भावार्थ रामायण/अध्याय पहिला
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय पहिला ॥
॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥
जातो वंशे रघूणां मुन्वरवचनात् ताटकां ताडयित्वा कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् । प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥
श्रीगणेश वंदन
ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या । वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥ तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप । तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥ यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी । तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश । आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥ ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन । माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥ ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न । उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥
श्रीसरस्वती वंदन
आतां वंदूं सरस्वती । जे चित्तचेतना चैतन्यशक्ती । जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती । अमूर्ताची मूर्ति स्वरूप जिचें ॥ ७ ॥ हंसवाहिनी हा शब्द रूढ । परी तें परमहंसी आरूढ । गुह्यार्थ जे अति गूढ । ते दावी उघड ग्रंथार्थीं ॥ ८ ॥ परमहंस अंशाअंशीं । शोभा शोभे अहर्निशी । सत्त्वातीत शुद्धतेसीं तोचि निजांगासी शुभ्रवर्ण ॥ ९ ॥ ॐकार तो तिचा वीणा । त्रिमात्रा तिन्हीं तंती गहना । वेदोपनिषद पुस्तक जाणा । अर्थवी अर्थना परमार्थता ॥ १० ॥ ऐसी अगाधत्वें अति सुंदर । प्रभा परमार्थै मनोहर । जेणें प्रकाशे चराचर । तो मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी ॥ ११ ॥ ऐसी ऐकोनी स्तुती । सुप्रसन्न सरस्वती । स्वभाएंतिची वदनीं वस्ती । या वचनोक्ती ते वदवी ॥ १२ ॥ ते म्हणे गा रामकथेतें वेगीं चालवीं भावार्थें । सद्भावें होईल सरतें । प्रिय संतांतें मी करीन ॥ १३ ॥
श्रीसंत वंदन
आता वंदूं संतसज्जन । जे आर्तचातकां चिद्घन । त्रिविध तापां उपशमन । जे निजजीवन साधकां ॥ १४ ॥ ज्यांची सहज झाल्या संगती । सकळ कर्मां होय निवृत्ती । स्वधर्म सच्छांती येती । भावार्थें प्राप्ती परमार्था ॥ १४ ॥ सत्संगाचे निजमेळीं । परमार्थ जाय पाल्हाळीं । लगडोनि ये स्वानंदफळीं । सर्वकाळीं सफळित ॥ १६ ॥ बीजत्वाचा ना फेडिजे देंठ । आदि मध्य नाकळे शेवट । स्वानंद रसाळ फळघोंट । अनुभव स्पष्ट सत्संगें ॥ १७ ॥ ऐसिया संतांचे महिमान । आकळे ऐसें कैंचें ज्ञान । बालत्वें वोलिलो तें न्यून । द्यावें अवधान कथेसी ॥ १८ ॥ ऐसें ऐकोनि वचनस्तवन । सुखावले संतसज्जन । तुझे मनोगतीं आमुचें मन । सदा सावधान ग्रंथार्थीं ॥ १९ ॥ आम्हांसी आवडे रामकथा । तेथेंही तूं रसाळ वक्ता । तरी स्तुती सांडोनि आतां । वदें ग्रंथार्था अर्थान्वयें ॥ २० ॥
श्रीकुलदेवता वंदन
आतां वंदूं कुळदेवतां । जे नामरूपें एकनाथा । एकपणादेही माथां । नांदवी निजभक्तां निजान्वयें ॥ २१ ॥ ऐकोनि सद्गुरूची बोली । बोधपरशुरामें निवटिली । अनेकत्व सोडोनि वहिली । स्वयें उठली एकत्वें ॥ २२ ॥ ते एकरूपें एकनाथा । मूळान्वयें कुळदेवतां । एकाकारावांचूनि सर्वथा । द्वैताची कथा करूं नेदी ॥ २३ ॥ एकपणजनीं वनीं । एकपण मनीं नयनीं । एकपण त्रिभुवनीं । नांदवीं म्हणोनि कुळदेवाअ ॥ २४ ॥ ब्रह्मा आणि हरि हर । त्रिगुणी तेन्ही अवतार । मी त्रिगुणांच परी प्रियकर । केलों साचार एकात्मता ॥ २५ ॥ ब्रह्मा आणि हरि हर तियेचें खेळणें जगडंबर । मज खेळावया चिदंबर । देवोनि प्रियकर कुळदेव्या केलों ॥ २६ ॥ ते जय जय जगदंबा । उदो म्हणे ग्रंथारंभा । श्रीरामकथेची शोभा । अति वल्लभा मजलागीं ॥ २७ ॥ तेंचि भावार्थरामायण । तुज करितां निरूपण । न्यून तें तें करीन पूर्ण । कथा संपूर्ण संपादी ॥ २८ ॥
श्रीसद्गुरु वंदन
आतां वंदूं सद्गुरू । जो स्वानंदबोधवज्रपंजरू । ज्याचेनि हा संसारू होय सुखकरू तरणोपाया ॥ २९ ॥ जेणें कस्तकीं ठेवितां हात । अहंभावा होय घात । सोहंभाव होय प्राप्त । दावी अप्राप्त अद्वयानंद ॥ ३० ॥ जन तोचि जनार्दन । जनार्दन सकळ जन । एका जनार्दना शरण । मीतूंपण विरालें चिदन्वयें ॥ ३१ ॥ जनार्दना पढिये एकपण । एका पढिये जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न । अनन्य शरण या नांव ॥ ३२ ॥ जनार्दन माझे मन । जनार्दन माझे नयन । जनार्दन वदतें वदन । वक्ता वचन श्रीजनार्दन ॥ ३३ ॥ जनार्दन गतीची गती । जनार्दन मतीची मती । जनार्दन स्फुरे स्फूर्तीं । सकळ व्युत्पत्ति जनार्दन ॥ ३४ ॥ निजांगें जो सकळ जन । यालांगी नांवे जनार्दन । लिंगदेहा करी मर्दन । यालांगी जनार्दन व्युत्पतिव्याख्या ॥ ३५ ॥ येथे तो कर्ता मी अकर्ता । हेंही बोलणें अति मूर्खता । मी कर्ता तो अकर्ता । हे परम मूर्खता सोलींव ॥ ३६ ॥ यापरी मीतूपण । दूरी दवडो जनार्दन । बोलवी भावार्थ रामायण । कथानिरूपण चालवी ॥ ३७ ॥
रामायणाचे मूळ कारण
अजापास्नि उत्पत्तिजेत । दशेंद्रियें अति समर्थ । जन्मला राजा दशरथ । अतिविख्यात तिहीं लोकीं ॥ ३८ ॥ मूळचे अजत्व लोपोनि चृष्टी । अजन्मा राम जन्मेल पोटीं । हे रामायणींची मूळ गोष्टी । शास्त्रपरिपाठी परमार्थ ॥ ३९ ॥ रावणाचे नित्यांकित । सुरवर झाले जी समर्थ । ब्रह्मादिकां चिंता अद्भुत । तिहीं रमानाथ प्रार्थिला ॥ ४० ॥ करावया राक्षसांचा घात । मी अवतरेन रघुनाथ । रमा मुख्य कलहा हेत । इचेनि अंत निशाचरां ॥ ४१ ॥ तुम्ही सकळही सुरवर । वेगीं व्हावें वानर । आम्ही दोघें धरोनि अवतार । सत्य करूं वचनार्थ ॥ ४२ ॥ फेडावया देवांची सांकडी । स्वधर्म वाढवावया वाढी । नामें मोक्षाची उभवावया गुढी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ४३ ॥
राजा दशरथाची कथा
ते सूर्यवंशीं अजाचा सुत । अहमात्मा जन्मला दशरथ । ऐका त्याचा वृतांत धर्मयुक्त स्वधर्मीं ॥ ४४ ॥ त्यासी तिघी राणिया प्रबुद्धा । लोकोत्तर अति प्रसिद्धा । धर्मपत्न्यां विशुद्धा । नामानुवावा अवधारा ॥ ४५ ॥ ज्येष्ठ कौसल्या ते सुद्विधा । सुमित्रा ते शुद्ध मेधा । कैकेयी ते अविद्या । मंथरा कुविद्या तीपासीं ॥ ४६ ॥ उदरा येईल आदिमूर्तीं । त्या आधी नव्हती संतती । अपुत्रपणें नृपती । पुत्रार्थीं उद्यत ॥ ४७ ॥ सुख नेदी राजभुवन । सुख नेदी सिंहासन । सुख नेदी भोगस्थान । मान सन्मान सुख नेदी ॥ ४८ ॥ सुख नेदी अलं कार वस्त्र । सुख नेदी भोग कलत्र । सुख नेदी छत्र चामर । स्तुतिस्तोत्र सुख नेदी ॥ ४९ ॥ राजा पोटांतून भोगीं विरक्त । यालागीं पोटा येईल रघुनाथ । जो अत्यंत विषयासक्त । त्यासी भगवंत स्पर्शेना ॥ ५० ॥ जेवीं आंधळे न देखे पिता । तेवी विषयी नेणती भगवंता । तोच त्यांचा प्रतिपाळिता । देखणी अवस्था त्यां नाहीं ॥ ५१ ॥ दशरथा न गमे जनस्थानीं । निघाला पारधीलागीं वनीं । विचरे एकाकी होऊनी । आवडे विजनीं रहिवास ॥ ५२ ॥ दुसरियाचा सहसा घात । सर्वथा न मानी दशरथ । हृदयीं कळवळला रघुनाथ । झाला विरक्त सर्वार्थीं ॥ ५३ ॥ वनीं एकाकी विहार । करी वनफळांचा आहार । नावडे राजोपभाग उपचार पुत्रार्थीं थोर साक्षेपीं ॥ ५४ ॥
श्रावणाची कथा
होणारासारखी बुद्धी । मांडली निशि अवस्था पारधी । अंधारीं श्रावणातें वधी । मातापिता खांदी कावडीसी ॥ ५५ ॥ लौकिकाची लोकवार्ता । श्रावणें पितरें कावडी ठेवतां । हे तंव समूळ अबद्ध कथा । तो मातापिता न विसंबे ॥ ५६ ॥ अंधारीं अंध माता-पिता । झाडीं ठेवी हे मिथ्या वार्ता । खांदीं घेवोनि ताता । जीवनार्थ तो आला ॥ ५७ ॥ बुडबुड कमंडलूच्या शब्दीं । ध्वनी उठली जळसंनिधी । दशरथ केवळ शब्दवेधी । बाणवेधी विंधिला ॥ ५८ ॥ धाव लागता संपूर्ण । काय बोलिला श्रावण । कोण्या सभाग्याचा बाण । रामस्मरणेंसी आला ॥ ५९ ॥ श्रावणासी बाण लागतां । नठवेचि मातापिता । नाठवेचि देहममता । राम स्मरतां देह त्यागी ॥ ६० ॥ अंतरीं श्रीरामस्मरण । परम भाग्य हें कल्याण । बाण नव्हे तो ब्रह्म पूर्ण । स्मरणेंसीं प्राण त्यागिला ॥ ६१ ॥ दशरथ बोलिला आपण । कोण्या साधूचें हें वचन । माझ्या पापाचें न्र्दळण । केलें संपूर्ण रामनामें ॥ ६२ ॥ श्रीरामनाम स्वयें ऐकतां । रायासी न बाधे ब्रह्महत्या । रामस्मरणें देह त्यागितां । नित्य मुक्तता श्रावणासी ॥ ६३ ॥ रामनामें नित्य निर्धूत । एक मुक्त एक पापातीत । ब्रह्महत्येसीं दशरथ । अति अलिप्त रामनानें ॥ ६४ ॥ दशरथ जंव येवोनि पाहे । तंव श्रावण बाणें विंधिला आहे । त्याच्या पितरें पुत्रमोहें । राजा लवलाहें शापिला ॥ ६५ ॥ आम्हांसी दिधले पुत्रदुःख । तूही पावसी पुत्रशोक । शापें रायासी परम हरिख । मी पुत्रमुख देखेन ॥ ६६ ॥ ब्राह्मणशाप नव्हे वृथा । मी पुत्र पावेन सर्वथा । परम आल्हाद दशरथा । आनंद चित्ता वोसंडे ॥ ६७ ॥ शाप नव्हे परमामृत । उल्हासे रायाचें चित्त । पोटीं प्रकटेल रघुनाथ । शाप दशरथा सुखरूप ॥ ६८ ॥ पुत्र झाले इत्थ्ंभूत । ऐसा मानिला निश्चितार्थ । हृदयीं संचरला रघुनाथ । उद्वेगरहित यालागीं ॥ ६९ ॥ शाप देवोनि दारुण । तिहीं दोघीं सांडिला प्राण । तिघांसी देवोनि दहन । उत्तरविधान करविले रायें ॥ ७० ॥
श्रावणाचा पूर्वजन्म वृत्तांत
जळचर पक्षियांचे युग्म । त्यांसी एका मीनासी मित्रत्व परम । तयां समकाळें मरणधर्म । झाला तो जन्म मागील ॥ ७१ ॥ आटतां देखोनि सरोवरा । शीतळ निशिये चंचुभारा । धरोनिया तया मकरा । अगाध नीरा स्नेहें नेत ॥ ७३ ॥ तंव मार्गीं वन तें नवखंड । तेथोनि उसळले बेलुकांड । तें मत्स्यांतें लागता चंड । पहिला दुखंड धरणिये ॥ ७३ ॥ तेणें दुःखे गृध्रीं दोघीं । देह ओपिले तयालागीं । तेचि ऋणानुबंधयोगी । धरिले तिघीं नरदेह ॥ ७४ ॥ मत्स्य तोचि श्रावण जनीं । पक्षिये ते जनक जननी । एके अवसरीं निमाले तिन्ही । ऐसी पुराणीं मूळकथा ॥ ७५ ॥
ब्रह्महत्येचे दुष्परिणाम
राजा रामनामें दोषातीत । तरी लोकप्रवृत्तिशास्त्रार्थ । अश्वमेध करी दशरथ । वसिष्ठयुक्तविधाने ॥ ७६ ॥ फेडावया ब्रह्महत्याडाग । केला अश्वमेधयाग । राजा शुद्ध झाला सांग । परी राष्ट्रीं भंग मांडिला ॥ ७७ ॥ जें राज्यीं ब्रह्महत्या घडे । ते राज्यीं पर्जन्य न पडे । शुक्रें धरियले पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ॥ ७८ ॥ तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले । वृक्ष शेंडियास वाळले । सरितांचे शोषिले जळस्रोत ॥ ७९ ॥ प्रजा घरोघरी आक्रंदती । गाई हंबरडा फोडिती । द्विजांची नित्यकर्में राहती । हाहाभूत क्षितीं प्राणिमात्र ॥ ८० ॥
दैत्यगुरूशी दशरथाचे युद्ध
देखोनि भूतांची दशा ऐसी । राजा कळवळला मानसीं । शुक्रें धरिलें पाणियाडासी । त्यासी युद्धासी निघाला ॥ ८१ ॥ दशरथाची शक्ति कैसी । रथ चालविला स्वर्गासी । कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे ॥ ८२ ॥ तुम्ही जाल स्वर्गाप्रती । मी पाहीन स्वर्गसंपती । वसिष्ठ म्हणें न्यावें निश्चिंती । भविश्यस्थिती जाणोनि ॥ ८३ ॥ रायासीं तिचे अति प्रीती । प्रीतीनें बैसविली रथीं । क्षणार्धें शक्रलोकप्रती । आला भूपति संग्रामा ॥ ८४ ॥ परम योद्धा श्रीरामजनक । देखोनि शुक्रें घेतला धाक । साह्य दैत्यसेना अनेक । दशरथें एकैक खिळिले बाणीं ॥ ८५ ॥ वृषपर्वा तेजोराशी । रायें विरथ केले त्यासी । मुकुट पाडोनि भूमीसीं । मोकळे केशीं पळविला ॥ ८६ ॥ वृषपर्वा जो दैत्यनाथ । युद्धीं झाला हताहत । देखोनि दैत्यसेना समस्त । पळे कुंथत रणघायीं ॥ ८७ ॥ शुक्रें युद्ध केलें अनेक । दशरथ योद्धा अति अचूक । सिंहनाद करोनि देख । शुक्रासंमुख लोटला ॥ ८८ ॥ शुक्रें केले अलोलिक । अचूक छेदिला रथाचा आंख । कैकेयीनें बाहु घातला देख । तेणें पराङ्मुख नव्हेचि राजा ॥ ८६ ॥ रामप्रताप दशरथ पोटीं । तेणें झांकली शुक्राची दृष्टी । धाकें पळे उठाउठीं । दिधली पाठीं संग्रामी ॥ ९० ॥
दशरथाचा विजय
ब्राह्मण म्हणोनि राखिला हात । येरवीं तत्काळ करिता घात । विजयी झाला जी दशरथ । हर्ष अद्भुत सुरनरां ॥ ९१ ॥ मोकळे झालें पाणियाडें । तत्काळ तेथें पर्जन्य पडे । फिटले गाईंचे साकडें । ब्राह्मणीं रोकडे मांडिले याग ॥ ९२ ॥ चालिले सावास्वधाकार । हरिखले देव पितर । दशरथावरी अपार । सुमनसंभार वर्षले ॥ ९३ ॥ अवघे करिती जयजयकार । इंद्रासी आल्हाद अपार । दैत्य पराहविले थोरथोर । तेणें अमरेंद्र संतोषला ॥ ९४ ॥ दिव्यांबरे अलंकार । रायासी दिधले अपार । इंद्रें सन्मान केला थोर । अवघे सुरवर संतुष्ट ॥ ९५ ॥ पराभविलें दैत्यगुरूसी । अति आनंद बृहस्पतीसीं । तेणें सन्मानिलें दशरथासी । धरिले पोटासीं स्वानंदे ॥ ९६ ॥
बृहस्पतींचा वर
देवगुरु वरद वदत । जे जे तुझे मनोरथ । सिद्धि पावतील समस्त । जाण निश्चित नृपनाथा ॥ ९७ ॥ तुज होईल पुत्रसंतती । ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती । याग करावा अयोध्येप्रती । विभांडकाहातीं पुत्रेष्टी ॥ ९८ ॥ विभांडक नित्य वनवासी । तो भेटी न देईल तुम्हांसी । मृगीसुत पुत्र त्यासी । ऋष्यश्रृंग तया नाम ॥ ९९ ॥ तो प्रमदामदें वेधवोन । नगरा आणावा छळून । येतांच त्याचें आपण । करावें लग्न निजकन्येसी ॥ १०० ॥ तुज नाहीं गा संतान । यालागीं तुझा निजमित्र शांतन । तेणें तुज दिधलें कन्यारत्नी । ते शांतनेसीं लग्न करावें ॥ १ ॥ इंद्र म्हणे दशरथासी । आणावया ऋष्यश्रृंगासी । अप्सरा धाडीन तुजपासीं । त्या तत्काळ त्यासी आणतील ॥ २ ॥
कैकयीला राजाचे वरदान
युद्धीं रथीं सूदलें बाहूसी । राजा तुष्टला कैकेयीसी । म्हणे देईन जें जें मागसी । ऐसी भाक तिसीं दिधली ॥ ३ ॥ तंव ते बोलली आपण । तुझेनि मज काय अपूर्ण । स्वर्गादि दिव्य भूषण । मी भोगी आपण तुझेनि ॥ ४ ॥ कल्पतरुपारिजातमाळा । तुझेनि शोभती माझिया गळा । स्वर्गसुखाचा सोहळा । भोगिजे स्वलीळा तुझेनि ॥ ५ ॥ येणेंचि शरीरें आपण । तुझेनि भोगी स्वर्गभुवन । तुझेनि आम्हा काय न्यून । मी सुखसंपन्न तुझेनि ॥ ६ ॥ हासोनी बोलली रायासी । तुम्हीं मज दिधले भाकेसी । ते मी मागेन काळविशेषी । यथाकाळेंसीं अनुकूल ॥ ७ ॥ राजा म्हणे सत्य वचन । हें माझें भाष्यवरदान । जेव्हा तूं मागसील आपण तत्काळ जाण मी देईन ॥ ८ ॥ ऐसी दशरथाची ख्याती । स्वर्गीं देव वानिताती । दिग्गज वर्णिती दिगंती । कीर्ति त्रिजगतीं विस्तारली ॥ ९ ॥ यश कीर्ति औदार्य । गुणगांभीर्य अति धैर्य । दशरथाचे वीर्य शौर्य । स्वर्गीं सुरवर वानिती ॥ ११० ॥ देवां दैत्यगुरु अदट । त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ । वीर दशरथ सुभट । प्रवाद पाठ तिहीं लोकीं ॥ ११ ॥ उदरा येईल रघुनाथ । सकळ संपदा आलिया तेथ । श्रिया विराजमान होत । श्रीमंत दशरथ यालागीं ॥ १२ ॥ स्वर्गीं दशरथ भूपाळ । इंद्रे राहविला बहुकाळ । अति प्रीतीचा कल्लोळ । दिव्य भोग सकळ भोगविले ॥ १३ ॥ अयोध्येत दशरथाचे अपूर्व स्वागत येवढेनि बहुमानैश्वर्येंसीं । राजा आला अयोध्येसीं । मखरें तोरणें चौपासीं । नरनारींसी आल्हाद ॥ १४ ॥ घरोघरीं गुढिया उभारिती । पदोपदीं आरत्या करिती । बंदिजन कीर्ति गाती । ओंवाळिती धनधान्यें ॥ १५ ॥ ब्राह्मण जपती शांतिपाठ । भाट गर्जती उद्भ॥ट । नरनारी पाहती घनदाट । पायवाटे नेती घडिया ॥ १६ ॥ दशरथाचा प्रताप गहन । मी बोलिलो अल्प जाण । सकळ आकळिता निरूपण । कथा असाधारण वाढेल ॥ १७ ॥ अफाट न करावा ग्रंथ । ग्रंथीं बोलावा मुख्यार्थ । पदीं दावावा परमार्थ । हा निजस्वार्थ कवित्वाचा ॥ १८ ॥ एका जनार्दना शरण । दशरथप्रतापलक्षण । कथा झाली हे संपूर्ण । श्रीरामागमन अवधारा ॥ ११९ ॥ स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां दशरथविजयाभिगमनं नाम प्रथोमोऽध्याय ॥ १ ॥ ॥ ओव्या ११९ ॥ श्लोक २ ॥ एवं १२१ ॥