या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२ / युगान्त

आहे. कोठल्याही मोहाला बळी न पडता दुर्योधनाला न सोडण्याचा निश्चय कर्णाचे मोठेपण दाखवतो. तरीही शेवटी एक गोष्ट खटकतेच. ती म्हणजे मारीन तर फक्त अर्जुनाला, इतरांना नाही, हे कुंतीला दिलेले वचन ! हे वचन म्हणजे औदार्याची परिसीमा ! मग त्यात खटकण्यासारखे काय?
 हे वेडे औदार्य म्हणता येईल; पण तरी औदार्य, मनाचा मोठेपणा, हा कसा नाकबूल करता येईल? नाकबूल करायला कारण दोन. कर्णाची कृती बऱ्याच वेळा अतिरेकी म्हणून वर जे म्हटले आहे, त्यापैकीच हा प्रकार वाटतो. कुंतीबद्दल त्याला प्रेम वाटले नाही, कणवही आली नाही. तथाकथित भावांबद्दलही त्याला काडीचे सोयरसुतक नव्हते. 'इतरांना सोडीन,' हे म्हणण्यात एक प्रकारची वल्गना होती. ज्यांना ‘सोडीन' म्हटले, त्यांच्याबद्दल तुच्छता होती. मला जो माझ्या तोडीचा वाटतो, त्याचा वध करीन, इतरांशी मला कर्तव्य नाही, असा ह्या म्हणण्याचा अर्थ आहे. अशी वल्गना व इतरांबद्दल तुच्छता हा गुण क्षत्रियाला शोभेसाही होता. पण ज्या प्रसंगी त्याने हे वचन दिले. त्या प्रसंगाला तो योग्य नव्हता. युद्ध खरेखुरे होते. ते काही शस्त्ररंग नव्हते. स्वतःची शेखी मिरवण्यापेक्षा दुर्योधनाला जय मिळवून द्यावयाचा, हे त्याचे कर्तव्य होते. इतर भावांना, विशेषतः धर्माला न मारण्यात दुर्योधनाचे अहित होते. धर्म मरता किंवा त्याहीपेक्षा कैद होता, तर युद्धाचा निकाल दुर्योधनाच्या बाजूने लागण्याचा फार संभव होता. स्वतःच्या मोठेपणात कर्ण दुर्योधनाचे हित विसरला, असे म्हणावे लागते. हे वचन औदार्याने दिलेले नसून उद्धटपणे दिलेले होते.
 ह्या प्रसंगाने कर्णाला 'मी कोण?' ते कळले. त्या 'मी'ला योग्य अशी भूमिका उघडपणे स्वीकारता येणे शक्य नव्हते, हे जाणून कर्णाने त्या 'मी'चा लौकिकात स्वीकार केला नाही.पण मनातून तरी त्याचे जन्मभराचे बंधन सुटून त्याला मोकळे झाल्यासारखे वाटायला पाहिजे होते. ज्यासाठी जिवाचे रान केले, ते