बस करा हे समाजसेवेचे ढोंग!
बस करा हे समाजसेवेचे ढोंग!
'अंतर्नाद'च्या १९९९ च्या दिवाळी अंकासाठी 'स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान' या विषयावर मी लिहावे अशी विनंती भानू काळे यांनी मला तीन-एक महिन्यांपूर्वी केली होती. माझी प्रकृती, निवडणुकीची धामधूम, वेगवेगळे दौरे यांमुळे हे लेखन मागे पडत गेले.आता अंकछपाईला द्यायची वेळ आली असल्याने हे काम मला हाती घ्यावेच लागले.
खरे सांगायचे तर, हे काम मागे पडायचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे या विषयावरील माझी मते इतकी धक्कादायक आहेत, की अंतर्नादच्या संपादकांना, तसेच अंकाच्या वाचकांनाही ती कितपत भावतील याविषयी मी साशंक आहे. असो.
"स्वयंस्फूर्त कार्य याचा अर्थ या अंकापूरता सामाजिक कार्य किंवा सेवाकार्य असा घ्यावा, इग्रजीतील Voluntary work या अर्थाने येथे स्वयंस्फूर्त कार्य हा शब्दप्रयोग योजलेला आहे."असा खुलासा संपादकांनी केलेला आहे. अशा अर्थाने केल्या जाणाऱ्या स्वयंस्फूर्त कार्याची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ मी यापुढे जे लिहिणार आहे, त्यातील काही विचार मी अन्य संदर्भात इतरत्रही अधूनमधून व्यक्त केलेले आहेत, तर काही विचार मी या ठिकाणी प्रथमच मांडत आहे. मुळात या विषयावर एकत्रितरीत्या माझे विचार मी प्रथमच मांडत आहे. तरीही हा विषय तसा माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचाही आहे.
ज्याला आपण स्वयंस्फूर्त कार्य म्हणतो अशा प्रकारच्या सर्व कार्यांमागील दृष्टिकोन महाभारतातील पुढील श्लोकात व्यक्त केला गेला आहे.
न त्वहं कामये राज्यम् न स्वर्गम् नापुनर्भवम्
कामये दु:खतप्तानां प्राणिनाम आर्तिनाशनम् ॥
(मला राज्य, स्वर्ग, मोक्ष हे काही नको. दुःखाने तप्त अशा प्राणिमात्रांचे आर्ति म्हणजे संकट वा दु:ख दूर करणे एवढीच माझी कामना आहे.)
या दृष्टिकोनातून काही कार्य करणे हे मला अजिबात न पटणारे आहे. त्यामुळे या सर्व स्वयंस्फूर्त कार्याला माझा तत्त्वश:च विरोध आहे, परंतु त्यापूर्वी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या स्वयंस्फूर्त कार्याचा आपण जरा थोडक्यात आढावा घेऊ.
बरेच स्वयंस्फूर्त कार्य आज पर्यावरणाच्या क्षेत्रात चालू आहे. सामान्यत: या मंडळींचा मोठी धरणं बांधायला विरोध असतो. अनेक बडी बडी मंडळी या प्रश्नावर आपला आवाजउठवताना दिसतात. त्यांची मूळ भूमिकाच मला चुकीची वाटते. या देशातील शेतीचे प्रश्न मिटायचे असतील, अगदी प्यायच्या पाण्याचा प्रश्नही मिटायचा असेल, तर त्यासाठी अशी मोठी धरणे बांधणे अपरिहार्य आहे. असे असतानासुद्धा दोन-चार व्यक्ती केवळ आपले नाव दुमदुमत राहावे, आपला लौकिक वाढावा, या एकमेव भूमिकेतून या आंदोलनांमध्ये अग्रभागी असलेल्या दिसतात. सर्व प्रसारमध्यमांमधून या मंडळींना, त्यांच्यामागे फारसा जनाधार नसतानाही, अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. मी नुकताच तीन आठवडे गुजरातेत राहून आलो. आठ-दहा दिवसांनी परत मी तिकडेच जाणार आहे. तिथल्या, विशेषत: सौराष्ट्रातील, जनतेचे पाण्याविना चाललेले हाल मी स्वत: पाहिले आहेत. राज्यातल्या तमाम जनतेकडे दुर्लक्ष करून काही संधिसाधू समाजकार्यकर्ते धरणविरोधी भूमिका घेत आहेत. मूठभर माणसांनी सगळ्या समाजाला वेठीस धरण्यातला हा प्रकार आहे. या मंडळींच्या हुशारीचे तसे कौतुक करावेसे वाटते! स्वत:ला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून आंदोलन छेडताना, आपल्याला केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही भरपूर प्रसिद्धी मिळेल, असेच क्षेत्र यांनी आंदोलनासाठी निवडले.धरणांना विरोध करणारी एक मोठी लॉबी आज जगभर कार्यरत आहे. या आंदोलकांना या लॉबीचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे.
स्वयंस्फूर्त कार्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे अंधश्रद्धानिर्मूलन. अंधश्रद्धा ही नेहमीच भोवतालच्या वास्तवाशी निगडित असते. अनिश्चितता आणि अज्ञान यांतून ती जन्माला येते. हे वास्तव बदलल्याशिवाय, केवळ आंदोलन करून ती दूर होईल असे समजणे, हीच मोठी अंधश्रद्धा आहे. नुसत्या शिक्षणाचा प्रसारही यासाठी पुरेसा नाही. तसे असते तर देशातील असंख्य बाबा-महाराजांसमोर आज जी उद्योजकांची, शास्त्रज्ञांची, पदवीधरांची गर्दी दिसते ती दिसली नसती.
देशातील बहुसंख्य समाज हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सर्व श्रद्धा शेतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे विज्ञाननिष्ठा शेतकऱ्यांच्या अंगी बाणूच शकत नाही. शेतातले पीक आणि परिणामत: कच्च्याबच्च्यांचे जीवनच पावसाच्या पडण्यावर वा न पडण्यावर अवलंबून आहे. या जाणिवेमुळे विज्ञाननिष्ठा त्याच्या बुद्धीला पटली तरी मनाला पटू शकणार नाही. आधुनिक औषधोपचार जवळपास उपलब्ध नाहीत, असले तरी परवडत नाहीत, म्हणून तर त्याला जवळ असेल त्या वैदू-भोंदूचे औषधपाणी करावे लागते. आपल्या प्रियजनांना यातले उत्तमातले उत्तम औषधपाणी करणे आपल्याला जमले नाही, ही मनाला घरे पाडणारी जाणीव विसरण्यासाठीवैदू-भोंदूच्या प्रभावाच्या कथा रचाव्या लागतात आणि स्वत:लाही त्यावर विश्वास ठेवावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पीकबुडीपासून शेतकऱ्याला संरक्षण मिळेल, म्हणजे वास्तविक उत्पादनखर्च भरून निघण्याची शाश्वती मिळेल, त्या दिवशी या शेतकऱ्याला विज्ञाननिष्ठा शिकण्याची गरजच राहणार नाही.
बरेच स्वयंस्फूर्त कार्यकर्ते हिंदुत्ववादी वा राष्ट्रवादी चळवळीत काम करताना दिसतात. आपला देश हे एक राष्ट्र आहे ही भावना जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, तरीही अनेक विघटनवादी शक्ती देशात आढळतात.
देशात अशी फुटाफूट का झाली? ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक जातीजमातीतल्या भर उमेदीतल्या तरुणांनी हसत हसत मरणालादेखील कवटाळले त्या देशातल्या तरुणांच्या मनातील देशभक्ती एकदम आटून गेली कशी? पाकिस्तानबरोबरच्या लढायांत चारचार वेळा इतर जवानांच्या बरोबरीने लढणारा शीख तरुण सगळ्या 'हिंदुस्थान' बद्दल एकदम एवढ्या चिडीने का बोलू लागला? भारतीय लष्करात परम शौर्य गाजवणारे गुरखे एकदम एवढे नाराज का झाले? मुस्लिम जमातीचा प्रश्न आणि दलितांचा प्रश्न पेटतच का राहिला?
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडवणे खरोखरच बिकट आहे. मुसलमान जमातीचे काही मूठभर नेते शहरात राहतात, व्यापार-धंदा करतात आणि त्यांतील काही चांगले धनाढ्यही आहेत; पण सर्वसाधारण मुसलमान दलितांपेक्षाही दलित आहेत. खरे सांगायचे तर त्यांच्यातील अनेकांचे पूर्वज भणंग दारिद्यामुळेच धर्मांतराकडे वळले. धर्म बदलल्याने आर्थिक हलाखी संपली नाही; पण इस्लामने थोड्या प्रमाणात 'माणूस' म्हणून मान आणि अभिमान दिला. गावातला मुलाणी, छोटा शेतकरी, कारागीर, विणकर, रिक्षावाले आणि छोट्यामोठ्या कारखान्यांत काम करणारा असंघटित मजूर हे भारतातल्या मुसलमानांचे प्रातिनिधिक चित्र आहे. दलितांना मिळणाऱ्या सोयीसवलतीही त्यांना नाहीत. बहुसंख्यक समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. संशयातून दुरावा तयार होतो आणि त्यातून पुन्हा संशय- अशा दुष्टचक्रामुळे दोन समाजांत एक अक्राळविक्राळ दरी सतत रुंदावते आहे.
भूमिहीन शेतकऱ्यांचे आणि छोट्या कारागिरांचे प्रश्न सुटल्याखेरीज सर्वसामान्य मुसलमानाच्या मनातील असुरक्षिततेची आणि कोंडले गेल्याची भावना दूर होणे कठीण आहे. मग तो सहजपणे विकासापेक्षा 'आखिरात' जास्त महत्त्वाची आहे असे निकराने सांगू लागतो. या वातावरणाचा फायदा त्यांचे शहरी पुढारी घेतात. परिणामत:,स्वातंत्र्याच्या एखाद्या तरी प्रकाशकिरणाकरिता मनात आक्रंदणाऱ्या मुसलमान मायबहिणीसुद्धा 'शरियत'चे समर्थन करू लागतात. मुस्लिम समाजाचे अर्थकारण करणारा नेता जन्मलाच नाही, हे मोठे दुर्दैव आहे.
दलितांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. हिंदू समाजापासूनची त्यांची फारकत काही बाबतीत थोडी कमी, तर काही बाबतीत पुष्कळ जास्त. गावच्या वतनदार महाराला चावडीसमोर कमरेत वाकून जावे लागे; पण तोच मुसलमान बनला तर जोडे घालून थेट चावडीपर्यंत जाऊ शके. मीनाक्षीपुरमचा हाच धडा आहे. इस्लामने त्याच्या आश्रयाला आलेल्यांना काही प्रमाणात सन्मान दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे बुद्धाला शरण गेलेल्यांना तशा सन्मानाचे भाग्यही मिळाले नाही. दलितांत फारसे कुणी मोठे व्यापारी, कारखानदारही नाही. समाजाचे नेतृत्व राजकीय सत्तेच्या काही दलालांकडे आणि राखीव जागेच्या धोरणाचा फायदा मिळालेल्या काही भाग्यवानांकडे. मुस्लिम नेतृत्वाप्रमाणेच दलित नेतृत्वालासुद्धा चिंता आहे ती दलितत्व संपवण्याची नाही, तर आपले नेतृत्व टिकवण्याची.
आजपर्यंत शेतकरी संघटनेमध्ये मला जो अनुभव आला, त्यावरून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, की या देशातील सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेही जातीयवाद नाही, भाषावाद नाही, धर्मवाद नाही. हे सर्व क्षुद्रवाद स्वार्थी राजकारण्यांनी केवळ जोपासून ठेवले आहेत. सर तर यापैकी एकही भांडण झाले नसते. आपल्या देशातले एखादे राज्य म्हणते, की आम्हाला फुटून जायचे आहे. अमेरिकेतले एखादे संस्थान असे म्हणते का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसे आहेत; अनेक राज्यांची आहेत; पण तिथे असे कुणी म्हणत नाही. उलट, अमेरिकेतील संस्थान असणे ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही, कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही.
समजलेले सारेच चूक आहे असे ध्यानात येईल तर तेही मानायची माझी तयारी आहे. प्रत्यक्ष अनुभवाने, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने जग समजण्याची पराकाष्ठा करणारा मी एक यात्रिक आहे.
माझ्यासारखा माणूस कोणत्याही धर्मात चालण्यासारखा नाही. प्रत्येक धर्माची एक पोथी असते, एक प्रेषित असतो आणि त्याने मांडलेली आचारविचारांची एक नैतिकता असते. ज्या काळात पोथी लिहिली गेली, तो काळ सगळा बदलला तरी प्रेषितांचे उत्तराधिकारी त्याच आचरणनियमांचा आग्रह धरतात. यहुदी, खिस्ती, मुसलमान हे असे बांधीव धर्म आहेत. त्यांच्यात माझ्यासारख्या यात्रिकाला जागा नाही.
पण माझ्यासारखा यात्रिक हिंदू राहू शकतो. नरबलींनी चामुंडा मातेला प्रसन्न करू पाहणाऱ्या अघोर भक्तापासून, श्वासोच्छ्वासात जंतू तर मरत नाहीत ना अशी चिंता बाळगणाऱ्या साधूंपर्यंत कोणीही हिंदू असू शकतो. कारण, हजारो वर्षे हिंदू हा शब्द एका खुल्या प्रयोगशाळेचे नाव आहे. हिंदू हा बंधने घालणारा बांधीव धर्म नाही. हिंदू ही एक संस्कृती आहे.
मुसलमानी आक्रमण यशस्वी झाले, इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात प्रस्थापित झाले याची एक प्रतिक्रिया आत्मपरीक्षणाची होती. हिंदू समाजातील दोष काय, त्यातील अन्याय कोणते यांचा विचार करून असे सारे अनाचार दूर करावे अशी मांडणी जोतिबा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींनी समाजावर आसूड उडवून, लोकनिंदेची कदर न करता केली. दुसरी एक प्रतिक्रिया अगदी वेगळ्या टोकाची. हिंदू धर्मात आणि संस्कृतीत दोष असे काहीच नाहीत, चक्रनेमिक्रमाने आपले गाडगे सध्या खाली आले आहे, ते यथावकाश वर जाईल; इतिहासातून धडा घ्यायचा असला तर तो एवढाच, की पिंड आणि ब्रह्मांड यांचे अद्वैत मानून आराधनेचे मार्ग व्यक्तिनिष्ठ न ठेवता सामूहिक करावेत आणि ब्रह्म आणि जीवात्मा यांच्यामध्ये एक 'राष्ट्र' नावाची जाणीव तयार करावी अशी मांडणी विवेकानंदांपासून ते गोळवलकर गुरुजी, सावरकर ते थेट आजचे विश्व हिंदू परिषदेचे नेते यांनी केली.
तरी हिंदू समाज अविचलित राहिला. जातीय दंगली झाल्या, पाकिस्तान झाले, अनुनयाचे राजकारण झाले, हिंदू प्रतिशोधाचेही राजकारण झाले तरीही हिंदुबहुसंख्य देशात मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि रोमन कॅथॉलिक महिला राज्यकर्त्यापक्षाची अध्यक्षा हे फक्त हिंदू बहुसंख्य देशातच संभवते. असे उदाहरण जगात इतरत्र कोठेही दिसणार नाही.आज हिंदुत्वाचा झेंडा घेऊन नाचणारे खरे म्हटले तर हिंदुत्वाला छोटे करू पाहत आहेत, निव्वळ धर्माचे स्वरूप देऊ पाहत आहेत.
बरेच हिंदुत्वावादी स्वदेशीच्या प्रचारासाठी काम करीत असतात. वस्तुस्थिती अशी आहे, की आपण जर परदेशी मालावर बंदी घातली तर जगातील इतर देश हिंदुस्थानशी एकतर्फी व्यापार थोडाच चालू देणार आहेत? आपण बंधने लादली तर तेही लादतील आणि थोड्याच काळात हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय व्यापार संपुष्टात येईल. मग प्रश्न असा उभा राहतो, की जगाला आपली गरज जास्त की आपल्याला जगाची गरज जास्त? हिंदुस्थानकडून एक पैशाचाही माल न घेतल्याने जगाचे काहीही बिघडणार नाही; पण परदेशांशी संबंध तोडल्यास तीन महिनेदेखील रेटणे हिंदुस्थानी उद्योगधंद्यांना अशक्य होईल.
कोणी म्हणते, पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी आली आणि देशावर अंमल बसवून गेली; नव्या बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच करतील. डॉन किक्झोटप्रमाणे मनाने मध्य युगात वावरणारी ही माणसे; आपले स्वातंत्र्य नकली आहे, तकलादू आहे; विलायती सत्तांचे सामर्थ्य इतके मोठे आहे, की लष्करी सत्ता मिळवण्याचे त्यांनी मनात आणले तर २४ तसात लाल किल्ल्यावर त्यांचा झेंडा फडकू शकतो; 'पाश्चिमात्यांना वसाहती नकोशा झाल्या म्हणून केवळ आपण स्वतंत्र आहोत,' ही दु:खद जाणीव स्वदेशीवाल्यांना नाही. ते आपले त्यांच्याच गुर्मीत राहतात. आजच्या अवस्थेतील हिंदुस्थान चालवण्यासाठी टेंडर काढले तर तर ते भरण्यासाठी साऱ्या जगात कोणीही पुढे येणार नाही; पैसा आणि रक्त खर्चून हिंदुस्थानावर सत्ता गाजवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
इतिहासाचे सार काढताना मग अशा बांधिलकीच्या विचारवंतांची त्रेधातिरपीट उडू. लागते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना 'सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती निव्वळ अधम अशा इंग्रजी व्यवस्थेपुढे का नमली' याचे उत्तर देण्यासाठी चक्रनेमीक्रमाने रहाटगाडग्याप्रमाणे इतिहासात वर गेलेले खाली येतात, खाली गेलेले यथाक्रम वर जातात, त्यासाठी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही, असे खास पुणेरी निदान मांडावे लागले.
मी स्वत:ला महात्मा फुल्यांचा पाईक समजतो. इतिहासाचा अर्थ सलगपणे, सुसूत्रपणे लावण्याचे पहिले काम महात्मा फुल्यांनी केले. अगदी विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडापर्यंत, 'शूद्रांची गुलामगिरी' या एकसूत्रात त्यांनी सर्व घटना गुंफून दाखवल्या. राष्ट्रवादी आघाडीची पर्वा न करता त्यांनी मोगालांना शूद्रांच्यामुक्तीचे श्रेय दिले आणि राष्ट्रवाद्यांच्या महापुरुषांवर कडाकड आसूड ओढले.
महात्मा जोतिबा फुल्यांच्या इतिहासमांडणीला संशोधनाचा वा कागदोपत्री साधनांचा आधार नव्हता. अशा तऱ्हेचा पुरावा पाच हजार वर्षांचा इतिहास लिहिणाऱ्याला मिळवणे शक्यही नव्हते. शूद्रांच्या गुलामगिरीच्या सूत्रावर प्रचंड प्रतिभेने इतिहासाचा एक प्रपंच त्यांनी उभा केला; पण विद्वन्मान्य इतिहासकारांत आज जोतिबांना काहीच मान्यता नाही.
स्वयंस्फूर्त कार्यातील बरीच मंडळी महिला आंदोलनात सहभागी आहेत. त्या महिला आंदोलनाची परिस्थिती काय आहे? जागोजागी भगिनीमंडळे, वनिता-समाज, स्त्रीसंघर्ष समित्या उगवतात आणि स्त्री-साहाय्याची काही जुजबी कामे करीत राहतात. स्वधर्मीयांकरिता, स्वजातीयांकरिता काही उपयोगी कामे करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे असे समजून लोक संस्था उभ्या करतात. जन्माच्या अपघाताने ज्या जातीत किंवा धर्मात आपण जन्मलो, त्याचा अभिमान तो काय बाळगायचा आणि आपल्या बुद्धीचा, कर्तबगारीचा आणि त्यागाचा लाभ एका मर्यादित समाजापुरताच संकुचित का ठेवायचा, हा प्रश्न अनेकांना पडतही नाही. निसर्गधर्माने ते आपल्या जन्मदात्या समाजाचा अभिमान बाळगतात आणि त्यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काहीतरी किडमीड कामे करत राहतात. बहुतेक स्त्रीसंस्था आणि स्त्रीनेत्या यांची परिस्थिती अशीच आहे. स्त्रीपुररुष संमिश्र समाजात आपल्या कर्तबगारीला पुरेसा वाव नाही अशी जाणीव झाली, की स्त्रिया महिला-चळवळीकडे वळतात; एखादा समाज, मंडळ किंवा समिती स्थापतात.
मोठमोठ्या मान्यवर महिला संघटनांत लब्धप्रतिष्ठित स्त्रियांनी महत्त्वाची सारी पदे अडवलेली असतात. कोणत्याही कार्यक्रमात मिरवायला त्यांनाच मिळते. नाव त्यांचेच होते. त्यामळे अशा संस्थांत नव्या उमेदीच्या कायकर्त्यांना आत शिरायला फारसा वाव नसतो. अनेकदा होते असे, की महिला संघटनांतील स्त्रीचे स्थान तिच्या नवऱ्याच्या समाजातील प्रतिष्ठेवर आणि आर्थिक सुसंपन्नतेवर अवलंबून असते. म्हणजे तर, कर्तृत्वाने नाव मिळविण्याचा, काही करून दाखविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तेव्हा जी ती स्त्री एक नवी पाटी लावून आपली एक संस्था उभी करू पाहते. एकेका शहरात दीडशेदोनशे महिला संस्था आपल्या नावांच्या पाट्या आणि नोंदणी क्रमांक मिरवीत उभ्या असतात.
अनेक घरांत नवराबायकोंचे, सासूसुनांचे, नणंदाभावजयांचे पटत नाही; काही ठिकाणीया वितुष्टांना मोठे विक्राळ स्वरूप येते. अशी अनेक प्रकरणे प्रत्येक समाजात, हर वस्तीत, दररोज घडतच असतात. असे काही घडले, की जवळपासच्या महिला संघटनांतील काही बाया असल्या प्रकरणांत लक्ष घालतात; नवविवाहित सुनेची बाजू न्याय्य आहे असे गृहीत धरून कामाला लागतात. पोलिसांत तक्रार नोंदवतात, मोर्चे काढतात, निदर्शने करतात. काही वेळा थोडेफार यश मिळते, बहुधा हाती फारसे काही लागतच नाही. अशा प्रकरणांचा पाठपुरावा करायचा म्हणजे मोठी ताकद, साधने, संयम आणि धैर्य लागते. एक प्रकरण निकालात निघण्याआधी दहा नवी प्रकरणे उभी राहतात. अगदी उत्साही, तळमळीच्या कार्यकर्त्यांचीही दमछाक होऊन जाते.
कौटुंबिक वितुष्टांची ही प्रकरणे स्त्रीचळवळीच्या विषयपत्रिकेवर असणे कितपत योग्य आहे? आत्महत्या असो, खून असो, शारीरिक छळाचा प्रश्न असो; ही सारी कृत्ये गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. दंडविधानात त्यासंबंधी यथायोग्य तरतुदी आहेत. असल्या प्रकरणांत जाणकार तज्ज्ञांनी बारकाईने तपास करणे महत्त्वाचे असते. असले तपास हे काही हौशागवशा कार्यकर्त्यांचे काम नव्हे.
खरे म्हणजे, असल्या प्रकरणांत महिला आंदोलनांचा काही संबंध नाही. स्त्रीवर जुलूम, अन्याय करणारे केवळ पुरुषच असतात असे नाही; बहुसंख्य प्रकरणी एका बाजूस सून तर दुसऱ्या बाजूस सासू आणि नणंद इत्यादी उभे ठाकलेले असतात. सून ही स्त्री खरी; पण सासू आणि नणंद याही स्त्रियाच.
असली प्रकरणे म्हणजे स्त्रीजातीवर इतरेजनांनी केलेला अत्याचार असे निखळपणे नसतेच आणि तरीही असल्या घरगुती प्रकरणांत महिला संघटना उत्साहाने लक्ष घालतात आणि आपली ताकद खच्ची करून घेतात.
यापलीकडे, काही मुखंडी स्त्रियांना आपल्या हाती मोठे शस्त्र आले असे वाटते आणि वॉशिंग्टनप्रमाणे ती कुऱ्हाड त्या चौफेर चालवू लागतात. यातून प्रकरणे वाढवण्यासाठी किंवा दबवण्यासाठी लाचलुचपतीची शक्यता तयार होते आणि अनेक वेळा स्त्रीकार्यकर्त्या आणि सबंध महिला चळवळच बदनाम होऊन जाते.
याखेरीज, स्त्रियांची वेगळी महिला बँक, स्त्रियांची वेगळी पतपेढी, स्त्रियांचा वेगळा साखर कारखाना असे अनेक क्षेत्रांत 'जनाना डब्बे' करण्यात अनेक संस्था गुंतल्या आहेत.
नवऱ्याने टाकून दिलेल्या, विधवा, कुमारी माता, अपंग स्त्रिया यांच्याकरिता शिक्षणाची सोय करणे, त्यांना काही आरोग्यसेवा देणे, त्यांच्या चरितार्थासाठी काही उद्योगधंद्यांचीसोय करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे अशा तऱ्हेची कामे करता येतात; पण गुजराथेतील ईला भट यांच्या सेवासंस्थेसारखे काही अपवाद सोडले तर इतरांना त्यांत फारसे यश मिळत नाही. अशा कामांना प्रचंड मेहनत, चिकाटी, व्यवस्थापन-कौशल्य आणि व्यवसायबुद्धी यांची गरज असते.
स्त्रियांचा प्रश्न हा अनेक संस्थांत, विश्वविद्यालयांत अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या परिषदा भरवणे, परिसंवाद घडवून आणणे हे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रचंड जोमाने चालू आहे. महिला कार्यकर्त्या राज्यपातळीवरील परिसंवादांत आधी मान्यता पावतात, मग हळूहळू राष्ट्रीय पातळीवर त्या परिसंवाद करू लागतात आणि शेवटची पायरी म्हणजे, वर्षातून दोनचार वेळा वेगवेगळ्या देशांत घडणाऱ्या परिसंवादांतील जागाही भूषवू लागतात. महिला-चळवळीतील कार्यकर्त्यांचे या दृष्टीने तीन संच बनतात; आगगाडीसंच, विमानसंच आणि जेटसंच! यातून स्त्रीप्रश्नाविषयीची खरी कळकळ ओसरू लागली, ती एक 'करिअर' बनली.
वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली कर्तबगारी दाखविणाऱ्या स्त्रिया होत्या. कोणी वकील होत्या, कोणी डॉक्टर; कोणी लष्करात जात होत्या तर कोणी वैमानिक बनत होत्या; कोणी साहसाची कामे करीत होत्या, तर कोणी कलाक्षेत्रात चमकत होत्या. अनेक उद्योजक महिलांनी कारखानदारी, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही आपल्या स्त्रीपणाचा कोणाताही आधार न घेता मोठी कामगिरी करून दाखवली. साऱ्या स्त्रीजातीस ललामभूत असलेल्या या दुर्गा स्त्री-चळवळीपासून दूर झाल्या आणि स्त्री-चळवळ वावदूक मुखंडींच्या हाती गेली.
खरे बघायला गेले तर स्त्रियांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न स्त्री-मुक्तीच्या चळवळीमुळे नव्हे तर इतर अनेक कारणांमुळे सुटलेले आहेत. उदाहरणार्थ, स्त्री-शिक्षणाला महर्षी कर्वे यांच्या कार्यामुळे जेवढी प्रेरणा मिळाली त्याहून जास्त प्रेरणा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आलेल्या रेशनिंगमुळे मिळाली. रेशनिंग खात्यात शिकलेल्या बायकांना नोकऱ्या मिळू लागल्या, या नोकऱ्यांमुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन बायांना प्रथमच उपलब्ध झाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर बायकांनी शिकायला सुरवात केली.
स्त्रियांचे जीवन सुखकर करण्यामध्ये सगळ्या चळवळीपेक्षा कितीतरी जास्त वाटा हा आधुनिक तंत्रज्ञानाने उचलला आहे. शिवण्याच्या यंत्रामुळे किंवा मिक्सरमुळे किंवा वॉशिंग मशीनमुळे सर्वसामान्य स्त्रीचे जीवन जितके सुकर झाले, तितके कुठल्याहीचळवळीमुळे कधीच झाले नसते.
तंत्रज्ञानाने एकूणच कुठल्याही चळवळीपेक्षा मानवी जीवनावर जास्त प्रभाव टाकलेला आहे; जास्त आनंद निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रातील द्राक्षे लंडन-पॅरिसमधील डायनिंग टेबलवर पोचली आहेत व त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घराततरी समृद्धी यायची शक्यता निर्माण झाली आहे, याचे एक कारण मालाची वाहतूक विमानाने करण्याची तंत्रज्ञानाचे केलेली सोय आणि याचे दुसरे कारण म्हणजे ही द्राक्षे खरेदी करणारे, 'मार्क्स ॲण्ड स्पेन्सर' यांसारखी सुपर मार्केटस्. "गरिबांसाठी मार्क्स आणि एंगल्स यांच्यापेक्षा कितीतरी जास्त कामगिरी मार्क्स ॲण्ड स्पेन्सर या दुकलीने केली," अशी टिप्पणी प्रख्यात व्यंगचित्रकार जॉर्ज निकत्से यांनी केली आहे.
साहित्यक्षेत्रातही थोडेफार स्वयंस्फूर्त कार्य सुरू असते. या क्षेत्राकडे बघितले तरी एकूण परिस्थिती केविलवाणीच असल्याचे दिसते. आमच्या शेतकरी संघटनेच्या कामामध्ये अक्षरश: लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदेलनाला काही स्थान मिळालेले नाही.
डाव्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्यामागे शेपाचशे माणसेसुद्धा नसली तरी, त्यांची कवने गाणाऱ्यांचा सुंदर ताफा त्यांच्यापुढे असतो. ज्यांच्या आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी, पोलिसांची जास्त त्या आंदोलनात प्रतिभेचा हा झरा खळाळून वाहताना दिसतो आणि प्रचंड आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेत, काही अपवाद वगळल्यास, साहित्य, कला, संगीत, शाहिरी, पोवाडे अशा मार्गांनी प्रतिभा दाखविणारे निपजले नाहीत. असे का झाले? एकदा एका कार्यकर्त्याने नानासाहेब गोऱ्यांना प्रश्न विचारला, "शेतकरी संघटना ही अशी रूक्ष, काव्य नसलेली का झाली?" ते म्हणाले, "शरद जोशी हा माणूसच गद्य आहे. त्यांनी जो अर्थशास्त्रीय विषय मांडला तोच रूक्ष आणि गद्य आहे. आंदोलनाचे साहित्य हे कधी अशा गद्य भाषेत तयार होत नाही. आंदोलनात काहीतरी डोक्यात मस्ती चढणारी, झिंग आणणारी गोष्ट असावी लागते. रामाच्या देवळाचे नाव घ्यावे लागते नसलेल्या गोष्टी तयार कराव्या लागतात, सामान्य माणसांचेसुद्धा पुतळे जागोजागी उभे करून त्यांना देवता बनवावे लागते. समाजाच्या हितसंबंधांबरोबरच काही एक पागलपणा केल्याखेरीज आजकाल खरे आंदोलन बनतच नाही आणि शरद जोशींना पागलपणा दाखवता येता नाही."
थोडेसे विषयांतर होते आहे, पण एका नामवंत समाजसेवकाचा एक अनुभव याठिकाणी मला सांगावासा वाटतो. यांच्या 'आदर्श गावाला' मी गेलो. "गावात कोणीही चित्रहार बघत नाही." गावकरी मला सांगू लागले. "का बरे?" मी विचारले. "नटनट्यांचे ते घाणेरडे चाळे काय बघायचे!" "पण एखाद्याला चित्रहार बघायची इच्छा असेल तर?" "तसा काही प्रश्नच उद्भवत नाही. चित्रहार पाहायचा नाही असा आदेशच आहे आम्हाला." हे सांगताना त्या गावकऱ्यांना मोठा अभिमान वाटत होता. हा आदेश कोणाचा? तर या तथाकथित समाजसेवकाचा. असली ही त्यांची हुकूमशाही! आणि हे 'आदर्श गावे' तयार करण्याचे कॉन्ट्रैक्ट घेणार!
आदर्श गाव ही कल्पनाच absurd आहे. असा कधी कुठे समाज बदलतो का? आज एक गाव आदर्श बनले, उद्या दहा गावे अदर्श बनतील, परवा १०० गावे आदर्श बनतील, असा गुणाकार या लोकांनी गृहीतच धरलेला असतो. प्रत्यक्षात असले गुणाकार कधीच होत नाहीत; पण अशी खोटी स्वप्ने विकण्यात आमचे महापुरुष वस्ताद!
काही स्वयंस्फूर्त चळवळी समाजामध्ये नैतिकता वाढावी म्हणून काम करीत असतात. यात अनेक गांधीवादी संस्था आहेत. त्यांच्या मते, आपल्या समस्यांचे कारण नैतिक मूल्यांचा ऱ्हास किंवा भ्रष्टाचार हे आहे.
या नैतिक प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करायला हवा, कारण आपल्या मुख्य विषयाशी हा थेट निगडित आहे.
नैतिकता ही काय चीज आहे? नैतिकतेचा मार्ग कोणता? महात्माजींना एकदा एकाने विचारले, "शांतीचा मार्ग कोणता?" बापूजींनी उत्तर दिले, "शांतीचा मार्ग नाही, शांती हाच मार्ग आहे." तसेच नैतिकता ही काही विवक्षित अवस्था नाही. नैतिकतेचा काही मार्ग नाही, नैतिकता हाच मार्ग आहे.
नीतिमत्तेच्या कल्पना वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या समाजांत बदलताना दिसतात. स्त्रीसत्तेपासून स्त्रीदास्यापर्यंत, ब्रह्मचर्यापासून ते प्रौढसंमतीच्या स्वैराचारापर्यंत सर्व प्रकारचे नीतिनियम इतिहासात सापडतात. अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबर नीतिव्यवस्थाही बदलताना दिसते. शेतीप्रधान समाजाची धारणा औद्योगिक समाजासारखी नसते. खासगी मालमत्तेवर आधारलेले समाज, आपली वेगळी नैतिकता तयार करतात, स्थिर समाजाचे नियम लढाया, उत्पात इत्यादींनी वारंवार हादरे खाणाऱ्या समाजापेक्षा साहजिकच निराळे असतात. अर्थव्यवस्था बदलली की नीतिमत्ताही बदलते.
तरीही बहुतांश समाजांनी मानलेल्या नियमांत एक सूत्र सापडते. स्वार्थाचा त्यागकरून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे असे बहुतेक काळात मानले गेले आहे. दुसऱ्यासाठी जगलास तर अमर झालास, स्वत:करिता जगलास तर मेलास, अशा अर्थाची अनेक बोधवचने सतत वापरली जात असतात.
'संसार करावा नेटका' किंवा 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे' यांसारखी अपवादात्मक वचने सोडल्यास संतवाणी ही वैराग्याची, नि:संगत्वाची आणि गरिबीचे गुणगान करण्याकरिताच राबली आहे.
जे दुर्मिळ त्याची किंमत जास्त या मागणी-पुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार परहितरत वर्तणुकीला अलोट महत्त्व मिळाले असावे. परार्थाच्या महत्त्वाचे दुसरेही एक कारण असू शकेल. व्यावहारिक जगातील प्रत्यक्ष जगणे आणि व्यक्तीची जाहीर केली गेलेली तथाकथित तत्त्वे यांमध्ये प्रचंड दरी असते. उदाहरणार्थ, विश्वाची स्वयंभू उत्क्रांती मानणारे मार्क्सवादी अर्थव्यवस्थेलामात्र नियोजनाची आवश्यकता प्रतिपादतात, तर विश्वकर्त्यावर श्रद्धा सांगणारे अर्थव्यवस्थेच्या खुल्या विकासांची महती सांगतात. व्यवहारात स्वार्थाने वागल्यानंतर शब्दांत तरी परार्थाचे गुणगान गायिले तर मन:शांती सुलभ होते म्हणूनही परार्थाचे हे कौतुक असावे. बलाढ्यांनी ताकदीच्या बळावर प्रभुत्व गाजवायच्या दिवसांत दीनदुबळ्यांच्या साहाय्याला क्वचित यातील काही संतवचने आली असतीलही; पण सत्तेच्या भर सद्दीत कोणा सुलतानाला संतांच्या शिकवणीमुळे बंधने पडल्याचे मात्र इतिहास कचितच सांगतो.
एकेकाळी मुंबईतील माणसे बसच्या रांगेची शिस्त कटाक्षाने पाळत. एका बसमध्ये जागा मिळाली नाही तर शांतपणे दुसरी येण्याची वाट पाहत थांबत. त्या काळी दिल्लीकर बस पकडताना पराकोटीची बेशिस्त आणि हुल्लड दाखवत असत. याचा अर्थ दिल्लीवाले कमी नीतिमान आहेत असा नाही. मुंबईच्या व्यवस्थेत एक बस गेली तरी दुसरी; नाही तरी त्यापुढची मिळण्याची जवळ जवळ खात्री वाटत असे. दिल्लीत तर तशी आशाही नसे. यामुळे दोघांच्या वर्तणुकीत फरक पडत असे.
भविष्यात जितके दूर पाहण्याची शक्यता, तितका मनुष्य नागड्या स्वार्थापासून दूर जातो. डोंगराच्या शिखरावरून पाहिले, विश्वाच्या व्यापकतेच्या तुलनेने स्वत:ची, स्वत:च्या इच्छा-आकांक्षांची क्षुद्रता जाणवली की काही काळ विचार बदलतात, तसाच हा प्रकार आहे.
आजची भ्रांत आहे, उद्याची आशा नाही, कोण काय म्हणेल याची चिंता करण्याचे कारण नाही अशा अवस्थेत नागड्या तात्कालिक स्वार्थाची उपज सहज होते. आजचाप्रश्न सुटला आहे, उद्याचा विचार करण्यची फुरसत आहे तेव्हा मनुष्य थोडा दूरचा विचार करून, दूरच्या फायद्यासाठी आजच्या स्वार्थाला मुरड घालू शकतो. सर्व व्यवस्थित असले तर अगदी जन्मांतराचीसुद्धा चिंता वाहता येते. आर्थिक स्थैर्याची भावना व परार्थाची नीतिमत्ता यांच्यात संख्याशास्त्रीय संबंध आहे.
आर्थिक विपन्नतेतही परार्थाची आवड आणि संपन्नतेतही दुष्टता या अनेक व्यक्तींत सापडतातही; पण संख्याशास्त्रीय संबंध त्यामुळे नाकारता येणार नाही. परार्थ हा व्यापक स्वार्थच असतो.
परार्थाचा हा अर्थ समजून घेऊन अवघ्या मानवजातीला एका मानसिक गुलामगिरीतून सोडवणे आवश्यक आहे. खावे, प्यावे, उपभोगावे या नैसर्गिक प्रेरणा. त्यांचे यथायोग्य पोषण झाले तर सहभोगाचीही गोडी वाटू लागते, गावाबरोबर जगण्यात आनंद वाटू शकतो, राष्ट्राकरिता प्राण देण्याची ऊर्मीही तयार होऊ शकते. त्यातही एका अलोट आनंदाचा अनुभव घेता येऊ लागतो.
प्रचंड दु:ख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरिता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. असे म्हणणारा निरोगी मनाचा नाही, याने काही लपवलेले आहे, या बोकेसंन्याशाच्या मनात काही क्षुद्र स्वार्थ आहे, असे मला वाटू लागते. मी हे माझ्या आनंदाकरिता करतो आहे, स्वार्थाकरिता करतो आहे, हे सांगण्यात कोणालाही शरम का वाटावी? परार्थाची साखर पेरणारा क्षुद्र स्वार्थ साधतो. त्यापेक्षा स्वार्थी बना, जितक्या व्यापक अर्थांनी, जितक्या मार्गांनी आयुष्य परिपूर्ण करता येईल तितके करा. दुसऱ्याचे हक्क लाथाडू नका. परार्थ म्हणून नव्हे, निव्वळ स्वत:च्या आयुष्याची परिपूर्णता कमी होऊ नये म्हणून-अशी शिकवण ठीक. हीच खरीखुरी नैतिकता होईल.
मी भविष्यातील आदर्श समाजाचे काहीच स्वप्न देत नाही; स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हा मार्ग सांगतो; पण या कक्षा रुंदावत पोचायचे कोठे हे मात्र सांगत नाही. नैतिकता ही कोणत्याही एका विवक्षित व्यवस्थेत नाही, ती मार्गक्रमणात आहे असे मानल्यानंतर आदर्शभूत समाज ही कल्पनाच अर्थहीन होते. आदर्शाची चित्रणे करणाऱ्या विचारपद्धतीपैकी मार्क्स व गांधी यांच्या स्वप्नसृष्टीचे काय झाले हे पाहण्यासारखे आहे.
मार्क्सवादाच्या समग्र विचारपद्धतीवर विसाव्या शतकातील कामगार चळवळ उभी राहिलेली आहे. जडवाद, विरोध विकासवाद, विपरीत उत्पादनसंबंध, खासगी मालमत्ता, अतिरिक्त मूल्य, मजुरांचे शोषण, वर्गसंघर्ष यांतून भांडवलशाहीचा अटळ विनाश, यांतूनवर्गरहित, शोषणरहित, समाजवादी समाजाची निर्मिती व त्यांतून मानवी मनाची मुक्ती एवढ्या सगळ्या, सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या पायावर मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादाची उभारणी झाली. जगातील सर्व कामगारांना एक करण्याचे स्वप्न पाहत कामगार चळवळ जगभर उभी राहिली. आपल्या देशात अनेकांनी या चळवळीत स्वत:ला झोकून दिले, बलिदान केले. मजुरीच्या रूपात, बोनसच्या रूपात, नोकरीच्या अटी, शर्तीबाबत सुधारणा असे अनेक फायदे मजुरांनी पदरात पाडूनही घेतले, पण मार्क्सवादी दर्शनाची बांधिलकी काही तयार झाली नाही.
कामगारनेतेपण हा व्यवसाय होऊ लागला. जो पाच-दहा रुपये जास्त मिळवून देईल, त्याच्यामागे कामगार जाऊ लागले, कामगारक्रांतीच्या मार्गाने मानवजातीच्या मुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून. ही हकिकत आहे. ज्या देशात तथाकथित मार्क्सवादी राजवट आली तेथे घडून आलेले बदलही किरकोळ, भांडवलशाही व्यवस्थेचा हा नवा अवतार असे वाटावे अशा धर्तीचे. हे असे का झाले? मार्क्सने नैतिक प्रश्नावर मौन पाळले होते. कामगारांचे शोषण थांबवा, उपयोगमूल्य व विनिमयमूल्य यांतील तफावत रद्द करा अशी निव्वळ मागणीबहाद्दर भूमिका त्याने घेतली नव्हती. तरी त्याच्या आंदोलनाची नैतिक परिणती त्याला पाहिजे तशी झाली नाही. अर्थव्यवस्थेच्या बदलांतून अपेक्षित परिवर्तन घडून आले नाही.
नैतिकतेवर अर्थव्यवस्था आधारू पाहणाऱ्या महात्मा गाधींची शोकांतिका मार्क्सहूनही भयानक आहे. जगाच्या इतिहासात म. गांधींइतका कोणत्याही युगपुरुषाशी त्याच्याच शिष्यांनी द्रोह केला नसेल. गांधीवादाला अपेक्षित आर्थिक व्यवस्थेच्या नेमकी उलटी व्यवस्था त्यांच्या परमशिष्यांनी उभारू घातली. गांधीवादी नैतिकता त्यांच्या शिष्योत्तमांनीची उलथवली. महात्मा गांधींनी त्यांच्या विचारात नैतिक बाजू कोठेही लंगडी ठेवली नव्हती; पण प्रत्यक्षात तिचा समाजजीवनावर काहीच परिणाम झाला नव्हता.
मार्क्सवाद्यांच्या क्रांतितत्त्वज्ञानात एक मोठी चूक वारंवार आढळते. शोषित शोषकांविरूद्ध लढा उभारतात, कमालीचे शोषण झाले की शोषित उफाळून क्रांती करतात, प्रस्थापित व्यवस्था उधळून देण्यास कंबर बांधतात असा काहीतरी विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो.
अगदी शरीरशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ही कल्पना अवास्तव आहे. अतिशोषितांमध्ये उठण्याची ताकदच नसते. शोषणाच्या अगदी सुरवातीच्या पायरीत त्यांची प्रतिकारक्षमता खलास होते. प्रत्यक्षात शोषक क्रमांक एकविरुद्ध शोषक क्रमांक दोन आघाडी उघडतातअसे दिसते. शोषितांचे नाव घेऊन ते ही आघाडी उघडतात. उदाहरणार्थ, परदेशी भांडवलदाराविरुद्ध आघाडी स्थानिक भांडवलदार उघडतात-वरकरणी नाव मात्र गांधींच्या तत्त्वज्ञानाचे किंवा स्वदेशीचे किंवा शिवशाहीचे असते.
जनन्मान्य थोर विचारवंत, लोकधुरीणांच्या दर्शनाची ही शोकांतिका विचार करावयास लावणारी आहे.
पहिला प्रश्न निर्माण होतो तो हा, की या प्रेषितांनी आदर्श समाजाची पाहिलेली स्वप्ने योग्य होती का? तत्कालीन समाजातील समस्यांचे अचूक विश्लेषण त्यानी केले. ते दोष दूर केल्यानंतर ज्याआदर्श समाजाची निर्मिती होईल त्याचे मोठे मनोहारी चित्रण हर 'पैगंबराने' उभे केले. ॲरिस्टॉटल, प्लेटोपासून मार्क्स -गांधींपर्यंत प्रत्येकाने एक आदर्श समाजाचे लोभस चित्र लोकांसमोर ठेवले.
अतिरिक्त मूल्यांचे विश्लेषण मार्क्सने केले.तेवढ्या आधारावर कामगारक्रांतीची आणि वर्गहीन समाजाची स्वप्ने रंगवणे हे मार्क्ससारख्या प्रकांड बुद्धिवाद्याला कसे काय योग्य वाटले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या आदर्शावर समग्र समाज उभा राहिल्याची कल्पना गांधींनी करणे कितपत वास्तववादी होते?
प्रत्येक छायाचित्राचा एक केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूत प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट दिसते. त्या बिंदूपासून जितके दूर जावे तितकी प्रतिमेची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक छोट्या-मोठ्या विचारवंतांच्या विचारपद्धतीचेही असेच असते. काही केंद्रबिंदूत त्यांना त्यांच्या काळाला व परिस्थितीला अनुरूप असा साक्षत्कार होतो. बुद्धिनिष्ठ सचोटी राखून आपला विचार तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा हे आजपर्यंत थोराथोरांना जमलेले नाही. आपल्याला गवसलेल्या सत्यकणांच्या आधारे विश्वव्यापी पसाऱ्याला गवसणी घालण्यच्या मोहाला मोठमोठे बळी पडले आहेत. विश्वाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वत:च्या पराभवाचा पाया घातला.
आपल्या विचाराचा भविष्यावर परिणाम काय होईल, याचे चित्रण करताना बुद्धिनिष्ठ कठोर तर्कशास्त्राला सोडून देण्याचा मोह त्यांना का पडला? अनुयायांना एक विशाल दर्शन देऊन, सर्वसंग परित्यागाला तयार करण्यासाठी? स्वप्ने विकण्याच्या धंद्यात ते का पडले हे सांगणे कठीण आहे.
मुळात आदर्श, सुखी, शांतिपूर्ण समाज ही कल्पनाच हास्यास्पद आहे. मनुष्यप्राणी संपूर्ण सुखी होऊच शकत नाही. कधी काळी तो असा सुखी झाला तर त्या कारणानेच तो दु:खी होईल. विरोधविकासवादाच्या जनकालासुझ परिपूर्ण समाजाचे स्वप्न रंगवावेसेवाटले याचे आश्चर्य वाटते. समाज एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेकडे जातो. जुने दोष समाजविकासाच्या आड येतात तेव्हा त्यांना दूर केले जाते. प्रयत्नांना वाचा हवी असते. ती वाचा पुरवण्याचे काम तत्कालीन पैगंबराकडे जाते.
मग प्रश्न निर्माण होतो तो हा, की परिवर्तनात थोर व्यक्तींनी नेमकी काय भूमिका बजावली? पैगंबराच्या विचारांच्या आधारे समाजपरिवर्तन घडून येते ही कल्पना पूर्णपणे भ्रामक आहे. रुसो, वॉल्टेअर यांच्या विचारांनी फ्रेंच राज्यक्रांती घडली नाही, मार्क्समुळे रशियन क्रांती घडली नाही, गांधीवादामुळे भारतातील स्वातंत्र्यचळवळ उभी राहिली नाही. समाज स्वत:च परिवर्तनाची दिशा ठरवत असतो, मार्गक्रमण करीत असतो. मार्गक्रमांचे समर्थन करणारा सोयीस्कर विचार आसपासच्या विचार-मंडीत शोधला जातो, आवश्यक तर उत्खनन करून काढला जातो. वाळवंटातील भटक्या टोळ्यांना इस्लाम-प्रसाराचे तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. सर्व युरोप खंडात एकेकाळी प्रभुत्व असलेल्या; पण औद्योगिक विकासात मागे पडलेल्या रशियाला समाजवादी औद्योगिकीरणाचा विचार रुजणारा होता. इंग्रजांना हटवून त्यांची जागा पटकावू पाहणाऱ्या हिंदुस्थानातील नव्या व्यापारी, कारखानदारवर्गाला गांधी तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. त्या त्या वेळच्या आर्थिक गरजांनी स्वत:साठी तत्त्वज्ञान निवडले. तत्त्वज्ञान्यांनी आर्थिक व्यवस्थेला गती दिली नाही.
रशियात मार्क्सवादाचा पराभव झाला, हे म्हणजे चूक आहे. गांधीवादही भारतात हरला नाही. मुळात या विचारांचा प्रयोग रशियात, भारतात झाला हे म्हणणे चूक आहे. या देशांत जे घडले त्याला मार्क्सवाद वा गांधीवाद अशी एक सोयीस्कर पाटी लावण्यात आली आहे. 'सुभाष केशकर्तनालया'चा सुभाषचंद्र बोसांशी जितका संबंध तितकाच या देशांतील घटनांचा मार्क्सशी व गांधींशी संबंध.
मार्क्सला सापडलेले सत्यकण हे स्थलकालसापेक्ष होते. अतिरिक्त मूल्याचा प्रमुख स्रोत कामगारांच्या शोषणात नाही, तिसऱ्या जगाच्या शोषणात आहे हे मार्क्सला समजले नव्हते असे नाही. साम्राज्यवादाच्या आर्थिक परिणामांचे तपशीलवार वर्णन त्याने दिले आहे. रोझा लुक्झेंबुर्गला तिसऱ्या जगातील लुटीचे भांडवलनिर्मितीच्या प्रक्रियेतील मान्य उमगले होते. मार्क्सला ते स्वच्छ दिसत असले पाहिजे; पण १९४८ च्या उठावाच्या अनुभवाने केवळ कामगारच क्रांती करू शकेल ही कल्पना मनात दृढ झालेली. त्या कामगारवर्गाला क्रांतीसाठी उद्युक्त करावयाचे तर त्यांच्याच शोषणातून अर्थशास्त्र उभारावयास पाहिजे. वर्गजाणिवेसारखी, तादात्म्यासारखी मार्क्सच्या जडवादात अजिबातन सामावणारी कल्पनाही तयार करावी लागली. कोणत्याही व्यवस्थेच्या उत्पत्ति-स्थिती-लयाची मीमांसा करणाऱ्या मार्क्सलाच वर्गविहीन परिपूर्ण समाजाच्या स्वप्नांची भाकडकथा तयार करावी लागली. ती प्रत्यक्षात येण्याचा काहीच संभव नव्हता. इतिहासाला मार्क्सवर इतकी मेहेरनजर करण्याची काहीच आवश्यकता नव्हती.
भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे महात्माजी सरसेनापती होते. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या, नि:शस्त्र, असंघटित जनांना बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उभे करण्याचे प्रचंड काम त्यांनी घेतले. चंपारण्याच्या, बारडोलीच्या अनुभवांनंतर अस्पृश्य शेतमजुरांना, खेडुतांना चळवळीत गोवून घेतले पाहिजे हे ओळखणारा, चौरीचुरापासून 'करेंगे या मरेंगे' पर्यंत झेप घेणारा हा रणधुरंधर आंदोलनासाठी नवनव्या आघाड्या व फौजा तयार करण्याकरिता पारंपरिक नीतिकल्पना वापरत होता. त्यांतून पारंपरिक नैतिकतेवर आधारित असा समाज निर्माण होईल अशी महात्माजींची अपेक्षा असली तर शासनाचे नेतृत्व त्यांनी आधुनिकीकरणवादी पंडितजींकडे सोपवले असते किंवा नाही, याबद्दल जबरदस्त शंका घेण्यास जागा आहे.
विचारवंतांनी केलेल्या स्वप्नरंजनाची परिपूर्ती न झाल्यामुळे आरामखुर्चीत बसलेल्या विद्वानांना कितीही वेदना झाल्या तरीही काळपुरुषाला त्याची काही पर्वा वाटताना दिसत नाही.
"आपला तो बबड्या आणि लोकांचं ते कारटं" या वृत्तीने महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखे आहे. पुण्यातील पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्षे आधी दिल्लीश्वरांनी केलेली बांधकामे पाहिली म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचे स्थान काय होते याबद्दलची वर्णने अवास्तव असावीत हे स्पष्टच होते. छत्रसाल, सूरजमल, जाट, हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशांतील पुरुषांच्या कार्यासंदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास आत्मकौतुकाने भरलेला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे.
पण याहीपेक्षा एक फार मोठे कोडे इतिहास वाचताना मला पडते. देवगिरीचे एवढे बलाढ्य राज्य; पण मुसलमानी फौजा अगदी बिनधास्त गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचल्या कशा? महाराष्ट्राच्या मध्यकेंद्रापर्यंत पोचण्याच्या आधी या परकी सैन्याला वाटेवरच्या शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी काहीच विरोध केला नाही? त्यांना नेतृत्व नसले मिळाले तरी काय झाले? राजारामाच्या वेळी कोठे होते नेतृत्व? तरी उभा महाराष्ट्र जागोजागलढला. मग रामदेवरायाच्या वेळी का नाही तो उभा राहिला? बरे, शत्रूच्या फौजा किल्ल्यापाशी येऊन पोहोचल्यानंतर तरी वेढ्याच्या बाहेरच्या लोकांनी वेढ्याची कुतरओढ का नाही केली?
इतिहासात जागोजागी वाचावे लागते की रजपूत, मराठा सैन्य शिकस्तीने लढले, पण अखेरीस शत्रूच्या प्रचंड संख्याबळापुढे त्यांचे काही चालले नाही. मोगल हजारो मैलांवरून येथे आलेले. त्यांची संख्येची ताकद स्थानिक राजांच्या त्यांच्या स्वत:च्या प्रदेशातील ताकदीपेक्षा जास्त कशी राहिली?
हे कोडे अनेकांनी मांडले आहे. अगदी १८५३ मध्ये मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रात मांडले आहे. भारतातील गावगाड्याबद्दल तो लिहितो,
"खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली-मोडली याचे काहीच सुखदु:ख नाही. खेड्याला धक्का लागला नाही, तर ते कोणत्या राजाकडे जाते, कोणत्या सुलतानाची त्यावर अधिसत्ता चालते याची त्यांना काहीच चिंता नसते, गावगाडा अबाधित चालत राहतो."
'राधामाधवविलासचंपू'च्या प्रस्तावनेत हे कोडे वेगळ्या पद्धतीने राजवाड्यांनी मांडले आहे. हिंदू राजवटीतील महाराष्ट्राच्या संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्मणांपुरती व उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशादी मराठे अत्यंत मागासलेले असून, त्यांत राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्यक्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी राजवट आली. सेनापती पडताच सैरावैरा पळत सुटण्याच्या प्रवृत्तीची पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या संदर्भात राजवाड्यांनी मीमांसा केली आहे. त्यात 'अधम', 'पशुतुल्य', 'द्विपाद' इत्यादी विशेषणे वापरून राजवाडे म्हणतात, एक अन्नदाता गेला म्हणजे दुसऱ्याच्या शोधात हे पोटभरू ताबडतोब सुटत. 'महिकावतीची बखर' पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा विचार त्यांनी अधिक स्पष्ट केला आहे.
"गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली, ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंत:स्थ प्रामाणिक समजूत आहे."
राष्ट्रवादी इतिहासकारांनी उदोउदो केलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील बंडखोरांची सर्वसामान्य जनतेला किती धास्ती वाटत होती, याचे वर्णन इतिहासकाराचा अभिनिवेश नसलेल्या गोडसे भटजींनी आपल्या प्रवासवर्णनात सविस्तर केले आहे.
शूद्रातिशुद्रांचा राणा जोतिबा फुले यांनी मुसलमानी आक्रमणाला सरळ 'विमोचन'असा शब्द वापरून गावातील सर्वसामान्यांची भावना व्यक्त केली आहे. इंग्रजांची राजवट आल्यानंतरही, "सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले. नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते तर ब्रह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले असते अशी त्यांना भीती वाटत होती."
जोतिबांची भावना हीच देवगिरीच्या आसपासच्या कुणब्याशूद्रांची भावना असली पाहिजे. हीच भावना सर्वसाधारण प्रजेची त्यांच्या जवळच्या गढीत किंवा किल्ल्यावर राहणाऱ्या तथाकथित देशबांधव स्वधर्मीय सरदार-राजांबद्दल असली पाहिजे. रामदेवराय आणि अल्लाउद्दीन यांत फरक एवढाच की पहिला दरवर्षी उभी पिके हक्काने कापून नेई, तर दुसरा कधी तरी एकदा येणार. रामदेवरायाच्या पराभवात प्रजेला थोडे तरी सूडाचे समाधान मिळत असले पाहिजे. रामदेवरायाकडून लुटले जायचे का अल्लाउद्दिनाकडून असा आणि एवढाच पर्याय रयतेपुढे असेल तर परकीय लुटारूच्या रूपाने मोचकच आला अशी प्रजेची भावना का होऊ नये? शिवाय, दोन लुटारूंच्या लढाईत स्वत: मरण्यात त्याला का स्वारस्य वाटावे? बंदा बहादुराच्या व त्यानंतरच्या पंजाबमधील लढायांसंबंधी खुशवंतसिंग म्हणतात, "शिखांकडून किंवा मराठ्यांकडून लुटून घ्यायचे का अब्दालीकडून एवढाच पर्याय पंजाबी शेतकऱ्यांसमोर असे आणि त्यातल्या त्यात मुसलमानांकडून लुटले जाणे हा सौम्य पर्याय वाटे."
राष्ट्रवादी इतिहासकारांनी मध्ययुगातही राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती असे गृहीत धरले आहे; पण असे राष्ट्र त्यावेळी अस्तित्वात नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते. "अठरा धान्यांची एकी होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" (सार्वजनिक सत्यधर्म - 'महात्मा फुले : समग्र वाङ्मय', संपादक धनंजय कीर व स.गं. मालशे, सुधारित तृतीयावृत्ती १९८८, पृ. ४२३)
आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये दरवर्षी एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा जो गुणाकार होतो, तो लुटण्याची आहे. लुटण्याची वेगवेगळी साधने वापरली गेली. दरोडेखोरी, सैन्याची लूट, राजांचा महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, सावकारी, जमीनदारी. सर्व समाजाचा इतिहास हा शेतीला लुटण्याच्या साधनांच्या विकासाचा इतिहास असतो.
अशा प्रकारे आपण भिन्न क्षेत्रांतील स्वयंस्फूर्त कार्याचा एकूण आढावा घेतला तर त्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्वयंस्फूर्त कार्याचा प्रयोग फसलेला आहे हे आपल्या लक्षातयेईल. असे असूनसुद्धा या क्षेत्रामध्ये अनेक लोक का शिरत असावेत? खूपदा ज्या स्वरूपाचे काम तथाकथित लाभार्थ्यांनाही नकोच असते, ज्या प्रकारच्या कार्यामध्ये स्वत:चेच व्यक्तिमत्त्व खुरटले जाते, त्या प्रकारच्या कार्यात ही मंडळी स्वत: का सामील होतात? खूपदा स्वयंस्फूर्त कार्य हा एक कधीही न संपणारा बोगदा असतो. अशा बोगद्यात ही मंडळी का उतरतात? आपण हे सगळे करतो आहोत हे कशासाठी, यातून काय निष्पन्न होणार आहे, हा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यात का येत नाही? मुळात समाजसेवेचा हा विंचू त्यांना डसतोच का?
गेल्या वीस वर्षांत मी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने सतत प्रवास करीत आहे. ठिकठिकाणी लोकांना भेटत आहे, चर्चा करत आहे. या सर्व प्रवासात स्वयंस्फूर्त क्षेत्रांतील असंख्य लहान-थोर नेत्यांना मी खूप जवळून पाहिले आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता, त्यांतल्या बहुतेकांविषयी माझ्या मनात कौतुकाची भावना उरलेली नाही.
यांतली बहुतेक मंडळी ही आपल्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जीवनात फारशी यशस्वी ठरलेली नाहीत, तरीही त्यांना असे वाटत असते, की आपण कोणीतरी खूप महान आहोत, आपली लायकी समाजाला पुरती कळलेली नाही. कसेही करून त्यांना प्रकाशात यायचे असते. (अशा प्रकारच्या सर्व विधानांना अपवाद नि:संशय असतात व यासंदर्भातही असे अपवाद निश्चितच आहेत, परंतु असे अपवाद वगळता, सर्वसाधारणत: माझी निरीक्षणे बरोबर आहेत असे मला वाटते.) अशा प्रकारचे स्वयंस्फूर्त कार्य करीत राहणे ही अशा मुळात सर्वसाधारण (Mediocre) असलेल्या काही मंडळींची गरजच असते. यामागे काही जैविक कारणेही आहेत. अशा कार्याद्वारे इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. दुबळे मूल किरकीर करून इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत असते, तर गुटगुटीत मूल स्वभावत:च शांत, आत्ममग्न असते, ते स्वत:शीच खेळत असते, इतरांचे लक्ष वेधून घ्यायची त्याला फारशी गरज वाटत नाही.
अशा स्वयंसेवी कार्यकर्त्यांची नम्रता ही वरकरणी असते. आतून ही मंडळी अतिशय अहंकारी व महत्त्वाकांक्षी असतात. आपले कार्यक्षेत्र निवडतानासुद्धा स्वत:ला जास्तीत जास्त प्रसिद्धी व लोकमान्यता मिळेल असेच क्षेत्र ते निवडतात. आपल्या लौकिक जीवनात ही मंडळी फारशी यशस्वी नसतात. नोकरीधंद्यात अयशस्वी ठरलेली असतात. खूपदा आपल्या कौटुंबिक जीवनातही ती दु:खी असतात. नियतीची यांना कुठे ना कुठे जोरदार ठोकर बसलेली असते आणि सामान्यत: अशीच मंडळी आपल्याला समाजकार्याकडे वळताना आढळतील. एकेकाळी कविता करणे वा कथा लिहिणे हेलोकमान्यता मिळवण्याचे सोपे माध्यम होते. आजकाल स्वयंस्फूर्त क्षेत्र हे असे माध्यम बनले आहे.
परोपकार ही एक चटकन चढणारी दारू आहे. सॉमरसेट मॉम हा माझा एक अतिशय आवडता लेखक. त्याने लिहिलेली एक छोटीशी कथा गंमतीदार आहे. एकदा येशू ख्रिस्ताला सैतान भेटतो. ख्रिस्ताने मोहाला बळी पडावे यासाठी तो अनेक लोभ दाखवतो. सानेनाणे, पैसा-अडका, जमीन-जुमला इत्यादी; पण येशू ख्रिस्त कशालाच बळी पडत नाही. शेवटी सैतान त्याला म्हणतो, की पृथ्वीवर जाऊन सर्व मानवजातीचा उद्धार करण्याची संधी मी तुला देतो. हे प्रलोभन काही ख्रिस्ताला टाळता येत नाही!
दुसऱ्याचा उद्धार करण्यातली झिंग ही काही और असते. बऱ्याच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांमध्ये मला एक आत्मकौतुकी Narcisist भावना आढळते, स्वत:वरच ते कमालीचे खूष असतात. वरवर जरी त्यांनी आपण हे सर्व इतरांसाठी करतो असा आव आणला, तरी प्रत्यक्षातमात्र आपल्या तेजोवलयात इतरांना सामील करून घ्यायची त्यांची अजिबात तयारी नसते. समाजहितापेक्षा आपल्या संस्थेची महती, प्रॉपर्टी व एकूण स्थान कसे उंचावेल याच्यावरतीच त्यांचे जास्त लक्ष असते. तुम्ही यांच्या विविध संस्थांची Trust deeds एकवार बघा. यातल्या बहुतेक जणांनी Trustee म्हणून आपणच तहहयात राहू याची तजवीज करून ठेवलेली असते. बाहेर यांनी लोकशाही मूल्यांचा कितीही गवगवा केला तरी स्वत:च्या संस्थामात्र ते 'हम करे सो कायदा' याच भूमिकेतून चालवीत असतात.
या मंडळीमध्ये एक गुणमात्र असतो. ही मंडळी बोलण्यात मोठी चतुर असतात. इकडी तिकडली वाचलेली दोनचार Quotations फेकून विद्वत्तेचा आभास निर्माण करण्याची कला त्यांना चांगली अवगत झालेली असते. यांच्या संस्था म्हणजे यांचे व्यक्तिगत साम्राज्यच असते. यांच्या वागण्यातल्या विसंगतीला तर काही सीमाच नसते. वरवर गरिबांचा कळवळा दाखवणारी ही मंडळी स्वत:मात्र चैनीत जगत असतात. अन्य जीवनक्षेत्रांत त्यांना मिळू शकले असते त्यापेक्षा जास्त उत्पन्न ही मंडळी या तथाकथित स्वयंस्फूर्त क्षेत्रातून स्वत:साठी काढीत असतात. चर्चेत परकीयांना, विशेषत: अमेरिकेला, सतत दोष देणारी ही मंडळी आपल्या संस्थेला मदत मिळावी म्हणूनमात्र सतत अमेरिकेपुढे झोळी पसरत असतात. वरकरणी ज्या उच्चभ्रूना ते नावे ठेवतात त्यांच्यासारखेच जगायचा आतून ते प्रयत्न करत असतात. ही कार्यकर्ती मंडळी कमालीची मत्सरग्रस्त असतात. सर्व यशस्वी माणसांना 'लब्धप्रतिष्ठित' म्हणून हिणवायला त्यांना आवडते. आपण तेवढेतत्त्वनिष्ठ आणि बाकीचे सारे भ्रष्ट अशी त्यांची ठाम धारणा असते. दुर्दैवाने- समाजही अशा लोकांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत असतो.
या सर्व समाजकार्यकर्त्यांची एक प्रतिमा, एक ढाचा तयार होतो व या क्षेत्रात नव्याने येणारी सर्व मंडळी आपापली मॉडेल्स ठरवून त्यांचे अनुकरण करीत असतात. आज दुपारीच मी सहज टी.व्ही. लावला तेव्हा टी.व्ही.वर एक हिंदी चित्रपट चालला होता. गंमत म्हणून मी तो थोडावेळ बघत होतो. त्यात एक अशीच कार्यकर्ती तरुणी दाखवली होती. तिचे नाव होते मेधा दीक्षित. मेधा पाटकर व राजीव दीक्षित या आजकाल प्रकाशझोतात असणाऱ्या दोन कार्यकर्त्यांवरून घेतलेले!
अशा या कार्यकर्त्यांचा व्यासंग अजिबात नसतो. त्यांचे सगळे ज्ञान हे एक प्रकारचे पॅचवर्क असते- थोडे इकडून घेतलेले, थोडे तिकडून घेतलेले. मला आश्चर्य वाटते, की समाजातील जे प्रश्न सोडण्यासाठी ते झटत असतात, निदान त्यांचा वरकरणी तसा दावा तरी असतो, ते प्रश्न मुळात कसे निर्माण होतात याचा त्यांनी फारसा अभ्यास केलेलाच नसतो. तसे पाहायला गेले तर या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ गरिबीत आहे व गरिबीचे मूळ आहे शेतीच्या दुर्दशेत.
जगातील पहिला व्यवसाय शेती हा आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा, एका दाण्याचे हजार दाणे करणारा, हा एकमेव व्यवसाय. व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात हे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाण-घेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची (Exchange Value) वृद्धी होते. समाजाचा इतिहास हा या शेतीतील गुणाकाराच्या वाटपाचा-बहुतेकदा लुटीचाच- इतिहास आहे. शेतीमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आपल्यापुढचे कुठलेही प्रश्न सुटणे शक्य नाही, अशी माझी धारणा आहे. उदाहरणार्थ, आपल्या शहरांतील भीषण बकालपणा, झोपडपट्टी, प्रदूषण, गलीच्छपणा हे प्रश्न घ्या. शहरांची इतकी अफाट वाढ का होते? फुटपाथवरसुद्धा पथारी पसरायला जागा नाही, अपुरा वीजपुरवठा, पाण्याचे हाल, सगळीकडे पसरलेली घाण असे सगळे वास्तव असूनसुद्धा लाखो माणसे शहरांमध्ये एकएक दिवस रेटत राहतात; एवढेच नव्हे तर दररोज त्यांत हजारोंची भर पडत असते. असे का? याचे एकमेव कारण म्हणजे शहरांतले गलीच्छ जीवन कितीही हालांचे असले तरी शेतीवरच्या उपासमारीपेक्षा ते परवडले असा शास्त्रशुद्ध विचार करूनच रोज हजारो नवे लोक ते शहरी जिणे पत्करतात. शेतीतील उत्पन्न वाढविल्याशिवाय शहरांकडे येणारा त्यांचा लोंढा थांबवताच येणार नाहीशेतीमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय नागरी जीवनाचे कुठलेच प्रश्न सुटणे शक्य नाही.
स्वयंस्फूर्त कार्य करणाऱ्यांमध्ये ही व्यापक जाणीव मला कधीच आढळलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या वीतभर क्षितिजात बुडलेला.
बरेचसे स्वयंस्फूर्त कार्य हे राष्ट्रावर कारगिलसारखी एखादी आपत्ती ओढवली की सुरू होते; परंतु अशा कार्यातला उत्साह व त्यातील पावित्र्य हे अल्पजीवी असते हे इतिहासाची पाने चाळली की लक्षात येते.
१९६२ मध्ये चीनशी युद्धाचा प्रसंग आला. गाठ बलाढ्य शत्रूशी होती. सर्वच बाबतीत आपण कमी पडत होतो. तरीदेखील हिमालयाच्या रक्षणासाठी सारा देश एकत्र झाला. बायाबापड्यांनीदेखील सैन्यातील जवानांच्या मदतीसाठी अंगावरचे दागदागिने उतरवून देऊन ढीग घातले. सुदैवाने, ती सारी लढाई २१ दिवसच चालली. चीनने आपले सैन्य एकतर्फी काढून घेतले नसते, चिनी सैन्य हिमालयातून खाली उतरून गंगायमुनेच्या खोऱ्यात उतरले असते आणि साऱ्या सीमा खरोखरच इंचाइंचाने लढवण्याची वेळ आली असती तर भारतीयांचा उत्साह किती दिवस टिकून राहिला असता याबद्दल मोठी शंका आहे.
किल्लारी भूकंप झाला. मृत्यूच्या तांडवाने थैमान घातले.साऱ्या देशातून आणि जगभरातून मदतीचे पूर लोटले. साऱ्या लोकांनी ज्या तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली आणि जिवाची बाजी लावली त्याचे सर्वत्र मोठे कौतुक होऊ लगाले; पण कौतुकाच्या शब्दांचे ध्वनिप्रतिध्वनी विरतात न विरतात तोच दगडामातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने काढून नेण्यासाठी भुरटे चोरटे हल्ले करू लागल्याच्या आणि त्यांत पोलिसही सामील झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परदेशांतून मदतीच्या रूपाने आलेले कपडे, अन्नधान्याचे डबे मान्यवर पुढाऱ्यांच्या कुटुंबियांची आणि दोस्त मंडळींची शरीरे आणि घरे सजवू लागले. नेते मंडळींनी कोट्यवधींची माया जमा केल्याची खुलेआम चर्चा होऊ लागली.
अलिकडे येऊन गेलेल्या सुनामीच्या लाटेने सर्वदूर विध्वंस झाला. स्वयंसेवी संघटनांचे आयतेच फावले. मुंबईत आलेल्या अलीकडच्या पुरातही हाच अनुभव. प्रत्येक मृतामागे काही ठोक रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते म्हटल्यावर, आपत्तीच्या आधी मृत झालेल्यांचीही नावे नुकसानभरपाईच्या यादीत घातली गेली. सुनामीच्या बाबतीत तर एक प्रकरण सांगण्यासारखे आहे. सुनामीची लाट आली त्याआधी तमीळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांची हालत मोठी दयनीय झाली होती. मच्छीमारीच्या यांत्रिक बोटींशी स्पर्धा करता येत नसल्याने छोट्या होड्यांचे कोळी मच्छीमारीच्या धंद्यातून दूर कसे होता येईल याची चिंता करीत होते. त्यांना सुनामी ही इष्टापत्तीच वाटली. आता नवीन व्यवसाय करता येईल, नुकसानभरपाईदाखल काही रक्कम मिळाली तर त्याचा नवीन व्यवसायात प्राथमिक भांडवल म्हणून उपयोग होईल, असा विचार ते करीत होते. पण, सुनामीनंतर प्रेतांची वासलात लावल्यावर, हवा श्वसनीय झाल्यावर स्वयंसेवी संघटनांची लाट येऊन आदळली. जी ती संघटना कोळ्यांना मच्छीमारीच्या नव्या बोटी देण्याच्या धांदलीत. परदेशातील नावा बांधणाऱ्यांचा धंदा बुडीत आला होता, त्यांचा जुना साठा साफ झाला आणि तामीळनाडू व केरळ येथील मच्छीमार पुन्हा एकदा बोटी आहेत; पण पकडायला मासे नाहीत, म्हणून समुद्रात खोलवर जाऊन शेजारी राष्ट्रांचे कैदी बनू लागले. स्वयंसेवी संस्थांचे सुनामीपूर्व आणि सुनाम्योत्तर ताळेबंद पाहिले तर स्वयंसेवी संघटनांच्या उदात्त आणि निःस्वार्थ कार्याचा बुरखा टरटरा फाटून जातो.
कुटुंबावर, गावावर, समाजावर, जातीवर, धर्मावर, देशावर संकट कोसळताच माणसांमध्ये एका चैतन्याचा संचार होतो. 'Wealth of Nation' प्रसिद्ध ॲडम स्मिथने तुलनेने अप्रसिद्ध 'Theory of Moral Sentiments' मध्ये या चेतनेचे विश्लेषण केले आहे. त्या चैतन्याच्या भरात माणसे अद्भुत कामे करून जातात; पण हे चैतन्य आणि त्यासाठी करायच्या कष्टांची आणि बलिदानाची तिरीमिरी अल्पजीवी असते.
आपत्ती ओढवली असता वाटेल त्या त्यागास, बलिदानास तयार करणारे चैतन्य ही एक प्रकारची उन्मादावस्था असते; मनुष्यप्राणी आणि समाज यांच्या जीवनाचा तो स्थायीभाव असू शकत नाही. सर्वसामान्य माणसांना जगायचे असते, आयुष्याचा अनुभव घ्यायचा असतो, सुखांचा उपभोग घ्यायचा असतो. अशा सुफल आयुष्याची शक्यता जिवंत राहावी यासाठी, आवश्यक पडल्यास, संकटकाळी तो सर्व हिशेब बाजूला ठेवून स्वत:ला झोकून देण्यास तयार होतो. बेफाम उन्मत्त चैतन्याचा हा अनुभव मोठा स्फूर्तीचा स्रोत असतो. पण, असे चैतन्य आणि बलिदान ही जीवनशैली होऊ शकत नाही.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की बहुतेक हुकुमशहांना आणि अनेक क्षुद्रवादी नेत्यांना आपत्कालीन चैतन्य हाच माणसांचा आणि समाजाचा सतत टिकणारा स्थायीभाव असावा असे वाटते. ज्या देशांत लोकांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम अधिक, राष्ट्रासाठीत्याग करण्याची जेथे तयारी अधिक, ते देश प्रगती करतात असा त्यांचा विश्वास असतो. राष्ट्रप्रेमाची निर्मिती हा अशा मंडळींच्या मते, देशाच्या थोरवीचा एकमेव मार्ग असतो. राष्ट्र, धर्म, जाती, इतिहास, पूर्वजांची थोरवी आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या एखाद्या जातीजमात-राष्ट्राचा विद्वेष अशा गोष्टींच्या आधारे माणसाच्या आणि समाजाच्या अस्मितेला गोंजारले, त्यांच्या अहंकाराला जोपासले की त्यातून निर्माण होणारे चैतन्य हीच विकासाची खरी ऊर्जा अशा भावनेपोटीच इतिहासभर अनेक प्रसिद्ध पुरुषांनी राष्ट्रभावनांना हाक घातली. प्रचंड युद्धे घडवून आणली, लक्षावधींच्या कत्तली केल्या, मुलूखच्या मुलूख बेचिराख केले; पण एकालाही सतत, धीमेपणे, पावलापावलाने का होईना, प्रगती करणारे समाज तयार करता आले नाहीत.
मी जरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीचा प्रश्न मांडत आलो असलो, तरी शेतीचा प्रश्न मी एका दरवाज्याची किल्ली म्हणून वापरला आहे; शेतीमालाच्या भावाचे तत्त्वज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र करण्याची गुरुकिल्ली म्हणून मी वापरले आहे. मी मुळात स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. गरिबीचे नाव घ्यायचे, गरिबी हटवायची म्हणायचे आणि गरिबी-निर्मूलनाचे वेगवेगळे कार्यक्रम काढून आपलेच खिसे भरून घ्यायचे हे मी केले नाही.
मी माझा विचार मांडत असताना माझी निळी जीन सोडायला तयार नाही. सुरुवातीच्या काळात शेतकरी संघटनेच्या सभेत प्रस्ताविक करणारे सांगत, "शरद जोशी परदेशात होते. इतका पगार मिळत होता. ते सगळं सोडून शेतकऱ्यांची कीव आली म्हणून ते हिंदुस्थानात परत आले." पहिल्या सभेपासून मी भाषणाच्या आरंभीच सांगत होतो, "मी करुणेच्या पोटी आलेलो नाही. मी सत्यशोधनाकरिता आलेलो आहे आणि या कामात आनंद मिळतो म्हणून काम करतो आहे. हा आनंद जोपर्यंत वाटणार आहे तोपर्यंत मी काम करणार आहे."
एका माणसाने दुसऱ्याकरिता करुणेपोटी काम करावे हे दोघांनाही घातक आहे, असे मी मानतो. मी जर का सुरुवातीलाच डोळ्यांतून पाण्याचे चार थेंब गाळीत मांडणी केली असती तर, माझी खात्री आहे, मी आतापर्यंत 'महात्मा' पदवीला पोहोचलो असतो; पण हे मी जाणीवपूर्वक टाळत आलो. एवढेच नव्हे तर, शेतकरी समाजाचे पूज्य संत ज्ञानेश्वर, तुकाराम या दोघांच्या विरुद्धची शिकवण आम्ही आमच्या शिबिरांत देतो. कारण, समाजाला एका विवेकाच्या पायरीवर आणून ठेवायचे आहे. त्यामुळे, कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारत नाही. अशी आम्ही गद्य माणसे असल्यामुळे, नानासाहेब गोरे म्हणाले त्याप्रमाणे, आमच्याकडे कवि माणसे वळत नाहीत, तयार होत नाहीत.
मी शेतकरी जीवनाचे उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते खेड्यातले जीवन, काय ती हिरवी झाडे, काय ती स्वच्छ हवा, कसे ते झुळझुळ झुळझुळ वाहणारे पाणी, शेतावर असणे म्हणजेच परमेश्वराच्या सानिध्यात असणे वगैरे सांगण्याचा वाह्यातपणा मी काही केला नाही.
शेतकरी असणे ही एक जीवनपद्धती आहे. इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये तिचे महत्त्व होते; पण पुढे, जितकी माणसे शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील तितका त्या समाजाचा विकास आहे. फक्त, शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेले वरकड. मूल्य लुटून नेणारे, शेतकऱ्यांची संपदा लुटून नेतात आणि शेतकऱ्याला मागे ठेवतात. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांतील महत्त्वाची आकडेवारी कोणती? शेतीवरील लोकसंख्या जवळजवळ कायम - ७४ ऐवजी ७० %- आहे; आणि शेतीचा राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा मात्र ६४ % वरून आज २३% वर आला आहे. शेतीतील मालमत्ता बाहेर घेऊन जायची आणि माणसे तिथेच ठेवायची, हे होऊ नये, हे इतिहासाच्या विरुद्ध आहे, हे निसर्गाच्या विकासाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे अशी मांडणी आम्ही करत आलो.
सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक Don Quixote लपलेला असतो, एक स्वप्नरंजन असते, प्रत्यक्षात न जमलेले भव्य दिव्य असे काही तरी आपण करत असतो. अशी छुपी : आत्मवंचना असते. वेळोवेळी असे अनेक Don Quixote माझ्या स्वत:च्या मनामध्येही निर्माण झालेले आहेत. कधी कधी मी स्वत:ला सॉमरसेट मॉमच्या The moon and six pence या कांदबरीतील Stock broker नायकाच्या जागी कल्पिलेले आहे. तर कधीकधी मी शरदबाबूंच्या सव्यसाची मधील डॉक्टर बनलो आहे. कधी कधी मी स्वत:ला एखाद्या आध्यात्मिक प्रेषिताच्या जागी कल्पिलेले आहे. या सगळ्या अनुभवांतून मी स्वत: गेलेलो असल्या कारणाने स्वयंस्फूर्त क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधला Don Quixote मला लगेच ओळखू येतो.
मला वाटते, माणसाची खरी प्रगती अगदी वेगळ्या कारणांतून होत असते. इतिहासाचा प्रवाह ही भिंत पाडण्याकडे आहे; परंतु समाज मान्यता देतो ती मात्र भिंती उभारणाऱ्यांना मग ती भिंत राष्ट्राची असो, धर्माची असो, जातीची असो की भाषेची. तैमूरलंग, चेंगीझखान, औरंगजेब, नादीर शाह यांना आपण क्रूरकर्मा ठरवले आहे; पण त्यांनी जगभर केलेल्या स्वाऱ्यांमुळे भिंती पाडण्याच्या या ऐतिहासिक विकासप्रक्रियेलामोठी चालना मिळाली. कोलंबसने अमेरिका शोधली तीदेखील तिथल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी नव्हे. तर व्यापारातून होणारा फायदा वाढावा म्हणून. Cupidity often brings greater benefits than greatness (महानतेपेक्षा खूपदा स्वार्थातून माणसाचा जास्त फायदा होतो.)
आपण सर्व 'युद्ध नको, युद्ध नको' असे म्हणत असतो; पण या युद्धामुळेच विकासाला सर्वांत जास्त चालना मिळाली आहे असे समाज सांगतो. सगळे जग जवळ आणणारे आजचे Computers, Internet किंवा अन्य सेटेलाईट कम्युनिकेशन किंवा अगदी विमाने हीसुद्धा युद्धासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच झालेली निर्मिती आहे. तुमच्यातील जे सर्वोत्कृष्ट असते ते युद्धप्रसंगी नेहमीच उफाळून येते. War brings out the best in men.
खूपदा माझ्याकडे अनेक तरुण मंडळी, 'आम्हाला शेतकऱ्यांची सेवा करायची आहे,' असे म्हणत येतात. शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे वगैरे उद्योगधंदे त्यांना सुरू करायचे असतात. "आम्हांला स्वत:ला याच्यातून काही नकोय," असा त्यांचा दावा असतो. पुन्हा एकदा तीच 'आर्तिनाशनम्'ची भाषा!
मला अशा लोकांची खूप भीती वाटते. मी त्यांना म्हणतो, "तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून काही करू नका. तुम्हांला जे काही करायचे असेल ते स्वत:च्या भल्यासाठी करा.' दुसऱ्याचे भले करायला निघालेली मंडळी जवळ आली, की माझी आवडती लेखिका आयन रॅन्ड हिच्या शब्दांत सांगायचे तर, "Laper's bells start ringing"
मी 'युनायटेड नेशन्स' मधली नोकरी सोडून येथे आलो त्याचे कारण माझी बुद्धिनिष्ठा हे आहे. गरिबीचा उगम नेमका कुठे आहे, याचा मला शोध घ्यायचा होता. स्वत:च्या शेतात राबता राबता मला त्याचा शोध लागला. शेतावरून उठलो ते थेट कांद्याच्या आंदोलनाला बसलो. अंगावरची जीन्स काढून खादीचा कुडता-पायजमा चढवण्याइतकी फुरसतही मला तेव्हा नव्हती. मागे परतायचे सगळे रस्ते, सगळे बंध मी तोडून टाकले, 'शेतीमालाला रास्त भाव मिळायला हवा' या एकमेव कामासाठी स्वत:ला झोकून दिले.
Nothing is sweeter than the smell of the burnt bridges असे म्हणत त्याचा मी गेली वीस वर्षे अनुभव घेतो आहे.
ॲडम स्मिथचे The wealth of nations हे माझे आवडते पुस्तक आहे. भांडवलशाहीचा पाया या पुस्तकाने घातला; पण याच लेखकाने नंतर Theory ofmoral snetiments ही देखील मांडली. तिच्यावरही माझा विश्वास आहे. इतरांसाठी काहीतरी करावे, हीदेखील स्वार्थाप्रमाणेच एक मूलभूत मानवी प्रेरणा आहे, असे मी मानतो. आपल्या भोवतालच्या दु:खी माणसाच्या जागी स्वत:ला कल्पणे, त्यातून त्याच्या दु:खांची अनुभूती घेणे आणि ते दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करणे हीदेखील एक मानवी प्रेरणा आहे हे मला मान्य आहे. ॲडम स्मिथच्या enlightened self-interest मुळे जगात हाहाकार उडणार नाही याचे कारण moral sentiments या मध्ये आहे. परंतु याचा आणि आजच्या स्वयंस्फूर्त कार्याचा काहीही संबंध नाही.
आजवरच्या सामाजिक इतिहासाचा आपण जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल, की ज्या प्रकारचा विकास या कार्यातून घडायला हवा, त्या प्रकारचा विकास या कार्यातून कधीही साधला जाणे शक्य नाही. विकासामागच्या प्रेरणा या अगदी वेगळ्या असतात. या देशातील जे स्वयंस्फूर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले, त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वत:ची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅच वर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती हे सगळे विचारात घेता, अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मी एक पराकोटीचा व्यक्तिवादी, individualist माणूस आहे. व्यक्ती हेच विचाराचे केंद्र आहे, समाजाचे केंद्र आहे, निर्मितीचे केंद्र आहे. व्यक्तीची काळजी घेतली तर समाजाची काळजी घ्यायची काहीही आवश्यकता नाही.
समाजसेवेच्या प्रेरणा कितपत विशुद्ध आहेत, याचा कस लावण्यासाठी एक साधी कसोटी आहे. जो एक विशेष प्रश्न सोडवण्याचा आविर्भाव असतो, त्या प्रश्नाच्या मुळावर घाव घातला आणि तो प्रश्नच संपवून टाकला, तर त्या कामातल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय असेल? कामगारचळवळींनी वारंवार पगार वाढले, बोनस वाढले, सवलती वाढल्या तरी कामगारांची 'नाही रे' ही परिस्थिती कायमच राहणार. समाजवाद्यांनी कामगारांच्या शोषणाचा प्रश्न हाताळण्याची पद्धत अशी काढली, की कामगारांचे शोषण चालूच राहावे. गरीबीच राहणार नाही असे म्हटले तर समाजवादी अशी शक्यताच नाकारतील. फार तर, क्रांतीनंतर 'नाही रे'च्या हुकूमशाहीतच मालमत्तेच्या हक्काचे संबंध उलथेपालथे झाल्यानंतर गरिबी संपू शकेल, असा ते वितंडवाद घालतील; पण, 'नाही रे'च्या हुकूमशाहीपेक्षा त्यांना 'आहे रे' बनवून 'आहे रे'ची लोकशाही तयार होण्याची शक्यता ते मुळात फेटाळूनलावतील.
गावागावांत आरोग्यसेवा नाहीत, त्यासाठी गावोगावी दाईसुईणींचे जाळे तयार करण्याच्या व्यापक योजना मांडणारे अनेक महाभाग मला भेटले आहेत. या पंचवीस वर्षांत, अगदी बाजाराच्या गावीसुद्धा, दहावीस एमडी/एमएस डॉक्टर, दंतवैद्य, नेत्रतज्ज्ञ, पॅथलॉजिस्ट यांची गर्दी उसळली आहे. गंमत अशी, की अजूनही हे महाभाग आपापल्या संस्थांचे देशीपरदेशी परिसंवाद भरवीत असतात. आपण हाती घेतलेला प्रश्न व्यावहारिक भविष्यकाळात तरी सुटणे शक्य नाही, अशा गृहीत तत्त्वावर बहुतेक स्वयंसेवी संघटना चालतात. तो प्रश्न नाहीसा झाला, तरी त्यांच्या सेवांची गरज संपलेली नाही, उलट त्यांच्या सेवेला एक नवीन परिमीती लाभली आहे, असे ते आग्रहाने मांडतात.
एके काळी कुष्ठरोग ही एक महाभयंकर समस्या होती. महात्मा गांधींनी कुष्टरोग्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले, त्यातून अनेकांनी स्फूर्ती घेतली; आपापले आश्रम, नगरे, वने स्थापली. उदंड सरकारी आणि खाजगी निधी मिळवले; पण, कुष्ठरोग मुळातूनच नष्ट करण्यासाठी लागणारे संशोधनाचे कार्य कोणी हाती घेतले नाही. कोण्या अनामिक संशोधकाने ते केले. त्यामुळे कुष्ठरोग आता साध्य बनला. त्याची किळसही फारशी राहिली नाही; पण, तरी त्यांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या महात्म्यांच्या धुपारत्याशेजारत्या चालूच आहेत. कुष्ठरोग संपला तर दुसऱ्या कोणाच्या सेवेचे काम घेऊ! कोणा दुष्टाने हा कुष्ठरोग संपवला कोण जाणे! पण, त्यामुळे आमच्या विभूतीतील ज्वाला आणि फुले संपली नाहीत, असा त्यांचा निर्धार आहे.
अलीकडे स्वयंसेवी संस्थांना एक नवे कुरण सापडले आहे, ते एड्स रोगाशी सामना करण्याचे सरकार या कामासाठी करोडोंनी रुपये वाटत आहे. भंडारा जिल्ह्यातील एक जुना कार्यकर्ता अलीकडे मला भेटला होता. तो आता स्वयंसेवी संस्थांच्या बरकतीच्या धंद्यात बस्तान मांडून आहे. अलीकडेच त्याला एड्ससंबंधी एक मोठा सरकारी प्रकल्प मिळाल्याचे त्याने मला मोठ्या आनंदाने सांगितले, मी त्याचे कौतुकही केले. परंतु माझ्या मनातील शंकाही मी त्याला सांगितली. लोकसंख्या आटोक्यात राहावी यासाठी कुटुंबनियोजनाच्या झेंड्याखाली गर्भाचा आईच्या पोटातच नाश केला जातो. याउलट, म्हाताऱ्यांना मात्र अत्याधुनिक लाईफ सपोर्ट सिस्टिम वापरूनही जिवंत ठेवण्याचा आटापिटा चालतो. वृद्धांना समाजात आदराचे स्थान दिले गेले पाहिजे, त्यांना पूर्वीच्या काळाप्रमाणे. 'काशीमरणा'साठी सोडून चालणार नाही हे मान्य आहे. पण लोकसंख्यानियंत्रणासाठी जो जन्माला येईल, त्याला अखेरपर्यंत समाजाने खाऊ घालावे,शिकवावे, कामधंद्यास लावावे आणि शेवटपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवावी, याचे ओझे समाजासच पेलणार नाही.
एड्सची लागण झालेल्यात अनेक शुद्ध चारित्र्याचे लोकही आहेत. रक्तपेढ्यांच्या, दंतवैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे HIV पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्याही कमी नाही. पण तरीही, एका बाजूने अंकुरत्या गर्भाची सरसहा कत्तल करावी आणि दुसऱ्या बाजूला स्वत:च्या बदचलनाने रोग ओढवून घेण्याऱ्या लोकांना कोट्यवधी रुपये खर्चुन आटापिटीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा, हे तर्कशास्त्र मला काही समजेना. मी त्या कार्यकर्त्याला जुन्या ओळखीचा फायदा घेऊन याबद्दल सरळ प्रश्न विचारला. त्यानेही तितक्याच खुलेपणाने उत्तर दिले,
"काय बरे, काय वाईट, सरकार ठरवेल. सध्या आमच्या संस्थेला निधी मिळतो आहे आणि त्यातून दहावीस लोकांना पोटाला लावता येईल ना?"
स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी खरेच आत्मचिंतन केले आणि त्यांच्या तोंडून एवढा जरी कबुलीजबाब मिळाला, तरी 'वाल्या'चा 'वाल्मीकी' बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
(अंतर्नाद, दिवाळी १९९९)
■ ■