भारतीय लोकसत्ता/भौतिक अधिष्ठान

विद्येच्या प्रगतीला कधीं खंड पडला नाहीं, म्हणूनच तेथली लोकसत्ता यशस्वी होऊं शकली. भारतांत याच कार्यकारण संबंधाची पुनरावृत्ति होत आहे. अजून ही विद्या अल्पशा सुशिक्षितांच्याच कक्षेत आहे. तिचा प्रसार बहुजनांत जसजसा होत जाईल त्या त्या प्रमाणांत त्यांचे कर्तृत्व वाढून समाजांतील विषमता नष्ट होईल आणि त्यामुळे लोकसत्तेची बैठक जास्त विस्तृत आणि म्हणूनच जास्त दृढ व दुर्भेद्य अशी होत जाईल.
 जगांतल्या कोणच्याहि प्रांताचा, कोणत्याहि कालखंडाचा इतिहास पाहिला तरी, समता तेथें उन्नति व विषमता तेथे अधोगति हा महासिद्धान्त आपल्याला दिसून येतो. राजशासन कोणच्याहि प्रकारचें असले तरी हा सिद्धान्त ढळलेला दिसत नाहीं. मग लोकायत्त शासनाला समतेची किती आवश्यकता असेल, याची सहज कल्पना येईल. येथल्या पूर्वसूरींना ही कल्पना आली होती, आणि म्हणूनच आपल्या समाजांतील जन्मनिष्ठ विषमता नष्ट करण्याचे त्यांनीं यावत्शक्य प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा इतिहास आपण येथवर पाहिला. पुढील प्रकरणांत वरील प्रकारच्या विशेष अंगांच्या सुधारणेच्या नादी न लागतां समाजाचे मूळ अधिष्ठानच बदलून टाकण्याचे आगरकरांनीं जे महनीय प्रयत्न केले, त्यांचे स्वरूप विशद करून त्यानंतर लोकशाहीच्या राजकीय अंगाच्या अभ्यासाकडे आपण वळू.




प्रकरण चौथें

भौतिक अधिष्ठान
आगरकर व विवेकानंद यांचे कार्य



धर्मनिरपेक्ष शासन

 आज भरतभूमीच्या राजशासनाचीं सूत्रे ज्यांच्या हातीं आहेत, त्या पुरुषांनीं एकमुखान असे जाहीर केलें आहे कीं, या भूमीचें शासन है धर्मनिरपेक्ष असच राहील. शासनसंस्था धर्माधिष्ठित असेल तर लोकसत्ता कधींच यशस्वी व्हावयाची नाहीं, असें त्यांचे निश्चित मत आहे आणि त्यामुळेच आपले शासन धर्मनिरपेक्ष ठेवावयाचे अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. आणि ती सर्वथैव योग्यच आहे याविषयीं लोकसत्तेच्या अभ्यासकांत मतभेद होणार नाहीं.
 पण देशाचे शासन धर्मनिरपेक्ष करावयाचे तर त्याला केवढी पूर्व तयारी करणें अवश्य असते, याची फारच थोड्यांना कल्पना असेल. आज या भूमींत हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जे समाज आहेत, त्यांच्या मनावर हजारों वर्षे धर्माची सत्ता अप्रतिहतपणे चाललेली आहे. या समाजांची सर्व बैठकच धर्माच्या पायावर स्थिरावलेली आहे. त्यांच्या जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्व अंगोपांगांवर धर्माची सर्वव्यापी सत्ताच निरंकुशपणे अधिराज्य गाजवीत आहे. त्यांचा व्यवहार पारलौकिक असो, ऐहिक असो, त्यांतील धोरण धर्माचा कौल घेऊनच निश्चित केलें जातें. त्यांच्या जीवनांत असा एकहि आचार नाहीं, विचार नाहीं, तत्त्व नाहीं, रूढी नाहीं कीं, जिचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पारलौकिक धर्माशीं संबंध जोडलेला नाही. अशा या भिन्न समाजांनी एकत्र येऊन घडविलेला जो भारतीय समाज त्याचे राजशासन- म्हणजे त्याच्या राष्ट्रीय प्रपंपाचें प्रधान अंग हें धर्मनिरपेक्ष करावयाचे म्हणजे या भारतीयांच्या जीवनावर धर्माची जी सर्वव्यापी सत्ता चालते ती नष्ट करून टाकणे किंवा बव्हंशी शिथिल करून टाकणे ही पहिली आवश्यक गोष्ट होय. समाजाच्या जीवनापासून केवळ शासनसंस्था कधींच विलग करता येत नाहीं. निदान अर्वाचीन काळांत तर ते अशक्यच आहे. शासनसंस्था हें समाजवृक्षाचें अंतिम फळ आहे. तेव्हां एखाद्या झाडाच्या फळांत सुधारणा करावयाची असेल, त्याची गोडी, त्याचा रस, त्याचा आकार व तेज वाढवावयाचे असेल तर ज्याप्रमाणे नुसती शेंड्याच्या आसपास छाटाछाट करून तेथे निराळी पुष्टि देण्याचा कांहीं उपयोग नसतो, तर त्या वृक्षाच्या मुळापासून नवीन जीवनरसांचे पोषण देणे अवश्य असते, त्याचप्रमाणे समाजवृक्षाचे अंतिम फळ म्हणजे जी शासनसंस्था तिच्यांत आमूलाग्र परिवर्तन करावयाचे असेल, तिचे स्वरूप समूळ बदलून टाकावयाचे असेल तर त्या वृक्षाचे मुळापासूनचे पोषणच बदलले पाहिजे, त्या समाजाचे अधिष्ठानच बदलून टाकिले पाहिजे. पूर्वीचे हे धर्माधिष्ठित समाज धर्मनिरपेक्ष लोकायत्त शासनाच्या अंकित रहावे अशी इच्छा असेल तर त्यांचे धर्म हे अधिष्ठान बदलून त्यांच्यावरची धर्माची सत्ता नष्ट करून त्यांना भौतिक शास्त्राधिष्ठित केले पाहिजे. आणि हे धोरण त्यांच्या एकाददुसऱ्या अंगाविषयीं न अवलंबिता त्यांच्या सर्व अंगोपांगांच्या बाबतीत त्याचा पुरस्कार केला पाहिजे. येथले राजकारण, समाजकारण, येथली नीतिव्यवस्था येथले वैयक्तिक संबंध, कौटुंबिक संबंध, स्त्रीपुरुषांचें वैवाहिक संबंध, येथले शैक्षणिक धोरण, त्यांतील गुरुशिष्य संबंध- सर्व सर्व भौतिकशास्त्राधिष्ठितच असले पाहिजे. असे केले तरच शासन धर्मनिरपेक्ष करण्यांत यश येऊन अंतीं लोकसत्ता दृढ व अभंग होते. आपल्या शास्त्यानीं धर्मनिरपेक्ष शासनाची घोषणा केली तेव्हां तिला या भूमींत जवळजवळ मुळींच विरोध झाला नाहीं आणि त्या तत्त्वान्यये शासन चालविण्यांत त्यांना कांहीं यशहि प्राप्त झाले आहे. या यशाचे पुष्कळसे श्रेय प्रथम केसरीचे व नंतर सुधारक पत्राचे संपादक असलेले भरतभूमीचे थोर सुपुत्र गोपाळ गणेश आगरकर यांना व त्यांनी प्रसृत केलेल्या विवेकनिष्ठ विचारप्रणालीला आहे. भौतिकाधिष्ठित समाजरचनेचे बहुतेक सर्व सिद्धान्त आगरकरांच्या या विचारप्रणालींत समाविष्ट झालेले आहेत.

विज्ञानप्रणीत समाजरचना

 आगरकर हे स्वतः अज्ञेयवादी होते. 'ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियास अगम्य आहे, हा धर्मसंबंधींचा शेवटचा सिद्धांत आहे' असे त्यांनी 'आमचे काय होणार' या निबंधांत सांगून टाकले आहे. आणि या अनुरोधानेच ते समाजशास्त्रीय तत्त्वांचें विवेचन करीत. 'आम्हां मनुष्यांना पाहिजे काय व ते मिळेल कशाने ?' या आपल्या निबंधांत ऐहिक अभिवृद्धीला, मानवाच्या इहलोकींच्या उन्नतीला (पारलौकिक) धर्मांची मुळींच आवश्यकता नाहीं असें त्यांनी निःसंदिग्धपणे प्रतिपादिले आहे. ते म्हणतात, 'ग्रीस व इटली देशाचे जुने वैभव, फ्रान्स देशांतील बडी राज्यक्रांति, जर्मनी आणि रशिया यांचे जय, पेशव्यांचा प्रचंड राज्यविस्तार, अमेरिकन लोकांचे स्वातंत्र्य व ज्यावरून सूर्य कधीं मावळत नाहीं असे इंग्रजांचे अफाट राज्य यांचा धर्माशीं म्हणण्यासारखा कांहीएक संबंध नाहीं. यासाठी ऐहिक सुख पाहिजे असेल त्यांनी राजनीति, पदार्थविज्ञान, नीतिप्रसार, विद्योत्तेजन यंत्र कलाप्रसार व धनसंचय या विषयांकडे आपले तनमनधन लावावे.' याच निबंधांत अन्यत्र त्यांनी म्हटले आहे कीं, 'ऐहिक व पारमार्थिक सुखाचे विषय व ते संपादण्याची साधने अगदीं भिन्न असल्यामुळे एकमेकांचें एकमेकांशीं बहुधा पटत नाहीं, किंवा तीं परस्पराला उपरोधक असतात असे म्हटले तरी चालेल.' हा विचार सांगून, ऐहिक उन्नतीसाठींहि घर्माची आवश्यकता आहे, असे आग्रहाने प्रतिपादन करणारे जे न्या. मू. रानडे त्यांच्यावर आगरकरांनी कडक टीका केली आहे.
 या स्पष्ट प्रतिपादनांपेक्षांहि आगरकरांनीं आपल्या धर्मकल्पना, देवदेवता, पुराणें व त्यांतील रूढी यांची ऐतिहासिक पद्धतीनें जी चिकित्सा केली आहे तिच्यामुळे रूढ पारमार्थिक धर्मकल्पनांना मोठा हादरा बसून समाजप्रवृत्ति विवेकप्रधान करून टाकण्याकडे फारच उपयोग झालेला आहे. 'देवतांच्या कल्पना पिशाच्चापासून निर्माण झालेल्या आहेत.' 'अनादि कालापासून मनुष्यास ईशशक्तीचें ज्ञान आहे असें जें अनेक श्रद्धाळूंचे फार जुने म्हणणें आहे ते साधार नाहीं.' हे व असले त्यांनी सांगितलेले विचार आज सर्वमान्य झाले आहेत; आणि म्हणूनच आज आपली आहे इतकी तरी प्रगति शक्य झाली. भौतिकशास्त्राधिष्ठित समाजाचे मुख्य लक्षण हें कीं, त्याची सर्व नियमने, बंधने, त्यांतील सर्व विधिनिषेध, त्याचे उत्कर्षापकर्षाचे सिद्धांत हे सर्व अनुभव, इतिहास, तर्क, प्रयोग, विवेक यांवर आधारलेले असतात, अतींद्रिय साधनांनीं प्राप्त झालेले ज्ञान हिशेबांत धरून या समाजाला वळण लावण्याचा प्रयत्न कोणीहि करीत नाहीं. त्याचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, युद्धशास्त्र, शिक्षणशास्त्र, सर्व कांहीं अनुभवप्रमाणगम्य असें असतें. अर्थात् समाजाच्या मनावरील अतींद्रियधर्मांचे वर्चस्व नष्ट झाल्याखेरीज समाज असलीं अनुभवगम्य बंधने मानण्यास व त्याचा आदर करण्यास कधींच सिद्ध होणार नाहीं हें सांगण्याचीं जरूर नाहीं. हे वर्चस्व नष्ट होण्यास जुन्या धार्मिक रूढींचीं, आचारविचारांची आणि गृहीत सिद्धांतांची ऐतिहासिक पद्धतीने केलेली चिकित्सा पुष्कळच कारणीभूत होते. आगरकरांनी अनेक निबंधांत ही चिकित्सा अगदी कठोर अशा शास्त्रीय दृष्टीने केली आहे. आपल्या समाजाची आज जी कांहीं शास्त्रप्रवण प्रवृत्ति झाली आहे तिचें श्रेय आगरकरांना देण्यांत येते ते याच कारणानें. (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. २८-२९ भाग २ रा पृ. १०-३०)

पूर्णावस्था पुढे आहे

 भौतिकाधिष्ठित किंवा विज्ञानप्रणीत समाजरचनेचा दुसरा सिद्धांत हा मनुष्यजातीच्या पूर्णावस्थेविषयीं आहे. ब्रिटिश लोकसत्तेचा अभ्यास करणारांना हे माहीतच आहे की मानवसमाजाची उत्तरोत्तर प्रगति होत आहे हा विचार इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस जर्मीं वेथाम याने रूढ केला आणि त्यामुळेच समाजांत चैतन्य निर्माण होऊन इंग्लंडचा उत्कर्ष झाला. या विचाराने मिळणाऱ्या प्रबल प्रेरणेवांचून मानवाला पराक्रम करणे शक्यच नाही. इंग्लंडमध्ये जॉनसनच्या काळापर्यंत प्रगतीचा सिद्धांत फारसा कोणाला मान्य नव्हता, आणि हजारों वर्षे जगाची तीच स्थिति होती. मनु, कानफ्यूशियस इ. धर्मवेत्यांचे समाजाला स्थिरावस्था आणण्याचेच प्रयत्न असत आणि त्यांत ते यशस्वी झालेले होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे समाजाला फार प्राचीनकाळी पूर्णावस्था येऊन गेलेली आहे व तेथून उत्तरोत्तर त्याचा ऱ्हासच होत आहे. सत्य, त्रेता, द्वापर व कली ही आपली युगकल्पना याच तत्त्वज्ञानांतली आहे. तिच्याअन्वयें पुढील काळांत समाजाची प्रगति होणे शक्यच नाहीं. उत्तरोत्तर कालक्रमानें अपरिहार्यपणे त्याचा ऱ्हासच होत जाणार. या कल्पना ज्या समाजांत दृढमूल झालेल्या असतात त्याचा उत्कर्ष होणे किती कठीण आहे हे सहन ध्यानांत येण्यासारखे आहे. कांहीं केलें तरी प्रगति अशक्य आहे अशी मनुष्याची खात्री झाली तर तो उद्योगाला प्रवृत्त होणार नाहीं. त्याच्या मनांत उत्साह व मनगटांत बळ येणार नाहीं. अशीं माणसे दैववादी बनून प्रवाहपतित होऊन बसतात. भारतीय समाजाला ब्रिटिशांच्या पूर्वकाळी हीच अवस्था प्राप्त झाली होती. अशा समाजाची उन्नति होणे अशक्य आहे. आणि तेथे लोकसत्ता तर क्षणभरही टिकणार नाहीं. लोकसत्ता ही गतिशीलतेवर दृढ श्रद्धा असणाऱ्या लोकांनाच यशस्वी करतां येते. स्थिरावस्थेच्या पुरस्कर्त्यांना नाहीं.
 ही गतिशीलता आपल्या समाजांत निर्माण करण्यासाठी आगरकरांनी फार प्रयत्न केले आहेत. 'आमच्या अल्पसमजुतीप्रमाणे मनुष्याची पूर्णावस्था अद्याप यावयाची आहे' हे मत 'आमचे काय होणार' या निबंधांत त्यांनी सांगितले आहे आणि त्याचे विशेष विवेचन 'मनुष्यजातीची पूर्णावस्था' या निबंधांत केलें आहे. (केसरीतील निबंध पुस्तक २ रें. पृ. ८१). ते म्हणतात, "ज्यांची जातिभेदावर श्रद्धा आहे त्यांच्या मतें मानवाच्या पूर्णावस्थेचा काळ मागेंच होऊन गेला असून आतां समानतेकडे मानवाचा कल होत असल्यामुळे दिवसेंदिवस मनुष्यजाति भ्रंश पावत आहे; पण जेथें मनुष्यास जन्मतः सर्वामध्ये साम्य आहे असे वाटत असतें तेथें याहून भिन्न स्थिति असते. तेथे कोणासहि आपण आहों तीच पूर्णावस्था आहे असे भासत नाहीं. आपल्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यास जागा आहे असे प्रत्येकास वाटते व त्यास ती करण्यास पुष्कळ उमेद असते. युरोपीय समाजांत ही समजूत दृढ होत आहे. या समजुतीनेच त्यांचे सुधारणेकडे सदोदीत प्रयत्न चालले आहेत. या समजुतीने युरोपीय लोकांत किती परिश्रम, किती उद्योग, किती धाडस व किती घडामोड सुरू आहे, याची आमच्याने कल्पनाहि करवत नाहीं." (उक्तग्रंथ पृ. ८८)
 आपला प्राचीन व मध्ययुगीन इतिहास पाहिला तर प्रगति तत्त्वावर व मानवाचें पूर्णत्व पुढे आहे या तत्त्वावर समाजाची श्रद्धा असण्याचे महत्त्व किती आहे ते कळून येईल. आपली आजची कलियुगाची घातकी कल्पना महाभारतकाळीं या स्वरूपांत नव्हती. निदान कालगतविषय तिच्या अगदीं उलट अशीहि एक कल्पना त्या काळीं मान्य झाली होती. सत्य, त्रेता, कलि इ. युगें हीं कालक्रमाने येत नसून तीं राजाच्या कर्तृत्वावर अवलंबून असतात असे महाभारतांत पितामहांनीं सांगितले आहे. राजा नेव्हां आपल्या पराक्रमानें देशांत शांतता प्रस्थापून प्रजेचा उत्कर्ष घडवितो तेव्हां सत्ययुग अवतरते— दण्डनीत्यां यदा राजा सम्यक् कार्त्स्न्येन वर्तते । तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ॥ (शांति पर्व ६९।८०)- आणि राजा दुष्ट किंवा दुबळा असला व त्यामुळे सर्वत्र अराजक माजलें कीं कलियुग मानतें, असा अगदी पुरोगामी विचार त्या वेळी सांगितला गेला होता. आपला प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली व उज्ज्वल असा होता याचीं जीं अनेक कारणे आहेत त्यांतील मानवाच्या पूर्णत्वासंबंधींचे हे तत्त्वज्ञान हें एक निश्चितच कारण आहे. मागें पूर्णावस्था होऊन गेली व आतां दिवसेंदिवस ऱ्हास होत जाणार हा विचार जेव्हां रूढ होतो तेव्हां मानवाच्या सर्व कर्तृवाचा झराच आटून जातो. 'आपण स्ववश नसून कालवश आहों ' हा विचार मानवी पराक्रमाला अत्यंत बाधक आहे. हाच विचार, हेंच तत्त्वज्ञान ब्रिटिशांपूर्वी शेंकडों वर्षे येथे रूढ होते. आगकरांनी ते उलथून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सुखभोगाचे महत्त्व

 युरोपच्या प्रगतीस कारणीभूत झालेले भौतिकवादांतील तिसरे तत्त्व म्हणजे, माणसानें पराक्रम करून अधिकाधिक सुखोपभोग मिळविण्याचा प्रयत्न करावा, त्यांत अनुचित असे कांहीं नसून ते त्याचे कर्तव्यच आहे, ते त्याला भूषणच आहे हे होय. वेदान्ती, संन्यासमार्गी, पारलौकिकधर्मनिष्ठ पंडित सुखभोगांचा नेहमी तिरस्कार करतात व त्यांचा त्याग करण्यास सांगतात. हे भोग मानवाच्या मोक्षमार्गाच्या आड येतात असे सर्व धर्माचे मत आहे. पण हें मत रूढ होतांच मानवाचें पौरुष खच्ची होते व तो इहलोकीचे वैभव गमावून बसतो, हे पौर्वात्य राष्ट्रांच्या अर्वाचीन काळच्या इतिहासावरून स्वच्छ दिसून येते. हा अनर्थ टाळावयाचा असेल तर समान भौतिकशास्त्राधिष्ठित होऊन सुखभोगाकडे मानवाची प्रवृत्ति होणे अवश्य आहे. हें जाणूनच आगरकरांनीं हें तत्त्व प्रतिपादिले आहे. 'भातभाकरीवर कसातरी जीव राखावा व दोन जाडेभरडे कपडे घालून शरीर झांकावें या पलीकडे आमच्या लोकांची सुखोपभोगाची कल्पना जातच नाहीं' या विषयीं खेद प्रदर्शित करून आगरकर पुढे म्हणतात, 'आपल्यामध्ये स्वसुखोपभोगाची ही जी हेळसांड माजली आहे ती अत्यंत दूषणीय आहे, इतकेंच नव्हे तर ती देशाला शारीरिक व मानसिक दारिद्र्य येण्याचे आदिकारण होय. (उक्तग्रंथ पृ. १२२) ऐहिक सुखाकडे या दृष्टीने पहाण्याची प्रवृत्ति असल्यामुळेंच आगरकरांनीं पुढील उद्गार काढले आहेत. 'तीव्र भूक व विषयवासना यांस उत्तम रीतीने भागवितां आल्यास जे समाधान होतें तें अद्वितीय व अवर्णनीय आहे, हे सत्यप्रिय व विचारी मनुष्यास कबूल केलें पाहिजे' (पृ. १४४) ऐहिक सुखाची व त्यांतल्यात्यांत विषयसुखाची उठल्याबसल्या निंदा करण्यास चटावलेल्या वेदान्तप्रवण मनुष्यास हे उद्गार अगदी असह्य होतील; पण हेच विचार राष्ट्राच्या समृद्धीला व म्हणूनच लोकशासनाला पायाभूत होत असतात, जाणून ते सांगितल्याबद्दल आपण आगरकरांना शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.

महातत्त्व

 व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बुद्धिप्रमाण्य हें विज्ञानाधिष्ठित समाजाचें मूलमहातत्त्व होय. त्याचा तर आपल्या लेखनांत आगरकरांनी उच्च स्वराने सारखा उद्घोष चालविला होता. 'सुधारक काढण्याचा हेतु' या सुधारकांतील पहिल्याच लेखांत त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ते म्हणतात, 'ज्या तत्त्वांचें अवलंबन केल्याने इतर राष्ट्र अधिकाधिक सुधारत चालली आहेत, तीं तत्त्वे हा सुधारक महाराष्ट्र लोकांपुढे वारंवार आणील. तसें करण्यास त्यास, आज ज्याचा जारीनें अंमल चालत आहे त्या लोकमता विरुद्ध बरेंच जावे लागणार असल्यामुळे, बराच त्रास पडणार आहे. पण त्याची तो पर्वा करीत नाहीं. कारण ज्या लोकमताचा पुष्कळांस बाऊ वाटतो त्याचा बऱ्याच बाबतींत आदर करण्यापेक्षां अनादर करणे हाच श्लाध्यतर मार्ग होय.'
 'मनुपाराशरादिकांचे प्रामाण्य आम्ही मानीत नाहीं' हे सांगतांना अत्यंत आवेशाने त्यांनी पुढील घोष केला आहे 'एकाद्या दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय ? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत त्यांस शेंकडों मनूंचे व सहस्रावधि पाराशरांचे आधार दाखविलेत तरी ज्याप्रमाणे पर्वताच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगांनें कड्यावरून पडूं लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास कोणीहि धजत नाहीं, त्याप्रमाणे आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतीस लागलेला वणवा कोट्यवधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवाताने किंवा मोठ्या किड्यांच्या शुष्क श्वासवातानें विझण्याचा मुळींच संभव नाहीं. उलट तेच त्यांत होरपळले जाण्याचा संभव आहे.' (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. १४५) बुद्धिस्वातंत्र्याच्या आनंदाचे तर एका ठिकाणी त्यांनीं ब्रह्मानंदासारखे वर्णन केले आहे.' बुद्धिमंदिरांत सत्याचा दीप प्रकाशित झाल्याबरोबर वृत्ति आनंदमय होऊन एकप्रकारें ज्याचे देहावसान सुटते असा एखादा महात्माच आईबापांची, गणगोतांची, धनद्रव्याची, जातीची, देशाची किंबहुना समग्र मनुष्यतेची पर्वा न ठेवतां अन्तरोत्थित अमर्याद प्रेरणाबलाच्या भरवशावर हवे तेवढे महत्कृत्य हातीं घेऊन तडीस नेतो.' (वरील ग्रंथ पृ. २०७)
 भौतिक शास्त्राधिष्ठित समाजरचनेचीं कांहीं प्रधान तत्त्वें वर सांगितलीं. पण तेवढीच सांगून आगरकर थांबत नाहींत. सामाजिक व वैयक्तिक संबंधांच्या अगदी बारीक तपशिलांतहि ते शिरतात व या नव्या तत्त्वांच्या अवलंबनाने तेथे कोणचीं परिवर्तने होतील व होणे अवश्य आहे तेहि ते दाखवितात. पितापुत्रांचें, पतिपत्नींचें, सासूसुनेचे नाते नव्या समाजरचनेत आमूलाग्र बदलून गेलें पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. मुलांनी आईबापाशीं कृतज्ञतेने वागावें, त्यास दुःख देऊं नये, त्यांची सेवा करावी हें युक्तच आहे; पण स्वतः प्रौढ झाल्यावर सामाजिक, धार्मिक वा राजकीय बाबतीत त्यांच्या आज्ञा सतत पाळीत रहाणे हें समाजाला घातक होईल, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. प्रगति व्हावयाची तर जुन्या व नव्या पिढीचा कलह होणें अवश्यच आहे, तो जेथे होत नसतो तेथे सर्व प्रगति खुंटलेली असते, हैं प्रतिपादन त्यांनी केले आहे. पुरुषाच्या व्यक्तित्वाइतकीच त्यांना स्त्रीच्या व्यक्तित्वाची महती वाटत होती. म्हणूनच विवाहाच्या बाबतींत स्वयंवर, प्रियाराधन, वल्लभोपासना हीं रूढ करावीं आणि लग्न झाल्यावर मुलीने आईबापांचे घर सोडून एकदम नवऱ्याच्या स्वतंत्र संसाराचे आधिपत्य पतकरावे व अशा रीतीनें सासुरवासाचे घोडे मुळींच नाहीसें करावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. २२९)
 शासनसंस्था ही धर्मनिरपेक्ष व्हावयाची तर समाजाच्या अगदीं अंगोपांगांत आमूलाग्र परिवर्तन होणे अवश्य आहे हें आगरकरांनी किती सूक्ष्मपणे जाणलें होतें तें वरील उताऱ्यावरून आपल्या ध्यानांत येईल. तीं सर्व अंगोपांगें-धर्मसंस्था, नीतिसंस्था, कुटुम्बसंस्था, आणि त्यांत अंतर्भूत असलेल्या व्यक्तींचे परस्परसंबंध या सर्वाचेच अधिष्ठान बदलले पाहिजे आणि त्यांना नवें विज्ञानाचे, बुद्धिवादाचे अधिष्ठान दिले पाहिजे, हे तत्त्वज्ञान सांगणे हें आगरकराचें जीवितकार्य होते. ते त्यानीं किती उत्कटत्वानें व तळमळीनें केले आहे, ते आपल्या ध्यानी येईल तर भारतीय लोकसत्ता त्यांची किती ऋणी आहे, ते आपणांस कळून येईल.

मूलगामी बुद्धिवाद

 वरील तत्त्वांमध्ये बुद्धिप्रामाण्याचें जें तत्त्व आहे ते आगरकरांनीं प्रथम सांगितले असे नव्हे. राजा राममोहन हे बुद्धिप्रामाण्यवादीच होते. त्यांचा ब्राह्मसमाज व महाराष्ट्रांतील प्रार्थनासमाज हे वेद किंवा इतर कोणचाहि तत्सम ग्रंथ ईश्वरप्रणीत मानीत नाहीत; त्याचप्रमाणे दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, रानडे, भांडारकर हे त्या काळचे सुधारकहिं बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करीत; पण त्यांच्या बुद्धिवादाचा प्रभाव आगरकरांच्या बुद्धिवादासारखा पडूं शकला नाहीं. याचे कारण हेंच कीं, जुन्या धर्माधिष्ठानावर उभे राहून त्यांनीं या नव्या तत्त्वाचा स्वीकार केला होता. या विषयीं 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत आचार्य जावडेकरांनी केलेले विवेचन उद्बोधक होईल. ते म्हणतात, 'धर्मांची सर्वव्यापी सत्ता नष्ट करून राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवहाराची स्वतंत्र पृथक् शास्त्रे निर्माण करणे आणि धर्माकडे केवळ अंतरंग सुधारणेचे किंवा आत्मिक उन्नतीचे कार्य ठेवणें हें एक आधुनिक युरोपीय संस्कृतीचे लक्षण आहे. आधुनिक युरोपीय सुधारणेत सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवहारांची धर्माशी फारकत केलेली आहे. इतकेच नव्हे तर नीतिशास्त्राचाहि धर्मांशीं व अध्यात्माशीं कांहीं संबंध नाहीं असे प्रतिपादण्यांत येत आहे. ही विचारसरणी आज आपल्या समाजांतहि रूढ होऊ पहात आहे. परंतु राजा राममोहन रॉय यांच्या वेळच्या हिंदुसमाजाची तशी स्थिति नव्हती. त्या वेळचा हिंदुसमाज हा मध्ययुगीन युरोपीय समाजासारखा होता. त्याच्या सर्व व्यवहारावर धर्मांची सत्ता अप्रतिहत नसली तरी तत्त्वतः चालत होती व ती तशी चालावी हेंच साहजिक व इष्ट आहे, अशी त्या वेळीं हिंदी समाजाची कल्पना व श्रद्धा होती.' (पृ. ६२)
 यावरून हे ध्यानांत येईल कीं, आगरकरांच्या पूर्वीच्या सर्व सुधारकांनी बुद्धिप्रामाण्य जरी स्वीकारले होते, तरी त्याची खरी प्रखरता त्यावेळीं भासमान होर्णे शक्य नव्हतें. कारण या पूर्वसूरींची धर्मनिष्ठा अचल होती. त्यांचे सर्व प्रयत्न धर्माचे स्वरूप उज्ज्वल करावे या हेतूने चालले होते. धर्माच्या सर्वव्यापी सत्तेचा उच्छेद करावा असा त्यांचा प्रयत्न नव्हता व हेतुहि नव्हता. इतकेच नव्हे तर त्याला त्यांचा तीव्र विरोध होता. न्या. रानडे, डॉ. भांडारकर यांना तर भौतिकवादाचा संताप येत असे. आणि म्हणूनच आपण हे ध्यानांत घेतले पाहिजे की, त्या सर्व सुधारकांच्या बुद्धिप्रामाण्याचा व्याप फार मर्यादित होता. भौतिकवादांतील एका तत्त्वाचा त्यांनी कांहींसा अंगीकार केला होता इतकेंच. आगरकरांच्या प्रतिपादनाचा आत्माच भौतिकवाद होता. त्यांना समाजाचें धर्म हें अधिष्ठानच बदलून टाकावयाचे होते. ऐहिक व्यवहारवरील जी आध्यात्मिक मतप्रणालींची सत्ता तीच आम्हांस बाधक झाली आहे, असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता आणि त्या दृष्टीने त्यांनी बुद्धिप्रामाण्याचें प्रतिपादन चालविले होते. धर्मनिरपेक्ष लोकायत्त शासनाला तेच तत्त्वज्ञान अवश्य होते; राममोहन किंवा रानडे यांच्या बुद्धिप्रामाण्याने हें कार्य झाले नसते, कारण त्यांचे अधिष्ठान जुनेच होते. ते अधिष्ठान बदलून टाकावें हें आगरकरांचे तत्त्वज्ञान होते आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची महती जास्त ठरते.

अंतर्ज्ञान व लोकसत्ता

 आगरकरांनीं पुरस्कारिलेल्या भौतिकाधिष्ठित बुद्धिप्रामाण्याचा लोकसत्तेशी किती घन संबंध आहे, तें पाश्चात्य पंडितांनी इतर अनेक देशांतील लोकसत्तांविषयीं जीं विवेचनें केलीं आहेत. त्यावरून सहज ध्यानांत येईल. पारलौकिक धर्माचा मुख्य आधार म्हणजे अतींद्रिय ज्ञान, अंतर्ज्ञान हा होय. इतिहास, अनुभव, तर्क, प्रयोग हीं सर्व तेथें गौण होत. बुद्धि व पंचज्ञानेंद्रिये याहून एक निराळी ज्ञानशक्ति मनुष्याला असते हें पारलौकिक धर्मात, अध्यात्मशास्त्रांत गृहीत धरलेले आहे आणि लोकशाहीला हेंच तत्त्व अत्यंत मारक असें ठरते. कारण अध्यात्मशास्त्रांत त्या अतींद्रिय ज्ञानशक्तीनें संपन्न असा जो पुरुष त्याचें वचन प्रमाण धरलेले असते. त्याला स्फुरेल तें सत्य. त्यापुढे दुसऱ्या कोणी शंका घेणें हेहि अधर्म्य आणि त्याने सांगितलेले तेंच एकमेव सत्य असे मानणे हा धर्म होय. लोकसत्ता बरोबर याच्या उलट तत्त्वावर अधिष्ठिलेली असते. माझ्या विचाराइतकाच दुसऱ्याचा विचार, माझ्या मताइतकेंच दुसऱ्याचें मत सत्य असू शकेल व त्याला तें मत सांगण्याचा माझ्याइतकाच, किंबहुना जगांतल्या इतर कोणच्याहि श्रेष्ठ पुरुषाइतकाच हक्क आहे, म्हणजेच त्याला विचारस्वातंत्र्य आहे, हे तत्त्व म्हणजे लोकशाहीचा प्राण होय. अध्यात्मशास्त्रांत अतींद्रियज्ञान संपन्न पुरुषांइतका अधिकार दुसऱ्या कोणाचाहि नसतो आणि त्यांनी सांगितलेल्या सिद्धांताइतका दुसरा विरोधी सिद्धांतहि खरा असूं शकेल ही कल्पना त्या शास्त्राला असह्य आहे. म्हणजे मानवाची मूलभूत समता व नवीन सत्य- संशोधनाचा अवसर हे लोकशाही घटक अध्यात्माला मंजूरच नाहींत आणि म्हणूनच अध्यात्माच्या, पारलौकिक धर्माच्या वर्चस्वाखाली लोकसत्ता वाढ कधींच शक्य नाहीं. अध्यात्माला पोप, शंकराचार्य, खलिफा, मनु यावांचून गति नाहीं व यांचे अधिकार मानणे हे लोकशाहीला कधींच मानवणार नाहीं. अध्यात्मवर्चस्व व लोकसत्ता यांचा असा हा मूलभूत विरोध आहे आणि म्हणूनच लोकसत्तेचें शासन धर्मनिरपेक्ष असणें अवश्य आहें. बुद्धि- प्रामाण्याच्या प्रसारावांचून असे शासन निर्माण करणे व तें टिकविणें अशक्य आहे. म्हणून लोकशाहीला त्याची फार आवश्यकता आहे. आगरकरांनी नेमके तेच कार्य केलें म्हणून त्यांची महती विशेष.
 आज आगरकरांचे तत्त्वज्ञान आपण सर्वांशीं नाहीं तरी बव्हंशीं आत्मसात् केले आहे आणि त्याअन्वये समाजरचना करण्याची ईर्षा धरली आहे; पण त्यांच्या काळी म्हणजे सुमारे साठ वर्षांपूर्वी समाजाने त्याचें मुळींच स्वागत केले नव्हते, इतकेंच नव्हे तर समाजाला ते अत्यंत तिरस्करणीय व त्याज्य असेंच वाटत होतें. परमेश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्मसिद्धांत, वर्णाश्रमव्यवस्था, परंपरेचा अंध अभिमान व कुटुंबांतील अधिकारश्रेणी हे पांच घटक म्हणजे हिंदुसमाजाचे पंचप्राण होते आणि त्यांवरच आगरकरांनीं टीकास्त्र चालविले होतें. मनुष्यतेचे ऐहिक सुखसंवर्धन हा एकच धर्म ते मानीत असत आणि पाश्चात्य पंडितांच्या आधारे शुद्ध विवेकनिष्ठेने त्याचें प्रतिपादन करीत असत. त्यांना आपल्या भारतीय पूर्वजांचा अगदीं प्रखर असा अभिमान असला तरी 'सध्यांच्या काळीं त्यांच्या विद्या, त्यांचे ग्रंथ, त्यांचे तत्त्वज्ञान आपणांस उपयोगी पडण्याजोगे नसून आपण आतां पाश्चात्य सुधारणांचा अंगीकार केला पाहिजे, पाश्चात्यांचे शिष्यत्व पत्करिलें पाहिजे' असे ते निःसंदिग्धपणे प्रतिपादीत असत. तसले ते तत्त्वज्ञान व त्याचे असले प्रतिपादन त्या काळी समाजाला रुचणें व पचणें शक्य नव्हते; त्यामुळे त्याच्याविरुद्ध त्या वेळीं प्रतिक्रियेची एक प्रचंड लाट उसळली. ती लाट एवढी जबरदस्त प्रभावी होती कीं, आजहि आपण धर्मनिरपेक्ष समाजाच्या गोष्टी बोलत असलो तरी, आणि जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगांत पाश्चात्यांचे अनुकरण करीत असलो तरी तात्विकरीत्या तसें कबूल करणे आपणांस जड जातें आणि त्या लाटेची शीग होती त्यावेळी जी भाषा आपण बोलत होतो तीच भाषा आज ती शीग व लाटहि ओसरून गेली आहे तरी आपण कायम ठेवली आहे. म्हणून या प्रतिक्रियेची मीमांसा करणे अवश्य आहे.
 व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा, आमूलाग्र परिवर्तन, क्रांतिप्रवृत्ति, गतिशीलता इ. भौतिकवादांतील जी तत्त्वें त्याविरुद्ध त्या काळीं भरतभूमीच्या सर्वच प्रांतांत जोराची प्रतिक्रिया सुरू झाली होती. पंजाबांत स्वामी दयानंदांनी स्थापलेला आर्यसमाज भौतिकवादाचा कट्टा विरोधक होता. मद्रास मध्यें अड्यारला स्थापन झालेला जो थिऑसफीचा पंथ त्यानें तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाविरुद्ध मोहीमच काढली होती. महाराष्ट्रांतहि आगरकरांच्या तत्त्वज्ञानाला कसून विरोध होत होता; पण या लाटेला ने खरें उधान आले स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील जगद्धर्मपरिषदेत जें अलौकिक यश मिळविले त्यामुळे या विवेकानंदप्रणीत प्रतिक्रियेविषयीं आपणांस जरा जास्त चिकित्सेने विचार करणे अवश्य आहे. त्यावांचून आगरकरांचे तत्त्वज्ञान व भौतिकवाद यांचे खरें महत्त्व व खरी आवश्यकता आपल्या ध्यानीं येणार नाहीं.
 भौतिकवादाविरुद्ध जी प्रतिक्रिया झाली ती आज जरी आपणांस अप्रिय वाटत असली, ती प्रतिक्रिया मारून काढून भौतिकवादाचाच आपण आज आश्रय केला पाहिजे गें जरी खरे असले तरी त्या काळीं ती प्रतिक्रिया होणे आपल्या देशाच्या उन्नतीच्या दृष्टीने फार अवश्य होते हा विचार आपण कधींही दृष्टिआड हाऊं देऊं नये. प्रतिक्रिया अवश्य होती असेन म्हणण्याचे कारण हें कीं, त्या वेळीं आपला समाज राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत पराभूत झाला होता. राजकीय दृष्टीनें तर आपण निश्चेष्ट झालच होतों; पण इतर क्षेत्रांतहि तीच गत झाली होती. पाश्चात्यांचे विज्ञान, त्यांचे यंत्रशास्त्र, त्यांचे अर्थशास्त्र, त्यांचें इतिहासपांडित्य व त्यांचा दिग्विजय यांमुळे केवळ शरीरानेच नव्हे तर मनानेंहि भारतीय जनता पराभूत व मृतकल्प झाली होती. आपली धर्मव्यवस्था, समाजरचना, आपले नीतिशास्त्र, आपले विज्ञान, आपले अर्थशास्त्र - एवंच आपले सर्व राष्ट्रीय जीवनच अगदीं हीन आहे. आपण पूर्वीहि श्रेष्ठ नव्हतो. आज तर नाहींच आणि पुढेहि कधींकाळीं आपल्याला श्रेष्ठ पदवी मिळण्याची आशा नाहीं अशा तऱ्हेचे निराशेचे विचार भारतीय मनाला गांजून सोडीत होते. आणि त्यामुळे या समाजाचा आत्मप्रत्ययच ढळतो कीं काय अशी भीति विचारवेत्त्यांना वाटू लागली होती. येथें जी प्रतिक्रिया झाली ती या भीतींतून निर्माण झाली होती.
 वैयक्तिक जीवनांत आत्मप्रत्यय ढळतांच मनुष्य आत्महत्येला प्रवृत्त होतो. राष्ट्रीय जीवनांत प्रत्यक्ष शारीर आत्महत्या झाली नाहीं तरी संपूर्ण शरणागतीच्या रूपाने राष्ट्र आत्महत्या करीत असते. गेल्या शतकाच्या तिसऱ्या चरणांत भारतीय समाजाच्या आयुष्यांत तसा भयानक क्षण येण्याचा संभव निर्माण झाला होता. रोगग्रस्त माणसाच्या जीवनांत असे प्रसंग पुष्कळ वेळां येतात. त्या वेळी वैद्यकीय मताने त्याच्या शरीरांत कसलेंहि त्राण उरले नसलें तरी त्याला तसे सांगणे धोक्याचें असतें. वस्तुस्थितीचे ज्ञान त्यावेळी घातकच ठरते. अशा वेळीं तुला कांहींहि झालेलें नाहीं, कांहीं लहानशी विकृति आहे ती तेव्हांच नाहींशी होईल, असा धीर देण्यानेच तो मनुष्य रोगमुक्त होऊन चांगला सशक्त व सुदृढ होईल. तसे झाल्यावर त्याच्या भावी आरोग्याच्या दृष्टीने त्याला त्याच्या रोगाचे यथार्थ ज्ञान करून देणें अवश्य ठरेल. पण प्रत्यक्ष रोगग्रस्त असतांना ते ज्ञान कधीहि हितावह ठरणार नाहीं. भरतभूमीची त्या वेळीं अशा मरणोन्मुख माणसाप्रमाणेच स्थिति झाली होती तिला आगरकरांचे तत्त्वज्ञान त्या वेळीं कोठल्याच अनुपानाशिवाय देणे घातक ठरलें असतें. तिला त्या स्थितींत स्वामी विवेकानंदासारखा कुशल धन्वंतरीच हवा होता.

हितावह प्रतिक्रिया

 वर सांगितलेच आहे कीं, पाश्चात्यांच्या भौतिकवादाचा जो प्रसार येथे होत होता त्याच्याविरुद्ध त्या काळी येथे प्रतिक्रिया होणे अवश्य होते. ती प्रतिक्रिया घडवून आणण्यास स्वामी विवेकानंदासारख्या विभूतीचा भरतभूमित जन्म झाला हे आपले भाग्य होय. दुसऱ्या एखाद्या कट्टर सनातन्याच्या हातून हे कार्य झाले असते तर त्याने ती लाट दुसऱ्या ध्रुवापर्यंत खेचून पुन्हां दुसऱ्या उलट्या प्रतिक्रियेची तयारी करून ठेवली असती. आणि मग त्या क्रियाप्रतिक्रियांच्या हेलकाव्यापायीं भरतभूमि हैराण होऊन गेली असती. पण तसे घडले नाहीं. याला कारण स्वामीजींची प्रज्ञा, त्यांची दिव्यदृष्टि, त्यांची अलौकिक समयज्ञता हेंच होय.भारताचा तेजोभंग झाला आहे, तो पराभूत झाला आहे, त्याचा आत्मप्रत्यय ढळण्याचा क्षण आला आहे हे त्यांनी जाणलें होतें. आणि या रोगावर स्वाभिमान जागृति, पूर्वजांच्या वैभवाचे दर्शन, परंपरेच्या दिव्य तेजाची प्रतीति, हीच संजीवनी होय असा त्यांचा बुद्धिनिश्चय तर होताच; पण त्याबरोबरच भौतिकवाद हा हितावह आहे, पाश्चात्य सुधारणा या मारक नसून त्या तारकच आहेत, त्यांचा स्वीकार हा अपरिहार्य आहे हेहि सत्य त्यांनी आकळिले होते आणि म्हणूनच आपला संदेश आपल्या राष्ट्राला देत असतांना त्यांनीं हें अनुसंधान कधींच सुटू दिले नाहीं. आरंभी प्राचीन इतिहासाच्या मुक्तकंठ प्रशंसेने, परंपरेच्या उज्ज्वल वर्णनानें व उपनिषद्धर्माच्या पुनरुज्जीवनाने त्यांनी स्वकीय समाजाला विश्वासांत घेतले, त्याचे मन उल्हसित केले, त्याच्या मनाला नवजीवन दिले आणि नंतर त्याचा आत्मप्रत्यय ढळण्याची भीति नष्ट होतांच त्यांनी त्याच्या खऱ्या अवस्थेचें त्याला ज्ञान करून देऊन थोड्याफार फरकाने त्याला आगरकरांच्या तत्त्वज्ञानावरच आणून ठेवले. आपल्या समाजाला भौतिक अधिष्ठान प्राप्त करून देऊन त्याचे शासन धर्मनिरपेक्ष करण्यांत आणि त्यामुळे येथली लोकसत्ता दृढमूल करून टाकण्यांत जे अल्पस्वल्प यश आपल्याला येत आहे, त्याचें बरेंचसें श्रेय स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक दिव्यप्रज्ञेला दिले पाहिजे. स्वामीजींची 'कोलंबो अल्मोरा व्याख्यानमाला' पाहिली म्हणजे हा चमत्कार त्यांनी कसा घडवून आणला ते आपल्या ध्यानीं येईल.
 १५ जानेवारी १८९७ रोजी पश्चिमेतून परत येऊन स्वामीजींनी कोलंबोच्या भूमीवर पुन्हा पाय ठेवला; पण त्यापूर्वीच त्यांची कीर्ति दाही दिशांना पसरून भरतभूमींत येऊन पोचली होती. १८९३ सालीं विवेकानंदांचे जगद्धर्मपरिषदेत व्याख्यान झाले आणि त्याक्षणीच त्यांनीं पश्चिमेवर अपूर्व विजय मिळवून आपल्या मायभूमीच्या पराभूत मनावरील मालिन्य नष्ट करून तिच्या अंगीं चैतन्याचा संचार घडवून आणला. ती व्याख्यानाची घडी अमृत घडीच होती. कारण ज्या पाश्चात्यांच्या पायापाशीं सुद्धां बसण्याची आपली लायकी नाहीं, असें भारतीय समाजाला वाटत होते तेच पाश्चात्य त्याच समाजाच्या पायाशी बसून 'शिष्यस्तेऽहम् शाधि मां त्वां प्रपन्नम्' अशा भावनेने याचना करूं लागले होते. अमेरिकेने अगदी प्रांजळ मनाने 'अलौकिक धर्मवेत्ता,' 'श्रीख्रिस्ताचा अवतार,' 'अध्यात्माचा प्रदीप' असा स्वामींचा गौरव करून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आणि त्यापेक्षाहि विशेष म्हणजे शेकडो अमेरिकन स्त्रीपुरुष रामकृष्णमठाचे सदस्य होऊन स्वामीजींचे शिष्य बनले. 'ज्या भूमींत असला अलौकिक धर्मवेत्ता पुरुष निर्माण होतो, तिच्याकडे धर्मप्रसारासाठी आपण आपले मिशनरी धाडणें हा मूर्खपणा आहे हे आतां तरी अमेरिकनांच्या ध्यानीं येईल काय ?' असें अमेरिकन वर्तमानपत्रे विचारू लागली.
 स्वामी विवेकानंदांनी मिळविलेला हा विजय शिकंदर किंवा नेपोलियन यांच्या विजयापेक्षां अनेकपटीने श्रेष्ठ होता. त्या विजयाच्या जाणिवेनें एक पराभूत, निराशाग्रस्त, मृतकल्प राष्ट्र संजीविनी दिल्याप्रमाणे सजीव झालें. त्याचा राष्ट्रीय अहंकार जागृत झाला. आत्मप्रत्ययाचें दिव्य स्फुरण त्याच्या चित्तांत झाले, त्याच्या इतिहासांतील युगायुगाची रात्र संपून नव्या युगाच्या उषेची दिव्यप्रभा त्याच्या मुखावर दिसूं लागली आणि अशा स्थितींत स्वामीजी आपल्या अमेरिकन शिष्यपरिवारासह कोलंबोला जेव्हां उतरले तेव्हां तर या राष्ट्राला सूर्योदय झाल्याचाच भास झाला. अशा या भूमिकेवरून स्वामीजींनी आपल्या कार्याला प्रारंभ केला.
 'आपण पूर्वी जगताचे गुरु होतों. जगताला अध्यात्मज्ञान देण्याचे कार्य अनेक युगें आपण केलें आहे. आणि पुढेहि आपण तेच करणार आहों' स्वामीजींची वाणी भारताच्या नभोमंडलांत घुमूं लागली. 'इतर देशांनी जग बाहुबलाने जिंकले. आपण तें वाणीच्या बलाने जिंकलें, अध्यात्म तेजाने जिंकले. प्रत्येक देशाला कांहीं विशिष्ट असे जीवितकार्य असतें. धर्म हें भारताचे कार्य आहे. राजकीय साम्राज्ये व आर्थिक साम्राज्ये आम्हीं स्थापलीं नाहींत. तो आमचा हेतूच नव्हता. अध्यात्म ही भारताची जगाला देणगी आहे. जगांत असा एकहि धर्म नाहीं कीं, जो कोणत्याना कोणत्या बाबतीत हिंदुधर्मांचा ऋणी नाहीं. आमच्या कांहीं रूढि चुकल्या म्हणून आमच्यावर कोणी टीका करतात; पण काल परवांच्या उपटसुंब राष्ट्रांनी आम्हांला उपदेश करणे हे हास्यास्पद आहे. त्यांना म्हणावें प्रथम दीर्घकाल टिकणाऱ्या रूढी निर्माण करा व मग आम्हांस शिकवावयास या. अध्यात्म, त्याग, संन्यास हें आमचें ध्येय आहे. जग हें मायामय असून त्यांतून मोक्ष मिळविणे हे आमचे अंतिम प्राप्तव्य आहे. शास्त्रज्ञान, सत्ता, संपत्ति, कीर्ति या सर्वांना त्यापुढे गौण स्थान आहे. ही आध्यात्मिकता हा आमच्या राष्ट्राचा कणा आहे. आणि तिचा सर्व जगाला उपदेश करून जडवादापासून त्याला मुक्त करणे हे आमचे कार्य आहे. तो आमचा अधिकारहि आहे. (स्वामी विवेकानंद समय ग्रंथ खंड २ रा. प्रबुद्ध भारत कचेरी १९१८ पृ. १०६-३२ )

परंपरेंतून क्रान्तीकडे

 अशा तऱ्हेच्या दिव्य संदेशाने विवेकानंदांनी प्रथम भारतीय समाजाचा आत्मविश्वास जागृत केला, त्याच्या स्वत्वाला उजाळा दिला व त्याच्या राष्ट्रीय अहंकारावर आलेली काजळी झाडून टाकून त्याला पुन्हां प्रदीप्त केला आणि आतां कठोर टीकेने त्याचें मन हाय खाणार नाहीं अशी खात्री होतांच त्यांनी आपले धोरण हळूहळू पालटण्यास सुरवात केली.
 'जगाला अध्यात्म शिकविणे हे आपले कार्य आहे, तो आपला अधिकार आहे हे खरे; पण आपल्याला जगापासून कांहींच शिकावयाचे नाहीं काय ? तसें नाहीं. आपल्यालाहि थोडे शिकण्याजोगे आहे. थोडे भौतिक ज्ञान, संघटन कौशल्य, सत्ता खेळविण्याचे सामर्थ्य हे गुण आपण पाश्चात्यांपासून घेतले पाहिजेत.' असे सांगण्यास त्यांनीं प्रारंभ केला. मदुरा येथील व्याख्यानांत श्रोत्यांना त्यांनी तशी जाणीवहि दिली. 'आपले राष्ट्र अधोगामी झाले आहे ही कल्पना नष्ट करून टाकली पाहिजे. आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान आपण धरिला पाहिजे; हे सर्व ठीक आहे. पण आतां मला थोडें कटु सत्य सांगावयाचे आहे. त्यावरून आपण रुष्ट होणार नाहीं अशी आशा आहे.' अशी प्रस्तावना करून स्वामीजींनी गेल्या हजार वर्षाच्या आपल्या हीनदीन स्थितीचें, आपल्या अधःपाताचे चित्र श्रोत्यांच्या समोर उभ केले व त्या अधःपाताला आपले आपणच सर्वस्वी कारण आहों असें त्यांना बजावलें. यापुढे स्वामीजींचा सूर अगदींच पालटला. आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले. आमच्यापैकी कोट्यवधि लोक धर्मच्युत झाले. पण त्यांनीं न व्हावे अशी कोणची व्यवस्था आम्हीं केली होती ? जे भिकारी होते, हीनदीन दरिद्री होते, त्यांना आम्ही थोडें सुख देण्याऐवजीं निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्याओवळ्यांत आणून ठेवला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले त्याचे हे परिणाम आहेत. (पृ. १४९). आपण अध्यात्माचा अतिरेक कला आहे, तेव्हां आतां आपला उद्धार होण्यास भौतिकवादाचा आश्रय करणे अवश्य आहे. एका दृष्टीने येथे भौतिकवाद आला आहे, तो आपल्या उद्धारार्थच आला आहे. त्याच्यामुळे जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टांचेखालीं चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टांचेखाली चिरडली आहे हें ध्यानांत ठेवा. आतां एकीनें दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखिला पाहिजे. केवळ अध्यात्मानें जगाची प्रगति होणार नाहीं.' (पृ. १५७)

प्रछन्न भौतिकवाद

 स्वामीजींनी किती धोरणानें व चतुराईने आपल्या संदेशाचा प्रसार चालविला होता, तें यावरून ध्यानांत येईल. ते स्वतः भौतिकवादी कधींच झाले नाहींत. पण भौतिकवादाचा आश्रय केल्यावांचून आपला उद्धार होणार नाहीं, ही त्यांची खात्री झाली होती. पण त्याचें प्रतिपादन कांहीं एका पद्धतीने झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. सुधारकांवर ते तुटून पडत ते केवळ त्यांच्या पद्धतीमुळे. मदुरा, कुंभकोणम् येथील व्याख्यानांत त्यांनी हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. 'सुधारकांनाहि झेपणार नाहीं इतकी सुधारणा व्हावी अशा मताचा मी आहे. पण तसे करतांना स्वकीयांचा तेजोभंग केला तर कांहीं साधणार नाहीं. गेल्या शंभर वर्षात सुधारकांना कांहींच फल मिळालें नाहीं, याचें कारण हेंच कीं, त्यांनी अतिरिक्त आत्मनिर्भर्त्सना केली. असला तेजोभंग करून कार्यभाग होत नसतो,' अस त्यांचे मत होते.
 पुष्कळ वेळां आगरकरांनीं जी भाषा वापरली तीच किंवा तिच्यापेक्षांहि जास्त कडक भाषा विवेकानंदांनी वापरली आहे; पण एक एका अर्वाचीन संस्थेचे प्रिन्सिपल होते तर दुसरे प्राचीन पद्धतीचे संन्यासी होते. स्वामींचा संन्यास हा भौतिकवादाच्या कडू औषधी गोळ्यांना अनुपानासारखा उपयोगी पडला. 'आपल्यापुढील कार्य' या भाषणांत ते म्हणतात, 'आपणच सर्वात श्रेष्ठ आहो, आपण जगाचे त्राते आहो हा भ्रम सोडून द्या. आपल्या पूर्वजांविषयीं मला निःसीम आदर असूनहि मी तुम्हांस सांगतों कीं आपणांस इतर राष्ट्रांपासून खूपच शिकवावयाचे आहे. (आरंभीच्या व्याख्यानांत थोडे शिकावयाचे आहे असे ते म्हणत.) कोणाच्याहि पायांपाशी बसण्याची आपली सिद्धता असली पाहिजे. आपण दुसऱ्यास शिकविण्यास समर्थ आहो हे विसरूं नये. पण जगाशी आपल्याला कांहीं कर्तव्य नाहीं, हा समज मूर्खपणाचा आहे. त्या समजामुळेच आपण गेलीं हजार वर्षे गुलामगिरीचे प्रायश्चित्त भोगीत आह' (पृ. २७२). नव्या शास्त्रीय ज्ञानांतून कोठले तरी सिद्धान्त घेऊन आपल्या जुन्या रूढींचें, लोकभ्रमांचें व कर्मकांडांचे वेडगळ समर्थन करण्याची पद्धत स्वामींच्या वेळी थोडी थोडी सुरू झाली होती. या प्रकाराची त्यांना अत्यंत चीड असे. त्याचा निषेध करून ते म्हणतात, "अशा तऱ्हेने जुन्या लोकभ्रमांचे समर्थन करणें हें अत्यंत लज्जास्पद होय. असे भोळसट होण्यापेक्षां तुम्ही कट्टर नास्तिक झाला तरी चालेल. कारण नास्तिक मनुष्य खरा जिवंत मनुष्य असतो. व त्याच्या मनाला वळण लावण्याची शक्यता तरी असते. निरीश्वरवादांत एकप्रकारचे सामर्थ्य आहे, एकप्रकारची रग आहे. अंधश्रद्धा, भोळसटपणा हा मात्र मृत्यु होय. म्हणून कुजट रूढींच्या समर्थनापेक्षां नास्तिकतेनेंच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे." (पृ. २७९) 'सुधारक काढण्याचा हेतु' या लेखांत आगरकरांनी यापेक्षां जास्त तीव्र असे काय लिहिले आहे ?
 एके ठिकाणी स्वामीजी म्हणतात, 'आम्ही हिंदुस्थानांतले संन्यासी ! बहुजनसमाजासाठीं, गरीब जनतेसाठी आम्ही काय केले आहे ? आम्हीं संन्यासी त्यांना अध्यात्म शिकवीत आहों ! यापेक्षां मूर्खपणा तो काय ? भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधि लोक अन्नान्न करीत आहेत. त्यांची पशूसारखी अवस्था झाली आहे. त्यांना सोडून परमेश्वराचा तुम्ही अन्यत्र कोठे शोध चालविला आहे ? ही गरीब जनता हाच परमेश्वर नव्हे काय ? त्यांची सेवा करतांना मला नरकवास आला तरी मी तो पतकरीन. भारताचे भवितव्य मूठभर उच्च लोकांवर अवलंबून नसून या कोट्यवधि जनतेवर आहे. तिला समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश दिला पाहिजे. असे करतांना आपण कट्टरातले कट्टर पाश्चिमात्य झाले पाहिजे. मात्र त्याच वेळी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या श्रेष्ठधर्मांचा आपणांस कधींहि विसर पडतां कामा नये." (विवेकानंद चरित्र खंड ४ था. प्रबुद्धभारत. पृ. १७७-१८२ )
 वर दिलेल्या अनेक उताऱ्यांवरून स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीची कल्पना येईल. आपल्या समाजाचे धार्मिक अधिष्ठानच बदलून टाकावें असें त्यांचें मत नव्हतें हें खरे, पण भौतिकवाद ते त्याज्य मानीत नव्हते, इतकेंच नव्हे तर आजच्या परिस्थितींत आपल्या उन्नतीसाठीं त्याचा स्वीकार करणे अवश्य आहे असे ते आग्रहाने सांगत होते, हे आपण विसरू नये. त्यांचा विरोध होता तो मार्गासंबंधी होता. येथल्या परंपरांचा नाश करून किंवा येथल्या जीवनाचे ओघ आमूलाग्र बदलून येथें नवेंच कांहीं स्थापावें त्यांना मान्य नव्हते. जे कांहीं नवें यावयाचे ते पूर्वस्थितींतून विकसित होऊन यावें असें त्यांचे मत होते. 'मला सुधारणा किंवा क्रान्ति मान्य नसून विकास मान्य आहे,' असें ते नेहमीं म्हणत.
 जगांतल्या सुधारकांचे सगळीकडेच दोन वर्ग पडलेले दिसतात. एक शुद्ध तर्काच्या व बुद्धिवादाच्या आश्रयानें आमूलाग्र क्रांति करूं पहात असतो, तर दुसरा जुन्या समानपीठिकांतूनच नवीन पीठिका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. नवतत्त्वांना विरोध कोणाचाच नसतो. त्या तत्त्वांची प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गाविषयींच मुख्यतः मतभेद असतो. या दोन वर्गापैकी आगरकर हे पहिल्या वर्गातील असून स्वामी विवेकानंद हे दुसऱ्या वर्गातील होत. लो. टिळक, महात्मा गांधी यांची विचारसरणी स्वामीजींच्या विचारसरणीसारखीच होती आणि म्हणूनच टिळकांनीं आगरकरांना विरोध केला होता. या दोन्ही प्रेरणांचा म्हणजे क्रान्तिप्रेरणा व विकास प्रेरणा यांचा विचार केला तर असे दिसून येईल कीं समाजाच्या प्रगतीला या दोहींची सारखीच आवश्यकता असते. श्रीकृष्ण, टिळक, महात्माजी, विवेकानंद या विभूतींची जगाला जेवढी आवश्यकता असते तेवढीच गौतमबुद्ध, आगरकर, मार्क्स यांची पण असते. कोणच्या काळीं कोणची प्रेरणा कमीजास्ती प्रमाणांत हितावह ठरेल, एवढाच काय तो प्रश्न असतो.
 आणि या तारतम्याचा विचार पाहून निर्णय करावयाचा तर आज आपण आगरकरांचे शिष्यत्व पत्करण्यास कोणताच प्रत्यवाय येण्याचें कारण नाहीं. स्वामी विवेकानंदांचे कार्य आतां होऊन गेलें आहे. त्यानंतर टिळक व महात्मानी यांच्या कार्याची परिणति होऊन आपणांस स्वातंत्र्याची प्राप्तिहि झाली आहे. आतां आपला राष्ट्रीय अहंकार इतका प्रबल झाला आहे, कीं पाश्चिमात्य तत्त्वांचा आपण कितीहि व कसाहि अंगीकार केला तरी आपला आत्मप्रत्यय ढळण्याची कालत्रयी शक्यता नाहीं. तेव्हां अशा स्थितीत लोकशाहीला अवश्य असे भौतिक अधिष्ठान आपल्या समाजाला प्राप्त करून देण्यांत कसलीहि हानि नाहीं, कसलाहि धोका नाहीं. धर्माचे अधिष्ठान बदलणे म्हणजे धर्मांची अवहेलना करणे असा मुळींच अर्थ होत नाहीं. ऐहिक व्यवहारांतील प्रत्येक क्षेत्रांत पारमार्थिक मोक्षधर्माची, त्याच्या नियमनांची जी अप्रतिहत सत्ता चालत असे ती नाहींशी करून तेथलीं नियमनें इतिहास, अनुभव, प्रयोग, अवलोकन यांच्या साहाय्याने निश्चित करणे एवढाच भौतिक अधिष्ठानाचा अर्थ आहे. भारताच्या प्राचीन व अर्वाचीन आध्यात्मिक वैभवाला यामुळे अणुमात्र धक्का लागण्याचे कारण नाहीं. उलट त्या अध्यात्मानें कारण नसतांना ऐहिकाची जी आतांपर्यंत हानि केली ती बंद झाल्यामुळे समाज त्याच्याकडे जास्तच आदराने पाहूं लागेल. भौतिक अधिष्ठानाचे पुरस्कर्ते पूर्वपरंपरेचा अभिमान धरीत नाहींत, तिला तुच्छ लेखतात हाहि समज भ्रामक आहे. या पंथांतील मार्क्सवादी लोकांची ती वृत्ति होती हें खरे आहे. पण एक तर रशियांतूनहि ती आतां समूळ नष्ट झाली आहे आणि दुसरे म्हणजे एका शाखेवरून सर्व तत्त्वज्ञानाचा अधिक्षेप करणें युक्त होणार नाहीं. प्राचीन आर्यत्व सोडावयाचें नाहीं हा तर आगरकरांचा बाणा होता. सुधारक पत्रांतील पहिल्या लेखांतच त्यांनी त्याचा घोष केला होता. तेव्हां भौतिकवादासंबंधींचीं ती भीतिहि निर्मूल आहे हे जनतेने ध्यानात घ्यावें आणि निःशंक मनाने आपल्या लोकायत्त शासनास आवश्यक असलेल्या क्रांतीला पाठिंबा द्यावा.

 या विचारानेहि पुष्कळांचे समाधान होणार नाहीं. कारण अजूनहि समाजांतील बहुसंख्य लोकांच्या मनांत धर्मश्रद्धा अगदीं जाज्वल्य स्वरूपांत टिकून आहे. त्यांनी हे ध्यानीं घ्यावें कीं, लोकशाहीएवढा श्रेष्ठ धर्म जगांत दुसरा नाहीं. प्रत्येक व्यक्तीची बुद्धि, तिचे मानसिक सामर्थ्य, तिचे हृदयाचे गुण, या सर्वांच्या म्हणजेच तिच्या व्यक्तित्त्वाच्या विकासाला अवसर देणें यापेक्षां जास्त उदात्त असें दुसरें काय आहे ? प्रत्येक व्यक्तीला हक्कानें उद्योग व अन्नवस्त्र मिळावे हे तत्त्व दानधर्मापेक्षा जास्त श्रेष्ठ नाहीं काय ? या गोष्टी आज सिद्ध झाल्या तर लोकशाहीच्या परिणतीनेच होतील. पण आध्यात्मिक व पारमार्थिक धर्माचे वर्चस्व जर ऐहिक व्यवहारावर राहिलें तर मात्र या गोष्टी कालत्रयीं प्रत्यक्षांत येणार नाहींत. हें ध्यानांत येऊनच लो. टिळकांसारख्या हिंदुधर्म व भारतीय संस्कृति यांच्या कडव्या पुरस्कर्त्यानें कॉंग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाच्या जाहीरनाम्यांत धर्मनिरपेक्ष शासनाला मान्यता दिली होती. तेव्हां भौतिकवादाच्या आश्रयाने कोणत्याहि प्रकारची आध्यात्मिक, धार्मिक वा सांस्कृतिक अधोगति होण्याचा अणुमात्रहि संभव नाहीं हें जाणून भारतीय जनतेनें हें मन्वंतर घडवून आणावे. तसें केलें तरच भारतीय लोकसत्ता यशस्वी होऊन आपले राष्ट्र बलशाली व वैभवशाली होऊ शकेल.
 मानवाची प्रतिष्ठा, समता व भौतिक अधिष्ठान या तत्त्वांच्या प्रतिपादनानें व उपदेशानें राममोहन रॉय, रानडे, आगरकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनीं भारतीय लोकसत्तेची पूर्वतयारी कशी केली, त्याचे येथवर विवेचन केले. आतां लोकशाहीचे अगदीं आत्मीय क्षेत्र ने राजकारण तेथील कार्याचा विचार आपणास करावयाचा आहे. पहिल्या क्षेत्रांत जशी राममोहन, रानडे व आगरकर यांची नांवें डोळ्यापुढे उभी राहातात, तशीं या क्षेत्रांत लो. टिळक, महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू या थोर विभूतींच नावें पुढे येतात. भारताच्या आपल्या आजच्या लोकसत्तेचे हे तीन शिल्पकार आहेत. यांपैकी एकाचेंहि कार्य उणें केले तर आपल्या लोकसत्तेचें मंदिर उभे राहू शकणार नाहीं. म्हणून त्यांच्या कार्याचा आपणांस साकल्याने विचार करावयाचा आहे. त्यापैकी पहिले शिल्पकार, आपल्या लोकसत्तेचे मंत्रद्रष्टे जे लोकमान्य टिळक त्यांच्या दिव्य मंत्राचें मनन व चिंतन करण्यास आतां आपण प्रारंभ करूं.




प्रकरण पांचवें

भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

 जगांतील एकंदर लोकसत्तेचा इतिहास लिहावयास जो कोणी इतिहासकार बसेल त्याला सर विन्स्टन चर्चिल यांना त्या इतिहासांत फार मोठे मानाचे स्थान द्यावें लागेल, याचे कारण अगदीं उघड आहे. हिटलरी दण्डसत्तेच्या आक्रमणांतून जगाला सोडविण्याचे महत्कार्य त्या पुरुषाने केले आहे. त्याच्या अभावी आज जगांतली सर्व लोकसत्ता नामशेष झाली असती आणि जग दण्डसत्तेच्या पाशवी सामर्थ्याला बळी पडून पुन्हां रानटी स्थितीप्रत पोचलें असतें. जगावरची ही आपत्ति विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या महान् सामर्थ्याने टाळली आहे आणि म्हणूनच जग त्यांचें ऋणी झालें आहे. हे जर खरे असेल, चर्चिल यांनी लोकसत्तेची जी सेवा केली तीमुळे सध्यांचे जग त्यांचे ऋणी आहे हे जर आपण मान्य करणार असलों- आणि तें आपणांस मान्य केलेच पाहिजे- तर यापुढचे जग भरतभूमीचे विख्यात सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे त्याच्यापेक्षां दसपट शतपट जास्त ऋणी राहील हे आपणांस मान्य करावें लागेल. कारण या भूमींतली लोकसत्ता