बळीचे राज्य येणार आहे!/निसर्गशेतीवरील किडी
निसर्गशेतीवरील किडी
निसर्ग-विज्ञान-व्यापार
विषय : नैसर्गिक शेती तथा निसर्गविज्ञान. या 'तथा' शब्दाने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक शेती म्हणजेच निसर्ग विज्ञान शेती हे काही खरे नाही. शिबिराचे सूत्रधार 'बळिराजा मासिक' आधुनिक व्यापारी शेतीचे मासिक अशी बिरूदावली मिरवते. निसर्गविज्ञान शेतीची चर्चा आधुनिक व्यापारी दृष्टिकोनातून घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात जागोजागी उदंड कष्ट, प्रयास, तपस्या करणारी निष्ठावान मंडळी एकत्र जमा झाली आहेत.
शब्दांचे मोठे पीक
विषय सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या वर्षभरांत अर्ध्या डझनावर देशी-परदेशी विद्यार्थी, या विषयावर डॉक्टरेट करणारे, मला भेटले आहेत. शेतकऱ्यांपेक्षा हा विषय विद्वानात अधिक लोकप्रिय झाल्याने शब्दांचे पीक मोठे उदंड आले आहे. कोणी वैकल्पिक (Alternative) शेती म्हणतो, म्हणजे हरित क्रांती घडवून आणण्याकरिता वापरलेल्या सुधारित बियाण्यांची वाणे आणि वरखते व औषधे यांच्या उपयोगाने होणाऱ्या शेतीला पर्याय देणारी शेती, कोणी फक्त पेट्रोलियमविरहीत शेती म्हणतो, कोणी जैविक, कोणी Biotic शेती. कोणी म्हणते पर्यावरणी (Ecological) शेती, कोणी शाश्वत (Sustenable) शेती,कोणी भूनाग (Vermiculture) शेती इ. शब्दप्रयोग आहेतच. इंग्रजीत शब्दांची लयलूट आणिक मोठी आहे. Organic, Natural, Bio-Dynamic, Permaculture इ.इ.
नैसर्गिक शेतकऱ्यांच्या छटा
फारसे तपशिलात न जाता सांगायचे झाले तर या सगळ्या प्रकारांमध्ये समानता एवढी की शेतीच्याबाहेरून येणाऱ्या, विशेषत: कारखानदारीत तयार होणाऱ्या वस्तूंचा, निविष्ठांचा वापर कमी. निसर्गशेतीत काही प्रखर निष्ठावान आहेत. एखाद्या सोवळ्या ब्राह्मणाप्रमाणे रसायनाच्या सावलीचाही विटाळ त्यांना खपत नाही. एक कण जरी रसायन आले तरी त्यामुळे सगळे नैसर्गिक चक्र बिघडून जाण्याची धास्ती त्यांना वाटते. बाकीच्यांची, आवश्यकता पडल्यास थोडीफार तडजोड करण्याची तयारी असते. या नव्या चळवळीत निसर्गवादी आहेत, तत्त्वज्ञानी आहेत, धर्मवादी आहेत पर्यावरणवादी आहेत, काही काही तर शेतकरीसुद्धा आहेत.
दुसरा एक प्रवाह
निसर्गशेतीच्या प्रवाहाबरोबर दुसरीही एक जबरदस्त विचारधारा आहे. नुकतेच महाराष्ट्रातील चार-पाचशे शेतकरी इस्रायलला जाऊन आले. शिवाय अर्थव्यवस्थेच्या खुलीकरणामुळे, निर्यातीसाठी, बी-बियाणे इत्यादींच्या आयातीसाठी अनेक तरुण शेतकऱ्यांचा परदेशी शेतकी तंत्रज्ञानाशी संबंध आलेला आहे. या मंडळींच्या तोंडची भाषा निसर्गशेतीवाल्यांपेक्षा अगदीच वेगळी आहे. आधुनिक व्यापारी शेतीकरीता शेतीमालाचे हुकमी उत्पदन घेतले पाहिजे, निर्यातीचे करारमदार झाले आणि उत्पादनच झाले नाही तर जागतिक बाजारपेठेत आपल्याला स्थान राहणार नाही हे त्यांना चांगले समजते आहे. हुकमी उत्पादन झाले पाहिजे एवढेच नव्हे तर ते उत्पादन ठराविक गुणवत्तेचे झाले पाहिजे; रंग, रूप, आकार, गंध, स्वाद, स्पर्श, चव, शुद्धता अशा सगळ्या कसोट्यांना माल उतरला पाहिजे. त्यांकरिता प्रचंड आच्छादित घरे बांधून उष्णतामान, पाणी, खते, औषधे यांचा ठराविक आणि नियमित पुरवठा करणाऱ्या जवळपास कारखानदारी तंत्रज्ञानाकडे ते वळत आहेत. माल तयार झाल्यानंतरही त्याची तोडणी, शीतकरण, आवेष्टन, साठवणूक, विक्री, प्रक्रिया, निर्यात याकरिता अधिकाधिक कारखानदारी साधने उपयोगात आणण्याची आवश्यकता ते हिरीरीने मांडतात.
एकट्या महाराष्ट्र राज्यातच शेतकऱ्यांमध्ये आणि शेतीसंबंधी दोन विचारप्रवाह सारख्याच हिरीरीने मांडले जात आहेत. एक 'निसर्गशेतीचा' आणि दुसरा 'उद्योजक शेतीचा'.
उद्योजक शेतकरी निसर्गशेतीच्या तसे विरोधी नाहीत, द्राक्षे, फुले, स्ट्रॉबेरी यांची निर्यात करणारी अनेक शेतकरी मंडळी आग्रहाने वरखतांचा वापर टाळतात किंवा मर्यादित ठेवतात. औषधांच्या उपाययोजनांत मात्र काही किरकोळ अपवाद सोडल्यास रासायनिक औषधांचा वापर हे उद्योजक शेतकरी करतात. हा कलही हळूहळू बदलेल. परदेशात जैविक शेतीमालाचा आग्रह वाढतो आहे. साहजिकच आपल्या देशातील पंचतारांकित मंडळीही जैविक मालाचा आग्रह धरू लागली आहेत. बाजारपेठेचा हा कल राहिला तर उद्योजक शेतकऱ्यांना रासायनिक खतांबरोबरच औषधांचा वापर कमी करावा लागेल. बाजारपेठेत भारताची जवळ जवळ मक्तेदारी होऊ शकेल. या दृष्टीने ही मंडळी निसर्ग शेतीचे महत्त्व मानतात.
रासायनिकाचे पुरस्कर्ते नाहीत
'निसर्गशेती' आणि 'रासायनिक शेती' असे दोन शब्दप्रयोग वापरले तर रासायनिक शेतीचे खंदे पुरस्कर्ते अथवा समर्थक असे कुणीच नाही. रसायनेच वापरा, जैविक खते वापरूच नका असा अतिरेक रासायनिकात सापडत नाही. नैसर्गिक खते चांगली पण पुरवठा म्हणून थोड्याफार प्रमाणात रसायनाचा उपयोग करणे सोयीचे आणि फायद्याचे असते एवढीच काय ती त्यांची मांडणी आहे. हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते कोणी नाहीत; पण गेल्या ३० वर्षातील यातंत्रज्ञानाच्या वापराचे समर्थन करणारे अनेक आहेत. हरितक्रांती तंत्रज्ञानाला ३० वर्षांपूर्वी पर्याय नव्हता. जर का तो वापर झाला नसता तर देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला नसता, लक्षावधी माणसे उपासमारीत सापडली असती असे त्यांचे म्हणणे आहे. मला असे वाटते की या विषयावर मतभेद नसावा.
चहूकडे निसर्गशेतीच
कित्येक शतके हिंदुस्थानात सारी निसर्गशेतीच चालू आहे. रसायनांचा उपयोग या शतकातच आला आणि त्यांतही विशेष करून गेल्या ३० वर्षांतच आला. आजही वरखतांचा वापर इतर देशांच्या तुलनेने अगदीच कमी आहे. तो वापर खात्रीशीर पाणीपुरवठा असलेल्या क्षेत्रात; गहू, भात, ऊस, कापूस अशा काही मोजक्या पिकांत आहे. बाकी शेतीत रसायनांचा वापर अगदीच किरकोळ आहे. देशातील जवळ जवळ ४० % शेतीत आजदेखील कणमात्र युरिया पडत नाही. निसर्गशेतीच्या शेकडो वर्षांत देशांत दुष्काळ पडत राहिले, माणसे उपाशी मरत राहिली. आजही ४० % शेतकरी निसर्गशेती करतात तरी देश अडचणीतच आहे. तेव्हा निसर्गशेती सगळ्या रोगांवरचा एक मोठा उपाय आहे असली भाषा विद्वानांनी खुशाल वापरावी, शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही.
निसर्गशेतीच्या विरुद्ध कोणीच नाही. या झेंड्याखाली काही प्रवृत्ती मात्र मनात काही प्रश्नचिन्हे आणि भीती तयार करतात.
धर्मवादाचे भूत
निसर्गशेतीच्या निमित्ताने एक नवा धर्मवाद शेतीमध्ये घुसविण्याचा प्रयत्न होतो आहे असा संशय घेण्यास जागा आहे. बाबामहाराजांचे अनेक शिष्यवर आणि स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे आणि जन्माच्या अपघाताने मिळालेल्या त्या धर्माच्या वारशाचा गर्व मिरविणारे अनेक लोक निसर्गशेतीच्या चळवळीत अग्रभागी आहेत. शेतकऱ्यांनी निसर्गशेती चळवळीतील धर्मवाद्यांपासून आणि समाजवाद्यांपासून सावध राहिले पाहिजे. मी हा मुद्दा आवर्जून मांडतो, कारण मला हा धोका फार भयानक वाटतो. निसर्गशेतीचे प्रयोग करणाऱ्यांपैकी अनेकजण धर्मवादी तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेले आहेत. खुद्द 'मासानोबु फुकुओका' यांची निसर्गशेतीची मांडणीच धर्मावर भर देते. त्यांनी म्हटले आहे,
"नैसर्गिक शेतीमध्ये धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा संयोग झाला आहे हे विशेषत: भारतीयांनी जाणले आहे. नैसर्गिक शेती हेच परम सत्य, खरा साधनमार्ग व यथार्थ शेतीपद्धती होय ही गोष्ट त्यांना आकळली याने मला धन्यता वाटली."
पुण्याच्या आसपास वावरांवर गायत्री मंत्राचा प्रयोग सांगणारे 'विज्ञानंद' झाले. तसेच 'निसर्गशेतीतील धर्मवादी' शेतकऱ्यांना धोका देऊ पाहत आहेत. रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांनी शेतकरी पोळलेला आहे याचा फायदा घेऊन 'विज्ञान हरले, अध्यात्म जिंकले' अशा आरोळ्या ठोकायला त्यांनी सुरुवात केली आहे. निसर्गशेतीची गोडी शेतकऱ्यांना लागली की मग जुन्या काळच्या ख्रिश्चन मिशनऱ्याप्रमाणे अध्यात्मात बाटवण्याचे हे कारस्थान आहे. जनावरांचे मूत्र शेतीला फायदेशीर पण त्यात गोमूत्र सर्वात फायदेशीर असा प्रचार गोपूजक धर्मवादी करतात. अर्धवट शास्त्रीय परिभाषेत त्याचे थातूरमातूर समर्थन देऊन लोकांना भुलवतात. ज्या ज्या देशात एक वशिंडाची गाय आहे तो तो देश आणि तेथील पर्यावरण उद्ध्वस्त झाले आहे. तरी त्या गाईचे देव्हारे माजवतात; ज्योतिष शास्त्राच्या आधाराने वैदिक शेती करण्याची शिफारस करतात. रायानिक शेतीचा पराभव झाला असेल, नसेल पण विज्ञानाचा पराभव झालेला नाही, चुकीच्या तंत्रज्ञानाचा पराभव झाला आहे. विज्ञाननिष्ठा जिंकत आहे. नफ्याची प्रेरणा सर्वात सबळ आणि सुष्ट प्रेरणा सिद्ध झाली आहे. ही दोन मूल्ये रासायनिक शेतीबरोबर सोडली तर घंगाळातील गढूळ पाण्याबरोबर त्यात न्हाऊ घातलेले बाळही फेकून दिल्यासारखे होईल.
कांचनमुक्तीचे कांचनमृग
धर्मवाद्यांप्रमाणेच एक वेगळे अध्यात्म सांगणारी मंडळी निसर्गशेतीत मिरवत आहेत. यात प्रामुख्याने गांधीवादी, सर्व सेवा संघवाले कांचन मुक्तिवादी यांची गणना आहे. निसर्गशेतीचा पुरस्कार करताना ते शेतीतील व्यावसायिकतेवर उघड उघड हल्ला करतात. कोणी 'ॲलन जॉर्ज' हा त्यांचा आवडता लेखक, त्याचे एक वचन उद्धृत केले जाते.
"जेव्हा तेव्हा शेतकऱ्याने वास्तविक शेती करण्याचे, अर्थात तिच्यापासून आपली व आसपासच्या समाजाची आवश्यकता पूर्ती करण्याऐवजी आपले उत्पादन दूर, लांब पाठवून पैशाच्या लालसेने विकण्यास सुरुवात केली व तिला व्यापाराचे रूप दिले तेव्हा त्याने संकट विकत घेतले व जमिनीचे शोषण करून हिरव्यागार शेतीचे वाळवंट केले."
"स्वत: व गाव यांच्या स्वावलंबनाऐवजी नफ्यासाठी शेती करील" या बुद्धीने शेतकरी निसर्गापासून दूर गेला आणि त्याने स्वत:चे, देशाचे नुकसान केले अशी मांडणी 'सर्व सेवा संघ'वाले करतात.
दुढ्ढाचार्यांची मळमळ
आपले हित कशात आहे, आपल्या पोराबाळांचे, कुटुंबाचे हित कशात आहे हे शेतकऱ्यांना कळत नाही; शेतीत काय पिकवावे याचे शहाणपण त्यांनी 'आम्हाकडून' घ्यावे, जग पैशाच्या मागे लागले तरी शेतकऱ्यांनी मात्र सेवाभावी जीवन काढावे अशी दांभिकता या विचारसरणीत आहेच. त्याखेरीज, वैयक्तिक नफ्यापेक्षा काही व्यापक उच्च तत्त्वांच्या आधाराने देशातील साधनसंपत्तीचा वापर अधिक चांगला होतो, असाही एक सिद्धांत आहे. सर्वसामान्य संसारी लोकांना त्यांचे हित काय कळणार? षड्रिपूंच्या कर्दमात ते बिचारे गटांगळ्या खात असतात. आम्ही परमेश्वरी ज्ञानाचे वारसदार त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवतो असा अहंकार धर्मवाद्यांनी वर्षानुवर्षे मिरवला. गहू किती पिकवावा, कोथिंबीर किती लावावी हे शेतकऱ्यांना काय समजणार ? त्यासाठी राजधानीतील नियोजन मंडळात बसलेली 'दुढ्ढाचार्य' मंडळी आकडेमोडी करून निर्णय घेतील ही समाजवाद्यांची आणि नेहरूवाद्यांची मांडणी. व्यक्तीच्या प्रेरणा देशघातक असतात आणि देशहित कळते ते आध्यात्मिक किंवा अर्थशास्त्री दुढ्ढाचार्यांना. कारण त्यांच्याकडे काही 'महान व्यापक दृष्टिकोन'असतो. समाजवादी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधाराने समाजावर हुकुमत बसवू पाहत होते. गांधीवादी तशाच तोंडवळ्याचा कार्यक्रम आध्यात्माच्या पायावर देत आहेत.
व्यक्तींनी नफ्याचा पाठपुरावा केल्यामुळे देशाचे नुकसान होते या वावदूक कल्पनेचा जागतिक ऐतिहासिक पराभव झाला आहे.
स्वातंत्र्याच्या कक्षा
नैसर्गिक शेतीत निसर्गाशी सहजीवन साधले जाते, नैसर्गिक शेती आत्मिक सुख आणि आनंद देते, त्याबरोबर नैसर्गिक शेतीत तयार होणारा माल अधिक पौष्टिक, चवदार असतो. रासायनिक खतांतून तयार झालेल्या मालाच्या सेवनाने माणसाचा स्वभाव बिघडतो, आध्यात्मिक अध:पतन होते असेही वेगवेगळे युक्तिवाद ऐकवले जातात. कोणत्या पदार्थाच्या सेवनाने मनुष्यप्राण्याची आध्यात्मिक उन्नती किंवा अवनती होते हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. नैसर्गिक शेतीतील माल अधिक रुचकर, पौष्टिक असतो हे मानण्यास मी तयार आहे; पण याच कारणाने नैसर्गिक शेती शेतकऱ्यांना आणि ग्राहकाला मान्य होईल ही कल्पना मनुष्यस्वभावाच्या चुकीच्या निदानावर आधारलेली आहे. स्वामी चिन्मयानंद एक अनुभव सांगत. पहाटे चार वाजता उठून तांब्याभर पाणी प्याले तर कोठा साफ राहतो, प्रकृती चांगली राहते, उत्साह वाटतो हे सगळे खरे; पण असा अनुभव घेऊनही उष:पान करणारे विरळाच. याउलट, धूम्रपानाने प्रकृती बिघडते, कॅन्सरसारखे भयानक रोग होतात हे माहीत असूनही एका झुरक्याच्या तलफेसाठी माणसे वेळी अवेळी कोसच्या कोस अवघड रस्त्याने पायी चालत जातात. नैसर्गिक शेतीतून आरोग्य, शांती मिळत असेल पण आरोग्य-सुख-शांती ही मनुष्यप्राण्याची उद्दिष्टे नाहीत; माणसाचे उद्दिष्ट स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचे असते. पोटॅशिअम सायनाइडसारख्या जहाल विषाची केवळ चव कळावी आणि मरण येण्याआधी ती लिहून ठेवता यावी यासाठी अनेकांनी प्राण गमावले आहेत असे म्हणतात.
रासायनिक शेतीतील इतर दोष काहीही असोत, त्यात उत्पादनावरील शेतकऱ्याचे नियंत्रण अधिक सज्जड आहे. रासायनिक शेतीला जो काही पर्याय निघेल तो माणसाच्या स्वातंत्र्याच्या कक्षा बंदिस्त करणारा असेल तर त्याची स्वीकृती कठीण आहे.
पर्यावरणवाद्यांची भयानक भकिते
निसर्गशेतीच्या चळवळीला धर्मवाद्यांप्रमाणेच पर्यावरणवाद्यांचाही मोठा धोका आहे. शाश्वत शेती किंवा सदा सर्वकाळ चालणारी शेती अशी कल्पना पर्यावरणवादी मांडतात. वर्तमान पिढीचा विकास उद्याच्या पिढ्यांच्या वारसाला धक्का न लागता झाला पाहिजे, जेणेकरून ही सुंदर पृथ्वी आणि त्यावरील प्राणिमात्र आणि मानव यांची वस्ती सर्वकाळ अबाधितपणे चालू राहील असेच तंत्रज्ञान वापरले पाहिजे अन्यथा पृथ्वीचा नाश अटळ आहे असा त्यांचा आग्रह आहे.
जगाच्या इतिहासात प्रत्येक पायरीला आता ही पृथ्वी बुडते, आता विनाश जवळ आला अशा आरोळ्या ठोकणारी मंडळी दृष्टीस पडतात. पहिली आगगाडी भूगोलावरून धावू लागली तेव्हा सृष्टीचा विनाश जवळ आला असे आधुनिक पर्यावरणवाद्यांचे पूर्वज करवादले होते. पहिले कारखाने उभे राहू लागले तेव्हा ही सारी हरित सृष्टी आता लुप्त होणार याची चिंता पडलेल्यांत टॉलस्टॉय, रस्कीन यांचीही गणना आहे. लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते आणि अन्नधान्याचे उत्पादन मात्र गणिती श्रेणीने वाढते तेव्हा मनुष्यजात भूकबळीने नष्ट होणे अपरिहार्य आहे असे भाकीत यांच्याच पूर्वजांनी वर्तवले होते. ही सगळी भकिते खोटी पाडून माणूस जिवंत राहिला, एवढेच नव्हे तर तो सुधारला, जास्त सुखी झाला हेही सत्य आहे.
ऊर्जास्रोतांचा कारकुनी हिशेब
ठराविक पेन्शन मिळणारे म्हातारे आपले सगळे दैनंदिन जीवन त्या रकमेत बसवण्याचा आरखडा तयार करतात, म्हणजे मरेपर्यंत आपणास काही कमी पडू नये. असला हिशेब मानवजात करत नाही. मनुष्य धडपडतो, स्वत:च्या 'स्वातंत्र्याच्या कक्षा' रुंदावण्याकरिता भगीरथ प्रयत्न करतो, निसर्गाची रहस्ये आणि प्रमेये शोधून काढतो. बैलाच्या ताकदीपासून वारा, पाणी, कोळसा, वीज, पेट्रोलियम, अणुपर्यंत ऊर्जेचे अनेक स्रोत त्याने वेसण घालून सेवेस ठेवले आहेत. उरलेल्या पेट्रोल स्रोतांचा नेमका हिशेब मांडून मनुष्यजातीच्या पुऱ्या भविष्यात ते पुरतील अशा गतीने जपून जपून वापरण्याची पद्धती माणसाच्या स्वभावाला जमणारी नाही. पेट्रोल संपले तर त्या जागी दुसरी काही साधने तयार करू, अणुंचा वार करू, समुद्रांच्या लाटांना कामी लावू, सूर्याची ऊर्जा वापरू आणि एक दिवस सूर्यच विझत आला तर त्या जागी एखाद्या तारकेला ओढीत आणून पेटवून देऊन नवा सूर्य उभा करण्याची त्याची जिद्द आहे. पर्यावरणवाद्यांनी प्रगतीला खीळ घालण्याची कोशीस शतकानुशतके केली, पण माणूस थांबला नाही. कर्तबगारी गाजवू इच्छिणाऱ्या पोराला घरातील म्हाताऱ्यांनी सावधगिरीचा सल्ला द्यावा हे योग्यच ; त्याचा काही ना काही उपयोग होतोच. पर्यावरणवाद्यांत काही भली मंडळीही आहेत. मनुष्याच्या भवितव्याविषयी त्यांना वाटणारी चिंता खरीखुरी आहे. अन्यथा या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना वापरणे कठीण व्हावे इतकी साधने, संपत्ती आणि सन्मान अगदी सहजासहजी उपलब्ध झाली नसती.
अशास्त्रीय शाश्वती
पर्यावरणवाद्यांच्या सद्हेतूबद्दल, सद्भावनेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही पण त्यापलीकडे त्यांच्याकडे काही असले तर ते तपासून घ्यावे लागेल. उदा: त्यांची शाश्वततेची कल्पना कितपत शास्त्रीय आहे? सातवी-आठवीच्या पदार्थ विज्ञानशास्त्राच्या पुस्तकात वेगवेगळ्या तऱ्हेच्या कारंज्यांचे प्रयोग केले जातात. थोडीफार बुद्धी असलेले सर्व विद्यार्थी त्या वयात शाश्वत कारंजा तयार करण्याच्या प्रयत्नास लागतात. शाश्वतता ही विज्ञानाच्या मूलभूत नियमानुसार अशक्य आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यः।' तेव्हा ही पृथ्वी चिरंतन कालापर्यंत चालणारी आहे ही कल्पना शास्त्रीय नाही. पृथ्वीसारखे ग्रह या अफाट विश्वात रोज एक
या गतीने तरी खपत असावेत.
शक्य होईल तितका पृथ्वीचा बचाव करावा याबद्दल कोणी वाद घालत नाही; पण खांद्यावर शबनम अडकवून फिरणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना पृथ्वीच्या जीवनमरणाची चिंता जे.आर.डी. टाटांपेक्षा अधिक आहे असे मानायला काही कारण दिसत नाही. पृथ्वी जगवायची कशी याचे पर्यावरणवाद्यांना काही विशेष ज्ञान झाले आहे असेही दिसत नाही. झाडे लावणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम. त्यामुळे पाऊस पडतो, निसर्गाचे संतुलन राहते, असा त्यांचा लाडका सिद्धांत; पण सर्व महाराष्ट्रभर जंगलेच जंगले असताना सतत तेरा वर्षे पाऊस पडला नाही आणि दुर्गादेवीचा कराल दुष्काळ झाला, हे कसे ? हे ते सांगू शकत नाहीत. सगळा राजस्थान भाक्रा-नान्गलच्या पाण्याने हिरवागार झाला तर मान्सूनचे चक्र थांबेल काय ? आणि बाकी सारा देश वाळवंट बनेल काय? या शक्यतेबद्दल ते काहीच ठामपणे सांगू शकत नाहीत. "पृथ्वीचा विनाश प्रदूषणापेक्षा एखाद्या ग्रहखंडाच्या टकरीने होण्याची शक्यता अधिक आहे. अशी टक्कर टाळायची तर त्याकरता लागणाऱ्या औद्योगिक उत्पादनाने प्रदूषणाचे प्रमाण आणखीनच वाढणार हे नक्की.
जुने समाजवादी
कोणत्याही उद्योगाचा पर्यावरणावर काही ना काही अनिष्ट परिणाम होतोच. कोणत्याही प्रकल्पातील असले दोष दाखवून त्यांना विरोध करणे इतपतच पर्यावरणवाद्यांचे ज्ञान. खुल्या व्यवस्थेपेक्षा समाजवादी नियोजनाने विकास होतो हा सिद्धांत खोटा ठरला, जग खुल्या व्यवस्थेकडे जाऊ लागले तेव्हा अर्थकारणाच्या सबबीवर किंवा पर्यावरणाच्या बागुलबुवाने तरी 'सरकारशाही व्यवस्था' काही काळ टिकवावी या बुद्धीने बहुत सारे जुने समाजवादी आज पर्यावरणवादी झाले आहेत.
दोषास्पदाकडून दोषात्पदाकडे
प्रत्येक समाजव्यवस्थेच्या स्वत:च्या पर्यावरण समस्या असतात. निसर्गशेतीचा अंमल चालू असताना मलेरिया, कॉलरा, देवी, नारू, खरूज असल्या रोगांनी सर्वदूर थैमान घातले होते. त्याबरोबर दुसऱ्या काही समस्या तयार झाल्या. त्या सोडवण्याच्या प्रयत्नांत मनुष्य गढला आहे. समाज एका दोषास्पद स्थितीतून दुसऱ्या दोषास्पद स्थितीत जातो आणि नवे दोष करता करता आणखीन नवीन समस्या डोक्यावर घेतो. मनुष्याच्या सांत जीवनात 'शांती'ला स्थान नाही. 'अशांती'तून सुटका कदाचित निर्वाणांत किंवा मोक्षांत मिळत असेल; एरवी नाही.
माणूसही निसर्ग आहे
निसर्ग हा नेहमीच श्रेष्ठच असतो, कल्याणकारीच असतो असा पर्यावरणवाद्यांचा दुसरा एक दृढ विश्वास आहे. मनुष्यच काय तो दुष्ट आहे आणि तो निसर्गाच्या मंगलकार्यात आड येतो अशी त्याची ठाम कल्पना आहे. सर्वकल्याणकारी निसर्गाने अशी अभद्र मनुष्यजात जन्माला घातलीच का? आणि तिचेच वर्चस्व प्रस्थापित होऊ दिले कसे? असले तार्किक प्रश्न निसर्गवाद्यांच्या भावविश्वात सामावत नाहीत.
निसर्ग सदाच कल्याणकारी असतोच असे नाही. निसर्ग प्रकृतीने संख्याशास्त्रीय आहे, तटस्था आहे. कधी त्याला वेसणही घालावी लागते. निसर्ग आणि माणसाचे शत्रुत्व नाही. एकाच कुटुंबातील स्त्री-पुरुषांसारखे त्यांचे नाते आहे. नवरा-बायकोत तरी सदसर्वकाळ गोडीगुलाबी आणि चांदणी रात्र असते असे थोडेच आहे!
अर्थकारण टाळता येत नाही
निसर्गशेतीच्या पंढरपूरच्या वारीत धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी हौशा-नवशा-गवश्यांप्रमाणे घुसले आहेत, त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी सावध राहणे महत्त्वाचे आहे.
घाट्यातील शेती
रासायनिक शेतीच्या अनुभवाने शेतकरी पोळला आहे, भांबावला आहे. त्याला आपल्या नादी लावण्याच्या प्रयत्न करणारे अनेक आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे; पण मग शेतकऱ्यांनी मार्ग घ्यावा कोणता? या प्रश्नाकडे वळण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा मांडणे आवश्यक आहे. निसर्गशेतीकडे वळलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव एकसारखा आहे. रसायनांमुळे त्यांचे उत्पादन घटत चालले होते, जमिनीचा कस उतरत होता याची जाणीव त्यांना निसर्गशेतीची सुरुवात केल्यानंतर झाली. रासायनिक शेती करत असताना ही शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही हे त्यांना सगळ्यांना उमजले होते आणि या जाणिवेतूनच त्यांनी परिवर्तन घडवून आणण्याची धडपड सुरू केली. शेतीतील घाट्याचे कारण रासायनिक तंत्रज्ञान होते काय? डंकेल प्रस्ताव आणि गॅट करार यांच्यासंबंधात हिंदुस्थान सरकारने जे दस्तावेज जिनिव्हात सादर केले त्यावरून आता एक गोष्ट स्पष्ट झाली, की हिंदुस्थानातील शेतकऱ्यांवर सरकारने जाणीवपूर्वक किमान ६९ टक्क्यांची (-) उणे सबसिडी लादलेली होती. शाश्वत शेतीचा उद्घोष करणाऱ्यांनी, शेतीप्रश्नातील सर्व काही आपणाला समजले, उमजले आहे असा डौल मिरवणाऱ्या लोकांनी सरकारच्या या धोरणाविषयी आपले तोंड कधी का उघडले नाही? याचा जबाब देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आव आणून पुढे येणाऱ्या सगळ्या विद्वानांना, शास्त्रज्ञांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी खडसावून विचारले पाहिजे, 'सरकार ठरवून सवरून ७० टक्क्यांनी आजपर्यंत आम्हाला लुटत आले याविषयी तुम्ही एक वाक्य बोलला नाही, शेतकऱ्यांना सबसिडीचा मोठा फायदा मिळतो,
त्यांच्या मिळकतीवर करदेखील नाही बघा हो! अशी आमच्या दारिद्र्याच्या दुःखावर डागण्या देणारी भाषा चौफेर बोलली जात असताना तुम्ही तिचा रतिमात्र विरोध केला नाही, का ते सांगा? अन्यथा, तुमच्या आतड्यात शेतकऱ्यांविषयी तिळमात्र कणव, कळकळ आहे यावर आमचा विश्वास बसूच शकत नाही, असे खडसावून सांगितले पाहिजे.
डंकेलवर सही झाली; पण म्हणजे शेतकऱ्यांच्या लुटीचे धोरण सरकार सोडून देणार आहे असे अजिबात नाही. शेतकऱ्यांनी बाजारात निविष्ठा खरीदण्याऐवजी आणि बाजारात माल विकण्याऐवजी स्वावलंबी आणि स्वयंभू निसर्गशेती केली म्हणजे शेतकऱ्याची लूट आपोआप थांबेल ही कल्पनाही चुकीची आहे. भारतीय संविधानात ९ वे परिशिष्ट घालून स्वत:च्या जमिनीच्या बचावासाठी शेतकऱ्यांना न्यायालयाची पायरी चढण्याची मुभा न ठेवणारे सरकार निसर्गशेतकऱ्याच्या शेतावर उतरून माल उचलून घेऊन जाण्यास कचरेल अशा भोळ्याभाबड्या आशेने नैसर्गिक शेतीकडे वळत असाल तर ती आशा खोटी आहे.
गच्चीवरील शेतीचे अर्थकारण
निसर्गवाद्यांतील भली भली माणसे शेतीच्या अर्थकारणाचा प्रश्न दुय्यम आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतात; आपण विज्ञानवादी आहोत, प्रयोगवादी आहोत असा घोष चालू असतानाच 'गच्चीवरील शेती' किंवा 'अर्ध्या गुंठ्यात एका कुटुंबाचे पोषण' असल्या कल्पना मांडताना हिशेबात हातचलाखी करून धोका देतात. एक पिशवीभर केरकचरा, उष्टेमाष्टे, शेण, कुजलेले पदार्थ एकत्र केले तर खर्च काहीच नाही; पण त्यातून कुटुंबाला पुरतील इतकी केळी, आंबे उत्पादन करता येतात या युक्तिवादातली हातचलाखी उघड आहे. बिनखर्चाने पोतेभर कुजलेले पदार्थ जमा करणे फारसे कठीण नाही; पण प्रत्येक शेतकऱ्याने अशी ५० पोती जमा करायची म्हटले तर स्वयंपाकघरातील उष्टेमाष्टेसुद्धा दुर्मिळ होईल आणि चढ्या किमतीने ते विकत घ्यावे लागेल. एका वेलीवरचा वनस्पतिशास्त्रीय प्रयोग लाखो वेलींना लागू पडतो; पण एका वेलीचे अर्थशास्त्र आणि २०० वेलींचे अर्थशास्त्र यात जमीनअस्मानचा फरक असतो.
दोन गुंठे वांगी
असाच नजरबंदीचा खेळ बिहारमध्ये काही मंडळींनी केला. कोरडवाहू जमिनीत २ गुंठे वांगी पिकवली आणि त्याच्या आधाराने एकरी साडेतीन लाख रुपये फायदा होऊ शकतो असा दावा मांडला. निसर्गशेतीचे प्रयोग करताना अर्थशास्त्राच्या नियमातून आपण सुटून जाणार आहोत अशी कल्पना कोणाही निसर्ग शेतकऱ्याने ठेवू नये.
एवढे सगळे सांगितल्यानंतर तरीही आता मी म्हणेन की, तीस वर्षांपूर्वी रासायनिक शेतीला पर्याय नव्हता. रासायनिक शेतीने जहाज ते रेशन दुकान ही परिस्थिती संपवली. आता काही फुरसत मिळाली आहे, उसंत मिळाली आहे, संकट टळले आहे, आता काही नवा मार्ग शोधण्याच्या कामास लागले पाहिजे.
सम्यक पातळीवर निसर्गशेती
स्वातंत्र्यानंतर अधिक धान्य पिकवा मोहीम हाती घेतली गेली. धान्य तर अधिक पिकवायचे, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची लूटही करायची, शेतीत भांडवल निर्मिती होणार नाही अशी व्यवस्था राबवायची हे सरकारी धोरण अमलात आणण्याकरिता पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्या काळात जमिनीचा तिसरा भाग तरी पाळीपाळीने पडीक ठेवण्याची पद्धत होती, ती संपली. जैविक खतांसाठी जमिनीचा एक मोठा भाग राखून ठेवला जात असे, ती पद्धत बंद करून त्याही वावरांत शेती करायची असेल तर बाहेरून रासायनिक खते आणून टाकण्याखेरीज काही पर्यायच नव्हता. व्यापक प्रमाणावर निसर्गशेतीकडे वळायचे असेल तर आजच्या शेतजमिनीपैकी तिसरा भाग वने, कुरणे यांच्या वाढीसाठी नांगराखालून काढून घ्यावा लागेल. त्याचे आर्थिक परिणाम काय होतील, शेतीच्या स्तरावर काय होतील आणि देशाच्या स्तरावर काय होतील याचा अभ्यास झाला पाहिजे.
फळबागांच्या शेतीत झाडांच्या मधल्या जागेत उगवणाऱ्या पालापाचोळ्याने फळझाडांची खतांची पुष्कळशी गरज भागून जाते. धान्ये, कडधान्ये यांच्या शेतीत अशी काही शक्यता नाही. मग जैविक शेतीकडे वाटचाल करताना अन्नधान्य आणि कडधान्य यांच्या उत्पादनाकडे बऱ्याच अंशी पाठ फिरवणे अपरिहार्य होईल. हा मुद्दाही दृष्टीआड होता कामा नये.
सध्याची सर्व जैविक उत्पादने मलमूत्रादी उत्सर्जने पूर्णपणे वापरली तरी नत्र व स्फुरदाच्या आवश्यकतेची २० टक्केही पूर्ती संभव नाही असे काही तज्ज्ञ म्हणतात.
उत्पादकतेची हरती शर्यत
रासायनिक शेतीतील उत्पादनाइतकेच उत्पादन नैसर्गिक शेतीत होते असे मला अनेकांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. फारशा तपशिलात न जाता हा मुद्दा मान्य करण्यास मी तयार आहे; पण नैसर्गिक शेतीतील काही अतिरेकी, संकरित वाणाचे बियाणेसुद्धा स्वीकारण्यास तयार होत नाही. जैविक अभियांत्रिकीच्या नव्या युगात तयार होणाऱ्या नवीन वाणांच्या बाबतीत अशी स्पर्धा करणे निसर्गशेतकऱ्यांना शक्य होणार नाही. उत्पादनात पाच-पाच, दहा-दहा पटीचा फरक पडू लागला. त्याबरोबर नेमका पाहिजे त्या गुणवत्तेचा माल जैविक अभियांत्रिकीने तयार करता येऊ लागला तर नैसर्गिक शेतीस बाजारात टिकाव धरणे दुष्कर होईल.
विज्ञानाचा पर्याय
अन्नधान्याच्या स्वावलंबनाने काहीशी फुरसत मिळाली आहे. रसायनांवर मर्यादेबाहेर निर्भर राहण्याचे कटू परिणाम समजले आहेत. शेतकऱ्यांना लुटणारी 'नेहरू व्यवस्था' संपण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत एका नव्या शेती तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. नवे तंत्रज्ञान विद्यापीठातून येण्याची शक्यता नाही. मोठमोठ्या कंपन्या त्यांची उत्पादने खपवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचा वापर हेच उच्च तंत्रज्ञान असे भासवतील. शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. गंडादोरे विकणारे मांत्रिक, तांत्रिक, धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी शेतकऱ्याला घेरतील. कुणी त्याला सुबाभुळीचे बी विकेल, कुणी गांडुळे. या सगळ्यांपासून दूर राहून शेतकऱ्यांनी विज्ञानशेती करण्याची गरज आहे. विज्ञानशेती निसर्गशेती असेल किंवा नसेलही; आग्रह बुद्धी, अनुभव आणि तर्क यांच्या वापराचा पाहिजे. रसायनांचा आग्रह नको गोमूत्राचाही
नको.
विज्ञान कोणा व्यक्तीस प्रमाण मानत नाही, कोणा ग्रंथासही प्रमाण मानत नाही; कोणा एका विचारप्रणालीलाही विज्ञान सदासर्वकाळ प्रमाण मानत नाही. सकल इंद्रियांचा जागरूकतेने वापर करून भोवतालचे जग कालच्यापेक्षा आज अधिक समजून घ्यावे; कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ज्ञानाचे कण परिश्रमपूर्वक वेचावे आणि तरीही आपल्या निष्कर्षांबद्दल शंका बाळगावी विज्ञानाची प्रकृती आहे. पुरावा थोडा, श्रद्धा मात्र मोठ्या दाट हा धर्मवाद्यांचा स्वभाव. निसर्गशेतीच्या भक्तांनी विनाआधार श्रद्धा जोपासण्याचा मोह टाळला पाहिजे. विज्ञाननिष्ठेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्ञान हे पुढे जाणारे असते. मनुष्याची प्रगती होत आहे. भूतकाळात मागे जाऊन प्रगती होत नाही. रसायनांनी झटका दिला म्हणून पुन्हा एकदा खताच्या खड्ड्यात जाऊन बसले यात शहाणपण नाही.
संचित अनुभवांची 'सीताशेती'
जगभरच्या विज्ञानाच्या अफाट प्रगतीत भारतीय शेतकऱ्याचा पाय टिकेल काय ? 'नेहरू व्यवस्थे'त संशोधनाच्या चोरीला प्रतिष्ठा आली, परदेशी पुस्तक नकलणारे शास्त्रज्ञ ठरले. नियोजन व्यवस्थेत आम जनतेचा प्रगत तंत्रज्ञानाशी संपर्क विद्यापीठातील विद्वान आणि पंडित यांच्या माध्यमातूनच शक्य होतो. इतकी वर्षे सरकार ठरवेल तेवढीच परदेशी संशोधनाची फळे लोकांपर्यंत पोचण्याची मुभा. खुल्या व्यवस्थेत आता शास्त्रीय प्रगती तुकाराम ग्यानबाच्या डोळ्यांर्यंत येणार आहे. पाश्चिमात्य पद्धतीच्या संशोधनाची त्याची अजूनही
औकात तयार व्हायची आहे.
पण पिढ्यान्पिढ्यांच्या संचित अनुभवांचा त्याला मोठा आधार आहे. गावोगाव, घरोघरी कितीतरी अनुभवांच्या गोष्टी सांगितल्या जातात. झेंडूची फुले लावल्याने मिरचीवर रोग पडत नाही. तांबडा राजगिरा पेरला तर लव्हाळा हटतो, असा संशोधनाचा कच्चा माल आमच्याकडे उदंड आहे. या साऱ्या समजुती प्रयोगाने तपासून पाहाव्या लागतील. प्रयोगशीलतेतून शेतीचे नवे विज्ञान आणि तंत्रज्ञान निघणार आहे; अंधश्रद्धेकडे जाऊन नाही.
भविष्य मागे नाही, पुढे आहे
शेती तंत्रज्ञानाची पुढील दिशा कशी असेल? मी एक विज्ञानकथांतल्या प्रमाणे स्वप्नरम्य कल्पना मांडतो. त्याने कल्पना स्पष्ट होईल. रसायनांचा जमिनीवर, पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो तो असंतुलित आणि वारेमाप वापराने. झाडांना गरज असते एक कणाची, आपण फवारतो दहा मण. दोष रसायनांचा नाही, अतिरेकी वापराचा आहे. वारेमाप वापर होतो, कारण झाडाची नेमकी गरज काय हे आम्हाला समजत नाही. अवकाश संशोधनाने आज हे तंत्रज्ञान माणसाला उपलब्ध होते आहे. झाडाला नेमकी पोषक द्रव्ये कोणती हवी, औषधांचा डोस किती हवा याचे अचूक मोजमाप गणकयंत्रावर मिळाले तर रसायनांची पुष्कळशी नासधूस उधळपट्टी थांबेल आणि रासायनिक शेतीचे भयानक परिणाम पुष्कळसे सुसह्य होतील.
या पलीकडे जाऊन वनस्पतींना पोषकद्रव्ये आणि औषधे नेमक्या आणि मोजक्या प्रमाणात देण्याची काही युक्ती सापडली तर माझी खात्री आहे, येत्या पंधरा-वीस वर्षांत एका काळी शेतकरी झाडांवर औषधांचा फवारा मारून झाडे न्हाऊन काढत होता या कल्पनेने लोकांना हसू येईल. माणसाला गोळ्यांनी, सुई टोचून किंवा शिरेवाटे सर्व पदार्थ पोचवता येतात तशी काही युक्ती वनस्पतींच्या बाबतीत शोधली गेली तर कदाचित एका गावात वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर सर्व देशाची शेती होऊ शकेल. रसायनांच्या भयानक परिणामांवर तोड अशा वैज्ञानिक प्रगतीने निघेल, जुन्या काळात परत जाऊन नाही.
रसायनांचा असंतुलित व अतिरेकी वापर हा जमिनीकरिता विनाशकारक, शेतकऱ्याला तोटा देणारा आणि ग्राहकालाही अनिष्ट ही गोष्ट खरी; पण याचा अर्थ शेतकऱ्यांनी स्वयंभू किंवा स्वावलंबी खेड्यांमध्ये बिगरव्यापारी शेतीकडे वळायचे आहे, असे नाही.
इतिहासाच्या निर्णायक पायरीवर शेतकरी
तीन हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला ; शेतकऱ्यांच्या खळ्यावर धान्याची रास जमू लागली; पोटापाण्याच्या दंडबेड्यांतून मनुष्यप्राण्याची सुटका होईल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी, 'स्वातंत्र्याच्या कक्षा' विस्तारण्यासाठी तो मोकळा होईल अशी अशा वाटत होती, ती आशा खोटी ठरली. शेतीतील वरकड उत्पन्नाची लूट चालू झाली ती आजतागायत चालू राहिली. लुटारू आले, राजेमहाराजे आले, सावकार, जमीनदार आले, गोरे इंग्रज आले, काळे इंग्रज आले, शेतीची लूट चालू राहिली. शेतीच्या लुटीचे युग संपत आले आहे. मॉस्कोचा पाडाव झाला आहे. नेहरूवाद मिटला आहे. जगभर व्यक्तिगत आर्थिक प्रेरणांचे महत्त्व मानले जात आहे.
सर्वसामान्यांना काही समजत नाही; आम्ही दुढ्ढाचार्य सांगू त्याप्रमाणे त्यांनी करावे; त्यातच त्यांचे कल्याण आहे असे उद्घोषणाऱ्या 'प्रेषितां'चा पराभव झाला आहे. नियोजन मंडळात नाही, बाजारपेठेतच सर्वोत्तम निर्णय होतात. छोटी छोटी माणसे आपापल्या कच्च्याबच्च्यांच्याकरिता धडपड करता करता साऱ्या जगाचे कल्याण साधतात. ब्रह्माचे हित आणि पिंडाचे हित एकच आहे, त्यांत तफावत नाही या अद्वैताचा विजय होतो आहे.
हिंदुस्थानातही एक नवा शेतकरी उदयाला येतो आहे. शेती ही त्याची जीवनशैली नाही; त्याचा व्यवसाय आहे. तो केवळ शेतकरी नाही; व्यापारीही नाही; तो सर्वार्थाने उद्योजक आहे. डोळे सताड उघडे ठेवून तो आपली उद्योजकता गाजवणार आहे. रासायनिक शेतीचे त्याला प्रेम नाही. तिला घाबरून धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी आणि इतर हौसे गवसे नवसे यांच्या कच्छपिला तो जाणार नाही. त्याचा शोध विज्ञानाचा असेल, त्याचे निष्कर्ष प्रयोगाने ठरतील. उद्योजक शेतकऱ्याची शेती विज्ञानशेती असेल. जगभर विज्ञान, विशेषत: जैविकशास्त्रे हनुमान झेपा घेत उंचावत आहे. उद्योजक शेतकऱ्याचा आधार हे विज्ञान आहे. निसर्गशेती, जैविक शेती, पर्यावरण शेती इत्यादी इत्यादी पद्धती विज्ञान स्वीकारतील आणि अर्थकारण मानतील तितक्याच प्रमाणात उद्याच्या उद्योजक शेतकऱ्याला मान्य होतील अन्यथा नाही.
(शेतकरी संघटक, २१ एप्रिल १९९४)
■