पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/कोलंबस




 कोलंबस

कोलंबस हा जिनोआ शहरीं इ० सन १४३५ साली जन्मला. आईबाप घरचे गरीबच असले तरी चांगले कुलवान् होते. दोन भाऊ व एक बहीण मिळून हीं चार भावंडे होतीं. कोलंबस हा बापाचा पहिलाच मुलगा असल्यामुळे त्यानें त्यास फार लहानपणींच मोठ्या हौसेने शिकवावयास आरंभ केला. लिहिणें, वाचणें, थोडे हिशेबठिशेब, व्याकरण आणि बरेचसें ड्रॉइंग या गोष्टी कोलंबसास फार लहानपणीं माहीत झाल्या. हे विषय शिकवीत असतां बापाच्या ध्यानांत आलें कीं, मुलाला भूगोलाच्या माहितीची आवड फार आहे. त्यांचें राहणेंही समुद्रापासून फारसें दूर नसल्यामुळे तितक्या लहानपणीसुद्धां आपण नावाडी बनावें अशी कोलंबसाला फार आवड वाटे. बापही भला शहाणा माणूस होता. ज्या विद्येकडे मुलाचा कल तीच विद्या त्यास शिकवली तर तें त्यास फार हिताचें होईल हें जाणून दर्यावर्दीपणाच्या कामाला जरूर तें तें ज्ञान देणाऱ्या प्याव्हिआ येथील शाळेत त्यानें त्यांस घातलें. कोलंबस तेथें भूमिति, भूगोलविद्या, खगोलविद्या व नावाडीपणा इत्यादि गोष्टी शिकूं लागला. लॅटिन भाषेचेंही थोडेंसें ज्ञान त्याला तेथें प्राप्त झालें. शाळेतील पंतोजीचें भांडवल संपतांच कोलंबसाने शाळा सोडली व दुसरीकडे कोठें मोठ्या शाळेत न जातां तो एकदम खलाशीच बनला. या वेळीं तो अवघा चवदा वर्षांचा होता. त्याच्या नातेवाइकांत कोलंबो नांवाचा एक कोणी धाडसी खलाशी होता. त्याच्या दिमतीस कोलंबस राहिला.
 त्या वेळीं इटली देशांत आणि भूमध्य समुद्राच्या सर्व कांठभर लहान लहान राज्ये पसरलेली असून प्रत्येक राजाचें म्हणून एक लहानसें आरमार असे. कांहीं धाडशी नावाड्यांनी तर कोठेही नोकरी न पत्करतां आपल्याच हिमतीवर दहा-पांच तरांडी जवळ बाळगून, पांच-पन्नास आपल्यासारखेच धाडशी लोक पदरीं ठेवून समुद्रावर वाटमारीचा धंदा बेधडक चालविला होता. सबंध भूमध्य समुद्रभर असल्या भुरट्या वाटमारेकऱ्यांचा धुमाकूळ चालत असे. कोलंबसाचा वर सांगितलेला जो कोलंबो तो असल्या लोकांमध्येसुद्धां बडा बिलंदर म्हणून समजला जात असे. त्याच्याच शिडाखालीं समुद्रावर अहोरात्र भटक्या मारावयास कोलंबस शिकत असल्यामुळे त्याची समुद्राची भीति पार मरून गेली. इतक्या लहानपणीं मन व पोंच हींही अगदी लहान असल्यामुळे खरें भयसुद्धां लहान पोरांना नीटसें उमगत नाहीं. मन इतकेंच वाढलेले असतांना कोलंबसाला धैर्य प्राप्त झालें. इ० सन १४४९ साली त्याच्या राजानें नेपल्स शहरावर छापा घालण्याचें ठरवून एक आरमार तयार केलें आणि त्यांपैकीं जहाजांचा एक ताफा वरील कोलंबोच्या हवाली केला. कोलंबो म्हटला कीं, कोलंबस आलाच. हें दर्यावरचें झुंज चार वर्षे चाललें होतें. वल्हवणें, दूरचें न्याहाळणें, प्रसंग आला असतां दर्यांत उडी फेंकणें, जहाजावर बसून समुद्राच्या लाटा डोक्यावरून जाऊं देणें, रात्री अपरात्री जागत राहून संधि साधून शत्रूवर तुटून पडणें, असल्या गोष्टींना कोलंबस अगदी सरावून गेला. ॲटलांटिक महासागरासारख्या 'तामसी' समुद्रावर होडग्यांत बसून दोन दोन महिने बिनदिक्कत हेलपाटत राहणें, आणि खरोखरीच मुलखानिराळ्या देशांत सांपडूनसुद्धां तिथल्या राक्षसी रानट्यांना वठणीवर आणणें, असलीं जीं कामें त्याच्या हातून पुढे झालीं तीं करावयास लागणारे मनाचें व शरीराचें बल त्याला या कोलंबोच्या देखरेखीखालीं मिळालें. याप्रमाणें या धंद्यांत कोलंबस वाढत असतां कोलंबो मृत्यु पावला. त्याचा पुतण्या धाकटा कोलंबो हाही मोठा धाडशी तांडेल म्हणून समुद्रावर गाजून राहिला होता. कोलंबसाची व त्याची चांगली गट्टी जमली. हा कोलंबो असा निर्दय आणि आडदांड होता कीं, आफ्रिकेंतल्या आडदांड मूरिश लोकांनासुद्धां त्याचा मोठा वचक बसून राहिला होता.
 एकदां असें झालें कीं, वेनिश शहरचीं कांहीं गलबतें फ्लॅन्डर्स देशांतून आपल्या देशाकडे परत जात होतीं. गलबतावर मोठ्या मोलवान् चिजा भरल्या होत्या. हीं जहाजें पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यानें सुखानें चाललीं असतां या दोघांनीं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जहाजावरचे लोकही भले खंबीर भांडखोर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी मारामारी चालली. दोघांचेही माणूस फार मेलें, जहाजाला जहाज भिडून हाणाहाणी चालली असतां कोलंबस ज्या जहाजावर होता त्यानें पेट घेतला. ह्यांनीं व त्यांनी आपापली निरनिराळी जहाजें साखळदंडाने एकमेकांस बांधून घातलीं होतीं व शत्रूचीं जहाजें अगदीं टेकल्यावर त्यांवर उड्या टाकून भांडावयास सांपडावें म्हणून त्यांची जहाजेंही आपल्या जहाजांस त्यांनी साखळ्यांनी गुंतविली. त्यामुळे असें झालें कीं, एक जहाज पेटतांच भोवतालचीं सर्व पेटलीं. होतां होतां दोन्ही- कडील सगळींच जहाजें पेटून एकच डोंबाळा माजला. आतां जहाजे सोडवितां येत नाहींत हें पाहून पटाईत पोहणारांनी बेलाशक समुद्रांत उड्या झोंकून दिल्या. कोलंबसानेही तेच केलें. पाण्यांत पडल्यावर त्याला एक वांसा सांपडला. त्याला धरून कोलंबस किनाऱ्याकडे पोहत जाऊं लागला. किनारा जवळपास सहा मैल होता. तरी कोलंबस पोहण्याच्या कामांतही चांगला निष्णात असल्यामुळें तो लवकरच पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यास येऊन लागला. म्हणजे जिनोआ शहरचा हा दर्यावर्दी रहिवासी आपल्या चांचेगिरीच्या धंद्यानिमित्त समुद्रावर फिरत असतां एका मोठ्या अरिष्टांतून निभावून कोठल्यातरी एका देशाच्या अनोळखी किनाऱ्यावर येऊन पडला. याच पोर्तुगाल देशांत त्याच्या कल्पना वाढत जावयाच्या होत्या. कोणाकोणाचें असें म्हणणें आहे कीं, त्याचें पोर्तुगाल देशांत येणें असल्या आकस्मिक रीतीनें झालेले नसून, आपलें गांव सोडून तो बुद्धिपुरस्सरपणें तेथें गेला होता. त्यांचें म्हणणें कीं, जिनोआ शहरी असतां त्याला भूगोल-विषयक ज्ञानाची व देशपर्यटनाची फार हौस उत्पन्न झाली होती. आणि तेव्हांच्या काळीं आफ्रिकेचा पश्चिम- किनारा शोधून काढणें, हिंदुस्थानास मार्ग शोधून काढणें, ज्या कांहीं खळबळी समुद्रकांठच्या लोकांत चालू होत्या त्यांत त्याचें मन गर्क झालेलें असे. त्याच्या स्वतःच्या म्हणून ज्या कांहीं कल्पना होत्या त्या तपासून पहावयास व जमल्यास त्या अमलांत आणण्याची संधि साधावयास मुद्दाम घरून उठून तो पोर्तुगाल देशांत गेला. त्यानें पुढें जें कांहीं महत्कार्य केलें त्याच्याशीं ही कल्पना चांगली जुळत असल्यामुळे हीच बरोबर असावी व हा वेळपर्यंत तो म्हणजे एक नुसता भटक्या मारणारा चांच्याच नसावा असें मानण्याकडे आपला कल होतो. पण तेवढ्यामुळे म्हणजे संगतवारपणामुळे हाच इतिहास खरा आहे असें निश्चित म्हणतां यावयाचें नाहीं. दर्याचं व खुष्कीचें चांगलें ज्ञान असल्याशिवाय माणूस चांचेपणा तरी कसा करील? शिवाय तेव्हां चांचेगिरींत कांहीं लाज अशी उरलीच नव्हती, अथवा उत्पन्नच झाली नव्हती. पोर्तुगाल देशांत आल्यानंतरच तेथील भूगोल- शोधविषयक चळवळी ऐकून त्याचें लक्ष त्याजकडे जोरानें वेधलें असेल. हा वेळपर्यंत तो तरी वयाने लहानच होता व आपले सर्व जीवित चाचेगिरी करीतच दवडावयाचें असाही कांहीं त्याचा निश्चय झाला होता असें नाहीं. कसेंही असो. आगंतुकरीत्या तो पोर्तुगाल देश आला असला तरी त्याला पुढे आनंदच वाटला असला पाहिजे व आपण होऊन तो आला असल्यास आपण एका फार चांगल्या राजाच्या राज्यांत येऊन दाखल झालों आहों असा त्यास अनुभव आला असेल. हा आनंद त्याला कां झाला व अनुकूल अनुभव कां आला त्याचें ज्ञान होण्यास पुढें वाचण्याची जरुरी आहे.
 या वेळी पोर्तुगालच्या गादीवर प्रिन्स हेन्री नांवाचा राजा होता. भोवताली सर्वत्र पसरलेल्या भूगोल- शोधविषयक कल्पनेंत हाही सांपडला होता. आपल्या बापाबरोबर मूर लोकांना झोडपावयासाठीं तो आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने थोडासा खालीं दक्षिणेकडे गेला होता. तेव्हांच त्याला अटकळ आली होती कीं, खूप खालीं गेलें तर आफ्रिकेलाही वळसा घालतां येईल व तसें झालें तर कदाचित तिकडून हिंदुस्थानाला जातां येईल. पण माहीतगार लोक म्हणत कीं, आफ्रिकेच्या किनाऱ्यानें थोडें दक्षिणेस खालीं जातांच माणूस अत्यंत प्रखर अशा कटिबंधांत आऊन पोचतें आणि तेथे गेल्यावर त्या उन्हांतून व तापलेल्या दर्यांतून परत येण्याची आशाच नको. तेथें जहाज च नावाडी दोघेही जळून बुडावयाचे. हेन्रीला हें खरें वाटेना. त्यानें सामुद्रिकांचें म्हणजे समुद्रविषयक ज्ञान ज्यांना चांगलें होतें त्यांचें एक मंडळ स्थापन केलें. देशोदेशींचे माहीतगार लोक, ज्योतिषी आणि साहसप्रिय नावाडी यांचाही त्यानें तेथें संग्रह केला. पुष्कळ दिवस शोधपूर्वक पाहिल्यावर त्याची खात्री होऊन चुकली कीं, उष्णकटिबंधांतील भस्म करणाऱ्या उष्णतेचें बुजगावणें उगाच आहे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने थेट खालीं जातां येईल व शेवटीं कोठें तरी तें महाद्वीप निमुळतें झालेंच असेल. निदान वळसण्यासारखें खास असेल. राजाच्या या निश्चित अनुमानामुळें साहसी लोकांना नवें स्फुरण आले. पोर्तुगाल व स्पेन यांच्या समुद्रकांठभर आतां जिकडे तिकडे हा एकच विषय भरून राहिला होता व साहस करणाराला 'श्री' प्राप्त होते हा न्याय सर्वकाली सारखाच महशूर असल्यामुळे आपल्या नशिबाची परीक्षा पहावयास सर्व उत्साही नावाडी तत्पर झाले होते. अशा या चलबिचलीच्या वेळीं कोलंबस पोर्तुगालच्या किनाऱ्यास लागला किंवा आला. ही गोष्ट सरासरी ३० सन १४०० साली घडली.
 कोलंबस चांगला उंच असून अंगापिंडानें मजबूत व पिळदार दिसत असे. त्याची चालण्याची ढब मोठी ऐटदार होती. चेहरा किंचित् लांबट असून मांसानें लदबदलेलाही नव्हता अगर वाळकाही नव्हता. डोळ्यांखालची हाडे मात्र जरा वर आलेली दिसत. नाक चोंचदार असून डोळे कांहींसे घारे असत. डोळ्यांची भिंगें स्वच्छ आणि लखलखणारी होतीं. एकंदरीनें हा गृहस्थ मोठा रुबाबदार दिसे. पण बत्तिशी पार पडली नाहीं तोंच केंस मात्र शुभ्र पांढरे होऊन गेले होते. कपडालत्ता आणि खाणेपिणें यांत त्याची मिजास म्हणून कांहीं नव्हती. जवळचा असो, परका असो, कोणाशींही बोलत असला तरी मोठ्या प्रेमळपणानें बोले. घरीं मुलांमाणसांशीं त्यानें कधींही खेकसाखेंकशी केली नाहीं त्यामुळे घरींदारीं आनंद असे. तो मोठा श्रद्धाळू होता पण त्याची धर्मबुद्धि तान्त्रिक नसून चित्तांत गूढपणें भरलेली होती.
 लिस्बन येथें असतांना त्यानें न चुकतां प्रार्थनेला जात असावें. त्याच देवळाच्या शेजारीं डोना फिनिपा नांवाची एक मोठी प्रतिष्ठित व उच्च दर्जाची स्त्री रहात होती. हिचा बाप एक मोठा प्रसिद्ध दर्यावर्दी म्हणून लोकांत प्रसिद्ध होता. या स्त्रीचें मन कोलंबसावर बसलें. लवकरच विवाहविधि होऊन त्याला सासूबाईंनीं घरजांवई केलें. हा सर्व योग मोठा चमत्कारिक असा म्हणावयास हवा, कारण कीं, यानें कोलंबसाच्या जीवितहेतूच्या रेषा स्पष्ट झाल्या. त्याला सफरी करण्याचा हव्यास होताच. पण आतां सासूबाईंनीं त्यास प्रोत्साहन दिलें. सासरा वारलाच होता, पण आपल्या हयातीत त्यानें ज्या कांहीं सफरी केल्या होत्या त्यांचे नकाशे इत्यादि सर्व गोष्टी त्यानें फार काळजीपूर्वक राखून ठेवल्या होत्या. सासूनें हे सर्व कागदपत्र जांवयाच्या हवालीं केले व रोज नवऱ्याच्या वेळच्या समुद्रावरील गोष्टी ही बाई त्यास बारकाईनें सांगे. कोलंबसानें आतां समुद्राचे नकाशे तयार करून देण्याचा धंदाच सुरू केला. धंदाच तो झाल्यामुळे घरींदारी दिवसांरात्रीं अष्टौप्रहर त्यानें समुद्राचाच ध्यास घेतला. कोण कोठें सफरीस जात आहे त्याची नोंद ठेवावी, कोण कोठून आला हे हुडकून काढून त्यानें कोणचा नवीन शोध लावला त्याची पूसतपास करावी, त्यास अनुसरून ते तेच नकाशे पण पुन: पुन्हा जास्त मजकूर भरून आणखी तयार करून विकावे, असा त्याचा क्रम चालू झाला. अर्थात् कोणाही नावाड्यापेक्षां त्याची माहिती जास्त व निश्चित अशी असे. त्याच विषयाच्या चिंतनानें व सुपूर्त माहितीच्या बळावर त्याला नव्या कल्पना सुचूं लागल्या. पूर्वी होऊन गेलेल्या भूगोलवेत्त्यांनीं लिहिलेले जुने ग्रंथ त्यानें वाचून काढिले व आधुनिकांची माहिती कोठें जुळते, कोठें जुळत नाहीं हेंही त्यानें शोधिलें. प्रिन्स हेन्रीच्या सामुद्रिक चळवळीमुळे अवघा दर्याकांठ नित्य नव्या येणाऱ्या बातम्यांनीं नादावून गेला होता. त्यांत कित्येक खऱ्या, कित्येक साफ खोट्या असत; पण या सर्वांचा रोख आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेकडे उतरून त्या निमुळत्या टोकास वळसा घालून पूर्वेकडे वळल्यावर हिंदुस्थानास पोंचतां यावें अशा प्रकारचा होता. हिंदुस्थानांतला सोन्याचा धूर फार उंच गेला असावा असें दिसतें, कीं इतक्या दूरच्या लोकांस इकडे येण्याची अशी लगबग व्हावी! कोलंबसाचें अवलोकन व चालना अखंड होती. कोणीही नवा आणि धाडशी तांडेल उठो, त्यानें हिंदुस्थानची वाट आफ्रिकेला वळसूनच सांपडणार असें गृहीत धरून समुद्रावर शिडें रोंखावीं असा क्रम चालू होता. कोलंबस जणुं कांहीं दूर उभा राहून ही चढाओढ पहात होता. नाविकांची व भूगोलवेत्त्यांची ही धडपड पाहून त्याच्या मनानें मात्र एक निराळीच कल्पना बांधिली. एखाद्या विषयाचें सांगोपांग ज्ञान व अविरत चिंतन असले तर माणसास सर्वथा नवीन कल्पना सुचते क बुद्धीला स्वतंत्र स्फुरण खास येतें. कोलंबसाला ही धडपड पटेना. 'इकडूनच हे सगळे कां मरताहेत?' तो स्वतःस म्हणे, 'चतुःसीमेस दर्या अफाट पसरला आहे. मग दक्षिणेकडेच कां? मग काय वाटेल तिकडे जाऊन पूर्वेकडील हिंदुस्थान हातीं लागेल?' तसेंही नाहीं. पण त्याच्या बुद्धीला नुसतीच बंडखोरी लाभलेली नव्हती, तिला शिस्तही होती.
 पुष्कळ दिवसपर्यंत फ्लोरेन्स शहरचा भूगोलवेत्ता पोलो टॉस्कानेली याजबरोबर त्याचा पत्रव्यवहार चालू होता; कां कीं, या पंडिताच्या मनांतही कोलंबसाचीच कल्पना बऱ्याच वर्षांपूर्वीपासून खेळत होती. पृथ्वी ही वाटोळी असून पूर्वेकडून पश्चिमेस व पश्चिमेकडून पूर्वेस जातां येणें सहज आहे असा त्याचा सिद्धान्त होता. पूर्वेकडे पसरलेले आशियाखंड पसरत पसरत युरोपच्या पश्चिमेस थोडासाच समुद्र मध्ये रहाण्याइतकें पसरलें असावें असा त्याचा अंदाज होता. आशिया- खंडाचा पूर्वकिनारा व युरोपचा पश्चिमकिनारा यांजमध्ये फार थोडें अंतर त्यानें कल्पिलें होतें. या दोहोंच्या मध्ये प्रचंड दर्या असून त्यांत आणखी एक विस्तीर्ण खंड असेल अशी त्यास कल्पना नव्हती. म्हणजे एकंदर पृथ्वीचा परिघ आहे त्याहून फार लहान असावा अशी त्याची अटकळ होती. पोलो टॉस्कानेली यानें आपलें हें मत नकाशासह कोलंबसास कळविलें. कोलंबसास फार धीर आला व युरोप आणि आशिया यांमधील समुद्राचें थोडेंसें अंतर आपण ओलांडण्याचें धाडस केलें तर आपण आशियांत व मग हिंदुस्थानास जाऊं शकूं असें त्याच्या मनानें घेतलें. वास्तविक वरील पंडिताचें हें अंतरविषयक मत साफ चुकलेलें होतें हें स्पष्टच आहे; पण चुकलें होतें हेंच बरें झालें! कारण खरोखरीचें अंतर त्यास कळलें असतें तर तें अंतर ओलांडावयास जाण्याची कोलंबसाचीही छाती झाली नसती. मार्कोपोलो, अल्फिगॅनस इत्यादींचीं मतेंही त्यानें शोधून पाहिली. अरिस्तातल, सेनेकाप्लिनी इत्यादींच्या मतांचा झोंक त्याच्या विचारास पोषकच होता. म्हणजे काय कीं, पूर्वकालीन व समकालीन अशा सर्व पंडितांचीं मतें त्यानें तपासून आपले मत निश्चित केलें होतें. हें शास्त्रविशारदांविषयीं झालें. जे कोणी प्रत्यक्ष नावाडपण करीत होते त्यांच्या माहितीकडेही त्याचें लक्ष होतें. मदिरा गांवचा लिओनामा खलाशी सांगे कीं, पश्चिमेकडे तीन-चारशे मैल गेलों असतां तेथें आपणांस कांहीं बेटें दिसली. आयर्लंडचा एक खलाशी सांगे कीं, दूर पश्चिमेस गेलों असतां तार्तरी देशाचा किनारा लांब दिसत होता. कोणास हजार हजार मैल समुद्रावर पश्चिमेकडून वहात येणारीं कोरींव लांकडें, कोणास ताजे ऊंस, कोणास चमत्कारिक रंगाचीं माणसें अशीं भेटल्याच्या कथाही सर्वत्र ऐकू येत. याही कथा तारतम्यभावानें त्यानें जमेस धरल्या; पण या सर्वांच्याहून बलवत्तर असें एक प्रमाण त्याच्या धर्मश्रद्धाळु बुद्धीस माहीत होतें. बायबलांत म्हटलें आहे कीं, "पुढें पृथ्वीचीं दोन टोंकें एकत्र येतील व माणसें आपापली राष्ट्रें, भाषा इत्यादि विसरून तारकाच्या निशाणाखालीं गोळा होतील." कोलंबसास वाटे, हीं दोन टोके म्हणजे युरोपचा पश्चिम किनारा व आशियाचा पूर्वकिनारा हे होत व त्यांस एकत्र आणण्याच्या कामी तारकानें आपणांस नेमिलें आहे. असो. याप्रमाणें शास्त्र, माहिती व श्रद्धा या सर्वांच्या संमतीनें "पश्चिमेकडे निघालों असतां पूर्वेकडील हिंदुस्थान केव्हांना केव्हा भेटलेच पाहिजे" हा सिद्धान्त कोलंबसानें कायम केला व तो पडताळून पहाण्याच्या उद्योगास तो लागला.
 तेव्हांचें युग राजयुग होतें. अर्थात् राजाच्या आश्रयाशिवाय हें काम तडीस जाणारे नव्हतें. या वेळीं मागें उल्लेखिलेल्या हेन्रीचा नातू जॉन गादीवर होता. त्यासही सफरीचा व शोधाचा मोठा नाद होता. त्यानें भूगोल- खगोल-शास्त्रवेत्ते एकत्र केले होते व त्यांनीं नौकानयनास अत्यंत उपयोगी असें ॲस्ट्रोलेब नांवाचें साधन तयार केलें होतें. अशा या राजाकडे कोलंबसानें बोलणें लाविलें. कोलंबसाची मुलाखत होऊन राजानें एक कमिटी नेमिली व प्रकरण योग्यपणे निकालांत काढा म्हणून सांगितलें. कमिटीवाले कांहीं अडाणी व कांहीं मत्सरी होते. त्यांनीं राजास कळविलें कीं, हा कल्पनाबाज माणूस केवळ वेडा आहे. राजाचें समाधान होईना. यावर त्यांनीं एक डाव केला. ते राजास म्हणाले, 'हा जेथें व ज्या दिशेनें जावयाचें असें हटकून म्हणतो तेथें व तिकडे आपलेच नावाडी आपण धाडूं व नवीन भूमि शोधण्याचें श्रेय आपणच घेऊं.' राजानें हुंकार दिला. कोलंबसाचे सर्व नकाशे या लुच्च्यांनी मागून नेले व कोणास नकळत आपलींच जहाजें त्या अनुरोधानें पश्चिमेस रवाना केलीं व इकडे कोलंबसास बोलण्याचालण्यावारीच झुलत ठेविलें. कांहीं दिवसांनीं ते बळेंच दर्यांत दवडलेले खलाशी रडत परत आले. त्यांना उल्हास ना ज्ञान. चार दिवस समुद्राची हवा पिऊन ते सांगत आले कीं, पश्चिमेकडे वाटेल तितकें जा, जमीन म्हणून कोठेंही नाहीं. हा कोलंबस उगाच उपरा, उपट्या दिसतो. या त्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवून राजानें कोलंबसास परत धाडिलें. राजाची ही लबाडी त्याला कळल्यावर त्यानें तिरस्कारानें त्याचें पुन्हा तोंड न पहाण्याचा निश्चय केला. दरम्यान त्याची बायको वारली. प्रपंचाची ओढाताण फार होऊं लागली. कर्जानें कपाळ छिनत चाललें. वरील तिरस्काराची या ओढगस्तपणांत भर पडून त्यानें पोर्तुगाल देशास रामराम ठोकला. कोणी म्हणतात सावकारांच तोंड चुकविण्यासाठींच तो तेथून निसटला.
 जिनोआ शहरच्या राजाकडे तो तडक गेला. पण त्याच्यांत दम नव्हता. तो म्हणाला, मला खर्चाचें झेंपणार नाहीं. मग त्यानें आपला भाऊ बार्थोलोमो यास इंग्लंडचा सातवा हेन्री यांजकडे पाठविलें; कारण कीं, त्याचाही या कामांतील लौकिक बरा होता. त्यास तिकडे पाठवून तो स्वतः स्पेन देशांत गेला. बरोबर एकुलता एक मुलगा, अंगावर कपडा नाहीं, खिशांत छदाम नाहीं अशी या वेळीं स्थिति त्याची होती. त्याचा मेहुणा तिकडेच एका खेडेगांवीं रहात असे. त्यांच्या आश्रयास जावे म्हणून तो वणवण करीत निघाला होता. वाटेंत एका धर्मोपदेशकानें त्याचें बोलणें नीट ऐकून घेतलें व त्याच्या कोणी तरी साहसी व प्रतिभाशाली माणूस असावा असे ओळखून त्यास पत्र देऊन आलोंझो पिंझो नांवाच्या तेव्हांच्या एका प्रसिद्ध दर्या-सारंगाकडे त्याने त्यास पाठविलें. त्यानें कोलंबसाची वाहवा करून त्यास राजदरबाराकडे रवाना केलें. इ० सन १४८६ च्या वसंतांत कोलंबस राजधानीस आला.
 तेथें पहातो तों निराळाच प्रकार चालू होता. राजा मूर लोकांशी युद्ध सुरू करणार होता. त्या निमित्त जिकडे तिकडे तयारीची दंगल माजून राहिली होती. वास्तविक राजा व राणी हीं चांगलीं होतीं. पण त्यांचीं कामें त्यांना पुरेशी असल्यामुळे कोलंबसाच्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावयास त्यांस फुरसतच होईना. आतां तर त्याला अन्नाचीही मोताद पडूं लागली. कोणी विचारीना व धंदा मिळेना असें झालें. पण दुसरा एक योग बरा वठला. त्याची रूपसंपदा, सतेज कान्ति व भव्य मुद्रा हीं पाहून एक चांगल्याची तरुण विधवा स्त्री त्यावर फिदार झाली. उभयतांनी लग्नाची तसदी घेतलीच नाहीं. खुशाल नवरा-बायको म्हणून राहूं लागलीं. पण कांहीं झालें, तरी हिंदुस्थानास पश्चिमेकडून जाण्याचा त्याचा ध्यास सुटेना. त्यानें आपली कहाणी अनेकांना सांगितली. शेवटीं याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे असें होतां होतां टोलोडे येथील महोपाध्याय कीं, जो फार विद्वान्, बहुश्रुत व चतुर होता, त्यानें त्याचें काम मनावर घेतले आणि त्यानें खुद्द राजाशीं त्याची गांठ घालून दिली. राजा तरी आपल्या एकटयाच्या मतानें काय करणार? त्यानें एक सभा बोलाविली व कोलंबसाच्या म्हणण्याची भवति न भवति चालू झाली.
 कोलंबस हा एकटाच काय तो आपली बाजू सजविणारा होता. बाकीचे सभासद त्याची परीक्षा करावयास जमलेले. कोणी त्यास पैसाकाढू उपटया म्हणत व कोणी भोळा, वेडगळ म्हणत. अन्नास महाग झालेला, पोळी पिकवावयास पहातो आहे, असें कोणी म्हणत. पण या कुत्सितांच्या बोलण्यानें निराश न होतां त्यानें आपलें म्हणणें कमिटीपुढें मांडिलें. भौतिकशास्त्रे व अध्यात्मविद्या हीं त्या काळीं अजून अलग अलग झालेली नव्हतीं. प्रत्यक्षानें जें खरें असेल तें सुद्धां धर्मशास्त्राशी विसंवादी असलें तर तें खोटें मानण्याची चाल असे. मूळ बायबल अथवा त्यावरील भाष्यें हींच सर्व झाताज्ञात ज्ञानाचे सुपूर्ण कुंभ असून जें त्यांत नाहीं तें ज्ञानच नव्हे असें समजत असत. अर्थात् कोलंबसाच्या भाषणांत जेव्हां 'पृथ्वीचा गोलाकार', 'गोलकाच्या दुसऱ्या बाजूस असणारे प्रतिपादाति (अँडिपोडिज्)' इत्यादि प्रयोग येऊ लागले तेव्हां त्या चिकित्सकमंडळांत 'पाखंड- पाखंड' म्हणून एकच गिल्ला झाला. कारण मागे असल्याच एका प्रसंगी सत्पुरुष लाक्तनियस हा उसळून म्हणाला होता कीं, "असल्या थोतांडावर विश्वास कसा बसणार? ज्यांच्या पायाचे तळवे आमच्या तळव्यांकडे आहेत असे मानवप्राणी पृथ्वीवर आहेत? मग त्यांच्या टांचा जमिनीस चिकटून डोकीं मात्र उरफाटीं लोंबत नसतील काय? पृथ्वीवर असा प्रदेश असणें शक्य आहे काय, कीं जेथें अवघ्या वस्तु 'खालीं डोकें वर पाय' अशा आहेत? जेथें झाडांच्या मुळ्या वर भुईंत व फांद्या खालीं अंतराळांत लोंबत आहेत? जेथें गारा, पाऊस वर पडतो? खरोखर या सर्व कुकल्पना दुसऱ्या एका मूर्ख कल्पनेमुळे पत्कराव्या लागत आहेत आणि ती म्हणजे पृथ्वी गोल आहे असें मानणे ही होय. हे नवमतवादी लोक अगोदर एक चुकीचें बोलतात आणि मग त्यांतून हजारों चुकीचींच प्रमेयें बाहेर पडतात!" सदर महंताचे बोल प्रस्तुत प्रसंगीं जबरदस्त शस्त्र म्हणून कोलंबसावर उगारण्यांत आलें. कोणी म्हणाले, "ही प्रतिपादातीची कल्पना सर्वथा अग्राह्य होय. ती जर मानिली तर आदामपासून अवघी मानवजात जन्मली हा बायबलप्रणीत सिद्धान्त खोटा पडतो. जर ते आदामचेच वंशज तर ते तेथें गेले कसे! एवढा अफाट समुद्र त्यांनी उल्लंघिला कसा? अर्थात् मूळांत ते नसलेच पाहिजेत." कोणी 'मूले कुठारः' या न्यायाने म्हणाले, "अगोदर पृथ्वी गोल आहे हेंच खोटें आहे. कारण बायबलांत स्पष्ट म्हटले आहे कीं, हें नीलवर्ण आकाश पृथ्वीवर तंबूप्रमाणे आहे. मग आकाश जर तंबू तर त्याच्या खालची पृथ्वी ही एक विस्तीर्ण सपाट सतरंजीच नव्हे काय?" कोणी म्हणत, "पृथ्वीचा गोलाकार व प्रतिपादातीचें अस्तित्व खरें धरलें तरी हा कोलंबस उष्ण कटिबंधांत जाऊन जगणार कसा?" कोणास चिंता पडली कीं, जी सफर निदान तीन वर्षे चालवावी लागणार तींत हा अन्नपाण्यावांचून मरणार नाहीं काय? शेवटीं एका चतुर श्रोत्यानें विचारलें कीं, "समजा, तुम्ही हिंदुस्थानास पोंचला; तरी पण पोंचलों म्हणून सांगण्यास तुम्ही परत कसे येणार? तुम्हीच म्हणतां पृथ्वी गोल आहे. अर्थात् इकडून तिकडे जातांना तुम्हांस उतरण लागेल व सफर सहज होईल; पण तिकडून परत फिरल्यावर तुम्हांस सारखा चढच लागणार. मग या अखंड चढानें तुम्ही परत कसे येणार?" हा बिनतोड कोटिक्रम ऐकून तेव्हांचे श्रोते कौतुकानें स्तिमित झाले, कीं आपल्याचपैकीं एकाचें अज्ञान पाहून ओशाळले याची नोंद इतिहासांत नाहीं! पण मागें मागें जाऊन प्रस्तुतच्या उत्क्रान्त कल्पनांची वाढ तपासली म्हणजे ज्ञानाची गति किती मंद आहे हें लक्षांत भरून आपल्या बुद्धीस गांभीर्य प्राप्त होतें. या गोंधळांतसुद्धां कांहीं उपाध्याय खरे चिकित्सक होते. त्यांनीं त्याचें म्हणणें खरें आहे असें ठरविलें व त्याप्रमाणें बादशहास कळविलें. पण बहुमत मात्र विरुद्ध होतें.
 इकडे राजा आपल्याच लगबगींत होता. शेवटीं आज पाहूं, उद्यां पाहूं असें करता करतां तो युद्धावर निघून गेला आणि कोलंबसास हात पांघरून बसण्याची पाळी आली. पुढे आपणांस तरी घरी बसून काय फायदा हें पाहून कोलंबसही लढाईवर गेला. दोन वर्षे या नादांत गेलीं. पुढें थोडें स्थिरस्थावर झाल्यावर त्यानें पुन्हा बोलणें सुरू केलें. पुन्हा सभा, पुन्हा चर्चा असें होऊन दरबारच्या पंडितांपुढें राजाचें कांहीं चालेना. त्याच्या मनांत मदत करावयाचें होतें; पण पंडितांचा बुद्धिवाद- म्हणजे अज्ञानवाद- त्यास तरी कोठें खोडत येत होता? शेवटीं कांहीं होत नाहींसें पाहून कोलंबसानें कानास खडा लाविला व राजधानी सोडली. दरम्यान इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतून राजांची पत्रे आली होतीं. हे राजे म्हणजे मोठे शोधलालस होते असें नव्हे तर कोलंबसाच्या प्रयत्नामुळे स्वतंत्र देश सांपडला तर आपला व्यापार आणि राज्य हीं वाढतील असें त्यांस चाटत होतें. कोलंबस राजदरबारांतून विन्मुख परत जातो हें पाहून जॉन पेरे या मठाधिकाऱ्यास फार वाईट वाटले व त्यानें राणीसाहेबांकडे जाऊन त्रागा केला कीं, असला उमदा शोधक परत दवडूं नये. राणी राजाची बायको खरी; पण प्रत्येक कामांत सरकारस्वारी काय म्हणते हें पाहाण्याची तिला जरूर नव्हती. तिचें व राजाचें मिळून एक संयुक्त असें तें राज्य होतें. काय वाटेल तें होवो, त्याला मदत करीन असें वचन तिनें दिलें व राजधानी सोडून गेलेल्या कोलंबसास जासूद धाडून परत आणिलें. दरम्यान युद्धाचा शेवटही गोड होऊन मूर लोकांची स्पेन देशांतून पूर्ण हकालपट्टी झाली. अर्थात् राजाही खुषींत होता. राणीसाहेबांचा कल पाहून त्यानेंही संमति दिली व कोलंबसास सर्व सिद्धता करून द्यावयाचा त्यांचा निश्चय झाला. अर्थात यापूर्वी कोलंबसाशीं अटी ठरवितांना पुन्हा बिनसेलसें दिसूं लागलें होतें. पण दागिनेसुद्धां गहाण टाकीन, पण आतां माघार घेणार नाहीं ही राणीची प्रतिज्ञा राजानें ऐकिली तेव्हां त्यानेही रुकार भरला. याप्रमाणें राजाश्रयार्थ दाही दिशा भटकणाऱ्या कोलंबसाला आपली कल्पना खरी करून दाखविण्याचा सुयोग प्राप्त झाला.
 राजा व कोलंबस यांच्यांत ठरलेल्या अटीही मनोरंजक आहेत. पहिली अट अशी होती कीं, कोलंबस जे जे देश व समुद्र हुडकून काढील तेथील सर्वसत्ताधारीपणा कोलंबसास असावा व तो त्याच्या मागून त्याच्या कुळांत चालावा. दुसरी अशी कीं, नवीन भूमीवर त्याच्याकडे राजाचे प्रतिनिधिपण असावें. तिसरी अशी कीं, त्या देशाचीं उत्पन्नें व त्यांशी होणारा व्यापार यांवरील नफ्यापैकीं दहावा हिस्सा कोलंबसास मिळावा. चवथी अशी कीं, तद्देशीयांशीं जे काय तंटे निघतील ते तोडण्याचा सर्व हक्क त्यासच असावा आणि शेवटची अशी की, त्याच्या या व पुढील सफरींत लागणाऱ्या खर्चापैकीं आठवा हिस्सा त्याने द्यावा व त्याबाबत नफ्यापैकींही आठवा हिस्सा त्यास मिळावा. इ० सन १४९२ एप्रिल ता. १७ ला फर्डिनंड राजा व इझाबेला राणी यांनीं या दस्तैवजावर सही केली व लागलींच तीं दोघें सफरीच्या तयारीस लागलीं. पश्चिमेकडे आशियांतील पूर्वेकडचा तार्तरी देश लागेल या कल्पनेवर त्यांनीं तार्तरीच्या बड्या खानास पत्रे दिलीं व पेलोस बंदरच्या अधिकाऱ्यांना हुकूम फर्माविले कीं, जहाजांची तयारी करावी. भोवतालच्या खलाशी लोकांवर सक्ती करून त्यांस सफरीवर जावयास लाविलें. जिकडे तिकडे हालचाल सुरू झाली. सफरीचें स्वरूप जेव्हां खलाशांस कळलें तेव्हां त्यांच्या घरीं रडारड सुरू झाली. जहाजांचे मालकही सर्वथा नाखुष होते, पण करतात काय? 'राजा बोले आणि दळ हाले!' आपण परत येऊंच अशी खुद्द कोलंबसासही खात्री नव्हती. त्यानें ख्रिस्ती पद्धतीनें उपदेशकापुढे पातकोच्चार केला. सर्व दुय्यम तांडेलांनीं व खलाशांनींही हा विधि उरकला. आपल्याकडे काशीस जातांना सर्व निरवानिरव करून जाण्याची चाल होती तसेंच या वेळीं झालें. किनाऱ्यावर अत्यंत कष्टी अशा सग्यासोयऱ्यांचे व बायकापोरांचे थवेच्या थवे जमा झाले. राजानें हें काय ओढून आणिलें आणि आमचीं माणसें आम्हांला अंतरविली म्हणून जिकडे तिकडे रडणींभेंकणी चालू झालीं. खुद्द खलाशीही नशिबाला हात लावून बायकापोरांकडे शेवटचें पाहून कामाला लागले. खरा कार्योत्साह काय तो कोलंबस व त्याचा दुय्यम पिंझो यांच्या मनांत होता. अशा रीतीनें मनांत कल्पना आल्यापासून धडपड करीत असतां अठरा वर्षांनीं कोलंबसास अनुकूलता प्राप्त झाली! दुसरा एखादा कमी धीराचा माणूस दारिद्र्य, अवहेलना, अवमान व दुःख यांनी खचून जावयाचा; पण कोलंबस खरा तत्त्वनिष्ठ होता आणि खरा धर्मश्रद्धाळू होता. त्याच्या मनांत अशी खोल आकांक्षा होती कीं, नवी भूमि शोधून काढीन, पुष्कळ धन मिळवीन आणि त्याच्या जोरावर फौजा उभारून ख्रिस्त्यांचें पवित्र स्थान जे येरुशालेम तें मुसलमानांच्या हातून सोडवीन. कोलंबसाच्या चारित्र्याचा हा भाग अत्यंत बोधप्रद आहे. एकेका गोष्टीचें असें वेड लागल्याशिवाय कार्ये तडीस जात नाहींत हें यावरून स्पष्ट दिसतें.
 इ० सन १४९२ ऑगस्ट ३ रोजीं या सफरीसाठी कोलंबसानें जहाजें हांकारिलीं. सप्टेंबर ता. ९ ला पोर्तुगीज लोकांचे फेरो बेट त्याला लागलें. तेथून पुढे सगळा समुद्र केवळ अज्ञातच होता. जमीन दिसेनाशी झाल्यावर खलाशी जास्तच हिरमुसलेले दिसूं लागले. त्यांना मारूनमुटकून जहाजांबरोबर पिटाळलेलें होतें. त्यांच्या मनानें खास घेतलें कीं, आतां आपण घरादारांस मुकलों. मर्दासारखे मर्द पण ते बायकांसारखे रडूं लागले. कप्तानाने त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगून पाहिल्या. जेथें पोंचावयाचे ते देश कसे सुंदर आहेत, तेथील जमिनी कशा सुपीक आहेत आणि सोनें तर किती सुलभ आहे इत्यादि अनेक काल्पनिक वर्णनें त्यानें केली; पण त्यांना वाटे कीं, सगळे जगलों वांचलों तर मिळावयाचें.
 तीनही जहाजांच्या तांडेलांस त्यानें हुकूम केला कीं, थेट पश्चिमेकडे चलावें. खलाशांचे भय वाढत जाऊं नये म्हणून त्याने एक हिकमत योजिली. आपण फार अंतर तोडीत चाललों नाहीं असें त्यांस वाटविण्यासाठीं त्यानें अंतर मोजण्याची दोन मापें केलीं. खरें आपल्यापाशीं व खोटें सर्वांना दिसेसें. प्रत्येक दिवशींच्या मैलांतून अमुक एक वजा करून उरलेला आंकडा मात्र पाटीवर लावावा असा त्याचा क्रम असे. सप्टेंबर ता. १३ ला होकायंत्राची सळई सरळ राहीनाशी झाली. प्रथम त्यानें हें कोणास दिसूं दिलें नाहीं; पण सुकाणूंवाल्यांच्या तें लवकरच ध्यानांत आलें व सर्व जहाजांवर जिकडे तिकडे खळबळ झाली. कारण सळई वांकडी झालेली त्यांनीं कधीं पाहिली नव्हती. अर्थात् दिशासुद्धां फिरल्या कीं काय, असें लोक कुजबुजू लागले; पण कोलंबसानें आपल्या ज्योतिषाच्या ज्ञानावर वेळ मारून नेली. तो जेव्हां नक्षत्र-तारांची नांवें व होकायंत्राचा त्यांच्याशीं संबंध इत्यादि बाबी सांगूं लागला, तेव्हां कांहींच न कळल्यामुळे त्यांनीं त्याचा बोज राखला व पडतें घेतलें. थोड्याच दिवसांत समुद्रावर फांद्या, फळें, लांकडें इत्यादि दिसली आणि तीं जिकडे जात आहेत तिकडे जावें असें कित्येकांनी सुचविलें; पण तो म्हणाला, 'हिंदुस्थान तिकडे सांपडावयाचें नाहीं, आपणांस सरळच गेलें पाहिजे'. त्याही खुणा पुढें दिसेनाशा झाल्या. दिवसांमागें दिवस व रात्रींमागें रात्र यावी व जावी असें झालें. वर आकाश व खालीं पाणी यांशिवाय तिसरा पदार्थ नाहीं असें झालें. त्यांना वारा फार अनुकूल होता व त्यामुळें प्रवास जलदीनें चालू होता. पुष्कळांना शंका येऊ लागली कीं, कप्तान खोटे मैल लावीत असावा. शेवटी हा अनुकूल वाराच त्यांना शत्रु वाटू लागला. कारण पश्चिमेकडून वारा मुळींच येईना. त्यांना वाटे कीं, आपणांस परत वळतां यावयाचे नाहीं. पूर्वेकडूनच जर वारा वहात राहिला तर उरफाटें फिरतां तरी कसें येईल? कोलंबसास यावर कांहीं तोड सुचेना. पण दैवयोगानें पश्चिमेकडून वारा वाहूं लागला! व खलाशांचा जीव भांड्यांत पडला. कारण कीं, इतक्या दूरच्या समुद्रावरही वाऱ्यास पश्चिमेकडून वहात येण्याची संवय आहे हें त्यांस दिसलें! पुढें तीन चार दिवसांनी वारा अगदींच पडला. समुद्र हलेना कीं डोलेना. खलाशांस वाटलें आतां तर बोटी जागच्या हलावयाच्यासुद्धां नाहींत! समुद्रांत मध्येच असलेल्या एखाद्या उथळ जागीं आपण आलों असून रेताडांत वगैरे नावा अडकणार ही भीति त्यांस वाटू लागली. कोलंबसाने लागलीच नांगर टाकून किती खोल पाणी तेथें आहे हें त्यांस पटवून दिलें. तरी त्यांस दम निघेना. ते म्हणत, 'असें जर आहे तर नावा सरकत कां नाहींत?' पण दैवयोगानें दुसरे दिवशीं समुद्रास गरगरून भरतें आलें व नावा भराभर चालूं लागल्या. तरी पण जमीन कोठेंच नाहीं! मागली फार मागें राहिली; पुढें असेलच अशी खात्री नाहीं. नावाड्यांत फार चुळबूळ सुरू झाली. "राजानें हा कोठला भुरटा परदेशी जवळ केला आणि स्वदेशच्या माणसांच्या गळ्याला दावें लावून तें त्याच्या हातीं दिलें." अशी जो तो तक्रार करूं लागला. "लोक चांगलें सांगत होते कीं, हा उगाच एक उडाणटप्पू भटक्या आहे. पण तें राजानें ऐकलें नाहीं आणि आतां आमच्या जिवाला तांत लागली आहे, आम्हीं याचें आतां कां ऐकावें?" दुसरा म्हणे, "खरेंच आहे. परत फीर म्हटलें तर हा ऐकत नाहीं." तिसरा म्हणाला, "हा बऱ्या बोलानें ऐकेलसें दिसत नाहीं. त्याला जरा चुणूकच दाखविली पाहिजे." शेवटीं कांहीं लोक बेफाम होऊन त्याला म्हणाले, "आतां जर तूं परत फिरला नाहीं तर तुझे हातपाय बांधून तुला समुद्रांत फेंकून देऊ. नाहीं तर परत फीर." कोलंबसही भला हिकमती व धीट होता. केव्हां शिवी हसडून, केव्हां दादा-बाबा करून, केव्हां भेद पाडून तो त्यांस वळवीत असे. एकदां असें झालें कीं, पिंझो आपल्या जहाजावरून 'जमीन जमीन' म्हणून मोठ्याने ओरडला. वेळ रात्रीची होती. कोलंबसासही वाटलें. जमीनच आहे. जिकडे तिकडे आनंद झाला. पण सकाळी पाहातात तो एका ढगापलीकडे तेथें कांहीं नाहीं. खलाशी जास्तच चवताळले. आक्टोबर ता. ७ च्या सुमारास संध्याकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे डोक्यावर उडत जात असतांना त्यांस दिसले. पक्षी आपल्या घरट्यांसच जात असावे हें उघड होतें. म्हणून त्या रोखानें कोलंबसानें जहाजें वळविली. तरी तीन दिवस जमीन नाहीं. चवथे दिवशीं एक झाडाचीं फळे असलेली फांदी, एक नकशी केलेला लांकडी सोटा, समुद्रकांठीं जसले असतात तसले मासे अशा वस्तु त्यांस दिसल्या. इतक्यांत त्या दिवशी रात्री कोलंबसास दोनदां उजेड दिसलासा वाटला. पण उगाच खोटी आशा वाटूं लागू नये म्हणून त्यानें एक दोघांस निरखून पहावयास सांगितलें. त्यांनाही ओझरता उजेड दिसला. अर्थात् ते सर्व गप्प बसले. शेवटी रात्री दोहोंच्या अमलांत आघाडीस असलेल्या पिंटो जहाजावरून जमीनसूचक असा कडाडून बंदुकीचा बार झाला! सर्व लोक ताडकन् उभे राहिले. ज्याला हा उजेड प्रथम दिसला त्याचें नांव रॉड्रिग बर्मेजो असें होतें. जिकडे तिकडे लगबग झाली. जमीन तर आहेच आहे; पण तेथें माणसेंही आहेत असें वाटून मंडळी आनंदांत गर्क झाली. तांबडें फुटतांच जमीन स्पष्ट दिसूं लागली. तीवरील झाडें, थुइथुइ करणारे झरे, गवताळ रानें हीं दुरून पाहून सर्वांना आनंदाचें भरतें आलें. कोलंबस काळजीनें खंगत होता. त्याला एकदम स्फुरण चढलें. त्यानें कृतज्ञता बुद्धीनें आकाशाकडे पाहिलें आणि अश्रूंचा प्रवाह त्याच्या डोळ्यांतून वाहूं लागला. वीस वर्षांची तपस्या फळास आली. अवमान, अवहेलना, दारिद्र्य धुऊन निघालें. लबाड, उपटया, भटक्या या नांवांनीं संबोधिलेले आपण, खरोखर, परमेश्वराची इच्छा व्यक्त होण्याचें साधन झालों म्हणून त्यास समाधान झालें. जे मारावयास उठले होते ते चरणीं लोळण घेऊ लागले. शिव्या देणारे घसा फोडून त्याचा जयजयकार करूं लागले. त्याचें भाकीत खरें झालें. सकाळ होतांच सर्वांनी आपापले पोषाख चढविले. कोलंबसानें आपला दर्यासारंगाचा जरतारी झगा घातला. कमरेस समशेर लटकाविली. व हातांत स्पेनच्या राजाचे निशाण घेऊन तो जमिनीवर उतरला. सर्वांनीं जमिनीचें चुंबन घेतलें व गुडघे टेकून मनोभावें ईश्वराची प्रार्थना केली. या ठिकाणी एका नवीन जगाचा आणि नवीन युगाचा अनावरणविधि झाला व तो कोलंबसाच्या हस्ते झाला.
 तेथच्या उघड्या नागड्या लोकांनीं जेव्हां हे उंच, सुस्वरूप, शुभ्रवर्ण, रंगीबेरंगी कपडयांनीं झकमकणारे, आणि तलवार बंदुकांनीं उग्र झालेले लोक समुद्रांत अचानक पाहिले तेव्हां त्यांस आश्चर्य वाटलें. इकडे कोलंबसास वाटले, आपण हिंदुस्थानासच आलों! व त्या कल्पनेनें तो तेथील सर्व गोष्टींचा अर्थ बसवूं लागला. तेथील सुंदर व तेजःपुंज पक्षी, उबदार आणि खेळकरपणा आणणारी हवा हीं पाहून त्याची खात्री झाली कीं, हें हिंदुस्थानच. हिंदुस्थानांत मसाल्याचीं राजेंच्या रानें आहेत असें त्यानें ऐकिलें होतें. तेथील हवेलाही मसाल्याचा वास येत आहे असें त्यास वाटूं लागलें! अर्थात् शोधासाठीं त्यानें कांहीं हत्यारबंदांस 'आंत जा' म्हणून सांगितलें. त्यांना अनेक तद्देशीय भेटले. ते फार सुजन व सभ्य दिसले. त्यांचीही कल्पना तीच झाली. येथेंच त्यांच्या नजरेस पानाच्या सुरळ्या एका टोंकास पेटवून दुसरें टोंक तोंडांत धरून जिकडे तिकडे धूर माजविणारे लोक दिसले. हीच आपली तमाखू! बरेच दिवस किनाऱ्यानें फिरून बेटा-भूशिरांना नवीं नांवें देऊन कोलंबसाने तेथील लोकांशी स्नेह संपादिला. मग सर्वभर हिंडून सोन्याचाही शोध लावला. मग बरेच दिवस घालविल्यावर सोनें, सुंदर पक्षी, पांच-सहा तद्देशीय माणसें व इतर अनेक वस्तु घेऊन परत फिरण्याचा त्यानें निश्चय केला. पण कित्येक खलाशांना त्या देशाचें इतकें वेड लागलें कीं, तेथेच रहाण्याची त्यांनी इच्छा दर्शविली. म्हणून कोलंबसानें तेथें एक किल्ला बांधण्याचें काम सुरू केलें. ही वसाहतीची मूळ कल्पना होय. किल्ला, खंदक तयार करून जवळचा जरूर तो दारूगोळा तेथें ठेवून त्यानें वसाहतवाल्यांस बऱ्या हुशारीने रहावयास सांगितलें आणि कृतकृत्य होत्साता तो स्पेन देशास परत निघाला. परतवाट फारशी सुखाची गेली नाहीं. पिंझो भांडून दूर निघून गेला. वादळें झालीं व आपण आतां सर्व बुडणार असें कोलंबसला वाटूं लागलें. त्यानें आपलें सर्व वृत्त लिहून काढिलें, तो कागद मेणकापडांत बंद करून वरून पुन्हा मेणाचे थर बसवून ते सर्व एका पिंपांत बसविले व पीप चांगलें बंद करून समुद्रांत फेंकून दिलें. हेतु हा कीं, आपण बुडाल्यास तें वहात वहात कदाचित युरोपास जाऊन लागावें! पण वादळें शांत झालीं व हाल-विपत्ति सोसून कोलंबसाचें जहाज पोर्तुगालच्या किनाऱ्यास लागलें. धिक्कारिलेला तांडेल नवें जग हुडकून काढून परत आला हें पाहून राजाला खंती वाटली. पण त्यानें उदारपणानें त्याचें स्वागत केलें. सर्व लिस्बन शहर त्यास पहावयास लोटलें. लवकरच कोलंबस स्पेनच्या किनाऱ्यास लागला. तेथून त्याने फर्डिनंड व इझाबेला यांस आपण परत आल्याची पत्रे लिहिली. राजधानीतचशी काय, सर्व मुलुखभर ही बातमी हां हां म्हणतां पसरली. सर्व लवाजम्यासह कोलंबस राजधानीस आला. तेथून राजवाड्याकडे त्याची मिरवणूक सुरू झाली. रोमन वीरांचाही असा सन्मान कधीं झाला नसेल. आघाडीला ते सहा इन्डिअन्स चालले होते. त्यांचीं रंगविलेलीं अंगे व सुवर्णभूषणें पाहून लोक चकित झाले. त्यांच्यामागें पोपट व इतर नवे पक्षी व पशु यांचे पिंजरे होते. त्याच्यामागें उंचावर ठेवलेले सोन्याचे मुकुट, सलकडी इत्यादि सोन्याच्या जिनसा चकमकत ठेविल्या होत्या. त्यांच्यामागून स्वतः कोलंबस स्वतः घोडेस्वार होऊन हातांत राजाचें निशाण घेऊन दिमाखाने चालला होता. आज राजानें आपलें सिंहासन वाड्यापुढील पटांगणांत मांडविलें होतें. सर्व मांडलिक, अमीर-उमराव, सरदार, दरकदार, विद्वान्, शास्त्रवेत्ते यांनी दरबार गच्च भरून गेला होता. कोलंबस तेथें येतांच सर्वांनीं खडी ताजीम दिली. प्रत्यक्ष राजा-राणी उभी राहिली व कोलंबस आतां गुडघे टेंकणार तोंच त्यास हात देऊन त्यांनीं उभें केलें. सर्वांना आनंदाश्रूंनी गहिवरून आलें. यत्न करूनही कोलंबसास शब्द उमटेना. शेवटी आनंदभार हलका झाल्यावर त्याने सर्वांस स्वमुखानें सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून राजाराणी खुष झाली. त्यांनीं देवाची प्रार्थना केली व त्याजवर बक्षिसांचा सडा केला. जो कोणी जमीन पहिल्यानें पाहील त्यास बडें पेन्शन मिळणार होतें. तेंही त्यांनीं कोलंबसासच दिलें. कारण रीड्रिगोच्या आधीं त्यानेंच उजेड पाहिला होता. पण यामुळे रीड्रिगो इतका रागावला कीं, हे सर्व लोक लबाड व खोटे ख्रिस्ती आहेत असें म्हणून तो वेडानें मुसलमान होऊन परागंदा झाला! असो. तेथें कोलंबसाच्या कर्तबगारीचा कळस झाला. कारण त्याचा जीवितहेतु पूर्णतेस गेला.
 वास्तविक त्यास या वेळींच मरण यावयास हवें होतें. कारण त्यानें येथून पुढे केलेल्या गोष्टी कोणाही सामान्य माणसास करतां आल्या असत्या; पण पुष्कळदां असें दिसतें कीं, जीवितहेतु संपल्यावरही कित्येक थोर विभूतिसुद्धां उगाच लुडबूड करीत जगत असतात व त्यायोगें त्यांच्या उज्ज्वल नांवास कलंक लागेशीं कृत्यें त्यांच्या हातून होतात. कोलंबसाचें असेंच झाले ती हकीकत थोडक्यांत देतों.
 एका सफरींत विजय आल्यामुळे कोलंबसास व राजास सारखाच हुरूप येऊन त्यांनी दुसऱ्या सफरीची तयारी केली. अशा पांच चार सफरी त्यानें केल्या. तेथें जावें, तेथिलांशी संबंध सुरू करावे, भांडणें निघावी, मारामाऱ्या व्हाव्या, तद्देशीयांच्या कत्तली व्हाव्या, त्यांच्या बायकापोरी जबरदस्तीनें ओरबाडाव्या, आपापसांत मारामाऱ्या कराव्या, सोन्याच्यामागें पळावें, गुलाम नेऊन विकावे, नव्या मुलुखाचें नामकरण करावें, हाच काय तो कार्यक्रम. दुसऱ्या सफरीसच तेथील लोकांच्या ध्यानीं आलें कीं, हे लोक बदमाष आहेत. एक कोलंबस नसेल दुर्वृत्त; पण बरोबरचे खलाशी व स्वदेशांत नकोसे झालेले लुच्चे हे महा पागल असत. आपल्या सुधारलेल्या शस्त्रास्त्रांनी ते त्यांस हैराण करीत व त्यांचे सोनेनाणें बुचाडून वर ते त्यांच्या बायकाही फुसलावून नेत. कोलंबसाचें हें नवें युग खरें; पण खुद्द मूळ अमेरिकनांस हळुहळू चेंपीत नेणारें आणि शेवटीं भूतलावरून निखालस निपटून टाकणारें हें प्राणसंकटच होतें. कोलंबस स्वतः या बाबींत फार मर्यादेनें व सचोटीनें वागत असे. पण बरोबरचे लोक त्यास आवरत नसत. कित्येकदां ते त्याजवरच उसळून उठत; पण या बाबतीत जरी तो भला होता तरी दुसऱ्या एका महापातकी संस्थेचा आरंभही त्याच्याच हातून झाला. नवीन स्थापिलेल्या वसाहतींचा खर्च भागावा आणि खजिन्यांतही भर पडावी म्हणून त्याने राजास पत्र लिहून सुचविलें कीं, क्यारिबियन बेटावरचे नरमांसभक्षक लोक यूरोपांत धरून न्यावे व तेथें गुलाम म्हणून विकावे! व्यापाराला हा उत्तम माल आहे! पण पत्र लिहितांना तो येवढ्यावरच थांबला नाहीं. दुष्ट कृत्य सोज्ज्वळ करण्याची कलाही त्याला साधली होती. त्यानें लिहिलें, हे अज्ञ लोक तिकडे विकले गेले म्हणजे ख्रिस्ती होण्याची संधि त्यांस सहजच मिळेल व अशा रीतीनें राजाचा स्वार्थ व गुलामांचा परमार्थ एकदमच साधतील! एका सफरींत तर त्यानें कित्येक मण सोनें, स्वादिष्ट फळें याबरोबरच राजधानींत विकावयासाठी पांचशें इंडियन गुलाम जहाजें भरून पाठविले! सोन्याचा हव्यास तर त्याला इतका सुटला कीं, तिकडे "चवदा वर्षांवरील प्रत्येक माणसानें दर तीन महिन्यांस चार पांच तोळे सोनें गोळा करून दिलेच पाहिजे" अशी सक्ति त्यानें केली होती! जे प्रतिष्ठित असत त्यांस तर सोनें शेरावारी द्यावें लागे! जेथें सोन नसेल तेथे प्रत्येकानें अमुक गठ्ठे कापूस दिलाच पाहिजे असा दंडक होता. ज्यांनी हे कर भरले असतील त्यांच्या गळ्यांत खूण म्हणून एक तांब्याची खापरखुंटी अडकवीत असत. अशा प्रकारें प्रथम देवदूतासारखे दिसणारे हे परके लोक सैतान आहेत हे त्या नेटिवांस कळून चुकलें. कोलंबसाने ठिकठिकाणी किल्ले बांधून तेथे सोनें गोळा करण्याचीं मकाणें केलीं. कोणी जरा हूं कीं चूं केलें, कीं किल्ल्यावरील शिबंदीचे लोक त्यास चाबकाखाली मारीत असत. एक गोष्ट मात्र सांगावयास हवी. जेव्हां जेव्हां त्यानें गुलामांचें भरताड भरून घरीं पाठविलें तेव्हां तेव्हां इझाबेला राणीस परम दुःख होई. तिला संताप येई आणि "या लोकांस परत आपल्या घरादारांत नेऊन सोडा" असा हुकूम ती सोडी. पण एकटीचें कांहींच चाललें नाहीं. पुढें कोलंबसाचीही ग्रहदशा फिरली. शेंकडों दर्यावर्दी तसल्या सफरी करून संपत्ति आणूं लागल्यामुळे त्याची मातब्बरी कोणास वाटेनाशी झाली. राजाराणी थकत चालली. बरोबरच्या लोकांस कोलंबस इतका धाकांत ठेवी कीं, ते शेवटी बंड करून उठत. त्यांनीं अमेरिकेत त्याजविरुद्ध अनेक कारस्थानें रचिलीं; व दरबारांत सारख्या कागाळ्या येऊं लागल्या. शेवटी त्या खऱ्या आहेत असें वाटून राजाराणीनें त्यास बडतर्फ करून परत बोलविलें. त्याच्या जागीं आलेल्या अम्मलदारानें त्यास एकाद्या साध्या कैद्याप्रमाणें वागविलें. त्याच्या हातांत दंडाबेडी घालून त्यास स्वदेशास परत धाडिलें. त्याजवर आरोप असे होते, कीं तद्देशीयांस ख्रिस्ती केलें असतां गुलाम म्हणून विकतां यावयाचे नाहीं म्हणून मिशनऱ्यांच्या कामास हा प्रतिबंध करतो; व परिचयाच्या किनाऱ्यावर जें खंडोगणती मोतीं सांपडलें तें हा आपल्यासाठीं दाबून ठेवतो. चोरट्या बदमाषाप्रमाणें जरी त्याची रवानगी घराकडे करण्यांत आली तरी त्याचें पूर्ववृत्त स्मरून राणीनें गय केली, पण तीही पुढें लवकरच वारली व त्यास कोणीही वाली नाहींसा झाला. त्याचें वयही बरेंच झालें व हळुहळू अशक्तता येऊ लागली. जवळचें सर्वस्व नाहीं होऊन ब्रह्मस्वाची पाळी आली. संधिवातादि रोगांनीं शरिरांत घर केलें. त्याला स्वतःला अवघ्या पृथ्वीवर आपली म्हणून एक टीचभरसुद्धां जागा राहिली नाहीं. आपल्या मुलास तो काकुळतीनें लिहितो: "माझ्या इनामांपैकीं एक कपर्दिकही मला मिळत नाहीं. मी उचापतीवर जगत आहे. वीस वर्षे मीं हाडांची काडे केली, नवीन पृथ्वी माणसांना दाखविली; पण माझी अशी अंगुळभरही जमीन स्पेन देशांत नाहीं. कोठें तरी भटारखान्यांत तुकडे खातों आणि आतां बिलाचे पैसे कोठले द्यावे म्हणून काळजी मला खाते." अशा आपत्तीत असतांनाच आपलें आटपत आल्याचें त्यास दिसूं लागलें. कागदोपत्रीं जें काय त्याजपाशीं होतें तें सर्वांना यथायोग्य वांटून देऊन श्रद्धाळूपणानें त्यानें देवाची करुणा भाकिली व वयाच्या ७० व्या वर्षी म्हणजे इ. सन १५०६ मे महिन्याच्या २० तारखेस प्राण सोडला.