पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/जूलियस सीझर




 जूलियस सीझर

इ.सनापूर्वी १०० या वर्षी जूलिअस सीझर याचा जन्म झाला. जगांत आजपर्यंत जे मोठमोठाले कार्यकर्ते होऊन गेले त्यांच्यांतील पहिल्या प्रतीच्या नांवांत सीझरचें नांव दाखल आहे. त्याच्या काळांतच लिहून ठेविलेल्या माहितीवरून त्याची चरित्रे लिहिली गेलीं आहे आणि म्हणून इतक्या भूतकाळीं त्यानें ज्या कांहीं प्रचंड उलाढाली केल्या त्यांचें चित्र आपल्या मनापुढें स्पष्ट उभे राहातें. केवळ बारीक अशा रूपरेखेच्या सांगाड्यांत कल्पनांचा यथेच्छ पेंढा भरून लेखकांनीं कित्येक प्राचीन वीरांची चरित्रे लिहून ठेविली आहेत. तीं केवळ कादंबऱ्याच होत; पण सीझरचें तसें नाहीं. प्रत्यक्ष त्याच्या काळी त्याच्यासंबंधी लिहिली गेलेली हकीगत चांगली तपशीलवार असल्यामुळे त्याच्या चरित्राला अस्सल ऐतिहासिक रूप आहे असें वाचकांस


वाटतें. शिवाय त्याच्या चरित्रावरून त्या वेळच्या अनेक थोर आणि पराक्रमी माणसांसंबंधानें, किंबहुना सामान्य रीत्या त्या कालासंबंधानेंसुद्धां आपल्याला बरीच स्पष्ट कल्पना येते. सध्यांच्या लोकसत्तावादाच्या ज्या गोष्टी आपण बोलतों त्या सीझरच्या वेळी प्रत्यक्षच अमलांत होत्या. कारण लोकसत्तेची कल्पना रोमन लोकांहूनही जुनी आहे. सभा, सेनेटें, प्रतिनिधि, निवडणुकी, व्होटें, व्होटासाठीं तोंडपुजा, पक्ष- उपपक्ष, वशिले, वशिल्याचीं तट्टे, लांचलुचपती, लोकमताचा लहरी स्वभाव, ऐदी श्रीमंत आणि मगरूर गरीब हे सगळे आधुनिक काळांतील प्रकार तेव्हांसुद्धां जशाचे तसे सांपडतात. पण हा एक प्रकार झाला. लोकसत्ता मानणाऱ्या युरोपांतील सध्यांच्या दुसऱ्या कांहीं गोष्टीही रोमन काळांत होत्या. घरीं लोकसत्तेचा डौल आणि बाहेर साम्राज्यसत्तेची हांव हेंही पूर्वीच्या रोमन राष्ट्रांत होतें. घरच्या घरीं लोकसत्तेचें मर्म त्यांस चांगलें कळे; व आपल्या शहरांत लोकसत्ताच असावी असा त्यांचा आग्रहही असे; पण या उदार तत्त्वाचा फायदा ते इतर कोणास द्यावयास केवळ नाकबूल असत. आणि म्हणून लहानशा रोम शहराच्या मर्यादा मागें टाकून त्या लोकांनीं प्रथम सर्व इटली देश व मग पूर्व-पश्चिम इतर देश झपाट्यानें आपल्या ताब्यांत आणिले; आणि तसतसें रोम शहराचे वैभव वाढत चाललें. वाढत्या वैभवाबरोबर लोकांच्या आकांक्षा बळावत जाऊन दरवर्षी स्वारी-शिकारीस जावें, मर्दुमकी करावी आणि गबर व्हावे अशी वहिवाट पडून गेली. श्रीमंतीची भूक चांगली प्रखर असल्यामुळे आणि अंगांत रगही चांगली भरलेली असल्यानें या लोकांनीं आपलें साम्राज्य खूपच विस्तारलें. अर्थात् मुलूख जिंकला म्हणजे तो हाताखाली कायमचा ठेवण्याची जबाबदारी आपोआपच पुढे येते. रोमन लोकांनीं तेंही केलें. मग तद्देशीयांशीं दळणवळण चालू होऊन इतर लोक आपले सेवक आहेत आणि आपण सेव्य आहों ही भावना त्यांच्यांत उत्पन्न झाली. भोगाची लालसा बळावली. फारसे श्रम न करतां जीवितांतील सुख भोगतां याचीं हा आपला हक्कच आहे असेही त्यांस वाटूं लागलें. स्वारीवर जाणारे बरीचशी लूट आपल्या मांडीखाली दडवूं लागले आणि अशा रीतीनें दौलत संपादितां येते हें पाहून बाहेर देशाच्या स्वाऱ्यांवर आपली नेमणूक व्हावी म्हणून शूर व कर्तबगार लोक खटपटी करूं लागले. लोकसत्ता असल्यामुळे लोकरंजन केल्याशिवाय या खटपटीस यश मिळणे कठीण असे. अर्थात् लोकरंजनाचे सर्व प्रकार सुरू झाले. मतदारांनी पैसा खाणें ही गोष्ट रोजच्या सरावाची होऊन बसली. तसेंच मोठमोठे अंमलदार आणि न्यायाधीश यांनीसुद्धां खाजगी रीत्या पैका कमावण्याकडे सारखी दृष्टि ठेवावी असें झालें. बाहेरून येणाऱ्या पैशाची खैरात पहिल्या पहिल्यानें देशांत सर्व लोकभर होत असे; पण पुढें 'आम्हीं मरावें आणि सर्वांनी श्रीमंत व्हावे हा न्याय कोठला' हें बोलणें सुरू होऊन स्वारीवर जाणारे तेवढे गबर होऊं लागले. संपत्तीचा सांठा एका अंगास व दारिद्र्य दुसऱ्या अंगास असें होऊन राष्ट्र एकारल्यासारखें झालें. बाहेर देशाहून नुसती संपत्ति आणण्याची वहिवाट पडली असें नाहीं. कैदी धरून आणून गुलाम बनवून राबावयास लावणें यांतही कांहींच पातक नाहीं असें ठरलें. या पद्धतीनें भिन्नभिन्न देशांतील लक्षावधि माणसें रोम शहरीं जमलीं. मोठमोठे सरदार-दरकदार हजारों एकर उत्पन्नें करून बसले व जमीनमशागतीचे काम या गुलामांच्या हस्ते होऊं लागले. बाहेरून आलेला पैका जसा, तशी स्वदेशाची जमीनही पिकवून खाण्यासाठींच कां होईना, पण सामान्य रयतांच्या वांटणीसच येईना. इतिहास, पीठिका, परंपरा आणि संस्कृति यांच्या सहवासाला पोकळ फुशारकी, सत्त्वहीन खानदानी, आळस आणि सामाजिक बदफैली हे गुण रहावयास आले आणि एकंदर समाजाचे श्रेष्ठ व कनिष्ठ असे स्पष्ट वेगवेगळे दोन थर बनले. या श्रेष्ठांतून कित्येक जबरदस्त योद्धे, मुत्सद्दी आणि साहसी शिपाई पुढे आले आणि त्यांनी रोम शहर व रोमन लोक यांचें नांव दशदिशां गाजवून सोडलें. हें खरेंच आहे; पण या श्रेष्ठकनिष्ठ भावाची बाधा रोमन सत्तेस हळुहळू होऊं लागली. लोकसत्तेची आवड त्यांस लागलेली होती; पण लोकसत्ता म्हटली म्हणजे तिच्या मर्यादा सारख्या फाटत जात रहातात हें त्यांस पत्करत नसे. लोकसत्ता खरी; पण ती आमच्याआमच्यांत; तुम्हीं जरा दूरच राहिलें पाहिजे, आदबीनेच वागले पाहिजे, आणि आमच्या भोक्तृत्वावर डोळा ठेवितां उपयोगी नाहीं अशी या श्रेष्ठांची कनिष्ठांच्या बाबतीत प्रवृत्ति असे. आम्हीं तुम्हांस जपावें हें ठीक आहे; पण सुखें व वैभवें यांची समसमान वांटणी हवी असे म्हणाल, तर तुमचें आमचें बनावयाचें नाहीं असा श्रेष्ठांचा भाव असे. ही चुरस चालू असतांसुद्धां न्यायान्याय पहाण्याची सर्वच श्रेष्ठांची दृष्टि अंधावली होती असें नाहीं. कांहीं श्रेष्ठ न्यायबुद्धीला वश होऊन स्वकीयांचा रोष सहन करून कनिष्ठांचा पक्ष घेऊन भांडत व त्यांच्या सुखसोयींची व हक्कांची तरफदारी करीत. अर्थात् या फितुरांसंबंधानें श्रेष्ठांच्या पक्षांत मोठी तिरस्कारबुद्धि असे. पण या मानीव फितुरीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठांचें जें अगदींच फाटावयाचें तें न होतां प्रसंगोपात्त कळवंडत असतांसुद्धां हे उभयतां लोक रोमन साम्राज्य सारखें फैलावीतच होते. कनिष्ठांनी निवडून दिलेले प्रतिनिधिही स्वाऱ्यांवर जात, आपले गुण दाखवीत आणि श्रेष्ठ-कनिष्ठांच्या नात्यांतला करडपणा नाहींसा करण्यासाठी झटत. श्रेष्ठांपैकी जे कनिष्ठांच्या आकांक्षांना अनुकूल असत त्यांनाही कनिष्ठांनीं आपल्यातर्फे निवडून द्यावें असें सुद्धां होई आणि यामुळे मनःसामर्थ्यें विकसित होण्यास अवसर मिळून न्यायबुद्धिही जागरूक राही. देशांतल्या देशांतच जर हे दोघे कोंडून राहिले असते तर हीं भांडणें विकोपास पोंचून राष्ट्राचें बळ आपापल्याशीं मस्ती करण्यांतच संपलें असतें; पण या रोमन लोकांना बाहेरची हवा खाण्याची जी संवय लागलेली होती. तीच त्यांस तारक होत असे. नित्य नवे प्रसंग उद्भवत दूरदूरच्या प्रान्तांत सीमान्तावर बंडे होत आणि मग, तो श्रेष्ठ असो की कनिष्ठ असो, जो कोणी पराक्रमी असेल, आटोप आणि आवरशक्ति दाखवील, त्यास तिकडे रवाना करण्यांत येई. तो जर श्रेष्ठ असला तर परत आल्यावर श्रेष्ठांचें वर्चस्व वाढविण्याकडे आपले वजन खर्च करी; कनिष्ठ किंवा कनिष्ठांचा पक्षपाती असला तर त्यांच्या बाजूनें आपलें वजन खर्च की. असाच एक मोठा प्रसंग प्राप्त झाला.
 रोमन राष्ट्राचें आणि न्युमिडियाचा राजा जुगर्थ याचे फार दिवस वैर चालू होतें. शेवटी या भांडणाचा निकाल करण्याचे काम कनिष्ठांचा वीर मारियस याजकडे आलें. हा मारियस मोठा सालस, कांहींसा भोळसट पण बडा शूर शिपाई होता. त्यानें जुगर्थाशी जोराचा सामना केला. त्याच्या फौजा उधळून लावून त्यानें त्यास पकडून आणिलें आणि तेव्हांच्या पद्धतीप्रमाणे या जुगर्थाला रथचक्रास बांधून त्या रोम शहरांत मोठ्या दिमाखानें प्रवेश केला. अर्थात् कनिष्ठांचा भाव वाढला. पण येवढ्यानेंच झालें नाहीं. रोम शहराला उत्तरेकडून नेहमी मोठें भय असे. आल्प्स पर्वताच्या बाजूनें पलीकडचे लांडग्यासारखे क्रूर रानटी लोक मोठमोठ्या झुंडी बनवून रोमवर चालून येत. इ. सनापूर्वी १०२च्या सुमारास अशीच एक मोठी टोळधाड वरून खाली आली. यावेळीं मुख्य अमलदार मारियस हाच होता. कित्येक वर्षे हाच निवडून येत होता. पण त्याच्यावर लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तो सर्वथा पात्र होता. मोठी फौज उभारून तो उत्तरेकडे गेला. खाली येतांना या किंब्री लोकांनी एक मोठी रोमन फौज गारद केली व विजयोत्साहानें तेही दक्षिणेकडे चालून आले. एक्स गांवाजवळ या फौजांच्या गांठी पडून प्राणांतक युद्ध झाले. मारियसनें लढण्याची शर्थ केली आणि एकही किंब्री शिपाई जिवानिशीं परत जाऊं दिला नाहीं. अवघी जमातच्या जमात त्यानें ठार करून टाकली. याप्रमाणे मोठे संकट गेल्यामुळे रोमन राष्ट्राच्या जिवांत जीव आला आणि मारियसबद्दल लोकांस पराकाष्ठेची आदरबुद्धि उत्पन्न झाली.
 पण त्याची ही सद्दी लवकरच संपली; कां कीं, सूला नांवाचा एक श्रेष्ठ हळुहळू लोकांच्या नजरेंत भरूं लागला होता. यानें मारियसच्या हाताखालींच शिपाईगिरी केली होती. पण तेव्हांपासूनच मारियसच्या मनांत त्याच्याविषयीं व त्याच्या मनांत मारियसविषयीं खोल मत्सरबुद्धि वागत होती. लष्करांत वाढतां वाढतां तो मोठा शूर शिपाई आणि चतुर सेनापति म्हणून प्रसिद्धीस आला. दरम्यान गुलामांचें बंड उद्भवलें. रोमन लोकानी जिंकलेल्या शहरांनी सारखी भुणभुण लाविली होती कीं, आपणांस मताधिकार द्यावा. रोमन लोक म्हणत, तुम्ही जित आहां; तुमच्या मतांवर आम्ही जेते आपला राज्यकारभार हांकावयास नाकबूल आहों. होतां होतां यादवी माजली. मारियस आणि सूला या दोघांनीं ती मोडली, तरी त्या शहरांना मतदानाचा अधिकार देणें भाग झालें. सूला याच्या मनांत कनिष्ठांविषयीं मोठा तिरस्कार असे. त्यासवाटे, आपण श्रेष्ठांनी हें साम्राज्य विस्तारिलें आहे व हे कनिष्ठ उगाच लोकसत्तावादाचा फायदा घेऊन आपल्यावर कुर्रघोडी करावयास पहात आहेत. या त्याच्या तिरस्कारबुद्धींत वरील यादवीनें भर पडली.
 यादवीतून तो मोकळा होतांच साम्राज्याच्या पूर्वेकडे एक मोठें प्रकरण उद्भवलें तिकडे त्यास वळावे लागले. आशियांतील राजा मातृदत्त हा दिग्विजयार्थ निघाला होता. त्याने रोमन प्रदेशांत शिरून अनेक ठिकाणचे लोक रोमनांविरुद्ध उठविले आणि हजारों रोमन लोकांची कत्तल केली. पुढे झपाट्यानें कुच करून बास्परस ओलांडून तो ग्रीस देशांत प्राप्त झाला व तेथील लोकांनी रोमचा अंमल झुगारून द्यावा म्हणून त्यानें खटपट आरंभिली. अर्थात् आतां तिकडे कोणीं जावें असा प्रश्न निघाला. शहरांतील लोकांचीं मतें घेतलीं त्यांवरून असे दिसलें कीं, मारियसने जावें असें त्यांस वाटत होतें. पण सूला म्हणाला, ही निवड नव्हे, नुसती मतांची चावट दगल आहे; मी तुमचें ऐकत नाहीं. आणि तो फौजबंद होऊन रोम शहरावरच चालून आला. मारियस एकदम पळून गेला. सुल्यानें विरोधकांची कत्तल केली व आपला अंमल कायम करून तो मातृदत्तावर चाल करून गेला. जातांना त्यानें आपला एक हस्तक अंमलदार नेमिला होता, पण सुल्याची पाठ वळतांच तो लोकपक्षास म्हणजे कनिष्ठांस जाऊन मिळाला; आणि पळालेला मारियसही हलकेंच परत येऊन त्याच्या मसलतींत शिरला. राज्यसूत्रे हातीं घेतांच उभयतांनीं श्रेष्ठांची कत्तल उडविली व हजारों श्रेष्ठ घराणी रोम शहर सोडून चालतीं झालीं. तिकडे सुल्यानें मातृदत्ताची चांगलीच खोड जिरविली आणि रोमन साम्राज्यावरचें एक अरिष्ट वारिलें. आपल्या विजयोन्मत्त फौजेसह तो घराकडे परत फिरला. रोम शहरी भलताच बनाव बनून राहिला आहे हें त्यास माहीत होतें. आपण केलेली व्यवस्था मोडून टाकून आपल्या पश्चात् हे लोक अधिकार बळकावून बसले याची त्याला पराकाष्ठेची चीड येऊन तो वेगाने रोमकडे आला.
 वाटेने झालेली आडकाठी त्यानें जुमानिली नाहीं. रोम शहराच्या वेशीबाहेर जोराची खडाजंगी उडाली. मारियस तर आधींच मरून गेला होता. सुल्यानें विरोधकांचा फन्ना उडविला व रोम शहरांत प्रवेश केला. श्रेष्ठांनी त्याला सर्वाधिकारी नेमिलें आणि मग त्याच्या मनांत जी गोष्ट सारखी डांचत होती तिच्यावर त्यानें शस्त्र उगारिलें. लोकपक्षाचा नायनाट करण्याचा त्यानें विडा उचलल्यासारखें केलें; पांच हजार लोक खुद्द रोम शहरांत कापून काढले आणि रक्ताच्या नद्या वाहविल्या. जो कोणी विरोधवचन बोलेल त्याला सुद्धां मृत्यूची घोर शिक्षा त्यानें फर्माविली. याप्रमाणें भयंकर रक्तपात करून या क्रूरकर्म्यानें आपली सत्ता प्रस्थापित केली. नवे कायदे रचून त्यानें श्रेष्ठसभेच्या हातीं अधिकारसूत्रे दिली; पण सूला इतका पिसाळल्याप्रमाणे वागला तरी एक गोष्ट त्याच्या मनाला कधीं शिवलीही नाहीं. आपण सर्वाधिकारी रहावें असें त्यास कधीही वाटलें नाहीं. श्रेष्ठसभेच्या हाती सूत्रे देतांच त्याने अधिकारसंन्यास केला. फौज, अधिकार, दर्जा, ही सर्व सोडून तो एरवींच्या माणसासारखा एके खेडेगांवी जाऊन कालक्रमणा करूं लागला. आणि चमत्कार हा कीं, तेथे त्यांस सुखानें मरण आलें. असली घोर शासनें केलेली, पण त्याच्या अंगास कोणी हात लाविला नाहीं ! असो.
 अशा रीतीनें रोम शहरी मोठी खळबळ माजून राहिली होती. जो पक्ष जोरावर असेल त्यानें दुसऱ्यास नकोनकोसें करावें, आपली माणसें निवडून द्यावी; व आपल्या हाती सत्ता आणि हुकमत ठेवावी असा प्रकार नेहमी चाले. सुल्याच्यापूर्वीही असल्या कत्तली झाल्या नव्हत्या असें नाहीं. इतकेच की, सुल्यानें ही कत्तल फार पद्धतशीर रीतीनें केली. या लडथडींतून कांहीं मार्ग निघावयास हवा होता, हें खरें असले तरी तो शेवटपर्यंत निघाला नाहीं. आणि शेवटी रोमन प्रजासत्ताक राज्याचें माहात्म्य संपून गेलें. वास्तविक सुल्याच्या कत्तली आणि ही विपरीत परिस्थिति यांच्यामधील काळांत पाँपे, सिसरो, व स्वतः सीझर यांच्यासारखे थोर थोर लढवय्ये व मुत्सद्दी होऊन गेले आणि त्यांनी एका हाताने रोमन साम्राज्याचा विस्तार व दुसऱ्या हाताने श्रेष्ठकनिष्ठांच्या नात्यांचा मिलाफ करण्याचे काम पुष्कळशा सदिच्छेनें व कुशलतेनें केलें. पण पुढे काय झाले त्यावरून जर पहावयाचें झालें तर असें म्हणावें लागतें कीं, रोमन साम्राज्याचा विस्तार पुष्कळ झाला असेल, पण रोमन प्रजासत्ताक राज्यपद्धति मात्र टिकूं शकली नाहीं. बाहेरचा महत्त्वाकांक्षेचा आणि वैभवाचा ओढा होता म्हणून इतके दिवस तरी हें रिपब्लिक टिकलें, नाहींतर श्रेष्ठ कनिष्ठांच्या भांडणांत खुद्द रोमन स्वातंत्र्याचासुद्धां लय व्हावयाचा.
 या तीन श्रेष्ठ पुरुषांपैकीं सीझरचें माहात्म्य फार मोठें आहे. शिपाईबाणा आणि मुत्सद्द्याचे गुण याच्या अंगीं चांगले एकवटले होते. तो स्वतः एका अस्सल श्रेष्ठ कुलांतच जन्मला होता; पण मरेतोंपर्यंत त्याने कनिष्ठांची तरफदारी केली. रोमन साम्राज्य तर त्याच्या पराक्रमाने इतके वाढलें कीं, रोमचें नांव काढले की सीझरची आठवण व्हावी असें झालें आहे. सुल्याची जरब सर्वत्र चालू होती, तेव्हां सीझर लहान होता. धरपकड आणि मानतोड यांचे पीक जिकडे तिकडे सुल्यानें माजविलें होतें. त्यामुळे अवघें शहर चिडीचीप झालें होतें. एक पिढीभर तरी आतां कोणी डोई वर करील असा सुमार राहिला नव्हता. असल्या या जरबीच्या शांततेत सीझरचें बालपण गेलें. पग हें गांवांतल्या गांवांत श्रेष्ठकनिष्ठांपुरतें झालें. एवढ्या थोरल्या विशाल साम्राज्यांत कोठे ना कोठे दंगेधोपे चालू असतच व शिपाईबाण्याचा उपयोग फार असे. म्हणून इतर तरुण मुलांच्याप्रमाणे सीझरही शिपाई बनला. वास्तविक मूळ शरीरयष्टि, प्रकृति, व स्वभावाचा कल ही पहातां सीझरला शिवाईबाणा मानवण्यासारखा नव्हता. लहानपणीं तो भारी नाजूक प्रकृतीचा असे. तो अंगानें अगर्दी किडकिडीत होता, पण त्याचा चेहेरा मोठा गोजिरवाणा होता. जरा छानछोकीची व नटण्याची हौसही त्याला होती. कंबरपट्टा जरा ढिला घालून म्हणजे पुढे थोडासा ओघळता ठेवून तो आपली रसिकता व मर्द माणसाची नटण्याची जनानी ऐट दाखवत असे. तो म्हातारा खविस सूला त्याला उद्देशून म्हणे, "तो ढिल्या पट्टयाचा छोकरा कुठे आहे?" वाङ्मयवाचनाचीही त्याला गोडी असे. वरील सर्व आविर्भावास अनुसरून तो थोडी कविताही करी. हर्क्यूलस् वर त्यानें एक कविता केली होती व इपिडस नांवाचें एक नाटकही त्यानें लिहिले होते. पण एकंदरीनें लहानपणी तो सामान्य बुद्धीचाच होता.
 मिस्रुड फुटलें नाहीं, तों सीझरचें लग्नही झालें. लोकपक्षाचा नायक सीना याची मुलगी त्यानें केली; यामुळे त्याच्या मताचा ओढा लोकपक्षाकडे आहे असें स्पष्ट दिसून आलें. मागें सांगितलेला जो प्रसिद्ध मारियस त्यानेही या सीझरच्या श्रेष्ठ कुळांतील एका मुलीशीं लग्न केलें होतें. त्यामुळेच राजकारणविषयक बाबतींत लोकपक्षाचा ओढा सीझर यास लागलेला होता, तो आतां कायम झाला. आपणा श्रेष्ठांपैकी एकानें हा असला विवाह लावला हें म्हाताऱ्या सुल्यास मुळच खपलें नाहीं. म्हणून त्यास बोलावून आणून त्यानें सांगितलें कीं, ही पोर टाकून दे, काडीमोड कर व दुसरें लग्न लाव. तो काळ असा होता कीं, सुल्याचा शब्द प्रमाण होता; पण सीझरनें धैर्यानें उत्तर केलें कीं, "मी बायकोस टाकणार नहीं." हें उत्तर खपवून घेणारांपैकी सूला नव्हता. पण अनेक मित्रांनी गळ घातली म्हणून; नाहीं तर इतर हजारांबरोबर सीझरची गठडी वळली असती. सीझरची चमक या प्रसंगीं इतरांस व खुद्द सूल्यास चांगली कळली. म्हातारा सूला गुरगुरून म्हणाला, "हा पोर त्या मारियसच्या वरचढ होणार असें दिसतें" सीझरनेही प्रसंगावधान राखिलें आणि झाली येवढी झकपक पुरे असें ओळखून रोममधून पाय काढला; व दूर आशिया मायनरमध्यें, कीं जेथे रोमन सेनापतींच्या फौजा मोहिमशीर होत्या, तिकडे तो शिपाईपेशा पत्करून निघून गेला. मातृदत्ताचें प्रकरण अजून थोडे धुमसतच होतें. त्याच्या लोकांनी ग्रीसच्या दक्षिणेकडील बेटांत धुमाकूळ चालविला होता. सीझरने स्वतःच्या हिंमतीवर जरूर तितकीं जहाजें जमा करून या बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. या लहानशा स्वारीत सीझरच्या अंगीं धाडस भरलेलें आहे ही गोष्ट लोकांच्या चांगली प्रत्ययास आली.
 पण या चकमकी चालू असतां तो आडदांड व ज्याला त्याला भिवविणारा सूला मरण पावल्याचें वर्तमान आलें. तें ऐकतांच सीझरने रणभूमीला रामराम ठोकला. कां कीं, तो तिकडे कांहीं सुखासुखीं गेलेला नव्हता. सुल्पाच्या भयानें तो तिकडे राहिला होता. पण परत येण्यास सूला मेला यापेक्षां, तो मेल्यामुळे उत्पन्न होणारी नवी परिस्थिति हांच जास्त कारण झाली. सीझरच्या स्नेह्यांच्या मनांत सुल्यानें बनविलेली राज्यव्यवस्था साफ मोडून टाकून नवा बनाव बनवावयाचा होता. म्हणून त्यांनी पत्रे धाडून सीझरला परत बोलाविलें होतें. या पत्रांमुळेही तो कदाचित् तांतडीने परत आला असेल. कसेंही असो; सीझर घरी परत आला. अर्थात् अजमासाप्रमाणें तेव्हांचा सत्ताधिकारी जो लेपिडस् त्यानें एक गुप्त कट रचावयास सुरवात केली होती. पुरेशी जमवाजमव होतांच जोराचा टोला देऊन सुल्याची घटना उलथून पाडून पूर्वीचा लोकपक्ष प्रबळ बनवावयाची धमक त्याला वाटत होती. सीझर परत येतांच त्यानें तें सर्व प्रकरण सूक्ष्मपणे पाहिलें आणि लेपिडस यास कळविलें कीं, आपल्याला ह्या प्रकरणांत मुळींच पडावयाचें नाहीं. परिस्थिति अनुकूल नव्हती हें एक आणि दुसरें असें कीं, सुल्याची घटना जरी रक्तपातावर उभारली होती तरी ती मोठी सुयंत्र चालू असून तिचे प्रवर्तक नव्या गोष्टी घेण्यास बिलकुल विन्मुख नव्हते. अर्थात् उगाच कांहीं तरी करावें आणि दंगाधोपा माजवावा हें सीझरला बिलकुल मान्य नव्हतें. एक पिढीभर तरी क्रान्तीची जरुरी नाहीं असें त्याचें मत बनलें होतें. पण लेपिडसला काय तो सोक्षमोक्ष करावयाचा होता. सीझरचा मेहुणा धाकटा सीना हा लेपिडसला मिळाला. एट्रिरियांत त्यांनी एक फौज उभी केली व लगोलग ते रोमवर चाल करून आले; पण खुद्द रोम शहरांत आतांपर्यंत सर्वप्रसिद्ध बनलेला जो पाँपे त्याच्याशीं त्यांची गांठ पडली. लेपिडस व सीना पराभूत होऊन पळून गेले आणि दुसऱ्या कटकटींची तयारी करण्यासाठी त्यांनी देशान्तरही केलें. या भानगडींत न पडण्याची सीझरनें दक्षता बाळगली हें फार चांगलें झालें. नाहीं तर त्याची अवस्था लेपिडससारखीच झाली असती.
 पाँपे हा सीझरपेक्षां वयानें कांहींसा मोठा असून ह्यापुढें कांहीं वर्षे सीझर व त्याचा मित्र सिसरो हे वकिल्या वगैरे करून आपापल्या बुद्धया पाजळविण्यांत गुंतले असतां तो रोमन साम्राज्यावरची संकटें वारण्याच्या मोठमोठ्या कामगिऱ्यात गुंतलेला असावयाचा, इतकें दोघांत अंतर होतें. शिपाईपेशा दूर ठेवून सीझर वकिली करूं लागला; पण त्या धंद्यांत जे खुमारीदार वक्तृत्व पाहिजे असतें तें त्यास नसे. सिसरो मात्र जबरा वक्ता बनला होता. त्याच्यापुढे सीझरचें कांहीं वजन पडत नसे. मग वक्तृत्वाचा अभ्यास करावयाचा असे ठरवून सीझर ऱ्होड्स येथे जावयास निघाला. वाटेनें त्याला चांच्यांनी पकडले; पण मोठा खंड भरून तो मोकळा झाला व वक्तृत्वाचा अभ्यास थोडा दूर ठेवून त्यानें चार तरांडी गोळा करून त्या चांच्यांवर अचानक छापा घातला व त्यांची हाडें नरम केली. येवढा उद्योग आटोपून तो ऱ्होड्स येथें अभ्यास करावयास गेला. दोन वर्षेपर्यंत अंगविक्षेप, आवाजाचे आरोहावरोह, चेहऱ्याच्या निरनिराळ्या कळा यांचा त्याने नीट अभ्यास केला; व मग मनाजोगती प्रगति झाल्यावर तो पुन्हा घरी परत आला. आई, बायको व आपण एका लहानशा घरांत रहात. आपला धंदा बरा कीं आपण बरे असें चाललें होतें; पण त्याचें आशियामायनरमध्यें जाणें, ग्रीक समुद्रांतील चाच्यांशीं मारामारी करणे इत्यादींवरून हा पुढे शूर शिपाई निवटेल असे लोकांस वाटू लागलें होतें. तसेंच वकील म्हणूनही त्याने लोकपक्षीय कज्जे चालविले होते. सीनाच्या घराण्याशीं लग्न-संबंध जोडून त्यानें सुल्यास दुखविण्याचें धैर्य दाखविलें होतें. अर्थात् हा एक नवा होतकरू तरुण माणूस आपला पुढारी होण्यास लायक आहे असें त्यांना वाटूं लागलें.
 त्याची लवकरच लष्करी ट्रिव्यून म्हणून निवड झाली व तेथें त्यानें आपले लोकपक्षीय धोरण अगदी उघड करून दाखविलें. पुढें, कोठें तरी तीत असलेला आपला मेहुणा सीना याची केस त्याने इतक्या कुशलतेनें वजनदारीनें लोकांपुढे मांडिली, कीं सीन्यास माफी मिळाली. सीझर लोकांच्या मनांत भरत चालला. वयाच्या ३२ व्या वर्षी त्याला क्वीस्टर म्हणून नेमणूक झाली व रोमन साम्राज्यावर हुकमत चालविणाऱ्या सेनेटमध्यें तो आतां बसूं लागला. येथें त्याची निरनिराळ्या लोकांशी ओळखदेख होऊं लागली. पाँपे हा सीझरहून सहाच वर्षांनी मोठा होता. पण तो लहानपणापासून मोठा प्रतापशाली असल्यामुळे रोम शहरीं त्याचें वजन चांगले बसले होतें. पण पाँपे नुसता शूरच नव्हता; त्याच्या अंगांत राजकारणाचे कसब नसले तरी तो मोठा महानुभाव आणि सच्चा माणूस होता. चालू राज्यपद्धति व तिचे प्रवर्तक त्यास पसंत होते असें मुळींच नाही; पण तो योग्य माणसांची वाट पहात होता. सीझरकडे पाहून त्यास वाटे की, हा आपल्याला चांगला जोडीदार होईल. दरम्यान सीझरची बायको कार्नेलिया वारली. पाँपेनें हा रिकामा झालेला जांवई पाहून आपली पुतणी पाँपिया त्याला देऊन टाकली. याप्रमाणे पाँपे व सीझर सासरेजांवई झाले ! सासऱ्याने त्याला लागलीच स्पेन देशांत एका कामगिरीवर पाठविले आणि जावयानेही कामगिरी इतकी चोख बजाविली की, सासरा व लोक सीझरवर खूष होऊन गेले. दरम्यान तिकडे मिथ्रिडेट्सचें बंड पुन्हा उद्भवलें व भूमध्यसमुद्रांत चांच्यांचा दंगा इतका माजला की, व्यापार बसला व प्रवास अशक्यप्राय बनला. सेनेटच्या हातून त्याचा नेहमींच्या उपायांनीं बंदोबस्त होईना; म्हणून तिनें पाँपची नेमणूक त्या कामावर केली. त्याने तिकडे जाऊन इतक्या तडफेनें काम केलें कीं, ज्या कामास तीन वर्षे लागतील असा लोकांचा अंदाज होता तें त्यानें तीन महिन्यांत झोडपून टाकलें. अवघे चांचेन्-चांचे त्यानें खणून काढले आणि मातृदत्ताचें प्रकरण कायमचें विझविलें. हा त्याचा कामाचा झपाटा व उरक पाहून राष्ट्र चकितच होऊन गेलें.
 इकडे सीझरने मोठी दुरान्देशी बाळगून लोकाराधन चालविले होतेंच. लोकांनीं त्याला लवकरच मुख्य पाँटि जागेवर निवडून आणले. या निवडणुकीने लोकांचा सीझरवरयमचा विश्वास बसला आहे असें सिद्ध झालें. दरम्यान क्याटिलाइन नावाच्या एका सरदाराने एक गुप्त कट आरंभिला. त्याने चांगली चांगली माणसे यांत गुंतविलीं. खुद सीझरचा हात यांत थोडा तरी गुंतला असावा असे मानण्यास जागा होती, पण सीझर लवकर सांवरला. कटवाल्यांच्या डोळ्यांपुढे कांहीं उदात्त ध्येय होतें म्हणावें तर तसें मुळींच नाहीं; पण कटवाल्यांची बातमी लवकर फुटली आणि धरपकड होऊन सर्वांना मुस्क्या बांधून कोर्टात आणिलें. सिसरोनें कटवाल्यांची अंडीपिलीं इतकी बारकाईनें काढलीं व अशीं खुलवून मांडली की, क्याटिलाइन पळाला तरी त्याच्या साथीदारांना, तडका- फडकी निकाल देऊन व कायदा बाजूस ठेवून, फांसावर चढवावे असा अभिप्राय सेनटने दिला. हे कृत्य बेकायदेशीर आहे असे सीझरने जोराने प्रतिपादिलें. लोकांना कटाचा तिटकारा आला होता तरी चालू कायदा झुगारून लोकांना फांशीं देण्याचा हुकूम सेनेटने द्यावा हें त्यांना पसंत पडेना. अर्थात् सीझरचें प्रतिपादन त्यांस फार पसंत पडले व सीझर लोकपक्षीय म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम झाली.
 लवकरच त्यास प्रीटर नेमण्यांत आलें व स्पेनदेशचें काम त्याच्या गळ्यांत पडलें. स्पेनचें कारभारीपण म्हणजे डोंगरकठडीचें राज्य हांकावयाचें काम ! पण सीझर म्हणाला, रोममध्ये राहून दुय्यमपणा पत्करण्यापेक्षां स्पेनमध्ये जाऊन कुलमुख्त्यारी चालविणें मला बरें वाटतें. त्याची महत्त्वाकांक्षा आतांपर्यंत योग्य तऱ्हेनें पोसून आतां चांगली बळावली होती असें दिसतें, कारण कीं, याच सुमारास अलेक्झांडरच्या पुतळ्याकडे पाहून तो एकदां उद्गारला, "खरोखर! या जगज्जेत्यापेक्षां वयानें मी कितीतरी मोठा आहे; पण लोक आठवतील असे एकही कृत्य मीं अजून केलें नाहीं!"
 स्पेन देशचा कारभार हाती येतांच सीझरने एकही दिवस वायां जाऊं दिल नाहीं. मोठमोठाले दरवडेखोर, बंडखोर डोंगराळ मुलुखांत राहून, संधिसाधून शेतवाड्यांवर आणि शहरांवर अचानक चालून येत आणि लोकांना उसंत म्हणून पडूं देत नसत. जिकडे तिकडे बजबज आणि कहर झाला होता. सीझरने सारखी दौड चालू ठेविली आणि चारसहा महिन्यांत त्याने या दरवडेखोर भामट्यांचा पुरा निःपात केला. सीझरच्या स्वभावांतला एक मोठा गुण येथे स्पष्ट झाला. कोणी काम हाती घेतले म्हणजे तें अगदी तळसून केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. थातुरमातुर, जुजबी अगर तुरतातुरुत ही भाषा त्याला येतच नव्हती. शत्रु मारावयाचे म्हणजे एकूण एक टिपून मारावयाचे; असे कीं, पुन्हा डोई वर होतां उपयोगी नाहीं ! असो. याप्रमाणें या लुटारू चोरांचा उपद्रव नाहींसा करून सीझरने पोर्तुगाल व गॅलीशिया प्रांतांकडे आपला मोर्चा वळविला. लवकरच हे दोन्ही प्रांत सर करून सबंध स्पॅनिश द्वीपकल्प त्यानें रोमन साम्राज्यास जोडून टाकलें. जसें रणांगणावर तसेंच कारभाराच्या कामांतही त्यानें विलक्षण तेज दाखविलें. करभाराची पद्धति नीट बसवून देऊन त्यानें प्रजेत विश्वास उत्पन्न केला आणि रोम शहरच्या हुजूर- खजिन्यांत गाड्याच्या गाड्या पैका पाठवून दिला. याप्रमाणें स्वतंत्र अख्त्यारी दिली असता आपण काय करूं शकतो याचा पुरा प्रत्यय त्यानें रोमन राष्ट्रास आणून दिला. अर्थात् या बातम्या जसजशा घरी येत तसतसा सीझरविषयी आदर वाढू लागला. आणि अगदी पहिल्या प्रतीची जीं कांहीं तेव्हांचीं माणसें, त्यांच्यांत त्याची गणना होऊं लागली. सीझरनें लोकाराधन चालविलें होतें असें वर म्हटलें आहे व तें खरेंही आहे. निरनिराळ्या तऱ्हांनी व पुनःपुन्हा संधि साधून त्यानें लोकांस वश करून घेतलें होतें; पण नुसत्या आराधनेनें भागत नाहीं; लोकांस कांहीं तेज दाखवावें लागतें. बुद्धिमत्ता, स्वार्थत्याग, पराक्रम त्यांची कांही कडकडून साक्ष त्यांना हवी असते. स्पेनच्या राज्यकारभाराने व पोर्तुगाल आणि गॅलिशिया हस्तगत करून, त्यानें ही साक्ष त्यांस दिली.
 तिकडे आशियाखंडांत शिरून पाँपेनें मोठा दिग्विजय केला. एक कोट नवी प्रजा त्यानें रोमन राज्यांत आणिली, देशोदेशींचे तीनशे राजेरजवाडे कैदी म्हणून बरोबर आणिले व लुटीच्या आणि खंडणीच्या पैशाने सरकारी खजिना तुडुंब भरून वहावयास लाविला ! पाँपेच्या आधी कोणी इतरांनीं अशीं कृत्ये केली नव्हती असे नाहीं; पण ते सर्व वीर लोभाला बळी पडले व राष्ट्राला श्रीमंत बनविण्याच्या ऐवजीं आपणच श्रीमंत बनले. पाँपेनें मात्र लोभ पुरा मारिला होता. आशियांतील नाना देशची धनश्री त्याच्या पायाशी लोळण घेत आली होती; पण तो तिला शिवलासुद्धा नाहीं. रोमचें नांव मात्र त्यानें जगभर गाजविलें. वहिवाटीप्रमाणे रोम नगरीने मोठ्या जयजयकारानें त्याचें स्वागत केलें. पण त्याला पुन्हा कॉन्सलचें पद देण्यास सेनेट- सभा राजी होईना; कारण तो आधींच आठ वर्षे ओळीनें कॉन्सल झाला होता. वास्तविक त्याला दुष्ट बुद्धि झाली असती तर तो फौजेसकट रोमवर आला असता, व सेनेट वगैरे सर्व त्याला गुंडाळून ठेवितां आली असती. पण तो खरोखरच मोठा इमानी माणूस होता. इटलीत पाय ठेवण्यापूर्वी त्यानें कायद्याप्रमाणें आपली फौज खालसा केली व खजिना सरकारांत गुदरला. हें सर्व खरें, पण याला कॉन्सलचें पद द्यावयाचे कितीदां असा प्रश्न सिसोरोनें उत्पन्न केला.
 हा सिसोरो मोठा महत्त्वाकांक्षी पण भित्रा, आणि थोडें करून फार झाल्याचा देखावा उत्पन्न करणारा होता. वक्तृत्वाची कला त्याने इतकी वश करून घेतली होती कीं, अजूनसुद्धां त्याचें नांव उपमान म्हणून उपयोजितात. त्याची बुद्धिही मोठी खोल व दुरांदेशी होता. त्यानें लिहून ठेवलेली तेव्हांची सर्व हकीगत इतिहासाचें साहित्य म्हणून फार उंच दर्जाची आणि विपुल अशी आहे. वक्त्याचे सर्व ढंग त्याच्या अंगी असून सेनेटमध्ये एकदां त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला म्हणजे प्रतिपक्षी भराभर घायाळ होऊन पडत. त्याचीं भाषणे वाचावयास फार मनोरंजक वाटतात; कां कीं, त्यांचे वाङ्मयरूप फार सुंदर आहे. लोकपक्षीय तत्त्वांचें ग्रहण करण्यास लागणारी बुद्धीची कुशाग्रता व मनाचे औदार्य हींही त्याजपाशी होती आणि श्रेष्ठ लोक फार ओढून धरतील तर हें साम्राज्याचे महावस्त्र फाटेल हें तो पूर्ण जाणून होता. पण सेनेटमध्ये तो श्रेष्ठपक्षीय म्हणूनच होता. आशियाखंड युफ्रेटिस नदीपर्यंत जिंकून परत आलेला पाँपे रणमैदानांत मोठा जोरावरसिंग खरा; पण सेनेटमध्ये सिसोरोपुढे त्याची बोबडी वळे. हा सिसोरो मोठा आत्मडौली असून आपण म्हणजे या रोमन साम्राज्याचे एकच एक आधारस्तंभ आहों असें तो समजत असे. पाँपेसुद्धां श्रेष्ठच होता; पण तरीही त्याला पुन्हा कॉन्सलचें पद देण्यास सिसोरो तयार नव्हता.
 अर्थात् पाँपेचा कल हळुहळू लोकपक्षाकडे झुकूं लागला. श्रेष्ठांच्या दृष्टीनें सिसोरोनें मोठी चूक केली. तिकडे अवघें स्पॅनिश द्वीपकल्प जिंकून आणि रोम शहरास गडगंज खजिना आणून सीझरनें लोकमत केवळ भारून टाकले होतें. त्याचें आजपर्यंतचे सर्व वर्तन लोकपक्षास सर्वथा अनुकूलच होतें. अर्थात् आतां आपण कॉन्सल म्हणून निवडून येण्यास कांहींच हरकत नाहीं हें त्याने ओळखलें. म्हणजे पाँपे व सीझर हे दोघे लोकपक्षाचे म्हणून कायम झाले. पण तिसरा एक मोठा जबरदस्त माणूस हस्तगत झाल्याशिवाय लोकपक्षाचें सामर्थ्य पुरेंसें दांडगे होणार नाहीं हें सीझरने ओळखिलें होतें तो गृहस्थ म्हणजे क्रॅसस. याच्यापाशीं अतोनात पैसा होता आणि त्याची प्रवृत्तिही लोकपक्षीय होती. निवडणुकी लढविणें म्हणजे पैशाचा खेळ आहे हे माणसाच्या जातीनें तेव्हांही ओळखलेलेच होतें. अर्थात् क्रॅससची मनधरणी करणें सीझरला प्राप्त झालें. त्या कामांत यश मिळून पाँपे, सीझर व क्रॅसस यांनी आपला लोकपक्ष बनविला पाँपेनें हांक मारतांच लक्षावधि शिपाई धूम ठोकीत त्याजकडे येणार, सीझर तर सामान्य जनसमूहाचा उघड उघड कैवार घेऊन भांडणार, आणि लागेल तितका पैका क्रॅसस पुरविणार, अशी ही योजना होती. याप्रमाणें तीन श्रेष्ठांनीच सामान्य जनसमूहाची कड घेऊन नवा प्रबल असा लोकपक्ष बनविला. पन्नास-साठ वर्षे लोकपक्षाची इतकी उचल झाली नव्हती. अर्थात् आतां आपल्याला अनुकूल असा नवा काळ आला असें लोकांस वाटू लागून त्यांच्यांत विलक्षण हुरूप उत्पन्न झाला.
 सीझर कॉन्सल म्हणून बिनबोभाट निवडून आला. पण त्याचा जोडीदार जो यावयाचा तो मात्र आपला असलाच पाहिजे असें श्रेष्ठांनी ठरवून हरहिकमतीनें विब्यूलस यास निवडून आणिलें आणि केवळ लोकांनी निवडलेल्या ट्रिब्यून्सपैकीं तिघेजण त्यांनीं श्रेष्ठांच्या बाजूस वळवून घेतले. येवढ्या तयारीवर सीझरला डांबून टाकतां येईल असा वरिष्ठांचा होरा होता. सीझर हा लोकपक्षीय म्हणून त्यांना त्याची भीति वाटे हें खरें, पण कॉन्सल झाला तर हा नेमकें काय करील याची त्यांना चांगलीशी अटकळ नव्हती. मारियस आणि सीना या लोकाग्रणींचीं जीं तत्त्वें तींच याचीही होतीं व त्यांच्याप्रमाणें या तत्त्वांचा तो निर्भयपणें उच्चार आणि पुरस्कार करी. पण सनदशीरपणा मात्र त्यानें केव्हांही सोडिला नव्हता व लोकपक्षाचे पुढारीपण म्हणजे मुर्दाड गुंडगिरी हाही न्याय त्याने पत्करला नव्हता. अर्थात् शत्रु खरा; पण त्याच्याबद्दलचा वचकसुद्धां आदर- मिश्रित होता. गेल्या साठ वर्षांत अनेक उलथापालथी झालेल्या होत्या. केव्हां वरिष्ठांचा तर केव्हां लोकांचा पक्ष जोरावर येतोसा दिसे. पण एकंदरीनें श्रेष्ठ हेच हुकमत चालवीत होते. जमिनींचे मालक बडे जमीनदार असून ते गुलामांकडून त्यांची मशागत करवीत, यामुळे सामान्य लोकांना फारशा जमिनीच नसत. रोम सोडून बाहेरच्या लोकांची मतदानाच्या हक्कांबद्दल सारखी हाकाटी चालूच होती. बंधमुक्त झालेल्या गुलामांच्या पुत्रपौत्रांचे समान हक्कांचे भांडण सुरूच होतें. ज्यांच्या उत्पन्नावर गुजारा करावयाचा ते पो नदीच्या पलीकडील प्रांत नुसते लोंबटासारखे वागविले जात. त्यांस मतदान नव्हतें. आणि मतदानाकडे पहावें तर मत म्हणजे नुसता पैका मिळविण्याची संधि आहे असें खुद्द लोकच मानीत. म्हणजे असें कीं, मताचा हक्क हवा म्हणून लोक भांडत; पण मिळाला म्हणजे आपली मतें योग्य माणसांना न देतां लांच खाऊन पैसे पेरणाऱ्याला ते तीं देत आणि मग मनासारखे कायदे झाले नाहींत म्हणून तिकडूनही असंतुष्ट बनत. ही दुःखस्थिति सुधारावयास सीझरला सिद्ध व्हावयाचें होतें. वास्तविक त्याची स्वतःची प्रवृत्ति क्रांतीकडे मुळींच नव्हती; पण एकदम कांहीं उलथापालथ होऊं देणें किंवा न देणें हें श्रेष्ठांच्या कलावर अवलंबून होतें. सुधारणा तर व्हावयास हव्या होत्या; श्रेष्ठांस त्या नको होत्या. आणि त्या करणार म्हणून म्हणणारा गडी रणावर दाखल झालेला होता. असा हा प्रसंग होता.
 इ० सनपूर्व ५९ च्या जानेवारीत नवे कॉन्सल कामावर दाखल होणार होते. पण आधीं डिसेंबरांतच बातमी पसरली कीं, सीझर अधिकारावर येतांच शेतीचा कायदा सेनेटपुढें लगोलग येणार. अर्थातच उभयपक्षांत झुंजीची तयारी सुरू झाली. कामावर येतांच सीझरने एक अत्यन्त उपयुक्त उपक्रम सुरू केला. सेनेटसभेच्या वादविवादाचा सारांश रोजच्या रोज लोकांस कळेल अशा जागीं तो चिकटविण्याची त्याने व्यवस्था केली. यामुळे सांगोवांगी हकीगतीवर अगर लुच्च्या बातमीदारांवर विश्वसण्याची जरुरी लोकांस राहिली नाहीं. मग शेतीचा कायदा त्यानें समेपुढे आणिला आणि कांही दुरुस्त्या, मुरडी, बदल सुचवावयाचे असतील तर ते त्यांनी सुचवावे असें त्यानें सभासदांस सांगितलें. त्याने करूं घातलेल्या कायद्याचें वास्तविक स्वरूप असें होतें, सरकारच्या जमिनी फार थोड्या खंडाने अमीर-उमरावांकडे लागलेल्या होत्या. त्या त्यांच्याकडून नुकसानभरपाईने परत घेऊन परदेशच्या स्वाऱ्यांवरून परत आल्यावर घरी रिकाम्या बसलेल्या शिपायांस वहिवाटावयास द्यावयाच्या असा सीझरचा संकल्प होता. बरें, या परत घ्यावयास सरकारांत पुरेसा पैसा होता व तोही त्या शिपायांनीच मिळवून आणिला होता. शिवाय, शिल्लक पैशांतून इतर ठिकाणी मिळतील तेथें जमिनी खरेदी करून त्यांवर रोम शहरांत जमा झालेल्या आणि निकामी राहिलेल्या लक्षावधि लोकांस नेऊन स्थापावें म्हणजे बेकारीचा प्रश्न थोडा तरी सुटेल असा सीझरचा अजमास होता.
 पण मोठमोठाले जमीनदार, सरदार वगैरे जे श्रेष्ठ होते त्यांस वाटू लागलें कीं, सीझर येथे थांबणार नाहीं. हा आपल्या हातून जमिनीची मालकी पुरी काढून घेईल. कोठल्या तरी उपटसुंभांना आमच्या बरोबरीचे व खानदानीचे बनविण्याचा हा सीझरचा डाव आहे. "आमच्या वाडवडिलांनी साम्राज्य विस्तारिलें आणि आतांचे आधुनिक लोक म्हणजे पकडून आणलेल्या गुलामांचे लडके आमच्या बरोबरीने हक्कदारी सांगणार" हा विचार त्यांस सहन होईना.
त्यांचा पुढारी कॅटो यानें एक दिवसभर सेनेटमध्यें सीझरवर सारखा भडिमार केला; इतका की, शेवटीं सीझरने त्याला कैद करावयाचा धाक घातला, तेव्हां तो गप्प बसला. सेनेटचे सभासद संतापाने बेफाम होऊन गेले. सीझरनें चुचकारून पाहिलें थोडें कमीजास्त करा असेही सुचविलें; पण सेनेट त्या कायद्याच्या मसुद्याला शिवेनासुद्धां शेवटीं 'जर तुम्ही माझ्या या मसुद्याचा विचारसुद्धां करणार नाहीं तर अखिल- मतदारसभेपुढे मांडून मी हा कायदा पास करून घेणार' असे निर्वाणीचे शब्द बोलून सीझरनें सभा बरखास्त केली.
 श्रेष्ठांना निराळाच दम होता. सीझर कॉन्सल म्हणून जशी अखिल मतदार सभा त्यास बोलावितां येत होती, तशी बिब्यूलस यास कॉन्सल म्हणूनच ती बरखास्तही करतां येण्यासारखी होती. दुसराही एक बाण त्यांच्या भात्यांत होता. चांदण्याकडे पाहून अमुक दिवस कामाला अशुभ आहे असें कॉन्सलनें सांगितलें तर त्या दिवशी काम होऊं नये असा शिरस्ता होता. जरूर पडली तर बिब्यूलसने आपल्या या हक्काचा वाटेल तितके दिवस उपयोग करून कौन्सिलचें कामकाजच होऊं देऊं नये व अशा रीतीने सीझरचा ताजा मसुदा आंबवून सोडतां यावा अशीही त्यांनी तयारी करून ठेविली. इकडे सीझरनेही टाकलेले पाऊल परत न घेण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशीं राजधानींतील मंडईचें पटांगण माणसांनी फुलून गेलें. पटांगणांत कॅस्टरचे देऊळ होते; त्याच्या पायऱ्यांवर सीझर आणि पाँपे हे दोघेही उभ राहिले. शेजारीं बिब्यूलस व त्याचे साथीदार तिघे ट्रिब्यून्स हेही उभे होते. सीझरने आपला मसुदा वाचून दाखविला आणि कांहीं फेरबदल करावयाचा असल्यास करा असें त्याने बिब्यूलस यास सुचविलें. संबंध अफाट सभा रागद्वेषांनी भडकून गेली होती. श्रेष्ठ- कनिष्ठ सर्वच चवताळून जाऊन दांत करकडून बोलत होते. बिब्यूलस म्हणाला, 'मला असली क्रान्ति नको आहे, निदान मी कॉन्सल आहें तोपर्यंत तरी मी ही घडूं देणार नाहीं'. हें ऐकतांच लोकांनी त्याचा धिक्कार केला. जास्तच चिडून जाऊन तो म्हणाला, 'तुमच्यापैकीं एकूण- एक माणसाला जरी हा कायदा हवा असला तरी यंदां तरी तो नाहींच नाही होणार. सीझरनें समय ओळखला आणि कोणत्या प्रसंगी कोणाची योजना करावयाची हें ध्यानांत घेऊन आपण बोलण्याच्या ऐवजी त्याने पाँपेला बोलण्याची विनंति केली. जमलेल्या लोकांत शिपाईगडी खूप होते; तेव्हां पाँपेची छाप सभेवर तत्काळ पडेल हें त्यानें हेरलें. पण यांत सीझरचा आणखीही एक खोल डाव होता. पाँपे लोकांसमोर उभा राहिला व साम्राज्य वाढविणारे आणि राष्ट्र श्रीमंत करणारे जे शिपाईगडी, त्यांची व शहरांतील दरिद्री लोक यांची कड घेऊन त्यानें सांगितलें कीं, मसुद्याचा शब्दन् शब्द आपणांस मान्य आहे. तत्काळ सीझरने त्याजकडे वळून, जणुं कांहीं त्याला बांधून घेण्यासाठी सर्वांना ऐकू जाईल असें त्यास विचारिलें, "असें जर आहे तर हा कायदा येथें पास होऊन सुद्धां कोणी लोक तो मोडूं लागले तर तुम्ही कायद्याची कड घेऊन उठाल ना?" पाँपेनें सीझरचा डाव ओळखला व कायदा त्याला खरोखरच हवा असल्यामुळे, तो गंभीर योद्धा नम्रपणानें पण डुरकणी फोडून म्हणाला, "हां, कान्सल- साहेब, मी तर गरीब साधा माणूस आहे. माझ्या हाती अंमल कांहींच नाहीं; पण जर तुम्ही लोक माझी मदत चाहतां तर येवढे सांगतों कीं, या कायद्यावर कोणीं तरवार उपसली तर तो सांभाळण्यासाठीं मी आपली ढाल खास पुढे करीन." हे ऐकतांच आपली शिपायाची गर्दन फुगवून एक लाख शिपाई गर्जून ओरडले, "भले बहाद्दर ! भले बहाद्दर" पाँपेच्या मागून क्रॅकस उभा राहिला. त्यानेंही संमति दिली. हा प्रकार पाहून व आपल्याच सवर्गीयांची ही वर्तणूक पाहून जमीनदार श्रेष्ठ अगदीं चिडून गेले. उगाच माशा मारीत बसावयाचा कारभार हातीं न घेतां एखादा धकाधकीचा मामला मिळाला तर पहावा अशी मात्र त्याची इच्छा होती.
 वास्तविक पाहातां कॉन्सलदारीनें त्याचें मोठेपण सर्वांच्या प्रत्ययास आलें. त्याची लोकांसाठी निर्भयपणें झगडण्याची तयारी स्पष्ट झाली. व रोमन राज्य हें, या किंवा त्या वर्गापेक्षां, मोठें असून ते टिकविण्यासाठी औदार्य पत्करून लोकसत्ता अधिकाधिक लोकांत पसरू द्यावी हा विचारही त्याने कृतीनें खरा करून दाखविला. पण सीझरचें खरें वैभव हें नव्हे. त्याचें नांव इतिहासाला मोठा मुत्सद्दी म्हणून इतकेंसे आठवत नाहीं, तर धुरंधर सेनापति आणि जगांतील दोन-चार जगज्जेत्यांपैकी एक म्हणून आठवतें. सध्यां तो त्रेचाळीस वर्षांचा होता. पण यांपैकी स्पेन देशांतली दोन वर्षे सोडली तर बाकीचीं प्रौढपणची सर्व वर्षे या पक्षापक्षांच्या भांडणांत व एकमेकांचे रागद्वेष खिजविण्यांतच गेली होतीं. स्वतंत्रपणे एकादें प्रचंड काम हातीं घेऊन ते करून दाखवावें आणि लोकांवर छाप बसवावी ही त्याची हौस अजून शिल्लकच होती. ती भागावयाची वेळ आतां प्राप्त झाली.
 आल्प्स पर्वताच्या पलीकडे गॉल्स, बेल्जी, नर्व्हीं, सेक्वानी, एडुई, हेल्वेटी अशा अनेक जमाती थेट उत्तर समुद्रापर्यंत पसरलेल्या होत्या. गॉल्स सोडून त्यांतील बहुतेक लोक अर्धवट रानटी आणि उनाडच असत. दोनदोन तीनतीन लाखांचे तांडे बनवून या जमाती मुलूखभर भटक्या मारीत आणि साधल्यास स्थायिक लोकांच्या वस्तीवर जाऊन अचानक कोसळत असत. यांपैकी एका म्हणजे गॉल नांवाच्या जमातीनें मागें एकदां रोम शहराचा जवळजवळ निःपात केला होता व किंब्री नांवाच्या जमातीनें तर मारियसच्या अमदानीतच रोमवर दौड करण्याचा धाक घातला होता. याचा अर्थ असा कीं, रोमन साम्राज्यावर ही रानटी लोकांची एक तीक्ष्ण तलवार सारखी लोंबत राहिली होती. ती केव्हां पडेल आणि रोमन राष्ट्राचा छेद होईल याचा नियम नव्हता. मधून मधून बातम्या येत कीं, आज अमुक जमातीनें तमकीकडे प्रयाण केलें; तमकीनें अमुक मुलख उध्वस्त केला. अर्थात् रोमन लोकांच्या पोटांत ऐन वैभवोपभोगांतही धस्स होई. सीझरसारखा मोहरा आतां रिकामा झाला होता. तेव्हां त्याला ही कामगिरी सांगावी आणि उत्तरेकडची कांहीं कायमची व्यवस्था झाल्यास पाहावी असा विचार करून राष्ट्राने त्यास उत्तरेकडे पाठविलें. हें प्रकरण इतकें लांबत जाईल आणि सतत नऊ वर्षे आपल्याला तिकडे अहोरात्र झगडा करावा लागेल अशी सीझरची अटकळ नव्हती व रोमन राष्ट्राचीही नव्हती. पण एकदां त्या कामांत हात घालतांच तसली शेंकडों कामें त्याजवर गडगडत आली. पण येतील तितकी झपाटून टाकण्याची पूर्ण शहामत आपल्या अंगीं आहे हें सीझरने सर्व जगास सिद्ध करून दिले. खरोखर, सीझरच्या उत्पातांनी भरलेल्या चरित्रांतील हे उत्तरेकडील युद्धाचे पर्व वीर, अद्भुत व करुण अशा रसांनी थबथबून भरलेलें आहे; पण त्यांतील प्रसंगांत सारखेसारखेपणा आणि त्यांची संख्याही फार असल्यामुळे त्यांचे वर्णन फार विस्ताराने देतां येत नाहीं. रक्तपाताला आणि कत्तलींना लागणारा कडवेपणा सीझरच्या ठिकाणी पूर्ण भरला आहे हेंही ह्या झगड्यांत दिसून आलें. "रोमन साम्राज्याची उत्तर निर्वेध करणें" हें ध्येय असे एकदा ठरल्यावर किती लक्ष माणसें आपण ठार मारतों याची फिकीरच त्यानें केली नाहीं.
 स्वित्सर्लंडमधील डोंगराळ प्रदेशांतून हेल्वेटी जमात वरचेवर धाक दाखवीत असे, तिला वठणीवर आणावयाचें ठरवून सीझरने प्रथम तिकडे कूच केलें. इतक्यांत वरून बातमी आली कीं, ३,६८,००० हेल्वेटी लोक आपापली ठाणीं सोडून पश्चिमेकडे निघाले असून रोमन साम्राज्यांतून वाट काढीत पश्चिमेकडे जाणार आहेत. ही टोळधाड वाटेसाठी का होईना; पण एकदां देशांत शिरली म्हणजे काय अनर्थ उडेल हें सीझरला माहीत होतें. झपाट्यानें पुढे जाऊन त्याने वाटेंतील नदीचा पूल मोडून पाडला. दरम्यान हे हेल्वेटी नदीवर येऊन दाखल झाले व त्यांनीं सीझरला नदीपार होऊन तुमच्या मुलुखांतून जाण्याची परवानगी द्या असा निरोप धाडला. पंधरा दिवसांत उत्तर धाडतों म्हणून सीझरने जबाब पाठविला, व लढाई पंधरा दिवस पुढे ढकलून, दरम्यान पूर्ण तयारी करून मग साफ सांगून पाठविलें कीं, वाट मिळणार नाहीं. थोडें तोंड फिरवून ते रोमन सरहद्दीच्या शेजारून जाऊं लागले. त्या वेळीं सीझरला पक्का वहीम आला कीं, या रानटांचे पश्चिमेकडील प्रयाण म्हणजे पश्चिमेकडील गॉल देशांत रोमनांविरुद्ध होऊं घातलेल्या प्रचंड डावाची प्रस्तावना आहे. अर्थात् शेजारी जाऊं देवोत की न देवोत, आपल्या रक्षणासाठी तरी त्यांना हालूं देतां उपयोगी नाहीं असें सीझर याने ठरविलें. त्यांनीं मात्र शोण-नदीपार होण्याचें काम सुरू केलें. त्याच्या फौजा दोहींकडे पांगल्या आहेत हे पाहून सीझरने जोराचा हल्ला केला व एक संबंध तुकडी कापून टाकली. आम्ही काय करावें म्हणून त्यांच्या नायकांनी धाडलेल्या निरोपास 'आल्या वाटेने परत जावें व परत येणार नाहीं म्हणून माणसें ओलीस द्यावी' असें उत्तर सीझरनें धाडिलें. हेल्वेटींनीं उत्तर केलें, 'ओलीस देण्याची आमच्यांत चाल नाहीं. मागण्याची मात्र आहे !' थोड्याच दिवसांत लढाईस तोंड लागलें. त्यांच्यापाशीं ९२००० कडवे जवान लढाईस तयार होते. सीझरची फौज लहान होती; पण युद्धकलेचें ज्ञान आणि शिस्त, यांपुढे नुसत्या आडदांडपणाचे आणि तामस बेफामपणाचें कांहीं चाललें नाहीं. बारा वाजल्यापासून रात्र पडेपर्यंत घनचक्कर युद्ध झालें. हेल्वेटींची निमी फौज गारद झाली. उरलेल्यांनी बायकांपोरांकडे पाहून पालविलें आणि ते सीझरला शरण आले. एवढी उठलेली वावटळ सीझरने जागच्या जागीं जिरवून टाकली; यामुळे घरचे मित्र व उत्तरेकडील शत्रु चकित होऊन गेले. दुडगरीवर हात ठेवणाऱ्या गॉल लोकांनी अभिनंदनासाठी वकील धाडले, पण मोठे काम अजून पुढेच होतें.
 स्वित्सरलंडच्या पलीकडील जर्मन्स हे फार मगरूर व त्यांचें संख्याबलही अवाढव्य असें होतें. ॲरिओरस्टस हा त्यांचा तरुण म्होरक्या वरून वरून रोमनांस इमान दाखवी; पण पोटांतून त्यांजवर जळफळत असे. त्याचा समाचार सीझरला घ्यावयाचा होता; कां कीं, आज ना उद्यां हे रानटे एक होऊन रोमन राष्ट्राच्या चिंध्या करणार हे स्पष्ट होतें. तसेंच हे जर्मन्स रोमन मांडलिकांच्या मुलुखांत शिरलेले होते. मोठी तयारी करून सीझर त्यांजवर चालून गेला. त्यांच्या पुढाऱ्यानें मुलाखतीसाठीं सीझरला बोलाविलें व तेथें विश्वासघात करून त्याला पकडण्याचे त्याने ठरविलें. भेटीच्या वेळीं सीझरला लाचलुचपतीचेही तो बोलला आणि तुम्हांला तुमच्या देशांत कोणीही विचारीत नाहीं, तुम्हांला धरण्याविषयीं मला गुप्तांतून लिहून आलें आहे अशा अनेक गोष्टी करून त्याने ठरविल्याप्रमाणें सीझरवर अचानक छापा आणला; पण तो झिंजाडून देऊन सीझर आपल्या तळावर परत आला. त्याच्या फौजाही जर्मनांचें नांव ऐकून थोड्या दणकल्याच होत्या व कित्येक पलटणींनी हुकूम तोडण्याचेंही ठरविलें होतें. पण सीझरनें धाक दाखवून, चुचकारून, पाठ थोपटून त्यांस ताळ्यावर आणिलें. झुंजाला तोंड लागलें. जर्मन्स राक्षसांसारखे लढले; पण रोमनांचीं शस्त्रे फार नामी होतीं त्यामुळे जर्मनांचा तग निघेना. ते घाबरे झाले आणि लढाई टाकून सुसाट पळू लागले. सीझरचा हा दुसरा मोठा विजय होय.
 जर्मनांचा मोड झाला पण अजून बेल्जी आणि नर्व्ही हे ताठरच होते. फ्रान्सच्या उत्तरेकडे तो त्वरेनें चालून गेला; आणि दारूला कधीं न शिवणाऱ्या त्या रणशूर नर्व्हींशीं त्यानें गांठ घातली. डुकर खळीस येतो तसे हे नव्हीं लढले. त्यांनी सीझरला एकदां सपाटून चोप दिला; पण सीझरची दौड मोठी, आवरशक्ति मोठी आणि युद्धकलेचे ज्ञानही मोठें. तरी या उत्तरेकडील युद्धांत सीझरलासुद्धां घाबरें करणारा हा बलाढ्य शत्रु ठरला. अशा शत्रूशीं सीझरने कधीं कोणी ऐकला नाहीं असा सामना केला आणि सर्व रणांगण नर्व्हींच्या रक्तानें नाहून गेलें. सीझरच्या या तिसऱ्या विजयानें उत्तरेकडील शत्रूंची कंबर बसल्यासारखी झाली. उत्तरेकडे वर सरकून सीझर इंग्लिश चॅनलवर जाऊन उभा राहिला. आल्प्सपासून उत्तर समुद्रापर्यंत म्हणजे आसेतुहिमाचल मुलूख सीझरनें पायदळी घातला आणि रोमन साम्राज्याची ध्वजा समुद्र वलांडून खुद्द इंग्लंडांतही फडफडूं लागली. पुढील वर्षी शत्रूंचें दुसरें एक पीक आलें. तेंही सीझरने हातोहात कापून टाकले आणि तिकडील मुलूख निष्कंटक करून टाकिला. या नऊ वर्षांत सोझरने ३०,००,००० लोकांशी लढाया केल्या. ८०० शहरे चढाई करून घेतली; ३०० राष्ट्रें खालसा केली; दहा लक्ष लोक ठार केले आणि दहा लक्ष कैद करून नेले; नेपोलियन हा आजपर्यंतच्या मारेकऱ्यांत मोठा मारेकरी म्हणून समजतात, पण त्यानें तरी इतकीं माणसें मारली असतील कीं नाहीं कोणास ठाऊक !
 सीझरच्या या यशोदुंदुभीनें रोम शहरांतील लोकांच्या कानठळ्या बसेसें झालें. मित्रांच्या आनंदाला सीमा राहिली नाहीं; व शत्रूंना त्याच्याशीं दावा धरण्याची लाज वाटू लागली.
 मग क्रॅससला वाटलें, आपणही कांहीं पराक्रम करावा. म्हणून त्यानें युफ्रेटीसकडे एक स्वारी काढली; पण त्याला लढाईचें कांहीं ज्ञान नव्हतें. तो नुसता नवकोटनारायण होता. पहिल्याच लढाईत त्याचा पराभव होऊन तो मारला गेला. म्हणजे सीझरच्या लोकपक्षापैकीं एक आधार कोसळला. दुसरा जो पाँपे तोही डळमळू लागला. कारण सीझरच्या यशानें तो दिपून गेला व त्याला मत्सर वाटू लागून तो श्रेष्ठांच्या अंगास मिळाला. रोम शहरीं कित्येक लोकांना असें वाटू लागले की, या जयांनी सीझर शेफारून जाईल व ससैन्य येऊन रोमचा मालक होऊन बसेल. म्हणून सेनेटनें त्याला एक वर्ष आधीं परत बोलाविलें. पाँपेनेही यास होकार भरला मोहिमशीर सरदाराने फौज खालसा करून सडे परत यावयाचें तसें या असा हुकूम सेनेटनें त्यास केला. सीझरनें उत्तर केलें कीं, पाँपेची फौज खालसा करा मग मी आपली करतो; पण जास्त न बोलतां तो रुबिकॉन नदी उतरून खुद रोमन भूमीवर ससैन्य दाखल झाला. याचा अर्थ असा की, रोमन रिपब्लिकचा कायदा त्यानें पायाखालीं तुडविला. हें त्यानें गैर कृत्य केले; पण लोक त्याला अनुकूल होते. या दहा वर्षांत पाँपेही आंबल्यासारखा झाला होता. लोकांचा कल पाहतांच पाँपे इटली सोडून गेला. पण तो शत्रु बनला, हें पाहून सीझरने त्याला उसंत पडूं दिली नाहीं. त्याचा निःपात करावयाचे ठरवून सीझर ग्रीसपर्यंत गेला. मग पाँपेचा मोड होऊन तो इजिप्त देशांत गेला. तेथे त्याला इजिप्तच्या राजानें ही ब्याद येथे नको म्हणून ठार मारून टाकलें ! याप्रमाणें या महानुभाव पाँपेचा अंत झाला; यामुळे लोकपक्षाचा झुकलेलाच पण दुसराही खांब बसला. तिकडे कॅटोनें आफ्रिकेत श्रेष्टांची जमवाजमव चालविली होती. म्हणून सीझरनें तिकडे जाऊन त्याचा मोड केला. म्हणून कॅटोनेंही आत्महत्या केली. शेवटीं सीझरच्या पिढीचे सगळे दांडगे लोक नाहींसे झाले. फक्त सिसरो काय तो उरला; पण तो नुसता तोंडपाटील होता. याप्रमाणें आफ्रिकेपासून इंग्लंडपर्यंत व टायग्रीसपासून पोर्तुगालपर्यंत सीझरला निर्वीरमुर्वीतलम् झालें. वीस दिवसपर्यंत रोम शहरांत जयजयकार चालू होते. होत्या त्या सगळ्या, आणि नव्हत्या त्या उत्पन्न करून, सेनेटनें सर्व पदव्या त्याला दिल्या. आपल्या विरुद्ध ज्यांनीं खटपटी केल्या होत्या त्यांना सीझरने उदार मनानें माफी दिली. शत्रूचे कागदपत्र त्याच्या हातीं अचानक लागले; पण ते त्यानें न वाचतांच जाळून टाकले. त्यांत त्याचा थोरपणा दिसून येतो. लोकांस हवे होते ते कायदे त्याने केले. सूला आणि पाँपे यांची स्वदेशाबद्दलची कामगिरी लक्षांत घेऊन त्यानें त्यांचे पुतळे उभे केले आणि 'मरणान्तानि वैराणि' हा न्याय खरा केला. आपली खासगी मिळकत त्याने लोकांच्या नांवानें करून दिली व सावकारांस साफ न बुडवितां कर्जबाजाऱ्यांना सुटी दिल्या. लोकांतील अनीतीला आळा घालण्यासाठी कायदे केले. सेनेटमध्ये फक्त श्रेष्ठच असत, तेथें इतरांचाही प्रवेश त्याने कायदेशीर ठरविला. पंचांगांत म्हणजे कालमापनांत फार चुका सांचत आल्या होत्या; म्हणून चालू वर्षांत तीन अधिक मास धरून कालमापन शुद्ध केले व सौरवर्ष चालू केलें. तेव्हां वर्ष मार्चात सुरू होई. वर्षाच्या पांचव्या महिन्याला त्यानें ज्यूलियस म्हणजे जुलै हें आपलें नांव दिलें. असो. अशा प्रकारे त्यानें रामराज्य चालू केलें. दरम्यान सीझरला राजा करावे अशी हूल कोणी भक्तांनी उठविली, अथवा खुद्द सीझरनेच तो डाव खेळून पाहिला असें कोणी म्हणतात. भर दरबारांत ऍंटनीनें त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवीत ठेवीत म्हटलें, "लोकांच्या तर्फे मी आपणांस हा अर्पितों." पण लोकांतून निषेधध्वनि उमटला. सीझर तर सावधानच होता. तो उंच घोष करून म्हणाला, 'हें राज-भूषण मला नको, नको, नको; त्या देवतेला घाला.' त्याच्या वैऱ्यांनीं या गोष्टीचा फायदा घेतला. सीझरला आतां ५६ वें वर्ष लागलें होतें. पोटीं पुत्रसंतान नव्हतें. म्हणून भाचीचा मुलगा त्यानें दत्तक घेतला, हाच पुढें ऑगस्टस म्हणून गाजला.
 सीझरची काठी उंच व सडपातळ होती. केवळ चेहऱ्यावरून पाहिलें तर तो इतर रोमन लोकांच्या मानानें, जास्त सुसंस्कृत असावा असे दिसे. त्याचें कपाळ हुंडे आणि रुंद असून नाक पातळ व उंच होतें. ओंठ मोठेच होते; पण डोळे मात्र गरुडाच्या डोळ्यांसारखे काळसर घारे होते आणि गर्दन मोठी वळीव व भरलेली दिसे. तो दिसण्यांत फिकट दिसे. दाढीमिशा काढावयाचीच त्याची पद्धत होती. डोक्यावरचे केसही आंखूड व पातळ असून शेवटीं शेवटी त्याच्या डोक्याला चांगलें टक्कल पडलें होतें. तें झांकण्यासाठीं डोक्यावर तो हार घाली. सभेंत बोलत असला म्हणजे त्याचा आवाज उंच झाल्यामुळे कर्कश बने. मरेतोंपर्यंत त्याची प्रकृति अगदीं खणखणीत राहिली होती. फक्त शेवटच्या वर्षी त्याला वाताचे झटके येऊ लागले होते. कोणी म्हणतात त्याला जन्मभर घुरें येत असे. त्याला आंघोळीस पाणी फार लागे. आणि एकंदरी सगळ्याच बाबतीत स्वच्छतेसंबंधीं तो फार खाराखिरी करी. जेवतांना चांगलें लागलें म्हणून उगाच अन्नावर ताव मारणें हें त्यानें कधींच केलें नाहीं. किंबहुना पानांत काय पडेल तें बिनतक्रार खावें हीच त्याची पद्धत होती. तो दारूला कधीं शिवलासुध्दां नाहीं. तरुणपण तो चांगला पहिलवानासारखा दिसे. सर्व मर्दानी खेळ खेळण्यांत तो बडा पटाईत असून घोड्यावर बसण्यांत तर चांगलाच वाकबगार होता. या घोड्याच्या बाबतीत तर तो इतका चिकित्सक असे कीं, त्यानें आपल्यासाठीं म्हणून एका चांगल्या अवलादीच्या घोड्याची पैदास केली होती व तो घोडाही इतर कोणाचा स्वारी स्वतःवर होऊ देत नसे. या घोड्याच्या पायाला गेळें होतें व म्हणून सीझरला यश मिळतें असें लोक समजत. अगदी लहानपणापासूनसुद्धां सीझरच्या सच्चेपणाबद्दल त्याच्या मित्रांची खात्री असे. कोणीं कुरापत काढली तरीसुद्धां भांडत बसण्याचा त्याचा स्वभावच नसे. चांगल्या कुलीन घराण्यांत वाढल्यामुळे त्याची नेहमींची वागणूक शांत, सभ्यपणाची व आदबशीर अशी असे. एकदां असें झालें कीं, तो कोठेंसा जेवावयास गेला असतां पानांत वाढावयाची फोडणी अगदीं करपून गेली होती. तरी आपणांस जेवावयास बोलविणारास आपण ती खाल्ली नाहीं तर वाईट वाटेल म्हणून, त्यानें ती मुकाट्याने खाऊन टाकिली. ओपिअस नांवाच्या मित्राबरोबर रानांतून प्रवास करीत असतां त्यास एकदा एका खोपटांत मुक्कामास राहावें लागलें. तेथे पहातात तो एकच अंथरूण सांपडलें. पण ओपिअस थोडासा आजारी असल्यामुळे त्यानें तें ओपिअसला दिले व आपण स्वतः उघड्या भुईवरच निजला. वास्तविक या गोष्टींत विशेष कांहीं आहे असें नाहीं. पण कांहीं मोठ्या माणसांचे मोठेपण असल्या बारीक गोष्टीपर्यंतसुद्धां पोंचलेलें असतें इतके यावरून दिसून येते.
 अशा या परम धीरोदात्त पुरुषाचा अंत नकळत जवळ आला. हा पुढें मागें राजा होणार ही हूल बद्धमूल झाली. भक्तांनीं दाखविलेला नैवेद्य विषवत् झाला. 'रोमन लोकसत्ता बुडणार' अशा खोट्या अफवा त्याच्या शत्रूंनी उठवून गुप्त कट आरंभिला. निकटचे मित्र तोंडदेखलें हंसून शत्रु बनले. 'तुमच्या जिवाविरुद्ध कांहीं कट चालू आहे; संभाळा' असे इशारे अनेक आले; पण त्यानें ते हंसण्यावारी नेले. आपणांस कोणी व कां मारावें हेंच त्यास कळेना. हुजरेसुद्धां तो बरोबर घेईना व कमरेची तलवारही जवळ बाळगीना. इतका निर्धास्त तो बनला. मार्चची १५ तारीख आली. त्या दिवशीं सेनेटची बैठक होती; म्हणून या सर्वाधिकाऱ्यास निमंत्रण आलें. मित्रांनी खाजगतांत सांगितलें कीं, 'जाऊं नका'. पण तें त्यानें मानिलें नाहीं. घरांतून बाहेर पडतांना त्याचा स्वतःचा पुतळा होता तो एकदम खाली रेलला. हें अशुभ झाले; पण तो थांबला नाहीं. सडकेनें एका हितचिंतकाने भवितव्याची चिठी हाती दिली ती त्यानें तशीच कुसकरून टाकिली. सेनेटमध्ये जातांच लबाड, कपटी, बदमाष, मानकापू पण वरवर हंसणाऱ्या अशा मित्रांनी त्याचें स्वागत केले. आणि तों स्थानापन्न होतांच त्या कटवाल्यांनी त्याच्या हातीं एक अर्ज दिला. इतक्यांत एकाने त्याचा झगा हिसकला. ही खूण मिळतांच ते सर्व कटवाले आपल्या सुऱ्या घेऊन त्याच्यावर धावले. त्यांत पुत्रवत् मानलेला ब्रूटसही होता. "अरे ब्रूटस् तूंही ! (उलटलास)" असें तो खेदानें गद्गदून म्हणाला आणि आपल्या झग्याच्या पदरानें त्यानें आपलें तोंड झांकून घेतलें. एवढ्यांत त्याला दहावीस जखमा झाल्या. खालीं रक्ताचें थारोळें झालें आणि हा उमदा नरमणि, हा रणांगणावरचा व्याघ्र, हा लोकांचा कैवारी, हा विद्येचा व्यासंगी, हा पंडितांचा परामर्शी, हा मानवजातीचा प्रगल्भ प्रतिनिधि, मान लटकी पडून, गतप्राण होऊन खाली कोसळला. ही गोष्ट ख्रिस्ती सनापूर्वी ४४ वे वर्षी घडली.