हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/१७९
 

भगवद्गीता असावी असे वाटते. भगवद्गीतेच्या पुढील-पुढील अध्यायांत सांगितलेल्या जगन्मित्रत्व व जगाबद्दल करुणा ह्या दोन गुणांचा वासही महाभारतात नाही.
 'दया भूतेषु' 'अहिंसा' हे शब्द महाभारतात येतात, पण अहिंसेचा अर्थ प्राण्यांना न मारणे असा नसून मित प्रमाणात व ठरलेल्या नियमांना धरून मारणे असा होता. गीतेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अध्यायात 'कृपा' हा शब्द थोड्याशा हेटाळणीनेच वापरलेला आहे. 'कृपयाविष्ट' अर्जुन किंवा अर्जुनाची 'कृपयाविष्टता' हे एक क्षत्रियाला न शोभेसे वर्तन होते. 'विषीदन्तम्' हेही विशेषण क्षत्रियाला न शोभेसे आहे, ह्या विषादामुळे व करुणेमुळे अर्जुनाच्या हातून शस्त्रे गळून पडली होती. डोळ्यांतून पाणी वाहत होते. तो रथात बसून राहिला होता आणि ह्या तिन्हीबद्दल कृष्ण जी विशेषणे लावतो ती विचार करण्यासारखी आहेत. त्याला तो 'कश्मल' म्हणतो. 'कश्मल' ह्या शब्दाचे काळेबेरे किंवा पाप ह्या शब्दांनी मराठीत भाषांतर करण्यासारखे आहे. 'कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे सुपस्थितम्', ('अरे अर्जुना. ह्या आणीबाणीच्या वेळी हे रे काय तुझ्या मनात काळेबेरे आले आहे ?') असे हे वाक्य ! हे त्याचे कृत्य 'अनार्यजुष्ट', 'अस्वर्ग्य', 'अकीर्तिकर' असे होते, असे कृष्ण म्हणतो. अर्जुनाच्या ह्या कृतीला तो पुढे 'क्लैब्य' म्हणतो. त्याला वाटणाऱ्या करुणेला 'क्षुद्र हृदयदौर्बल्य' म्हणतो. ही कृष्णाची मीमांसा महाभारतामध्ये सर्व क्षत्रियांच्या मनाला धरून होती. 'अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तव' असे तो अर्जुनाला सांगतो. व 'आज नाही, तर उद्या मरायचेच आहे. सरळ सामना देऊन मर. कर्म, जन्म व जातीप्रमाणे आलेले कर्तव्य करण्याचाच फक्त तुला अधिकार आहे. त्या कर्मातून मला काही चांगले मिळेल किंवा वाईट मिळेल, ही चिकित्सा करण्याचा तुला अधिकार नाही. फलाशा धरू नकोस. कर्तव्य म्हणून कर्म कर' असे सांगतो. अशी महाकठीण, स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल करुणेचा लवलेश नसलेली ही नीती