पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/कांहीं मतें
प्रो० दत्तो वामन पोतदार-
'पुरुषश्रेष्ठ' ग्रंथांत गोविलेलीं सुंदर चरित्रें मुलांस फार उद्बोधक होतील. रा० माटे यांची लेखनशैली फार मनोहर व मार्मिक अशी आहे. चरित्रें आटोप शीर प्रतिपादन स्पष्ट व ठसकेदार आणि भाषा खुबीदार, क्वचित् खोचदार असून स्पष्ट, प्रवाही व उल्हासयुक्त अशी आहे. त्यामुळे हा ग्रंथ मुलांच्या नित्यपाठांत घालण्यास अत्यंत पात्र असा उतरला आहे.
तारीख ४|७|३१
श्री० देशभक्त नरसिंह चिंतामण केळकर-
... आपली भाषा व विवेचनपद्धति यांची वेगळी प्रशंसा करण्याचे कारण नाहीं. पण दोन्ही येथें अशीं साधली आहेत कीं, प्रौढ व बाल अशा दोन्ही प्रकारच्या मनाला आपण लिहिलेलीं चरित्रें बोधप्रद होतील. मीं तीं वाचलीं तेव्हां त्यांत मला कांहीं नवी माहिती मिळाली व कांहीं जुन्या विस्मृत माहितीची उजळणी झाली. ग्रंथाचा हा पहिला भाग समजून असे आणखीही काही भाग काढाल तर वाचकवर्ग ऋणी होईल.
तारीख २८|६|३१
श्री० देशभक्त लक्ष्मण बळवंत भोपटकर -
... पूर्वोक्त पुरुषश्रेष्ठांनीं पाश्चात्यांच्या किंबहुना जगाच्या इतिहासावर आपल्या उज्ज्वल चारित्र्याचा कायमचा ठसा उमटविलेला आहे, इतकेंच नव्हे तर त्यास नवीन वळणेही लाविलेली आहेत, यांत कांही शंका नाहीं. या नऊ श्रेष्ठ पुरुषांपैकी प्रत्येकानें कोणकोणत्या क्षेत्रांत कोणकोणते कार्य केलें, याची अचूक कल्पना रा० माटे यांनीं आपल्या ग्रंथांत वाचकांना करून दिलेली आहे. रा० माटे हे एक नामांकित आणि विशेषतः शुद्ध स्वरूपाची मराठी भाषा लिहिणारे लेखक म्हणून त्यांची जी प्रख्याति आहे, ती त्यांनी या ग्रंथांत यथार्थ करून दाखविलेली आहे. हा ग्रंथ म्हणजे शुद्ध मराठी भाषेचा एक उत्कृष्ट मासला होय, असें लिहिण्यास मला मुळींच दिक्कत वाटत नाहीं.
तारीख २९।६।३१
प्रिन्सिपॉल आर. पी. सबनीस -
... विद्यार्थ्यांचे शील चांगले बनण्याला थोर पुरुषांच्या चरित्रांच्या वाचनाइतकें प्रभावी दुसरे कोणतेच साधन नाहीं. म्हणून रा० माटे यांनी 'पुरुषश्रेष्ठ' हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणें जरूर आहे.... हें पुस्तक वाचल्यानें विद्यार्थ्यांना साधें परंतु मनोवेधक मराठी कसे लिहावें हेंही समजेल,
तारीख २।७।३१
प्रो० गोपाळ विष्णु तुळपुळे-
... ही चरित्रे अगदीं संक्षिप्तस्वरूपाची असली तरी त्यांत त्या त्या चरित्र- नायकाच्या भूमिकेतील स्वारस्य यथार्थ प्रतिबिंबित झालें आहे. चरित्रांचे रहस्य समजविण्याच्या दृष्टीने कांहीं चरित्रांत प्रास्ताविक भाग व कांहीं ठिकाणीं प्रासंगिक विचार असे घातले आहेत. पुस्तक वाचीत असतां 'इतिहास' व 'चरित्र' ह्रीं कशीं अन्योन्य व्यापक व उद्बोधक असतात हें चांगलें समजतें. चरित्रांची भाषा सोपी, शुद्ध व मनोवेधक आहे. एकाद्या कादंबरीप्रमाणे वाचक त्यांत गढून जातो. या कारणानें पुस्तक बोधप्रद व मनोरंजक झालें आहे. विद्यार्थ्यांपुढे अशा प्रकारचीं पुस्तकें येतील तितकीं थोडींच अशी पुस्तकें त्यांच्या हाती पडल्याशिवाय त्यांच्यांत वाचनाची आवड व सदभिरुचि उत्पन्न होणार नाहीं. या दृष्टीने पाहतां रा० माटे यांनीं ह्रीं चरित्रे लिहून विद्यार्थीवर्गाला उपकृत करून ठोवले आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं.
तारीख १।७।३१