भारतीय लोकसत्ता/सामाजिक पुनर्घटना

आपल्याला यश आलें हेच आपले भाग्य आहे, हे म्हणणे त्यांना पटू लागेल. अशा स्थितींत या थोर पुण्याईवर किंचित् काळ आलेले मालिन्य पाहून त्यांनी तिच्या प्रभावी सामर्थ्याचा विसर पडूं देऊं नये. त्यांत आत्मघात आहे. लोकशाही यशस्वी होण्यास स्थिरशासन, परचक्रापासून संरक्षण व अंतर्गत शांतता यांची जरूर असते. गेल्या शंभर दीडशे वर्षांत ज्यांनीं ज्यांनीं लोकसत्तेचे प्रयोग केले त्यांच्यापैकी एकालाहि हें सिद्ध करतां आलें नाहीं. काँग्रेसच्या म्हणजे दादाभाई, रानडे, गोखले, टिळक, महात्माजी, सुभाषचंद्र, मालवीय, मोतीलाल, लजपतराय यांच्या आणि त्याचप्रमाणे राममोहन, लोकहितवादी, ज्योतिबा फुले, विष्णुशास्त्री, आगरकर, विवेकानंद यांच्या पुण्याईनें हें या देशांत सिद्ध झाले आहे. राष्ट्रपति राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलालजी, सरदार वल्लभभाई यांच्या कर्तबगारीने ते अजून टिकून राहिले आहे. लोकशाही सिद्ध करण्यास ही एक अपूर्व संधि आपणांस लाभली आहे. अशा वेळी काँग्रेसमध्ये शिरून या महान् प्रयोगांत या देशांतील तरुण कार्यकर्ते सामील होतील, व ध्येयनिष्ठा, चारित्र्य व त्याग या धनाची पुन्हां समृद्धि करतील, तरच औद्योगिक पुनर्घटना, राष्ट्रीयीकरण, आर्थिक समता इ. या भूमीची स्वप्न साकार होतील. काँग्रेस अधोगामी आहे, नीतिभ्रष्ट आहे असे म्हणून आपण दूर उभे राहिलो तर हा प्रयोग अयशस्वी होण्याची सर्व जबाबदारी आपल्यावरच येईल, हे तरुणांनी विसरू नये.



प्रकरण बारावें
सामाजिक पुनर्घटना
ब्राह्मणब्राह्मणेतर वाद
(१)

 लोकसत्ता ज्या समाजांत यशस्वी व्हावयाची तो समाज संघटित, अभग्न, एकसंध असा असणे अवश्य आहे. त्या समानांत अनेक भिन्न घटक असले तरी आपण सर्व मिळून एक समाज आहे अशी भावना त्या सर्वांच्या मनांत नांदत असली पाहिजे. धर्म, वर्ण, जाति, पंथ, प्रांत इ. अनेक कारणांनी प्रत्येक समाजांत अनेक भिन्न गट झालेले असतात. ऐतिहासिक कालांत त्यांच्यांत उच्चनीच, जित-जेते अशा प्रकारच्या भेदांनीं शत्रुत्व निर्माण झालेले असते. अनेक कारणांनी निर्माण झालेल्या व पोसलेल्या या भेदभावना समूळ नष्ट करून समाजाच्या सर्व घटकांत आपण सर्व एकाच समाजवृक्षाच्या भिन्न शाखा आहों, आपण सर्व एकच आहों अशी भावना दृढमूल करण्यांत समाजाच्या नेत्यांना ज्या मानानें यश येईल त्या मानाने लोकसत्ता यशस्वी होईल. संस्कृतीचा प्रसार, शिक्षण, राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रांतील समता, सम आकांक्षा, सम ध्येयभावना इ. अनेक बंधनांनी भिन्न समाज एकरूप होतात. पण पुष्कळ वेळां हीं सर्व ऐक्यकारणे असूनहि 'आम्ही भिन्नच आहों' असा आग्रह भिन्न गटांत टिकून राहतो. तसें झाल्यास हे आग्रह लोकशाहीला मारक होतील. म्हणून समाजाच्या भिन्न घटकांतील भेदभावना नष्ट करून त्यांचे भिन्न अहंकार एकरूप करून टाकणें लोकसत्तेला अत्यंत अवश्य आहे. दृढ व अभंग ऐक्य हा लोकसत्तेचा पाया आहे. कोणच्याहि देशांत अशा ऐक्यावांचून लोकसत्ता यशस्वी झालेली नाहीं व होणार नाहीं.
 या दृष्टीनें भारतीय समाजांतील भिन्न घटकांचा आतां विचार करावयाचा आहे. पाश्चात्यांचे राज्य या भूमींत येण्यापूर्वी हा समाज अनंत भेदभावनांनीं छिन्नभिन्न झालेला होता. आणि अत्यंत दुःखाची गोष्ट ही कीं, तसा तो रहावा हेंच तत्त्वज्ञान या समाजाने शेकडों वर्षे अंगीकृत केले होते. पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होऊं लागतांच येथील समाज-धुरीणांना याची जाणीव होऊन प्रथम ते घातक तत्त्वज्ञान नष्ट करण्याचा उद्योग त्यांनी हातीं घेतला. त्यांच्या त्या प्रयत्नांचें गेल्या अनेक प्रकरणांतून विवेचन केले आहे. आतां गेलीं शंभर सवारों वर्षे चालू असलेल्या या प्रयत्नांच्या यशाचं मापन व मीमांसा करावयाची आहे. त्या प्रयत्नांचें एक महान् फल म्हणजे स्वातंत्र्य है आपल्या पदरांत पडलें आहे. पण त्यांच्या साह्यानें आपला समाज एकसंध, एकजीव व अभंग करून येथील लोकसत्ता यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपली किती प्रगति झाली आहे त्याचा विचार झाला पाहिजे. आपल्या समाजांत राजकीय व आर्थिक कारणांनी निर्माण झालेल्या भेदांचा व विघटनेच्या कारणांचा विचार आपण गेल्या दोन लेखांत केला आहे. आतां सामाजिक व धार्मिक कारणांनी निर्माण झालेल्या विघटनेचा विचार करावयाचा आहे.

तीन भेद

 ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य व हिंदुमुसलमान हे प्रमुख भेद या क्षेत्रांत येतात. या भेदांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न या भूमींत अखंड चालू आहेत. ते यशस्वी होत आहेत, पुष्कळ अंशी झाले आहेत असे कधीं कधीं वाटते. पण कधीं असे प्रसंग, अशा घटना घडतात की या भेदभावनांना पहिल्यापेक्षांहि उग्र रूप येत आहे की काय अशी शंका येऊं लागते. म्हणूनच यांचा फार खोलवर विचार करणे अवश्य आहे. या भेदांतून निर्माण होणारा दूरीभाव, तज्जन्य कटुता व त्यांतून कधीं कधीं निर्माण होणारे कलह हे नाहींसे झाल्यावांचून भारतीय समाज एकसंघ व अभंग होणार नाहीं. आणि तसें झाल्यावांचून भारताची लोकसत्ता यशस्वी होण्याची आशा धरतां येणार नाहीं.
 वर उल्लेखिलेल्या तीन भेदांपैकीं, ब्राह्मणब्राह्मणेतर या भेदाचा विचार प्रथम करावयाचा आहे. नर्मदेच्या दक्षिणेस ब्राह्मण ब्राह्मणेतरवादानें निर्माण झालेली कटुता मध्यंतरी अगदी विकोपाला गेली होती. आणि आजही हा वाद शमल्यासारखा दिसत असला तरी उभय पक्षीयांच्या मनांतील परस्पराविषयींचे दंश कमी झाले आहेत, असे म्हणण्यास फारशी जागा आहे, असें वाटत नाहीं. तेव्हां ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यांतील या भेदाचीं मूलकारणे तपासून त्यांचे निर्मूलन करून त्यांच्यांत समभूमि निर्माण होण्याची शक्यता कितपत आहे हे पाहिले पाहिजे.
 महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यापासून म्हणजे म्हणजे जवळजवळ गेलीं पाऊणशे वर्षे महाराष्ट्रांत हा वाद धुमसत आहे. कोल्हापुरास शाहू छत्रपति यांना अधिकारसूत्रे प्राप्त झाल्यापासून म्हणजे या शतकाच्या आरंभापासून या वादाला जास्तच तीव्रता येऊं लागली. आणि १९२० सालीं ब्राह्मणेतरांची प्रत्यक्ष चळवळ सुरूं झाली, तेव्हां या वादाच्या ज्वाळा खूपच भडकल्या. मद्रासमध्ये साधारण याच कालखंडांत हा वाद उद्भवला व पोसला आहे. डॉ. नायर यांच्या ब्राह्मणेतर पक्षांचें नांव जस्टिसपार्टी असे होते. माँटेग्युचेम्सफर्ड यांनी राजकीय सुधारणांचा नवा हप्ता देऊं करतांच महाराष्ट्रांत ह्या वादाला उग्र रूप आले; त्याचप्रमाणे मद्रास प्रांतांतहि त्याच वेळी व त्याच कारणानें यानें उग्ररूप धारण केले. या पाऊणशे वर्षांच्या काळांत अनेक ब्राह्मणेतर पंडितांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या पुस्तकांतून आपली भूमिका विशद केली आहे. या वादाचें विवेचन करण्यासाठी त्या पुस्तकांतून ती त्यांची भूमिका समजावून घेणे अगत्याचें आहे. ज्योतिबा फुले यांनी 'गुलामगिरी' या आपल्या पुस्तकांत आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली आहे. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांचा 'दि मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम' या नांवाचा ग्रंथ याच हेतूनें लिहिलेला आहे. स्वामी मूळचे मलबारचे मोठे कार्यकर्ते होते. पुढे लाहोरच्या हिंदु मिशनरी सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी आपला ग्रंथ १९४१ साली प्रसिद्ध केला. महात्मा फुले यांच्या व स्वामींच्या मतांत पुष्कळसे साम्य आहे. फरक एवढाच की, फुले यांनी नुसतीं विधानें केलीं आहेत, मतें मांडली आहेत तर स्वामींनी अर्वाचीन पांडित्याच्या सर्व साधनांनी आपला ग्रंथ भूषविला आहे. प्रा. अण्णा बाबाजी लठ्ठे यांनी कोल्हापूरचे राजर्षि शाहू छत्रपति यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांत त्यांनी या वादाची सांगोपांग चर्चा केली आहे. छत्रपति शाहू ब्राह्मणेतर चळवळीचे अध्वर्यु असल्यामुळे हा ग्रंथ प्रमाणभूत मानण्यास हरकत नाहीं. 'ब्रिटिश साम्राज्याचा उदय' हें लठ्ठे यांचे दुसरे छोटेसें पुस्तक आहे, त्यावरूनहि ब्राह्मणेतरांच्या भूमिकेची कल्पना येते. नागपूरचे काशीराव बापूजी देशमुख यांनीं 'क्षत्रियांचा इतिहास' या ग्रंथाच्या तीन खंडांत ऐतिहासिक व तात्त्विक चर्चा करून ब्राह्मणेतर पक्षांचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. डॉ. आंबडेकर यांनी 'हू वेअर दि शूद्राज' हा ग्रंथ अलीकडेच लिहिला आहे. त्यांत एका क्षत्रिय शाखेच्या ऱ्हासाचीच मीमांसा असल्याने त्यांतूनहि या विषयावर बराच प्रकाश पडतो. श्री. रा. केशव सीताराम ठाकरे- प्रबोधनकार हे थोर लेखक व संपादक महाराष्ट्रांत विश्रुत आहेत. 'कोदण्डाचे टणत्कार,' 'संस्कृतीचा संग्राम' व 'शेतकऱ्यांचें स्वराज्य' या त्यांच्या पुस्तकांत त्यांनीं ब्राह्मणब्राह्मणेतर या विषयाबद्दल आपले विचार आपल्या अत्यंत सडेतोड पद्धतीने सांगितलेले आहेत. ब्राह्मणेतरांची भूमिका विशद करण्यासाठी आधारभूत म्हणून घेतलेले मुख्य असे हे ग्रंथ आहेत. यांतील ठाकरे यांची पुस्तकें जरा निराळ्या कोटीतील आहेत. त्यांची विचारसरणी इतरांच्यापेक्षां जरा जास्त व्यापक, थोडी जास्त उदार व इतरांच्याबरोबर स्वतःच्या दोषांचीहि कसून तपासणी करणारी अशी आहे. वरील इतर ग्रंथांविषयीं पुढें जी विधानें केली आहेत तीं कोठें कोठें त्यांच्या पुस्तकांना लागू पडणार नाहींत.

ब्राह्मणांचें चित्र

 या सर्व ग्रंथांवरून ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका पाहूं लागतांच या थोर पंडितांच्या मनांत अगदीं अग्रभागी असलेला जो पहिला सिद्धान्त आपणांस दिसून येतो तो हा की, वेदकालापासून आज १९५४ सालपर्यंत गेल्या सहासात हजार वर्षांच्या काळांत हिंदुस्थानावर जेवढे अनर्थ कोसळले, ज्या आपत्ति ओढवल्या, विनाशाचे ने प्रसंग गुदरले, येथें धार्मिक, सामाजिक, राजकीय- कोणच्याहि क्षेत्रांत जी अवनति झाली त्या सर्वाला येथले ब्राह्मण कारणीभूत आहेत. या लेखकांत कांहीं मतभेद आहेत. कांही विरोधी मतें यांनी सांगितली आहेत; पण ब्राह्मण हा दुष्ट, कारस्थानी, स्वार्थी, अधम, नीच, स्वजनद्रोही, स्वदेशद्रोही, धर्महीन, ध्येयहीन, तत्त्वशून्य, केवळ संधिसाधू, हृदयशून्य असा आहे- हजारों वर्षे असा आहे आणि अजूनहि त्याच्यांत फरक झालेला नाहीं, याबद्दल कोणाच्याहि मनांत शंका नाहीं. याबद्दल त्यांच्यांत मतभेद नाहीं. 'आज तीन हजार वर्षे भटांचे राज्य चालू आहे. त्यांत शूद्र व अतिशूद्र यांचे हाल होत आहेत. भट लोकांनी येथल्या लोकांना ज्ञानहीन केलें, स्वतः खोटे ग्रंथ लिहून शूद्रांस फसविले.' अशीं महात्मा फुले यांचीं मतें आहेत. (गुलामगिरी- प्रस्तावना) 'प्रारंभीच्या आर्यकाळापासून तहत आजपर्यंत भिक्षुकशाहीनें स्वतःच्या फाजील वर्चस्वाकरितां व स्वार्थाकरितां क्षत्रियांशीं व देशाशी निमकहरामी केली व द्वेषबुद्धीची विषारी कारस्थानें केलीं.', 'शंकराचार्यानें भेदप्रधान भिक्षुकी हिंदुधर्माच्या नांवाखालीं आखिल ब्राह्मणेतर जनतेला ब्राह्मणांचे गुलाम बनविलें व क्षत्रियांवर भिक्षुकी श्रेष्ठत्वाचा बोळा फिरवून व जातीभेद उत्पन्न करून हिंदी राष्ट्र रसातळास नेले.' असा अभिप्राय काशीराव देशमुख यांनी दिला आहे. (क्षत्रियांचा इतिहास, खंड १ ला, पृ. २४८- २५०) 'वास्तविक पाहिले तर मनाचा उदारपणा आजपर्यंत ब्राह्मणांनी कधींहि कोठेंहि दाखविलेला नाहीं. संकुचित वृत्ति हेच त्यांचें ब्रीद. उदार वृत्ति व मनाचा मोकळेपणा हा क्षत्रियांचाच मनोधर्म.' (संस्कृतींचा संग्राम- ठाकरे पृ. ३६.) 'सामान्य नियमाला अपवाद असतात हे तत्त्व लक्षांत ठेवून अर्से म्हणावयास हरकत नाहीं कीं, ब्राह्मण- मग तो चित्पावन असो, यजुर्वेदी असो किंवा कोणीहि असो, त्याच्या आपमतलबाला किंचित् धक्का लागण्याची वेळ आली कीं तो सर्व देशबंधुत्वाचे नाते विसरून ब्राह्मणेतरांवर सापाप्रमाणे उलटण्यास कमी करणार नाही' (कोदंडाचे टणत्कार - पृ. १३७.) अशा तऱ्हेचीं श्री. ठाकरे यांची मतें सुप्रसिद्धच आहेत. स्वामी धर्मतीर्थजी महाराज, प्रा. लठ्ठे, डॉ. आंबेडकर यांनी याच तऱ्हेचीं मतें मांडलेली आहेत.
 वरील अवतरणे ब्राह्मणेतर ब्राह्मणांची भयंकर निंदा करतात अशी तक्रार करण्यासाठी दिलेली नाहींत. तशी तक्रार करण्याचा, किंवा या विधानाबद्दल संताप येण्याचा अधिकार ब्राह्मणांना मुळींच नाहीं. याच पापानें त्यांचेहि हात धुतलेले आहेत. 'कलियुगांत क्षत्रियच नाहींत, फक्त ब्राह्मण व शूद्रच आहेत' हें मत ब्राह्मण शेकडो वर्षे कवटाळून बसले होते. अनेक थोर क्षत्रिय वंश भारताच्या रक्षणाचें व प्रजापालनाचें कार्य करीत असल्याचें डोळ्यास दिसत असूनहि त्या सर्वांना शूद्र लेखणाऱ्या ब्राह्मणांच्या ठायीं समाजहितदृष्टि कितपत असेल ते दिसतंच आहे. अर्वाचीन काळांतहि राजवाड्यांच्या सारख्या पंडिताला एकाद्या सामान्य चिटोऱ्याच्या आधारे सर्व कायस्थ प्रभूंची निंदा करण्यास दिक्कत वाटत नाहीं. तेव्हां दुसऱ्या सर्व जातींबद्दल अत्यंत हीन उद्गार काढणे हे आपल्या सर्वसमाजाच्या पिंडांतच आहे. ब्राह्मणांना तर याविषयीं राग येऊं देण्याचा काडीमात्र अधिकार नाहीं. यामुळे त्या हेतूनें हीं अवतरणें दिलेलींच नाहींत. यांत ब्राह्मणांविषयीं प्रगट केलेलीं मतें व पुढे दिलेला तपशील यांतून क्षत्रिय, वैश्य व इतर ब्राह्मणेतर यांच्याबद्दल जो अभिप्राय प्रगट होतो त्याच्याकडे मला वाचकांचे लक्ष वेधावयाचे आहे.

क्षत्रियांत दुही माजविली

 या सर्व ब्राह्मणेतर पंडितांच्या मतें आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठीं ब्राह्मणांनी जे अनर्थ घडवून आणले त्यांतील पहिला मोठा अनर्थ हा की ब्राह्मणांनीं क्षत्रियाक्षत्रियांत प्रत्येक वेळी दुही माजविली व त्यांच्यांत आपसांत युद्धे घडवून आणून अखिल क्षत्रिय समाजाचा नाश करून टाकला. राम-रावण, कंस-कृष्ण, कौरव-पांडव हे सर्व ज्योतिबा फुले यांच्या मतें देवभोळे क्षेत्रपति होते. ब्राह्मणांनीं त्यांच्यांत तंटे माजवून त्यांचा नाश केला. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांचा असाच आरोप आहे. त्यांच्या मतें ब्राह्मणांनी कौरवपांडवांपासून आजच्या काँग्रेसच्या संघटनेपर्यंत हेच धोरण कायम ठेविले आहे. कौरवपांडवांत युद्ध घडवून त्यांचा नाश ब्राह्मणांनी केला; दशरथ व रामचंद्र यांच्यांत वितुष्ट आणून रामाला देण्यास दशरथास भाग पाडलें; इतकेच नव्हे तर पुढे सीतेशी घटस्फोट घेणे ब्राह्मणांनींच रामाला भाग पाडिलें. सीता जनकाची मुलगी आणि जनक ब्राह्मणविरोधी ! म्हणून त्यांनी हा सूड घेतला. स्वामी म्हणतात, 'अगोदरच ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे रामाचे जीवित उत्सन्न झालेले होते. म्हणून त्यांच्याशीं पुन्हां विरोध नको या बुद्धीनें रामानें आपल्या मनाविरुद्ध सीतेचा बळी दिला.' (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ६१-६७) बौद्ध धर्मातहि ब्राह्मणांनीच फूट पाडली. ब्राह्मण स्वत: बौद्धधर्मांत शिरले व सूक्ष्म कारस्थानें करून, आपल्या दुष्ट बुद्धिसामर्थ्याचा उपयोग करून, ब्राह्मणांनीं तो धर्म रसातळास नेला. कारण, स्वामींच्या मतें, तो धर्म समतावादी असून खऱ्या अर्थाने राष्ट्रीयधर्म होता. (पृ. ८१ ते ८७) बुद्धधर्माचे हिंदुस्थानावर चवदाशे वर्षे वर्चस्व होते असेहि स्वामींचें मत आहेच. क्षत्रियांत फूट पाडून त्यांचा नाश घडविणे हें व्रत ब्राह्मणांनी पुढेहि चालविले होतें. कौटिल्य नांवाच्या ब्राह्मणानें चंद्रगुप्ताकरवीं शिकंदराला बोलाविले. मगधाचा त्याला नाश करावयाचा होता. पण शिकंदर परत गेला. तेव्हां त्यानें चंद्रगुप्ताकरवीं नंदकुलाचा नाश करविला. पुढे त्याचा नातू अशोक हा बौद्धधर्माचा पुरस्कार करू लागला तेव्हां ब्राह्मणांनी पुष्यमित्राकडून त्याच्या वंशाचा नाश करविला. प्रा. आण्णा बाबाजी लठ्ठे यांचे याचप्रकारचे मत आहे. सातारा व कोल्हापूर या भोसल्यांच्या दोन शाखांत वैर धुमसत ठेवण्याचे कार्य पेशव्यांनी केले. येवढी मोठी दुफळी घडवून आणण्यापासून पुण्याला १९२० सालीं भवानी पेठेंत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी घेतलेल्या सभेंत व पुणे म्युनिसिपालिटीत १९२५ साली महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी भरलेल्या सभेंत ब्राह्मणेतरांत फूट पाडून कलागत लावून देण्याच्या लहान फाटाफुटीपर्यंत आणि वेद कालापासून तहत आजपर्यंत ब्राह्मण हा क्षत्रियांत फूट पाडून त्यांचा नाश घडवीत आहे असें ब्राह्मणेतर पक्षाच्या पंडितांचं मत आहे.
 ब्राह्मणेतर पक्षानें ही जी भूमिका स्वीकारली आहे तिचा नव्या तरुण ब्राह्मणेतरांनी शांतपणे विवेकाने विचार करावा अशी माझी त्यांना विनंति आहे. या भूमिकेमुळे ब्राह्मणांवर किती अन्याय होतो किंवा ऐतिहासिक सत्याचा किती अपलाप होतो या दृष्टीने विचार करावा असे माझे सांगणे नाहीं, विचार अशा दृष्टीने करावा कीं, ही भूमिका पत्करली तर हिंदुस्थानांत अत्यंत पराक्रमी, धीमान्, प्रज्ञावंत, असा जो क्षत्रियवर्ग व श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, चंद्रगुप्त, शिवछत्रपति यांसारखे जे त्यांतून निर्माण झालेले भारताचे महापुरुष त्यांच्याविषयी काय अभिप्राय प्रगट होतो ? ब्राह्मणांवर निंदेचा भडिमार करतांना या ब्राह्मणेतर लेखकांनीं क्षत्रिय व एकंदर ब्राह्मणेतर जनता यांना कोणच्या पातळीवर आणून सोडलें आहे याचा विचार ब्राह्मणेतर तरुणांनी करावा. कौरव, पांडव, श्रीकृष्ण, रामचंद्र, चंद्रगुप्त, हे महापुरुष दुसऱ्याने ज्यांना सहज फसवावें, भरीं घालावें, चिथावून द्यावें, आणि हा आपणांस फसवीत आहे हे ज्यांना कळू नये असे होते काय ? ब्राह्मणांनीं चिथावल्यामुळे कौरवपांडवांचें युद्ध जुंपले असते तर ते थांबविण्याची संधि शेवटी आली होती. अर्जुन 'मी लढत नाहीं' असे म्हणत होता. त्यावेळी श्रीकृष्णाला तो अनर्थ सहज टाळता आला असता. का श्रीकृष्णालाहि ब्राह्मणांचे कारस्थान कळण्याइतकी बुद्धि नव्हती ? आणि त्यानें गीता सांगितली ती स्वतःच्या प्रेरणेनें नव्हे काय ? तिच्यामुळे शेवटीं लढाईची प्रेरणा मिळाली. तेव्हां तीहि स्वतःच्या मनांत नसतांना ब्राह्मणांच्या आग्रहाला बळी पडून कृष्णाने अर्जुनाला सांगितली काय ? सर्व अनर्थाला कारण ब्राह्मण झाले, आपल्यावर मुळींच जबाबदारी नाही, अशी भूमिका ब्राह्मणेतरांना घ्यावयाची आहे, पण ती घेतांना आपण दुसरे काय पत्करीत आहोत याचा ते विचार करीत नाहींत असे वाटतें. क्षत्रियाला स्वतःची बुद्धि नाहीं, निश्चय नाहीं, अवलोक नाहीं ही बैठक ते पत्करीत आहेत. ब्राह्मण म्हणाले, लढा– लढले. ते म्हणाले, राणीला हाकलून द्या- दिली. मुलाला वनवासांत पाठवा-- पाठविला. असें म्हणण्यांत क्षत्रियांची केवढी मानहानि आहे ! आणि नुसती मानहानि नाहीं. क्षत्रियांच्या थोर चारित्र्यावर याने बोळा फिरविला जातो. रामचंद्राने अत्यंत उदात्त ध्येयानें सीतेचा त्याग केला होता. अशाच उदात्त धर्मकल्पनेने तो पित्राज्ञा मानून वनवासांत गेला होता. आणि रामाचें रामत्व सर्व यांत आहे. त्याच्या व्यावहारिक युक्तायुक्ततेबद्दल कितीहि मतभेद असला तरी त्याची भव्योदात्त ध्येयनिष्ठा ही अमान्य करतां येणार नाही. पण ब्राह्मणांच्या जुलमामुळे दशरथानें त्याला हाकलले व तो गेला, आणि सीतेलाहि त्यानें ब्राह्मणांच्या जुलमामुळे दूर केले असा त्याच्या कृत्याचा अर्थ बसविला तर त्यांत ब्राह्मणांवर भडिमार करण्याचे श्रेय जरी मिळाले तरी रामचंद्राला व एकंदर क्षत्रियवर्गाला आपण कोणत्या पातळीवर आणून ठेवीत आहोत याचा विचार ब्राह्मणेतर पंडितांनी केला पाहिजे.

जातिभेद निर्माण केले

 ब्राह्मणांनी जातीभेद निर्माण केले, समानांत उच्चनीचता प्रसृत केली आणि हिंदुसमाजांत पराकाष्ठेची विषमता रूढ केली हा दुसरा अनर्थ होय. ब्राह्मणांच्या माथीं हें जातिभेदाचें अपश्रेय ठेवतांनाहि ब्राह्मणेतर पंडितांनीं वरील प्रकारच्या कोटिक्रमाचाच अवलंब केला आहे. आणि त्यामुळे क्षत्रिय राजवंशाची वरीलप्रमाणेच विचित्र अवस्था होत आहे. काशीराव देशमुख यांनीं क्षत्रियांच्या इतिहासांत जातिभेद निर्मितीचें पुढीलप्रमाणे वर्णन केलें आहे. जातिभेदाचा विषम धर्म शंकराचार्याने निर्माण केला. त्यापूर्वी वैदिक धर्म व आर्य धर्म हे समतेचे धर्म होते; पण आपले वर्चस्व त्यांत प्रस्थापित होत नाहीं म्हणून ब्राह्मणांनीं जातिभेदाचा धर्म केला. त्याला राजाश्रय पाहिजे म्हणून शंकराचार्य अबूचे प्रमार क्षत्रिय राजे यांच्याकडे गेला. व माझा हा धर्म तुम्ही प्रस्थापित करा अशी त्यानें प्रार्थना केली. क्षत्रिय हे जात्याच उदार. त्यांचें अंतःकरण फुलासारखे नाजुक. त्यामुळे या ब्राह्मणाची दया येऊन त्यांनी त्याचा धर्म प्रस्थापित करण्याचे मान्य केले. मग त्यांनी प्रतिहार, चालुक्य, चव्हाण यांना नव्या हिंदुधर्माच्या प्रसाराची कल्पना सांगितली. त्यांना हे मान्य नव्हते. पण प्रमार फार मोठे असल्यामुळे त्यांना विरोध करण्याची हिंमत कोणाला झाली नाहीं. मग त्यांनी बौद्धधर्मीयांचा पाडाव करून त्या धर्माचा धुव्वा उडविला. हा जो नवा हिंदुधर्म त्यानेंच हिंदुस्थानचा नाश झाला. याच्या प्रसाराचा पहिला आशीर्वाद प्रमार, प्रतीहार, चालुक्य, चव्हाण आदि क्षत्रिय कुलोत्पन्न राजांनी दिला होता. हें सांगून देशमुख म्हणतात 'ही गोष्ट क्षत्रियांच्या उदारतेची व धर्मस्थापक वृत्तीची साक्ष पटवीत आहे. क्षत्रिय वृत्ति व क्षात्र तेज आणि ब्राह्मणी वृत्ति व भिक्षुकी भावना यांतील महदंतर तिच्यावरून दृष्टोत्पत्तीस येतें.' (क्षत्रियांचा इतिहास खंड १ ला. पृ. १०२ - १०७)
 स्वामी धर्मतीर्थजी यांनी अशाच प्रकारची मीमांसा केली आहे. आर्य धर्मांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीं ब्राह्मणांनी आपली निराळी जात केली व नंतर सर्वच समाजांत त्यांनी उच्चनीचता रूढ केली. या कामीं कांहीं क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांना साह्य केले हें स्वामींना मान्य आहे. (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ४५-४६) पुढें बौद्धधर्मानें समतेचा पुकारा केला. त्यावेळी ब्राह्मण त्या धर्मात शिरले व त्यांनी तेथेंहि जातिभेद रूढ करून त्या धर्माचा विनाश घडवून आणला. या ठिकाण अशी शंका येईल की बौद्ध धर्मगुरु व बौद्ध धर्मीय राजे या वेळी काय करीत होते ? स्वामीजींचे उत्तर असें की त्यांनीं उदारपणाने ब्राह्मणांच्या या जातिभेदाकडे दुर्लक्ष केले. (पृ. १२७) एके ठिकाणी तर स्वामीजींनी असें म्हटले आहे कीं स्वतः गौतमबुद्ध ब्राह्मणांचा पक्षपात करीत असे. तो त्यांच्याबद्दलच्या आदरानें नव्हे तर भीतीनें ! (पृ. १०२) त्यांच्यामते त्या काळच्या सर्व राजांना ब्राह्मणांची दहशत वाटे. (पृ. १०६) जो राजा ब्राह्मणधर्माचा पुरस्कार करणार नाही त्याच्या राज्यावर ब्राह्मण संकटे आणीत. बौद्ध राजा गादीवर आला की त्याच्यावर परचक्र आणून ब्राह्मण त्याचा नाश करीत. (पु. ११७- १२०) आणि यामुळे बुद्ध व अशोकसुद्धां या बलाढ्य ब्राह्मण खानदानी वर्गाशीं उघड विरोध करण्याचे टाळीत आले असले पाहिजेत. स्वामीजींच्या मतें रजपूत हे कोणी परकीय जमातींचे लोक होते. त्यांना ब्राह्मणांनीं क्षत्रियत्व दिलें. आणि मग या नव्या क्षत्रियांनीं सर्व देश ब्राह्मणांच्या पायाशी गुलामासारखा आणून ठेवला. (पृ. १२८- १२९) अ. बा. लठ्ठे यांच्या मतें ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या दीर्घकालीन संघर्षात शेवटी आठव्या शतकाच्या सुमारास क्षत्रिय रजपूत हे ब्राह्मणांपुढे नमले. तेथून पुढे त्यांच्या अंगीं पराक्रम नव्हता असे नाहीं; पण ते केवळ ब्राह्मणांचे भाडोत्री शिपाई झाले. ध्येयनिष्ठा, उदात्तता यांचा त्यांच्या ठायीं लोप होऊन ते केवळ ब्राह्मणांचें एक हत्यार बनून राहिले. (शाहू छत्रपति चरित्र, खंड १ ला, पृ. १६८).

क्षत्रियांचे चित्र.

 जातिभेदनिर्मितीची ब्राह्मणेतर पंडितांनी केलेली मीमांसा पाहिली म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होते. रजपूत, प्रमार, प्रतिहार, चालुक्य, चव्हाण हे सर्व क्षत्रियवंश व बुद्धकाळांतील इतर राजवंश या सर्वांनी जाणूनबुजून जातिभेद प्रस्थापित करण्याचे व तो दृढमूल करण्याचे कार्य केले आहे, हे या सर्व पंडितांना मान्य आहे; पण क्षत्रियांनी ही कृत्ये ब्राह्मणांच्या प्रेरणेने केली असे त्यांचे मत आहे. विषमतेच्या धर्मामुळे अखिल हिंदु समाजाचा नाश होईल, राष्ट्र रसातळाला जाईल हे त्या सर्वांना दिसत होते. पण कोणीं दयाबुद्धीनें, कोणी भीतीनें, कोणी अन्य कांहीं थोर वां हीन हेतूने त्या धर्माच्या प्रस्थापनेसाठी तरवार उपसली. बाह्मणांनी आमच्यांत दुही माजवली आणि आम्ही भोळेभाबडे असल्यामुळे आपसांत लढलों, या भूमिकेप्रमाणेच जातिभेदधर्मप्रस्थापनाच्या समर्थनार्थ अंगिकारलेली ही दुसरी भूमिकाहि क्षत्रियांना अपमानकारक व अनर्थावह आहे. प्राचीन काळच्या क्षत्रियांना एका जबाबदारीतून मुक्त करतांना हे पंडित त्यांच्यावर दुसरे वाटेल ते आरोप करीत आहेत. भाडोत्रीपणा, कमालीचा अविवेक, भेकडपणा, ध्येयशून्यता हे अतिशय निंद्य गुण हे पंडित त्यांच्या अंगी अभावितपणे चिकटवीत आहेत. ही भूमिका कितपत श्लाध्य आहे ?
 आज या ब्राह्मणेतर पंडितांचें ब्राह्मणांविषयीं अत्यंत हीन मत आहे. मागल्या काळच्या अनेक थोर क्षत्रिय वीरांचे मत तसें नव्हते, पण त्यांना ते मतस्वातंत्र्य देण्यास हे पंडित तयार नाहींत. मागल्या काळी ज्यांनी ज्यांनीं ब्राह्मणांविषय आदरभाव व्यक्त केला व त्यांना वंद्य मानले त्या सर्व क्षत्रिय वीरांची वाटेल ती निंदा करण्यास हे पंडित कमी करीत नाहींत. 'हू वेअर दि शूद्राज्' हा डॉ. आंबेडकरांचा ग्रंथ पहा. त्यांच्या मतें शूद्र हा शब्द आजच्याप्रमाणे हीनजातिवाचक नव्हता. शूद्र हें एका थोर क्षत्रिय वंशाच्या शाखेचें नांव होर्ते. सूर्यवंशीय राजे ही ती शाखा होय. वसिष्ठ हे या वंशाचे गुरु. पण पुढे ब्राह्मण फार गर्विष्ठ झाले; ते क्षत्रियांना तुच्छ लेखूं लागले. ते सूर्यकुलांतल्या राजांना सहन होईना. म्हणून त्यांनीं ब्राह्मणांविरुद्ध जाऊन त्यांच्यावर अत्याचार केले. तेव्हां ब्राह्मणांनीं सूडबुद्धीनें सूर्यवंशीय राजांचा उपनयनसंस्कार करण्याचे नाकारले. आणि उपनयन नाहीं म्हणजे द्विजत्व नाहीं, असा प्रकार होऊन या सूर्यवंशीय शूद्र राजांचा अधःपात झाला. ते आपल्या श्रेष्ठपदावरून खाली आले. आंबेडकरांच्या ग्रंथाचा तात्पर्यार्थ असा आहे. आतां त्यांच्या या सिद्धांतावर अनेक शंका येतील. त्यांचें निरसन करतांना व ब्राह्मणांवर भडिमार करतांना आंबेडकर क्षत्रियांविषयीं काय अभिप्राय प्रगट करतात ते पहा. सूर्यवंशीय राजांना ब्राह्मणांचा उन्मत्तपणा सहन होईना म्हणून ते त्यांच्याविरुद्ध गेले. मग इतर वंशांतल्या- चंद्रवंश, हैहय वंश- या वंशांतल्या राजांनी हेच धोरण कां अवलंबिलें नाहीं, ते ब्राह्मणाचा आदर कां करीत राहिले, असा प्रश्न येतो. आंबेडकर म्हणतात हे सर्व राजे नेभळे, नाकर्ते, स्वाभिमानशून्य असे होते. चंद्रवंशांत दुष्यंत, भरत, भीष्म, श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर असे थोर क्षात्रवीर होऊन गेले. हे सर्व स्वाभिमानशून्य, नेभळे, नाकर्ते होते हा निर्णय ब्राह्मणेतरांना मान्य आहे काय ? सूर्यवंशाचा अधःपात झाला म्हणजे काय, हें आंबेडकरांनीं स्पष्ट केलेले नाहीं. ब्राह्मणक्षत्रिय हा वाद प्रथम वेदकालांतील दिवोदाससुदास यांच्यावेळी सुरू झाला, असें डॉक्टरसाहेब म्हणतात. हरिश्चंद्राच्या वेळीं तो विकोपास गेला. तेव्हांच ब्राह्मणांनी उपनयन करण्याचें नाकारलें, पण त्यानंतर बत्तीस पिढ्यांनी रामचंद्र झालेला आहे. आणि रामानंतरहि बत्तीस पिढ्या हा वंश राज्य करीत होता. म्हणजे अध:पात झाला हेच खरें नाहीं. तरी ब्राह्मणांवर भडिमार करण्यासाठी आंबेडकरांनी या वंशाला अध:पतित ठरविले आणि इतर सर्व क्षत्रियांना नेभळे, स्वाभिमानशून्य व नाकर्ते ठविलें. रजपूत वंशांत बाप्पा रावळ, हम्मीर, पृथ्वीराज, संगराणा, राणाप्रताप यांसारखे महापुरुष होऊन गेले. पण प्रचलित कथा अशी आहे की रजपूत हे मूळचे परकी असून ब्राह्मणांनीं त्यांना क्षत्रियत्व दिलें. अर्थातच ते ब्राह्मणांना वंद्य मानीत. यामुळे या पंडितांनी सर्व रजपुतांना भाडोत्री, ध्येयशून्य, हीन ठरवून टाकले आहे. रजपूत हे इतिहासांत कशासाठी प्रसिद्ध असतील तर ध्येयनिष्ठा, क्षात्र तेज, अग्निदिव्य यासाठीं- यांच्या अतिरेकासाठीं होते. सहाशे वर्षे त्यांनी मुसलमानी आक्रमणाला टक्कर देऊन या भूमीचें रक्षण केले. पुढे ते थकले, त्यांनी हार खाली हें खरें. पण प्रा. लठ्ठे यांच्यामते त्यांनीं आठव्या शतकांतच हार खाल्ली व तेथून पुढे ते केवळ भाडोत्रीपणें लढत.
 या भयंकर भडिमारांतून शिवछत्रपतीहि सुटत नाहींत. 'ब्राह्मणी वर्चस्वांतून शिवाजीचें मन कधींच मुक्त होऊं शकले नाहीं,' असें स्वामी-धर्मतीर्थजी म्हणतात. पण ठाकरे यांचा हल्ला फारच प्रखर आहे. त्यांच्यामते कोल्हापूरचे राजर्षि शाहू छत्रपति हें शिवछत्रपतीपेक्षां पुष्कळच श्रेष्ठ होते. शाहू छत्रपतींनी जे कार्य केले ते शिवाजीनें केले असते तर त्यांच्यामते इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानावर झालेंच नसतें. पण ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध लढा करण्याची रग शिवाजींत नव्हती. ठाकरे म्हणतात, 'शिवाजीनें मराठी स्वराज्य स्थापन केले म्हणून आम्ही त्याचा गौरव करतो. पण तोहि भटी गोमूत्राच्या गाडग्यांत अडकून भटी ब्रह्मगाठींच्या आडाखेबाज फासांत डोळे उघडे ठेवून फांशी गेला' (शेतकऱ्यांचे स्वराज्य-पृ. ५६ ते ६०) श्रीमती ॲनी बेझंट यांचें नांव भारताच्या अर्वाचीन इतिहांत महशूर आहे. राजकीय क्षेत्रांत त्या अग्रस्थानी होत्या. पण जातिभेद, अस्पृश्यता यांचें त्यांनीं कांहींसें समर्थन केले आहे. यासाठीं ब्राह्मणेतरांनीं स्वतंत्रपणें त्यांना प्रतिगामी ठरविण्यास हरकत नव्हती. पण ब्राह्मणांना व जातिभेदाला अनुकूल असणारे ब्राह्मणेतर स्वतंत्रपणे विचार करूं शकतात हेंच या ब्राम्हणेतर पंडितांना मान्य नाहीं. धर्मतीर्थजींच्या मर्ते ॲनीबेझंट व त्यांची थिआसफीकल सोसायटी या ब्राम्हणी वर्चस्वाला बळी पडल्या होत्या म्हणूनच त्यांचे असे विचार झाले. आजच्या काँग्रेसबद्दल त्यांचें तेंच मत आहे. ते म्हणतात, काँग्रेस ही क्षत्रिय झुंजार वृत्तीची संस्था. पण जुन्या काळी मराठे, रजपूत यांचा जसा उपयोग ब्राह्मणांनी केला तसाच काँग्रेसचाहि उपयोग ते आज करीत आहेत.
 क्षत्रियांतील दुही, यादवी व हिंदुस्थानांतील जातिभेद आणि एकंदर धर्मशास्त्रांतील विषमतेचीं तत्त्वे यांच्या सर्व जबाबदारीतून ब्राह्मणेतर समाजाला मुक्त करण्याच्या प्रयत्नांत व ब्राम्हणांवर ती सर्व जबाबदारी लादण्याच्या भरांत ब्राम्हणेतर पंडितांनी एकंदर क्षत्रियवंशाची, त्यांतील थोर पुरुषांची व एकंदर ब्राह्मणेतर समाजाची काय अवस्था व बदनामी करून टाकली आहे ते वर सांगितले. आतां त्यांनी प्राचीन काळच्या ज्या घटना वर्णिल्या आहेत त्यांतून क्षत्रियांना बदनामीकारक असे आणखी किती निष्कर्ष निघतात ते पाहिले म्हणजे ही भूमिका कोणाहि ब्राह्मणेतराला मान्य होईल असे वाटत नाहीं. ब्राह्मण हा, या पंडितांच्या मतें, आज सहासात हजार वर्षे सर्व हिंदुस्थानभर वर्चस्व गाजवीत आहे. म्हणजे तो सारखा जागरूक, संघटित, व धूर्त असा असला पाहिजे. आणि क्षत्रिय मात्र एवढ्या काळांत सारखा विघटित, बेसावध, इतरांच्या सल्ल्याने वागणारा, स्वयंप्रेरणा नसलेला असा असला पाहिजे. ब्राह्मणांच्या विरुद्ध त्याला एकजूट करता आली नाहीं. त्यांची कारस्थानें तो ओळखूं शकला नाहीं. ब्राह्मणांनी उपनयन करण्याचे नाकारले तर त्यांच्यातील कोणालाहि द्रव्यानें, भीतीनें, भेदनीतीने फोडणे, त्यांच्यांत दुही माजविणे व कांहीं ब्राह्मण आपल्या बाजूचे करून ठेवणे आणि त्यांच्या साह्यानें तरी इतर ब्राह्मणांचीं कारस्थाने जाणून घेणें हें क्षत्रियांना कधींहि शक्य झाले नाहीं. क्षत्रियांत दुही माजविणे मात्र ब्राम्हणांना केव्हांहि शक्य होते. वास्तविक ब्राम्हणांच्या हातीं राजसत्ता अशी पेशवाईच्या काळी फक्त होती. आणि बंगालमध्ये नवव्या दहाव्या शतकांत कांहीं काळ ब्राह्मणी राज्ये होती. पण बाकी सर्वत्र व सर्व काळी राजसत्ता क्षत्रियांच्या हातीं होती. एवढी सत्ता इतक्या दीर्घकाल हातीं असूनहि क्षत्रियांना ब्राह्मणांपुढे हार खावी लागली. ब्राह्मण हा इतका बुद्धिमान्, इतका सामर्थ्यसंपन्न, इतका संघटनाकुशल आणि क्षत्रिय मात्र कायमचा भोळाभाबडा, बलहीन, विघटित असा होता. अशा तऱ्हेचे क्षत्रियांना अत्यंत अवमानकारक निष्कर्ष या इतिहासमीमांसेतून व ब्राह्मणेतरांनी स्वीकारलेल्या भूमिकेतून निघतात, क्षत्रियांनी ही पराभूततेची कल्पना कां पत्करावी ते कळत नाहीं. ब्राह्मण हे दुष्ट होते, कारस्थानी होते, नित्य घातक व्यूह रचीत, नित्य विनाशाच्या योजना आंखीत; पण आम्ही क्षत्रियांनी त्यांची कारस्थानें, त्यांचे व्यूह, त्यांच्या दुष्ट योजना हाणून पाडल्या अशी भूमिकाहि त्यांनी पत्करली नाहीं. नाश करण्यांत ब्राह्मणांना, क्षत्रिय हे राज्यकर्ते असूनहि, दर ठिकाणीं यश आलें; अशी दीन, दुबळी भूमिका त्यांनीं स्वीकारली आहे. सूर्यवंशासारख्या महान् राजवंशाचा अधःपात घडविण्यांत ब्राह्मणांना यश आलें. कौरवपांडवांमध्यें, त्यांच्यापैकी एका बाजूस, भीष्म-कर्ण व दुसऱ्या बाजूस कृष्णार्जुन असे प्रज्ञावंत महापुरुष असूनहि यादवी माजवून त्यांचा नाश करण्यांत ब्राह्मण यशस्वी झाला. रामाला वनवासांत घालवून देण्यांत व सीतात्याग करायला लावण्यांतहि त्याला यश आले. चंद्रगुप्त, अशोक, शिवाजी यांनाहि आपल्या 'गोमूत्राच्या गाडग्यांत' त्यांनी अडकवून टाकले. विषमतेचा धर्म प्रस्थापित करण्यांत, क्षत्रियांनाहि इतरांना हीन लेखावयास भाग पाडण्यांत ब्राह्मण यशस्वी झाले. दर ठिकाणी ब्राह्मणांनी आमच्यावर मात केली, अशी दैन्याची, दौर्बल्याची पराभूततेची भूमिका क्षत्रियांनीं, व ब्राह्मणेतर पंडितांनीं स्वीकारली आहे. याचे अत्यंत अनर्थकारक परिणाम सध्यांच्या काळांत झाले आहेत; पण ते सांगण्यापूर्वी ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना ज्ञानहीन ठेवले या तिसऱ्या आरोपाचा विचार करून टाकूं.

आम्हांस ज्ञानहीन ठेवलें

 ही भूमिकाहि अशीच दैन्याची व दुबळेपणाची आहे. 'भट लोकांनी तीन हजार वर्षे येथें राज्य केले. त्या काळांत येथल्या लोकांना ज्ञानहीन केलें व खोटे ग्रंथ लिहून शुद्र अतिशूद्र यांना फसविले' असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे. प्रा. लठ्ठे यांनी छत्रपतिशाहूचरित्रांत वीसपंचवीस वेळा तरी हा आरोप केला आहे. आजहि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा गौरव करणारे ब्राह्मणांच्यावर हाच आरोप करीत आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही कीं ब्रिटिश राज्य प्रस्थापित झाल्यानंतरच्या काळांतहि ब्राह्मणांनी इतरांना विद्याहीन ठेवले असा ब्राह्मणांच्यावर आरोप आहे. ब्राह्मणांनी असें केले की नाहीं हा मुद्दा वेगळा आहे. संस्कृतविद्या ब्राह्मणेतरांना देऊं नये अशी सनातन ब्राह्मणांची संकुचित दृष्टि होती यांत शंकाच नाहीं. अर्थात् पाश्चात्यविद्या सर्व समाजांत प्रसृत करण्याचे प्रयत्नहि भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी यांच्या काळापासून अनेक ब्राह्मण करीत आले आहेत, हेंहि विसरून चालणार नाहीं. पण आपला आतांचा विषय तो नाहीं. प्रा. लठ्ठे यांनी राजर्षि शाहू यांचे चरित्र लिहिले आहे त्याला फ्रेझर नामक इंग्रज अधिकाऱ्यानें प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत त्यानें स्वच्छ म्हटलॆं आहे कीं, १८३३ सालीं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे घेतली. त्यानंतर या क्षेत्रांतली ब्राह्मणांची मक्तेदारी समूळ नष्ट झाली, असे असूनहि नंतरच्या काळांत आम्हांला ब्राह्मणांनी विद्या मिळू दिली नाहीं, आणि म्हणून आमचा समाज मागासलेला राहिला अशी तक्रार करणे क्षत्रियांच्या स्वाभिमानाला, कर्तृत्वाला, स्वयंप्रेरणेला शोभेल काय, असा प्रश्न आहे. याहि बाबतींत त्यांनी दीन दुबळी अशीच भूमिका घेतली आहे.
 क्षत्रियांच्या मताप्रमाणेच वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण हे भारताला भूषणभूत असलेले वाङ्मय त्यांनींच लिहिले आहे. तेव्हां त्या काळांत तरी ब्राह्मणांनीं विद्या दिली नाहीं, हा आरोप करता येणार नाहीं. पुढे ब्राह्मणांचें कर्मकांड वाढलें तेव्हां क्षत्रियांनी बौद्ध, जैन हे धर्म प्रस्थापित केले. या धर्माचें वर्चस्व हिंदुस्थानांत चवदाशें वर्षे होतें; अनेक राजे स्वतः बौद्धधर्मी होते. अनेक हिंदुराजे सर्व धर्माच्या पंडितांना सारखा आश्रय देत. तेव्हां या काळाबद्दलहि असा आरोप करता येणार नाहीं. पुढे दहाव्या शतकापासून संतवाङ्मयाचा काळ सुरू झाला. त्या काळांत अनेक संत ब्राह्मणेतरच होते. आणि वेदान्तज्ञान सर्व समाजांत पसरविण्याचे कार्य त्यांच्या बरोबरीने ब्राह्मण करीत होते. या काळांत दर वेळी सनातन ब्राह्मण वर्ग या ज्ञानप्रसाराला सारखा विरोध करीत होता हें खरें आहे. पण तितकाच मोठा ब्राह्मणवर्ग अट्टाहासानें शूद्रापर्यंत भागवतधर्माचा प्रसार करीत होता हेहि खरें आहे. यानंतरच्या काळांत जिला विद्या असें म्हणतात, ती कोणाजवळ शिल्लक नव्हती. मागल्या काळांत पाणिनि, पतंजली, नागार्जुन, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, शंकराचार्य, कुमारिल भट्ट, भास्कराचार्य, इ. अनेक भाष्यकार, गणितज्ञ, अनेक साहित्यशास्त्रज्ञ जसे उदयास आले त्याप्रमाणे पुढील काळांत कोणीहि झाले नाहींत. त्यानंतर विद्याव्यासंगाला खरी चालना मिळाली ती ब्रिटिशांचें राज्य आल्यानंतर. त्यानंतरच्या काळांत ब्राह्मणेतरांनी सर्व सामर्थ्य अंगी असून व सर्व साधनें हाताशीं सुलभ असूनहि दीन दुबळी भूमिका कशी पतकरली आहे ते पहा. महात्मा ज्योतिराव फुले यांचें प्रारंभीचे मुख्य कार्य हें की त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या. आतां सनातन ब्राह्मण व स्पृश्य समाज यांचा भयंकर विरोध असतांना जे मराठे अस्पृश्यांना विद्या देण्याची व्यस्था करतात त्यांनी आम्हांला ब्राह्मणांनी विद्येपासून ठेविले अशी तक्रार करणे म्हणजे जाणूनबूजून स्वतःवर दैन्य व दौर्बल्य ओढवून घेण्यासारखें नाहीं काय ? १८८० सालानंतर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी ब्राह्मणेतरांना, विशेषतः मराठ्यांना शिक्षण देण्यासाठी अट्टाहास चालविला होता. वसतिगृहें, शिष्यवृत्त्या, मोफत शाळा अशा सर्व प्रकारांनी ते साह्य करीत होते. तेच प्रयत्न ग्वाल्हेर, इंदूर व कोल्हापूर येथे १८९० सालापासून चालू झाले. ही अनुकूलता असूनहि ब्राह्मणेतरांनीं विद्याक्षेत्रांत निर्णायक शक्ति ब्राह्मणांच्या हाती आहे असे म्हणावें ही भूमिका आत्म-प्रत्ययाची, जागृततेची व स्वावलंबनाची आहे काय ? या काळांत महाराष्ट्रभर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षणप्रसारक मंडळी, आर्यन एज्युकेशन सोसायटी यांसारख्या शिक्षणसंस्था प्रस्थापित झाल्या होत्या. त्यांत ब्राह्मणेतरांना केव्हांहि मज्जाव नव्हता. डेक्कन एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष स्वतः राजर्षि शाहू हेच होते. या संस्थेने सर्व समाजाला शिक्षण सुलभ केलें असे त्या वेळच्या गव्हर्नरांनीं- लॉर्ड सँढर्स्ट- यानी प्रशस्तिपत्रहि दिले आहे. असें असूनहि भाऊराव पाटील यांचे चरित्रकार ब्राह्मणांनी आपल्या मुला-मुलींची फक्त सोय केली असें म्हणतात. इतक्या सोयी, इतकी संधि, इतकीं साधनें ब्राह्मणेतरांना अनुकूल असूनहि ब्राह्मण त्यांना विद्येपासून दूर ठेवू शकतो, असें ब्राह्मणाचें अद्भुत सामर्थ्य तरी काय आहे आणि अशी ब्राह्मणेतरांची दुर्बलता तरी कोणची की जी त्यांना सारखी ब्राह्मणांच्या आहारी जाण्यास भाग पाडते? बंगालचें उदाहरण पहा. नवी पाश्चात्य विद्या हें उत्कर्षाचे साधन आहे, ती यशाची गुरुकिल्ली आहे, ती संजीवनी आहे हें तेथील ब्राह्मणेतरांच्या ध्यानांत येतांच तेथील अनेक श्रीमंत घराण्यांनी त्या विद्येचा ध्यास घेऊन आपली मुले लहानपणापासून इंग्लंडमध्ये पाठविण्यास सुरवात केली. त्यामुळे बंगालमध्ये रॉय, चतर्जी, बॅनर्जी, टागोर या ब्राह्मण घराण्याप्रमाणेच घोष, बोस, पाल, दत्त हीहि घराणी विद्यासंपन्न झाली. आणि लालमोहन, आनंदमोहन, रासबिहारी, अरविंद, बारींद्रकुमार घोष, रमेशचंद्र दत्त, नरेन्द्रनाथ दत्त, (स्वामी विवेकानंद) जगदीशचंद्र, सुभाषचंद्र असे एकेक रथी महारथी त्यांच्यांत निर्माण झाले. महाराष्ट्रांतील मराठा घराण्यांनी विद्येचा असा ध्यास घेतला असता तर ? महाराष्ट्र, बडोदें, इंदूर, ग्वाल्हेर हे सर्व प्रांत मिळून, इंग्लंडमध्ये आपल्या मुलांना पाठवून शिक्षण देऊ शकतील अर्शी शंभर एक घराणी सहज होतीं. त्यांनी हे धोरण ठेविले असते॑ तर महाराष्ट्रांत ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद निर्माणच झाला नसता. कारण मग जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठेच आघाडीवर राहिले असते. पण ज्योतिबांनी दांतांच्या कण्या करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले तरी ब्राह्मणेतर समाजाच्या मनावर व त्यांतील नेतृत्व करणारा जो मराठावर्ग त्याच्या मनावर ते ठसलेच नाहीं. जनरल नानासाहेब शिंदे यांनी आत्मचरित्रांत अनेक ठिकाणीं ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे. श्रीमंत सयाजीराव, श्रीमंत माधवराव शिंदे याबाबतीत फार निराश असत. त्यांनीं मराठयांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. विलायतला जाण्याचा खर्चहि अनेकांना त्यांनी देऊ केला, दिला. पण त्यांच्यांत पाश्चात्य विद्येची अभिरुचि निर्माण झाली नाहीं. त्या विद्येचे सामर्थ्य, तिची महती त्यांना कळावी तशी कळली नाहीं. बंगाल्यांतील घोष, बोस, दत्त या घराण्यांप्रमाणे त्यांनी उपक्रम केला असता, इंग्लंड दूर राहू द्या- येथल्या युनिव्हर्सिट्यांत आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावयाचे त्यांनी ठरविले असते तर त्यांना प्रतिबंध करणे ब्राह्मणांना कालत्रयीं शक्य झाले नसते. पण तसे सामर्थ्य ब्राह्मणांच्या अंगीं आहे, त्यांचा प्रतिबंध असतांना आपणाला शिक्षण घेणे शक्य नाहीं, हीच भूमिका त्यांनीं पतकरली आणि अजूनहि तीच सत्य होती असे ते मानीत आहेत.
 ब्राह्मणब्राह्मणेतरवादांत ब्राह्मणेतर पक्षाच्या थोर धुरीणांनीं जी भूमिका स्वीकारली आहे तिच्यांतील मुख्य सिद्धांताचा येथवर विचार केला. हिंदुस्थानांतील सर्व अपयशाला, अवनतीला ब्राह्मणच जबाबदार आहेत असे सिद्ध करून स्वतःला त्या अपश्रेयांतून मुक्त करून घेण्याच्या भरांत या पंडितांनीं क्षत्रिय समाजाच्या मनःसामर्थ्याचे व बुद्धिबलाचे जे मापन केलें आहे व त्याचे जे चित्र रंगविलें आहे ते किती अनर्थकारक व अवमानकारक आहे हे त्यावरून दिसून येईल. ब्राह्मणांची दुष्ट बुद्धि, त्यांची कारस्थानें, त्यांचे घातकी व्यूह यांचे जे वर्णन त्यांनी केले आहे ते सर्व खरे मानले तर वेदकालापासून आतांपर्यंतचा क्षत्रिय समाज हा कर्तृत्व नसलेला, दुसऱ्याच्या चिथावणीनें वाटेल तो आत्मघात व राष्ट्रघात करण्यास प्रवृत्त होणारा, स्वतःच्या सार्वजनिक व कौटुंबिक जीवनांतहि ब्राह्मणांचे वर्चस्व सहन करणारा व सर्वस्वी ब्राह्मणांच्या आहारी जाऊन, हातीं राजसत्ता असतांनाहि दीन- दुबळा झालेला होता, अशी विचित्र इतिहासमीमांसा आपल्याला पतकरावी लागते. कोणचाहि स्वाभिमानी मराठा ती पत्करील असे वाटत नाहीं.

इंग्रज आपला उद्धारकर्ता

 ब्राह्मणेतर पक्षाने स्वीकारलेली ही भूमिका केवळ तात्त्विक असती, पूर्व इतिहासांतील ब्राह्मण व ब्राह्मणेतरांच्या संबंधांविषयींचे एक विद्वानाचें मत, एवढेच तिचे महत्त्व असते तर लोकशाहीच्या विवेचनांत त्याला एवढे स्थान देण्याचे कारण पडले नसतें. पण दुर्दैवानें तसे नाहीं. भारताच्या इतिहासावर ब्राह्मणेतरांनी स्वीकारिलेल्या भूमिकेचा अत्यंत घातक असा परिणाम झालेला आहे. ब्राह्मणांनीं गेली सात आठ हजार वर्षे या भूमीवर आपली सत्ता चालविली. आपला विषमतेचा ब्राह्मणी धर्म रूढ करून आम्हां सर्वं ब्राह्मणेतरांना पिळून काढले व आमच्यांत दुही निर्माण करून, आम्हांला अज्ञानांत ठेवून सर्वस्वी हीन दीन करून टाकले, ही भूमिका ब्राह्मणेतरानी केवळ तात्विक म्हणून स्वीकारली नाहीं, तर तिच्यांतून अपरिहार्यपणे निघणारा दुसरा एक सिद्धांत त्यांनी असा काढला कीं, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचें असें बलाबल असल्यामुळे हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य राहिले तरच ब्राह्मणेतरांचा उत्कर्ष होईल. ब्राह्मणांच्या दुष्ट शक्तीपासून ब्राह्मणेतरांचा बचाव करण्याचें सामर्थ्य, ब्राह्मणेतर पुढाऱ्यांच्या मतें, त्यांच्या समाजाच्या ठायीं नसून ते इंग्रजांच्या ठायींच फक्त आहे. त्यांचे राज्य जर गेले तर ब्राह्मण येथे पुन्हां विषमतेचा, उच्चनीचतेचा ब्राह्मणी धर्म रूढ करतील व ब्राह्मणी राज्य पुन्हां प्रस्थापित करतील. म्हणून इंग्रजी राज्याविरुद्ध चळवळ करणे हे घातक होय. भारती समाजाचा तिच्यामुळे नाश होईल. अशी भूमिका ब्राह्मणेतर समाजानें १९३०-३५ सालापर्यंत पतकरली होती. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांच्या १९४१ च्या ग्रंथांत हीच विचारसरणी प्रतिपादिलेली आहे. डॉ. आंबेडकरांच्या १९४५ च्या ग्रंथांतहि हीच भीति व्यक्तविलेली आहे. त्यानंतर आतां स्वातंत्र्यच आले आहे तेव्हां तसें प्रतिपादन कोणी केलेले ऐकिवांत येत नाहीं. पण लोकांच्या मनांतून हा विचार कितपत नष्ट झाला आहे ते सांगतां येत नाहीं.
 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मतें आर्य म्हणजे फक्त ब्राह्मण. बाकी सर्व शूद्र होत. राम, कृष्ण, शिवाजी सर्व शूद्र होत. बळी हा शूद्र असून ख्रिस्त हा त्याचाच अवतार होता. त्यामुळे सर्व ख्रिस्ती व म्हणूनच इंग्रजहि शूद्र होत. 'आम्हा शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाचा पट्टा इंग्रजांनी तोडला; मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यासारखे पायलींचे पंधरा व आधोलीचे सोळा संत झाले. पण त्यांतील एकानेंहि शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाच्या पट्ट्यास बोट लाविलें नाहीं. इंग्रजांनी मात्र आम्हांस सोडविलें. भट जो इंग्रजाविरुद्ध बंड करतो त्याचें कारण हेच होय. येथली शूद्र प्रजा व शुद्र इंग्रज यांच्या पुरत्या ओळखी होऊन पुढे जड जाईल म्हणून ब्राह्मणांनी इंग्रजांना हांकून लावण्याचा कट केला आहे. भट इंग्रजांविरुद्ध याच कारणास्तव द्वेष पसरतात. जीं बडे झालीं त्यांत भट अग्रेसर नाहीं असें एकहि नाहीं. पण इंग्रज कांहीं जन्माचे पुरणार नाहींत. तेव्हां ते आहेत तोपर्यंत भटांचें वर्चस्व मोडून स्वराज्य स्थापावें'- अशा तऱ्हेचे प्रतिपादन महात्मा फुले यांचें असें. (गुलामगिरी पृ. ५९, ६१, ८२) त्या काळी लोकहितवादी, रानडे, दादाभाई यांची इंग्रज हेच आपले उद्धारकर्ते, अशी श्रद्धा होती. त्यांच्या मनांतील अर्थ असा की समाजरचना, राजकारण, अर्थव्यवस्था यांचें ज्ञान आम्हांला नाहीं. इंग्रजांच्या नेतृत्वाने त्या तत्त्वाचा अभ्यास होऊन प्रत्यक्ष व्यावहारिक धडेहि आम्हांला मिळतील. मग आम्ही कार्यक्षम होऊं व स्वातंत्र्याला लायक होऊं. अमुक एका वर्गाच्या किंवा जातींच्या वर्चस्वांतून इंग्रज आम्हांस सोडविणार अशी ती भूमिका नव्हती. ब्राह्मणेतरांची भूमिका तशी होती. मागील इतिहासमीमांसा अक्षरशः खरी मानून त्यांनी मनाशीं सिद्धान्तच ठरवून टाकला होता की ब्राह्मणांचें वर्चस्त्र नष्ट करणे आपणांला शक्य नाहीं. इंग्रजांनीं तें वर्चस्व मोडून द्यावें. आमचें दास्य त्यांनीं नष्ट करावें. तसें त्यांनी केले नाहीं तर स्वातंत्र्य येतांच पुन्हां येथे ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल. अशी ही भूमिका होती. इंग्रज हा आपला उद्धारकर्ता नव्हे, तो आपला शत्रू आहे, आपल्या देशाचा व समाजाचा उद्धार स्वावलंबनानें आपणच केला पाहिजे, त्या कामीं इंग्रज साह्य तर करणार नाहींच, पण उलट पावलोपावलीं तो अडथळाच आणील, हे तत्त्वज्ञान प्रथम विष्णुशास्त्री यांनी सांगितले व टिळकांनी आमरण त्याचा प्रसार केला. या त्यांच्या प्रयत्नाविषयीं प्रा. लठ्ठे यांनी असे म्हटले आहे कीं, ब्राह्मणांना प्रारंभी सरकारी खात्यांत पुष्कळ नोकऱ्या मिळाल्या. १८७५ च्या सुमारास नोकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढावयास हवें होतें, ते वाढेना. कारण खालच्या दर्जाच्या जागाच संपल्या. वरच्या दर्जाच्या म्हणजे कलेक्टर, डी. एस्. पी. अशा जागा इंग्रज सरकार ब्राह्मणांना देईना; म्हणून ब्राह्मणांनी इंग्रजांविरुद्ध चळवळ सुरू केली. विष्णुशास्त्री, टिळक, राष्ट्रीय-पक्ष यांच्या चळवळीविषयीं ब्राम्हणेतरपक्षाचे हे मत आहे. महात्मा ज्योतिबा यांच्याप्रमाणेच 'इंग्रज हा ब्राह्मणेतरांचा उत्कर्ष करतो, त्यांना जागृत करतो, त्यांची उन्नति करतो म्हणून ब्राह्मणांना इंग्रजांचा द्वेष वाटतो' असें प्रा. अ. बा. लठ्ठे यांनीं १९२४ सालीं मत दिले आहे. (छत्रपती शाहूचरित्र- पृ. ३२४-२५) तेव्हां इंग्रज हे आपले उद्धारकर्ते होत, स्वराज्य देऊन ते येथून गेले तर येथें ब्राह्मण पुन्हां ब्राह्मणी राज्याची प्रस्थापना करतील, म्हणून इंग्रजाविरुद्ध लढा करावयाचा नाहीं - ही भूमिका ब्राह्मणेतरांनीं स्वीकारलेली होती. प्रा. लठ्ठे यांनीं 'हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्याचा उदय' या नांवाचें पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रस्तावनेंत ते पुस्तक लिहिण्याचे कारण त्यांनी दिले आहे. 'हिंदी लोकांच्या राजकीय अथवा राष्ट्रीय शीलाविषयीं तिरस्कार, हल्लींहि (१९१४ सालीं) त्यांच्या हाती अवशिष्ट असलेल्या राजसत्तेच्या जुलमीपणाची स्पष्ट जाणीव, व इंग्रजी सत्तेविरुद्ध चालू असलेल्या चळवळीपासून उत्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांचें उघड दिसणारें स्वरूप या सर्वांमुळे हे लेख लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाली, हें येथे सांगणे अवश्य आहे. या पुस्तकांतील प्रकरणांना त्यांनीं, ब्रिटिश-साम्राज्याचा अरुणोदय, सूर्योदय, अशीं नांवें दिली आहेत. इंग्रज बहुजन- समानाची काळजी करीत नाहींत, त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार मधूनमधून फुले व लठ्ठे यांनी केली आहे. पण त्यांच्यामतें याचे कारण असे की ब्राह्मण इंग्रजांनाहि फसवितात ! क्षत्रियवर्ग आपसांत लढतो, जातिभेदाच्या विषमधर्मांस साह्य करतो त्याचे कारण ब्राह्मणेतरांच्यामतें, ज्याप्रमाणे भोळेपणा, अज्ञान, भाबडेपणा हे आहे त्याचप्रमाणे इंग्रजांच्या बाबतींतहि भोळेपणा अज्ञान हेच कारण आहे. साहेबांना हिंदी जनतेची खरी तळमळ आहे. तिचा उद्धार करावा ही उत्कट इच्छा आहे. पण त्यांना येथल्या परिस्थितीचे मुळींच ज्ञान नाहीं. म्हणून त्यांनीं पाश्चात्य विद्या फक्त ब्राह्मणांनाच दिली. (छत्रपति शाहू चरित्र पृ. ३२१-२४.) इंग्रज सरकार अत्यंत भोळे असून भटांनीं त्यांच्या डोळ्यांत माती टाकली. (गुलामगिरी-फुले- पृ. १०४) एरवीं ते ब्राह्मणेतरांचे वाली आहेत. अशी ब्राह्मणेतरांची विचारसरणी असल्यामुळे ब्रिटिश राज्याशी एकनिष्ठ रहाणे अत्यंत अवश्य आहे या विचाराचा त्यांनीं १९३०-३५ पर्यंत पाठपुरावा केला होता. मद्रासमध्ये याच तऱ्हेची विचारसरणी ब्राह्मणेतर पक्षानें रूढ केली होती. १९१७-१८ या सालीं सुरू झालेल्या होमरूलच्या चळवळीला विरोध म्हणून ब्राह्मणेतरांनी चळवळ सुरु केली. ब्रिटिश राज्यच आम्हांला जास्त पसंत आहे, कारण स्वराज्य आलें तर ब्राह्मणी राज्य होईल, तेव्हां सत्तादान करूं नये, अशी त्यांची मागणी होती. जस्टिस पार्टीचे अध्वर्यु डॉ. नायर हे ब्रिटिश सरकारपुढे ब्राह्मणेतरांचे गाऱ्हाणे सांगून स्वराज्याच्या मागणीस विरोध करण्यासाठी विलायतेलाहि गेले होते. (लँड मार्क्स इन्ं इंडियन कॉन्स्टिटयुशन ॲन्ड नॅशनल डेव्हलपमेन्ट, खंड १ ला- पृ. ३५२- गुरुमुख निहालसिंग) वर उल्लेखिलेले मलबारचे स्वामी धर्मतीर्थजी यांनी १९४१ सालीं सुद्धां याच तऱ्हेने प्रतिपादन केलें आहे. 'परकीय वर्चस्व अहितकारकच असतें असें नाहीं, बुद्धीनें व धनानें

आपण समर्थ आहे. तेव्हां आणखी कांही वर्षे- कांहीं दशकें- ब्रिटिशांचें राज्य राहिले तरी भयंकर नुकसान होईल असें नाहीं. (पृ. २) काँग्रेस ही एक क्षत्रिय झुंजार वृत्तीची संस्था आहे. पण तिच्यावर ब्राह्मणी वर्चस्व आहे. जुन्या काळीं ज्याप्रमाणे मराठे, रजपूत, इतर क्षत्रिय यांचा उपयोग ब्राह्मणांनी केला, तसाच आतांही काँग्रेसचा उपयोग केला जाईल. (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ३०५ प्रकरण २३) [याचा अर्थ असा की स्वामीजींच्या मतें महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, राजेंद्रबाबू, अबुलकलम आझाद हेहि भोळे, अज्ञ, परप्रत्ययनेय असे असून ब्राह्मण सूत्रे हलवितील तसे नाचणारे आहेत.] ब्राम्हणेतरांतील अग्रेसर असे जे क्षत्रिय-नायर व मराठे- त्यांनी या विचारसरणीचा अवलंब केल्यानंतर अस्पृश्यांनीं तसा केला असेल यांत कांहीं आश्चर्य नाहीं. मात्र त्यांची भीति केवळ ब्राह्मणी राज्याची नसून एकंदर सवर्णांच्या राज्याची आहे. ब्राह्मणच फक्त दुष्ट व जुलमी आणि बाकी शूद्र, अस्पृश्य यांसह सर्व ब्राह्मणेतर दलित, ही ब्राह्मणेतर धुरीणांची भूमिका अस्पृश्यांना मान्य नाहीं. त्यांच्या मते सगळाच सवर्ण समाज जुलमी आहे. शिवराम जानबा कांबळे हे अस्पृश्यामधले एक थोर पुढारी व कार्यकर्ते आहेत. महात्माजींनी १९३० साली कायदेभंगाची मोहीम सुरू केली. त्यावेळी कांबळे यांनी- 'हिंदी राष्ट्रीय क्रान्तिविरोधक पक्ष' या नांवाचा पक्ष महात्माजींच्या चळवळीस विरोध करण्यासाठी म्हणून प्रस्थापित केला होता. 'चातुर्वर्ण्यविध्वंसनाचें व अस्पृश्यता- निवारणाचे कार्य पूर्ण होईपर्यंत तरी हिंदुस्थानांत ब्रिटिश राजसत्तेची फार जरूर आहे असे या पक्षाचे मत आहे' असे पक्षस्थापनेचे कारण देऊन महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी यांनी कायदेभंगाची चळवळ तहकूब करून हीं कार्यें हाती घ्यावीं, नाहींतर त्यांच्याविरुद्ध सत्याग्रहाची मोहीम करण्यांत येईल, असे कांबळे, घाटगे, पाताडे या पक्षप्रमुखांनी जाहीर केले होतें. (कांबळे यांचे चरित्र- नवलकर, शेवटचें पृष्ठ). डॉ. आंबेडकर यांनी 'व्हॉट काँग्रेस ॲंड गांधी हॅव् डन् टु दि अनटचेबलस्' या १९४५ च्या आपल्या पुस्तकांत ब्रिटिश राज्याविषयीं हेच विचार प्रगट केले आहेत. अस्पृश्यांनी काँग्रेसच्या लढ्यांत कर्धीहि भाग घेतला नाहीं, असें सांगून त्याचे कारण त्यांनी वरीलप्रमाणेच दिले आहे. 'अस्पृश्यांना अशी भीति वाटते की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळतांच तेथे पुन्हां हिंदूच -(डॉ. आंबेडकर अस्पृश्यांना हिंदू मानीत नाहींत) म्हणजे सवर्ण हिंदूचे राज्य होईल. आणि मग अस्पृश्यांची स्वातंत्र्य, समता, सुख, उत्कर्ष यांची आशा समूळ नष्ट होऊन ते केवळ मजूर होऊन रहातील.' (पृ. १६७) डॉ. आंबेडकरांच्या मतें ब्रिटिशांशी लढा करण्याचीच जरूर नव्हती. काँग्रेसनें हा नसता उद्योग केला. ब्रिटिश सरकारची वृत्ति बदलत असून आपण आपसांत ऐक्य केले कीं ते निश्चित स्वराज्य देतील. ब्रिटिशांच्या सद्भावनेवर काँग्रेसनें अविश्वास का करावा हेच त्यांना कळत नाहीं. (पृ. १७७-८०) १९३० सालीं एकदां आंबेडकरांचे मत निराळें होतें. त्यांचाहि ब्रिटिश सरकारवर विश्वास नव्हता. एका भाषणांत त्या सालीं ते म्हणाले की, 'आम्ही इंग्रजांच्या बाजूनें पूर्वी लढलो. त्यावेळी इंग्रज आम्हांला तारतील असें आम्हांला वाटले होते. पण आमची फसगत झाली. इंग्रजांच्या वतीनें लढून आमचें कांहीं एक हित झाले नाहीं. त्यांना लढाया करावयाच्या होत्या तोपर्यंत त्यांनी आम्हांला हाताशी धरले. नंतर गरज सरो वैद्य मरो, अशी स्थिति झाली. तेव्हां स्वराज्य हेच अस्पृश्यतेवर औषध आहे. आमच्या बेड्या स्वराज्यांतच तुटतील. बाकीच्या लोकांना जे राजकीय हक्क आहेत ते आम्हांला स्वराज्यांतच मिळतील.' (प्रभात २४-११-३०) १९३० साली आंबेडकरांचे हे मत होते. पण पुढे त्यांचें व त्यांच्या अनुयायांचे मत बदलले आणि इंग्रज हाच आपला उद्धारकर्ता होय, आपले रक्षण व उत्कर्ष तोच करणार, म्हणून ब्रिटिश विरोधी चळवळ व लढा हा आपल्या समाजाला घातक ठरेल, हीच ब्राह्मणेतरांची प्रारंभींची भूमिका त्यांनीं स्वीकारली. वास्तविक ब्राह्मणेतरांनीं ही भूमिका १९३० च्या सुमारास सोडली. इंग्रजांच्या स्वरूपाचे ज्ञान होऊन ते संग्रामांत उतरले. पण अस्पृश्यांनीं १९४५ सालीं सुद्धां ती सोडली नव्हती.
 आपण ब्रिटिश राज्याशीं एकनिष्ठ आहों, ही गोष्ट ब्राह्मणेतर किती अट्टाहासाने सांगत त्याचें एक उदाहरण देतो. ब्राह्मणब्राह्मणेतर वादांत १९२१-२२ च्या सुमारास अत्याचार होऊं लागतांच खटलेहि खूप झाले. व आततायी ब्राह्मणेतरांना शिक्षा झाल्या. त्याबद्दल विजयी मराठा पत्रानें सरकारविरुद्ध पुढील तक्रार केली आहे. 'प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमन- प्रसंगींची पुणे शहरांतल्या ब्राह्मण चळवळ्यांनी उत्पन्न केलेली परिस्थिति तरी टाइम्सपुढे उभी रहावयास पाहिजे होती. त्यावेळीं व आजतागायतहि महाराष्ट्रांत जी शांतता राहिली याचं कारण केवळ महात्मा फुले यांचें अनुयायी किंवा ब्राह्मणेतर पक्षाचे लोक होत. ब्राह्मणांच्या ब्रिटिश द्वेषाच्या चळवळीला आळा बसला असला तर त्याचें कारणहि हेच लोक होत. पण ब्रिटिश साम्राज्याच्या या दोस्तावरच आज टाइम्सकार आग पाखडीत असून साम्राज्य उलथून पाडणाऱ्यांच्या गळ्याला ते मिठी मारीत आहेत. (उतारा सत्याग्रही महाराष्ट्र- पृ. २२७)
 ब्राह्मणेतरांनी आपली चळवळ उभारतांना तत्त्वज्ञानाची जी बैठक स्वीकारली तिचा आढावा घेऊन आपण एका दृष्टीने तिचें परीक्षण केलें. पूर्वकाळच्या इतिहासाची त्यांनीं अत्यंत विपरीत मीमांसा करून क्षत्रिय वर्गाला व एकंदर ब्राह्मणेतर समाजाला आत्मप्रत्ययहीन दुर्बल व ध्येयहीन ठरवून टाकले. आणि ही मीमांसा केवळ तात्त्विक मर्यादेंत न ठेवतां ती अक्षरशः खरी मानून ब्राह्मणी वर्चस्व आमचे आम्ही हाणून पाडू शकणार नाहीं, यासाठी ब्रिटिशांचे राज्यच येथे दीर्घकाल राहिले पाहिजे, इंग्रज गेले तर पुन्हां आम्ही ब्राम्हणी धर्माच्या मगरमिठींत सांपडूं- श्रीकृष्ण, रामचंद्र, चंद्रगुप्त, शिवाजी, हे आमचे महापुरुषदि त्यांतून सुटू शकले नाहींत- अशी दैन्याची व परावलंबनाची भूमिका त्यांनी पत्करली.
 ब्राह्मणेतर विद्वानांनी स्वीकारलेल्या या भूमिकेमुळे त्यांच्याच वर्णनांतून क्षत्रिय समाजाविषयीं काय अभिप्राय प्रगट होतो, त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य याविषयी काय मापन होतें, या दृष्टीनें येथवर परीक्षण केलें. आतां त्या भूमिकेचे ऐतिहासिक दृष्टीनें थोडें परीक्षण करावयाचे आहे. आणि त्यानंतर त्या भूमिकेचें ब्राम्हणेतर समाजावर किती घातक परिणाम झाले आहेत व अजूनहि होण्याचा संभव आहे व एकंदर भारतीय समाजावर यापुढे त्याचे काय परिणाम होतील याचें विवरण करावयाचे आहे.



(ब्राह्मणब्राह्मणेतर वाद)
 ब्राह्मण ब्राह्मणेतर वादांत हिंदुस्थानांत वेदकालापासून जे जे अनर्थ झाले त्या सर्वांना ब्राह्मणच जबाबदार आहेत, हा सिद्धान्त प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणेतर पंडितांनी जी इतिहासमीमांसा केली ती क्षत्रियांना व एकंदर ब्राह्मणेतर समाजालाच कशी अवमानकारक आहे हे वर सांगितले. त्याचप्रमाणे तो इतिहासमीमांसा पत्करल्यामुळे इंग्रज हाच आपला उद्धारकर्ता आहे, या देशांतलें ब्राह्मणीधर्माचे वर्चस्व मोडणें आपल्याला शक्य नाहीं, इंग्रजी राज्यकर्ते मात्र ते मोडूं शकतील, म्हणून त्यांचें राज्यच येथें टिकले पाहिजे, आपण त्यांच्या साम्राज्याचे दोस्त झाले पाहिजे, नाहीं तर स्वराज्यप्राप्ति होतांच पुन्हां ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल, असा ब्राह्मणेतरांचा बुद्धिनिश्चय झाला व १९३० सालापर्यंत ते स्वातंत्र्याच्या लढ्यापासून अलिप्त राहिले. इतकेच नव्हे, तर ब्रिटिशराज्यविरोधी चळवळी या देशाला विघातक होतील असें त्यांनी मानिले, हाहि विचार वर ब्राह्मणेतर पंडितांच्या वचनांच्या आधारेंच सांगितला.
 मला अशी खात्री वाटते की नव्या पिढीच्या ब्राह्मणेतर समाजाला ही विपरीत इतिहासमीमांसा, स्वतःलाच अत्यंत अवमानकारक असें हें पूर्वइतिहासाचें भाष्य आणि त्या भाष्यामुळेच पत्करलेला दुसरा सिद्धान्त- इंग्रज जातांच येथें ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल हा सिद्धान्त- मान्य होणार नाहीं. आणि तसे झाल्यास दुही माजविणे, जन्मनिष्ठ उच्चनीचतेचा पुरस्कार करून इतरांना हीन लेखणे, आपली विद्या इतरांपासून लपवून ठेवणें, हे जे दोष आहेत ते आपल्या समाजाच्या सर्वच जातींत, जमातींत, वर्गांत आणि वर्णात आहेत, त्यांतून मुक्त असा कोणीहि नाहीं, हा इतिहाससिद्ध विचार त्यांना पटण्याचा संभव आहे. तसे झाल्यास ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचें मूळच उपटल्यासारखे होईल. म्हणून त्या दृष्टीनें थोडी इतिहासचिकित्सा आतां करावयाची आहे.

इतिहासाची साक्ष

 पूर्व इतिहासांत जेव्हां जेव्हां क्षत्रियाक्षत्रियांत यादवी माजली तेव्हां तेव्हां ती ब्राह्मणांनीं माजविली, आम्ही भोळेभाबडे म्हणून फसलों, ही भूमिका स्वतःला अवमानकारक म्हणून तर ती क्षत्रियांनी पत्करूं नयेच; पण ती इतिहाससिद्ध नाहीं हेंहि त्यांनीं ध्यानांत घ्यावें. ज्या यादवीशीं ब्राह्मणांचा चुकूनहि संबंध नाही अशी यादवी कितीतरी वेळां क्षत्रियांत उद्भवली आणि त्यांच्या नाशास कारण झाली, हें इतिहास सांगत आहे. पृथ्विराज व जयसिंग यांच्यांतील वैमनस्य व त्याचे अनर्थकारक परिणाम सर्वश्रुत आहेतच. दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत अनेक मराठे सरदार होते. त्यांत भोसले, जाधव, घोरपडे यांची आपसांत कशीं भयंकर वैरें माजलेली होती आणि एकमेकांचा अधःपात घडवून आणण्यास ते कसे टपलेले असत, हेंहि इतिहासाला माहीत आहे. यांत ब्राह्मणांचा कांहींच संबंध नव्हता. खुद्द शिवछत्रपतींच्या विरुद्ध चंद्रराव मोऱ्यांसारखे किती तरी मराठे सरदार होते. प्रत्यक्ष त्यांचा भाऊ त्यांना कधींच वश झाला नाहीं. तो विजापूरशींच एकनिष्ठ राहिला आणि त्यांचा पुत्र तर मोगलांना जाऊन मिळाला होता. प्रबोधनकार ठाकरे यांनी संभाजीला दोष लावणाऱ्यांना नांवें ठेवून त्याच्या या कृत्याचे समर्थनच केले आहे. त्यांचे म्हणणें असे कीं, घरांत सावत्र आई होती म्हणून संभाजी कंटाळला होता. त्याच्या कर्तबगारीस स्वराज्यांत वाव मिळेना. ह्यास्तव, मोगलाईत का होईना पण मर्दपणास वाव मिळेल, म्हणून संभाजी तिकडे गेला ! छत्रपतींच्या राज्यांत सामान्य शेतकऱ्यांचे सेनापति झाले. मावळे, हेटकरी, भंडारी- सर्वांच्या कर्तृत्वास वाव मिळाला, तेथे प्रत्यक्ष युवराजाच्या कर्तृत्वास मात्र वाव मिळत नव्हता ! असो. पुढील काळांतील संताजी व धनाजी यांचें वैर महाराष्ट्राला किती घातक ठरले ते सर्वांना माहीतच आहे. ते ब्राह्मणांनीं माजविलें असें अजून कोणी म्हटलेलें नाहीं. संताजीचे मुंडकें तोडणारा एक मराठाच होता. शाहू व ताराबाई यांच्या वैराची हीच कथा आहे. हें मुद्दाम पेटविले असले तर ते मोंगलांनी पेटविलें होते आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर २५ वर्षांचा लढा जिंकल्यानंतर त्यावेळचे प्रमुख मराठे कोणत्या तरी एका बाजूस दृढपणे चिकटून रहाते तर पेशवाईचा उदयच झाला नसता; पण तें धोरण न अवलंबितां त्या वेळचे प्रमुख सरदार- चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण, हिंदुराव घोरपडे हे दोन्ही पक्ष सोडून मुसलमानांना जाऊन मिळाले. पुढे पेशवाई आली. तेव्हां मराठा सरदारांची आपसांतील वैरें ब्राह्मणप्रेरित होती असा दावा मांडणें तरी शक्य आहे; पण पेशवाई संपल्यावर शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे मातबर सरदार स्वतंत्र फौजा संभाळून होते. त्यांनी ऐक्य करून सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींचा पाठपुरावा केला असता तर इंग्रजी राज्य झाले नसतें; पण इंग्रजांनीं भेदनीतीचा अवलंब करून त्यांच्यांत दुही माजविली. त्यामुळेच हे एकेकटे इंग्रजाशी लढून सर्व पराभूत झाले. याचा अर्थ असा आहे की, आपल्या या भूमीत सर्व समाज संघटित करून ठेवील इतकी प्रबळ अशी कोणचीच निष्ठा त्यावेळी नव्हती. स्वामिनिष्ठा नव्हती, धर्मनिष्ठा नव्हती व राष्ट्रनिष्ठा हा शब्दच आपण ऐकला नव्हता; आणि अशा निष्ठेच्या अभावीं येथले ब्राह्मण, येथले क्षत्रिय, येथले जैन, गुजराथी, मारवाडी इ. व्यापारी वैश्य आणि इतर सर्व जनता यांच्यांत वाटेल तेव्हां फूट पडत असे. कधीं मोंगल यादवी माजवीत, कधीं इंग्रज माजवीत. कधीं तेच इतर स्वार्थी विचारांनी परस्परांत फूट पाहून आपापला पक्ष बळकट करीत. अशा स्थितींत एका जमातीनें किंवा वर्गाने दुसऱ्यावर, यांनी आमच्यांत मुद्दाम दुही माजवून आमचा नाश घडविला, असा आरोप करणे एकतर इतिहासाच्या दृष्टीनें सयुक्तिक नाहीं, आणि दुसरे म्हणजे अशानें जी पराभूत वृत्ति व जे न्यूनगंड निर्माण होतात ते त्या समाजालाच फार घातक होतात. ब्राह्मण दुही माजवू शकतात, मोंगल यादवी चेतवूं शकतात, इंग्रजहि आमच्यांत फूट पाडतात, असें सारखें म्हणत बसून आपल्या अधःपाताची जबाबदारी दुसऱ्यावर टाकल्याने समाज मनानें पेंगुळतो. आपल्यांत दुसरे लोक यादवी माजविणार, ते आपल्याला फसविणार आणि आपण त्या भेदनीतीला तोंड देण्यास असमर्थ आहो, असा याचा अर्थ होऊन समाज हतप्रभ होतो. परक्यानें कोणीतरी आपले रक्षण केले पाहिजे, आपला मार्ग सुकर केला पाहिजे, अशी परावलंबी वृत्ति निर्माण होते. उत्कर्षाप्रमाणेच आपल्या अपकर्षालाहि आपले आपणच जबाबदार आहों ही भूमिका जीवनदायक आहे. तिच्यामुळे मन समर्थ व सकस बनते. ब्राह्मणेतर तरुणांनीं इतिहासाकडे या दृष्टीने पहावें अशी माझी त्यांना विनंति आहे. आपला अधःपात झाला तर इतर बाहेरची कारणे दर वेळी कांही तरी असणारच; पण खरे कारण आपल्याठायीच आहे, हें प्रत्येक समाजाने जाणले पाहिजे. ही जाणीव व तज्जन्य जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्यावांचून कोणच्याहि समाजाचा उत्कर्ष होणार नाहीं.

समाजरचनाच विषम

 जन्मनिष्ठ उच्चनीचतेचा ब्राह्मणीधर्म हा ब्राह्मणांनी निर्माण केला, जातिभेद त्यांनी पसरून दिले, आम्ही तो धर्म प्रस्थापित करण्यास साह्य केले असले तरी ते त्यांच्या प्रेरणेने केलें, आजहि आमच्यांत जन्मनिष्ठ उच्चतेची भावना जरी असली तरी ती ब्राह्मणांच्या चिथावणीनेंच टिकून आहे, ही भूमिकाहि याच तऱ्हेची आहे. दुर्दैवानें हिंदुस्थानांतील समाजरचनेचे तत्त्वज्ञान बव्हंशीं विषमतेवरच उभारलेले आहे. इ. स. पूर्वी समतेची कांहीं तरी भावना होती असे दिसून येतें. पण पुढे हळूहळू ती नष्ट होत गेली. अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राह्मणः पूज्यते सदा । ब्राह्मण विद्वान् असो, अविद्वान् असो, तो पूज्यच आहे, असें तत्त्व मनूनें मांडलें. आणि 'टोणपा ब्राह्मण असेल साचा, तरी तो गुरु आठ वर्णाचा', 'जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तरी तो तीन्ही लोकीं श्रेष्ठ' अशा तऱ्हेची विचारसरणी रूढ झाली. जातींची व उच्चनीचतेचीं बंधनें साधारण दहाव्या शतकाच्या सुमारास कडकपणें अमलांत येऊं लागलीं; आणि तेव्हांपासूनच हिंदुस्थानच्या विनाशास प्रारंभ झाला.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेचें हें, जे तत्त्व, ही जी समाजघातक विषमता तिचा तत्कालीन ब्राह्मणांनी अतिशय हिरिरीनें पुरस्कार केला ही गोष्ट खरी आहे. बाराव्या तेराव्या शतकापासून इंग्रजांचे राज्य प्रस्थापित होऊन पाश्चात्य विद्या येथे येईपर्यंत सनातन ब्राह्मणवर्गाची दृष्टि अत्यंत संकुचित व हीन होऊन गेली होती. सर्व समाजाचा हळूहळू ऱ्हास होत होता, परक्यांच्या आक्रमणास देश बळी पडत होता. तरी रूढ धर्मावरची त्यांची अंधनिष्ठा कमी झाली नाहीं. त्यामुळे समाजाच्या नाशाच्या कारणांची मीमांसा करून त्यावर उपाययोजना करण्याची ऐपत त्यांच्याठायीं कधींहि निर्माण झाली नाहीं. ज्ञानेश्वराला त्यांचा विरोध, एकनाथाला विरोध, तुकारामाला विरोध, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध, आणि थोरल्या बाजीरावावर सामाजिक बहिष्कार घालण्याची त्यांची तयारी ! शिवछत्रपति ही केवढी दिव्य शक्ति आहे, त्यांचा पराक्रम हिंदुधर्माचा कसा उत्कर्ष घडवीत आहे, या भूमीचा सर्व इतिहास बदलून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यांत कसें आहे, हे या सनातन शास्त्री, पंडित, भिक्षुक या वर्गाला आकलनच झालें नाहीं. कलावाद्यन्तयोः स्थितिः। नन्दांतं क्षत्रियकुलम् । ही वचनें मूढपणें उराशीं धरून त्यांनीं शिवप्रभूच्या क्षत्रियत्वाला व म्हणूनचं राज्याभिषेकाला विरोध केला. आणि सनातन भिक्षुक वर्गाची हीच वृत्ति गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत जवळ जवळ कायम होती.
 पण याचा अर्थ असा नव्हे की इतर कोणी जाती किंवा इतर कोणी समाज या जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या घातक तत्त्वाच्या वर्चस्वापासून मुक्त होते. तसे असतें तर त्यांनीं या धर्माविरुद्ध तेव्हांच संग्राम करून या राष्ट्राला वांचविलें असतें. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला जसा अंध, सनातनधर्मनिष्ठ शास्त्री-पंडितांचा विरोध होता, तसाच श्रेष्ठ, खानदानी कुळांतल्या मराठ्यांचाहि होता. भोसल्यांचें कुळ ते कमी समजत. 'मोहिते, महाडिक, निंबाळकर, सावंत, जाधव, घोरपडे वगैरे बडे बडे मराठे सरदार पहिल्यापासूनच शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेला विरुद्ध होते.' असे सांगून प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या वेळच्या मराठ्यांवर कडक टीका केली आहे. आणि आपल्या म्हणण्याच्या सिद्धयर्थ इतिहासपंडितांचा उताराहि दिला आहे. (कोदण्डाचा टणत्कार. पृ. ३६, ३७.) ही खुद्द शिवछत्रपतींच्याबद्दल त्यांची दृष्टि; मग मराठेतर समाजांबद्दल– कुणबी, माळी, लोहार, कुंभार, कोळी, परीट या एकंदर समाजांबद्दल काय असेल त्याची सहज कल्पना येईल. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी याविषय उद्बोधक माहिती दिली आहे. मद्रासकडे नायर हे जमीनदार होते. त्यांतील नायर शिलेदारानें चेरुमाचा (हीन जातीयाचा) करमणुकीखातर प्राण घेतला तरी चालत असें. (भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न पृ. १५६) ब्राह्मण व नायर (क्षत्रिय) या दोघांनी, त्यांच्या मतें, अस्पृश्यांना गुलाम बनविले होते. त्यांची आणखीहि एकदोन मतें आत्मनिरीक्षण करतांना ब्राह्मणेतर तरुणांनीं ध्यानांत घ्यावी. बौद्धांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार यामुळे सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होतां उलट वाढलीच. आणि त्या काळीं अस्पृश्यतेचें दृढीकरणच झालें, द्रविडांबद्दल त्यांनी लिहिले आहे की, आर्याप्रमाणेच द्रविडांतहि चातुर्वर्ण्य असल्याचे पुरावे सांपडतात. (पृ. ३९) एके ठिकाणी ते म्हणतात की राजपुत, जाठ, गुरखे, मराठे, कुणबी, चित्पावन, नंबुद्री, नायडू, मुदलियार, नायर, पाळेगार- या जाति हिंदुधर्माच्या पोलादी चौकटीत वरिष्ठ स्थान पटकावून बसल्या आहेत. (पृ. १८३) आणि हीच गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. भरतभूमीचें जें जें वैभव आहे त्याचें श्रेय ज्याप्रमाणें क्षत्रियांना व ब्राह्मणांना आहे, त्याचप्रमाणे येथें जें जें हीन आहे त्याचें अपश्रेयहि प्राधान्यानें या दोघांना आहे. माझे तर असें मत आहे कीं या श्रेयाचे व अपश्रेयाचे वाटेकरी या दोघांप्रमाणे इतर समाजहि आहेत. वैश्यांनी व्यापारवृद्धि केली; इतकेच नव्हे तर अनेक वेळां त्यांनीं राज्यकारभारहि केला आहे. आणि भारतीय संस्कृतीचे ते निःसंशय श्रेयभागी आहेत. पण श्रेयाबरोबर अपश्रेयाचीहि जबाबदारी माथीं घ्यावी लागते. नुसत्या श्रेयाची जबाबदारी घेणें व अपश्रेयाची टाळणे याला अर्थच नसतो. तसें केल्यास या समाजाला इतर अनेक अवगुण आपल्या अंग चिकटवून घ्यावे लागतात, इकडे आज लोकांचे दुर्लक्ष होत आहे.
 ब्राह्मण हाच केवळ स्वतःला जन्मानें श्रेष्ठ समजतो व त्या श्रेष्ठत्वाचीं सुखें व हक्क मिळवूं पहातो, आणि मराठे तसें करीत नाहींत, असें आहे काय ? माझे वाडवडील वेदवेत्ते होते, शास्त्री होते, पुण्यशील होते, धर्मनिष्ठ होते म्हणून त्यांच्याप्रमाणे मलाहि, मी तसा नसलों तरी, केवळ मी त्यांच्या कुळांत जन्माला आलो म्हणून तुम्हीं दक्षिणा दिली पाहिजे, माझी पूजा केली पाहिजे, अशी ब्राह्मणांची मागणी होती. आणि ही वृत्ति अगदीं अनिष्ट व घातक होती, यांत शंका नाहीं. पण इतरांची वृत्ति कांहीं निराळी नव्हती. मराठे हेच म्हणत आले. माझ्या वाडवडिलांनी तरवार मारली, त्यांनी वतन मिळविले, आतां मी तसा पराक्रमी नसलो तरी केवळ त्यांच्या कुळांत आलो आहे, म्हणून मला त्यांचे वतन पाहिजे, माझा तो हक्कच आहे, अशीच मराठ्यांची मागणी आहे. वतन, मिरास, सरदारी, सरंजामदारी, संस्थान व राज्य ही केवळ जन्मानें, वंशपरंपरेनें मिळवणे ही जन्मनिष्ठ उच्चनीचताच आहे. अंगी पराक्रम नसला तरी क्षत्रिय राजाचा मुलगा राज्याचर हक्क सांगतों, आपले श्रेष्ठत्व मिरवितो. त्याचप्रमाणे ब्राह्मणांचा मुलगा अंगी विद्वत्ता नसतांना दक्षिणेवर हक्क सांगतो व मी टोणपा असलो तरी आठ वर्णाचा गुरुच आहे, अशी प्रौढी. मिरवितो. हिंदुस्थानच्या इतिहासांत एकाहि ब्राह्मणेतरानें, मी पराक्रम केला नाहीं तेव्हां मला वतन किंवा सरंजाम नको, राज्य नको, असे कधीहि म्हटलेले नाहीं: केवळ जन्मानें मिळालेले हक्क व सुखे, तेहि, ब्राह्मणाप्रमाणेच, ते योग्यच आहे असें मानून भोगीत आहेत. आणि आपण श्रेष्ठ कुलांतले व इतर हीन कुलांतले असा अभिमान मिरवीत आहेत.
 ब्राह्मणेतरांची ही प्रवृत्ति महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्वीच्या काळी होती व आतां नाहीं, असें मुळींच नाहीं. ब्राह्मणेतर सांगतात कीं, पूर्वी आम्ही मोळे होतो, आम्हांस ब्राह्मणांनी फसविलें, पण महात्मा फुले यांनीं आमच्यांत जागृति केली व आमची दृष्टि उघडली. फुले यांनी ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाविरुद्ध निर्भयपणे झगडा केला. ब्राह्मणेतर समाजाला जागृति आणण्यासाठी सर्व आयुष्य अर्पण केलें हें सत्यच आहे. आणि त्यामुळे आपला सर्वच समाज त्यांचा ऋणी आहे. पण त्यांच्यानन्तरच्या काळांत ही उच्चनीचतेची भावना मराठ्यांच्या वृत्तींतून अजिबात गेली व ब्राह्मणांतच फक्त राहिली असें आहे काय ? जातिभेदाचें व अस्पृश्यतेचे सर्व खापर ब्राह्मणांच्या माथीं फोडणाऱ्या मराठा खानदानी वर्गाने ९६ कुळांच्या बाहेर विवाहसंबंध करण्यास आरंभहि केलेला नाहीं. गांवोगांवीं अस्पृश्यांना, जरा अतिक्रम केल्याबरोबर, झोडपून काढण्यांत तेच पुढाकार घेत आहेत. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळीं, पर्वतीच्या सत्याग्रहाच्या वेळ, अस्पृश्यांना विरोध करणारांत बहुसंख्य ब्राह्मणेतरच होते. पर्वतीवर मंदिरप्रवेशसत्याग्रहाच्या वेळी अस्पृश्यांबरोबर सत्याग्रह करून स्पृश्यांचा दगडघोंड्यांचा मार खाणारांत न. वि. गाडगीळ, वि. म. भुस्कुटे, देशदास रानडे, बाळूकाका कानिटकर हे ब्राह्मण होते व मार देणारांत ब्राह्मणाप्रमाणेच गुंजाळ, झांजले इ. ब्राह्मणेतर होते. (शिवराम जानबा कांबळे- चरित्र- नवलकर- पर्वतीसत्याग्रह प्रकरण) महर्षि शिंदे अस्पृश्यांत मिसळत, हें सनातन मराठ्यांना मंजूर नव्हते. त्यांच्या भगिनी वारल्या तेव्हां या मंडळींनी खांदा देण्याचें नाकारले. तो नव्या मताच्या मराठयांनी दिला. केशवराव जेधे असेच अस्पृश्यांत वावरत. तेव्हां त्यांच्यावर त्यांच्या समाजाने तीन वर्षे बहिष्कार घातला होता. (सत्याग्रही महाराष्ट्र- प्रेमा कंटक पृ. २२७) याचा अर्थ असा की ब्राह्मणी धर्मातील जन्मनिष्ठ उच्चनीचतेवर मराठ्यांची ब्राह्मणाइतकीच दृढ श्रद्धा होती व आहे आणि त्यांतून मिळणारी सर्व श्रेष्ठता व सुखेंहि त्यांना भोगावयास हवीं आहेत; पण आज त्याची जबाबदारी फक्त ब्राह्मणांवर लादावी असा त्यांचा विचार आहे; आणि तो महात्मा फुले यांनी जागृति आणल्यानंतरहि !

मराठा - मराठेतर

 मराठे हे ब्राह्मणाइतकेच जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे कट्टर अभिमानी आहेत हें ब्राह्मणेतर चळवळीची थोडी फळे पदरांत पडूं लागलीं तेव्हां स्वच्छ दिसून येऊ लागले. ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली तेव्हां, ब्राह्मण फक्त जुलमी, अन्यायी, विषमतेचे पुरस्कर्ते, आणि बाकी सर्व समाज- मराठे, कुणबी, माळी, लोहार, सुतार, परीट, कुंभार, कोष्टी, साळी, अस्पृश्य- हा समाज दलित अशी भूमिका, या ब्राह्मणेतरांतील नेते जे मराठे, त्यांनी घेतली. आणि त्यासाठीच वर सांगितलेले तत्त्वज्ञान पूर्वीच्या इतिहासाच्या विपरीत मीमांसेच्या आधारे त्यांनी प्रसृत केलें. असें करतांना त्यांनीं खरोखरीच या सर्व समाजाशीं सर्व दृष्टींनीं एकरूप व्हावयाचे ठरविले असते, तर त्या सामाजिक क्रांतीला तुलना नव्हती. सर्व जगांत ती एक अभूतपूर्व गोष्ट घडली असती. पण इतक्या अभूतपूर्व गोष्टी जगांत घडत नाहींत. माँटफर्ड सुधारणा येऊन सरकारी नोकऱ्या व सत्ता हाती येते असे दिसतांच मराठा वर्गाचें स्वरूप बदललें व इतर समाजांना त्याची जाणीव होऊन मराठा व मराठेतर असा भेद निर्माण झाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी याविषयीं केलेले विवेचन फार उद्बोधक आहे. ब्राह्मणेतरांच्या बाजूनें ब्राह्मणांवर भयंकर भडिमार करणारे हे एक थोर लेखक आहेत. त्यांच्याच शब्दांत या प्रकाराचें वर्णन केलें कीं, त्याकडे कलुषित व पक्षपाती दृष्टीने पाहिल्याचा आरोप येण्याचे कारण उरणार नाहीं. 'शेतकऱ्यांचे स्वराज्य' या आपल्या पुस्तकांत ठाकरे लिहितात- 'जातिभेद, देव- मानवांतला दलाल भट, आणि सामाजिक उच्चनीचता, या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय दोषांवर कट्यार चालविणाऱ्या सत्यशोधक समाजाचा पुरस्कार ब्राह्मणेतरांनी सर्रास केल्यामुळे या चळवळींच्या संघशक्तीचा दुरुपयोग मराठे चळवळे स्वजातिवर्चस्वाकडे करतील, अशी प्रथमतः कोणालाहि शंका आली नाहीं. (पण) मराठे झाले तरी पिण्डानें जातिभेदाळू हिंदूच ! विद्येत अगदींच मागासलेले.... आम्ही करूं ती पूर्व दिशा असा भटी मद त्यांना चढला. केवळ मागासलेल्या खेडवळ ब्राह्मणेतर जनतेची संघटना साधावी तर कार्यकर्त्या मराठ्यांचें वर्तन अनेक मराठेतर समाजांना जाचक होऊं लागले.' (पृ. ८०) यानंतर श्री. ठाकरे यांनी केलेल्या विवेचनाचा सारांश असा:- माँटफर्ड रिफॉर्म्सची नवीं कौन्सिले सुरू होण्याच्या सुमारास तर ब्राह्मणेतर पक्षांत भयंकर उत्पात माजले. मराठामराठेतर भेदाचा पाया याच वेळीं भक्कम पडला. मराठे या वेळेपासून स्वजातिवर्चस्वाची भाषा अट्टाहासाने बोलू लागले. मराठा वृत्तपत्रे मराठेतरांना उघड धमक्या देऊं लागलीं. ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे मराठा चळवळ, असे भाष्य मराठे करूं लागले. क्षत्रिय म्हणजे फक्त मराठे, अशी व्याख्याहि त्यांनीं जाहीर केली. कौन्सिलदाऱ्या, दिवाणगिऱ्या आणि सरकारी नोकऱ्या या खास मराठ्यांना मिळाव्या आणि त्याहि लायकीच्या प्रमाणांत नव्हे, तर लोकसंख्येच्या प्रमाणांत एवढ्याच क्षुद्र बिंदूवर ब्राह्मणेतर चळवळीची भिंगरी फिरू लागली. (पृ. ८०-८२) आज ब्राह्मणेतर चळवळीचें कोणी 'धार्मिक लढा' कोणी 'वर्गलढा' असें वर्णन केले आहे. महात्मा फुले यांची दृष्टि धार्मिक लढ्याची होती. पण ती त्यांच्यापुरतीच राहून पुढें नष्ट झाली. देव व जनता यांच्यांत भट हा दलाल नको, हा धार्मिक लढ्याचा आत्मा होय. पण ब्राह्मणेतर चळवळींचे प्रमुख नेते राजर्षि शाहू यांनींच 'क्षात्रजगद्गुरु' निर्माण केले. प्रा. लठ्ठे यांनी 'ब्राह्मणी वर्चस्वाचा अंत' असें याचें वर्णन केले आहे. पण ठाकरे यांचे मतें, याच वेळीं महात्मा फुले यांचे थोर तत्त्व ब्राह्मणेतरांनी सोडलें. आणि त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळींत दांडगी फूट पडली. कारण एक दलाल जाऊन तेथे दुसरा दलाल आला, इतकाच फरक ! मराठेतर क्षत्रियांना याची फार चीड आली. 'वर्गलढा' हें वर्णन, ठाकरे यांचे मतें, असेंच सयुक्तिक नाहीं. उमरावतीच्या ब्राह्मणेतर काँग्रेसमध्यें ब्राह्मण वगळून बाकीची सारी दुनिया समाविष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगळणारे गुजर, मारवाडी, देशाला दारूबाज बनविण्याचा राजरोस मक्ता घेणारे सोमयानी पारशी, कज्जेदलाल वकील इ. शेतकऱ्यांचे खास शत्रू त्यांचे पुढारी बनले. कसाईच गोरक्षणाचे चळवळीचे सूत्रधार बनल्यावर परिणामाची कल्पना सहन येईल. (पृ. ८१) ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य पुढाऱ्यांनी मराठ्यांविषयीं हेंच लिहिले आहे. "मराठ्यांनीं ब्राह्मणांना हांकलून देऊन त्यांच्या जागा आपण घेतल्या आहेत. अस्पृश्यांनी आपली मुले शाळेत पाठवूं नयेत म्हणून घरादारांचा नाश करूं अशा त्यांनीं धमक्या दिल्या."

सर्व समाजच रोगग्रस्त

 ब्राह्मणेतर चळवळीला हें जे रूप आले त्यावरून हे स्पष्ट होईल की जन्मनिष्ठ उच्चनीचता हा रोग आपल्या सर्व समाजाच्याच रक्तांत भिनलेला आहे. आणि तो नाहींसा करण्यासाठी सर्व समाजांतल्या पुरोगामी शक्तींनी एकवटून प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या देशांतील प्रत्येक जातींत विवेकी, बुद्धिनिष्ठ व उदार बुद्धीचे, निःस्वार्थी व त्यागी लोक जसे सांपडतात तसेच अविवेकी, अंधनिष्ठ, संकुचित वृत्तीचे, स्वार्थी असेहि लोक सांपडतात. ही वस्तुस्थिति दृष्टीआड केली तर, बाह्मण व ब्राह्मणेतर एवढ्या दोनच फळ्या होऊन समाजाची विघटना तेथें थांबणार नाहीं. तर मराठा व मराठेतर, मराठा क्षत्रिय व इतर क्षत्रिय, महार व महारेतर, अशा सारख्या चिरफळ्या होत जातील. नव्हे, तशा होत चालल्याच आहेत. आणि या प्रवृत्तीला वेळींच पायबंद बसला नाहीं, तर भारतीय समाजाची पुनर्घटना करणे जवळजवळ अशक्य होऊन बसेल.
 विषमतामूलक असा जो सनातन धर्म, ज्याला ब्राह्मणी धर्म असें सर्व ब्राह्मणेतर पंडितांनी संबोधिले आहे आणि जो फक्त ब्राह्मणांनींच प्रसृत केला असा त्यांचा आरोप आहे, तो ब्राह्मणी धर्म नष्ट करावा असा प्रयत्न पाश्चात्य विद्येनें दृष्टि उघडल्याबरोबर स्वतः ब्राह्मणांनीच अट्टाहासाने सुरू केलेला आहे. राजा राममोहन रॉय व त्यांचा ब्राह्मसमाज, रानडे, भांडारकर व त्यांचा प्रार्थना समाज, स्वामी दयानंद व त्यांचा आर्यसमाज हे सर्व याच क्षेत्रांतले प्रयत्न आहेत. लोकहितवादी यांनी या जुनाट व घातकी धर्मावर व त्यालाच चिकटून राहणाऱ्या मूढ ब्राह्मणांवर जितका भडिमार केला तितका ब्राह्मणेतरांनी सुद्धां केला नसेल, आणि माझ्या मते, यासाठीं ब्राह्मण लोक त्यांचे कायमचे ऋणी राहतील. आगरकर व त्यांचा 'सुधारक' यांचा तर रूढधर्माचा विध्वंस करण्यासाठींच जन्म होता हें सर्वश्रुत व सर्वमान्य आहे. विष्णुशास्त्री, टिळक व त्यांची परंपरा यांनी केव्हां कव्हां नव्या सुधारणेस विरोध केला आहे. पण जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे ते पुरस्कर्ते होते असें, त्यांचे लेख ज्यानीं वाचले आहेत त्यांना केव्हांहि म्हणतां येणार नाहीं. या देशांत पूर्वी व आतांहि राष्ट्राभिमान ही निष्ठाच नाहीं आणि ती जातिभेदामुळे नाहीं, असें स्पष्ट सांगून राष्ट्रनिष्ठा अंगीं बाणविण्यासाठी आपण पाश्चात्यांना गुरु केले पाहिजे, असें विष्णुशास्त्री यांनीं निःसंदिग्धपर्णे सांगितलेले आहे. टिळकांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या वेदोक्ताच्या प्रकरणांत व पुढें पटेल बिलाच्या वेळी सनातन्यांची प्रतिगामी बाजू घेतली ही गोष्ट अत्यंत वाईट झाली, व त्यामुळे आपल्या समाजाची मोठी हानि झाली आहे हे खरे आहे. पण त्यामुळे ते जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे पुरस्कर्ते होते व त्यांना ब्राह्मणी राज्य प्रस्थापित करावयाचें होतें असा आरोप सयुक्तिक होणार नाहीं. १८८१ सालीं लेखणी उचलल्यापासून, गिरण्यांमध्ये फायद्याचा हिस्सा कामगारांना मिळाला पाहिजे, शेतकरी व कारागीर काँग्रेसमध्ये आला पाहिजे, कष्टकरी लोक म्हणजेच देशांतली प्रजा, मँचेस्टरमुळे येथला कोष्टी मरत आहे, चांदी पौंडाची चलाखी करून सरकार शेतकऱ्याला पिळीत आहे, सारावाढीमुळे, सर्व्हे सेटलमेंटमुळे शेतकरी उठकळेस आला आहे, या जनतेला जागृत करणे हेंच सुशिक्षितांचें काम आहे, असा टिळकांनी सारखा धौशा चालविला होता. व्यक्तिस्वातंत्र्याचे ते कट्टे पुरस्कर्ते होते. ज्या देशांत विचारस्वातंत्र्य नाहीं तो देश मृत समजावा, अशी त्यांची शिकवण होती. जातिभेद किंवा सामाजिक रूढि यामुळे येणारी उच्चनीचता मानावयाची नाहीं, असे लोकशाही स्वराज्य-पक्षाचें धोरण म्हणून त्यांनी जाहीर केले होतें. टिळकांचे हे सर्व कार्य दृष्टिआड करून वेदोक्तासारख्या काही प्रकरणामुळे त्यांना ब्राह्मणीधर्माचे उपासक म्हणावयाचे असेल, तर या आरोपांतून कोणीच सुटणार नाही. महात्माजींनीं चातुर्वर्ण्याचेंच नव्हे, तर जातिभेदाचे कितीतरी ठिकाणी समर्थन केले आहे. पितृपरंपरेनें विशिष्ट गुण माणसाच्या अंगी येतात, त्या गुणांच्या मर्यादा मनुष्याला ओलांडणे शक्य नाहीं म्हणून वर्णव्यवस्थेने सांगितलेले, जन्मानें ठरणारे व्यवसायच माणसाने करावे, असे महात्माजी सांगत असत. (मॉडर्न रिव्ह्यू- ऑक्टोबर १९३५) गांधीजींनी पुष्कळ ठिकाणी जातिभेदास विरोध केला आहे. पुढे पुढे स्पृश्य व अस्पृश्य यांचे विवाहहि त्यांनी घडविले; पण 'विशिष्ट गटांतूनच वधू निवडणे हा फार मोठा संयम आहे, आत्म्यांचा विकास होण्यासाठी मिश्रविवाह व सहभोजन यावर बंदी घालणे अवश्य आहे' अशीहि शिकवण ते देत. (यंग इंडिया ६-१०-२७) आणि तुमच्या विचारांत विसंगति आहे असें कोणी म्हटल्यास त्यांना ते मान्य होत नसे. 'जातिनिष्ठ व्यवसाय' हा तर गांधीवादानें मार्क्सवादावर, आणि आजची आर्थिक क्षेत्रांतली घातकी स्पर्धा टाळण्यासाठी, उपाय म्हणून सांगितलेला आहे. पितृपरंपरेने आलेला व्यवसाय स्वीकारल्यानें मनुष्याच्या शक्तीची बचत होऊन ती शक्ति त्याला आत्मिक उन्नतीसाठी वापरतां येते असें त्यांचें मत होतें. [यंग इंडिया २९-९-२७] या त्यांच्या मतामुळे अस्पृश्यांचे नेते डॉ. आंबेडकर त्यांच्यावर चिडून जात. आणि अस्पृश्यांच्याच नव्हे तर वरिष्ठ ब्राह्मणेतर समाजांतील नेत्यांनी सुद्धां, काँग्रेसचा उपयोग ब्राह्मण करून घेत आहेत, असा यामुळे अभिप्राय दिल्याचें मागें सांगितलेंच आहे. माणूस कितीहि मोठा झाला, त्याच्या वृत्ती कितीहि क्रांतिकारक असल्या, तरी पूर्वरूढींचे संस्कार कोठें तरी त्याच्या मनांत घर करून बसलेले असतात व केव्हां केव्हां ते प्रबल होतात, हे आपण लक्षांत घेतले पाहिजे आणि तेवढ्यासाठी त्याच्या सर्व कार्यावर बोळा फिरविण्याचे धोरण निषिद्ध मानले पाहिजे. पण ब्राह्मणेतर पंडित या जीवनाकडे या हंसक्षीर न्यायाने पहात नाहींत. त्यामुळे त्यांनी रजपुतांना भाडोत्री ठरविले, साक्षात् शिवछत्रपतींना ब्राह्मणी वर्चस्वाच्या अधीन झालेले पुरुष असे मानले, जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे पुरस्कर्ते, असा टिळकांवर आरोप केला आणि महात्माजींवरसुद्धां त्याच तऱ्हेचे आरोप करण्यास कमीं केलें नाहीं! अशा स्थितींत गेलीं शंभर वर्षे ब्राह्मणी धर्माचें तत्त्वज्ञान नष्ट करण्याचे स्वतः ब्राह्मणांनींच जे प्रयत्न चालविले आहेत त्याच्या मागची सद्भावना त्यांना कितपत मान्य होईल याची शंकाच आहे. पण तशी सद्भावना आहे असें क्षणभर गृहीत धरून त्यांनी ब्राह्मणांच्या या प्रयत्नांचा विचार केला तर त्यांच्या मनांतील कटुता बरीच कमी होईल असे वाटल्यामुळे त्यांना तशी नम्र विनंति करून हे विवेचन मी करीत आहे.
 विषमतामूलक ब्राह्मणी धर्म नष्ट करण्याचा सुधारकांनी प्रयत्न केलाच आहे. पण अर्वाचीन काळांत शास्त्री पंडितांनीसुद्धां या काम मोठा पुढाकार घेतला आहे. नारायणशास्त्री मराठे या थोर पंडिताला याचे बरेंचसे श्रेय आहे. त्यांच्याशिवाय विद्वद्रत्न के. ल. दप्तरी, महामहोपाध्याय काणे, विद्यावाचस्पति सदाशिवशास्त्री भिडे, महामहोपाध्याय पाठकशास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर्कतीर्थ पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांनी अविश्रांत परिश्रम करून, अनेक ग्रंथ लिहून धर्माला आलेले अमंगल रूप घालवून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोणावळ्याचें धर्मनिर्णयमंडळ हे त्याचेंच फल होय. हे मंडळ आतां जातिवर्णनिरपेक्ष कोणाचेहि धर्मसंस्कार वेदमंत्रांनीं करण्यास सिद्ध आहे. भिन्न जातीय विवाह करूं इच्छिणारांनाहि, अनुलोम प्रतिलोम कसलाहि विवाह असला तरी, मंडळ साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहे. तेव्हां आतां उच्चनीचतेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणधर्माचा ब्राह्मणांनींच कणा मोडून पाडला आहे यांत शंका नाहीं.
 ह्याचा अर्थ असा नव्हे कीं, समाजांतील ब्राह्मणवर्ग त्या जुन्या रूढीच्या दुष्ट वर्चस्वांतून पूर्णपणें मुक्त झाला आहे. तसें प्रतिपादन मला मुळींच करावयाचें नाहीं. अजूनहि सनातन धर्माला दृढपणे कवटाळून बसणारे अनेक ब्राह्मण शहरांतून आणि विशेषतः पाश्चात्य संस्कृतीपासून दूर असणाऱ्या खेड्यापाड्यांतून अनेक सांपडतील. स्वतःच्या श्रेष्ठपणाची प्रौढी मिरविणे, इतरांना हीन लेखणे त्यांचा संपर्क टाळणे, अंधपणेंच जुने आचारविचार चालवीत रहाणे, आपल्या आचारविचारउच्चाराने इतर जातींचीं, समाजांची मने कशी दुखवतात, त्यामुळे भिन्न जातींत कटुता कशी निर्माण होते व ही कटुता द्वेषभावनेंत परिणत होऊन समाजविघटनेस कशी कारण होते, याची फिकीर कधहि न करणे-हीं जी अपभ्रष्ट सनातन धर्माची लक्षणे ती त्यांच्या ठायीं अजूनहि दिसून येतात. तेव्हां ब्राह्मण समाज सर्वांगानें सुधारला आहे व सामाजिक पुनर्घटनेस सर्वस्वी अनुकूल भूमिका त्याने घेतली आहे, असा पक्ष मला अगदी मांडावयाचा नाहीं. मला ब्राह्मणेतरांच्या निदर्शनास एवढेच आणावयाचे आहे की ब्राह्मण जसा या जुन्या ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वांतून मुक्त झालेला नाहीं तसाच इतर कोणचाहि समाज त्यांतून मुक्त झालेला नाहीं. विकृत अशा सतातन धर्माचीं वरील सर्व लक्षणे मराठ्यांपासून शूद्रअतिशूद्रांपर्यंत प्रत्येक जातींत त्याच प्रमाणांत, आणि पाश्चात्य विद्या त्यांच्यांत कमी प्रसृत झालेली असल्यामुळे, थोड्या जास्त प्रमाणांत दिसून येतात. आणि म्हणूनच माझी त्यांना अशी प्रार्थना आहे कीं, याविषयीं भ्रामक समजुती निर्माण करून त्यांनी पूर्वीप्रमाणेच दुसरी एखादी विपरीत भूमिका घेऊं नये. मागल्या इतिहासाविषयीं अशाच भ्रामक समजुती त्यांनीं निर्माण केल्या. मागल्या सर्व अनर्थाची जबाबदारी ब्राह्मणांवर लादण्याच्या बुद्धीनें क्षत्रियांना त्यांनीं अत्यंत हीन व अवमानकारक भूमिकेवर आणून सोडले. महाराष्ट्रांतल्या मराठा समाजाने अंगीकारलेली ही भूमिका पाहून हा काय विनोद होता कीं दैवदुर्विलास होता, हेच कळत नाहीं. गेल्या आठ-नऊशे वर्षात या देशावर अरब, अफगाण, तुर्क, मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी आक्रमणे करून आपापली लहानमोठीं राज्य स्थापलीं. त्यांना ब्राह्मणी वर्चस्व सहज उधळून देतां आले. त्यांनी इतर प्रजेबरोबर ब्राह्मणांचेहि वाटेल ते हाल केले, त्यांचे समाजच्या समाज नाहींसे करून टाकले, त्यांचें सक्तीनें धर्मांतर अनेक वेळां अनेक ठिकाणीं केलें, आणि याविरुद्ध प्रतिकार करण्यांत ब्राह्मणांना, कांही अपवाद वजा जातां, इतर समाजाप्रमाणेंच केव्हांहि यश आले नाहीं. कोणीहि येऊन ब्राह्मणी वर्चस्वाचा असा धुरळा करून टाकण्यास समर्थ ठरत असतांना मराठ्यांनी मात्र आपणांत हें सामर्थ्य नाहीं, अशी भूमिका स्वीकारावी आणि इंग्रजांच्या स्वार्थीपणाची हजारों प्रत्यंतरें येत असतांना, त्यांना आपले उद्धारकर्ते मानून तिलाच दृढपणे चिकटून रहावें हें या भूमीचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव होय ! सुदैवानें १९३० सालापासून इंग्रजांच्या आश्रयानें आत्मोद्धार करण्याचे धोरण ब्राह्मणेतरांनी टाकले आहे. पण उच्चनीचतेच्या धर्माचे वर्चस्व सर्वच समाजावर आहे, या रोगांतून कोणीहि मुक्त नाहीं, ही भूमिका त्यांनी अजून स्वीकारली आहे, असें वाटत नाहीं. ब्राह्मण फक्त जुलमी, अन्यायी, विषमतेचे भोक्ते आणि बाकी सर्व महाराष्ट्रीय समान समतावादी, उदार, नव्या विचारसरणीचा, अशी अजून त्यांची भूमिका असल्याचे दिसते. यामुळे ब्राह्मण या जातीचें वर्चस्व नष्ट करण्यांत त्यांना यश मिळेल, पण ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व कधींच नष्ट होणार नाहीं.
 पुढील काळांत ब्राह्मणेतर समाजाचें पुढारीपण मराठा समाजाकडे येईल असें वाटते. विषमतेच्या ब्राह्मणी धर्माचे उपासक केवळ ब्राह्मणच नसून आपल्याहि अंगी तोच रोग आहे याची दखल त्यांनी घेतली नाही तर, त्यांना ब्राह्मणेतरांचें नेतृत्व करण्यांत यश येईल असे वाटत नाहीं. मराठा- मराठेतर चळवळ शाहू राजर्षींच्या देखतच कशी सुरू झाली हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या आधारे वर दाखविलेंच आहे. ब्राह्मणांना ज्या दुष्कर्मासाठी मराठे दोष देत आले, त्याच दुष्कर्मांत ते आतां आपल्या चळवळीचा बळी देत आहेत, असा ठाकरे यांचा स्पष्ट अभिप्राय आहे. म्हणजे मराठेतर लोक मराठ्यांवर नाराज आहेत. अस्पृश्य समाजांतहि असेच वारे वहात आहेत. अस्पृश्य हे या ब्राह्मणेतरांतून फुटून निघाले आहेत, आणि मराठा पुढारी स्वार्थांध आहेत, असा त्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. (अस्पृश्यांच्या चळवळीतील सावळा गोंधळ- भाई अमरसिंग) आणि मराठा समाजाने पहावयाचे ठरविलेच तर त्याला मराठेतर वर्गांच्या या प्रवृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध होतील. अस्पृश्य व आदिवासी हे समाज आतां जोरानें उठावणी करीत आहेत. यावेळी नगरपालिका, जिल्हाबोर्डे, काँग्रेस- समित्या, त्यांतील प्रमुख आसनें, सरकारी अधिकाऱ्यांची बरीचशी आसने आणि मंत्रीमंडळे यांवर सर्वत्र बव्हंशी मराठा वर्ग अधिष्ठित झालेला त्यांना दिसेल. अशा वेळी आपला सर्व समाज समतावादी, उदार असून विषमतेच्या ब्राह्मणी धर्मातून मुक्त आहे, असा खोटा डांगोरा हा नेतृत्व करणारा समाज पिटीत राहील तर स्वतःच्या समाजाची व इतर समाजांची पुनर्घटना करण्यांत तो अयशस्वी होईल; आणि मग ब्राह्मणवर्गाला एकजात जलुमी व अन्यायी ठरविण्यासाठी त्यांनी इतिहासाची जशी मीमांसा केली आणि ती सत्य मानून परावलंबनाची भूमिका जशी त्यांनी स्वीकारली, तशीच मीमांसा व तशीच भूमिका हे नवीन वर येणारे समाज व जुने मराठेतर पत्करतील.

भोळेपणाची भूमिका

 आपण फसलों, अपयशी झालों, आपल्यांत फूट पडली, आपण विषमता प्रस्थापित केली व अन्याय केला तर ते सर्व कोणातरी दुसऱ्या कारस्थानी समाजाच्या कारवाईला बळी पडल्यामुळे होय, आपल्या समाजाच्या अंगी वास्तविक ते दोष मुळींच नाहीत, आपला समाज भोळा भाबडा, श्रद्धाळू असा आहे, कारस्थान, कपट, त्याला कळत नाहीं, अशी भूमिका अजूनहि ब्राम्हणेतरांनी सोडली नसावी असे वाटतें. मुंबई प्रदेशांत मंत्रिमंडळांमध्ये महाराष्ट्राच्या वांट्याला महत्त्वाची खाती आलेली नाहीत, प्रतिनिधींच्या प्रमाणांत त्यांना मंत्रीमंडळांत जागाहि मिळालेल्या नाहीत, मुंबईचें प्रतिनिधित्व करण्याचा त्यांचा हक्क लाथाडण्यांत आला, अशा तऱ्हेची टीका एकेकाळी वर्तमानपत्रांत चालू होती. या टीकेंत प्रामुख्याने असा एक सूर होता कीं मराठ्यांना- हिरे,चव्हाण, या त्यांच्या प्रतिनिधींना- गुजराथ्यांनीं फसविलें, बनविलें, आणि म्हणून ही अवस्था झालेली आहे. कोणाच्या मतें ही फसवणूक ब्राह्मणांनी केली आहे. यावेळी मुख्य प्रधान वास्तविक भाऊसाहेब हिरे व्हावयाचे. ते न होण्याची कारणमीमांसा एका मराठा पत्रांत पुढील- प्रमाणे दिलेली आहे. बाळासाहेब खेर यांना मुरारजीच मुख्य मंत्रि व्हावे असें वाटत होतें. हिरे त्यांना नको होते. म्हणून त्यांनी बनाव असा घडवून आणला कीं हिरे यांना मुरारजीकडे पाठवून 'आपणच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे' असे हिरे यांचे तोंडून वदविलें. हिरे हे आपल्या योजनांच्या स्वप्नसृष्टीत दंग होते. त्यामुळे आपण कोणच्या कचाट्यांत सांपडलो आहों याचे त्यांना भान राहिले नाहीं. वगैरे. मुंबई विधिमंडळांतील मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा ही, मागील अंकावरून पुढे चालू, अशापैकी आहे. फसविणारा कपटकारस्थानी ब्राह्मण आणि फसणारे भोळे भाबडे, अजाण, अश्राप मराठे! कंसश्रीकृष्ण, कौरवपांडव, रामरावण हे सर्वं महात्मा फुले यांच्या मतें देवभोळे क्षेत्रपति होते. त्यांना ब्राह्मणांनीं फसविलें, त्यांच्यांत दुही माजविली व त्यांचा नाश केला. सातारचे शेवटचे छत्रपति प्रतापसिंह यांचे बंधु आप्पासाहेब हे स्वतःच त्यांच्याविरुद्ध जाऊन इंग्रजांस सामील झाले. त्याविषयी लिहितांना काशीनाथराव देशमुख म्हणतात की 'हा भोळा मराठा वीर' सांगलीकर व नातू यांच्या कारस्थानास बळी पडला. प्रत्येक ठिकाणी क्षत्रिय-मराठा हा भोळा आहे भाबडा आहे, त्याला स्वतःची कणखर बुद्धि नाहीं, स्वयंप्रभ कर्तृत्व नाहीं. त्याला ब्राह्मणांनीं फसविले, त्याला मोगलांनी फसविलें, त्याला इंग्रजांनी फसविलें, त्याला गुजराथ्यांनी फसविले, आणि आतां पुन्हां त्याला, त्याच्या हातीं सर्व राजसत्ता, बहुमताचा पाठिंबा, महात्मा फुले व राजर्षि शाहू यांनी निर्माण केलेली जागृति, हे सर्व असूनहि, ब्राह्मण फसवीत आहेत! आणि हे भोळे मराठे वीर फसत आहेत! भगवान् श्रीकृष्णापासून काँग्रेसमधील मराठयांपर्यत हाच प्रकार चालू आहे !
 मला एक सुदैवाची गोष्ट अशी वाटते की भाऊसाहेब हिरे व यशवंतराव चव्हाण यांनी ही भूमिका पत्करलेली नाहीं. आपण फसलों, आपल्या मनासारखें आपल्याला घडवितां आले नाही, असे त्यांना कदाचित् वाटतहि असेल. पण सर्व साधने व उपकरणे हाताशी असतांना आपल्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर लादून आपण भोळेपणाची सबब सांगावी, ही भूमिका त्यांना अत्यंत अवमानकारक वाटत असावी. आपण उत्कर्ष पावलों तर आपले आपण; आणि खाली गेलों, अपयशी ठरलों, तरी आपले आपणच; एका श्रेयाप्रमाणे दुसऱ्या अपश्रेयाचीहि जबाबदारी माझ्या शिरावर आहे, याच भूमिकेत स्वाभिमान आहे, व भावीं उत्कर्षांची बीजे आहेत असें त्यांचें मत असावें असे त्यांच्या भाषणांवरून दिसते. हे खरे असेल व त्यांच्या नेतृत्वानें हीच भूमिका ब्राह्मणेतरांनी पत्करली असेल तर महाराष्ट्राचा भाग्योदय लवकर होण्याची आशा धरण्यास हरकत नाहीं. कारण माझे असें निश्चित मत आहे की गेली शंभर वर्षे मराठा समाज जो मागासलेला राहिला आहे, आपले पूर्वकाळचे कर्तृत्व व पराक्रम त्याला प्रगट करता आला नाहीं, त्याचे कारण म्हणजे त्यानें पत्करलेली अत्यंत अवमानकारक अशी भूमिका हेंच होय. पूर्व इतिहासाची विपरीत मीमांसा करून सर्व अनर्थांची जबाबदारी ब्राह्मणांच्या माथीं लादण्यासाठी त्यानें महापराक्रमी क्षत्रियांना ब्राह्मणांच्या हाताखालचीं बाहुलीं ठरवून टाकले व त्यामुळेच ब्राह्मणी वर्चस्व मोडण्यास आपण असमर्थ आहों असें ठरवून, आपला उत्कर्ष इंग्रज करून देणार, ही मराठ्यांच्या क्षात्रतेजाला अत्यंत अवमानकारक अशी भूमिका त्यानें पत्करली. मराठा समाज हा मागासलेला राहिला त्याचें हें कारण आहे. याविषयीं थोडी शास्त्रीय चिकित्सा करून हें लांबलेले विवेचन संपवितो.

कर्तृत्वाची महाप्रेरणा

 कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका, या देशांकडे वाचकांनी जरा दृष्टिक्षेप करावा. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या युरोपांतल्या देशांतील अस्सल युरोपीय रक्ताच्या लोकांनींच वरील देश वसविलेले आहेत. तरी गेल्या शंभर दोनशे वर्षांत त्या देशांत (कादंबरी, काव्य, नाटक इ.) साहित्य, विज्ञान, घर्मसुधारणा, राजकीय नेतृत्व, तत्त्वज्ञान, रणपांडित्य, समाजसंघटना, इ. सांस्कृतिक क्षेत्रांत एकहि पुरुष शॉ, गालस्वर्दी, क्युरी, पाश्चर, न्यूटन, लूथर, लेनिन, स्टॅलिन, माओट्से टुंग, रसेल, मार्क्स, हिंडेनबर्ग, रोमेल, झुकॉव्ह, यांच्याइतका उंच गेलेला दिसत नाहीं. क्वचित् अपवाद कोठें असेल, पण एकंदरीने अशी थोर प्रतिभा, बुद्धिमत्ता व कर्तृत्व त्या देशांत दिसत नाहीं, हें खरें आहे. आणि याच लोकांनीं त्याच पद्धतीने वसविलेला अमेरिका हा देश पहातां तेथें सर्व प्रकारच्या कर्तृत्वास नुसते उधान आलेले दिसतें. वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, रूझवेल्ट, एडिसन, कॉम्टन, ग्रॅहम बेल, लेक, मायकेनसन, राइटबंधु, विल् ड्युरँट्, जॉन ड्यूई, पर्ल बक्, अप्टन सिंक्लेअर, हेलन केलर, जेन ॲडम्स, हेन्री फोर्ड, लिंडबर्ग असे राजकारणी, शास्त्रसंशोधक, तत्त्ववेत्ते, साहित्यविशारद अमेरिकेंत होऊन गेले व प्रत्यहीं होत आहेत इंग्लिश, फ्रेंच, डच, जर्मन हेच लोक कॅनडा, न्यूझीलंड, इ. देशांत आहेत. आणि तेच लोक अमेरिकेत आहेत. असे असतांना त्यांच्या चरित्रांत व कर्तृत्वांत एवढा फरक कां पडावा? याचें उत्तर माझ्या मतें एकच आहे. कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, व आस्ट्रेलिया येथील लोक आपल्या उत्कर्षासाठी, विशेषतः आपल्या संरक्षणासाठी, सर्वस्वी इंग्लंडवर अवलंबून आहेत. निदान आतांपर्यंत तरी होते. स्वतःच्या उत्कर्षाची व विशेषतः मरणमारणाच्या संग्रामाची जबाबदारी ते घेत नाहीत. या जबाबदारीचा अर्थ फार मोठा असतो. विज्ञान- संशोधन, शस्त्रास्त्राची तयारी, सर्व जगावर चौफेर सावध दृष्टि टाकीत रहाणे, संघटनेचें तत्वज्ञान सिद्ध ठेवून प्रसृत करणें, धर्म, नीति, यांची चिंता वाहणे या सर्वांचा अंतर्भाव यांत होतो. अशी ही राष्ट्राच्या मरण- मारणाच्या संग्रामाची जबाबदारी शिरावर घेऊन त्याची नित्य चिंता वाहणे ही कर्तृत्वाला चेतना देणारी अत्यंत श्रेष्ठ अशी प्रेरणा आहे. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाची चिंता मनुष्य करूं लागला की त्याला स्वतःच्या गुणांचा उपयोग करण्याचे कारण व संधि निर्माण होते. ज्याला हा उत्कर्ष साधावयाचा नाहीं, त्याची ज्याला फिकीर नाहीं, त्याच्या अंगीं मोठे गुण असले तरी ते कुजून सडून जातात. केवळ दोन एकर जमीन नांगरून पोराबाळांचें पोट भरणे, किंवा जरूर तेवढे मासे पकडून निर्वाह करणे, किंवा असलेली वाडवडिलांची मिळकत संभाळून विलास करणे, किंवा कारकुनी करून गुजारा करणे यापलीकडे ज्यांची दृष्टि जातच नाहीं, त्यांना तो संसार संभाळण्यासाठी शास्त्रसंशोधन, साहित्यलेखन यासाठी लागणारे गुण अंगी असले तरी त्यांची जरूरच लागणार नाहीं, आणि म्हणून त्या गुणांना चालना मिळणार नाहीं ! राष्ट्राच्या उत्कर्षाची चिंता, मरणमारणाच्या संग्रामाची जबाबदारी व कर्तृत्व यांचा संबंध हा असा अगदी उघड दिसणारा आहे. त्यांत गूढ असें कांहीं नाहीं. न्यूझीलंड, कानडा इ. देशांनी राष्ट्रीय उत्कर्षांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर कधींच घेतली नाहीं. आपल्यावर कोणी स्वारी केली तर ब्रिटन आपले रक्षण करील, या विचारानें ते निर्धास्त राहिलेले लोक आहेत. त्या लोकांच्या रक्तांत मोठे गुण, मोठे कर्तृत्व असले पाहिजे यांत शंका नाहीं. पण त्यांचा वापर करण्याचे त्यांना कारण पडत नाहीं. म्हणून ते उदयास येत नाहींत. उलट अमेरिकेनें ब्रिटनची सत्ता दीडशे वर्षांपूर्वीच झुगारून देऊन आपल्या उत्कर्षाची, प्रगतीची, विकासाची व अंतिम संग्रामाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ती घेतांच यक्षिणीची कांडी फिरावी तसा प्रकार होऊन तेथे सर्व प्रकारचे कर्तृत्व उफाळून वर आले.
 राष्ट्राच्या उत्कर्षाचे चिंतन सर्व प्रकारच्या कर्तृत्वाला प्रेरक होतें, हा सिद्धान्त मानवी समाजाबद्दल जे इतर अनेक सिद्धान्त प्रस्थापित झाले आहेत त्यांच्याइतका सत्य आहे. जड पदार्थाविषयींचे सिद्धान्त ज्याप्रमाणे शेकडां शंभर बरोबर ठरतात, त्याप्रमाणे समानशास्त्राचे सिद्धांत कधींच ठरत नाहींत. कारण मानवी मन हे जवळ जवळ अज्ञातच आहे. या मर्यादा ध्यानांत ठेवून वरील सिद्धांताचा वाचकांनी विचार केला तर त्याचा बराच प्रत्यय त्यांना येईल असे वाटतें.

अखिल राष्ट्राचें चिंतन

 माझ्या मतें मराठा समाज गेलीं शंभर वर्षे मागासलेला राहिला आहे त्याचें हें कारण आहे. राष्ट्राच्या उत्कर्षाचें चिंतन करण्याची प्रवृत्ति आपल्या देशांत अर्वाचीन काळांत तरी पाश्चात्य विद्येमुळे निर्माण झाली आहे. त्या पाश्चात्य विद्येची उपासना या प्राचीन काळच्या थोर व कर्तृत्वशाली समाजाने केली नाहीं. आणि ज्या थोड्या लोकांनी केली त्यांनी देशाच्या मरणमारणाच्या संग्रामांतून अलिप्त रहाण्याचे धोरण ठेविलें. त्यामुळे गेल्या शंभर वर्षात महात्माजी, सुभाषचन्द्र, योगी अरविंद, लजपतराय, पंडित जवाहरलाल, विवेकानंद, वल्लभभाई, रानडे, गोखले, टिळक, सावरकर, जगदीशचन्द्र, चंद्रशेखर रमण, रामानुजम् राधाकृष्णन्, रवींद्रनाथ यांच्याप्रमाणे सर्व क्षेत्रांत अखिल भारताचे नेतृत्व करणारे पुरुष त्या समाजांतून, त्यांच्या रक्तांत तें सामर्थ्य असूनहि, निर्माण झाले नाहींत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासांतहि डॉ. भाऊ दाजी, डॉ. भांडारकर, न्या. तेलंग, चिंतामणराव वैद्य यांसारखे संस्कृत पांडित्य, हरीभाऊ, देवल, खाडिलकर, गडकरी यांसारखी साहित्यप्रतिभा, शिवरामपन्त परांजपे, डॉ. जयकर यांसारखें वक्तृत्व, चिंतामणराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ यांच्यासारखें अर्थकोविदत्व, आणि गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास- संशोधन इ. क्षेत्रांतील पारंगतता प्राप्त करून घेऊन, राष्ट्रीय प्रपंचाच्या या सांस्कृतिक क्षेत्रांतहि त्यांना प्रगति करतां आली नाहीं. ब्राह्मणेतरांतील जे मराठेतर वर्ग, त्यांतले लोक पूर्वकाळांतहि या क्षेत्रांत अग्रभाग फार थोडे आले होते. त्यामुळे त्यांनी अर्वाचीन काळीं या क्षेत्रांत अजून पाऊल टाकले नसले तर त्यांत एवढेसे आश्चर्य नाहीं. पण मराठा समाजाचा मागासलेपणा हा अगदीं असमर्थनीय आहे. चाफेकर, सावरकर, बापट, कान्हेरे यांचा मार्ग त्यांना ब्रिटिश साम्राज्यावरील निष्ठेमुळे मान्य नसणे हे ठीक होतें. पण आय्. सी. एस्. चा मार्गहि त्यांनी अनुसरला नाहीं ! तो त्यांनी अनुसरला असता तर पाश्चात्य विद्येची उपासना त्यांना घडली असती. आणि मग, त्याच क्षेत्रांत नव्हे तर राष्ट्रीय प्रपंचाच्या सर्वच क्षेत्रांत ते अग्रमालिकेत येऊन उभे राहिले असते.
 सुदैवानें १९३०-३५ सालापासून अखिल ब्राह्मणेतर वर्ग हा राष्ट्राच्या मरणमारणाच्या संग्रामांत उतरला आहे. आपला उद्धार इंग्रज करतील, ही परावलंबनाची भाषा त्याने तेव्हांपासून सोडली आहे. पाश्चात्य विद्येची महतीहि आतां त्यानें जाणली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे थोर कार्यकर्ते ब्राह्मणेतरांत या विद्येचा आणि विशेषतः तिला आवश्यक असणाऱ्या तपोनिष्ठेचा प्रसार करण्यासाठी सर्वस्व अर्पण करीत आहेत. यामुळे त्या समाजाच्या कर्तृत्वाला बहर येईल व सर्व क्षेत्रांत तें फुलू लागेल, अशी निश्चित आशा वाटते.
 असो. या तऱ्हेने सर्व क्षेत्रांत कर्तृत्व बहरूं लागले म्हणजे बहुधा ब्राह्मणेतर समाज अत्यंत कठोर अशा आत्मनिरीक्षणास सिद्ध होईल. आणि मग स्वतःच्या समाजाला अत्यंत अवमानकारक अशी प्राचीन इतिहासाची मीमांसा टाकून देऊन त्या काळच्या श्रेयाप्रमाणेच अपश्रेयाचीहि भागीदारी तो स्वीकारील हें निश्चित. कारण अशी अपयशाची जबाबदारी टाळल्याने आपलाच अधःपात होतो, असे त्याच्या ध्यानांत येईल. असें झाले तर चालू इतिहासांतहि दर ठिकाणी भोळेपणाची भाबडेपणाची भूमिका घेऊन आपल्या अपयशाचें खापर दुसऱ्याच्या माथीं फोडण्याऐवजी आम्ही चुकलों, फसलों, घसरलों, तर त्याला आमचे आम्ही जबाबदार आहों, आणि आमच्या चुका आम्ही निस्तरणार आहों अशा रगदार, व स्वाभिमानी भावनेची जोपासना त्यांच्या ठाय निश्चित होईल; आणि मग ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचें मूळच उपटल्यासारखे होऊन आपला समाज एकसंघ होण्याची आशा धरतां येईल. यायोगे आणखीहि एका दृष्टीने प्रगति होण्याचा संभव आहे. जातिभेद नष्ट व्हावा व सर्व महाराष्ट्रीय समाज एक रक्ताचा व्हावा अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान सध्यां प्रसृत होत आहे. ब्राह्मणब्राह्मणेतरांतील कटुता कमी होऊन हे दोन समाज जवळ आले तर त्या तत्त्वज्ञानाला जोर व वेग प्राप्त होऊन कदाचित् ते प्रत्यक्षांत येण्याची आशा निर्माण होईल.
 ब्राह्मणब्राह्मणेतर या विषयाचे विवेचन येथे संपले, आपला सर्वच समाज, त्याचे सर्वच घटक विषमतेच्या, संकुचित दृष्टीच्या रोगानें ग्रस्त आहेत आणि येथल्या प्राचीन काळच्या व आतांच्याहि उत्कर्षाची व अधःपाताची जबाबदारी सर्वांवरच आहे, श्रेयाप्रमाणे अपश्रेयाला सर्वच भागीदार आहों, अशी या विवेचनामागली भूमिका आहे. ती मान्य झाल्यास येथले बरेचसे प्रश्न सुटतील आणि भारतीय लोकसत्ता यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होईल असे वाटते.



प्रकरण तेरावें
सामाजिक पुनर्घटना
अस्पृश्य व आदिवासी

 स्वातंत्र्याच्या उत्तरकाळांत एकंदर भारतीय जीवनाची पुनर्घटना करण्याचे प्रयत्न काँग्रेसनें व इतर कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्यांपैकी राजकीय व आर्थिक पुनर्घटनेच्या प्रयत्नांच्या यशापयशाचे मोजमाप आपण प्रथम केले आणि त्यानंतर आतां सामाजिक पुनर्घटनेचा प्रश्न विचारार्थ घेतला आहे. मागें जागोजागी अनेक वेळां हे सांगितले आहे कीं, धर्म, पंथ, जाति, वर्ण,