भारतीय लोकसत्ता/मानवपुनर्घटना
दुर्गेषु च महाराज षट्सु ये शास्त्रनिश्चिताः ।
सर्व दुर्गेषु मन्यन्ते नरदुर्ग सुदुर्गमम् ॥
महाभारत, शांतिपर्व अध्याय ५५- ३५
"शास्त्रांच्या विषयांत ज्यांची मति निश्चित झाली आहे ते पंडित असे सांगतात की, राज्यरक्षणासाठी जे सहा प्रकारचे दुर्ग म्हणजे किल्ले अवश्य असतात त्यांत नरदुर्ग हा सर्वात दुर्भेद्य असा दुर्ग होय. [अनन्यनिष्ठ राजसेवक हाच खरा राज्याचा आधार होय.]"
"अनेक लोक धनाची महती गातात; आणि धनाचा उपयोग असतो यांत शंका नाहीं. पण अंतिम यशापयश हें मानवावरच अवलंबून असते. इतिहास हा मानवानें घडविला आहे. आणि मानवजातीची प्रगति झाली ती मानवाच्या कर्तृत्वामुळे झालेली आहे; धनामुळे नव्हे. शिक्षणानें, संस्काराने आपण भारतांत जर इष्ट ती मानवमूर्ति घडवूं शकलो तर बाकीचें कार्य अत्यंत सुसाध्य आहे" -पंडित जवाहरलाल नेहरु– (कुरुक्षेत्र खास अंक— २ ऑक्टोबर १९५३)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण येथे जे लोकसत्ताक शासन स्थापन केले ते यशस्वी करण्यासाठी आपल्या जीवनाची सर्वांगीण पुनर्घटना करणे अवश्य आहे हा विचार सांगून त्या पुनर्घटनेची दिशा कोणची, मार्ग कोणचे, महत्त्व किती या सर्वांचे विवेचन गेल्या कांहीं प्रकरणांतून केले. राजकीय, आर्थिक व सामाजिक या तीन अंगांची पुनर्घटना करण्यासाठी काँग्रेस सरकारने कोणचे प्रयत्न केले व त्यांचे फळ काय मिळाले याचा कांहींसा आढावाहि त्या लेखांत आपण घेतला. आतां आपल्या लोकशाहीच्या यशाच्या दृष्टीने मानव पुनर्घटनेचे जे सर्वात महत्त्वाचें कार्य त्याचा विचार करून भारतीय लोकसत्तेचें हे विवेचन पुरे करावयाचे आहे.
कोणच्याहि समाजाच्या उत्कर्षाला जी अनेक प्रकारची धने अवश्य असतात, त्यांत 'मानवधन' हें सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. सुपीक जमीन, अरण्यें, खाणी, नद्या, बंदरें, समुद्रकिनारा, व्यापार, कारखानदारी इ. सर्व धनें आपापल्या परी अवश्य व महत्त्वाची आहेतच. पण विवेक, त्याग, कर्तृत्व, दूरदृष्टि, बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य तेजस्वी व अभिमानी वृत्ति, उदात्त ध्येयवाद इ. गुणांनी संपन्न असलेला मानव हें कोणत्याहि राष्ट्राचें खरें धन होय. हे धन असल्यावर इतर धने नसली तरी निर्माण करतां येतात किंवा बाहेरून मिळवितां येतात. पण हें धन नसेल तर इतर धनें असून नसल्यासारखीं होतात. ती असली तरी त्यांची माती होते, किंवा इतर देशांतल्या लोकांना त्यांचा उपयोग होऊन स्वदेशाला ती जास्तच घातक ठरतात. इतर देशांतल्या कोणच्याहि लोकशाहीचा आपण अभ्यास केला तर यशःसिद्धि ही भोवतालच्या परिस्थितीवर फार थोडी अवलंबून असून मानवाचें मन, बुद्धि, अंतःकरण यांचे जे गुण त्यांवर ती बव्हंशी अवलंबून असते हें आपल्या ध्यानांत येईल. क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे । या कविवचनाचा भावार्थ हाच आहे. इंग्लंडमध्ये राजसत्तेवर नियंत्रण घालण्यांत आले व लोक संघटित लोकशाहीचा मार्ग यशस्वीपणे क्रमूं लागले. त्याचवेळी जर्मनी, फ्रान्स, पोलंड, स्पेन, इटली येथेंहि त्याच दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या देशांच्या भौतिक परिस्थितीत त्याकाळीं तरी म्हणण्यासारखा फरक नव्हता. असे असूनहि त्यांना यश आले नाहीं. इंग्लंड पूर्ण यशस्वी झालें, फ्रान्स व जर्मनी कांही दृष्टींनीं यशस्वी झाले. पण इटली, स्पेन व पोलंड यांना यशाचे दर्शनहि झाले नाहीं. उलट त्यांचा कमालीचा अधःपात झाला. याला कारण एकच. तेथला मानव हा नव्या जबाबदाऱ्या पेलण्यास असमर्थ ठरला. ते ते समाज रसातळास गेले ते यामुळे. पूर्वीच्या काळी युरोपांत ग्रीसचा उदय झाला. गेल्या शतकाच्या अखेरीस पूर्वेकडे जपानचा उदय झाला. त्यावेळी ग्रीस किंवा जपान यांच्या भोवतालच्या देशांतील परिस्थिति त्यांच्यापेक्षा निराळी होती असे नाहीं. भौतिक परिस्थिति जवळ जवळ तीच होती. तरी ग्रीक व जपानी मानवानें आपल्या अंतरांतील त्याग, विवेक, कष्ट करण्याची व यातना सोसण्याची सिद्धता, उच्च आकांक्षांसाठी वाटेल ती किंमत देण्याची मनाची तयारी इ. अनेक प्रकारचें धन दोन्ही हातांनी उपसून बाहेर काढले व आपला उत्कर्ष करून घेतला. इतर आवतीभवतींचे समाज कशांत उणें पडले असतील तर ते या आंतरिक धनाच्या बाबतींत. याचा अर्थ असा की, राष्ट्राच्या उन्नतीच्या बाबतीत निर्णायक ठरणारे धन म्हणजे मानवधन होय. भारताच्या इतिहासांतील फार प्राचीन काळांतील महर्षि व्यास यांच्यापासून भारताचे आजचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापर्यंत हे एकच महातत्त्व येथले थोर पुरुष भारतीयांना सांगत आहेत. विवेक, त्याग, धैर्य, प्रज्ञा, निष्ठा या मानवी सद्गुणांचे संवर्धन करा. प्रारंभी दिलेल्या अवतरणांचा हाच भावार्थ आहे. पन्हाळा किंवा सिंहगड हे खरे किल्ले नव्हत. बाजीप्रभु, तानाजी मालुसरे हे खरे किल्ले होत. शिवछत्रपतींचें, मराठी राज्याचें रक्षण त्यांनी केले. हे दुर्भेद्य नरदुर्ग हाच खरा राष्ट्राचा आधार होय. भेदनीतीला ते वश झाले, त्यांची निष्ठा चळली, त्यांचा विवेक सुटला की दगडाचे किल्ले कांहींच करूं शकत नाहींत. ते शत्रूलाच साह्यभूत होतात. म्हणून नरदुर्ग सर्वात श्रेष्ठ असे महाभारतकारांनी सांगून ठेविले आहे. पंडित जवाहरलाल आज तेंच सांगत आहेत. नवें राष्ट्र घडावयाचें तर नवी मानवमूर्ति प्रथम घडली पाहिजे. मग आपल्याला दुष्कर असें कांहीं नाहीं. मानवधन हे खरें धन होय. इतर धनें गौण होत.
मानव पुनर्घटना याचा अर्थ आतां सहज ध्यानांत येईल. अविवेक, अंधनिष्ठा, विघटनावृत्ति, स्वार्थ, मोह, दैववाद इ. भारतीयांच्या अंगचे दुर्गुण नष्ट करून त्यांच्या ठायीं त्याग, विवेक, धैर्य, ध्येयनिष्ठा इ. सद्गुणांचे संवर्धन करणे म्हणजेच पुनर्घटना. ही पुनर्घटना आहे असे म्हणण्याचे कारण असे कीं वरील सर्व आंतरिक धन हे मानवाच्या स्वाधीनचें आहे. ते त्याच्या ठायीं आजच आहे. ते कोठून बाहेरून प्राप्त करून घ्यावयाचें नाहीं. आनुवंश, भौगोलिक परिस्थिति, अर्थव्यवस्था, यांवरहि तें अवलंबून नाहीं, ते धन सर्वस्वी स्वाधीन आहे. आपल्या मनाची घडण फक्त बदलावयाची आहे. अवश्य ते घटक तेथेंच इकडे तिकडे पडलेले आहेत. ते घेऊन, जुने काढून टाकून, रचना फक्त नवीन करावयाची आहे. पण हे कार्य दिसावयास इतके सोपे असले तरी मानवाचा आजपर्यंतचा इतिहास पहातां असे दिसते की, सर्वांत दुःसाध्य अशी एखादी गोष्ट असेल तर ती हीच आहे. स्वातंत्र्यानंतरचा आपला इतिहास पहातां तोहि हीच साक्ष देणार असे वाटू लागले आहे.
मानवाच्या आंतरिक गुणांच्या संपादनाच्या दृष्टीने गेल्या पांचसहा वर्षांचे आपल्या समाजाचे चित्र पाहू लागलो तर मन खेदानें व्याप्त होते. भावी काळासंबंधीं भीति वाटू लागते आणि मनाचा धीर सुटल्यासारखा होतो. या क्षेत्रांत प्रगति तर नाहींच. पण दरवर्षी, दरदिवश, नव्हे प्रतिक्षणी, प्रतिपदीं आपण अधःपाताकडे चाललो आहो आणि तेहि अत्यंत वेगानें घसरत आहोत, असे दिसून येत आहे. लोकायत्त भारताचे सार्वजनिक जीवन आपण तपासू लागलो तर त्या जीवनाचें प्रत्येक अंग नासलेलें, सडलेले आहे, असे आढळू लागते. मानवी गुणांची संपत्ति आपण पोषिली तर नाहींच पण स्वातंत्र्यापूर्वी तिचा जो कांहीं सांठा आपल्याजवळ होता तोहि आपण गमावून टाकून दिवाळखोरीच्या काठावर येऊन उभे राहिलो आहो. येथून विनिपात फार दूर नाहीं. अनेक शतकानंतर आज आपणांस स्वतंत्र्याची प्राप्ति झाली आहे. पण आतां विश्वप्रयत्न करून मानवाच्या
आंतरिक धनाची जोपासना केली नाहीं तर पूर्वसूरीनीं भगीरथ प्रयत्नांनी आणलेली ही गंगा तशीच वाहून जाईल आणि आपण पूर्वी अनेक शतकें नरकांत पिचत पडला होतो तसेंच पुन्हां पडून राहूं. ही आपत्ति येऊं नये म्हणून या भूमीच्या तरुण कन्यापुत्रांनी जिवाचा पण लावून अवश्य त्या सद्गुणांची जोपासना प्रथम स्वतःच्या ठायीं व नंतर समाजांत केली पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रथम वस्तुस्थितींचें दर्शन घडवून मग त्या गुणांच्या जोपासनेसाठी त्यांनी कोणचे मार्ग अनुसरावे हें या प्रकरणांत सांगावयाचे आहे.
वर सांगितलेले मानवाचे जें आंतरिक धन म्हणजे त्याच्या मनाचे व बुद्धीचे गुण त्याचे दोन भागांत वर्गीकरण करता येईल. कार्यक्षमता व नीतिमत्ता हे ते दोन भाग होत. यांमध्ये मानवाच्या सर्व गुणांचा समावेश होतो. त्यांतील कार्यक्षमतेचा प्रथम आढावा घेऊं आणि नंतर भारताच्या सार्वजनिक जीवनांतील नीतिमत्तेचा हिशेब करूं. कोणचेंहि कार्य अंगावर घेतले तर प्रथम त्याची संपूर्ण योजना आंखणे, खर्चाचा अंदाज करणें, सामग्रीचे स्वरूप ठरविणे, तज्ज्ञ माणसें नमविणे, त्यांच्यांत कामाची वांटणी करणे ही कर्तृत्वाची पहिली कसोटी होय. यानंतर या योजनेप्रमाणे कार्य घडवून आणणे हे कार्यक्षमतेचे दुसरे लक्षण होय. त्यासाठी सतत जागरूक राहून अंतिम ध्येयाकडेच सर्व कायौंघ सारखा जात राहील अशी काळजी घेणें, भिन्न खात्यांत एकसूत्रता राखणें, शिथिलता, बेजबाबदारी यासाठी कडक शिक्षा करून असले दोष निपटून काढणें इ. गुणांची आवश्यकता असते. हे गुण म्हणजेच ही कार्यक्षमता आपण भारतीयांनी कितपत प्रगट केली तें आतां पहावयाचे आहे. गेल्या पांचसहा वर्षांत आपण ज्या
निरनिराळ्या योजना आंखल्या त्यांची हकीकत मागें दिलीच आहे. त्या योजनांवर सरकारनेच तज्ज्ञांकडून जे अहवाल लिहवून घेतले त्यांच्या आधारानेंच आपल्याला आपल्या कार्यक्षमतेचें मापन करता येईल.
१९४६ सालीं काँग्रेसने सत्ता हातीं येतांच 'प्रांतविकासयोजना' आंखली होती. चार वर्षांनी त्या कार्याचे परीक्षण करून त्यासंबंध अभिप्राय द्यावा, अशी डॉ. ग्यानचंद यांना सरकारने विनंती केली होती. त्यांनी जें निवेदन सादर केले आहे त्यावरून आपणा भारतीयांच्या ठायीं क्रियासिद्धीला लागणारे सत्त्व मुळींच नाहीं असे स्पष्ट दिसून येते. साधनसामग्री म्हणजे उपकरणे येथें विपुल आहेत असें नाहीं; पण ते सत्त्व जर आपल्या ठायीं असतें तर आहेत या साधनांच्या जोरावरच आपणांस सध्यांच्यापेक्षां दसपट यश मिळवितां आले असते असे दिसून येईल.
कार्यक्षमता
डॉ. ग्यानचंद यांनी या योजनांच्या कार्यवाहीतील पहिला दोष दाखविला तो हा की, अखिल भारत डोळ्यापुढे ठेवून त्यांची आंखणी झालेली नाहीं. प्रत्येक प्रांताचे हितसंबंध जणुं निराळे आहेत असें धरून, किंवा कसलाच विचार न करता, या योजना ठरविल्या गेल्या आहेत. नवीन रस्त्यांची बांधणी पंजाब व बंगाल या प्रांतांत होणें अवश्य होते. पण या प्रांतांत रस्त्यांवर एकदोन कोटीच खर्च झाला असून उत्तर प्रदेशांत मात्र तेरा कोटि रुपये झाला आहे. १९४९ पर्यंत एकंदर सर्व प्रांतांचा विकासखर्च २२९ कोटी झाला यांतील ५६ कोटी म्हणजे एक चतुर्थांश खर्च इमारती व रस्ते याकरतांच झाला आहे. हे ग्यानचंद यांच्या मतें अगदीं असमर्थनीय आहे. आसाम व मुंबई या प्रांतांत मोठे कारखाने निघणे अत्यंत अवश्य होते. पण या प्रांतांत त्यांच्या योजना सुद्धां नाहींत. पाटबंधाऱ्यावर सर्वात जास्त खर्च मध्यप्रदेशांत होणे अवश्य होते. कारण नांगरटीखाली येण्याजोगी पण पडीत जमीन तेथे सर्वात जास्त आहे. पण त्याच प्रांतांत सर्वांत कमी खर्च झाला आहे. (प्रॉव्हिन्शियल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम- ग्यानचंद- गव्हमेंट ऑफ इंडिया १९४९. पृ. १७३ ते १८९) हे सर्व सांगून डॉ. ग्यानचंद म्हणतात की, या सर्व कार्यक्रमांत एकसूत्रता अशी नाहींच. एका प्रांताचा दुसऱ्या प्रांताशी संबंध नाहीं. आणि अखिल भारताचे समग्र दर्शन तर योजनेंत कोणालाच नव्हते. प्रत्येक प्रांताला पैशाचा विशिष्ट वांटा मिळाला होता. आणि प्रत्येक प्रांत तो परस्परनिरपेक्ष खर्च करीत होता. कोणाचा कोणाला मेळ नव्हता. पंडित नेहरूंनी वरील पुस्तकाच्या प्रस्तावनेत तर आणखी पुढे जाऊन म्हटले आहे की भिन्नभिन्न प्रांतांचा एकमेकांशीं मेळ नाहीं इतकेच नव्हे, तर प्रांतांतल्या एका खात्याचा दुसऱ्या खात्यांशी मेळ नाहीं. आणि पुढे कांहीं उदाहरणे देण्यांत येतील त्यावरून असें दिसेल कीं, एका कारखान्यांत किंवा एका संस्थेतहि एका विभागाचा दुसऱ्याशी मेळ नसतो ! भारताचा प्रचंड विस्तार व विपुल सुप्त संपत्ति पाहून अभिमानाची भाषणे करणे सोपे आहे. पण या अफाट पसाऱ्यांतील अनंत घटकांना एकसूत्रबद्ध करून या अनंत घटकांतून एक भारतमूर्ति निर्माण करणे अत्यंत दुष्कर आहे. तसें झाल्यावांचून आपले स्वातंत्र्य टिकणेंसुद्धां शक्य नाहीं. मग भारतीय समाजाचे संघटित राष्ट्र बनविणे आणि तें राष्ट्र लोकायत्त करणे हे तर सुतराम् अशक्य आहे. भारतीय राष्ट्रपुरुष असें आपण बोलतांना बोलतों. पण पुरुषाच्या प्रत्येक हालचालींत, बोलण्यांत, विचारांत आणि सर्व जीवनांत जी एकसूत्रता असते-- जी नसेल तर मनुष्याला मनुष्यत्वच येणार नाहीं-- ती एकसूत्रता भारतीय पुरुषाच्या अंगी आल्यावांचून त्याला राष्ट्रपुरुष कसें म्हणतां येईल ? ती एकसूत्रता आणणे हे आत्म्याचें कार्य आहे. तसा आत्मा भारताला अजून निर्माण झालेला नाहीं. आणि तो निर्माण करण्याची आपल्या ठायीं पात्रता आहे असे दिसत नाहीं. दोनशे पानांच्या पुस्तकांत डॉ. ग्यानचंद यांनीं निदान पन्नास वेळां तरी हे सांगितले असेल.
या योजनेंतील दुसरा दोष असा की तिच्या पुढे निश्चित हेतु व साध्य असे रेखलेले मुळींच नव्हते. प्रत्येक प्रांतांत लक्षावधि किलोवॅट वीज निर्माण करण्याच्या योजना आंखल्या आहेत, कांहीं चालू झाल्या आहेत; पण या निर्माण होणाऱ्या विजेचा वापर कसा करावयाचा हें अजून कांहींच ठरलेलें नाही. याचा व्हावा तितका विचारच झालेला नाहीं. आणि ग्यानचंद म्हणतात कीं, असें आहे तोपर्यंत हा खर्च समर्थनीय आहे असे म्हणतां येत नाहीं. (उक्तग्रंथ पृ. १६९) अंतिम हेतूचा व व्यापक दर्शनाचा अभाव असल्यामुळे कोणच्या कार्याला अग्रमान द्यावा व कोणचें पुढे ढकलावे याचें ताळतंत्र रहात नाहीं. डॉ. ग्यानचंद यांच्या म्हणण्याचें प्रत्यंतर मुंबई व मद्रास या प्रांतांत दिसून येतें. हे दोन्ही प्रांत अन्नधान्याच्या बाबतींत तुटीचे आहेत आणि नेमक्या याच प्रांतांनीं दारुबंदी करून आपले २०/२५ कोटींचे उत्पन्न घालविले आहे. आसामचे उदाहरण असेंच आहे. या प्रांतांत भूमीच्या कुशींत सुप्त धन अगणित आहे. आणि तज्ज्ञांच्या मतें, या धनाच्या निर्मितीवर जितका खर्च करावा तितका फलदायी होईल. पण विकसनांत या प्रांताला २२९ कोटीपैकी फक्त ६ कोटी मिळाले आहेत. आणि येथल्या खनिज संपत्तीला अजून स्पर्शहि झालेला नाहीं. इतकेच नव्हे तर ती खणून वर काढण्याची योजनाहि आखलेली नाहीं. सर्व मिळून अंतीं काय साधावयाचें आहे किंवा एखाद्या विशिष्ट योजनेने अंती काय प्राप्त करून घ्यावयाचे आहे हेहि ठरले नसेल तर आंखलेल्या योजना किती फलदायी होतील हे दिसतेंच आहे !
या पुस्तकांत भिन्नभिन्न ठिकाणीं डॉक्टर ग्यानचंद यांनी जे शेरे दिले आहेत ते एकत्र केले तर आपल्या १९४६ ते ५० या पंचवार्षिक योजनेचें रूप पुढीलप्रमाणे दिसेल. या योजना प्रत्यक्षांत आणणाऱ्या अधिकाऱ्यांत दृढनिश्चय नाहीं, स्वयंप्रेरणा नाहीं व तळमळ नाहीं. (पृ. ४२, ७९) सामग्ऱ्याने अवलोकन करून योजना आंखावी, प्रत्येक पावलास आढावा घेऊन सावध रहावे व त्या अनुभवानें शहाणें व्हावें, ही विद्या आमच्यांत नाहीं. (पृ. ७७) आरंभी केंद्रसरकारने या विकासकार्यक्रमाला ८०० कोटी मंजूर केले होते, पण पुढे ५०० कोटीची कपात केली. आतां इतकी कपात झाल्यावर कांहीं योजना रद्द करून थोड्या चालू ठेवणे प्राप्त होते. पण तसे करतांना-- म्हणजे ही निवड करतांना-- विवेकबुद्धि वापरलेली दिसत नाहीं. (७९) एकसूत्रता आणण्यासाठी कांहीं प्रांतांत स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत व कोठें कोठें तर स्वतंत्र खातेंच काढलेले आहे. पण या खात्यांनाहि आपल्या कार्याची कल्पना नाहीं. ते अधिकारी माहिती जमा करतात, दप्तर ठेवतात आणि जरूर तेथें माहिती पुरवितात; पण अनेक ठिकाणांहून येणाऱ्या माहितीचा परस्पर मेळ घालावयाचा आहे, त्यांत तारतम्य ठरवून कोणची योजना मागें जात आहे, कोणची पुढे जात आहे, त्यांतून हितअहित कशांत आहे इ. धोरण त्यावरून आंखावयाचे आहे याची जाणीवच या अधिकाऱ्यांना नाहीं. म्हणून हीं खातीं अर्थशून्य आहेत. त्यांचा कांहीं उपयोग नाहीं. (पृ. ११४)
हा अकार्यक्षमतेचा तपशील देऊन शेवटी डॉ. ग्यानचंद असा निर्णय देतात. 'या विकासयोजनेतील खर्चाची छाननी केली तर असे दिसते की यांत एकसूत्रता नाहीं. पैशाची जी प्रांतवार वांटणी केली तिच्यामागें कांहीं सुबुद्ध आंखणी किंवा तारतम्य आहे असे दिसून येत नाहीं. गरजा व सुप्तशक्ति यांचा हिशेब नाहीं. योजनेच्या कार्यात अनेक निर्णय केवळ तात्कालिक स्फूर्तीनें घेतलेले दिसतात. तेव्हां हाताशी असलेल्या साधनांचें व शक्तीचें यापेक्षा जास्त फल राष्ट्राला मिळाले नाहीं यांत काय नवल ? असल्या हिशेबशून्य खर्चामुळे हातीं असलेल्या अल्पशा साधनांचाहि उधळ व नाश होणे हे हिंदुस्थानसारख्या देशांत अटळच आहे.' (पृ. १८९ ).
प्रस्तावने॑त डॉ. ग्यानचंद यांनीं याहिपेक्षां कठोर टीका केली आहे. ते म्हणतात. 'येवढ्या मोठ्या योजना, सामान व मानवी शक्ति यांचा इतका मोठा व्यय, पण त्यामानाने फळ नाहीं. शिवाय आतां आर्थिक स्थिति खालावल्यामुळे या योजना पूर्ण होतील अशी ग्वाही देतां येत नाहीं. पण या योजनांचें अपयश हें साधनांच्या अपुरेपणांत नाहीं. खरे वैगुण्य म्हणजे एकसूत्रता, सुसंगति, परस्पर अन्वय यांचा अभाव हे आहे. आणि धनसाधनें वाढली तरी त्यांचे भवितव्य बदलणार नाहीं. प्रत्येक पायरीगणिक सुसूत्रता, सुबद्धता, एकात्मता आणली तरच या फलद्रूप होतील.'
डॉ. ग्यानचंद यांचें हें निवेदन व त्यांची टीका पूर्णपणें यथार्थ कशी आहे हे 'शिंदरी फर्टीलायझर फॅक्टरी' च्या गाजलेल्या इतिहासावरून कळून येईल. हाहि इतिहास सरकारने नेमलेल्या 'एस्टिमेट कमिटीनें' च लोकांपुढे मांडला आहे. आपल्या राज्यकारभाराचें निःस्पृह पंडितांकडून मापन करवून घेऊन त्या मापनांत कितीहि कठोर व जहरी टीका केलेली असली तरी ते स्वतःच प्रसिद्ध करून जनतेपुढे मांडण्याचें जें अत्यंत प्रांजल धोरण नेहरू सरकारेंन अवलंबिले आहे व ग्यानचंद, गोरावाला, एस्टिमेट कमिटी यांच्या इतिवृत्तांवरून ज्याचे प्रत्यंतर येत आहे, त्या धोरणासाठी आपल्या सरकारला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. सरकारविरुद्ध कोणी टीका करतांच किंवा तसा विचार कोणाच्या मनांत आला असेल अशी शंका येतांच सोव्हिएट रशियांत त्या मनुष्याला गोळी घालतात. आणि भारताचे सूत्रधार पंडितजी मुद्दाम निःस्पृह अशा पंडितांना निमंत्रण देऊन त्यांनी केलेली टीका प्रांजलपणे जनतेपुढे मांडतात. हे पाहून भारतीय प्रजासत्ताकाच्या भवितव्याविषयीं निर्माण होत चाललेली निराशा क्षणभर तरी कमी होते यांत शंका नाहीं. असो. एस्टिमेट कमिटीनें शिंदरी फॅक्टरीबद्दल काय सांगितले ते आपणांस पहावयाचे आहे.
या कारखान्याच्या उभारणीचा खर्च प्रथम अंदाजाने सुमारें ११ कोटी धरलेला होता. पुढे १२ कोटीची मागणी करण्यांत आली व त्यानंतर १५, १८, २३ अशी ती सारखी वाढविण्यांत आली व अजूनहि ही रक्कम पुरेशी होईल अशी खात्री नाहीं. असें का व्हावे याविषय चवकशी
झाली तेव्हां पुढील गोष्टी उघडकीस आल्या. उद्योग व पुरवठा या खात्याच्या अधिकाऱ्यांनीच कमिटीपुढे साक्ष देतांना सांगितले की, या योजनेच्या खर्चाचें अंदाजपत्रक केलेलेच नव्हतें ! साधारण आंकडा सांगितला होता. तसेंच या योजनेवर नियंत्रण असे कोणाचेंच नव्हते. अर्थमंत्री यांनीं या खर्चाचे हिशेब पाहून त्यांतील गोंधळ नाहींसा करण्याचा प्रयत्नहि केला नाहीं. ११ कोटीवरून २३ कोटीपर्यंत खर्च कां वाढला या प्रश्नाचे उत्तर असें की, योजना मंजूर झाल्यावरहि कारखान्यासाठी लागणारी जमीन व यंत्रे विकत घेण्याची त्वरा करण्यांत आली नाहीं. तेवढ्या मुदतींत किंमती वाढत गेल्या व त्यामुळे सरकारला पुष्कळ वेळां चौपट किंमती द्याव्या लागल्या. याची चवकशी करून याला जबाबदार कोण ते सरकारने निश्चित करावें, अशी एस्टिमेट कमिटीने शिफारस केली आहे. या कारखान्यांत स्वतंत्रपणे खर्चाच्या रकमा मंजूर करणारे बारा अधिकारी होते आणि आठ स्वतंत्र हिशेबनीस होते ! यांच्या प्रत्येकांच्या कचेऱ्या स्वतंत्र होत्या व त्यांचा एकमेकीस मेळ नव्हता. मेळ घालण्याचा एकदांहि प्रयत्न करण्यांत आला नाहीं. उद्योग व पुरवठा या खात्यानें शिंदरी योजनेवर देखरेख करण्यास पुष्कळ स्वतंत्र अधिकारी नेमले असूनहि वरील प्रकार झाला. या अधिकाऱ्यांच्या पगाराचा खर्च भरमसाट असून तो मुळींच करावयास नको होता, असें कमिटीचे मत आहे. एस्टिमेट कमिटीच्या पूर्वी 'काटकसर समिती'नें बऱ्याच गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणल्या होत्या. तरी त्याकडे कोणीं लक्ष दिले नाहीं. हे सर्व निवेदन करून कमिटीनें परखडपणे असें विचारले आहे कीं, 'सरकारी कारभार चालविण्याची ही काय रीत आहे की काय ?' याबाबतींतली शिथिलता, बेजबावदार वृत्ति, हलगर्जीपणा आणि कर्तृत्वशून्यता अगदीं अक्षम्य आहे. गरीब हिंदी जनतेचे कोट्यवधि रुपये यामुळे अगदीं मातींत
गेले आहेत. उपकरणे आहेत, पैसा आहे, योजना आहेत, पण त्यांचा घटयिता जो माणूस त्याच्या ठायी कसलेहि 'सत्त्व' नाहीं. तें निर्माण झाल्यावांचून कोणचीहि पंचवार्षिक वा दशवार्षिक योजना सफल होणे शक्य नाहीं.
बिहारचे अर्थमंत्री श्री. सिंह यांनीं गया येथें काँग्रेसच्या एका सभेत जें उद्गार काढले त्यावरूनहि याच मताचा पाठपुरावा होईल. ते म्हणाले, 'पाटबंधाऱ्यांच्या ज्या लहान योजना आंखल्या होत्या, त्यांत कोट्यवधि रुपये नुसते उधळले गेले. हे पाटबंधारे नीट झाले असते तर बिहारमध्ये दुष्काळ पडला नसता. सरकारच्या भिन्न खात्यांत कसलीच एकसूत्रता नव्हती. आणि पुष्कळशा पाटबंधाऱ्यांच्या योजना म्हणजे विनोदप्रकरणेंच होतीं.' (टाइम्स ऑफ इंडिया २५- ११- १९५०)
भिन्नभिन्न प्रांतांतल्या नियोजनांच्या अपयशाची जी कथा वर सांगितली. तशीच रडकथा केन्द्रसरकारच्या आर्थिक नियोजनाची आहे, हे स्वतः पंडितजींनींच सांगून टाकलेले आहे. प्रांतांचे प्रधानमंत्री व काँग्रेसचे प्रतिनिधि यांचेपुढे भाषण करतांना जवाहरलालजी म्हणाले, 'नियोजनाविषयी आपण भाषणे पुष्कळ केलीं; पण आतांपर्यंत फारसें कांहीं साधलेले नाहीं. अनेक दिशांनीं आपण प्रयत्न केले पण केन्द्र व प्रांत यांत आणि प्रांताप्रांतांत अवश्य ते सहकार्य व एकसूत्रता आम्ही आणूं शकलो नाहीं. मी अगदी प्रांजलपणें सांगतों कीं, केन्द्र सरकारमध्येहि अखिल भारताचें समग्र दर्शन घेण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न केला गेला नाहीं.' (टाइम्स ऑफ इंडिया २६-४-५०)
आपल्या कार्यक्षमतेचें स्वरूप हे असें आहे. विषयाचे पूर्णज्ञान, पूर्व योजना, काम सुरू झाल्यानंतरची जागरूकता, कार्य तडीस नेऊन इष्ट हेतु सिद्धीस नेण्याची जबाबदारी व तळमळ या सर्व गुणांचा कार्यक्षमतेंत अंतर्भाव होतो. दुर्दैवाने या सर्व गुणांचा आपल्या कारभारांत अभावच दिसून येतो. डॉ. ग्यानचंद यांनी प्रांतविकास योजनांचा जो चित्रपट दिला आहे तसेच इतर खात्यांचे चित्रपट आहेत. आपले सरकारी कायदेपंडित कायदे करतात त्यांचा न्यायालयांत धुरळा होतो. आपले इंजिनियर धरणाच्या भिंती बांधतात त्या पाण्याची लाट त्यांच्यावर थडकण्याच्या आधींच वांकड्या होतात किंवा कोसळून पडतात. त्यांनी बारा वर्षे टिकावयाच्या हिशेबानें बांधलेली घरें सहा महिन्यांत निकामी होतात. गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम पोलीसांकडे दिले की गुन्ह्यांच्या प्रमाणांत वाढ होण्यास प्रारंभ होतो. अन्नधान्य वाढविण्याची मोहीम सुरू केली की अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागते. आपले आरोग्यखातें, आपले शिक्षणखाते, आपले नभोवाणीखातें- प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यक्षमतेचे डिंडिम असेच वाजत आहेत. भिन्नभिन्न सरकारी खाती व इतर सार्वजनिक संस्था यांचे अहवाल वाचले म्हणजे कर्तृत्वाचा व आपला दहा जन्मांत तरी कधी संबंध आला होता की नाहीं अशी शंका येऊं लागते.
आपल्या कार्यक्षमतेचें स्वरूप न्याहाळल्यानंतर आतां आपल्या नीतिमत्तेचे रूप पहावयाचे आहे. कार्यक्षमता व नीतिमत्ता हीं राष्ट्रपुरुषाची दोन फुफ्फुसे आहेत. त्यांतून त्याचे श्वसन चालते. यांपैकी एक जरी कार्य करीत राहिले तरी प्राण राहूं शकतो. सतराव्या शतकांतील ब्रिटनच्या राज्यकारभाराचें 'अत्यंत अधोगामी पण अत्यंत कार्यक्षम' असें इतिहासकार वर्णन करतात. म्हणजे एकाच फुफ्फुसावर तेथला कारभार चालला होता. पण तेवढ्यावर परमोत्कर्ष साधला नाहीं तरी अनेक संकटांतून ब्रिटन पार पडलें. पण जेथें दोन्ही फुफ्फुसें बिघडली आहेत तेथें अशी आशा धरतां येईल काय ?
आपल्या देशाच्या सार्वजनिक जीवनांतील नीतिमत्तेचे सध्यां संपूर्ण दिवाळे निघालेले आहे याबद्दल आतां दुमत होईल असे वाटत नाहीं. राजकीय पुनर्घटना व औद्योगिक पुनर्घटना या प्रकरणांत विषयाच्या अनुषंगानें काँग्रेसची संघटना, व्यापारी वर्ग व एकंदर समाज यांच्यातील कमालीच्या अनीतीचे वर्णन केलेच आहे. विषयाच्या पूर्ततेसाठी आपला एकंदर राज्यकारभारहि अनीतीच्या रोगानें कसा सडून गेला आहे याची माहिती येथें देतो. ही माहिती सरकारी अहवालांतूनच घेतलेली आहे. आपल्या सरकारी खात्यांत एकहि खाते असें नाहीं कीं जे या रोगापासून मुक्त आहे. (१) हिंदुस्थानचे अकाउंटंट जनरल आपल्या सर्व परदेशी वकिलातीतून हिंडून आले व त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. त्यांत त्यांनी सांगितले आहे की या वकिलातीत सर्वत्र उधळेपणाचा कारभार आहे. पैशाचा हिशेब एकाहि वकिलातीत समाधानकारक ठेवलेला नाहीं. (सकाळ. २८-१०-५१) इंग्लंडमध्ये खरेदी केलेल्या जीपगाड्यांचे प्रकरण सुप्रसिद्धच आहे. या वकिलाती परदेशी कंपन्यांशी करार करतात, तेहि सावधगिरीनें केलेले नसतात. कराराचा भंग झाला तर त्यासाठी कंपनीला जबाबदार धरता येईल अशी तरतूदच कांहीं करारांत केली नव्हती. अर्थात् यांतील हेतु उघड आहे. (२) उत्तर प्रदेशांतील स्थानिक स्वराज्यांची नुकतीच तपासणी झाली. तिच्या अहवालांत पुढीलप्रमाणे माहिती मिळते. बनारस, कानपूर, लखनौ, मुझफरपूर, झांशी, डेहराडून, इटावा या म्युनिसिपालिट्यांनीं नियमाप्रमाणे हिशेब ठेवलेला नाहीं. उत्पन्नापेक्षां खर्च प्रत्येक ठिकाणी जास्त आहे. प्रत्येक वेळी टेंडरें स्वीकारतांना सर्वांत महाग होतीं तीं स्वीकारलेली आहेत. उधळपट्टी, लांचलुचपत, अफरातफर यांचा सर्वत्र बुजबुजाट आहे. अफरातफरीच एकंदर ९३ प्रकरणे उघडकीस आलीं आहेत आणि असे असून सरकारने तिकडे दुर्लक्ष केले आहे. (३) पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या प्रांतोप्रांतीच्या अहवालावरून आपल्या सरकारी कारभाराचे रूप असेंच ओंगळ असल्याचे दिसून येतें. संघराज्याचें एक व प्रत्येक प्रदेश राज्याचे एक अशी पब्लिक सर्व्हिस कमिशने नेमावीं व सरकारी खात्यांतील वरिष्ठ जागा त्यांच्या शिफारसी अन्वयेंच भराव्या, असा भारताच्या घटनेतील ३२०-३ या कलमानें दण्डक घातलेला आहे. वशिलेबाजी, लांचलुचपत याला आळा बसावा हा यांतील हेतु आहे. पण बहुतेक सर्व प्रांतांतील राज्यसरकारें या कलमाचा भंग करीत आहेत. मध्यप्रदेशांतील प. स. कमिशनचे अध्यक्ष भवानीशंकर नियोगी यांनी प्रतिवर्षी राष्ट्राध्यक्षांना सादर करावयाच्या अहवालांत स्पष्टपणे असे नमूद केलें आहे कीं, आपापल्या खात्यांत नेमणुका करतांना सरकारी अधिकारी आम्हांला विचारीत नाहीत. शिक्षण, जंगल या खात्यांनी आपल्याच मर्जीप्रमाणे नेमणुका केल्या. आणि जाब विचारला तेव्हां, कार्यक्षमता वाढावी व काम त्वरित व्हावे या हेतूनें असें केले, असे उत्तर दिले. नेमणुका करतांना सर्व कागदपत्रें कमिशनकडे धाडली पाहिजेत हाहि नियम पाळलेला नाहीं. कित्येक वेळा तर नेमणुका केल्याचे कमिशनला कळविलेंहि नाहीं. (टाईम्स ऑफ इंडिया २-९-१९५०) हैद्राबाद, पंजाब येथील प. स. कमिशनच्या अध्यक्षांनी अशाच तक्रारी नमूद केलेल्या आहेत. कमिशनला न विचारतां प्रत्येक खात्यांत सरकार वाटेल ती ढवळाढवळ करतें असे या अहवालांचे म्हणणे आहे. (सकाळ ३०-१२-५१) (४) शिक्षण संस्था, विद्यामंदिरें हीं सरस्वतीचीं म्हणून मानलेली निवासस्थानेंहि या गलिच्छ अनीतीच्या रोगांतून मुक्त नाहींत. आग्रा व अलाहाबाद विद्यापीठांच्या कारभारासंबंध उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांनी जे निवेदन केले आहे तें वांचून कोणालाहि धक्का बसल्याखेरीज रहाणार नाहीं. वशिलेबाजी, खाबूपणा, लांचलुचपत, हे सर्व प्रकार या विद्यापीठांत १९४१ सालापासूनच असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वातंत्र्यानंतर ते कमी न होतां सहस्रपटीनें वाढलेच आहेत असे या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. सीनेटमध्ये निवडून येण्यासाठी मतें मिळवून दिलीं, किंवा प्रत्यक्ष पैसे दिले तरच या विद्यापीठांत परीक्षक नेमले जाते. कांहीं केवळ मॅट्रिक झालेल्या गृहस्थांना एम्. ए. चे परीक्षक नेमलें होतें. अधिकाऱ्यांच्या नात्यांतील विद्यार्थ्यांना पहिला वर्ग देण्याचे अमान्य केल्यामुळे कांहीं विद्वानांचे परीक्षापद गेले. अशा योजनेमुळे अगदीं रद्दी विद्यार्थ्यांना तेथे एम्. ए. च्या परीक्षेत सहज पहिला वर्ग मिळतो. आणि या सर्व प्रकारची दखल सरकार घेणार आहे म्हणून या विद्यापीठांचे अधिकारी सध्यां संतप्त झाले आहेत. (टाइम्स ऑफ इंडिया १९-११-५२) आपला एकंदर राज्यकारभार नीतीच्या दृष्टीनें कोणाच्या पातळीवर जाऊन बसला आहे याची यावरून सहन कल्पना येईल. हल्लीं मुळीं सर्वत्र असा नियमच झाला आहे की एखादें धरण बांधण्यासाठी, लोकांना कर्ज देण्यासाठी, सहकारी तत्त्वावर पुनर्रचना करण्यासाठी सरकारनें एखादें खाते किंवा संस्था स्थापिली कीं एक वर्षाच्या आंत तिच्या कारभारांतील वशिला, लांच, गोंधळ यांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमावें लागतें !
आपल्या देशाला सर्व दृष्टीनी असा जो विपरीत काळ प्राप्त झाला आहे त्याचे प्रधान कारण म्हणजे काँग्रेस या संस्थेचा अधःपात हे होय. या देशाच्या उन्नतीचें श्रेय जसे बव्हंशीं काँग्रेस या संस्थेलाच आहे त्याचप्रमाणे त्याच्या अधोगतीचेंहि खापर बव्हंशी तिच्याच माथी फुटणार अशी भवितव्यता दिसत आहे. शरीरांत हात, पाय, काळीज, फुफ्फुस, मेंदू, या सर्व अवयवांचे महत्त्व आपापल्यापरी आहेच. पण या सर्वांना संघटित करून, त्यांच्यांत प्राण भरून, त्यांचा कारभार एकसूत्री ठेवून सर्व शरीरांत एकत्व व तज्जन्य चैतन्य प्रस्थापित करण्याचे कार्य आत्मा करीत असतो. भारती राष्ट्र पुरुषाच्या देहांत हे कार्य काँग्रेस इतके दिवस करीत होती. त्याच्या आत्म्याच्या ठायीं स्वातंत्र्यपूर्व कालांत ही संस्था होती. तो आत्मा स्वातंत्र्यानंतर नष्ट झाला. आणि आतां या देशाची अवस्था एकाद्या कलेवरासारखी होऊन त्याची अंगें व उपांगें विघटित होऊं पहात आहेत. मागें राजकीय पुनर्घटना या लेखांत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राष्ट्राध्यक्ष राजेंद्रबाबू यांची जी अनेक वचनें उद्धृत केलेली आहेत व आपण डोळ्यांनी जे चित्र नित्य पहात आहोत त्यावरून वस्तुस्थिति अशी झाली आहे याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाहीं. येथें मानवपुनर्घटनेशी त्याचा संबंध काय हे दाखवून आपणांस पुढे जावयाचे आहे.
अगदी लहान अशा कुटुंबसंस्थेपासून राष्ट्र या व्यापक संस्थेपर्यंत सर्व संस्थांच्या इतिहासांतून असा एक नियम दिसून येतो की या संस्थांत ध्येयवादाने प्रेरित होऊन अहोरात्र तिच्या भवितव्याची काळजी करीत, यातना व कष्ट सोशीत, एखादी थोर व्यक्ति जेव्हां अखंड जळत रहाते तेव्हांच त्यांच्यांत जिवंतपणा टिकून राहतो. खोलीमध्ये एखादा दिवा जळत असला म्हणजे ज्याप्रमाणे भोवतालच्या अंधारांतला कणकण उजळून निघत असतो त्याप्रमाणे जेव्हां राष्ट्रांत एकादा महापुरुष ध्येयवादाच्या आगींत उभा राहून नित्य जळत रहातो तेव्हां इतरांच्या मनांतील हीन भाव नित्य उजळून निघतात व त्यांचे सात्त्विक गुणांत रूपांतर होत रहातें. ज्या संस्थेच्या नेतृत्वानें राष्ट्राचे कार्य चालू असते ती जोपर्यंत ध्येयवादानें प्रेरित झालेली असते, आपण केलेल्या कष्टाचे फळ राष्ट्राच्याच पदरीं पडणार आहे अशी तिच्या निःस्वार्थीपणामुळे जनतेची जोपर्यंत खात्री असते तोपर्यंत जनताहि ध्येयवादानें प्रेरित होऊन निःस्वार्थीपणे कष्ट करण्यास सिद्ध होते; आणि जनतेच्या या सहकार्यानेंच राष्ट्रीय प्रपंचाचा गाडा ओढणें शक्य होते. स्वातंत्र्याच्या पूर्वकालांत काँग्रेस ही अशी ध्येयवादानें प्रेरित झालेली संस्था होती आणि त्यामुळेच जनतेचें सहकार्य मिळविण्याचे सामर्थ्य व पुण्याई तिच्या ठायीं निर्माण झाली होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्यांत आत्मबलिदान करण्याइतके सहकार्य करण्याची प्रेरणा ती लक्षावधि लोकांच्या मनांत निर्माण करूं शकली. आपल्या ध्येयवादानें, निःस्वार्थीपणामुळे नित्य जळत रहाण्याच्या धैर्यामुळे अखिल जनतेचें सहकार्य प्राप्त करून घेण्याची जी पुण्याई तोच राष्ट्राचा आत्मा होय. ती पुण्याई, तो आत्मा आज नष्ट झाला आहे व त्यामुळे या देशाचें कलेवर होऊं पहात आहे.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची आपल्याला पुनर्घटना करावयाची होती. ती केवळ काँग्रेसला आपल्याच संघटनेच्या बळावर करणे अशक्य होते. जनतेचें तन मन धन या कार्यासाठी राबणें अवश्य होतें. हजारो सुशिक्षित तरुण, लक्षावधि शेतकरी व कामगार यांचे बौद्धिक व शारीरिक कष्ट, आणि कोट्यवधि जनतेचा मनोमन पाठिंबा यांची या कार्याच्या सिद्धतेला आवश्यकता होती. आपल्याजवळ भांडवल नाहीं, अन्नधान्य नाहीं, यंत्रे नाहींत, इतर साधनसामुग्री नाहीं; तज्ज्ञ लोक आपल्याकडे कमी, कसबी कामगार कमी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव कमी; अशा सर्व उणीवा होत्याच. पण त्या उणीवा कार्यसिद्धीच्या आड आल्या नसत्या. म्हणजे भांडवल किंवा साधनसामुग्री यांच्यावांचून कामें झाली असती असा भावार्थं नाहीं. तर त्या उणीवा भरून काढणे शक्य झाले असते. केव्हां? काँग्रेसची पुण्याई कमी झाली नसती तर, आपल्या राष्ट्राच्या कर्णधारांप्रमाणेच त्यांच्या नेतृत्वाने काम करणारे प्रांतोप्रांतींचे नेते आणि त्यांच्या शिस्तीत वागणारे जिल्ह्यांतले, तालुक्यांतले, शहरांतले, गांवांतले कार्यकर्ते हे त्यागी आहेत, निःस्वार्थी आहेत, आपल्या (म्हणजे जनतेच्या हितासाठी ते आहोरात्र कष्टत आहेत असा विश्वास जनतेच्या ठायीं निर्माण झाला असता तर अर्धपोटी राहून उन्हातानाची पर्वा न करतां, अपयशानें निराश न होतां, आपल्या राष्ट्रांतल्या कोट्यवधि सुशिक्षित अशिक्षित नागरिकांनी काँग्रेसशी हार्दिक सहकार्य केले असते. आणि मग इकडचे पर्वत तिकडे सहज फेकून देतां आले असते. आज काँग्रेसला भांडवलदाराचे दास्य पतकरावे लागले आहे असे आपण ऐकतों. पण हीहि गोष्ट सध्यांच्या स्थितीत अपरिहार्य म्हणून जनतेनें मान्य केली असती. काँग्रसचे मोठमोठे पदाधिकारी व हजारों कार्यकर्ते हे आपले आहेत, जनतेच्या हितावांचून त्यांना अन्य दृष्टि नाहीं ही खात्री जनतेला मनोमन पटली असती तर वाटेल त्या आपत्तीशी झुंज देण्यास ती सिद्ध झाली असती. भावी काळाच्या आशेच्या प्रेरणेने तिनें वर्तमानकाळाचे कष्ट, यातना, उपासमार सर्व कांहीं आनंदाने साहिले असते. इंग्रजांचे राज्य होतें तेव्हां हें दिसून आलें नाहीं काय ? तुरुंग, लाठीमार, गोळीबार, संसाराचा विध्वंस हे सर्व समोर दिसत असूनहि काँग्रेसशी सहकार्य करून आत्मबलिदान करण्यासहि लक्षावधि भारतीय पुढे आले. आतांच्या आपत्ति तुरुंग, गोळीबार त्यांच्या मानाने कांहींच नाहीत, कष्ट करून जे फल मिळवावयाचें तें पूर्वीसारखे दूरवरचें, अनिश्चित असेहि नाहीं. असे असूनहि, काँग्रेसमध्ये तरुण रक्त येत नाहीं, असे दुःखाचे, निराशेचे उद्गार पंडितजींना काढावे लागतात. आणि जनतेचे सहकार्य मिळत नाहीं, तिच्या मनांत काँग्रेसविषयीं तिटकारा येत चालला आहे, असे शेकडो अधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगावे लागते. यांचें कारण एकच. भांडवल नाही, यंत्रे नाहीत, साधनसामुग्री नाहीं हें कारण नव्हे. जनतेच्या सहकार्यावर हक्क सांगण्याइतकी पुण्याई काँग्रेसजवळ शिल्लक नाहीं ! त्याची अपेक्षा करण्याइतकाहि अधिकार तिला सांभाळून ठेवतां आला नाहीं. काँग्रेसला अनेक भयंकर आपत्तींना तोंड द्यावयाचें होते हे खरे आहे. निर्वासितांचा प्रश्न, काश्मीरचें प्रकरण, संस्थानिकांचा प्रश्न, अन्नधान्याचा तुटवडा, दुष्काळ, टोळधाडी, महापूर, व्यापारी व भांडवलवाले यांचा स्वार्थ, कम्युनिस्ट लोकांचा दहशतवाद आणि स्टॅलिननिष्ठा या सर्व आपत्ति अत्यंत भयानक व दुस्तर होत्या व आहेत याविषयीं शंका नाहीं. पण काँग्रेसची शुद्ध ध्येयनिष्ठा जर अचल, अभंग राहिली असती तर या प्रश्नांचें, या आपत्तीचे स्वरूप फार सौम्य झालें असतें, त्यांतल्या कांहीं नाहींशा झाल्या असत्या व कांहीं उद्भवल्याच नसत्या. आज काँग्रेसचे अधिकारी पुष्कळ वेळां जनतेला टाकून बोलतात, लोक अत्यंत स्वार्थी आहेत, आळशी आहेत, त्यांना समाजहितबुद्धि नाहीं, त्यांची दृष्टि संकुचित आहे, त्यांची अभिरुचि हीन आहे, सत्य, संयम, विवेक या गुणांशी त्यांची ओळख नाहीं, आणि यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना यश येत नाहीं, असें भाष्य करतात. भारतीय जनता अशी आहे याबद्दल वादच नाहीं. सामाजिक निष्ठा, जनहितबुद्धि, संघटनेसाठी अवश्य असणारा विवेक या दृष्टीने आपण अगदी खालच्या पातळीवर आहो याबद्दल दुमत केव्हांहि नाहीं; पण स्वातंत्र्यापूर्वी जनता अशीच होती. नव्हे याहूनहि खालच्या पातळीवर होती. तशाहि स्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनीं व हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे तिला उच्च कार्याची प्रेरणा दिली. जनतेला अशी प्रेरणा देऊन तिला उच्च पातळीवर चढविणे हेच काँग्रेसचें कार्य आहे. जनता स्वार्थी आहे, आळशी आहे म्हणून आम्हांला यश येत नाहीं असे म्हणणे म्हणजे, अंधार काळा आहे म्हणून मला प्रकाशतां येत नाहीं, अशी दिव्याने तक्रार करण्यासारखे आहे. अंधाराला उजळून टाकण्यासाठींच दिवा जळत असतो. भोवतालच्या जनतेंत उच्च संस्कृतीचें संवर्धन करण्यासाठींच तिचा नेता स्वतः तनमनधनानें जळत रहातो. ते व्रत त्याने पाळल्यानंतर मग जनतेचा अधिक्षेप करण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. एरवी नाहीं. जनता अधोगामी झाली हे काँग्रेसच्या अपयशाचें कारण नसून काँग्रेसची ध्येयच्युति ही जनतेच्या व राष्ट्राच्या अधःपाताचें कारण आहे.
कल्याणी येथील काँग्रेसच्या अधिवेशनांत पंडित जवाहरलाल यांनी हाच महनीय विचार काँग्रेसजनांना ऐकविला. ते म्हणाले, की "गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने माझ्या मनाची अशी निश्चिति झाली आहे कीं, आपण जनतेला योग्य तऱ्हेनें साद घातली तर ती उत्तम प्रतिसाद देते; पण जेथें प्रतिसाद मिळविण्यांत आपण अपयशी होतो तेथे दोष आपलाच असतो, जनतेचा नव्हे."
काँग्रेसमधील ही अनीति, हें पाप धुवून काढण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून गेलीं पांचसहा वर्षे काँग्रेसचे पुढारी अखंडपणे करीत आहेत; पण त्याचा काडीइतकाहि उपयोग होत नाहीं, असें दिसते. प्रत्येक सभेंत, प्रत्येक बैठकींत, प्रत्येक परिषदेंत पटेल, नेहरू, राजेन्द्रबाबू, तंडनजी, पट्टाभि यांच्या भाषणांचा गेलीं पांचसहा वर्षे हा एकच सूर होता. 'ध्येयच्युत होऊं नका, स्वार्थाला बळी पडूं नका, क्षुद्र मोहाला वश होऊन राष्ट्रहिताचा बळी देऊं नका' असा काँग्रेसजनांच्या कानीं-कपाळी सारखा उपदेश ते करीत आहेत. पण त्यांचा हा उपदेश अरण्यरुदनासारखा ठरत आहे. सध्यां काँग्रेसच्या अनुयायांचें सत्त्वच ढळल्यासारखे झाले आहे. स्वार्थ, लोभ, मोह यांनीं ते अंध व पिसाट झाले आहेत. नेहरू, राजेन्द्रबाबू हे त्यांच्या लेखी आतां कोणी नाहींत. यामुळे या थोर धुरंधरांच्या तोंडी अनेक वेळां निराशेचे उद्गार आलेले दिसतात. अहमदाबादच्या भाषणांत नेहरू म्हणाले, 'काँग्रेसचा विनिपात होणार हें मला स्पष्ट दिसत आहे. सध्यां आपण केवळ बहुसंख्येच्या जोरावर देशाची विकलता झांकून ठेवीत आहोत. कसला तरी एक भयंकर रोग काँग्रेसच्या काळजाला झाला आहे व त्यामुळे ती आंतून सडत चालली आहे. आज काँग्रेसमध्ये चैतन्य उरलेले नाहीं व इतरांना ती चैतन्य देऊं शकत नाहीं.' (टाइम्स- ३०-१-५१) अशा तऱ्हेचे निराशेचे, कठोर, कानउघाडणीचे उद्गार गेली तीनचार वर्षे या थोर पुरुषांच्या तोंडून ऐकत असूनहि काँग्रेसजनांच्या पापप्रवृत्ति रतिमात्र कमी पडत नाहींत. उलट त्या वाढतच आहेत, असें अखिल भारतीय काँग्रेसकमिटीच्या निवडणुकांतील प्रकरणांवरून दिसून येतें.
उपदेशाचा सौम्य मार्ग खुंटल्यानंतर दुसरा शिक्षेचा मार्ग उरतो. त्याने कदाचित् सुधारणा होईल, असे वाटतें; पण काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा अजून अवलंब केलेला नाहीं. पंडितजींनी तसा धाक अनेक वेळां दाखविलेला आहे. जातीयवादी, स्वार्थी, पापभ्रष्ट, अधोगामी सभासदांना मी काँग्रेसमध्ये राहू देणार नाहीं, हाकलून लावीन, असे निकराचे उद्गार त्यांनी अनेक वेळां काढलेले आहेत. काळा बाजार करणाऱ्यांना तर फांशीं देण्याचीहि धमकी त्यांनी दिलेली आहे; पण प्रत्यक्षांत तसें त्यांनी कधीच केलेले नाहीं. उलट मद्रास, बंगाल येथील काँग्रेसच्या मंत्रीगणांचे भयंकर पापमार्ग त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर व त्यांना त्यांतील गुन्हेगारी पटल्यावरहि त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्षच केलेले आहे. याचे कारण काय ते नेमके सांगणे कठीण आहे; पण आभाळच फाटल्यानंतर टांका कोठे घालावा अशी बहुधा पंडितजींची स्थिति झाली असावी. काँग्रेसजनांच्या अधःपाताची, अनीतीची भ्रष्टतेची ही दुःखद कहाणी एका प्रदेशाची नसून भारतांतील प्रत्येक गांवाची, शहराची, तालुक्याची व जिल्ह्याची आहे. सरकारी खात्यांकडे पाहिले तरी तोच प्रकार आहे. अशा स्थितींत शिक्षा कोणाकोणाला करावयाची व हाकलून तरी कोणाकोणाला काढावयाचें ! अर्थात मनांत अनेक वेळां असे येते की प्रारंभी पापप्रवृत्ति दिसू लागतांच पंडितजीनी कठोरपणा धारण करून खरोखरच कांहीं मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना कडक शिक्षा केल्या असत्या, तर सर्वांनाच दशहत बसून या रोगाची लागण थांबली असती. पण प्रत्यक्ष त्या स्थानी असलेल्या माणसाला त्याच्या अडचणी माहीत असतात. त्यामुळे या बाबतींत तर्कवितर्क करण्यांत तथ्य नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे की, राष्ट्राच्या आत्म्याच्या ठायीं असलेली, राष्ट्राच्या उन्नतीची, बलसंवर्धनाची, विकासाची सर्व जबाबदारी जिच्या शिरावर आहे, अशी कॉंग्रेस ही एकमेव संस्था कमालीची अधोगामी झाली आहे आणि तिच्यांत सुधारणा होण्याची आशा तिच्या धुरंदर नेत्यांनाहि फारशी वाटत नाहीं. हे ध्यानांत घेऊन या विलक्षण आपत्तीच्या प्रसंगी आपल्या लोकशाहीच्या रक्षण संवर्धनाच्या दृष्टीनें भारताच्या नागरिकांनी कोणची योजना केली पाहिजे, कोणचे प्रयत्न केले पाहिजेत, हा आपल्यापुढे महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपल्याला जो लढा लढावयाचा आहे, तो सत्त्व विरुद्ध तमोगुण असा लढा आहे. लोकसत्तेमध्ये हा लढा अटळ असतो. ब्रिटन व अमेरिका या जगांतल्या बलशाली व यशस्वी अशा लोकसत्ता आहेत. त्यांना प्रारंभापासून हा लढा लढावा लागलेला आहे. दोनहि देशांत औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अत्यंत प्रबळ होऊन लोकांच्या तमोगुणांना आवाहन करून अनियंत्रित होऊं पहात होती; या वेळी तेथे या धनशक्तीशी लोकशक्तीनें कसा संग्राम केला हें पहाणे उद्बोधक होईल आणि त्यावरून कदाचित् आपल्याला आपली लोकसत्ता यशस्वी करण्याचा मार्ग सांपडेल.
थॉमस जेफरसन, ॲब्राहम लिंकन, थिओडोर रूझवेल्ट, विड्रो विल्सन, व फ्रँकलिन रूझवेल्ट या पांच अमेरिकन थोर पुरुषांनी अमेरिकेतील हीन प्रवृत्तींशी संग्राम करून तेथील लोकसत्ता यशस्वी केली आहे. त्यांनी हा संग्राम कशाच्या बळावर केला हें आपण पाहूं लागलो, तर आपणांस एक अगदीं निश्चित, अगदीं निर्णायक असें उत्तर मिळते. ते बळ म्हणजे चारित्र्य हे होय. एक ध्येयवादी निष्ठावंत पुरुष लोकसेवेचे व्रत घेऊन, त्याच्या आड येणाऱ्या स्वार्थी धनशक्तीशीं प्राणपणाने झुंज घेण्यास सिद्ध झाला, ध्येयवादाच्या आगीत तो सततं जळत राहिला की, त्याच्या तेजांतून अनेक स्फुल्लिंग बाहेर पडतात व मग अनेक निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होतात. सर्व देशभर धनशक्तीनें चालविलेल्या अन्यायाचा त्यांनीं डांगोरा पिटण्यास प्रारंभ केला कीं, कालांतराने लोकशक्ति जागृत होते आणि तिच्यापुढे धनशक्तीला– कोणच्याहि पापशक्तीला-नमावें लागतें. लोकसत्तेच्या यशाचा हा एकमेव राजमार्ग आहे.
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जार्ज वॉशिंग्टन निवृत्त झाल्यावर तेथील राजकारणांत दोन पक्ष उघड दिसू लागले, जॉन ॲडम्स व अलेक्झांडर हॅमिल्टन यांचा फेडरॉलेस्ट पक्ष व दुसरा जेफरसन यांचा डेमॉक्रट पक्ष. पहिला धनशक्तीचा व दुसरा लोकशक्तीचा उपासक होता. जेफरसनचा चारित्रकार म्हणतो, 'जेफरसनला असें दिसून आले की, अमेरिकेनें ब्रिटनचें जूं झुगारून दिलें तरी ती खरी स्वतंत्र झालेली नाहीं. दुसरी एक मदांध व जुलमी सत्ता आपल्या देशाला बेड्या घालणार असे त्याला दिसूं लागलें. ती सत्ता म्हणजे धनसत्ता होय. अमेरिकन क्रांतीत ज्यांनी आपले रक्त सांडलें त्यांना आतां असें आढळून आले कीं, इंग्लिश राजशाही आपण नष्ट केली, पण तिच्या जागी तितकीच अनियंत्रित व जुलमी अशी धनशाही प्रस्थापित होऊं पहात आहे. धनाचे उत्पादन करणारे कष्टाळू लोक व त्यांची पिळवणूक करणारे धनिक लोक यांचा संग्राम झडणार हे स्पष्ट दिसूं लागलें. या संग्रामांत जेफरसननें कष्टाळू जनतेची बाजू घेतली आणि अखेर धनसत्तेवर मात केली. या वेळी धनशक्तीने आपले सर्व सामर्थ्य पणास लावून जेफरसनविरुद्ध फळी उभी केली होती. असे असूनहि हा लढा जेफरसननें कशाच्या बळावर जिंकला हे समजून घेण्यासाठी भारतातील तरुण नागरिकांनी जेफरसनच्या चरित्राचा जरूर अभ्यास करावा.
अब्राहम लिंकन यांच्याजवळहि ध्येयनिष्ठा, चारित्र्य याखेरीज दुसरे कोणचेंहि बळ नव्हते. चारित्र्य याचा एक विशिष्ट अर्थ येथे अभिप्रेत आहे. सार्वजनिक प्रपंच प्रामाणिकपणें, निःस्वार्थी बुद्धीनें व ध्येयनिष्ठेनें करण्याची प्रवृत्ति हा तो अर्थ आहे. अनंत यातना सोसाव्या लागल्या, तुरुंग, छळ किंवा देहदंडहि सोसावा लागला तरी लोक सेवाव्रतापासून च्युत न होता मृत्यूलाहि भिवविणारें जें धैर्य हे पुरुष प्रगट करतात, त्याचें नांव चारित्र्य. या मार्गात तुरुंग किंवा मृत्यु यांच्याप्रमाणेच अनेक प्रकारचे लोभमोहहि आड येतात. त्यांना जिंकून आपले व्रत अखंडपणे चालविण्याचा जो निर्धार तें चारित्र्य होय. या चारित्र्याला दुर्जय अशी कोणचीहि शक्ति जगांत नाहीं आणि याचे कारण अगदीं उघड आहे. माणूस ध्येयनिष्ठेनें झिजत राहिला, की त्याला पाहून लोक जागे होऊं लागतात. त्याची ध्येयनिष्ठा जसजशी कसाला लागत जाते, तसतसें त्याचें तेज वाढू लागतें व लोक त्याच्या नेतृत्वाखाली संघटित होतात आणि मग देशांत लोकशक्ति निर्माण होते. धनिक लोक पैशाच्या बळावर एरवी लोकांना वश करून ठेवीत असतात; पण चारित्र्याची पुण्याई अशी आहे कीं, तिच्यामुळे लोकांच्या मनांतील धनमोह नष्ट होऊन त्यांच्या ठायीं त्यागबुद्धि, जनहितबुद्धि, आत्मयज्ञ करण्याची वृत्ति म्हणजेच चारित्र्य निर्माण होतें आणि मग जे सामर्थ्य धनसत्तेचे गुलाम होऊन पडलेले असते, तेंच राष्ट्रसेवेच्या कारणीं लागते. म्हणून सार्वजनिक प्रपंचांत लोकसेवा करतां करतां तनमन झिजवीत स्वतः चारित्र्य ही महाशक्ति संपादन करणे व इतरांच्या ठायी ती निर्माण करणे हा एकच मार्ग भारतीय तरुणांनी यापुढे अवलंबिला पाहिजे.
या शतकाच्या आरंभी आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष असलेले थिओडोर रूझवेल्ट यांनी याच बळावर भांडवली सत्तेला नमविले. रिपब्लिकन पक्षांत प्रवेश करून प्रथम राष्ट्रीय प्रपंचांतील विशुद्ध चारित्र्याची महती ते वर्णू लागळे, तेव्हां त्या पक्षाचे मालक म्हणजे तेथील धनश्रेष्ठी त्यांना हसूं लागले. त्यांना एका बाजूला नेऊन त्यांनी पोक्तपणे उपदेश केला की, 'राजकारणांत नैतिक शुद्धि आणण्याच्या वेड्या कल्पना तूं सोडून दे. स्वतःचे कल्याण साधणे हेंच तुझें उद्दिष्ट ठेव. बहुजनांच्या कल्याणाच्या नादी लागणे व येथल्या श्रेष्ठींच्या धनाला व सत्तेला मर्यादा घालणे हा तुझा धंदा नव्हे. यांत तूं फुकट मरशील.' थिओडोरने हा उपदेश मानला नाहीं व आपली शुद्धीची मोहीम सुरू केली. न्यायखात्यांतील लांचखाऊपणा प्रथम त्यानें उघडकीस आणला. नंतर रेल्वेकारभारावर हल्ला चढविला. न्यूयॉर्कची एलिव्हेटेड रेल्वे कंपनी सर्व विधिमंडळाला लांच देण्यास तयार होती. तो डाव त्यानें हाणून पाडला. नंतर त्याने पोलीस खात्यांत प्रवेश करून घेतला व ते सर्व खाते पोलीसांच्या पितळी बटनाप्रमाणे लखलखीत करून टाकलें. हा दणका पहातांच रिपब्लिकन पक्षांतील जेठी वचकले. त्यांनी त्याला उपाध्यक्षपद देण्याचे ठरविले. अमेरिकेंत उपाध्यक्षपद हें कर्त्या पुरुषांचें थडगे आहे असे मानतात. कारण त्या आसनावर गेलेल्या माणसाचा जनतेशी संबंध रहात नाहीं व मग तो शक्तिहीन होतो. आणि म्हणूनच रिपब्लिकन जेठींनीं थिओडोर रुझवेल्ट यांना तेथे गाडून टाकण्याचा विचार केला. पण त्यांच्या दुर्दैवाने अध्यक्ष मॅकिनले यांचा एक महिन्यांतच खून होऊन रुझवेल्ट अध्यक्षपदी आले. तेथे येतांच ट्रस्टस्, वंबाइन्स्, कार्पोरेशन्स यांच्या नियंत्रणाचे कायदे करून जनतेचे बळ त्यांच्या मागें उभें करून त्यांनीं धनसत्तेला नामोहरम केलें. एवढे सांगून चरित्रकार म्हणतो कीं, या सर्व अनुभवावरून रुझवेल्ट यांच्या मनाची खात्री झाली की, व्यक्तीचे नैतिक सामर्थ्य हीच समाजाचे भवितव्य ठरविणारी निर्णायक शक्ति होय. प्रारंभी सांगितलेले मानवधन ते हेंच होय.
अध्यक्ष विड्रो विल्सन यांनी हेच धोरण पुढे चालवून धनशक्तीशीं संग्राम चालू ठेविला. त्यांच्या चारित्र्याची कीर्ति आधीच सर्वत्र पसरली होती. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षानें आपण होऊन त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून त्यांना न्यूजर्सीचं गव्हर्नरपद स्वीकारण्याची विनंति केली. ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे की धनाचे स्वामी किंवा भांडवलदार किंवा पक्षाचे पडद्यामागचे जेठी यांना जनतेला प्रिय असलेल्या चारित्र्यसंपन्न माणसांची नेहमींच आवश्यकता असते. आपली व्यभिचारकर्में लपविण्यासाठीं त्यांना कुंकवापुरता पति हवा असतो. केव्हांहि पाहिलें तरी राष्ट्रांत जागरूक जनता हीच निर्णायक शक्ति असते. या जागरूक जनतेला आपल्या पाठीशी घेण्यासाठी त्यांना असा एखादा पुरुष हवाच असतो. तो पक्षांत आला की आपल्या चौकटीत बसवून त्याला निस्तेज करून टाकावयाचें हे त्यांचे धोरण असतें. आणि हा माणूस कच्चा असला तर तेथें त्या सुखासनावर बसून आपल्या नांवाचा त्या जेठींना उपयोग करूं देतो. विड्रो विल्सनवर डेमोक्रॅटिक पक्षांतील जेठींना हाच प्रयोग करावयाचा होता; पण ह्या पुरुषाची ध्येयनिष्ठा अभंग असल्यामुळे त्यांचीच आंतडी फाडून तो बाहेर आला. पक्षाचा चालक जिमस्मिथ याच्याच डोक्यावर त्यानें पहिला घण घातला. तो निवडणुकीस उभा रहाणार होता; पण 'तूं चारित्र्यहीन व नालायक आहेस' असे सांगून विल्सननी, त्यांच्याच पक्षांत तो असूनहि, त्याला विरोध केला आणि त्याने उर्मट उत्तरें करतांच जनतेपुढे त्याच्यावर भडिमार करून त्याची हाडें मोडून टाकली. दातीं तृण घरून विल्सनपुढें त्याला शरणागति पतकरावी लागली. विल्सन हा एक शिक्षकाचा पेशा असलेला सामान्य माणूस त्यानें या तमोगुणी धनशक्तीला कशाच्या जोरावर नमविलें ! पैशाच्या जोरावर धनवंतांनी वश केलेली लोकशक्ति चारित्र्याच्या बळावर त्यानें खेचून आपल्या मागें आणली ! याच सामर्थ्याच्या जोरावर त्यांनीं आपलें श्रेष्ठ ध्येय साध्य करून घेतले. पूर्वी राजसत्ता ही ईश्वरदत्त असते असे मानीत. आतां भांडवलदारांचा तसाच समज होऊं लागला होता. भांडवलसत्ता ही ईश्वरदत्त असते हा भ्रम नष्ट करून सर्व सत्ता जनतेकडून मिळत असते हें अमेरिकेंत प्रत्यक्षांत सिद्ध करणे हे अध्यक्ष विल्सन यांचें ध्येय होते. हे ध्येय सतत डोळ्यापुढे ठेवून आपल्या चारित्र्याच्या पुण्याईनें त्यांनी ते बव्हंशी साध्य केले होतें.
फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट यांच्या चरित्राचें हेंच सार आहे. त्यांच्या पत्नी एलिनॉर या ध्येयवादी होत्या. 'दलित जनतेचा दुःखभार हलका करण्यासाठी कांहीं उपाययोजना झालीच पाहिजे आणि ती करणे हे तुमचें जीवितकार्य आहे' अशी प्रेरणा पतीला त्या नित्य देत असत. त्यांच्याहि चित्तांत या थोर कार्याचे स्फुरण झाले आणि मग लोकसेवेच्या खडतर मार्गानें रूझल्वेट यांनी प्रवास सुरू केला व अखेर शिखर गांठले. प्रारंभापासूनच स्वपक्षांतल्या श्रेष्ठींच्या विरुद्ध त्यांनी पाय रोवला होता. नवीनच उगवलेल्या या 'उपटसुंभाला' प्रथम कोणी विचारीना. पण पैशाला व अन्य मोहांना तो वश होत नाहीं असें दिसतांच ते दचकले व डोळे चोळून पाहूं लागले. त्याच्या सत्यापुढे त्यांना नमावें लागले. धनशक्तीशी उभा दावा असूनहि चार वेळां फ्रँकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊं शकले. हा महिमा त्याग, ध्येयनिष्ठा यांचाच आहे. गेल्या शतकाच्या प्रारंभी धनशक्तीशीं ज्यांनी संग्राम सुरू केला त्या जेफरसनपासून दीडशें वर्षांनी तो संग्राम त्याच निष्ठेने लढविणाऱ्या रूझवेल्टपर्यंत अमेरिकेचे हे सर्व थोर पुरुष लोकशाहीच्या यशाचें रहस्य आपणांस समजावून देत आहेत.
धनशक्ति व लोकशक्ति यांचा अमेरिकेत झालेला लढा जरा सविस्तर वर्णून त्याचें जें वर विवेचन केले त्यांत एक हेतु आहे. आपल्यापुढे आपली लोकशाही यशस्वी कशी करावी हा बिकट प्रश्न येऊन पडला आहे. त्यासाठीं मी जो उपाय सुचविणार आहे तो एरवीं विपरीत, विसंगत व असयुक्तिक वाटण्याचा संभव आहे; पण अमेरिकेतील हा लढा आपण नीट समजावून घेतला तर बहुधा तसे होणार नाहीं असें वाटते. माझ्या मते सध्यां तरुण भारतीय नागरिकांनी बहुसंख्येनें काँग्रेसमध्ये शिरणे अवश्य आहे. काँग्रेसच्या अधःपाताचें, तिच्या नीतिभ्रष्टतेचं इतके वर्णन केल्यानंतर त्याच संस्थेत प्रवेश करावयास सांगणे हे अत्यंत विपरीत असें वाटेल. व्याख्यानांत, खाजगी चर्चेत असे मीं सांगितल्यावर माझ्या अनेक मित्रांनी तशी टीकाहि केली. आणि तसे त्यांना वाटू नये, यांतील सयुक्तिकता वाचकांना दिसावी याच उद्देशाने मीं वर अमेरिकेतील थोर पुरुषांनी अवलंबिलेल्या धोरणाचें जरा सविस्तर स्पष्टीकरण केले आहे. अमेरिकेत सध्यां रिपब्लिकन व डेमोक्रॅट हे जे दोन मोठे पक्ष आहेत त्यांच्या तत्त्वांत व आचारांत सध्यां महत्त्वाचा कसलाहि फरक नाही. सन १८०० च्या सुमारास हे पक्षभेद निर्माण झाले त्यावेळी त्यांची तत्त्वे भिन्न होतीं. पण आतां तसा भेद त्यांच्यांत नाहीं. नीति किंवा अनीति, कर्तृत्व वा नालायकी, भांडवली वा राष्ट्रीय किंवा कांहींसे समाजवादी धोरण या सर्व दृष्टींनीं दोन्ही पक्ष व्यवहारतः सारखेच आहेत. आपला जो भ्रष्टतेचा, अनीतीचा विषय चालू आहे त्या दृष्टीने दोन्ही पक्ष सारखेच अधोगामी ठरले आहेत. असे असूनहि रूझवेल्ट, विल्सन या धीर पुरुषांनी त्याच पक्षांच्या संघटनांत शिरून आपल्या चारित्र्यानें त्यांची शुद्धि घडवून आणली. हेच धोरण भारतीय नागरिकांनी स्वीकारावे असे मला वाटते. पंडितजी सध्या तरुणांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून साद घालीत आहेत. काँग्रेसच्या अनीतिमुळे, धनवंतांचें तिनें जें दास्य पतकरले आहे त्यामुळे, तिच्या कार्यकर्त्यांत सध्यां ज्या दुफळ्या होत आहेत, जी विघटना चालू आहे त्यांमुळे या संस्थेत आपल्याला वाव नाहीं असे तरुणांना वाटते. आणि तसे वाटणे एकपरीने साहजिकच आहे. पण तसा वाव आहे म्हणून तरुणांनीं, नव्या दमाच्या पिढीनें काँग्रेसमध्ये जावे असे मला म्हणावयाचें नसून रूझवेल्ट विल्सन यांच्याप्रमाणे आंत शिरून तिची शुद्धि करून स्वतःला अवसर प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे माझे सांगणे आहे. ही गोष्ट सोपी नाहीं हें खरें. नवे लोक असें कांहीं करूं लागतांच शिस्तीच्या नांवाखाली काँग्रेसश्रेष्ठी व त्यांच्यामागचे सूत्रधार त्यांना हाकलून देतील यांत शंकाच नाहीं. पण याच वेळी या तरुणांनी संग्राम केला पाहिजे. तो झालेला अन्याय जनतेपुढे मांडून ती शक्ति आपल्यामागें खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांत एक बळी जाईल, दुसरा जाईल, अनेक जातील पण या लढ्यांतूनच लोकशक्ति धनवंतांच्याकडून आपल्याकडे खेचण्याचे सामर्थ्य नव्या कार्यकर्त्यांना प्राप्त होईल. मात्र हे करीत असतांना त्यांनी लोकसेवेचे खडतर व्रत चालू ठेवले पाहिजे. त्यांतच त्यांचे चारित्र्य प्रखर होत जाईल आणि धनशक्तीवर मात करून काँग्रेसचें पुनरुज्जीवन त्यांना करता येईल. ब्रिटिश सरकारशी लढा चालू असतांना आपल्याला कार्य करण्यास वाव आहे की नाहीं या विचाराने त्यावेळचे नेते व कार्यकर्ते आडून बसले नाहींत, तर आत्मबलिदानाचा निश्चय करून त्यांनी आपल्या पराक्रमाला क्षेत्र निर्माण केले. एकामागून एक त्यावेळी मागल्या पिढीचे धुरीण बळी जाऊं लागतांच जनता जागृत झाली व तिच्यांतून एक नवी शक्ति निर्माण झाली. आणि तिच्यापुढे ब्रिटिश सरकारलाहि नमावे लागले. म्हणून तेच धोरण तेथील तमोगुणी शक्तीशी संग्राम करण्याच्या काम नव्या पिढीनें अवलंबिले पाहिजे,
काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे आग्रहाने सांगण्याचें कारण असे कीं, ती एक फार मोठी पुण्याई आहे. आजचे काँग्रेसचे अनुयायी नीतिभ्रष्ट असले तरी ते म्हणजे काँग्रेस नव्हे. अशा स्थितींतही ते देशाच्या अधिकारपदावर राहूं शकतात तेहि काँग्रेसच्या पूर्वपुण्याईच्या जोरावरच. हें पुण्याईचं सामर्थ्य त्यांच्यामागून काढून आपल्यामागें खेचण्याचें कार्य नव्या नागरिकांनी केले पाहिजे. यामुळे दोन कार्ये साधतील. सध्यांचें भ्रष्ट अधिकारी हतप्रभ होतील व नव्या पिढीला पूर्व संचिताचे बळ प्राप्त होईल. थिओडोर रूझवेल्ट यांनीं रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेचा असाच उपयोग केला. विड्रो विल्सन व फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी डेमाक्रॅटिक पक्षाची पुण्याई अशीच उपयोगांत आणली. १९१४ साल लोकमान्य टिळक तुरुंगांतून सुटून आले तेव्हां काँग्रेसचे नेते अगदीं सरकारधार्जिणे व भीरु वृत्तांचे होते. त्यांच्या हाती सध्यांच्या श्रेष्ठीप्रमाणेच काँग्रेसची सूत्रे होतीं तरी त्याच काँग्रेसमध्ये टिळक शिरले व त्यावेळच्या नेत्यांना आपल्या चारित्र्याच्या बळावर उधळून देऊन त्यांनी काँग्रेस आपल्या ताब्यांत घेतली. हेंच धोरण आपण पुढे चालू ठेविले पाहिजे. नाहींतर फ्रान्ससारखे येथें अनंत पक्ष निर्माण होतील आणि स्थिर शासन निर्माण करणे आपल्याला अशक्य होऊन बसेल. म्हणून मला नव्या पिढीच्या तरुण नागरिकांना अट्टाहासाने असे सांगावेसे वाटते की पंडितजींच्या हांकेला प्रतिसाद देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये शिरावें व आपल्या चारित्र्यबळाने तिला पूर्वीचें उज्जवल रूप प्राप्त करून द्यावे.
१५ ऑगस्ट १९५२ या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानें अध्यक्ष राजेंद्रबाबू यांनी जे भाषण केले त्यांत एकच संदेश होता. 'चारित्र्य संपादन करा.' खरोखर या एकाच संदेशाची भारताला जरूर आहे. आपण माणूस म्हणूनच कमी पडत आहे. सार्वजनिक नीतिमत्ता, कार्यक्षमता, उद्योगशीलता, उत्तरदायित्व, दक्षता, समाजहितबुद्धि या गुणांच्या दृष्टीनें जपानी माणूस, इंग्लिश माणूस, अमेरिकन माणूस हा हिंदी माणसापेक्षा पुष्कळच उंच पदवीवर आहे. ती उंच पदवी हेच चारित्र्य. जमिनीची मशागत करून तिचा कस वाढविण्याचे या देशांत जसे प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत करून त्याचा कस आपण वाढविला पाहिजे. तो वाढला तर लोकशाहीला अवश्य ती साधनसामुग्री व समृद्धि आपणांस उपलब्ध होऊन राममोहनरायांच्यापासून टिळक, महात्माजी, सुभाषचंद्र यांच्यापर्यंत अनेक विभूतींनी ज्या एकाच ध्येयासाठी आयुष्य वेचलें तें ध्येय साध्य होईल.
आज जग एका क्रान्तिरेषेवर उभे आहे. त्या रेषेच्या कोणच्या बाजूला त्याचें पाऊल पडेल, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. आणि हे भवितव्य ठरविणे भारतीयांच्या हाती आहे. आजपर्यंतच्या इतिहासांत जगाचें भवितव्य ठरविण्याचा हा मान कालपुरुषाने असा एकट्या एक देशाच्या हात कधी दिला नसेल. भारताला आज तो प्राप्त झाला आहे. त्या सन्मानाला आपण पात्र आहोत की नाहीं है मात्र ठरावयाचे आहे. कालपुरुषानें एक असामान्य जबाबदारी आपल्या शिरावर टाकून आपली सत्त्वपरीक्षाच चालविली आहे.
जगांत आज लोकायत्त शासनानें आपलें राजकारण चालविणारी, लोकशाहीवर खरी श्रद्धा असणारी दोनच राष्ट्रे आहेत. ब्रिटन व अमेरिका.