हस्तपत्रकांत लिहिल्याप्रमाणे सरकारी कचेर्या व अदालतीतून चालू असलेल्या शब्दांची स्वतंत्र यादी जोडणार होतों परंतु पुष्कळ नोकरलोकांच्या अशा सूचना आल्या की आपली यादी स्वतंत्र प्रसिद्ध केल्यास फार चांगले होईल; ह्यणून पहिला बेत रहित करून त्या यादीतील बरेच शब्द ह्याच कोशांत जागचे जागी घातले व ती यादी तिचे स्वतंत्र पुस्तक करण्यासाठी तशीच ठेवली आहे. तीत न्यूनाधिक करून लवकरच प्रसिद्ध करू.
चांगल्या शब्दांबरोबर वाईट शब्दही यांत आले आहेत, परंतु त्यासंबंधाने आमचा नाइलाज आहे. आह्माला कित्येकांनी त्यासंबंधाने दोष लाविले त्यांस जे आह्मी सांगितले तेच आमच्या कोशाचा उपयोग करणारांपैकी ज्यांस वाईट शब्दांचा कंटाळा वाटेल त्यांकरिता लिहून ठेविले पाहिजे. न्यायाधीश, इतिहासकार, वैद्यक ग्रंथकार, यथादृष्ट पदार्थांचा चितारी ह्यांची जी गत तीच कोशकाराची. न्यायाधीशापुढे खटला आला, मग तो चांगल्या मनुष्याचा असो अथवा वाईट मनुष्याचा असो अथवा देवघेवीचा किंवा खूनबलात्काराचा असो, की, त्याला पक्षपात न करितां न्याय केला पाहिजे. त्याप्रमाणेच ज्या देशांतला रहिवासी इतिहासकार असेल त्या देशाच्या लोकांच्या उत्कर्षाविषयीं किंवा अपकर्षाविषयीं तो यथाभूत वर्तमान लिहितो. उत्कर्षाविषयी जोराने लिहितो व अपकर्षाविषयी मुळींच लिहीत नाही असे होत नाही. वैद्यक ग्रंथकाराची तर गोष्ट काही विशेषच आहे. तो रक्त, मांस, अस्थि, श्लेष्मा ह्यांचे तर काय पण याहूनही घाणेरडे पदार्थाचें विवरण यथास्थितपणे करितो. तीच गोष्ट चितार्याची. एखाद्या वीर पुरुषाचे चित्र चितारी काढू लागला तर तो वीर पुरुष कितीही सुंदर असला व त्याच्या चेहऱ्यावर एखादा वाराचा डाग असला तर तो चितारी 'अरेरे! ह्या सुंदर चेहर्यावर हा व्रण मी कसा काढू ! ' असा विचार बिलकूल न करितां बेधडक त्या व्रणासुद्धा हुबेहूब चित्र उठवून देतो व त्या चित्राच्या मार्मिक पहाणारास अतिशय सुखवून टाकतो. त्यांच्या मालेपैकीच कोशकार. त्यांना शब्दाच्या बरे वाईटपणाबद्दल विचार करिता कामा नये. तो विचार त्या शब्दांचा उपयोग करणारे निबंधकार, कवि, इत्यादिकांनी करावा. त्यांचे तारतम्याची जबाबदारी त्या त्या शब्दांचा प्रयोग करणारांकडे आहे.
ह्यांत मराठी भाषेच्या सांप्रतच्या स्थितीत चालू असलेले बहुतेक शब्द आहेत. ज्ञानेश्वरी वगैरे अति प्राचीन ग्रंथांत असलेले व स्लेट, पेन्सिल, पोष्ट, टाईम, वगैरे इंग्रजीतून येणारे अशा शब्दांचा ह्यांत समावेश केला नाही. ह्याचे कारण हे की, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांतल्या शब्दांचा स्वतंत्र कोश आहेच व इंग्रजी शब्द इंग्रजीभाषानभिज्ञही वापरतात, परंतु फारशी भाषेतून मराठी भाषेत आलेल्या शब्दांप्रमाणे त्यांची अद्यापि मराठीतले ह्मणून गणना होऊं लागली नाहीं.
प्रस्तुत कोश पंडितांस मान्य झाला ह्मणजे आह्मी आपणांस कृतार्थ समजू व ईशेच्छेने जमल्यास ह्यांत गाळलेले शब्द, शब्दांची संपूर्ण व्युत्पत्ति व स्थलविशेषी चित्रे देऊन ह्याचाच विस्तार करण्याची उमेद आह्मास येईल.