भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म/महाभारतातील व्यवहार नीती अथवा राजनीतिशास्त्र




३. महाभारतातील व्यवहारनीती अथवा
राजनीतिशास्त्र

व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
 भारताच्या राष्ट्रीय प्रपंचात सध्या अनेक बिकट समस्या निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानावर व भारतातील पाकिस्तानी वृत्तीवर आपण किती गाढ प्रेम करावे, पाण्याच्या प्रश्नात, कर्जाच्या प्रश्नात, आपल्या देशातून पाकिस्तानला लोहमार्ग करून देण्याच्या प्रश्नात स्वराष्ट्राचे अहित करूनही प्रत्येक वेळी पाकिस्तानला झुकते माप किती द्यावे, एकपक्षी करार किती पाळावे, केवळ शब्द दिला होता म्हणून बेरुबारीचा टापू पाकिस्तानला देणे योग्य आहे काय, रशिया, चीन यांच्या राज्यकर्त्यांवर किती विश्वास ठेवावा, आपल्या व्यापाऱ्यांना चीनने उधळून लावले असतानाही भारतातील चिनी व्यापाऱ्यांवर आपण किती प्रेम करावे, चीनने आक्रमण केले असताना चीनशी सहानुभूती दाखविणाऱ्या लोकांना अत्यंत महत्त्वाची सरकारी अधिकारपदे द्यावी की नाही; नेपाळ, भूतान येथील कटकटी दूरदृष्टीने जाणून त्यांना भारतात सामील करून टाकणे इहलोकी व परलोकी कितपत पुण्यप्रद होईल; रशिया, इजिप्त यांच्या मैत्रीवर किती प्रमाणात विश्वास ठेवावा, आपल्या देशात येऊन गोड भाषणे करून जाणाऱ्या परदेशी पाहुण्यांची आश्वासने आपण कितपत मानावी, स्वराष्ट्रापेक्षाही सर्व जगाच्या कल्याणाची चिंता भारताला जास्त आहे, असा गौरव ते करतात त्याने आपण कितपत भुलून जावे; सत्य न्याय, अहिंसा यांचाच अखेरीस जय होतो असा दृढ विश्वास धरून आपण किती निश्चिंत राहावे, असे व या प्रकारचे अत्यंत जटिल व गहन प्रश्न आपल्यापुढे उभे आहेत अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की असल्या राजनैतिक समस्यांची महाभारतात जी चर्चा आहे व तिच्या आधारे तेथे जे सिद्धांत सांगितले आहेत ते वाचीत असताना ती चर्चा आजचे प्रश्न प्रत्यक्ष डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहे असे वाटते. शेकडो वर्षे झाली तरी मानवी स्वभाव अणुमात्र बदललेला नाही असे हा भाग वाचताना आपल्या प्रत्ययास येत असते. आणखी एक गोष्ट ध्यानात येते. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी ही सर्व राष्ट्रे महाभारत डोळ्यासमोर ठेवूनच पदोपदी वागत आहेत; श्रीकृष्ण, भीष्म, नारद यांचेच सिद्धांत त्यांनी शिरोधार्य मानले आहेत याची पदोपदी खात्री पटत असते. मन व्याकुळ करणारी आणखी एक गोष्ट आहे. महाभारतातील राजनीतीच्या या सिद्धांताना हेटाळणारा, त्या थोर व्यवहार-विशारदांच्या मतांना तुच्छ मानणारा, आणि त्या इतिहास पुनीत तत्त्वांची दरक्षणी पायमल्ली करणारा जगात एकच देश आहे. तो कोणता ? महाभारत जेथे जन्माला आले तो आपला भारत !
 आजच्या या सत्य-अहिंसा-पंचशीलांच्या काळात महाभारताचा अभ्यास करण्यास सांगणे हे सुद्धा भारतीयांना अपमानास्पद वाटण्याचा संभव आहे. तरी पण या प्राचीन ग्रंथात राजनीतीसारख्या अत्यंत गहन शास्त्राचा विचार तरी कसा केला आहे हे कुतूहल म्हणून तरी भारतीयांनी पाहावे असा माझा आग्रह आहे. आणि त्या हेतूनेच पुढील विवेचन केले आहे.

समस्या

 महाभारतात पुढीलप्रमाणे अगदी विरुद्ध अर्थाची वचने अनेक ठिकाणी सापडतात.
 १. सर्वभूतहितः साधुः असाधुः निर्दयः स्मृतः । वन.३१३।९२
 सर्व भूतांच्या हितासाठी झटतो तो साधू व निर्दयतेने वागतो तो असाधू (दुष्ट) होय.
 २. वेदाऽहं तव या बुद्धि: अनृशंस्या अगुणैव सा । शां. ७५
 तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा स्पर्शही नाही हे मी जाणून आहे. पण अशा प्रकारची बुद्धी व्यर्थ होय.
 एका ठिकाणी दयेची महती सांगितली आहे तर दुसऱ्या ठिकाणी क्रूरत्वावाचून सर्व व्यर्थ होय असे म्हटले आहे.
 त्याचप्रमाणे पुढील वचने पाहा-
 १. ना सो धर्मो यत्र न सत्यमस्ति ।
 न तत् सत्यं यत् छलेनाभ्युपेतम् । - उद्योग ३५/५८
 ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे व जे कपटाने दूषित असेल ते सत्य नव्हे.
 २. कृतं मम अप्रिय तेन येनायं निहतो मृधे
 इति वाचा वदन् हंतॄन् पूजयेत रहोगतः । - शां. १०२।३७
 या शत्रुवीराचा लढाईत ज्याने वध केला त्याने माझे अत्यंत अप्रिय केले आहे, मला दुखविले आहे असे बाह्यतः म्हणावे, पण अंतस्थ रीतीने त्या शत्रूला मारणाऱ्याचा गौरव करावा.
 सत्य नसेल, कपट असेल तर तो धर्मच नव्हे, असे एकदा सांगितले आहे, पण अन्यत्र कपटाचरणाचा, असत्याचा जाणून-बुजून उपदेश केला आहे.
 ही परस्परविरुद्ध, अत्यंत विसंगत अशी वचने पाहिली म्हणजे महाभारतात कशाचा नेमका उपदेश करावयाचा आहे हे ध्यानात येणे कठीण होऊन बसते. अशी वचने एक दोन ठिकाणी असती तर ती उपेक्षणीय म्हणून सोडून देता आली असती. पण तसे नाही. अशी विरोधी वचने महाभारतात शेकड्यांनी सापडतील. बरे ही वचने काही सामान्य माणसांच्या तोंडीच आहेत असे नाही. तर श्रीकृष्ण, भीष्म, व्यास यांसारख्या थोर प्रज्ञावंत पुरुषांनी केलेला हा उपदेश आहे. अर्जुन हा धर्मराजाला मारण्यास सिद्ध झाला त्या वेळी, 'अहिंसा हा माझ्या मते सर्वात श्रेष्ठ धर्म होय,' असे कृष्णाने त्याला सांगितले. -(कर्ण ६९); उलट कर्णवधप्रसंगी त्याने काय उपदेश केला ? अर्जुनाच्या एका बाणाने कर्ण घायाळ होऊन मूर्च्छित झाला. तेव्हा अशा स्थितीत त्याच्यावर दुसरा बाण टाकून त्याला ठार मारणे अर्जुनाला प्रशस्त वाटेना. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाला, 'अर्जुना, तू वेडा तर नाहीस ना ? अरे, शत्रू दुर्बल झाले म्हणजे केव्हाही ज्ञानी लोक त्यांचा नाश करण्यास विलंब लावीत नाहीत. बाबा रे शत्रूचा वध करणे तो विशेषेकरून तो संकटात असतानाच केला पाहिजे. शहाण्याने अशा स्थितीत शत्रूचा नाश केल्यास त्याजकडून धर्माचरण घडून शिवाय त्यास कीर्तीही मिळते, यास्तव, हे अर्जुना, तुझा बलाढ्य शत्रू जो कर्ण त्याला वधण्याची त्वरा कर.' -(कर्ण ९०).
 पितामह भीष्मांनी तर एके ठिकाणी असे स्पष्ट सांगितले आहे की "विजयाची इच्छा करणारे राजे धर्म व अधर्म या दोहोचेही अवलंबन करून वागत असतात. केवळ धर्माचे अवलंबन केल्यास त्यांची कार्यसिद्धी होत नाही.” –(शांति ८०).
 अशी अनेक विसंगत, विरोधी वचने पाहिली म्हणजे ही नकळत, किंवा दुर्लक्षामुळे झालेली गोष्ट नसून त्या परस्पर- विरोधात काही तरी मोठा अर्थ आहे, असा उपदेश करण्यामध्ये या थोर पुरुषांचा काही तरी हेतु आहे असे निश्चित वाटू लागते. तो हेतु काय आहे व या विसंगतीचा अर्थ कसा लावायचा ते आता आपण पाहणार आहोत.
 सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शरणागताला अभय, ही अत्यंत श्रेष्ठ धर्मतत्त्वे होत यात शंकाच नाही. आणि मानवजातीला या तत्त्वांच्या उपदेशाचीच जास्त जरूर आहे हेही खरे आहे. पण जगात मानवी व्यवहाराकडे पाहिले म्हणजे अनेक वेळा असे ध्यानात येते की, प्रसंगी काही लोकांशी व्यवहार करताना या तत्त्वांच्या आचरणाला मुरड घातली नाही तर त्या तत्त्वांचा जो मूल-हेतू तोच विफल होतो. अहिंसेचे तत्त्व आपण निरपवाद रीतीने पाळू म्हटले तर त्यायोगे अहिंसा तर नाहीच पण उलट सर्व आप्तस्वकीयांची व शेवटी आपलीही हिंसा होण्याची वेळ येते. म्हणूनच आत्यंतिक अहिंसा हे शुद्ध पापकर्म असून हिंसा हा धर्म आहे असे श्रीकृष्णासारख्यांना सांगणे भाग पडते.
 भारती युद्धानंतर धर्मराजा हा त्या युद्धातील हिंसेच्या कल्पनेमुळे फार विव्हल झाला. तो म्हणाला, 'पितामहा, मी युद्धामध्ये असंख्य वीरांचा वध केला आहे आणि त्यांच्याविषयीचा विचार पुनः पुन्हा अंतःकरणात येऊन मला ताप होत आहे. या संहारामुळे ज्यांना आज पुत्र, पति आणि बंधू यांचा कायमचा वियोग झाला आहे त्या श्रेष्ठ स्त्रियांची काय बरे अवस्था होईल! खरोखर आपल्या पुरुषांचा वध करणाऱ्या आम्हा पांडवांना शिव्याशाप देत त्या कृश व दीन स्त्रिया भूतलावर व्याकुळ होऊन पडतील; अथवा हे द्विजश्रेष्ठा, आपले पती, बंधू आणि पुत्र हे नाहीसे झालेले पाहून सर्वही स्त्रिया वात्सल्यामुळे प्राणत्याग करून यमनगरीस जातील आणि असे झाले म्हणजे धर्म हा सूक्ष्म असल्यामुळे आम्हांला स्त्रीवधाचे पातक लागेल.
 धर्मराजाचा हा विचार खरोखर मोठा उदात्त आहे व तो पाहून मानवी मन असेच असावे, शत्रूच्या स्त्रियांबद्दलही त्याला असेच कारुण्य असावे, यातच भूषण आहे, असे वाटू लागते. पण त्याबरोबरच हा विचार युधिष्ठिराने खरोखरच अमलात आणला असता तर काय झाले असते याचा जर आपण विचार करू लागलो तर ती उदात्तता टिकत नाही. शत्रूंना मारले तर त्यांच्या स्त्रिया विधवा होतील या भीतीने जर कोणी शत्रुवध करण्याचे नाकारील तर तो शत्रू त्या अहिंसापालकांच्या पक्षाच्या स्त्रियांना विधवा केल्यावाचून राहणार नाही. शत्रूच्या पोरांबाळांची दया केली, तर आपली पोरेबाळे अनाथ होण्याचा प्रसंग येतो. जगाचा न्याय असा कठोर असल्यामुळेच भारतीय थोर तत्त्ववेत्त्यांनी या धर्माच्या थोर तत्त्वांचा मोठा खोल विचार करून त्याच्या अगदी योग्य अशा मर्यादा कोणत्या त्या दाखवून दिल्या आहेत.
 अहिंसा, सत्य, दया यांचा एकांतिक उपदेश करणाऱ्याला जगात मोठी कीर्ती मिळते, सर्वत्र त्याची प्रशंसा होते, शत्रूही त्याचे गुणगान करितात हे खरे; पण प्रत्यक्ष व्यवहारात पाहिले तर असे दिसते की या प्रतिपादनामुळे तो स्वकीयांचा शत्रू ठरतो व त्यांच्या नाशाला कारण होतो. म्हणूनच या तत्त्वांच्या मर्यादेचे उल्लंघन करू नये असे महाभारतात सांगितले आहे.

द्विविधनीती : गृहनीती व परनीती

 या मर्यादेमुळेच नीतीला द्विविध रूप येते. एक गृहनीती व एक परनीती. आपला देश, राष्ट्र किंवा राज्य यातील जे लोक किंवा कोणत्याही अन्य कारणाने ज्यांना आपण स्वकीय समजतो, ज्यांचे आपले सुखदुःख एक आहे असे आपण समजतो, त्यांच्याशी वागण्याचे जे नियम, जे धोरण, ती गृहनीती व ज्यांना आपण परकीय समजून शत्रुसम लेखतो- मग ते कोठलेही असोत- त्यांच्याशी वागण्याचे जे नियम ती परनीती होय. त्यांतील पहिल्या प्रकारच्या म्हणजे गृहनीतीमध्ये सत्य, न्याय, अहिंसा, दया, क्षमा या तत्त्वांचा जितका उत्कर्ष होईल तितका भूषणावहच होय असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे. ज्यांना आपण स्वकीय म्हटले त्यांच्यासाठी कोणताही त्याग हा कमीच ठरेल. असा त्याग करणे हा आपला धर्मच आहे. त्याला जो सिद्ध होणार नाही तो मानव अधम होय असे महाभारतात ठायी ठायी सांगितलेले आढळते. उलट जो शत्रू आहे, जो आज ना उद्या आपला, आपल्या प्रजेचा, राष्ट्राचा घात करील अशी आपली खात्री आहे त्याच्याशी वागताना कोणत्याही प्रकारच्या सत्यासत्याचा, धर्माधर्माचा विचार करू नये, जितके कठोर, क्रूर, कपटी होता येईल तितके होऊन शत्रूचा नायनाट करावा आणि असे करण्यातच धर्माचरण आहे असा भारती तत्त्ववेत्यांनी मोठ्या निर्भयपणे उपदेश केला आहे.

पृथक क्षेत्रे

 महाभारतप्रणीत गृहनीतीचा प्रथम विचार करून नंतर आपण परनीतीचा परामर्श घेऊ. येथे जी गृहनीती किंवा परनीती सांगितली आहे ती मुख्यतः राजाला म्हणजे राष्ट्राच्या पालनकर्त्याला उद्देशून सांगितलेली आहे. व्यक्तीने ते सिद्धांत जसेच्या तसे अनुसरावे असे म्हटल्यास अर्थाचा अनर्थ होईल. "जी कृत्ये आम्ही राष्ट्रासाठी करतो ती आम्ही स्वतःच्या वैयक्तिक संसारासाठी केली तर आम्ही बदमाष ठरू." असे काव्हूरने म्हटले आहे. महाभारतातील हे नीतिप्रकरण वाचताना हेच धोरण ठेविले पाहिजे. प्रजेचे पालन करणे, राष्ट्रात उत्तम व्यवस्था ठेवणे, शासन व्यवस्थित चालू ठेवून बळी तो कानपिळी हा जो मात्सन्याय तो नष्ट करून टाकणे, प्रजा उत्सन्न न होऊ देणे, हे राजाचे आद्यकर्तव्य होय. ते त्याने न केले तर असे पातकच नाही की जे लोक करणार नाहीत. त्यामुळे जगावर कल्पान्त ओढवेल, सर्वच धर्म उत्सन्न होऊन जाईल, माणसे पशू होतील. म्हणून काय वाटेल ते करून शासन हे टिकविलेच पाहिजे, असा भारतकारांचा कटाक्ष आहे. ते टिकविल्यानंतर त्याच्या कक्षेच्या आत मानवाने आपल्या मनाची उदारता, त्यागवृत्ती जितकी व्यापक करणे शक्य आहे तितकी करावी, तोच खरा धर्म होय असे महाभारताचे प्रतिपादन आहे. इतकेच नव्हे तर शत्रुभाव धारण करणारे लोक वगळून बाकीच्या विश्वातील सर्व मानवांच्यापर्यंत आपल्या औदार्याची कक्षा विस्तृत करावी असाही उपदेश त्यांनी केला आहे.
 महाभारतात हे प्रकरण राजाला उद्देशून आहे म्हणून वर सांगितले. सध्याच्या युगात राष्ट्रकार्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. मागल्या काळी ती फक्त राजावर होती. तेव्हा राजाला जी तत्त्वे सांगितली आहेत ती राष्ट्रकार्यार्थ सांगितली आहेत हे ध्यानात घेऊन राष्ट्रकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही गृहनीती व परनीती अनुसरिली पाहिजे. ती व्यक्तीसाठी नाही याचा अर्थ ती व्यक्तीच्या खासगी संसारासाठी नाही. राष्ट्रीय संसारात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिचा अवलंब करणे अवश्यच आहे. त्यातूनही व्यक्तीला खासगी संसारात सर्वथा निषिद्ध अशी फक्त परनीतीच होय. गृहनीतीचे रूप इतके उदात्त आहे की प्रत्येक व्यक्ती ती आपल्या खासगी संसारात आचरणात आणील तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरण्यास मुळीच वेळ लागणार नाही.
 त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे. स्वकीय कोण व परकीय कोण याचे काही निश्चित असे नियम ठरले आहेत असे समजणे चूक होईल. साधारणत: आपल्या समाजाचे रक्षण, त्याचा उत्कर्ष यांच्या आड जो येईल तो 'पर' व यासाठी जो साह्य करील तो 'स्व' असा दंडक मानता येईल, श्री शिवछत्रपतींना राष्ट्रकार्य करावयाचे असल्यामुळे चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे यांनाही पर मानून त्यांचा वध करावा लागला. आपला सावत्र भाऊ व्यंकोजी यावर चाल करावी लागली. इतकेच नव्हे तर दिलीरखानाला मिळून संभाजीने भूपाळगडला वेढा घातला त्या वेळी त्याच्यावर गोळा टाकला नाही म्हणून फिरंगोजी नरसाळ्याची निर्भर्त्सना राजश्रींना करावी लागली. यावरून 'स्व' आणि 'पर' चा उलगडा होईल. पांडव व कौरव हे भाऊ भाऊ होते. असे असून श्रीकृष्णाने कौरवांना परनीती कशी लागू केली अशी शंका येईल म्हणून हे विवेचन केले आहे. पण या विवेचनात खोल जाण्याचे हे स्थळ नव्हे. ज्यांना आपण 'स्व' मानतो त्यांच्याशी कोणत्या नीतीने वागावे व 'पर' मानतो त्यांच्याशी कसे वागावे याचे विवेचन येथे आहे. 'स्व' कोण व 'पर' कोण हे ठरविणे हे स्वतंत्र शास्त्र आहे.

गृहनीती

 गृहनीतीमध्ये पितामह भीष्मांनी राजाला व पर्यायाने सर्व राष्ट्रहितचिंतकांना पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे. 'राजाने सदैव गर्भिणी जसे आपल्या गर्भाचे पालन करते त्याप्रमाणे प्रजेचे पालन केले पाहिजे. ज्याप्रमाणे गर्भिणी आपल्याला स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा त्याग करून आपल्या गर्भाला हितकारक तेच करते त्याप्रमाणे, कुरुश्रेष्ठा, धर्माच्या अनुरोधाने वागणाऱ्या राजानेही निःसंशय तसेच वागले पाहिजे. म्हणजे आपल्याला इष्ट असतील या गोष्टींचा त्याग करून जी जी गोष्ट लोकहिताची असेल ती ती त्याने केली पाहिजे. ज्ञानसंपन्न अशा राजाने चारही वर्णांवर सदैव दया केली पाहिजे. राजा धर्मात्मा व सत्यवक्ता असेल तरच प्रजेचे रंजन होते.-' (शांति ५६). 'कोप न करणारा, व्यसनशून्य, सौम्य शिक्षा करणारा आणि जितेन्द्रिय असा राजा असला म्हणजे हिमालयपर्वताप्रमाणे तो लोकांच्या विश्वासास पात्र होतो. ज्याच्या राज्यात प्रजा आपल्या पित्याच्या घरात असल्याप्रमाणे निर्भयपणे संचार करीत असतात तोच राजा सर्वांत श्रेष्ठ होय. ज्याच्या राज्यामध्ये वास करणारे लोक आपल्या कर्मामध्ये आसक्त, केवळ आपल्या शरीरावरच प्रेम न करणारे, वश्य, शिक्षा मान्य करणारे, आज्ञेत राहणारे, दुसऱ्याला पीडा देण्याची इच्छा न करणारे आणि सत्पात्री दान करण्याची आवड असलेले असे असतात तोच खरा पृथ्वीपती होय.-' (शांति ५७) 'राजाची उत्पत्ती धर्मासाठीच आहे; आपल्या इच्छा तृप्त करण्यासाठी नाही. जो लोकांचे संरक्षण करतो तोच राजा होय हे तू लक्षात ठेव. धर्म हा सर्व प्राण्यांना आधारभूत असून राजा हा धर्माला आधार आहे.' असा आंगिरस कुलोत्पन्न उतथ्यमुनीने उपदेश केला आहे. (शांती ९०) त्याचप्रमाणे वामदेवाने असे सांगितले आहे की, 'राजाने (कोणाही राष्ट्रहितचिंतकाने), लोकांनी प्रार्थना केल्यावाचून त्यांचे प्रिय करावे.'- (शांती ९३). 'जो राजा उत्कृष्टपणे वागणाऱ्या लोकांशी असत्याचरण करतो त्याचा आत्मा परशूच्या योगाने छिन्न झालेल्या वनाप्रमाणे त्या कर्माच्या योगाने क्षीण होतो.'
 गृहनीतीत राजापुढे हे जसे विशाल व उदात्त ध्येय ठेविलेले आहे त्याचप्रमाणे व्यक्तीपुढेही ठेविलेले आहे.

भुञ्जते ते त्वधं पापा ये पंचन्त्यात्मकारणात् । ६,२७,१३

 'जे केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवितात ते पातकी लोक त्या अन्नाच्या रूपाने पापच भक्षण करितात.'
 ही शिकवण फारच उदात्त अशी आहे. आपण अन्न खात असताना आपल्या अनाथ, दरिद्री बांधवांची आठवण ठेविली पाहिजे, न ठेवणे हा मोठा अधर्म होय असे येथे सांगितले आहे. मानवधर्माचे हे खरोखर सारच आहे. परनीतीत अहिंसा, सत्य या तत्त्वांना मर्यादा पडतात असे सांगितले असले तरी गृहनीतीत तसा प्रकार मुळीच नाही. 'अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरळपणाची वागणूक, क्षमा व सावधानता हे गुण ज्याच्यापाशी असतील तो सुखी होईल' असा येथे उपदेश आहे. -(शां.२१५). 'आपल्याला अनिष्ट अशी गोष्ट असेल ती दुसऱ्याच्या संबंधाने करू नये. धर्माचे संक्षिप्त स्वरूप हे असे आहे. याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय.' (१३-११३-८) 'मृत्युलोकी प्राणांपेक्षा प्रियतर असे काही नाही. यास्तव मनुष्याने स्वतःप्रमाणेच दुसऱ्यावरही दया करावी ' (१३, ११६) 'सत्याइतका श्रेष्ठ धर्म नाही. सत्याइतके श्रेष्ठ काही नाही, आणि असत्यापेक्षा अधिक भयंकर असे काही नाही. आपणावर दुसऱ्याने केलेला उपकार जो स्मरत नाही त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते' -(७, १८३, २८). 'पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशी आले असता संतुष्ट होऊन पुढे जातात त्याच्या धर्मापेक्षा कोणता धर्म अधिक आहे?" अशा तऱ्हेची अनेक अमृतवचने महाभारतात पदोपदी सापडतात.
 भारतात ज्या अनेक कथा आहेत त्यांत जाती पंथ, प्रांत, यांच्या अतीत असलेल्या मानवधर्माची उदात्त शिकवण देणाऱ्याही पुष्कळ कथा सापडतात. शिबी अथवा उशीनर नावाच्या धर्मनिष्ठ राजाची कथा अशीच आहे. ससाण्याच्या भीतीने कपोत पक्षी त्याच्या आश्रयास आला. त्या वेळी शिबिराजाने कपोताला अभय दिले. मागून ससाणा आला व 'माझे भक्ष्य परत दिले नाहीस तर तुला अधर्म घडेल,' असे राजाला म्हणू लागला. राजापुढे मोठा पेच येऊन पडला. तरी त्याने शरणागताला अभय देण्याचे आपले थोर व्रत सोडले नाही. त्याने कपोताऐवजी आपल्या शरीरातील मांस घेण्याविषयी श्येनपक्षाला विनविले. त्याने ते मान्य करताच राजाने आपल्या शरीराचे मांस काढून तागडीत टाकण्यास सुरुवात केली आणि ते कपोताच्या वजनाइतके भरत नाही असे दिसताच त्याने आपला सर्व देह तागडीत ठेवून श्येनपक्ष्याला संतुष्ट केले.
 शरणागताला दिलेले वचन पुरे करण्यासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या शिबिराजाची ही कथा अतिशय उदात्त तर आहेच, पण व्याधाच्या क्षुधाशमनार्थ आपला देह अर्पण करणाऱ्या कपोत पक्ष्याची कथा त्याहीपेक्षा उदात्त आहे.

उदात्त मानवधर्म

 एकदा एका अरण्यात भयंकर वादळ झाले व प्रचंड वृष्टी झाली. पंचमहाभूतांनी इतके कराल रूप धारण केले की, सर्व जीवसृष्टी भयविव्हल होऊन गेली. अशा वेळी अनेक पक्षी घरट्यातून खाली पडले. त्यांतच एक कपोत पक्षिणीही पडली. त्या अरण्यात एक पक्षिघातक व्याध त्याच वेळी हिंडत होता. तो थंडीने, पावसाने अगदी मृतवत झाला होता तरी तेवढ्यात त्याने त्या कपोतीला वरून पिंजऱ्यात घातले. पण पुढे त्राण न राहून तो तेथेच गारठून जाऊन भूमीवर पडला. कपोतीच्या शोधार्थ कपोत तेथे आल्यावा त्या व्याधाचा सूड घेण्यास सांगण्याऐवजी त्या कपोतीने 'हा अतिथी आहे याचा सत्कार करा' असे पतीला सांगितले. कपोताला पत्नीचे हे उदारवचन ऐकून आनंद झाला व त्याने शेकोटी करून त्या व्याधाला शेकण्याची सोय करून दिली व तो शुद्धीवर येताच 'आपणांस आणखी काय पाहिजे?' असे त्यास मोठ्या आदराने विचारले. त्यावर 'मला क्षुधा फार लागली आहे, तेव्हा मलर काही खावयास दे,' असे व्याधाने सांगितले. हे ऐकून कपोत फार खिन्न झाला. कारण व्याधाला खावयास देण्यास त्याच्यापाशी काहीच नव्हते. अतिथीची इच्छा आपणास तृप्त करता येत नाही. हे पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली, व तुझी क्षुधा मला माझ्या देहदानाने शांत करता येईल असे म्हणून त्याने अग्नीत उडी घातली.
 ते पाहून तो व्याध पराकाष्ठेचा दुःखी झाला. आयुष्यभर केलेल्या हत्येचा त्यास पश्चात्ताप झाला. त्याचे मन शुद्ध झाले, त्याच्या साऱ्या हिंस्रवृत्ती नष्ट झाल्या व एका क्षणात त्याच्या मनात फार मोठे परिवर्तन घडून आले. हीन, अधम, हत्यारी असा तो व्याध नष्ट होऊन थोर, शुद्धचित्त व उदार असा एक नवीनच पुरुष कपोताच्या त्या आत्मार्पणातून निर्माण झाला.
 कपोताची ही कथा म्हणजे परमथोर, परमउदात्त अशां मानवधर्माचे अगदी सार आहे. मानवाच्या विशालतेची कक्षा याहून मोठी असूच शकणार नाही. अहिंसा, त्याग, सत्याने असत्य जिंकणे, आत्मार्पणाने शत्रूला जिंकणे, पापावर पुण्याचा विजय, इत्यादी उदात्त तत्त्वांचे इतके उत्कृष्ट उदाहरण दुसरे सापडणे जवळ जवळ अशक्य आहे. आणि अशी ही कथा महाभारतात सांगून तिचा नित्य पाठ करण्याचा उपदेश केला आहे यावरून भारतीय तत्त्ववेत्त्यांची सत्यावरील भक्ती च धर्मावरील निष्ठा अत्यंत उज्ज्वल अशी होती याविषयी कोणाला शंका येण्याचे कारण रहणार नाही.

ध्येय व व्यवहार

 पण हा उदात्त उपदेश करीत असताना भारतकार हेही विसरत नाहीत की, मानवप्राणी हा इतक्या वरच्या पातळीत जवळ जवळ कधीच नसतो. कपोताने आपल्यासाठी आत्मार्पण केलेले पाहून एकदम धक्का बसून, हीनत्व सांडून आपल्या मनाचे परिवर्तन करून टाकणारे व्याध जगात बहुसंख्य नसून, कपोताने अग्नीत उडी टाकली आहे त्यामुळे त्याची बायकापोरे आयतीच आपल्या हाती सापडतील, तेव्हा याच्याबरोबर त्यांचीही होळी करून चांगले भोजन करण्यास काही हरकत नाही, असे म्हणणारे लोकच जगात जास्त असतात. आणि म्हणूनच वरीलसारखे शत्रूसाठीही आत्मार्पण करण्याचे प्रसंग अपवादभूत असतात हे विसरून त्याचा राष्ट्रीय प्रपंचात आपण उपदेश करू लागलो तर सर्व राष्ट्राची होळी झाल्याखेरीज राहणार नाही, हे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी अनेकवार बजाविले आहे.
 स्वकीयांसाठी असला त्याग हा दरघडी केला तरी तो अभिनंदनीयच आहे. क्वचितप्रसंगी शत्रूही अशा त्यागाने मोहित होऊन मित्र बनतो. पण ते फार क्वचित. म्हणूनच त्याच्याशी वागण्याचे नीतिनियम अगदी वेगळे होत. त्या नियमावलीलाच परनीती असे म्हटले आहे. महाभारतातील या परनीतीचे रूप आता आपणांस पाहावयाचे आहे.

परनीती

न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसया
सत्वैः सत्त्वा हि जीवन्ति दुर्बलैर्बलवत्तराः ।

- शांति. १५/२०

 'युधिष्ठिरा, अहिंसा वृत्तीने जगात कोणी जिवंत राहिल्याचे दिसून येत नाही. खरोखर बलवान प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात.' ध्येयवादी सत्याची एकांतिक भक्ति करणाऱ्या युधिष्ठिराला अर्जुनाने जगातील व्यवहारासंबंधीचे हे कठोर सत्य सांगितले आहे आणि हे ध्यानात घेऊनच भारतीय तत्त्ववेत्त्यांनी व्यवहारवादाचा उपदेश केला आहे.
 'याप्रमाणे मी तुला हे नीतिशास्त्र सांगितले आहे. याचा पातकांशी संबंध आहे. म्हणून मनुष्याने अशा प्रकारचे आचरण सदैव करू नये. पण शत्रूने अशा आचरणाचा प्रयोग केला तर मी सांगितलेल्या नीतीचा अवलंब केल्यावाचून कसे चालेल । तात्पर्य, हे मी तुझ्या हिताकरिता सांगत आहे. अशा प्रसंगी याच धर्माचे आचरण केले पाहिजे. ते दोषावह नाही. -' (शांति.अ. १३९) या वाक्यांत महाभारतकारांनी परनीतीची आवश्यकता व तिच्यां मर्यादा स्पष्ट करून सांगितल्या आहेत. या नीतीचा अवलंब नेहमी करावयाचा नाही, स्वकीयांशी करावयाचा नाही, ते पातक होईल. ही नीती शत्रूशी वागताना आचरावयाची आहे. त्या वेळी ती धर्मविघातक ठरत नाही.

शत्रुसंहार अटळ

नाघ्नतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत । -शांति. १५/१५
नाच्छित्वा परमर्माणि नाकृत्वा कर्म दारुणम्
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रेयम् ।

- शांति. १४०/५०

 शत्रूचा वध न करणाऱ्या राजाला या लोकी कीर्ती लाभणार नाही, धन मिळणार नाही, आणि त्याची प्रजाही सुरक्षित राहणार नाही. इंद्रसुद्धा वृत्रासुराचा वध करूनच महेन्द्र पदवीला पोचला. शत्रूच्या मर्मस्थानावर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय आणि मासे मारणाऱ्या कोळ्याप्रमाणे हत्या केल्याशिवाय राज्यलक्ष्मीचा लाभ होत नाही; असा महाभारतकारांचा राजनीतीचा पहिला सिद्धांत आहे. आणि म्हणूनच पितामह भीष्मांनी अहिंसावादी युधिष्ठिराला पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे
 'राजा,- व्यवहारदृष्टीचा लोप झाला तर राजाला स्वर्गाची व कीर्तीची प्राप्ति कशी होणार? राजाने शत्रूच्या नाशाकरिता त्याच्या द्रव्यादिकांचा अपहार करावा व त्याच्या देशात प्रवेश करून तो प्रदेश दग्ध करून टाकावा. शेतांतील धान्ये जाळून टाकावी, शत्रूच्या लोकांत फाटाफूट करून त्यांच्याचकडून अथवा आपल्या सैन्याकडून त्या सर्वांचा नाश करवावा. नदी-वरून गमन करण्याचे जे पूल वगैरे मार्ग असतील ते मोडून टाकावे. तलावादिकांतील सर्व जल फोडून देऊन नाहीसे करावे व ते फोडून देता येत नसेल तर विषादिकांच्या योगाने दूषित करावे. – (शां. ६९). हे राजा, स्वकार्य करण्याविषयी प्रवृत्त झालेल्या राजाने शत्रूंना वश करून नंतर त्यांचा वध करावा. शत्रूंना पीडा देणाऱ्या राजाने सदैव स्वस्थ झोप घेत राहू नये. कारण ठिणग्यांचा जसा अग्नि होतो तसा पीडित केलेला शत्रूही प्रबल होऊ शकतो. विजय मिळणे अनिश्चित असल्यास शत्रूवर चालून जाऊ नये. तर, हे प्रभो, कारस्थानी अशा अमात्यांच्या साह्याने काय करावयाचे ते ठरवून, काही द्रव्य देऊन, विश्वास दाखवून शत्रूला वश करून घ्यावे व तो पराजित केलेला नाही हे मनात ठेवून त्याची आपण उपेक्षा करीत आहो असे बाहेर दाखवावे. पुढे त्याचे पाय किंचित डळमळू लागले की संधी साधून त्याजवर प्रहार करावा. विश्वासाने काम करणाऱ्या हेरांकडून त्याच्या सैन्यात फंदफितूर करावा. भेद, दान, औषधी यांची त्याजवर योजना करावी. शत्रूविषयीचा द्वेष मनांत गुप्त ठेवावा आणि संधी साधण्याची वाट पाहात राहावे. आणि संधी येताच शत्रूस ठार करावे. संधी येण्याची वाट पाहात असताना शत्रूचा आपल्यावर विश्वास बसेल अशा तऱ्हेच्या आचरणात कालक्षेप करावा. शत्रूवर एकदम शस्त्रप्रहार करू नये, विजय मिळणे अनिश्चित आहे हे लक्षात ठेवावे. शत्रूस होणारी पीडा कमी होऊ देऊ नये व कठोर शब्दांनी त्याच्या अंतःकरणास छिद्रेही पाडू नयेत. पण संधी आली की त्याजवर शस्त्रपात केल्याखेरीज राहू नये.' -(शांति. १०३)

कपटनीतीचा अवलंब

 शत्रूचा कोणत्या ना कोणत्या उपायाने संहार केलाच पाहिजे हे महाभारतात अगदी निक्षून सांगितले आहे. तो संहार करण्यासाठी वाटेल त्या नीतीचा अवलंब करावा, वाटेल ते कपट करावे, असा त्यांचा अभिप्राय आहे. इंद्राला देवगुरु बृहस्पती ने पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे.
 'शत्रूवर नानाप्रकारचे मायावी प्रयोग करावे. त्याचा जो शत्रू असेल त्याला त्याचेवर उठवावा व कपटाचेही आचरण करावे. मात्र त्या कपटामुळे आपल्या कीर्तीस बाध येईल असे होऊ देऊ नये. विश्वासू मनुष्याकडून शत्रूच्या लोकांना वश करून घ्यावे. हे वृत्रनाशका इंद्रा, पूर्वीदेखील आपल्या नगरामध्ये योग्य अशा नीतीचा अवलंब करून राजे लोकांनी शत्रूला जिंकले आहे. हे राजा, आपल्या अमात्यादिकांना गुप्तपणे द्रव्य देऊन व त्यांचे वेतन बंद करून, ते आपल्या अपराधामुळे मर्जीतून उतरलेले आहेत,' असे प्रसिद्ध करावे व त्यांची योजना शत्रूची नगरे व राज्ये यांजवर करावी. पूर्वीच्या राजांनी असे आचरण केलेले आहे.' (शांति. १०३)

निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः
नहि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ।

-वन. ५२/२२

 'कपटबुद्धी शत्रूचा कपटानेच वध कैला पाहिजे, असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटाने वध केला असता त्याला पाप म्हणत नाहीत.' असे भारतीय पुरुषांचे मत आहे. म्हणूनच या राजनीतीचा त्यांनी पुनः पुन्हा उपदेश केला आहे. कालकवृक्षीय मुनी क्षेमदर्शी राजाला सांगतात, 'हे राजा, प्रथम अत्यंत उत्कृष्ट प्रकारे शुचिर्भूत राहून व चांगली कर्मे करून तू शत्रूची मर्जी संपादन कर. व तुला मित्रांचे पाठबळ मिळाले म्हणजे उत्कृष्ट प्रकारची मसलत करणाऱ्या मंत्र्यांच्या साहाय्याने गुप्त विचार करून आपल्या विश्वासू लोकांकडून शत्रूंमध्ये फाटाफूट कर. आणि ज्याप्रमाणे बेलफळाने बेलफळ तोडतात त्याप्रमाणे तू शत्रूकडून शत्रूंचा नाश कर. राजा, सुंदर आणि दुर्लभ असे पदार्थ, स्त्रिया, वस्त्रे, शय्या, आसने, गृहे, रस, सुगंधी पदार्थ आणि फळे यांवर तू शत्रूची आसक्ती निर्माण कर. त्यायोगे त्यांचा नाश होईल. हे राजा, मोठमोठी मूल्यवान उपवने, मंदिरे, शय्या यांवर शत्रूची आसक्ती निर्माण करून त्या उपभोगसुखांच्या योगाने तू त्याचा खजिना रिकामा कर.' -(शां. १०५.).
 शत्रूला दयाबुद्धी दाखविणे, त्यांशी वागताना न्यायनीतीचा विचार करणे किती घातुक आहे हे भीम व दुर्योधन यांच्या अखेरच्या गदायुद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने पांडवांना जो उपदेश केला व त्यांच्या कृत्याचे जे समर्थन केले त्यावरून चांगले समजून येईल.

श्रीकृष्णप्रणीत युद्धनीतीचे स्त्ररूप

 प्राणाचे भय घेऊन दुर्योधन शेवटी एका डोहात लपून बसला होता. काठावरून युधिष्ठिर त्याच्याशी बोलत होता. त्या वेळी युधिष्ठिराने दुर्योधनाला सांगितले की, 'मी तुला सवलत देतो. पाच पांडवांपैकी ज्याच्याशी युद्ध करावे अशी तुझी इच्छा असेल, त्याच्याशी तू, गदायुद्ध कर. आणि त्या एकाला जरी तू मारलेस तरी सर्व राज्य तुझे आहे.' ही सवलत ऐकून दुर्योधन बाहेर आला. पण इकडे श्रीकृष्ण मात्र धर्माच्या या आत्मघातकी उदारतेने अगदी संतापून गेले. ते म्हणाले, 'युधिष्ठिरा, हे तू काय करून ठेवलेस ? अरे युद्धात तू, अर्जुन, नकुल किंवा सहदेव यांपैकी कोणाला त्याने निवडले तर कसे होईल ? त्याच्याशी सामना करण्यास तुम्ही मुळीच समर्थ नाही. रणात दुर्योधनाला प्रतियोद्धा पृथापुत्र वृकोदरावाचून तर मला कोणीच दिसत नाही. असे असताना तू हे काय कबूल करून बसलास ? हे राजा, तू केवळ दयाबुद्धीने हे साहस केले आहेस आणि येथे साफ घसरला आहेस. 'आमच्यापैकी एकाला मारून राजा हो' असे तू सांगितलेस तरी कसे? मागे शकुनीशी तू जसे द्यूत केलेस तसलेच द्यूत तू पुन्हा मांडले आहेस. राजा, तू आपल्या शत्रूला फायदेशीर अट देऊन त्याला चांगल्या जागेवर आणून ठेवलेस आणि स्वतः मात्र खाड्यात पडला आहेस. एकंदरीत आपण पुन्हा विपत्तीत सापडलो खरे ! अरेरे, अजूनही तुला ही बुद्धी सुचते, त्याअर्थी ही पंडूची व कुंतीची संतती राज्य भोगीच नाही, निरंतर वनवास व दारिद्र्य भोगण्यासाठीच तिचा जन्म आहे !-' (शल्य. अ. ३३).
 पुढे भीम व दुर्योधन यांचे महायुद्ध सुरू झाले. दुर्योधन मुळीच हटेना तेव्हा अर्जुनाला चिंता वाटू लागली. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'अर्जुना, भीम व दुर्योधन या दोघांचे शिक्षण सारखेच आहे. भीम अधिक बलवान आहे पण दुर्योधन हा त्याच्यापेक्षा अधिक घटलेला व प्रयत्नशील आहे. तेव्हा भीमसेन जर धर्मयुद्धाचे नियम पाळून लढेल तर त्याला जय मिळणार नाही. त्याने अन्यायाने युद्ध केले तर तो खात्रीने सुयोधनास ठार मारील. देवांनीसुद्धा कपटानेच दैत्यांस जिंकले असे आम्ही ऐकिले आहे. म्हणून म्हणतो भीमाने कपटप्रचुर असा पराक्रम करावा. शिवाय, 'युद्धात मी सुयोधनाची मांडी फोडीन,' अशी भीमाने प्रतिज्ञाही केली आहे. ती आपली प्रतिज्ञा त्याने पूर्ण करावी म्हणजे झाले. अर्जुना, दुर्योधन तरी मायावीच आहे. तेव्हा उलट भीमानेही त्याचे मायेनेच तुकडे उडविले पाहिजेत. भीम जर आपल्या बळावर भिस्त ठेवून न्यायाने लढू म्हणेल, तर युधिष्ठिर संकटात पडेल, यात संशय नाही. अर्जुना, मी तुला पुन्हा सांगतो, ऐक. धर्मराजाच्या त्या अपराधामुळेच आपणांस भय उत्पन्न झाले आहे. एवढा थोर उद्योग केला, भीष्मप्रभृती कौरवांचा निःपात उडविला, जय मिळविला, उज्ज्वल कीर्ती पसरली, आणि वैराचे उसने पुरेपूर निघाले. एवढे सर्व होऊन विजय अगदी हातात आल्यासारखा झाला असता धर्मराजाने तो धोक्यात घातला. खरोखर, अर्जुना, धर्माला ही मोठीच दुर्बुद्धी आठवली. अशाप्रकारचे हे घोर युद्ध करून जे मिळविले ते, 'केवळ एकाला जिंकले असता हारवीन,' असे म्हणून त्याने हे युद्ध पणास लावले, तेव्हा त्याला काय म्हणावे ? दुर्योधन हा मोठा घटलेला वीर आहे. शिवाय त्याचे काय, तो जिवावर उदार झालेला आहे. जिवावर उदार झालेले साहसी पुरुष थोडे असले तरी ते बहुतांस भारी असतात. एक मारीन किंवा मरेन, अशा निश्चयाने जे धाडशी लोक युद्धात उडी घेतात. त्यांच्यापुढे उभा राहण्यास इंद्रही समर्थ नाही. अर्जुना, सांप्रत सुयोधनाची तशी स्थिती आहे. तो जिवावर उदार झालेला आहे. अशा स्थितीत कोणता शहाणा माणूस त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान करील ? आज तेरा वर्षे सुयोधन सारखा गदायुद्धाचा सराव करीत आहे आणि तो पहा भीमसेनास ठार मारण्याच्या हेतूने ऊर्ध्व, तिर्यक असा सारखा फिरत आहे. छे छे ! पार्था जर महाबाहू भीमसेन याला अन्यायाने ठार न करील तर आज दुर्योधनच विजयी होईल.' -(शल्य. ५७).
 यानंतर गदायुद्धात भीमाने दुर्योधनाच्या मांड्या प्रतिज्ञेप्रमाणे फोडून त्याला ठार मारले. त्या वेळी बलराम फार क्रुद्ध झाले. अधर्माने युद्ध केले म्हणून त्यांनी भीमाची व पांडवांची फार निंदा केली. दुर्योधन खाली पडल्यावर भीमाने त्याच्या मस्तकावर लाथ मारली. तेव्हा युधिष्ठिरालाही न्यायनीतीची लहर येऊन तोही. भीमाची निर्भर्त्सना करू लागला. या योगाने विजयी होऊनही पांडव हे अगदी लज्जित झाले. त्यांची वदने खिन्न झालेली पाहून मेघ व दुंदुभी यांच्यासारख्या गंभीर वाणीने श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, 'पांडवहो, तुम्हांस खिन्न होण्याचे कारण नाही. वेळोवेळी मीच युक्तिप्रयुक्तीने तुमच्या हितार्थ रणामध्ये या कौरवांचा असा निःपात करण्यास सांगितले होते. या शत्रूंना असे मारले ही गोष्ट तुमच्या मनाला लागून राहण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही हे मुळीच मनात आणू नका, शत्रू पुष्कळ व अधिक बलवान असले म्हणजे ते अशाच उपायांनी मारावे लागतात. असुरास मारणाऱ्या देवांपासून हा असाच मार्ग चालत आला आहे. आणि याच संतसंमत मार्गाने सर्व चालतात.

'पूर्वैरनुगतो मार्गो देवैरसुरघातिभिः
सद्भिश्चानुगतः पन्थाः सर्वैरनुगमिष्यते ' -(शल्य ६१)

आज आपण कृतकृत्य झालो आहोत. तेव्हा आता शिबिरास जाऊ व विश्रांती घेऊ.'
 वासुदेवाचे हे भाषण ऐकून पांचालासह पांडव अत्यंत हर्ष पावले व सिंहासारख्या गर्जना करू लागले. दुर्योधन मेलेला पाहून आनंदित झालेल्या त्या लोकांनी मग शंख फुंकले. व माधवानेही आपला पांचजन्य शंख फुंकला !
 श्रीकृष्णाच्या वरील भाषणावरून परनीतीसंबंधी त्यांचा काय अभिप्राय होता हे स्पष्ट होईल.

परनीतीच्या अभावी -

 पांडवांवर ओढवलेले प्रसंग पाहिले, आणि दर वेळेस योग्य परनीतीचा धर्म सांगून त्यांना श्रीकृष्णांनी कसे वाचविले ते ध्यानात घेतले म्हणजे मनात निःसंशय असे येऊ लागते की, श्रीकृष्णासारखा नीतिविशारद धर्मवेत्ता पुरुष त्यांचा पाठीराखा नसता तर धर्मराजाने आपल्या सत्यअहिंसेने पांडवांचा कायमचा घात करून त्यांच्या हाती कायमची नरोटी दिली असती. सुदैव असे की श्रीकृष्णासारखा व्यवहारज्ञ सखा त्यांना मिळाला. आणि त्याहीपेक्षा सुदैव असे की त्याचे ऐकण्याची मधून मधून तरी धर्मराजाला बुद्धी होत असे.

सामोपचार-मर्यादा

 शत्रूंचा संहार करावा, त्याशी कपटाचे वर्तन करावे असा उपदेश केला असला तरी या लोकांना युद्धाची भलतीच हौस होती असे मात्र समजू नये. युद्ध शक्य तो करून टाळावे असाच त्यांनी उपदेश केला आहे. युधिष्ठिराला नारद म्हणतात, "हे शत्रु तापना, युद्ध करून रक्तपात करणे हे होता होईल तो टाळले पाहिजे. यास्तव हे शत्रुनाशना, शत्रूच्या नाशास उद्युक्त झाल्यावर प्रथम साम, दाम, भेद हे उपाय योजावे. या उपायांची उत्तम प्रकारे योजना केल्याने प्राणहानी न होता आपला उद्देश सिद्धीस जातो. हे प्रजापालका, तू असेच धोरण ठेवतोस ना ?" -(सभा. अ. ५) पितामह भीष्मांनीही युद्ध शक्यतो टाळावे असाच उपदेश केला आहे. 'युधिष्ठिरा, तू प्रचंड चतुरंग सेनेचे पोषण करून प्रथम सामोपचाराचेच वर्तन ठेव. आणि त्याचा उपयोग न होईल तर युद्धाविषयीचा प्रयत्न कर. कारण हे भारता, युद्धातील जय हा निकृष्ट प्रतीचा आहे. तो साहाजिक रीतीने किंवा दैवयोगाने मिळतो असे तज्ज्ञ लोकांचे मत आहे. हे राजा, अत्यंत बलसंपन्न असणारी सेनाही हरिणसमूहासारखी असते; अर्थात हरिणांपैकी एक पळू लागला की ज्याप्रमाणे दुसराही त्याच्यामागून पळू लागतो त्याप्रमाणेच सैन्यातील एक माणूस सैन्य सोडून पळून गेला की दुसरा त्याच्यामागून जाऊ लागतो. राजा, परस्परांचे बल ओळखणारे, उत्साही, प्राणाची पर्वा न करणारे आणि दृढनिश्चयी असे केवळ पन्नास शूर पुरुष असले तरी ते शत्रूच्या सैन्यास ठार करून सोडतात. इतकेच नव्हे तर परस्परांशी मिळून वागणारे, दृढनिश्चयी, कुलीन व सन्माननीय असे. सात, सहा किंवा पाचच योद्धे असले तरी ते शत्रूला भारी होतात.
 राजा, इतर उपायांनी कार्य होणे शक्य नसेल तर युद्ध करावे. कारण साम, भेद आणि दाम यांच्यानंतरचा उपाय युद्ध हा आहे. म्हणून परपक्षाच्या योद्धयांवर क्रौर्यमिश्रित सामोपचाराचा पुनः पुनः प्रयोग करावा. अशी चोहोबाजूने पीडा लागली म्हणजे शत्रू संधीला तयार होतो. शत्रूचे जे अगदी खाजगी लोक असतील त्यांच्यामध्ये फाटाफूट करण्यासाठी गुप्त हेरांचा प्रवेश करवावा. जो राजा शत्रूहून अत्यंत श्रेष्ठ असेल त्याच्याशी संधी करणे प्रशस्त होय. कारण तसे केल्याशिवाय, शत्रूला व त्याच्या इतर योद्ध्यांना प्रतिबंध होईल अशा रीतीने पीडा देणे शक्य नाही.
 आता शत्रूला अपराधाबद्दल क्षमाच का करू नये असे तू म्हणशील. पण क्षमा ही सज्जनांवर करावयाची असते. ती असज्जानाकडे केव्हाही जात नसते. हे कुंतीपुत्रा, क्षमेचे रहस्य तुला सांगतो. जो राजा शत्रूवर विजय मिळविल्यानंतर त्याला क्षमा करतो त्याची कीर्ती वाढते व तो मोठा अपराधी असला तरी त्याचे शत्रूही त्याजवर विश्वास ठेवतात. म्हणून शत्रूला जर्जर करून टाकल्यानंतर त्याला क्षमा केलेली चांगली. कारण तापविल्यावाचून वाकविलेले काष्ठ पुनरपि पूर्वस्थितीस येते.

गोड वाणी

 राजा प्रसंग पाहून, राजाने मृदुता व तीव्रता या दोहोंचेही अवलंबन करावे. युधिष्ठिरा, शत्रपात करण्यापूर्वी व चालू असतानाही प्रिय भाषण करावे आणि प्रहार केल्यानंतरही शोक केल्यासारखे अथवा रोदन केल्यासारखे दाखवून कारुण्य प्रकट करावे. "माझ्या लोकांकडून संग्रामात आपल्यावर शस्त्रप्रहार झाला हे मला इष्ट नाही; पण काय करावे ! मी पुनः पुनः सांगितले तरी ते माझे ऐकत नाहीत. ज्याने हा अन्याय केला आहे त्याने मला फार दुःख दिले आहे" असे बाहेर उद्गार काढावे आणि अंतस्थ रीतीने ज्याने त्या शत्रूला ठार केले असेल त्याचा गौरव करावा. बाह्यतः प्रहार करणाऱ्या लोकांशी अपराधी मनुष्यासारखे वर्तन ठेवावे आणि लोकप्रीती संपादन करण्यासाठी, ज्याचा वध केला असेल, त्यांच्यासाठी विलापही करावा. सारांश अशा रीतीने कोणत्याही स्थितीत सामोपचाराने वागणारा धर्मवेत्ता राजा सर्व प्राण्यांना प्रिय होतो. त्याला कोणतीही भीती राहात नाही.
 जित शत्रूला क्षमा करू नये असे कोठे सांगितले आहे तर कोठे त्याला मोठ्या सन्मानाने वागवावे असेही सांगितले आहे. नारदांनी युधिष्ठिराला राजनीतीचा उपदेश केला तेव्हा ते म्हणाले, 'हे वीरपुंगवा, शत्रूला जिंकणे व जिंकल्यावर योग्य प्रकारे त्याचे रक्षण करणे यात वीरांचे खरे शौर्य आहे. तेव्हा तू शत्रूस हस्तगत केल्यावर त्याचे नीटपणे रक्षण करतोस ना ?' -(सभा.अ.५) शांतिपर्वातील वामदेवगीतेतही असाच उपदेश आहे. 'जो राजा कल्याणकारक आचरण करणाऱ्या शत्रूभूत राजाला संग्रामामध्ये धरल्यानंतर द्वेषामुळे त्याचा बहुमान करीत नाही, तो क्षात्र धर्मभ्रष्ट होय. ' (शांति.अ.९३)
 पण क्षमा किंवा शिक्षा हे सर्व प्रसंगावर व तारतम्यावर अवलंबून राहील. शत्रू हा पुन्हा उचल करणार नाही ही निश्चिती करून घेतली पाहिजे हा त्यातला भावार्थ म्हणून भारतकार म्हणतात ऋण, अग्नी आणि शत्रू यांचा जर अवशेष ठेवला तर ती पुनः पुनः वृद्धिंगत होतात. यास्तव त्यांचा शेष ठेवू नये. शत्रू अवशिष्ट ठेवले तर त्यांचा अपमान झाला असल्यामुळे ते पुढे अत्यंत भीती उत्पन्न करितात. म्हणून शत्रूने हृदयाला पाझर फोडण्यासारखे उद्गार काढले तरीही त्याला सोडू नये व त्याच्याविषयी दुःख बाळगू नये. पूर्वी त्याने आपणास पीडा दिली असेल तर त्याचा वधच करावा. मात्र परकीयांना वश करण्याचा व त्यांजवर अनुग्रह करण्याचा प्रयत्न राजाने सदैव करावा, पण प्रसंगानुसार त्यांचा निग्रहही करावा.

प्रहरिष्यन् प्रियं ब्रूयात् प्रहरन्नपि भारत ।
प्रहृत्यच कृपायीत शोचेत च रुदेत च ।

-(आदि. १४०/५६)

 शत्रूवर प्रहार करण्याचे मनात असता वरकरणी त्याच्याशी गोड बोलावे. प्रहार करीत असतानाही गोडच बोलावे. आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयी सहानुभूती दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेही.
 राजा अशा सौम्य वर्तनाने शत्रूचा उच्छेद करता येतो. सौम्य उपायांनी भयंकर अशा शत्रूचाहि वध करता येतो. वरीलसारख्या सौम्य उपायाला असाध्य असे काहीच नाही. कारण जो सौम्य असतो, तोच अतिशय तीक्ष्ण असा उपाय आहे. -(शांति. १४०)
 शत्रूशी कपट करून त्याला फसविणे, संकटात गाठून त्याचा संहार करणे व करतानाही त्याच्याबद्दल बाह्यतः सहानुभूती दाखविणे हे राजनीतीतले पाठ आहेत; त्याचप्रमाणे आपण दुर्बल असताना शत्रूपुढे नमून वागणे व वेळ येताच उलटणे हाही पाठ या राजनीतीत सांगितला आहे.

प्रसंगी हेही अवश्य

 बृहस्पतीने इंद्राला पुढीलप्रमाणे उपदेश केला आहे : 'शत्रू जर अवेळीच आपल्यावर चालून आला, तर त्या वेळी आपले सामर्थ्य बाजूला ठेवावे, आणि सुज्ञ पुरुषांना संमत असलेल्या मार्गाचे अवलंबन करून त्याच्याशी स्नेह करावा. पीडा कोणत्याही प्रकारे देऊ नये आणि क्रोध व अहंकार यांचा त्याग करून त्याच्या छिद्रांचा शोध करीत राहावे. अशा रीतीने प्रसंग आला असता बलाढ्य शत्रूशी नम्रतेने वागणेच योग्य होय. नंतर शत्रू अनवधानतेने वागत असता अवधानपूर्वक त्याचा वध करण्याची संधी पाहात राहावे. प्रणाम, अन्नपान, व मधुर भाषण या मार्गांनी शत्रूशी स्नेहसंबंध ठेवावा. त्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी केव्हाही शंका येऊ देऊ नये. संशय येण्याजोगी जी कृत्ये असतील त्यांचा त्याग करावा. त्या शत्रूवर मात्र राजाने कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये. अवमान झालेले राजे या गोष्टीविषयी जागरूक असतात. अर्थात शत्रूचा आपणांवर विश्वास बसवून घेण्यासाठी दक्ष असतात पण आपण मात्र त्यांजवर विश्वास ठेवीत नाहीत. हे सुरश्रेष्ठ इंद्रा, राजांचे ऐश्वर्य टिकविणे, यासारखे दुसरे दुष्कर कर्मच नाही. यासाठी राजाने नेहमी सावध असले पाहिजे. अनवधानाने वागणाऱ्या राजाचे राज्य तत्काल नष्ट होते.
 इंद्रा, पुष्कळ शत्रू असले तर त्यांच्याशी एकट्यानेच लढू नये. त्या वेळी साम, दाम, भेद व दंड या उपायांचे अवलंबन करून क्रमाक्रमाने एकेकाचा विध्वंस करावा. आणि त्यांतूनही अवशिष्ट राहिले तर त्यांच्याशी लक्ष्यपूर्वक वागावे. सामर्थ्य असले तरीही बुद्धिमान पुरुषाने सर्वांशी युद्ध करण्याचा प्रसंग आणू नये. ज्या वेळी अश्व, गज, रथ, यांनी परिपूर्ण, पायदळ व यंत्रे विपुल असलेली, व आपल्यावर भक्ती असलेली अशी प्रचंड सेना जवळ असेल व शत्रूपेक्षा आपला अनेक प्रकारे उत्कर्ष आहे अशी खात्री होईल तेव्हा आपला अभिप्राय प्रकट करून शत्रूवर निःशंकपणे प्रहार करावा व त्याचा निःपात करावा. १- (शां. १०३ )

धर्मापेक्षा बल श्रेष्ठ

 जय धर्मामुळे मिळत नाही; बलामुळे मिळतो. शत्रूशी सामना देताना न्यायनीतीचा विचार करणे हे आत्मघातकी का ठरते त्याची मीमांसाही भारतीय तत्त्ववेत्त्यांनी केली आहे. सत्यमेव जयते, नहि सत्यात् परो धर्मः | असा उपदेश त्यांनी अनेक वेळा केला असला तरी तो गृहनीतीचा भाग आहे हे आपण विसरू नये अशी त्यांची इच्छा आहे. कारण गृहनीती व परनीती या अगदी निराळ्या आहेत. जगाच्या व्यवहारात सत्य, धर्म, न्याय यांनी जय कधीही मिळत नाही ही भारती तत्त्ववेत्त्यांची बालंबाल खात्री होती. पितामह भीष्म सांगतात, 'युधिष्ठिरा, आपत्प्रसंगी धर्म व अधर्म यांचा विचार करीत बसणे म्हणजे अरण्यात एखाद्या पशूचे पाऊल उठले असता ते लांडग्याचे आहे, चित्त्याचे आहे का वाघाचे आहे असा विचार करीत बसण्यासारखेच व्यर्थ आहे. या लोकांत धर्माचे अथवा अधर्माचेही फल कोणी प्रत्यक्ष पाहिलेले नाही, यास्तव तिकडे लक्ष न देता सामर्थ्यप्राप्तीची इच्छा करणे योग्य होय. कारण हे सर्व जग बलाढ्य पुरुषांच्याच आधीन असते. सामर्थ्यसंपन्न पुरुष इहलोकामध्ये संपत्ती, सैन्य व आमात्य संपादन करू शकतो. जो मनुष्य द्रव्यसंपन्न नसेल तो खरोखर महापातकी होय. अल्पसे द्रव्य हे केवळ उच्छिष्ट होय. (श्रियोबलममात्यांश्च बलवानिह विन्दति । यो ह्यनाढ्यः स पतितः तदुच्छिष्टं यदल्पकम्) बलाढ्य पुरुषाला त्याच्या भीतीमुळे कोणाकडून फारसा अपकार होत नाही. बल आणि धर्म ही उभयता जर खऱ्या अधिकाऱ्यामध्ये वास्तव्य करीत असली तर मोठ्या भीतीपासूनही रक्षण करू शकतात. तथापि, धर्माहून बलाचीच योग्यता अधिक आहे. कारण बलाच्या योगाने धर्माची प्रवृत्ती होते (अतिधर्मात् बलं मन्ये बलात् धर्मः प्रवर्तितः ।) इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे जंगम पदार्थ पृथ्वीवरच अवलंबून असतात त्याप्रमाणे धर्म हा बलावरच अवलंबून असतो. ज्याप्रमाणे धूम वायूच्या अधीन असतो त्याप्रमाणे धर्मही बलाच्याच अनुरोधाने वागतो. वृक्षाचा आश्रय करून राहणाऱ्या वेलींची जशी वृक्षावर सत्ता चालत नाही तशीच बलावर धर्माची सत्ता चालत नाही. सुख जसे विलासी पुरुषाच्या अधीन असते तसा धर्मही बलाढ्य पुरुषांच्या अधीन असतो. तेव्हा राजा, हे लक्षात ठेव की, बलाढ्य लोकांना असाध्य असे काही नाही.' (शांति १३४)
 ऐहिक बल व पारमार्थिक बल यांचा योग्य विवेक करून सर्व पारमार्थिक बल (म्हणजेच धर्म) हे ऐहिक बलावर अवलंबून आहे असे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी स्पष्ट मत दिले आहे. म्हणूनच धर्म हे जरी एखाद्यास अंतिम साध्य वाटले तरी तो धर्म ज्या ऐहिक बलावर अवलंबून आहे त्याची उपासना प्रथम त्याने केली पाहिजे, आणि त्यासाठी ज्या उपायांचा अवलंब करावा लागेल त्या उपायांचा अवलंब केला पाहिजे. सत्य, धर्म, अहिंसा या उदात्त तत्त्वांना जी मुरड यासाठी घालावी लागेल ती घातली पाहिजे, कारण असे न करावे तर सत्य, धर्म यांचाच सर्वस्वी उच्छेद होतो. कारण बलहीनाचे सत्य कोण ऐकणार, आणि त्याचे धर्माचरण तरी कोण चालू देणार !
 आणि जगाची अशी स्थिती असल्यामुळे, म्हणजे सत्य, धर्म यावर विजय अवलंबून नसल्यामुळे, तो सर्वथा बलाच्या, मनगटाच्या बलाच्या अधीन असल्यामुळे, नीतिशास्त्रात आपल्याला एरवी अप्रिय वाटणाऱ्या तत्त्वांचा समावेश करावा लागतो.

अविश्वास

संक्षेपो नीतिशास्त्राणामविश्वासः परो मतः । -(शां. १३८|१९७)

हे तत्त्व अशापैकीच आहे. सर्व नीतिशास्त्राचे -परनीतीचे -थोडक्यात सार हेच की, कोणाचा विश्वास म्हणून धरू नये.
 एरवीच्या जीवनात आपल्याला नेहमी सद्गुणांची वाढ करावयाची असते. त्यामुळे दुसऱ्यावर विश्वास टाकून, त्याला मोठेपणा देऊन, त्याचे मन वळवावे असा उपदेश केला जातो, आणि तो अगदी योग्यच आहे. पण राजकारणात शत्रूशी वागताना हे धोरण घातकी ठरल्यावाचून राहणार नाही. महाभारतात याविषयी पुढीलप्रमाणे उपदेश केलेला आढळतो.
 'आपले व आपल्या शत्रूचे कार्य एकच असले तर बलाढ्य शत्रूशी संधी करून सावधपणे व युक्तीने ते कार्य साधावे. पण कार्य झाले म्हणजे मात्र त्या शत्रूवर विश्वास ठेवू नये. आपल्यावर ज्याचा विश्वास नसेल त्याच्यावर विश्वास ठेवू नयेच पण आपल्यावर विश्वास आहे त्याच्यावरही विश्वास ठेवू नये.

नित्यं विश्वासयेत् अन्यान | परेषां तु न विश्वसेत् ।

–(शां. १३८)

 आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनांत नेहमी विश्वास उत्पन्न करावा, आपण मात्र दुसऱ्यावर कधीही विश्वास ठेवू नये. सारांश, कोणताही प्रसंग आला तरी आपल्या जीविताचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे अविश्वास हेच राजनीतिशास्त्राचे संक्षिप्त व मुख्य स्वरूप होऊन बसते. मनुष्यावर अविश्वास ठेवून राहणे हेच आपल्या विपुल हिताचे साधन आहे. विश्वास न ठेवून वागणारे लोक दुबळे जरी असले तरी ते शत्रूकडून बद्ध होत नाहीत. व विश्वास ठेवून वागणारे लोक बलाढ्य असले तरी दुर्बल असे शत्रू त्यांना बद्ध करू शकतात.
 कोणाही दोन पुरुषांचे प्रथम परस्परांशी वैर असले, व नंतर काही कारणामुळे ते परस्परांवर उत्कृष्ट प्रीती करू लागले, व कार्य झाल्यावर त्यांच्या मनांत परस्परांना फसविण्याचा विचार आला तर सुज्ञ मनुष्य उत्कृष्ट प्रकारच्या बुद्धीचा आश्रय करून दुसऱ्याला फसवितो. मनुष्य जरी ज्ञानसंपन्न असला तरी तो जर बेसावध राहिला तर अज्ञ लोकही त्याला फसवू शकतात. म्हणूनच प्रमाद न होऊ देता, अंतःकरणात भीती वाटत असली तरी, ती वाटतं नसल्याप्रमाणे, व विश्वास नसला तरी तो असल्यासारखा दाखवून मनुष्याने वागावे. हे प्रजाधिपते, प्रसंगानुसार शत्रूशीही संधि करावा व मित्राशीही संग्राम करावा असेच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात. हे जाणून व शास्त्रांची तत्त्वे लक्षात घेऊन कार्यामध्ये आसक्त व प्रसन्न राहून संकट येण्यापूर्वीच त्याची भीती उत्पन्न झाल्याप्रमाणे वागावे व भीतिग्रस्त मनुष्याप्रमाणे दुसऱ्याचा आश्रय करावा व संधीही करावा. अंतःकरणात भीती बाळगून सावधानपणे कार्यामध्ये आसक्त होऊन राहिले म्हणजे विचारहि सुचतात. कारण, हे राजा, संकट उत्पन्न होण्यापूर्वी जरी भीति बाळगून वागत असलो तरी ती खरी नसते. पण जो भीति न बाळगता विश्वासाने राहतो व सदैव निर्भयपणे वागतो त्याजवर पुढे मोठे संकट ओढवते.' -(शांति अ. १३८)
 ब्रह्मदत्त व पूजनी यांच्या संवादात (शां. अ. १३९) असेच विचार प्रगट झाले आहेत.

निश्चयः स्वार्थशास्त्रेषु विश्वास सुखोदयः । - शां. १३९।७०

 स्वार्थशास्त्राचा म्हणजे राजनीतीशास्त्राचा असा सिद्धांत आहे की दुसऱ्यावर विश्वास ठेवणे हे सर्व दुःखांचे उत्पत्तिस्थान आहे. याविषयी शुक्राने प्रल्हादाला दोन गाथा सांगितल्या होत्या. जे लोक शत्रूच्या सत्य अथवा असत्य भाषणावर विश्वास ठेवतात ते, मधाच्या आशेने जाणाऱ्या व मध्येच शुष्क तृणांनी आच्छादिलेल्या कड्यांवरून पडणाऱ्या लोकांप्रमाणे नाश पावतात. राजाने कोणाचेही वाईट केल्यानंतर त्यावर विश्वास ठेविला तर दुःख भोगावे लागते. -(शां. १३९).
 गृहनीती व परनीती यांची पृथक् क्षेत्रे आरंभीच सांगितली आहेत. पुष्कळ वेळा इकडचे तत्त्व तिकडे व तिकडचे धोरण इकडे असा माणसांच्या मनांत घोटाळा निर्माण होतो व पुष्कळ वेळा याविषयी निश्चय न झाल्यामुळे बुद्धीला व्यामोह पडून माणसांचा नाशही होतो. माणसे पराक्रमी असतात, त्यागी असतात, स्वाभिमानी असतात, दयाशील असतात. पण पराक्रम, त्याग, स्वाभिमान, दया कोठे दाखवावयाची याविषयी निश्चित कल्पना नसल्यामुळे हे गुण मातीमोल होतात व कित्येक प्रसंगी घातकही होतात. अधम, हीन, राष्ट्रद्रोही माणसांमुळे राष्ट्राचा घात तर होतोच पण पुष्कळ वेळा उदार, क्षमाशील, सत्यवचनी अशा माणसांकडूनही, व्यवहारनीतीच्या अज्ञानामुळे, श्रेष्ठ निष्ठा कोणती, कनिष्ठ कोणती, शक्य काय अशक्य काय, यांचा हिशेब त्यांच्या ठायी नसल्यामुळे, अंतराळातच ते वावरत असल्यामुळे, स्वकीयांचा घात होतो. मराठ्यांच्या, राजपुतांच्या इतिहासात, सध्याच्या हिंदुस्थानच्या इतिहासात या प्रकारची अनेक उदाहरणे आहेतच. येथे महाभारतातलेच एक उदाहरण देतो.

गृहनीती व परनीती यांच्या संकरामुळे अनर्थ

 द्रोणाचार्यांच्या वधाची ही कथा आहे. या एका कथेत अनेक विचित्र प्रकार घडले आहेत; त्या वेळी भिन्न भिन्न व्यक्तींनी चमत्कारिक वृत्ती प्रकट केल्या आहेत, त्यासंबंधी भिन्न मते तेथील लोकांनी प्रकट केली आहेत. आणि यामुळे गृहनीती व परनीती यासंबंधी फारच उद्बोधक असे विचार त्यातून आपणांस उचलता येतील.
 रणांगणात एके दिवशी गुरु द्रोणांनी भयंकर उग्ररूप धारण केले व पांडवांच्या हजारो सैनिकांचा ते संहार करू लागले. त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणांची छाती होईना व आज पांडव पृथ्वीतलावरून नष्ट होणार असा रंग दिसू लागला. त्या वेळी श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, "या महाधनुर्धराच्या हातांत धनुष्य, आहे तोपर्यंत याला जिंकणे इंद्रालाही शक्य नाही. जर याने शस्त्र खाली ठेवले तरच याचा वध होणे शक्य आहे. तेव्हा पांडवहो, या वेळी धर्म वगैरे सर्व गुंडाळून ठेवून (धर्म उत्सृज्य) जेणे करून जय मिळेल अशी युक्ती तुम्ही योजिली पाहिजे. मला वाटते की अश्वत्थामा मेला तर हा लढणार नाही. तेव्हा युद्धात तो मारल गेल्याचे कोणी तरी याला सांगावे."
 श्रीकृष्णाची ही मसलत अर्जुनास आवडली नाही, पण इतरांना ती मान्य झाली व सत्यनिष्ठ, अहिंसाप्रिय अशा धर्मराजानेही तिला अनुमोदन दिले. नंतर भीमाने अश्वत्थामा नावाचा एक हत्ती ठार मारला व द्रोणांच्या जवळ जाऊन 'अश्वत्थामा मारला गेला' असे तो मोठ्याने ओरडू लागला. प्रथम द्रोणांची खात्री पटेना. तेव्हा त्याने, हे खरे की खोटे, असे युधिष्ठिरास विचारले, त्रैलोक्याचे जरी राज्य मिळाले तरी युधिष्ठिर असत्य भाषण करणार नाही अशी त्याची खात्री होती.
 या वेळी श्रीकृष्णाने युधिष्ठिरास बजावले की, 'युधिष्ठिरा, द्रोण असाच लढत राहिला तर तुझ्या सर्व सेनेचा फडशा होईल. तेव्हा त्याच्यापासून तू आमचे रक्षण कर. अरे, अशा प्रसंगी सत्य भाषणापेक्षा असत्याचीच अधिक महती आहे !' युधिष्ठिराची सत्यनिष्ठा अगदी एकांतिक होती. पण या वेळी व्यवहार त्याने ओळखला व 'कुंजर अश्वत्थामा मारला गेला' असे त्याने उत्तर दिले व उत्तर देताना कुंजर शब्द अगदी हलके उच्चारला. त्यामुळे आपला पुत्र अश्वत्थामा हाच मेला असे वाटून द्रोणाने शस्त्र टाकून दिले व ती संधी साधून धृष्टद्युम्नाने अर्जुनाच्या निषेधाला न जुमानता त्याचा वध केला. (द्रोणपर्व, अ. १९०, १९२)
 द्रोणांच्या या असल्या वधामुळे अर्जुन अगदी चिडून गेला व पुढे अश्वत्थामा जेव्हा चवताळून पांडवांच्या सैन्यावर तुटून पडला व संहार करू लागला तेव्हा त्याची कड घेऊन तो स्त्रपक्षीयांना दुरुत्तरे करू लागला व प्रत्यक्ष युधिष्ठिराची निर्भर्त्सना करू लागला. तो म्हणाला, 'ज्यांना अनाथाप्रमाणे गाठून धृष्टद्युम्नाने अत्यंत अघोरपणे मारिले त्या आचार्यांचा वाली आता उभा आहे. माझ्या गुरूचे केश धृष्टद्युम्नाने धरले, त्याची वीर अश्वत्थामा कदापि क्षमा करणार नाही. राजा, क्षणिक अशा राज्यासाठी पितृतुल्य अशा गुरूचा तू वध करविलास. तू धर्मज्ञ असूनही अत्यंत अधर्म केला आहेस ! माझ्याने हे पाहवत नाही. आमच्या हातून हा भयंकर अधर्म घडला आहे. आपण नीच लोभ्यांनी केवळ राज्यासाठी या वृद्ध आचार्यांचा वध केला. हे आपल्या हातून अति भयंकर पापकर्म घडले आहे. अशा प्रसंगी जिवंत राहण्यापेक्षा मृत्यूच श्रेयस्कर होय.' -(द्रोण १९६).

अर्जुनाचा व्यामोह

 धृष्टद्युम्न, भीमसेन व धर्मराज यांची अर्जुन निर्भर्त्सना करीत होता ती कोणत्याही अधम वासनेमुळे नसून अत्यंत सात्त्विक अशा गुरुभक्तीच्या उमाळ्यामुळेच करीत होता. पण असे सात्त्विक भाव, अशी गुरुनिष्ठा ही एरवी कितीही अभिनंदनीय असली तरी शत्रुपक्षीय लोकांच्या बाबतीत त्यांना आवर घातला नाही तर हे सद्गुणच घातक होतात ही श्रीकृष्णाची व्यवहारनीती त्याला कळत नव्हती. हा गुरू असला तरी आपल्या लहानशा अभिमन्यू बाळाला एकट्याला गाठून ठार मारणारा हा गुरू आहे हे अर्जुन त्या वेळी विसरला आणि त्याला शस्त्र टाकल्यानंतर मारण्यात अधर्म झाला असे तो म्हणाला. आपल्या प्रिय द्रौपदीचे वस्त्र ओढणाऱ्या दुर्योधनाचे रक्षण करण्यासाठी, म्हणजे पर्यायाने त्या नीच कृत्याचे समर्थन करण्यासाठीच तो लढत आहे हेही त्याने ध्यानात घेतले नाही. त्याला अधर्माने मारण्याची श्रीकृष्णाची मसलत त्याला पटली नाही. पण याला मारला नाही तर हा आपणास ठार करील व पुन्हा आपल्या स्त्रीवर तो दुर्योधन तसलाच घोर प्रसंग आणील, आणि तसे करण्यास, तो अधर्म घडवून आणण्यास, हा द्रोण जिवंत राहिल्यास पर्यायाने साह्यच करील हेही अर्जुन विसरला. म्हणजे गुरुभक्ती, सत्य अहिंसा, शरणागतास अभय इत्यादी श्रेष्ठ तत्त्वे ही एकांतिकतेने वापरली तर ती धर्मालाच विघातक होतात ही व्यवहारनीती तो विसरला. आज शेकडो वर्षे भारतीयांची हीच स्थायीवृत्ती आहे.
 धर्मप्रेम, गुरुभक्ती, सत्यनिष्ठा, यांचा उमाळा अनावर होऊन अर्जुन जेव्हा युधिष्ठिराची व स्वपक्षीयांचीच निर्भर्त्सना करू लागला व 'अश्वत्थाम्यापुढे आता तुम्ही कसे टिकता ते पाहतो,' असे आपणच म्हणू लागला, तेव्हा भीम पराकाष्ठेचा क्रुद्ध होऊन गेला. त्या वेळेस भीमसेनाने अर्जुनास जे उत्तर दिले ते उपहास व्याजोक्ती, वक्रोक्ती यांनी इतके नटलेले आहे की वक्तृत्वाचा तो आदर्श होऊन बसला आहे.

भीमसेनाचे अमोघ वक्तृत्व

 भीमसेन म्हणाला, 'शाबास धर्मशीला अर्जुना ! शाबास ! आज तू एखाद्या अरण्यवासी मुनीप्रमाणे किंवा अगदी एखाद्या स्वधर्मदक्ष, क्षमाशील ब्राह्मणाप्रमाणे धर्माच्या गोष्टी सांगत आहेस. अर्जुना, तुझा पराक्रम इंद्रासारखा आहे. पण महासागर ज्याप्रमाणे मर्यादेचे उल्लंघन करू शकत नाही त्याप्रमाणे तुला आज धर्माचे अतिक्रमण करवत नाही. वास्तविक अश्वत्थाम्याचे निवारण करणे वगैरे गोष्टींची तुजपुढे काहीच प्रतिष्ठा नाही. परंतु अधर्म घडेल म्हणून ते करण्यास तुझे मन धजावत नाही ! तेरा वर्षे सतत जाळीत असलेला क्रोध एका बाजूस सारून तू आज धर्माचीच कास धरीत आहेस तेव्हा तुझी कोण प्रशंसा करणार नाही ! सुदैवाने तुझे मन आज धर्माकडे वळले आहे. आणि तुझ्या पूर्वपुण्याईच्या बळाने तुझी बुद्धी अशीच क्षमाशील राहील ! तू धर्माने वागत असता शत्रूंनी अधर्माने तुझे राज्य हिरावून घेतले, द्रौपदीला भर सभेत आणून तिची अप्रतिष्ठा केली, आपणांस वास्तविक योग्य नसताना झाडाच्या साली व कातडी नेसवून तेरा वर्षेपर्यंत वनवासास घालविले, या सर्व काळजास पीळ पाडणाऱ्या गोष्टी क्षात्रधर्माप्रमाणे वागावयाचे म्हणून मी सहन केल्या. आणि आज ती अति नीच अधर्माची कृत्ये मनात सलत असल्यामुळे शत्रूंचा निःपात करून टाकण्यास आम्ही उद्युक झालो असताना तू धर्मज्ञानाची इच्छा करीत आहेस ! तू कठोर भाषण करून माझ्या काळजाला घरे पाडीत आहेस. आमच्या जखमेवर मीठ चोळीत आहेस आणि वाक्शल्यांनी माझे अंतःकरण विदीर्ण करीत आहेस ! अरे, तुझ्या पुरत्या षोडशांशाचीसुद्धा ज्याला सर नाही त्या अश्वत्थाम्याची तू प्रसंशा करतोस ! अर्जुना, तू मोठा धार्मिक आहेस ! पण हा स्वतःचा दोष मात्र तुझ्या ध्यानात येत नाही. अरे, शत्रूची प्रशंसा करून आपल्याच लोकांना भिवविण्यात तुला लाज कशी वाटत नाही ? तू काय समजला आहेस? मला तूं अश्वत्थाम्याच्या गोष्टी सांगतोस ! अरे मी क्रुद्ध झालो तर पर्वताच्या ठिकऱ्या करीन, पृथ्वी विदीर्ण करून टाकीन व इंद्रासह देवांनाही रणातून पळवून लावीन. हे वीरा, अशा प्रकारचा तुझा भाऊ आहे तोपर्यंत द्रोणपुत्राचे भय धरण्याचे कारण तुला नाही.' -(द्रोण १९७).
 अर्जुन व धृष्टद्युम्न यांची यानंतर याच विषयावरून पुष्कळ बाचाबाची झाली. पण सुदैव असे की अर्जुनाने आपल्या गुरुभक्तीची तड पोचविली नाही. त्या निष्ठेमुळे त्याने धर्मभीमांना सोडून दिले असते तर अनर्थच कोसळला असता. पण लवकरच तो शांत झाला. आपण पितामह भीष्मांच्या बाबतीत असलाच 'अधर्म' केला आहे हे त्याच्या ध्यानी आले व त्याने आपल्या गुरुभक्तीला आवर घातला आणि धर्मभीमांशी द्रोह तर त्याने केला नाहीच पण अश्वत्थाम्याच्या नारायणास्त्राच्या प्रयोगात भीमाचा नाश होण्याची वेळ आली असताना त्याने स्वतः जीव धोक्यात घालून त्याला वाचविले व अश्वत्थाम्याची कड घेण्याची क्षणैक आलेली लहर सोडून देऊन पुनरपि त्याने त्याला युद्धासाठी आव्हान केले.
 पण अर्जुनाने ही समंजसता दाखविली नसती व त्याने धर्म-भीमांचा त्याग केला असता तर जो अनर्थ झाला असता त्याची मीमांसा करताना आपणांस काय म्हणावे लागले असते ? व्यवहारनीतीचे, गृहनीतीचे व परनीतीचे योग्य ज्ञान नसल्यामुळे शौर्य, पराक्रस सर्व वाया जाऊन पांडवांचा नाश झाला असाच निर्णय करावा लागला असता व अर्जुनाच्या धर्मप्रेमामुळे दुर्योधनाच्या अधर्माचा उत्कर्ष झाला असे म्हणावे लागले असते.
 पण सुदैवाने तसे झाले नाही. श्रीकृष्णासारखा महान व्यवहारवेत्ता गुरू पांडवांना मिळाला, धर्मराजाने आपल्या सत्यनिष्ठेला मुरड घातली, अर्जुनाने गुरुभक्तीला व धर्मप्रेमाला मुरड घातली, धर्माचा उत्कर्ष यामुळेच होईल, नाही तर आपला पराभव होऊन धर्मनष्ट चांडाळांचे राज्य पृथ्वीवर माजून अधर्माचा विजय होईल हेही त्यांनी समंजसपणे लक्षात घेतले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला

धर्माचा रथ

 धर्मराजाने द्रोणाचार्यांना असत्य सांगितले म्हणून पूर्वी त्याचा रथ जमिनीला न टेकता चार बोटे उंचून असा चालत असे, तो एकदम खाली आला व जमिनीवरून चालू लागला अशी कथा सांगतात. पण ही कथा अर्धवट आहे. कथेचा उत्तर भागही सांगणे अवश्य आहे. युधिष्ठिराने तसे असत्य भाषण केले नसते तर रथा सकट तोच पृथ्वीच्या उदरात गाडला गेला असता, आणि मग असत्य किंवा सत्य कोणतेच भाषण त्याला करता आले नसते. केवळ सत्याच्या बळावर त्याचा तरीही विजय झाला असता, परमेश्वराने त्याला व त्याच्या पक्षाला या सत्यनिष्ठेमुळे वाचवले असते असे म्हणावे तर तेही खरे नाही. कारण सत्याचा वाली जो परमेश्वर त्या परमेश्वरानेच श्रीकृष्णानेच त्याला असत्य भाषण करण्याचा उपदेश केला होता.
 परनीतीचे विवेचन आतापर्यंत सविस्तर केले. स्वतःचे रक्षण व शत्रूचा संहार हे तिचे ध्येय आहे. ते साध्य करताना सत्य, अहिंसा, धर्म यांना मुरड घालून ध्येयवाद, एकांतिकता सोडून देणे अवश्य आहे. कपट करून शत्रूत भेद करणे, मायावीपणा करून शत्रूला फसविणे, विश्वास दाखवून त्याचा घात करणे, इत्यादी कोणताही सूक्तासूक्त मार्ग अवलंबिल्यावाचून गत्यंतर नाही, कारण जगात सत्याचा किंवा धर्माचा विजय होत नसून बलाचा- ऐहिक बलाचा विजय होत असतो इत्यादी सिद्धांतांचे स्पष्टीकरण आपण ऐकले. आणि ही प्रवचने कोणा सामान्य माणसांची नसून भीष्म, श्रीकृष्ण यांसारख्या धीमान, जगताच्या उद्धारार्थ अवतरलेल्या थोर विभूतींची ती आहेत हेही आपल्या घ्यांनात आले. आता या सर्व परनीतीचा सारांश ज्यात आहे असे शत्रुंजय राजाच्या हितार्थ भरद्वाजमुनींनी केलेले प्रवचन शेवटी जोडल्यास अस्थानी होणार नाही.

राजनीतीचा सारांश

 भरद्वाज म्हणाले, "राजा शत्रुंजया, आपत्तीच्या प्रसंगी योग्य प्रकारची मसलत करावी, योग्य प्रकारे पराक्रम गाजवावा, योग्य प्रकारे युद्ध करावे आणि प्रसंग पडला तर योग्य रीतीने पलायनही करावे. त्याविषयी विचार करू नये. नम्रता केवल वाणीत असावी, पण अंतःकरण वस्तऱ्यासारखे तीक्ष्ण असावे. जे कार्य केले असता शत्रूचे व आपले सारखेच हित होईल त्या कार्यासाठी शत्रूशी संधी करावा. तथापि, त्याजवर विश्वास ठेवू नये आणि कार्य झाले म्हणजे सुज्ञ मनुष्याने लागलीच शत्रूपासून दूर व्हावे. मित्राप्रमाणेच शत्रूचेही मधुर भाषणाच्या योगाने सांत्वन करीत असावे. पण सर्पयुक्त असलेल्या गृहाची जशी भीती बाळगावयाची तशीच त्याची भीती बाळगावी. आपल्या बुद्धिसामर्थ्यानुरूप शत्रूचा तिरस्कार करीत असावे आणि कोणतीही गोष्ट होऊन गेल्यानंतर मग तिजबद्दल त्याचे सांत्वन करावे. शत्रू जर निर्बुद्ध असेल तर पुढे लाभ होणार आहे असे दाखवून त्याचे सांत्वन करावे व ज्ञानसंपन्न असेल तर तात्कालिक लाभ दाखवून त्याचे सांत्वन करावे. कल्याणेच्छू राजाने शत्रू पुढे प्रसंगानुसार हात जोडावे, शपथ वाहावी, सामोपचाराचे अवलंबन करावे, शिरसाप्रणाम करून भाषण करावे व अश्रूही ढाळावे. आपला काळ उलट असेल तोवर शत्रूला डोक्यावर घ्यावा, पण योग्य काल आलेला दिसताच दगडावर आपटलेल्या मडक्याप्रमाणे त्याचा चुराडा करून टाकावा.
 प्रसंगविशेषी शत्रूला आशा दाखवावी, पण तिला कालाची मर्यादा सांगावी आणि नंतर ती सफल होण्याला विघ्ने आणावी. आलेल्या विघ्नांचेही काही तरी कारण सांगावे आणि त्या कारणांच्याही मुळाशी कोणता तरी अंतःस्थ हेतू असल्याचे सांगावे. शत्रूपासून जोपर्यंत भीती नाही तोपर्यंत आपण भ्याल्यासारखे वागावे, पण त्यापासून भीती आहे असे दिसून येताच निर्भय मनुष्याप्रमाणे त्याच्यावर प्रहार करावा.
 शत्रुंजया, राजनीतीचे तात्पर्य थोडक्यात असे की, 'कोणाकडूनही आपला उच्छेद होऊ देऊ नये. सौम्य असो अथवा भयंकर असो, हवे ते कर्म करून दीन दशेतून आपला उद्धार करून घ्यावा, आणि प्रथम समर्थ व्हावे आणि सामर्थ्य आल्यानंतर धर्म आचरावा.'

कर्मणा येनकेनैव मृदुना दारुणेनेच
उद्धरेत् दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ॥

-आदि, १४०, ७२


● ● ●