प्रशासननामा/एक वारकरी अधिकारी



एक वारकरी अधिकारी



 प्रिय मित्रा,

 माझाच अल्टर इगो असलेल्या इनसायडरने वर्षभर ‘प्रशासननामा'च्या माध्यमातून प्रशासनातले अनुभव व चिंतन वाचकांपुढे मांडले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय प्रशासनाची घालून दिलेली चौकट आज किती खिळखिळी झाली आहे, हे त्यातून काही अंशी तरी जाणवले असणारच. प्राप्त अधिकारांचा माज आल्याप्रमाणे गैरवापर, भ्रष्टाचार व ज्यांच्या सेवेसाठी आपली नोकरी आहे व सुविधा-अधिकार शासनाने दिले आहेत, ते विसरून वागणं व सामान्य माणसाच्या समस्यांविषयी अनास्था व बेपर्वाईची वृत्ती... या तीन बाबींमुळे शासकीय अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन व कलंकित झाली आहे. पण अधिकाऱ्यांना त्याची जाणीव नाही किंवा त्याकडे ते मुद्दामच कानाडोळा करतात. 'प्रशासननामा'तील प्रत्येक लेख ही अशा अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करणारी एकेक बखरच आहे. या बखरीचा शेवट मी तुझ्यावर लिहून करणार आहे. हेतू एकच आहे, तो म्हणजे प्रशासनरूपी गर्द अंधाराच्या बोगद्याच्या शेवटी काही दिवे लुकलुकणारे आहेत व ते मार्ग दाखवीत आहेत, ही जाणीव व्हावी म्हणून. गतवर्षी मी पाच सप्टेंबरला माझ्या प्रशासकीय गुरूंबद्दल लिहिले होते. ते भारतीय प्रशासन सेवेतील बडे अधिकारी होते. पण मित्रा! तुझ्याबद्दल लिहिताना विशेष आत्मीयता वाटते. कारण माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमध्ये असाही एक अंतर्बाह्य, स्वच्छ, कार्यक्षम आणि खरंखुरं अध्यात्म जगणारा अधिकारी आहे. मित्रा! माझ्यातला दहा वर्षांपूर्वीचा मी तुझ्यात मला दिसतो आणि जेव्हा जेव्हा माझ्या प्रशासकीय जीवनात कसोटीचा वा आत्मपरीक्षणाचा प्रसंग येतो, तेव्हा प्रशासकीय गुरू राजासाहेब यांचे बोल, किंवा तुझ्या कृतीतून वा संभाषणातून झरणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या मला आठवतात आणि बळ प्राप्त होतं. मनातली किंकर्तव्यमूढ अशी अवस्था नाहीशी होते. पुरवठा उपआयुक्त म्हणून माझ्या विभागातील एक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून तुझ्याकडे माझे लक्ष वेधले गेले. दहा वर्षांपूर्वीचा मी मला तुझ्यात दिसला. एक समान जोडणारा दुवा मला मिळाला आणि तू मला जवळचा सुहृद वाटू लागलास.

 खाडी युद्धानंतर औरंगाबादला मी जिल्हा पुरवठा अधिकारी होतो. पुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि काळाबाजार याविरुद्ध जणू युद्धच पुकारले होते. सामान्य नागरिकांचा एक आंतरिक पाठिंबा अशावेळी मिळतो याची जाणीव झाली होती. दुर्दैवाने माझी फार लवकर, तडकाफडकीने बदली झाली, पण आजही केरोसिन टंचाई झाली, रेशन दुकान वा ग्राहक हितसंरक्षण क्षेत्रात समस्या आल्या की, नागरिक माझी आठवण काढतात, असं अनेकांनी मला सांगितले आहे. ही बाब धडाक्याने काम करायला बळ देते.

 तूही असाच आहेस मित्रा! प्रशासन हा आपला स्वधर्म मानून, निष्ठेने काम करणारा आणि त्यामुळेच जिल्ह्यात कडक वागूनही लोकप्रिय झालेला! तुझ्यामाझ्यात फरक एवढाच आहे की मी केवळ "प्रोफेशनल एथिक्स" पाळून हे पदसिद्ध काम आहे, असे समजून गांधीजींच्या विश्वस्त भावनेला प्रमाण मानून काम करत आलो आहे. तर तुझी व्यावसायिक नीतिमत्ता ही तुझ्या अंगात भिनलेल्या वारकरी परंपरेतून आलेली ‘स्वधर्मनिष्ठा' आहे, त्यामुळे 'अधिकारी माऊली' असा तुझा लौकिक झाला. वारकरी संप्रदायाची खूण म्हणून गळ्यात माळ घालून वावरणारे अनेक नेते व अधिकारी मी पाहिले आहेत. पण त्यांचे वर्तन व भ्रष्टाचार बघून, मला त्यांच्यातील दांभिकपणा जाणवून ॲलर्जी झाली होती.

 तू इथे जिल्हापुरवठा अधिकारी म्हणून बदलून येण्यापूर्वी मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं, पण तुझ्या गळ्यातील माळ आणि तुझ्या बोलण्यातले ज्ञानेश्वरीचे संदर्भ पाहून मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. कारण आपल्या पुरवठा खात्यात पूर्वी एक माळकरी अधिकारी होता, त्याच्या भ्रष्टाचाराचे व अन्यायाचे किस्से मराठवाड्यातील प्रत्येक गावात मशहूर होते. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्यावर सबळ पुराव्यानिशी त्याच्यावर मी कार्यवाही केली. तेव्हा त्याने माझ्यावर नाना आरोप केले. त्याकाळात तुझ्याकडे पाहून व राजासाहेबांच्या आठवणीने मला मानसिक बळ मिळालं होतं. हे कबूल केलं तर तुला कदाचित आश्चर्य वाटेल. मित्रा! एका अर्थानं राजासाहेबांप्रमाणे तूही माझा गुरूच आहेस. ज्युनिअर असलास तरी, कारण, तुझ्या वर्तनानं आणि विचारानं मला अनेकदा प्रशासनाच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमान झाल्याचा अनुभव आला आहे.

 भारतीय समाजात किंवा प्रशासनात काय, शेकडा ९०% भ्रष्ट व अन्यायी असले तरी १०% हे नक्कीच चांगले व न्यायी असतात, पण बहुतेक वेळा ते ‘अनसंग हिरोच' असतात. फक्त उच्चपदस्थ आय.ए.एस. वा आय.पी.एस. अधिकारी प्रसारमाध्यमाचे लक्ष वेधून गेतात. तुझ्यासारखे अधिकारी जिल्हा व गावपाळीवर, प्रत्यक्ष ग्रामीण क्षेत्रात काम करून, शासनाच्या ध्येयधोरणांची काटेकोर अंमलबजावणी करून गोरगरीब वर्गाला न्याय देत असतात आणि प्रशासनाचा तोल सावरत असतात - ते मात्र अंधारातच राहतात. मला अशा ‘अनसंग हिरो'ना न्याय द्यायचा आहे. खास करून तुला. कारण त्यातला सर्वात चांगला, कार्यक्षम आणि नीतिमूल्ये पाळणारा, अंतर्बाह्य स्वच्छ अधिकारी तू आहेस. म्हणून प्रशासननामाचे हे एक पुष्प मी तुझ्या नावाने वाचकांपुढे वाहत आहे.

 शासकीय अधिकारीच काय, पण आजकाल सर्व सुशिक्षित अभिवादन करताना “हॅलो' असं सहजतेने म्हणतात, तुझा उत्स्फूर्त ‘रामराम' ऐकला, की हे पाणी काही वेगळंच आहे असे जाणवते. भारतीय परंपरेचे सत्त्व घेऊन आलेला तू त्यांचा प्रतिनिधी आहेस, असे मला वाटते.

 वारकरी घराण्याची परंपरा तुला वारसाने मिळाली आणि ती तुझ्या रक्तात सहजतेनं भिनली गेली. ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाची जोड व्यवहारात, आचरणात तू आणीत राहिलास. तुझ्यात स्वधर्मनिष्ठा प्रखर आहे. त्यापुढे मृत्यूचीही पर्वा तुला वाटत नाही, हे मला दिसले, तेव्हा काळजीनं मी तुझ्या जिल्ह्याच्या कलेक्टरांशी बोललो आणि पोलीस संरक्षण दिले, तो हृद्य किस्सा मला नेहमी आठवतो.

 तू पुरवठा खात्यातील काळाबाजार रोखण्यासाठी अचानक भेटी व धाडसत्र सुरू केले. रेशन दुकानदार, केरोसीन एजंट व पेट्रोलपंपचालक तुझ्या जाळ्यात सापडू लागले. तेव्हा तुला रात्री-अपरात्री धमक्यांचे फोन येऊ लागले. 'आम्ही तुला मारून टाकू. ट्रकखाली चेंदामेंदा करू. तुझ्या मुलाचं अपहरण करू.' त्यावेळी फोनवर तू शांतपणे म्हणायचास, ‘मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणाला मृत्यू देणं किंवा न देणं तुमच्या हातात नाही. माझं आयुष्यच जर आता संपलेलं असेल तर तू केवळ निमित्तमात्र ठरशील आणि ते संपलेले नसेल तर तू काय करणार? तू माझा बालही वाकडा करू शकणार नाहीस. मी तझ्या धमक्यांना भीक घालणार नाही आणि फोन ठेवताना त्यांनाही तू ‘रामराम' म्हणायचास.

 मी तातडीने तुला पोलीस संरक्षण घे असे सुचवले. तेव्हा तू म्हणालास, "सर, त्याची गरज नाही. माझ्या ओठावर ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळी असतात.

ना तरी आयुष्य पुरले आहे ।
तरी औषधे काही नोहे ।
येथ एकाची उपेगा जाये ।
परमामृत
यथा बोला संजयो म्हणे ।
जी येरयेरांची मी नेणे ।
परि आयुष्य तेथे जिणे ।
पुढे की गा

 मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. असाही अवलिया, चुकून का होईना, प्रशासनात सापडतो, हे प्रशासनाचे अहोभाग्य म्हटलं पाहिजे!

 “सर, माऊलींच्या अशा ओव्यातून माझी जडणघडण झाली. मृत्यू हा मानवी जीवनाचा महासखा आहे, खरं तर मृत्यू हे जीवनाचे एकमेव अंतिम सत्य आहे. पर्यायाने लौकिक जीवन क्षणभंगुर आहे, तर मग माणसं लोभी का होतात ? भ्रष्टाचार का करतात? वामाचार का करतात? हा मला नेहमी प्रश्न पडतो."

 मित्रा! आपल्या महसूल प्रशासनात माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून आणि मरून गेल्यानंतरही त्याच्याशी संबंधित अनेकविध कामे करावी लागतात. त्यातील सर्वात अवघड काम म्हणजे महसूल वसुली, विविध करांची वसुली, साम-दाम-दंड-भेदाने करावी लागते. राजकीय हस्तक्षेपाला तू या कसोटीला शंभर टक्के उतरला आहेस. तुझे वसुलीचे तंत्र सर्वांना उलगडून दाखवले, तरी ते केवळ तुलाच जमू शकेल! याचा पॅटर्न होणे शक्य नाही.

 एका तलाठ्यानं तुझ्या वसुलीची पद्धत मला एका भेटीत सांगितली. त्याच्याकडे पाच गावे होती. अनेक गावकरी बागायती शेती करणारे असूनही वसुली देत नव्हते. आपल्या परीने प्रयत्न करूनही तलाठ्याला यश मिळत नव्हते. कारण तिथला एक सरपंच आमदाराचा प्रमुख कार्यकर्ता होता आणि त्याच्या जोरावर तो सरपंच स्वत:ची थकबाकी द्यायचा नाही. शिवाय गावक-यांनाही ‘पैसे भरू नका.' अशी फूस द्यायचा. त्या गावी वसुली दौऱ्याच्या काळात तू गेलास तेव्हा गावात भागवत सप्ताह चालू आहे, असं तुला समजलं. अशावेळी माझ्यासारखा अधिकारी सरळ ते गाव टाळून पुढे गेला असता. पण तू वारकरी, तू पाराजवळ जीप थांबवलीस. वीणा वाजवीत भजन-कीर्तने करणाऱ्या बुवांच्या पाया पडून खाली जमिनीवर बसलास. श्रवणात मग्न झालास. गावकऱ्यांनी तुला  ओळखून खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला, तेव्हा तू म्हणालास,

 “देवाच्या दारी सर्व समान. मग कशाला हवी खुर्ची ?"

 त्यामुळे गावकरी विलक्षण प्रभावित झाले असणार. कीर्तनानंतर तू त्यांच्याशी बोलू लागलास आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या उद्धृत करीत गावकऱ्यांना स्वकर्तव्याची जाणीव करून दिलीस. त्यावेळी म्हणालास, “माझे आताचे स्वकर्तव्य म्हणजे जमीन महसुलाची आणि करांची वसुली. ते पैसे शासनाला भरणे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही आपला स्वधर्म निभावणार, की मला कडक वागायला लावून माझा स्वधर्म पाळायला भाग पाडणार?"

 तुझी ही मात्रा खरोखरच, जालीम होती. सगळ्यांनी त्या संध्याकाळी पूर्ण गावाची वसुली तलाठ्याकडे जमा करून गाव बेबाक केलं!

 मित्रा, या दोनच प्रसंगातून तुझी मला खरी ओळख पटली.आपण बदलीमुळे दुरावलो असलो, तरी मला तुझी आठवण येते. तेव्हा मन एका समाधानानं भरून येतं. कडक वागणं आणि तरीही लोकप्रिय असणं, हे तुला जमलं आहे. आमदार, मंत्री व इतर पदाधिकारीही तुला सहजतेनं माऊली म्हणूनच पुकारतात आणि तुझ्याविरुद्ध कोणी तक्रार केली म्हणतात, 'माऊली मुद्दाम तुमच्याविरुद्ध काही करणार नाही. तुमचं काम खरं असेल तर त्यांना परत जाऊन भेटा. नियमात असेल तर काम जरूर होईल.'

 अर्थात, राजकीयदृष्ट्या जमवता न आल्यामुळे माझ्या तीनदा सलग बदल्या झाल्या. बदली या हुकमी अस्त्राचा वापर करून लोकप्रतिनिधी कार्यक्षम अधिकाऱ्यांना खच्ची करू शकतात; पण मित्रा, तू स्वत: काही जाणीवपूर्वक न करताही कधी अप्रिय झाला नाहीस. त्याचे कारण मी शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की, आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातले, शेतकरी कुटुंबातले असतात. त्यांच्या घरात कुणी ना कुणी तरी, पंढरपूरची वारी करत असते. गावयात्रा, भागवतसप्ताह, भजन-पूजन-कीर्तन या गोष्टींनी समाज बांधला जात असतो. तो सामाजिक व्यवहार आहे. ही शतकांची परंपरा आहे. जनतेला अश्रद्ध-नास्तिक नेता चालत नाही. त्यामुळे जनमानसाची नाडी ओळखणारे नेते हे मनाने कसेही असले तरी आपल्या कृतीतून व व्यवहारातून जनतेच्या धार्मिक भावना कुरवाळीत असतात. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष जगणारा तु, त्यांना मूर्तिमंत माऊली वाटतोस. तुझं काम कधी कधी त्यांना अप्रिय वाटत असलं, तरी तुला विरोध करायला ते धजत नाहीत. त्यामुळे तू प्रसंगी राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे, पण जनहितकारक काम नेटाने पार पाडतोस. तरीही तुला पदावरून हटवायचा विचार त्यांच्या मनात आणता येत नाही. कारण तुझी ‘वारकरी अधिकारी' ही जनसामान्यात रुजलेली प्रतिमा. म्हणून मित्रा, मला भरवसा आहे की, तू प्रत्येक ठिकाणी असाच, तडफेने समाजहिताचे काम करीत राहशील.

 तुझ्या सहकारी मित्रानं तुझ्या संदर्भातला सांगितलेला एकच किस्सा इथं लिहिणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं एक काम असतं सरबराई. अर्थात बंदोबस्त. सर्किट हाऊसवर बड़े अधिकारी येतात तेव्हा पुरवठा अधिकारी तिथं संपर्क अधिकारी म्हणून कायम असतो. अगदी चांगल्या अधिकाऱ्यांनाही हे काम टाळता येत नाही. त्यांचे खालचे अधिकारी-कर्मचारी यात वस्ताद असल्यामुळे सारं काही सांभाळून नेतात आणि ते डोळ्यावर कातडी ओढून स्क्स्थ बसतात. पण तुझा खाक्याच काही और. तुझ्या एका बड्या व तुला वरिष्ठ असणाऱ्या अधिका-याला नववर्षाची पार्टी देण्याची सणक आली. त्यानं तुला बोलावून ती पार्टी आयोजित कर असे म्हटले. सामिष व मद्यपानासह. तेव्हा तू ताडकन म्हणालास, "हे शक्य नाही सर. माझा महिन्याचा अख्खा पगार खर्चला तरी ही पार्टी होणार नाही आणि मी खालच्या माणसांना त्याबाबत सांगणार नाही. मला माफ करा!"

 प्रशासनामध्ये असे सुनावणे आणि तेही वरिष्ठांना, मोठे जोखमीचे आहे. त्यांच्या हाती गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार असतात. आपली पदोन्नती त्यावर अवलबून असते.

 मित्रा, तू अपवाद आहेस व एकमेव - असं म्हणणं अतिशयोक्ती होईल, पण दुर्मीळ नक्कीच म्हणता येईल. अंगीकारलेल्या नीतिनियमाचे पालन कितीही अडचणी आल्या तरी तडजोड करायची नाही, माघार घ्यायची नाही आणि परिणामाची पर्वा करायची नाही, ही त्रिसूत्री तू ज्ञानराज माऊलींकडून, त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून शिकलास.

अगा स्वधर्म हा आपला ।
जरी का कठीण तू जाहला ।
तरी तोचि अनुष्ठिला
भला देखे

 मित्रा, तू आपला स्वधर्म जाणला आहेस. प्रशासनातलं स्वकर्तव्यही तेवढ्याच सहजतेनं अंगीकारलं आहेस. तुझ्या आध्यात्मिक अधिकाराचा वापर तू कुशलतेने, शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी करतोस आणि  त्याचा परिणामही जाणवतो. शासनाच्या या योजना खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोचवायच्या असतील तर आजही ग्रामीण भागासाठी प्रवचन, भजन व कीर्तन हे प्रभावी माध्यम आहे. तू ते जाणीवपूर्वक आचरतोस आणि तुला ते यश मिळवून देते.

 मित्रा, आध्यात्मिकतेचा स्पर्श असलेला तुझा पॅटर्न ‘लखिना पॅटर्न' प्रमाणे पॅटर्न होऊ शकणार नाही. कारण, तुझी कार्यपद्धती तुझ्या जगण्यातून आली आहे. तिचे अधिष्ठान निष्काम कर्मयोग हे आहे. तडजोड न करता जनता जर्नादनरूपी परमेश्वराला शरण जात शासनाच्या योजना राबवणे, हे तुझ्या प्रशासनप्रणालीचे सार आहे, ते मलाही आचरणं शक्य नाही. कारण मी धर्म व अध्यात्मिकता यापासून बराच दूर आहे. मीही माझ्या पद्धतीने स्वधर्म पाळतो. पण तो नैतिक व सामाजिक जबाबदारीतून आलेले आहे, असं माझं मत आहे.

 भारतीय प्रशासनास बदनाम करणा-या त्रिसूत्रीबाबत सुरुवातीला मी मीमांसा केली आहे. त्यावर मात करता येणं, खरं तर, फार कठीण आहे अशातली बाब नाही.

 प्रत्येक अधिकाऱ्याने किमान 'व्यावसायिक नीतिमत्ता पाळून आपलं काम व्यवस्थित व वक्तशीर करीत जनतेला न्याय व संतोष देणं, अधिकाराचा वापर जनहितासाठी व अन्याय निवारणासाठी करणं; आणि लाच न घेणं' ही त्रिसूत्री हे त्याचं उत्तर आहे. माझ्या मित्रा, त्याच तू एक सच्चं उदाहरण आहेस. प्रशासननाम्याच्या माध्यमातून तुला वाचकांपुढे आणताना एकच समाधान वाटत आहे की, आमच्या प्रशासनात स्वधर्म आचरणारी, एक वारकरी वृत्तीची, संयमी तशीच पराक्रमी अधिकारी माऊली आहे.

 ज्ञानेश्वरांच्या शब्दात मी तुला शुभेच्छा देतो.

तुम्ही वृत्त नियम न करावे ।
शरीराते न पीडावे ।
दुरी केंही नवाचावे। तीर्थासी गा
देवतांतर न भजावे ।
हे सर्वथा काही न करावे ।
तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे ।
अनायासे