या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४ / युगान्त

सांगितली. 'तू असे वाईट कृत्य करू नकोस,' म्हणून कृपाने त्याला परोपरीने सांगितले. ह्या अनुषंगात अश्वत्थाम्याचे एक वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. तो आपल्या मामाला सांगतो, “तुम्ही मला ब्राह्मणधर्माप्रमाणे वागायला सांगता, पण मी तो कधीच शिकलेलो नाही. लहानपणापासून माझा सगळा जन्म अस्त्रविद्या शिकण्यातच गेला. श्रेष्ठ ब्राह्मणाच्या कुळात जन्मून मी मंदभाग्य क्षात्रधर्मात वाढलो. आता मला तो अनुसरू द्या' (१०.३.२१-२२) कृपाचे न ऐकता त्याने घोडा जोडला व एकटाच रथात बसून तो पांडवाच्या शिबिराकडे भरधाव गेला, व हा भाचा करतो आहे तरी काय, अशा भीतीने कृप व कृपामागून कृतवर्मा त्याच्या पाठीमागे धावले. अश्वत्थामा शिबिरात शिरलेला त्यांनी पाहिला व ते शिबिराच्या बाहर उभे राहिले. अश्वत्थाम्याने आत जाऊन पहिल्याने निजलेल्या धृष्टद्युम्नाला मारले मग पाचही द्रौपदीपुत्रांना मारले. रात्रीच्या वेळेला किती लोक आले आहेत व कोण हल्ला करीत आहे, हे न उमजल्यामुळे लोक सैरावैरा धावत असताना कृप व कृतवर्मा यांनी शिबिराला आग लावून दिली. त्यामुळे गोंधळात भरच पडली.
 जेवढे मारता येतील तेवढे लोक मारून अश्वत्थामा बाहेर आला व झालेले वर्तमान मृतप्राय दुर्योधनाला सांगून त्याने त्याच्याकडून शाबासकी मिळवली. पण झालेल्या कृत्याचा सूड उगवण्यासाठी पांडव व कृष्ण आपल्या मागोमाग येतील, हे जाणून तो तेथून पळाला व गंगेच्या काठी व्यासापुढे जाऊन हजर झाला. पांडव त्याच्या मागोमाग आले. त्याने एक अमोघ अस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी टाकले व अर्जुनाने प्रति-अस्त्र टाकले. दोन्ही अस्त्रे भिडली. आता जगाचा संहार होणार, असे पाहून व्यासाने मध्ये पडून अर्जुनाला ‘आपले अस्त्र मागे घे,' अशी विनंती केली. अर्जुनाने अस्त्र मागे घेतले. पण अश्वत्थाम्याला आपले अस्त्र मागे घेता आले नाही. त्या अस्त्राने पांडवांचा नाश झाला नाही, पण उत्तरेच्या पोटातील गर्भावर ते अस्त्र पडले, असा वृत्तांत आहे. स्वतः पांडवांनी अश्वत्थाम्याला