मतें निर्मूल आहे. कारण महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पैशाची ह्यांचा समावेश प्राकृतांत होतो, व ही प्राकृत भाषा प्रकृति- संस्कृत - हिच्यापासून झाली. ह्याशिवाय देशीनाममाला ह्मणून जो जैनपंडित हेमचंद्र यांनी केलेला कोश आहे त्यांतील शब्द मात्र कोणत्याही संस्कृत शब्दापासून निघाल्यासारखे दिसत नाहीत. ह्यावरून असे अनुमान काढितां येतें कीं तेवढे मात्र शब्द शुद्ध देशी होत. बाकीचे सारे संस्कृत किंवा संस्कृताचे अपभ्रंश होत. अशा ह्मणजे स्वरूपानें विद्यमान किंवा अपभ्रंशरूप शब्दांस (सं) ही संज्ञा दिली आहे, व देशी शब्दांबद्दल कांहीं लिहिले नाहीं.

आतां (फा) किंवा (आ) संज्ञांविषयी. मुसलमानांचा इकडे अंमल झाल्यापासून राज्यांतील अठरा कारखाने मुसलमानांच्या अधिकारांत असत. त्यामुळे सर्वत्र फारशी शब्दांचा उपयोग होऊ लागला. व मूळ फारशी लोकांवर आरबांचा अंमल असल्याकारणानें फारशीत तिच्या बरोबरीने, किंबहुना ज्यास्तही, आरबी शब्द तींत मिळाले. फारशी कोश पहातां त्यांत अमुक शब्द आरबी व अमुक शब्द फारशी असे पृथक्करण केलेले आढळते. ह्या गोष्टीस अनुसरूनच आह्मीही फारशीशब्दांपासून आरबी शब्द वेगळे काढले आहेत.

ह्या कोशांत शब्दांस देता आले तितके मराठीच प्रतिशब्द दिले आहेत. " देता आले तितके असे " ह्मणण्याचे कारण असे की शास्त्रीय पारिभाषिक शब्द, पशुपक्षी व लतावृक्षांच्या नांवांस प्रतिशब्द क्वचितच आढळतात म्हणून अशा ठिकाणी पशुविशेष, वृक्षविशेष असे निरुपायास्तव ह्मटले आहे. अशा ठिकाणी त्या त्या पदार्थांची चित्रेच काढून दाखवावयास पाहिजे होती, परंतु तसे करण्यास पैसे फार लागल्यामुळे ह्या कोशाच्या ग्राहकांवर अधिक बोजा पडता.

प्रारंभी मूळ शब्द मोठ्या टैपात देऊन त्यापुढे तो कोणत्या भाषेतून आला आहे हे व त्याचे व्याकरण सांगून शेवटी त्याचा अर्थ दिला आहे. एकाच शब्दाचे दोन, तीन, किंवा ज्यास्त अर्थ असल्यास २, ३ इत्यादि अंक घालून अर्थ दिले आहेत. त्याप्रमाणेच त्या त्या अर्थाच्या अनुरोधाने त्या शब्दाचे व्याकरण बदलत असल्यास ते त्या त्या अर्थाच्या आकड्यापुढे दिले आहे.

पूर्वनिर्दिष्ट कोशांचा वर्णक्रम असा आहे की, अमुक शब्द अमुकच स्थळीं सांपडेल असे निश्चयाने सांगता येणार नाहीं. तसा घोटाळा आमच्या कोशांत बिलकुल नाहीं, हें आमच्या कोशांतील एखादें अक्षर समग्र वांचून पाहिल्यास सहज ध्यानांत येणार आहे. त्या व्यवस्थेबद्दल युक्तिवाद अप्रस्तुत होय.