प्रस्तावना.
भाषेच्या संपन्नतेचे ज्ञान तिच्यांत अनेक विषयांवर असलेले ग्रंथ, तिचे निर्विवाद व्याकरण व तिचा कोश यांनी होते. त्यांत विशेषेकरून अनेक विषयांचे प्रतिपादक ग्रंथ ही तिची मुख्य संपत्ति होय. निर्विवाद व्याकरण ही तिची कसोटी, व कोश हा तिचा कचित् अस्ताव्यस्त व कचित् यथाविभाग- कोश अथवा खजीना. ह्या तीनही उपकरणांनी युक्त अशी, या भरतखंडातील अनेक भाषांत, एक संस्कृत भाषाच केवल होती व आहेही. प्रस्तुत काळी 'आहेही' हे ह्मणणे ह्मणजे अतिवयस्क मनुष्याशी किंवा अति लहान अर्भकाशी सुंदर नवयुवतीचा समागम आहे असेंच ह्मणणें होय; कारण, जसे ते दोघेही तिच्या उपभोगाचे अपात्र, तसेच हल्लीचे भरतखंडवासी लोक संस्कृत भाषेच्या उपयोगाचे अपात्र. सारांश काय की, संस्कृत भाषा सर्वैश्वर्यसंपन्न असून तिचा मार्मिक, भोक्ता राहिला नाहीं. असो. संस्कृत भाषेत अनेक विषयांवर ग्रंथ आहेत, तिचे व्याकरण निर्विवाद आहे व तिचा कोशही व्यवस्थितपणे संपूर्ण भरला आहे. सदरी सांगितलेली स्थिति भरतखंडांतल्या इतर भाषांची तर काय परंतु आशिआखंडांतल्या कोणत्याही भाषेची नाही असे ह्मटल्यास चूक होईल असे आह्मास वाटत नाही. तशा स्थितीत असून सांप्रत चालू असलेल्या भाषा यूरोपात सांपडतील; परंतु त्याही चारपांचच. यावरून हे लक्षांत येईलच की पुढील शब्दसंग्रह ज्या भाषेचा आहे ती ह्मणजे मराठी भाषा वर सांगितल्या लक्षणानें पहातां संपन्न नाही. ह्या आमच्या ह्मणण्याच्या खरेपणाच्या प्रतिपादनार्थ दूर जाणे न लगे. इच्यांत किती विषयांवर किती ग्रंथ आहेत, इचे व्याकरण किती पूर्ण आहे व इचा कोश कसा व केवढा आहे याचा विचार केला ह्मणजे पुरे आहे. त्यात पहिला विचार मराठीत असलेल्या ग्रंथांचा. ग्रंथांचे विभाग दोन तर्हांनीं करितां येतात. एक त्यांतील विषयांसंबंधाचा व दुसरा त्यांच्या गद्यपद्योभयविधत्वसंबंधाचा. यांशिवाय उभयसाधारण एक तिसराही विभाग आहे. तो कोणता ह्मणाल तर कालकृतप्राचीन किंवा अर्वाचीन. प्राचीन मराठी ग्रंथांकडे पहातां त्यांत वेदांताशिवाय कोणत्याही दुसऱ्या विषयावर असलेला ग्रंथ लक्षांत येत नाहीं* त्या विषयाचे प्रतिपादन तरी सर्वत्र पदामय आहे. हें प्राचीन विविधविषयप्रतिपादक ग्रंथांविषयी झाले. आतां प्राचीन गद्य-
- सर्वथा 'नाही' असे ह्मणण्यास थोडे अपवाद आहेत, परंतु ते इतके थोडे आहेत की सदरीं दिलेल्या शेर्यास ते प्रतिकूल होणार नाहीत. ते अपवाद ह्मणजे - क्वचित वैद्यक व शालिहोत्र यांतील हस्तलिखित अस्ताव्यस्त चुटके, वामन पंडितकृत भर्तृहरीच्या नीतिशतकाचें भाषांतर, व ऐतिहासिक मोडी लिपीत लिहिलेल्या (व ज्यांतील बहुतेकांचा जीर्णोद्धार काव्येतिहाससंग्रहद्वारा नुकताच झाला ) अशा बखरी. ह्यांपैकी बखरीशिवाय बाकी सारे पद्यमय आहेत.