बुध-बृहस्पतींची कहाणी

ऐका बुधबृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहींत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, “असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले.” सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं. ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, “आम्हीं संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे. आतां आम्ही पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासीं दर बुधवारीं आणि बृहस्पतवारीं जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ति पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावें पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढतें आहें.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केला. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दौंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हांकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा तीं अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागले, तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविलि. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं. तूप वाढूं सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.

जशी त्यांवर बुध-बृस्पतींनीं कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.