भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय १२

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय बारावा ॥

ताटिका वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हे रामायणी निजकथा । जैं आदरें ऐके श्रोता ।
तैं पापपुण्यांच्या करी घाता । स्वभावता नित्यमुक्त ॥१॥
कथाश्रवणें नित्यमुक्त । हाही नवलाव नव्हे येथ ।
अक्षरीं अक्षर अक्षरार्थ। श्रीरघुनाथकथार्थें ॥२॥
पढतां रघुनाथचरित्र । श्रोते वक्ते नित्य पवित्र ।
धन्य ऎकती त्यांचे श्रोत्र । धन्य वक्त्र वदत्याचें ॥३॥
धन्य धन्य वाल्मीकि मुनी । श्रीरामकथा वदली वाणी ।
कथा त्रैलोक्यपवनी । भवमोचनी चरितार्थ ॥४॥
रामनाम दों अक्षरीं । कुंटिणी वंदिजे सुरवरीं ।
ऐशी कथेची अगाध थोरी । ते कोणें वॆखरीं वानावी ॥५॥
हें असो पूर्वकथासंबंधीं। श्रीरामासी लागे समाधी ।
ते स्वयें वसिष्ठ उद्बोधी । ते कथाविधी अवधारा ॥६॥
श्रीराम जाला सावधान । प्रपंचपरमार्थस्थितीं समान ।
हे वसिष्ठांचे पूर्णपण । श्रीरामीं संपूर्ण बिंबले ॥७॥
सर्वेंद्रियी वित्समाधान । मिथ्या समाधिव्यत्थन ।
कर्म क्रिया ब्रह्मपूर्ण । ऐसा सावधान श्रीराम॥८॥

श्रीराम सावध झाल्यामुळे सर्वांना आनंद :

देखोनि श्रीराम सावधान । विश्वमित्रा आनंद गहन ।
सुखावोनि सुगरण । केली संपूर्ण पुष्पवृष्टि ॥९॥
सुरी दुंदुभी त्राहाटिल्या भेरी । निशाण त्राहाटिलें राजद्वारीं।
गगन गर्जें जयजयकारीं। पूर्ण सुरनरीं आल्हाद ॥१०॥
विश्वामित्राच्या यज्ञार्थ । स्वयें जाइल रघुनाथ ।
वसिष्ठें पाहोनी सुमुहूर्त । आल्हदे दशरथ प्रयाण करवी ॥११॥
करोनियां पुण्याहवाचन । राजा सवें सैन्य दे संपूर्ण ।
तें वसिष्ठें निवरून । रामलक्ष्मण रथारूढ करावी ॥१२॥

श्रीराम रथारूढ होऊन निघाल्यावर राजाची विश्वामित्रांना विनंती :

राजा म्हणे विश्वमित्राप्रती । मीं आत्मा दिधला तुझें हातीं ।
यावरी तूं कृपामूर्ती । जाणसी त्या रीतीं संरक्षीं ॥१३॥
वसिष्ठ म्हणे विश्वामित्रासी । तुज गुरूत्व यावें सुर्यवंशीं ।
धनुविद्या सबीजेंसीं । श्रीरामासी उपदेशीं ॥१४॥
ऐकोनी वसिष्ठचे वचन । विश्वमित्रें केले नमन ।
तूं अंतरात्मा आपण । मनोगत पूर्ण जाणसी माझें ॥१५॥
जाणोनी माझे मनोगता । शिष्य करावें म्हणसी रघुनाथा ।
तुजहीपरता ज्ञाता । आणिक सर्वथा असेना ॥१६॥
आपुलिय सच्छिष्यासी । कोणीं न द्यावें उपदेशासी ।
हें वसिष्ठ साजे तुजपासीं । इतर ऋषींसी अति अभिमान ॥१७॥

श्रीरामांना धनुर्विद्या शिकविण्यासंबंधी वसिष्ठ विश्वमित्रांची एकवाक्यता :

वसिष्ठ म्हणे विश्वामित्रासी । मी तूं नाहीं आम्हां तुम्हांसी ।
यालागीं तूं श्रीरामासी । अवश्य होसी गुरूत्वें गुरू ॥१८॥
दोघां मुनींच्या वचनार्था । ऐकोनि आल्हद रघुनाथा ।
दोहीं मुनींचे निज ऐक्यता । उल्हासें रघुनाथ रथारूढ ॥१९॥
जीवासवें जैसा प्राण । तैसा रामासवें लक्ष्मण् ।
तेणेंही केले रथारोहण । धनुष्यबाणतूणीरेंसी॥२०॥

श्रीरामांच्या प्रयाणसमयी झालेले शुभ शकुन :

श्रीराम करितां प्रयाण । स्वयें पाहे शकुन ।
दोघे द्विज प्रसन्नवदन । फ़ळेंसी पूर्ण भेटले ॥२१॥
पूर्णकलशीं सालंकृता । पुढें भेटल्या पंच योषितों ।
दधि क्षीर नवनीत माथां । गोपवनितों भेटल्या ॥२२॥
अपूर्व अमृत फ़ळे क्षीरघागरी । दध्योदनेंसीं वायन करीं ।
हातीं कुमर कडे नोवरी । पुढे एक नारी भेटली ॥२३॥
सत्य जाती वायस । अपसव्य जाती तास ।
सन्मुख भेटले राजहंस । मुक्ताफ़ळंचे घोंस मुखीं धरूनी ॥२४॥
दक्षिणे जाती मृग कृष्णवर्ण । वामांगगामी मृगी पूर्ण ।
भारद्वाजाचें वाम उड्डाण । नकुळही आपण वामांगी सरके ॥२५॥

वसिष्ठांकडून शकुनांचे विवेचन :

दशरथ जातां बोळ्वून । श्रीरामशकुनांचे शुभ चिन्ह ।
ब्रह्मरूपी वसिष्ठ आपण । मार्गी व्याख्यान करून सांगे ॥२६॥
प्रथम भेटल्या ब्राह्मण । ब्रह्मसृष्टीमाजी जाण ।
जो विजयी होय संपर्ण । सुरासुरगण वंदिती ॥२७॥
पूर्णकलश जैं भेटती । तैं सदा पूर्णत्व मनोरथीं ।
दधी क्षीर भेटलिया नवनीतीं । तैं पुर्ण प्राप्ती ऎश्वर्याची ॥२८॥
सव्य गेलिया वायस । तो सर्वत्र पावे यश ।
अपसव्य गेलिया तास। शुद्ध नि:शेष नासती ॥२९॥
मुक्तघोसीं सन्मुख । हंस भेटलिया देख ।
तो सर्वत्र पावे सुख । स्वप्नीही दु:ख देखेना ॥३०॥
सव्य गेलिया मृगगण । अलभ्य लाभ पावे पूर्ण ।
मृगीचे वामगमन । तें नवनधू आपण माळ घाली ॥३१॥
नकुळ गेलिया वामभागीं । तो विजयी होय रणरंगी ।
शत्रु निर्दाळील वेगीं । यश त्रिजगी न समायें ॥३२॥
डावा गेलिया भारद्वाज । तो करी सिद्ध काज ।
वैरियांसी लावोनि लाज । आनंदाचें भोज नाचवी ॥३३॥
ऐसी सांगता शकुनगती । स्वये संतोषला नृपती ।
विजयी होइल रघुपती । ह निश्चय चित्ती दृढ झाला ॥३४॥
दीड गांव शरयुतीरीं । कामाश्रमाची अति थोरी ।
विश्वामित्रें तेथवरी । रथ चमत्कारीं कुमरेसीं नेला॥३५॥

कामाश्रमात विश्रांति :

कामाश्रमीं श्रीरामवस्ती । तेणें सकळ सिद्धीस जाती ।
हे विश्वामित्राची निजयुक्ती । कार्यसिद्ध्यर्थीं राहविला राम ॥३६॥
श्रीराम आणि लक्ष्मण । निजतेजें विराजमान ।
करीं गोंधागुळित्राण । धनुष्यबाण सन्नद्धे ॥३७॥
काकपक्षशिखधरे । कवची खड्गी महावीर ।
बाळपणीं अति दुर्धर । जेंवी वैश्वानर तेजस्वी ॥३८॥
त्याचें देखोनि स्वरूप । विश्वमित्रा सुख अमूप ।
श्रीराम लावण्याचा दीप । चिस्वरूप सुखकारी ॥३९॥
ऋषि म्हणे तयांपती । येथे बसावे आजिचे रातीं ।
राम म्हणे आज्ञा निश्चितीं । सुखरूपें वस्ती करिते जाले ॥४०॥

सिद्ध मंत्राची विश्वमित्रांकडून प्राप्ती :

विश्वमित्राचे संगतीं । सुखशयनीं कमिली राती ।
उदय होता गभस्ती । ऋषि प्रबोधीं श्रीरामा॥४१॥
विधियुक्त करोनि स्नान । संध्या गायत्री जपावर्तन ।
करूनि विश्वमित्रा नमन । स्वनंदे चरण वंदिल ॥४२॥
देखोनि श्रीरामविनीतता । उल्लास विश्वमित्राचे चित्ता ।
आलिंगोनि श्रीरघुनाथा । कृपेनें बोले तो कृपाळू ॥४३॥
ऎकें बापा रघुनाथा । तुम्हासी सिद्ध मंत्र देइन आतां ।
दोघीं चरणीं ठेविला माथा । सावधानता मंत्रार्थीं ॥४४॥
दृढ बाणल्या मन्त्रार्था । राक्षसभय नुपजे चित्ता ।
श्रम बाधेना सर्वथा । तिन्हीं अवस्था सावधान ॥४५॥
या मंत्रार्थाचिया प्रौढीं । रणांगणीं राक्षसकोडी ।
मारितां न उगे अर्ध घडी । तो मंत्र निरवडी सांगेन ॥४६॥
क्षुधा तृषा निद्रा आळस । बांधू न शके देहकश्य ।
ऐशिया मंत्राचें मंत्ररहस्य । तुम्हांसी मी अवश्य सांगेन ॥४७॥
परम तपाची निवरडीं । जे म्यां जोदिली सिद्धार्थजोडी ।
ते तुज देइन रोकडी । म्हणोनि आलिंगी ॥४८॥
ऐसी कृपा देखोनि पूर्ण । दोघीं धरिले दृढचरण ।
सवंभावे सावधान । सद् गुरूवचनग्रहणार्थीं ॥४९॥

मंत्रसिद्धीचा साक्षात्कार :

मंत्राक्षर पडतां कानीं । सिध्दिपरिपाक अंत:करणीं ।
मंत्रशक्ती लागे चरणीं । मंत्रशिरोमणि श्रीराम ॥५०॥
श्रीराम मंत्रीं मंत्राक्षर । श्रीराम क्षराक्षरातीत पर ।
श्रीराम स्वयें ऒंकार । मंत्रार्थसार श्रीराम ॥५१॥
श्रीराम मंत्राची निजशक्ती । श्रीराम मंत्रची मंत्रमुर्तीं ।
त्यासी मंत्रार्थ बाणला चित्तीं । हें नवल किती सांगावें ॥५२॥
मंत्रीं मंत्रार्थनिजबीज श्रीरामची स्वयें सहज ।
तो वंदोनी सद्गुरूचरणरज । शिष्यत्वाची वोज सेवकत्वें दावी ॥५३॥
सद्गुरूची निजसेवा । तेंचि निजबीज सकळ देवां ।
ते कळलेंसे राघवा । गुरूआज्ञे जीवा विक्रित केलें ॥५४॥
दोघां मंत्रार्थ वाणला पूर्ण । विश्वमित्रा कळली खूण ।
दोघांची पाटी थापटून । सुखसंपन्न स्वये झाला ॥५५॥

शरयूसंगमावर एक रात्र मुक्काम :

रघुनाथासी म्हणे आपण । येथोनि करावे प्रयाण ।
राम म्हणे आज्ञा प्रमाण । रथीं तिधे जण बैसले ॥५६॥
कथाकौतुक मार्गानुक्रम । शरयुतीर मनोरम ।
पुढे भागीरथीसंगम । उत्तमोत्तम देखिला ॥५७॥
मानससरोवरीं जन्मली । यालागीं शरयू नाम पावली ।
अयोध्यानगरीं रूढ झाली । संगमा आली शरयु गंगेच्या ॥५८॥
देखोनि संगमदर्शन । साष्टांग केले नमन ।
स्नान संध्या जप ध्यान । मंत्रावर्तनप्रयोगें ॥५९॥
तये संगमासंगती । राम राहविला एक रातीं ।
प्रभात जालिया परतीराप्रती । जाणें निश्चितीं नेमिलें ॥६०॥

पहाटे नावेतून पैलतीराला जातात :

मग प्रात:काली उठोन । नावेसीं रामलक्ष्मण ।
विश्वमित्र बैसवोनी जाण । घेवोनि आपण परतीरां गेला ॥६१॥
परतीरीचे विधान । केले स्नान संध्या जप ध्यान ।
तीरीं वनाचें विपरीत भान । रघुनंदन स्वयें देखें ॥६२॥

ताटिका राक्षसीच्या भयंकर त्रासाची कल्पना :

उग्र पक्ष्यांची चावटी । क्रूर श्वापदाची दाटी ।
दिवाभीताची घुंघाटी । शिवा भुंकत भयानक ॥६३॥
भृगीझुंगीचे झणत्कार । वनीं वाजत भयंकर ।
राम पुसे हें वन कं घोर । ऋषि प्रत्युत्तर समूळ सांगे ॥६४॥
भयानक भासे वन । तेथें आहे ताटिकाभवन ।
ते राक्षसी अति दारुण । प्राणिगणभक्षक ॥६५॥
तिचेनि वन हें उद्वस । मालव केशिक कारूष ।
हे क्षणर्धे देश केले ओस । अति दुर्धर कर्कश राक्षसी ॥६६॥
दशदिशा मार्ग रोधून । तिचे भेणे वागों न शके कोणी जन ।
तेणे मार्गे आपण । सर्वथा गमन न करावें ॥६८॥
राम म्हणे ऐसी कैंची । कोठोनि आली हे कोणाची ।
येवढी शक्ति तिला कैंची । ऋषि तियेचि सांगे ॥६९॥

ताटिकावृत्तांत :

सुकेतु यक्ष अति पावन । त्यासी नव्हतें संतान ।
तेणें करोनि अनुष्ठान । ब्रह्मा प्रसन्न स्वयें केला ॥७०॥
तो मागे पुत्रसंतान । ब्रह्मयाने गिधले कण्यारत्न ।
अनल्प-वीर्यकन्या जाण । कार्यकारण प्रवृत्तीचे ॥७१॥
तुज नव्हे पुत्रसंतती । सहस्रबळनागशक्ती ।
कन्या होइल निश्चितीं । ब्रह्मा वरदोक्ती वदोनी गेला ॥७२॥
ते हे ताटिका कन्यारत्न । सुंदोपसुंद बंधु दोघे जण ।
त्यांत ज्येष्ठ सुंदेंसीं केले लग्न । अति शोभन समारंभें ॥७३॥
सुंदापासोनि गर्भसंभवु । मारीच आणि सुबाहु ।
ताटिकेच्या पोटीं दोघे भाऊ । जन्मोद् भवु पावले ॥७४॥
त्या उभय बाळकांची जाळी । लागली पित्याचे मूळीं ।
पित्याची बुद्धि ते काळीं । मरणोन्मेळीं बळावली ॥७५॥
संदोपसुंद महावीर । परम योद्धे अति दुर्धर ।
तिहीं पराभवोनि सुरवर । त्याचें अधिकार स्वयें घेतलें ॥७६॥

तिलोत्तमेची कथा :

त्याचा करावया वधू । विधाता रची विचीत्र बोधू ।
तिलोत्तमा सुंदर वधू । दोघे बंधू देखती ॥७७॥
ती देखतांचि सुंदर । दोघे उठिले सत्वर ।
तिच्या वरणीं अति तत्पर । तत्कामीं दुर्धर सकामी ॥७८॥
कनिष्ठ म्हणे ज्येष्ठसी । भावजयी मानीं तूं इसी ।
येरू म्हणे ज्येष्ठपत्नीऐसी । निश्चयेसीं तूं मानीं ॥७९॥
कनिष्ठाचे लहे । ज्येष्ठे पाळावे सोहळे ।
भावजयी मानीं ये वेल्हाळे । कृपामेळें कृपाळुवा ॥८०॥
ज्येष्ठआज्ञेची थोरी । कनिष्ठें मानावी शिरीं ।
हे ज्येष्ठपत्नी खरी । निजनिर्धारीं मानावी ॥८१॥
कनिष्ठे कामिली जी कांता । ती भावजयी मानीं दुहिता ।
ज्येष्ठपत्नी ते तुज माता । तुवां तत्वतां मानावी ॥८२॥
ऐसिया करितां विवादा । दोघे दुर्धर चढले क्रोधा ।
परस्परें घेवोनि गदा । निर्वाणयुध्दा प्रवर्तले ॥८३॥
दोघे युद्धीं अति दुर्धर । दोघे गदाविंदान अति चतुर ।
अति मंडला निकुर । येरेयेरां नाटोपती ॥८४॥
कनिष्ठें कळालाघवांत । केला ज्येष्ठाचा घात ।
पडतां द्गद क्षोभें हाणित । कनिष्ठाचा घात ज्येष्ठें केला ॥८५॥

स्त्रीकामाचा प्रभाव :

बंधुबंधूच्या घाई । दोघे जण पडिले ठईं ।
हे स्त्रीकामाची नवाई दृष्टिक्षेपें पाहीं देहांत दोघां ॥८६॥
नाहीं स्त्रीशीं कामे एकांतू । नाही स्त्रियेसीं केला मातू ।
नाही स्त्रियेसी लाविला हातु । परी अपघातु स्त्रीदृष्टीं ॥८७॥
एवं स्त्रियासीं न व्हावी भेती । स्त्रियांसी न करावी गोष्टी ।
स्त्रियांसी पाहतांच दृष्टीं । उठाउठीं आत्मघात ॥८८॥
सखे आत्मबंधु दोनी । तिहीं स्त्री देखतां नयनीं ।
निजघातें निमाले रणीं । स्त्रीदर्शनीं अपघात ॥८९॥
स्त्रीदर्शनी देहघात । स्त्रीस्पर्शनीं नरकावर्त ।
एवं स्त्रियांची संगत । अति अनर्थ पुरूषांसी ॥९०॥
कथाकथनीं सुंदोपसुंद । हा कथेसी लागला संबंध ।
म्हणोनी केला अनुवाद । श्रोतीं जल्पानुवाद न म्हणावा ॥९१॥
स्त्रीसंगपासी अति अनर्थ । हो बोलिलो परमार्थ ।
पुढील कथेचा भयचकित । ताटका तदर्थ या वना आली ॥९३॥

ताटका राक्षसी का झाली ? :

मग बोले रघुनंदन । तीस कां आले राक्षसपण ।
तेविशयींचें निरूपण । ऋषि संपूर्ण सांगतु ॥९४॥
अगस्तीच्या आश्रमासी । ताटका वसे वनवासीं ।
घेउनि दोघां पुत्रांसीं । ती परदेशीं विचरत॥९५॥
ते नागायुतनिजशक्ति । त्या बळाची अंगीं मस्ती ।
तेणें बळें ते दुर्मती । अगस्तीप्रती ढळूं गेली ॥९६॥
पुत्रांसमवेत आपण । विक्राळ करोनियां वंदन ।
अगस्तीस छळितां जाण । तेणे दारूण शाप दिधला ॥९७॥
विक्राळ करोनि वदनासी । ते तूं मज दहूं आलीसी ।
तें तूं सपूत्र राक्षसी । विक्राळ देहासीं विटंक होसी ॥९८॥
ते हे अगस्तीशापदग्ध । राक्षसी अति विरुद्ध ।
प्राणागणां करी बाध । मार्गनिरोध केला असे ॥९९॥
जे मार्गीं असे ते रक्षसी । मे मागीं जातां नये आम्हांसी ।
ऐसें ऐकतां ऋषिवाक्यासी । हासें रामासी पैं आलें ॥१००॥
स्त्रीव्यक्ति ताटिकाभणें । जें करावें पलायन ।
तैं तुम्च्या यागीं संरक्षण । केंवी आपण करावें ॥१॥
आज्ञा ऐसी स्वामीनाथा । राक्षसी वधीन मी आतां ।
ऐसें विश्वामित्रे ऐकतां । उल्लासें तत्वता आलिंगी ॥२॥
तुझा पहावया पुरूषार्थ । म्यां सूचिला मार्ग भयार्थ ।
तवं तूं निधडा रघुनाथ । निर्भयार्थ निजयोद्धा ॥३॥
इसीं मारावें रघुनाथा । स्त्री मारूं नये शास्त्रार्था ।
दुष्टदमनीं हें वाक्य वृथा । इसीं सर्वथा मारावें ॥४॥
स्वामी करूं नये गुरूअवज्ञा । हे सकळशास्त्रप्रतिज्ञा ।
वसिष्ठदशरथांची आज्ञा । तुझी अवज्ञा न करावी ॥५॥
सकळ शास्त्रार्थ आपण । गुरूचरणां येती शरण ।
गुरूंचे अपार महिमान । अन्यथा कोण करू शके ॥६॥
ताटिकेचा वध : ऐंसे बोलोनि रघुनंदन । नमूनियां सद्गुरूचरण ।
चाप सज्जोनियां जाण । साटोपें ठाण मांडिलें ॥७॥
ते काळीं श्रीरामस्वरूप । पाहातां काळासी सुटे कंप ।
वीर्यधैर्याचा साटोप । परम प्रताप युद्धाचा ॥८॥
करिता धनुष्यीं टणत्कार । दुमदुमिले मेरुमांदार ।
खळबळले सप्त सगर । पाताळीं विखार खळळिले ॥९॥
धनुष्यनादें कांपे सृष्टी । न्याहा उठला वैकुंठीं ।
ध्यानीं दचकला धूर्जटी । हडबड मोठी सुरवरां॥११०॥
नांदे कोंदले अंबर । दिशा जाल्या नदाकार ।
तेणे तटिकेचे जिव्हार । कांपे थरथरा सन्नदें ॥११॥
तेणें गजबजुनी उठी । दोघे कुमार देखे दृष्टी ।
गिळावया आवळी चाटी । सक्रोध उठी साटोपें ॥१२॥
विकट देखोनियां हाक । विक्राळ पसरोनियां मुख ।
धांविन्नली श्रीरामासन्मुख । येरू तो नि:शंक तद्वधार्थीं ॥१३॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । पाहें भ्यासुर राक्षसी पूर्णा ।
देखतां प्राणी सांडिती प्राणा । इजसमोर कोणा न राहवे ॥१४॥
आतां पाहें माझें विंदान । हस्तलाघवी अनुसंधान ।
एके घाई घेईन प्राण । म्हणोनि बाण सोडिला ॥१५॥
कनाडी ओढितां आपण । आकर्षिला ताटिकेचा प्राण ।
हृदयीं आदळला बाण । जिव्हारीं पूर्ण भेदला ॥१६॥
बाणाच्या सबळ मेळीं । ताटिका देवोनि आरोळी ।
नेटें आदळली भूतळीं । न्याहा पाताळीं ऊठिला ॥१७॥
ताटिकेचें निजशरीरभारें । दुमदुमिलीं गिरीकंदरें ।
डळमळी मेरुशिखरें । भयें वनचरें मूर्च्छागत ॥१८॥
तळीं पाषाण जाले रंगोळी । वृक्ष उपडिले समूळीं ।
पक्षीं भ्रमती अंतराळी । बैसलीं टाळीं दिग्गजांची ॥१९॥
ताटिकापातें भूकंप होत । समुद्रजवळ उचंबळत ।
नरनारी हाहाभूत । असुर कांपत थरथरां ॥१२०॥
तिचे छेदिले त्रिविघ ताप । छेदिले संकल्पविकल्प ।
छेदोनियां पुण्यपाप । विविकल्प मारिली ॥२१॥
छेदिला देहेंसी अभिमान । जीवपणाऐसीं जीवबंधन ।
समूळ छेदोनि मीपण । ताटिका संपूर्ण मारिली ॥२२॥

त्रैलोक्यात सर्वांनाच आनंद :

ताटिका पंडतांचि सृष्टीं । देवांची कोट्यानुकोटी ।
विमाने दाटली दाटीं । पुष्पवृष्टी तिहीं केली ॥२३॥
निशाणें त्राहाटिलीं सुरवरीं । शंख दुंदुभि निशाण भेरी ।
गगन गर्जें जयजयकारीं । कीर्ति सुरवरीं वानिजे ॥२४॥
योगि छेदी निजकल्पना । तेणें सुख होय जीवा मना ।
ताटिका निर्दाळितांचि जाणा । सुख त्रिभुवना श्रीरामें ॥२५॥
भक्त निर्दाळी अशंका । तेणं तो पावोनि निजत्मसुखा ।
तेंवि वधिताचि ताटिका । सकळ लोकां आल्हाद ॥२६॥
विश्वामित्राचे निजगुण । अमरेंद्र वानी आपण ।
तुझेनि धर्में जाण । दुष्टनिर्दळण श्रीरामें ॥२७॥
ताटिका वधिली तत्काळीं । कौशिक नाचे आनंदमेळीं ।
श्रीरामाते जीवे ओवाळी । पिटिली टाळी ऋषिवृंदें ॥२८॥
इंद्र सांगे विश्वामित्रासी । अस्त्रविद्या द्यावी श्रीरामासी ।
हा साह्य सुरकार्यासी । तुमच्याही यागासी सिद्ध्यर्थ ॥२९॥
श्रीरामासारिखें पात्र । यासी सांगावे सच्छास्त्र ।
विद्या सांगावी सबीजमंत्र । तुवां विश्वामित्रगुरूवर्या ॥१३०॥
ऐकोनि देवांचे वचन । विश्वामित्र संतोषोन ।
श्रीराम दे आलिंगन । करी निंबलोण सर्वस्वें ॥३१॥
तो म्हणे ताटिका वधितां येथ । सुरवरां सुख जालें अपरिमित ।
मार्गस्थां मार्ग निर्मुक्त । हा प्रताप समर्थ श्रीरामाचा ॥३२॥
हें रघुनाथाचें प्रथमचरित्र । लोकत्रयीं अति विख्यात ।
पुढारीं कथा परम अद् भुत । श्रोतीं सावचित्त परिसावी ॥३३॥
जे कथेचेनि अवधानें । जन्ममरणांचे उठे धरणें ।
विषयांचे खत लाटणें । गुढी उभवणें वैकुंठी ॥३४॥
वैकुंठींचे मुक्तवासी । तेहि येती रामकथेसी ।
कथेचि महिमा आहे ऐसी । कथा सर्वांसी प्रियकर ॥३५॥
एकजनर्दना शरण । जालें ताटकानिर्दळण ।
पुढें धनुर्विद्या अस्त्रग्रहण । यज्ञसंरक्षण ऋषींचे ॥३६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
ताटिकानिर्दलनं नाम द्वादशोऽध्याय: ॥ १२ ॥
॥ ओंव्या १३६ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.