भारता'साठी/तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य



तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य


 ११ मे २००१ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे 'तंत्रज्ञान दिवस' साजरा व्हायचे ठरले होते. प्रत्यक्षात कोठे एखादा किरकोळ सभासमारंभ झाला असेल. माझ्या तो नजरेत आला नाही; इतर कोणाच्याही आला नसावा. त्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रात भली पानभर जाहिरात मात्र नजरेत भरली. एक पानी जाहिरात म्हणजे कित्येक लाखांचा खर्च: पण कोणत्याही केंद्रीय मंत्रालयाला असल्या खर्चाची फारशी फिकीर वाटत नाही. नागरिकांत उत्साह असल्याखेरीज कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाहीत; जाहिरात दिल्याने खुर्चीत बसल्या बसल्या प्रसिद्धीचे काम होऊन जाते.

 जाहिरातीच्या अग्रभागी उपराष्ट्रपती व स्वतः पंतप्रधान यांचे फोटो आणि त्यांच्या बरोबरच मानवसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी आणि शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री बाची सिंग रावत यांचे फोटो आणि संदेश.

 झपाट्याने एक होणाऱ्या जगात तंत्रज्ञानातील सामर्थ्य जोपासायचे असेल तर आपल्या नीतिमूल्यांची सातत्याने तपासणी करावी लागेल. - कृष्णकांत, उपराष्ट्रपती

 नवीन शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, समाज, शासन आणि पर्यावरण यांचा संगम महत्त्वाचा ठरणार आहे. - अटलबिहारी वाजपेयी, प्रधानमंत्री

 भविष्यातील ज्ञान हे सामाजिक गरजांशी निगडित असले पाहिजे. त्यात माणुसकीची जोपासना पाहिजे आणि त्यातून टिकाऊ तंत्रज्ञान उपजले पाहिजे. - मुरली मनोहर जोशी, मानसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री

 आज सतत विकसनशील, प्रसरणशील आणि परिवर्तनशील अशा विविध व संयुक्तिक तंत्रज्ञानांची जोपासना ही आत्यंतिक गरज आहे. - बाची सिंग रावत,

विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री

 टिोंच्या खालोखाल संस्कृतातील एक वैदिक प्रार्थना. नुसते 'शांतिः शांतिः शांतिः' असे नेहमीप्रमाणे न म्हणता आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, पाणी, औषधी वनस्पती इत्यादी इत्यादी अशी मोठी यादी जोडली आहे आणि या सर्वांना 'शांती असो' अशी ही प्रार्थना.  'तंत्रज्ञान दिवस' साजरा करायचा तर त्यासाठी 'तमसो मा ज्योतिर्गमय,' अशी गतिशील प्रार्थना अधिक उचित झाली असती. शासकीय तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाला प्रगतीपेक्षा शांतीची आस अधिक असावी. जाहिरातीतील वेगवेगळ्या मथळ्यांत तंत्रज्ञान कसे असले पाहिजे यासंबंधी काही घोषणावाक्ये आहेत. उदाहरणार्थ,

 'तंत्रज्ञान शोषणविरहित असले पाहिजे'

 'तंत्रज्ञान पर्यावरणसुष्ट असले पाहिजे'

 'पर्यावरण नवनवोन्मेषशाली असले पाहिजे'

 'पर्यावरण सर्वार्थाने उचित पाहिजे.'

 सारी एकूण प्रसिद्धी पाहिली की, हा सारा खटाटोप तंत्रज्ञानाचे सामर्थ्य आणि माहात्म्य सांगण्याकरिता आहे की त्याला जेरबंद करण्याकरिता आहे यासंबंधी मनात संभ्रम तयार व्हावा.

 सारे जग जैविक तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करते आहे. चीन, ब्राझीलसारख्या देशांतही काही पिकांखालील निम्म्यावर जमीन जैविक बियाण्यांखाली गेली आहे. या तंत्रज्ञानाच्या आधाराने तयार झालेल्या स्वस्त वरचढ मालाशी स्पर्धा करणे भारतीय शेतकऱ्यांना अशक्यप्राय झाले आहे याचा या प्रसिद्धीत कोठे उल्लेखही नाही.

 अनेकांच्या मनांत 'तंत्रज्ञान' हा अभद्र शब्द झाला आहे. ठेंगू लोकांच्या देशात गलिव्हर खलाशी शिरल्यावर या अजस्र माणसाला शक्यतो निष्प्रभ कसे करता येईल याची चिंता साऱ्या ठेगूंना पडली तद्वत, काय वेगवेगळ्या प्रकारांनी खटपट करावी म्हणजे आपल्या संकल्पनांची इस्त्री बिघडणार नाही याचीच प्रमुख चिंता तंत्रज्ञानविरोधी भारतीयांना वाटत आहे. जबाबदार नेत्यांची वर दिलेली अवतरणे हीच बुद्धी दाखवितात.

 तंत्रज्ञानाचा असा दुस्वास का?

 प्रतिभेच्या स्पर्शाला वंचित राहिलेल्या सामान्य जनांना आणि धडाडीविषयी दडस असलेल्या जनसामान्यांना प्रतिभेचा उन्मेष आणि पराक्रम यांच्याविषयी

नेहमीच छुपा दुस्वास वाटतो. संशोधक, यशस्वी कारखानदार, व्यापारी यांच्याविषयी काहीतरी खोडी शोधून त्यांना दूषणे देण्याची आपली परंपरा फार जुनी आहे.

 'तंत्रज्ञान चांगले हो, पण गरीबांचे काय? निसर्गाचे काय' असे प्रश्न ते विचारतात आणि यच्चयावत् प्रतिभाशून्यांचे आवडते जीवनमूल्य 'विषमता निर्मूलन' याचा आधार घेऊन ते आघाडीवर जाणाऱ्यांचे पाय ओढू पाहतात.

 तंत्रज्ञानाचे विरोधक सर्वत्र आढळतात. ते जेट विमानांतून प्रवास करतात; इंटरनेट, इ-मेलवर एकमेकांशी संपर्क साधतात; हातातील मोबाईल फोन एखाद्या निशाणाप्रमाणे फडकावतात; अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालयात औषधोपचार घेतात आणि तेथील उपचाराने जीव वाचवत असताना आधुनिक उपचारव्यवस्था आणि तंत्रज्ञान यांच्यावर निःसंकोचपणे दुगाण्या झाडीत असतात. तंत्रज्ञानाचे विरोधक तंत्रज्ञानाच्या रसाळ फळांचा निग्रहाने त्याग करून विरक्त बुद्धीने जगणारे साधुसंन्यासी नाहीत; ज्या हाताने भरविले त्यालाच चावणारी ही जमात आहे.

 'माल्थस'पासून ते 'रोम क्लब'च्या अर्थशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांनी 'पृथ्वीला आता माणसांचा भार असह्य होतो आहे' अशी हाकाटी दिली आणि मोठ्या उत्पाताचे इशारे दिले. प्रत्यक्षात लोकसंख्या प्रचंड वाढली तरी इतिहासातील कोणत्याही कालखंडापेक्षा आज, अगदी सामान्य-जनसुद्धा अधिक चांगले खातात, पितात आणि जगतात. केवळ पस्तीस वर्षांपूर्वी हिंदुस्थान अन्नधान्याच्या भिकेवर जगत होता. पाचदहा वर्षांत तो अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला याला कारण कोणी सरकार नाही, तर हरित क्रांतीचे तंत्रज्ञान आहे. पूर्वी माणसे भर विशीतिशीत आजाराने, साथीच्या रोगाने मरून जायची; आज आयुष्यमान दुप्पट झाले याचा वरदाता वैद्यक तंत्रज्ञान आहे, कोणतीही सरकारी योजना नाही.

 हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांचे पुरे आयुष्य पाणी भरण्यात आणि सरपण जमा करण्यात जाते. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत या मायबहिणींच्या आयुष्यात काही थोडा दिलासा आला असेल तर तो तंत्रज्ञानाने बहाल केलेल्या शिवणयंत्राने, पिठाच्या गिरणीने आणि इंजिन किंवा मोटर यावर चालणाऱ्या पाण्याच्या पंपाने.

 मग, अशा 'सर्वहितेषु' तंत्रज्ञानाचा इतका व्यापक रागराग का होतो?

 पोपट गोड बोलतो, त्याच्या नशिबी पिंजरा येतो; स्त्रिया प्रजनन करतात, त्यांना दुय्यम स्थानी ठेवले जाते; शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतात, त्यांना वेठीस धरले जाते. या सर्वांप्रमाणेच तंत्रज्ञान गुणाकारी असते, कदाचित् याच कारणाने त्याचा द्वेष सारे अनुत्पादक वर्ग करीत असतात.

 सूर्योदयाला विरोध करणारी ही जात काही नवीन नाही. आदिमानवाने चाकाचा

शोध लावला त्या वेळीही 'या चाकाने प्रचंड गती येईल, मनुष्यजातीचा विनाश ओढवेल' असा आरडाओरडा करणारे आजच्या पर्यावरणवाद्यांचे पूर्वज त्याही वेळी नक्की असतील. वाफेचे इंजिन झुक झुक करीत रुळांवर धावू लागले तेव्हातर पर्यावरणाच्या नावाखाली तंत्रज्ञानाच्या विरोधकांनी हैदोस घातला. जैविक तंत्रज्ञान उदयाला येत असताना त्याला विरोध करणारे हे प्रमुखतः गतिविरोधी परंपरेतील आहेत. इतिहासाने यांना प्रत्येक पायरीला खोटे ठरविले आणि माणसाच्या प्रगतीची दिशा नवनवोन्मेषशाली विज्ञानात आहे हे दाखवून दिले; पण, हे पठ्ठे काही नवे शिकायलाच तयार नाहीत.

 सर्व मानवजातीच्या कल्याणाकरिता कामी आलेली एकमेव गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. जानकीच्या विशुद्धतेविषयी संशय घेऊन तिला अग्निदिव्य करायला लावणाऱ्यांची जमात आजही तंत्रज्ञांच्या भूमिकन्येस तिच्यावर भलतेसलते आळ घेऊन अग्निदिव्यास सामोरे जाण्यास भाग पाडीत आहेत. याला आघाडीवरील वैज्ञानिक काही प्रमाणावरतरी जबाबदार आहेतच. त्यांना ती जबाबदारी नाकारता येणार नाही.

 संशोधनाच्या प्रचंड शर्यतीत एकजण जिंकतो, बाकी सारे अनामिक होऊन जातात, अयशस्वी प्रेमवीराप्रमाणे त्यांतील अनेकजण प्रियवस्तूंचा घात करायला तयार होतात. जैविक तंत्रज्ञानाला युरोपीय देशांत कडवा विरोध होतो. जर या तंत्रज्ञानातील महत्त्वाचे श्रेय अमेरिकेतील शास्त्रज्ञांऐवजी युरोपीयन शास्त्रज्ञांना मिळाले असते तर हा विरोध उपजलाच नसता, कदाचित्.

 एका काळी तंत्रज्ञानाच्या आघाडीवर असलेले नवीन तंत्रज्ञान आले म्हणजे जीवाच्या आकांताने त्याला विरोध करतात. हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाच्या काळात ज्यांनी रासायनिक खते व औषधे या उद्योगधंद्यात अफाट पैसा कमावला, ते जैविक तंत्रज्ञानाने आपल्या पोटावर पाय येतो अशी भीती वाटताच सारा पैसा जैविक तंत्रज्ञानाच्या विरोधकांच्या पाठिंब्यासाठी खर्चू लागले.

 मागे पडलेले आणि कालबाह्य झालेले शास्त्रज्ञ शास्त्रच उद्ध्वस्त करायला निघालेल्यांशी हातमिळवणी करायला निघतात हे दुर्दैव खरे; पण त्याही पलिकडे, यशस्वी शास्त्रज्ञांनीही विज्ञानयुगास आवश्यक अशी कामगिरी बजावण्यास कुचराई केली आहे. अगदी गेल्या शतकापर्यंतच्या मोठ्या शास्त्रज्ञांचे लिखाण वाचले तर त्यांनी, कामगिरीच्या संदर्भात का होईना, एक विश्वदर्शन उभे करण्यासाठी चिंतन केलेले दिसते. समाजव्यवस्थेविषयी काही निष्कर्ष काढलेले दिसतात. काही अपवाद सोडल्यास नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या दार्शनिक

निष्कर्षाचा शोध बाजूस पडला आहे. नव्या शास्त्रज्ञांना, कदाचित् असल्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सवड नसावी; पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य आणि विज्ञानदृष्टी प्राणपणाने जपणे व त्यासाठी, आवश्यक तर, सामाजिक, राजकीय संघटन आणि संघर्ष अपरिहार्य आहे.
 ही सामाजिक जबाबदारी वैज्ञानिकांनी पेलली नाही आणि ते केवळ नवनवे संशोधनच करीत राहिले तर त्यांची स्थिती उत्तमोत्तम बियाणे तयार करून जमिनीच्या मशागतीची काळजी न करणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे होईल. तंत्रज्ञानाविषयी समाजात दुस्वास आहेच; तो असाच वाढू दिला तर सध्या जैविक बियाण्यांच्या प्रायोगिक शेतीवर हल्ले होतात, उद्या प्रतिभाशून्यांच्या झुंडी साऱ्या विज्ञानशाळांना नष्ट करण्यासाठी घोंघावू लागतील. शेवटी सीतेप्रमाणेच तंत्रज्ञानालाही 'भूमिमाते, मला तुझ्या पोटात घे' म्हणण्याची वेळ न येवो!

(२१ मे २००१)

◆◆