भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय १५

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय पंधरावा ॥

सीतेचा पूर्वजन्मवृत्तान्त :

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पदकमलरजोभिः मुक्तपाषाणदेहा
द्वियमभवदहल्या गौतमे धर्मपत्नी ।
त्वयि चरति विशीर्ण ग्रावविंध्याद्रिपादे
कति कति भवितारस्तापसा दारवण्त ॥ १ ॥

श्रीरामचरण स्पर्शाचा परिणाम :

लागतां श्रीरामपादरजःकण । जावोनियां पाषाणपण ।
जाहले अह्ल्योद्धरण । तें दारग्रहण गौतमें केलें ॥ १ ॥
चरणरजांचा प्रताप । अहल्या जाहली निष्पाप ।
हरून गौतमाचा विकल्प । स्त्री अनुरूप पतिव्रता ॥ २ ॥
अगाध पदमहिमा देखोन । विस्मित जाले ऋषिजन ।
स्वर्गी सुरवर करिती स्तवन । नाम पावन तिहीं लोकीं ॥ ३ ॥
पुढें विंध्याद्रीचे ठायीं । जे पाषाण लागती रामपायीं ।
ते निःशेष विरोनि पाहीं । उठतील स्त्रीदेहीं सुंदरत्वें ॥ ४ ॥
तयां स्त्रियांचे देखोन । बहुसाल तपस्विजन ।
ब्रह्मचर्य विरर्जून । दारग्रहणकरतील ॥ ५ ॥

ऋषिमुनींचे मिथिलानगरीकडे प्रयाण :

एवं ऋषिवर्यमंडली । रामकीर्तनाचे समेळीं ।
चालती आनंदकल्लोळी । पुधे मिथिला देखिली ॥ ६ ॥
विदेहाची विदेहपुरी । पताका झळकती चिदंबरी ।
रविचंद्रांची लोपोनि थोरी । रत्नकळसांच्या हारी शोभती ॥ ७ ॥
वनश्रियेचिया शोभा । पूर्णत्वें पूर्ण करी नभा ।
प्राण स्तब्ध राहे उभा । होय प्रवेशारंभा आल्हाद ॥ ८ ॥
वृक्ष समूळी सपत्रीं गोड । बीजेवीण फळांचे घड ।
देखतां पंथिकांचे पुरे कोड । छाया सेवितां चाड निचाड होय ॥ ९ ॥
नवल त्या छायेची विश्रांती । कामक्रोधां होय शांती ।
त्रिविध ताप स्वयें शमती । भ्रांति ते चिच्छक्ती स्वयें होय ॥ १० ॥
सेवितां त्या फळांचा स्वाद । क्षुधेतृषेचा निमे बाध ।
सबाह्य कोंदे परमानंद । अति सुस्वाद विटेना ॥ ११ ॥
जाणोनि त्या फळांची गोडी । शुकांची सवेग पडे उडी ।
तृप्ती लाहोइयां गाढी । उडण्याची ओढी विसरोनि गेली ॥ १२ ॥
विदेहवनींच्या हंसांसी । नवलीला दिसे त्यांसी ।
सांडोनी उभय पक्षांसी । चिदाकाशीं उड्डाण ॥ १३ ॥
देखोनि वनस्थळी । मुमुक्षुमयूर स्वानंदमेळीं ।
पिच्छें पसरोनि रोमावळी । सुखसुकाळीं नाचती ॥ १४ ॥
विदेहवनींचा सुगंध । पावतां प्रकटे परमानंद ।
देही पावे आनंद । होय निजबोध स्वानंदें ॥ १५ ॥
स्वानंदे मयूर गर्जती । तेणें वेदार्थ चवकती ।
सांडोनि कर्मवादवृत्ती । निश्चल राहती निःशब्दें ॥ १६ ॥
वनीं पारवे ते घुमती । तेणें गंधर्वगाणी वेडावती ।
सामवेदाची उपरमे वृत्ती । पक्षी बोलती अनुतम्य ॥ १७ ॥
प्रवेशतां रामचरण । ऐसी स्थिति पावे उपवन ।
हें विदेहाचें विदेहवन । अगाध महिमान कोण वर्णी ॥ १८ ॥
स्वधर्में वसतां मगरीं । पिंगळा वेश्या समाधी वरी ।
ते विदेहाची विदेहपुरी । कोणें थोरी वर्णावी ॥१९ ॥
ज्याचे द्वारपाळाचें वचन । शुकासी दे समाधान ।
हें जनकाचें अति महिमान । अगाध लक्षण परमार्थीं ॥ २० ॥

स्वयंवर यज्ञमंडपावरील रूपक :

तेचि नगरबाह्य प्रदेशीं ।राम देखे जनकयागासी ।
जो सीतास्वयंवरोद्देशी । बहुक्लेशेंसीं योजिला ॥ २१ ॥
धैर्याचा स्तंभ निर्धारीं । धर्माचे आडवळे तयावरी ।
शांतीनें सेविला कुसरी । त्या मंडपामाझारी यज्ञ्वाट ॥ २२ ॥
निर्धूम अग्नि अति उद्‌भट । इंधनेंविण अति लखलखाट ।
ज्वाळा अतिशयें चोखट । सुखस्वादिष्ट प्रकाश ॥ २३ ॥
ॐकार अर्धमात्रा निजार्थें । जे जाणती पैं परमार्थें ।
तेचि होते पोते उद्गारते । अक्षरार्थें द्वारपाळ ॥२४ ॥
निर्गुणेंसी वळिलें त्रिगुण । तेंचि तेथींचें त्रिसंधान ।
विवेकाचें परिस्तरण । परिसमूहन नैराश्यें ॥ २५ ॥
निष्कंटक इध्मा पूर्ण । भूता ऐक्यें बर्हिबंधन ।
श्रद्धा आज्यस्थाली स्थापून स्रुक्‌‍स्रुवामार्जन प्रत्यगावृत्ति ॥ २६ ॥
वक्रबुद्धीच्या वक्रोक्ती । त्याची आघाराज्याहुती ।
पाठीं प्रधानहोम होमिती । सहित प्रकृतिमहत्तत्वेंसीं ॥ २७ ॥
युक्तिप्रयुक्तीं ज्ञानाभिमान । द्रव्य दारा ममता मान ।
गुरुमंत्रें त्यांचे केलें हवन । विनियोगविधान न ममेति ॥ २८ ॥
सावधानतासादृश्य । कर्मी ब्रह्मतारहस्य ।
अवभृथस्नानसामरस्य । निमज्जनीं उल्लास परमानंदें ॥ २९ ॥
कॆह्त्रा प्रतिपाळी संपूर्ण । क्षेत्रपाळ तो चि‍द्घतन ।
त्यासी देती विषयांचे बळिदान । वासनास्मरणव्समवेत ॥ ३० ॥
यालागीं त्या बळिदानासी । परतोनि पाहों नये त्यासी ।
स्मरण उरों नये मानसीं । एवं शुद्धविधीसी बळिदान ॥ ३१ ॥
अखंडत्वें नित्यस्थिती । तेचि वसुधारा अहोरातीं ।
अहंकाराची पूर्णाहुती । फळसंयुक्तीं होमिली ॥ ३२ ॥
स्वयें सांडणें मीतूंपण । हेंचि श्रेयः संपादन ।
आत्मत्व देणें हे अगाध दान । समाधान स्वानंदे ॥ ३३ ॥
परमानंदे अभिषिंचन । सवेंचि भवभय विसर्जन ।
ऐसा विदेहाचा यज्ञ । रामें आपण देखिला ॥ ३४ ॥
नाना देशींचे ब्राह्मण । नाना भाषा अति प्रवीण ।
वेदशास्त्रार्थीं अति संपन्न । देदीप्यमान तेजस्वी ॥ ३५ ॥
ऐसिया ब्राह्मणांच्या थाटी । विदेहाच्या यज्ञवाटीं ।
श्रीरामें देखोनियां दृष्टीं । पोटी अत्यंत सुखावला ॥ ३६ ॥

श्रीरामाचा यज्ञभूमीजवळ निवास केला :

श्रीराम म्हणे विश्वामित्रासी । स्वामीनें रहावें यज्ञवाटापासीं ।
वचन मानलें कौशिकासी । तेचि प्रदेशीं निवास केला ॥ ३७ ॥
महीवतीचें स्वच्छ जीवन । तीरीं अगाध उपवन ।
सदाफळी शोभायमान । तें निवाडस्थान श्रीरामाचें ॥ ३८ ॥
घेवोनि ऋषिवरांचा संभार । आला ऐकोनि विश्वामित्र ।
जनक धांवला सत्वर । केला नमस्कार सद्‌भावें ॥ ३९ ॥
हर्षें दिधलें शतगोदान । केले मधुपर्कपूजन ।
तैसेच पूजिले ऋषीजन । साधुसज्जन आल्हादें ॥ ४० ॥
राजा बोलिला हरिखें जाण । आजि सुफळ माझा यज्ञ ।
आजि माझे सुफळ नयन । साधुदर्शन देखोनी ॥ ४१ ॥
साधूंसी क्षेत्र आलिंगन । तेणें शरीर होय पावन ।
साधूंसे मृदु भाषण । वाचा आवन तद्योगें ॥ ४२ ॥
साधूम्चे चरणतीर्थ । सेवितां अंतर पुनीत ।
साधुसंगें सुनिश्चित । ब्रह्मप्राप्ति भाविका ॥ ४३ ॥
बहुकाळ याग यजिता विधीं । यज्ञीं नव्हेचि यज्ञसिद्धी ।
तूं आलासि कृपानिधी । यज्ञाची त्रिशुद्धी सिद्धी झाली ॥ ४४ ॥
कौशिक रायातें पुसत । स्वस्थ राज्य स्वस्थ चित्त ।
येरु म्हणे हे कृपासमर्थ । स्वस्थ सुनिश्चित सर्वार्थभावें ॥ ४५ ॥

राजा जनकाकडून श्रीराम-लक्ष्मण वर्णन :

राजा पुसे दोघे जण । अग्नितेजें विराजमान ।
हेही उपमा यांसी गौण । तेंही लक्षन अवधारीं ॥ ४६ ॥
अग्निसान्निध्य सर्वातें तावी । यांची सन्निधि सर्वांतें निववी ।
यांची पाहतां पैं पदवी । जीवींच्या जीवीं आल्हाद ॥ ४७ ॥
यांचे देखिलिया दर्शन । डोळियांस नावडे आन ।
यांच्या स्वरूपीं जडलें मन । चित्त चिंतन विसरूनी ॥ ४८ ॥
सुंदर आणि सुकुमार । रूपरेखा मनोहर ।
ठाणमाण अति गंभीर । हे कोणाचे कुमर नृप पुसे ॥ ४९ ॥
दुर्गम मार्ग अति दारुण । यांचे कैसेनि आगमन ।
तुजसी यांसी कां सन्निधान । हें समूळ कारण मज सांग ॥ ५० ॥

विश्वामित्रांचे उत्तर :

ऋषि म्हणे हे दशरथाचे कुमर । रामलक्ष्मण महावीर ।
ऐक राया यांचे चरित्र । अति पवित्र सांगेन ॥ ५१ ॥
माझा याग न पवे सिद्धी । मारीच सुबाहु सदा बाधी ।
ताटिका सर्व मार्ग विरोधी । आश्रमा त्रिशुद्धी उपहती करी ॥ ५२ ॥
यालागीं म्यां अनुष्ठान । करूनि हर केला प्रसन्न ।
तेणें मज करूनि सावधान । हें गुह्य ज्ञान सांगितलें ॥ ५३ ॥
साक्षात् पूर्ण परब्रह्म । अवतरले दाशरथि राम ।
त्याचेनि सिद्धि पावेल होम । राक्षसां भस्म तो करील ॥ ५४ ॥
शिववचनविश्वासीं । म्यां जावोनि दशरथापासीं ।
मागून आणिलें श्रीरामासी । निजयागासी सिद्ध्यर्थ ॥ ५५ ॥
मार्गीं ताटिका छेदिली । मार्गस्थां मार्ग निर्मुक्त केली ।
सिद्धाश्रमीं वस्ती जाली । ख्याती लाविली राक्षसां ॥५६ ॥
सुबाहु निवटिला वाणधारा । मारीचास लागला पिसारा ।
तो उडविला समुद्रतीरा । येरा निशाचरां निर्दाळिलें ॥ ५७ ॥
अवचट लागतां चरणी । अहल्या उद्धरली तत्क्षणीं ।
अगाध श्रीरामाची करणी । वेदपुराणीं जगद्वंद्य ॥ ५८ ॥
तो हा हरचापदर्शनेच्छा । आला असे आम्हांसरिसा ।
देखोनि श्रीरामाचा ठसा । जनकमानसा उल्लास ॥ ५९ ॥
सीतेसी अनुरूप नोवरा । श्रीरामचि निजनिर्धारा ।
परी धनुर्धारणां महावीरां । अति दरारा बळिष्ठ ॥ ६० ॥

सीतेचा जन्मवृत्तान्त :

जनक म्हणे ऋषिराजा । सीता माझी निजात्मजा ।
परी ते मुख्य अयोनिजा । ऐक महाद्विजा तो भाव ॥ ६१ ॥

अपवाहतयः क्षेत्रं हलाग्रात् उत्थितामिमाम् ।
सर्वलक्षणसंयुक्तां नाम्ना सीतेति विश्रमात् ॥ २ ॥

नांगर वाहता शेतीं । पेटी लागली हलाचिये दांतीं ।
ती उघडितां त्यामाजी हे आंत होती । रूपवती ममात्मजा ॥ ६२ ॥

शतानंदाकडून कथाकथन :

ऐकोनि रायाचा शब्द । अहल्याकुमर शतानंद ।
जनकपुरोहित प्रसिद्ध । तेणें पूर्वानुवाद आरंभिला ॥ ६३ ॥
ब्रह्मशापाचें क्रूर अज्ञन । त्यामाजी माझी माता निमग्न ।
तिसी लागतां श्रीरामचरण । जाली उद्धरण जगद्वंद्य ॥ ६४ ॥
लागता श्रीरामचरण । स्वयें उद्धरती पाषाण ।
हेंही नवल नव्हे जाण । जगदुद्धारन श्रीराम ॥ ६५ ॥

नाममहिमा :

अगाध श्रीरामाचें नाम । नाम निर्दाळी क्रोध काम ।
नाम निवारी मरण जन्म । नाम तें ब्रह्म निर्द्वंद्व ॥ ६६ ॥
अबद्ध पडतां वेद । तत्काळ बाधी निषेध ।
अबद्ध नामें प्रसिद्ध । होती शुद्ध पहापापी ॥ ६७ ॥
अबद्ध मंत्राच्या आवर्तीं । जपक चळले नेणो किती ।
अबद्ध नामाच्या नामोक्तीं । अबाध कीर्ति वाल्मीकाची ॥ ६८ ॥
अबद्ध नामें नारदोक्ती । मारा मारा या वचनोक्तीं ।
रामनामीं लागली वृत्ती । पापनिष्कृति वाल्मीकाची ॥ ६९ ॥
करितां अबद्ध नामपठण । वाल्मीक उद्धरला आपण ।
वदला शतकोटी रामायण । कथा पावन शिववंद्य ॥ ७० ॥
ते देखतां श्रीराममूर्ती । हर्षें विरे चित्तवृत्ती ।
आनंद ओसंडेचि त्रिजगतीं । हे स्वरूपस्थिति श्रीरामाची ॥ ७१ ॥
रामनामीं अभेदस्थिती । यालागी जड उद्धरती ।
राम केवळ ब्रह्ममूर्ती । आद्यशक्ती ते सीता ॥ ७२ ॥
ते सीतेची उत्पत्ती । ते मी सांगेन पूर्ववृत्ती ।
जे म्यां ऐकिली नारदोक्तीं । तेचि तुम्हांप्रति सांगेन ॥ ७३ ॥

पद्माक्षराजाचे अनुष्ठान :

पूर्वीं पद्माक्षराजा अति पावन । त्यानें करोनि अनुष्थान ।
रामा केली सुप्रसन्न । माझें कन्यारत्न् तूं होईं ॥ ७४ ॥
येरी म्हणे गा नृपनाथा । मज न घडे जन्मकथा ।
भगवंतीं अन्वयो न लाभतां । जाण तत्त्वतां नरवर्या ॥ ७५ ॥
ऐसें ऐकोनियां वचन । राये धरूनि दृढ ध्यान ।
भगवंत केला सुप्रसन्न । मागे वरदान कन्यार्थीं रमा ॥ ७६ ॥
विषयांचिये विषयपुष्टी । रमा गोड प्रथमदृष्टीं ।
लक्ष्मी विमुख जालिया पाथी । दुःखकोटी श्रीमंता ॥ ७७ ॥
लक्ष्मी आलिया जे सुख । सुख नव्हे तें केवळ दुःख ।
सुख मानिती ते केवळ मूर्ख । जाण निष्टंक नृपनाथा ॥ ७८ ॥
राजा म्हणे श्रीहरी । रमा खेळे मांडीवरी ।
ऐसीच मज कृपा करीं । म्हणोनि निर्धारीं धरिले पाय ॥ ७९ ॥

विष्णुकडून वरप्राप्ती :

ऐसें रायाचें मनोगत जाण । जाणोनियां विष्णू आपण ।
देता जाला मातुलिंग पूर्ण । येंएं कन्या जाण पावसी रमा ॥ ८० ॥
ते मातुलिंग द्विधा करिता । कन्या देखिली अतिरूपता ।
रायासी उपजली ममता । माझी दुहिता म्हणोनी ॥ ८१ ॥
पद्माक्षाचें घरीं जन्म । यालागीं पद्मावती हें नाम ।
तिचें रूप देखोनि उत्तम । उल्लास परम रायासी ॥ ८२ ॥
जन्मली मातुलिंगाप्रती । तीं दोनीं शकले एक होतीं ।
तेंचि मातुलिंग शक्तीच्या हातीं । स्वयें सप्तशती बोलत ॥ ८३ ॥

पद्मावतीविवाह, भयंकर रणकंदनातून सर्वनाश :

कन्या स्वयंवरायोग्य । रायें विवाह आरंभिला सांग ।
भाळोनि आले ऋषिवर्ग । योग्य ता योग्य मिरविती ॥ ८५ ॥
आले देव दानव मानव । नर किन्नर गंधर्व ।
राजे पावले सर्व । दैत्यसमुदाव बळेंसीं ॥ ८६ ॥
कन्या देखोनि रूपस । सवेग पावले राक्शस ।
स्वरूप देखोनि बहुवस । अति कर्कश संग्रामा ॥ ८७ ॥
रायें पण केला क्षोभदृष्टीं । आकाशाची सुनीळ उटी ।
ज्याचे आंगीं शोभे गोमटी । त्यासी हे गोरटी वरील ॥ ८८ ॥
पण ऐकोनि दुर्धर । क्षोभले अवघे सुरासुर ।
कन्याहरणार्थ तत्पर । जाले नरवीर सन्नद्ध ॥ ८९ ॥
धरूं धांवलें यक्ष राक्षस । देओहिनि क्षोभला पद्माक्ष ।
बाणीं साधोनियां लक्श । विपक्षपक्ष त्रासिला ॥ ९० ॥
घायीं त्रासिलें निशाचर । रायें पळविलें संभार ।
आकाश लंघिती सुरवर । दैत्यीं दुर्धर युद्ध केलें ॥ ९१ ॥
तेही पळविलें दैत्यगण । रायासी खडतरले बाण ।
तेणेम् रणांगनीं प्रण । सांडिला आपण क्षात्रवृत्तीं ॥ ९२ ॥

पद्मावतीची अग्नीत उडी आणि बाहेर आगमन :

जाली रणाची निरवडी । कन्या धरितां तांतडीं ।
तिणें उठोनि लवडसवडी । अग्निमाजी उडी घातली ॥ ९३ ॥
नोवरी नव्हेचि प्राप्त । राक्षस क्षोभले अत्यद्‌भुत ।
घरें पाडोनिया समस्त । नगर उपहत तिहीं केलें ॥ ९४ ॥
सुरनरां असुरां कंदन । करोनि रायें दिधला प्राण ।
राणियां केलेम् सहगमन । लक्ष्मी तें विघ्न श्रीमंतांसी ॥ ९५ ॥
प्रतिपाळिते प्राणा मुकले । अभिलाषिते रणीं पडिले ।
उरले ते रडत गेले । लक्ष्मीचें केलें असें आहे ॥ ९६ ॥
ते आदिशक्ति नोवरी । निघाली अग्निकुंडाबाहेरी ।
तंव बाहेर भोंवलीं बोहरी । मग कुंडाच्या तीरीं एकाएकी बैसे ॥ ९७ ॥

तिला नेण्याचा रावणाचा प्रयत्‍न, पुन्हा अग्निप्रवेश :

विमानीं विचरतां रावण । त्यासी प्रधान सांगे सारण ।
जियेलागीं जालें रणकंदन । ते हे जाण नोवरी ॥ ९८ ॥
इसी धरूं जातां सुरासुरीं । उडी घातली अग्निमाझारी ।
ती हे निघोनि बाहेरी ।कुंडाच्या तीरीं बैसलीसे ॥ ९९ ॥
तिचें देखोनि बरवेपण । रावण अभिलाषी संपूर्ण ।
धरूं जातां आपण । अग्निप्रवेशन नोवरीयें केलें ॥ १०० ॥
तंव रावण बोले हासोनि । अग्निमाजी तुझी लपणी ।
ते सुरवर नेणती कोणी । तरी मी शोधूनी धरीन आतां ॥ १ ॥

कुंडात पंचरत्नाप्राप्ती :

तेथें अति क्षोभें रावण । कुंड विझवी आपण ।
शोधितां नोवरी न लभे जाण । तेथे पंचारत्नेंण जाण सांपडली ॥ २ ॥
त्या रत्नांवची पाहतां शोभा । लपोनि जाय सूर्यप्रभा ।
महातेजाच्या निजगाभा । रावण उभा विस्मित ॥ ३ ॥
सावध करोनियां निजमना । मग तयां दिव्यरत्नांन ।
करोनियां अतियत्ना । चढोनि विमाना लंकेसी आला ॥ ४ ॥
तीं रत्नेंि अति गोमटीं । मंदोदरीस द्यावया भेटी ।
ते देव्हारां ठेवोनि पेटी । आपण उठाउठीं सेजारां आला ॥ ५ ॥
स्त्रियेसी सांगे गुह्य गोष्टी । रत्नेंद अत्यंत गोमटीं ।
तुज शोभती कंथीं मुकुटीं । ते देव्हारां पेटी ठेविलीसे ॥ ६ ॥
ते पेटी तिसी उचलितां । नुचलेचि पैं सर्वथा ।
रावने उपहासोनि कांता । आपण तत्वतां उचलूं आला ॥ ७ ॥
त्यासी उचलितां विसां हातीं । नुचलेचि पैं सर्वशक्तीं ।
बलाची मावळती गती । रावण चित्तीं चळकांपे ॥ ८ ॥
तेथें मिनले प्रधान । वेगें आले सुहृज्जन ।
पेतीमाजी कोण निधान । काढोनि पाहूं आपण गेला ॥ ९ ॥

रत्नमपेटी उघडतांच तेजस्वी कन्यादर्शन :

ते उघडतांचि पेटी । तेजें झांकल्या त्यांच्या दृष्टी ।
अनर्घ्यरत्नग कन्या गोमटी । देखोनि गोरटी साशंकित ॥ ११० ॥
सावध होवोनि लंकानाथ । कन्येचा सांगे पुर्ववृत्तांत ।
मंदोदरी म्हणे हे कृत्या निशित । करावया कुळघात कां आणिली ॥ ११ ॥
पाळितां निर्दाळिली पिता जननी । सुरासुरी भुलोनि निमाले रणीं ।
दानवमानवांच्या श्रेणी । पदिल्या रणांगनीं इचेनि ॥ १२ ॥

रत्नमपेटी भूमीत पुरण्याविषयी मंदोदरीचा सल्ला :

भविष्य बोले मंदोदरी । हे प्रतिपाळित्यातें संहारी ।
उद्यां भोवंडील बोहरी । हे राष्ट्राबाहेरी सांडावी ॥ १३ ॥
इचा करिता बाळघात । आतांचि उपजेल अनर्थ ।
हे न ठेवावी राज्यांत । त्यागावी निश्चित राष्ट्रांतरी ॥ १४ ॥
आतांचि हे इची पेटी । रावण नुचलवे संकटीं ।
इसी मारितां कडकडाटीं अनर्थ कोटी होईल ॥ १५ ॥
अचेतन खांब हाणितां लाथा । हरिण्यकशिपु पावला घाता ।
येथेंही होईल तेचि कथा । इसी तत्त्वतां त्यागावें ॥ १६ ॥
वचन मानलें लंकानाथा । युक्ती मानली समस्तां ।
पेटी त्यागावया सर्वथा । सवेग दूतां बोलावी ॥ १७ ॥
कन्यात्यागा शीघ्रवंत । विमान आणिलें त्वरित ।
मंदोदरी दूतांसी सांगत । हे पेटी भूमिगत करावी ॥ १८ ॥
प्रकट पेटी ठेवाल जेथें । तत्काळ अनर्थ उपजेल तेथें ।
यालागीं करावी भूमिगत । अति गुप्त निक्षेप ॥ १९ ॥
जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । हे वाढेल त्याचे घरीं ।
जो आत्मत्वें वर्तेल चराचरीं । त्याच्या घरीं नांदेल ॥ १२० ॥

पेटीतून प्रकटलेली भविष्यवाणी :

पेटी घालितांचि विमानीं । तियेमाजी उठली ध्वनी ।
मी मागुतीं येईन लंकाभुवनीं ।राक्शसदहनीण् दहनार्थ ॥ २१ ॥
माझें करिताची अभिलाषण । रावनासी येईल मरण ।
माझें निमित्त संपूर्ण । निर्दळन राक्षसां ॥ २२ ॥
ऐसा ऐकतांचि शब्द । रावण झाला अतिस्तब्ध ।
राक्शस धाकती सुबद्ध । भविष्य विरुद्ध ऐकोनि ॥ २३ ॥
दूतीं पेटी घालोनि विमानीं । पाहत पाहत आले या वनीं ।
विदेहाची सीमा लक्षूनी । पेटी निक्षेपूनी ते गेले ॥ २४ ॥

जमीन नांगरताना ब्राह्मणाला पेटीची प्राप्ती, त्यावरील मालकीसंबंधी चर्चा :

ते भूमि जनकें धर्मार्थीं ।द्विजासी दिधली क्षेत्रवृत्ती ।
तोही नांगर धरावया शेतीं । अति निगुतीं मुहूर्त पाहे ॥ २५ ॥
वेळ साधोनि सुमुहूर्तीं । नांगर धरिताचि शेतीं ।
प्रथम तासाचे उपहती । फाळाच्या दांती पेटी लागली ॥ २६ ॥
द्विजासी सांग क्षेत्रदूत । धन्य धन्य तुझा सुमुहूर्त ।
पीक पिकलें अद्भु्त । निधि निश्चित पहा स्वामी ॥ २७ ॥
द्विजें पेटी देखतांचि जाण । म्हणे गुप्त ठेवा तें राजधन ।
मज क्षेत्र दिधलें दान । ठेवा आपण घेऊं नये ॥ २८ ॥
ते पेटी घेवोनि हातीं । द्विज आला राजसभेप्रती ।
हा गुप्त ठेवा होता तुमचें शेतीं । तो त्वाम् भूपति घेईजे स्वयें ॥ २९ ॥
राजा बोले धर्मवचन । तुम्हांसी दिधले भूमिदान ।
तेथील जें धनधान्य । तें ब्रह्मार्पण द्विजवर्या ॥ १३० ॥
द्विज धर्मार्थीं अति प्रवीण । मज समर्पिलें क्षेत्र दान ।
नाहीं दिधलें गुप्तधन । हें मी आपण स्पर्शेना ॥ ३१ ॥
धनलोभ नाहीं द्विजा । धनलोभ नाहीं भूभुजा ।
परम संकटीं पडिला राजा । हें साधुसमाजा कळों आलें ॥ ३२ ॥
तेथें साधु बोले वचन । यामाजी कोण आहे धन ।
तें काढोनि पहावें आपण । मग शास्त्र विधान विचारूं ॥ ३३ ॥
ते उघदितांचि पेटी । सौंदर्याची दीप्ती दृष्टीं ।
कन्या देखिली गोरटी । आश्चर्य पोटीं सर्वांच्या ॥ ३४ ॥
कन्या दृष्टीं देखतांची देख । डोळियां लागली टकमक ।
विस्मयें दाटले सकळिक । अलोलिक सौंदर्य ॥ ३५ ॥

पेटीतील कन्येचा जनकाकडून स्वीकार :

देखोनि लावण्यनिधान । जनकें उचलिली आपण ।
म्हणें हें माझें कन्यारत्न् । भेरी निशाण त्राहाटिलें ॥ ३६ ॥
गगन गर्जें मंगळतुरीं । सभा गर्जे जयजयकारीं ।
शांतिपाथ पढिजे ऋषीश्वरीं । वेदोक्तमंत्री अभिव्यक्त ॥ ३७ ॥
जनकें पाळिली म्हणोनि जनकात्मजा । धरेनें राखिली अति ओजा ।
यालागीं म्हणति धरणिजा । परी ते अयोनिजा जगदंबा ॥ ३८ ॥
नांगर वाहतां लागली दांती । सीता जन्म पावली शेतीं ।
ते सांगितली पूर्वस्थिती । हे नारदोक्ती यथार्थ ॥ ३९ ॥
सीतेचे जन्मलक्षण । यासी मूळ स्कंदपुराण ।
कालिकाखंडीं हें निरूपण । समूळ संपूर्ण लिहिलेंसे ॥ १४० ॥
अहल्येचा ज्येष्ठ सुत । जनकाचा जो पुरोहित ।
शतानंदस्वामी समर्थ । तेणें हा वृत्तांत सांगितला ॥ ४१ ॥
सांगितली सीतेची उत्पत्ती । आतां सीतास्वयंवरार्थीं ।
जनकासी हरचापप्राप्ती । झाली कैशा रीतीं तें ऐका ॥ ४२ ॥
एकाजनार्दना शरन । जालें सीताजन्मकथन ।
पुढें हरचापप्रकरण । सज्जनीं सावधान परिसावें ॥ १४३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
जानकीजन्मकथा नाम पंचदशोऽध्याय ॥ १५ ॥
॥ श्लोक २ ॥ ओव्या १४३ ॥ एवं १४५ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.