भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय १७

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सतरावा ॥

सहस्रार्जुनाचा वध व शिवधनुष्याची पूर्वकथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

राजा व राजपुत्र यांच्याशी युद्ध व त्यांचा निःपात -

परशुराम पाहे दुरून । निर्नायकी दिसे सैन्य ।
राजा नाहीं आला आपण । राजपुत्र पूर्ण देखिले ॥ १ ॥
रायाचे राजसुत । शोधोनि मारावे समस्त ।
हे मातेची आज्ञा समर्थ । तो मी कार्यार्थ साधीन ॥ २ ॥
केला त्र्यंबकाचा टणत्कार । नादें मूर्छित झाले सुर ।
दुमदुमले गिरिकंदर । राजकुमार धाकिन्नले ॥ ३ ॥
धाकें दचकला प्रधान । उभा ठेला धैर्य धरून ।
सैन्यें उभ्या उभ्या सांडीती प्राण । टणत्कारें पूर्ण नभ कोंदलें ॥ ४ ॥
बाण सोडिला सिंहमुख । तेणें गज मारिलें निःशेष ।
रथांचे छेदोनि आंख । वाजीचीं मस्तकें फोडिली ॥ ५ ॥
बाणपिसारा सुटला वारा । कोटी कोटी रहंवरा ।
उडवोनि नेलें अंबरा । वरिल्या वीरा आवर्तु ॥ ६ ॥
वरील वीर तळीं पडत । तळीं धुरा चूर होत ।
रथ अंगभारें आदळत । तेणें पीठ होत शूरांचें ॥ ७ ॥
बाण सोडिले संपूर्ण । आवर्तीं पडिलें सैन्य ।
जो जिकडे सरे चुकवोन । तिकडेच बाण खडतरती ॥ ८ ॥
धाकें धाकें घायाबेणें । आडवी वोडवती वोडणें ।
वोडणें फोडोनियां बाणें । सर्वांग स्ंपूर्ण भेदिलें ॥ ९ ॥
रामें मांडिली रणकळी । शिरांची केली चेंडुफळी ।
राजे मारिले अतुर्बळी । रुधिरांजुळी प्राशिती भूतें ॥ १० ॥
सैन्य देखोनि महामार । खळबळिले राजकुमर ।
प्रधान धांविन्नले समोर । अतिदुर्धर निजयोत्रें ॥ ११ ॥
बाणांचिया झडाडा । प्रधान उडविला रोकडा ।
नेऊन टाकिलां रायापुढां । मस्तकीं तडा पडोनि मेला ॥ १२ ॥
चंड आणि प्रचंड । तिहीं युद्ध केलें वितंड ।
त्यांचे छेदोनियां बाहुदंड । दोहींचें मुंड पाडिलें ॥ १३ ॥
दोघे पाडिले अति दुर्धर । रणीं उठिला हाहाकार ।
हाक दैत्यांचें छेदी वक्त्र । वीरें वीर आटिले ॥ १४ ॥
मग लक्षिले राजकुमर । तेही चालिले अति दुर्धर ।
युद्ध चाले घोरांदर । शस्त्रास्त्रलाघवें ॥ १५ ॥
बाणें बाणांतें तोडित । शत्रें शत्रांतें झोडित ।
अस्त्रें अस्त्रांतें मोडित । मग ओढित निर्वाणशस्त्रें ॥ १६ ॥
रामें छेदिले त्यांचे रथ । सारथी मारिले शातानुशत ।
वीर मारोनियां तेथ । अवघे विरथ रणीं केले ॥ १७ ॥
अंतकांतक अर्धचेंद्रें । निःशेष छेदिलीं त्यांची शस्त्रें ।
सचेंचि निवटिलीं शिरें । अवनीं रिधिर प्रवाहे ॥ १८ ॥
राजपुत्र पडतां क्षितीं । पडल्या वीरांच्या पांथी ।
रामें रणीं लाविली ख्याती । केली शांति सर्वांची ॥ १९ ॥
रणांगणा जे जे आलें । तें तें निःशेष निर्दाळिले ।
बोंब सांगावया नाहीं उरले । रामें केले निक्षत्री ॥ २० ॥
अश्व गज रथ पदपदाती अतिरथी महारथी । जे जे आले युद्धाप्रती ।
त्यांची समूळ शांति । भार्गवें केली ॥ २१ ॥

राजाची उद्विग्नता :

प्रधान पाडिला राजभवनीं । पुत्र पादिले रणांगणीं ।
राजा क्षोभला ऐकोनी । युद्धालागोनि उठवला ॥ २२ ॥
सैन्य निमालें समस्त । उरले पार्षद पाच शत ।
राजा एकाकी युद्धार्थ । बैसला त्वरित रथावरी ॥ २३ ॥
राजा मनीं करी विचार । म्यां गाई ब्राह्मणां लाविलें शस्त्र ।
तेणें मी जाहलों अपयशःपात्र । आतां करां क्षात्र क्षात्रधर्में ॥ २४ ॥
दावीन क्षात्रधर्म रणीं । परशुराम त्रासीन बाणीं ।
कटाक्षें बिडेन रणांगणी । निजनिर्वाणीं युद्धार्थीं ॥ २५ ॥
तो सूड मागेल पित्याचा । मी सूड घेईन पुत्रांचा ।
पाहों पराक्रम दोहींचा । गर्जोनि वाचा उठावला ॥ २६ ॥

परशुरामाकडून राजाचा धिःकार :

परशुराम सतेज बोले । जेवोनियां घर घेतलें ।
तें तुवांचि दुष्टा साच केलें । निर्वैरा मारिलें जमदग्नी ॥ २७ ॥
जमदग्नीनें सांदिला कोप । त्यावरी त्वां केला प्रताप ।
वृथा करिसी बळाचा जल्प । तूं अति अल्प लघुत्वें ॥ २८ ॥
स्त्रियावरी तुज पुरुषार्थ । माझी माता पडली मूर्छित ।
तो तूं सांपडलासी येथे । तुज निःपात मी करीन ॥ २९ ॥

दोघांचे युद्ध :

ऐसा ऐकतां वचनपुंज ।कोपें चालिला सहस्रभुज ।
त्यावरी लोटला द्विभुज । धरावया गज केसरी जैसा ॥ ३० ॥
जमदग्नीचा अति क्रोध । होता परशुरामीं प्रसिद्ध ।
तो खवळला अति विरुद्ध । रायाचा कंडू छेदावया ॥ ३१ ॥
कोपें धनुष्या वाहिला गुण । काधिले अति तीक्ष्ण बाण ।
सरसावला सहस्रार्जुन । युद्ध दारुण मांदिलें ॥ ३२ ॥
दोहींचे बाण तिखट । बळें पिच्छांचा झुंझाट ।
गगनीं बाणांचा खणखणाट । हव्यवाट उठिला ॥ ३३ ॥
बाणें बाणातें निवारी । शस्त्रें शस्त्रातें संहारी ।
अस्त्र अस्त्रातें स्वयें वारी । शस्त्रास्त्रीं प्रवीण ॥ ३४ ॥
सहस्र भुजांचा धनुर्वाड । द्विभुजें लाविलेला वेढा ।
बाणांचिया झडाडां । कांहीं कैवाडा स्मरेना ॥ ३५ ॥
त्याचि लाघवामाजि देख । रामें रथाचा चेदिला आंख ।
सारथि मारिला निःशेष । वारू अमोलिक पाडिले रणीं ॥ ३६ ॥
मागूनियां रथांची भरनी । तेही वीर छेदिले रामें बाणीं ।
साहाय्यकारी नाहींकोणी । एकला रणीं उरे राव ॥ ३७ ॥

अस्त्रांनी द्वंद्वयुद्ध :

विरथी राजा उरे आपण । क्रोधें मांडिलें निर्वाण ।
अस्त्रें अनिवार योजून । त्यांचे निवारण नेणती कोणी ॥ ३८ ॥
दंडास्त्र आणि चंदास्त्र । सवेंचि सोडिलें प्रचंडास्त्र ।
वेगें मोकली वितंडास्त्र । घोर घोरास्त्र अनिवार ॥ ३९ ॥
देखोनि शस्त्रांचा संभार । रामनेटका धनुर्धर ।
शस्त्रें शस्त्रांचा संहार । करी तो प्रकार अवधारा ॥ ४० ॥
दंडें दंडिले दंडास्त्रा । खंडे खंडिले खंडास्त्रा ।
चंडें छेदिलें प्रचंडास्त्रा । छेदिलें घोरास्त्र अघोरास्त्रें ॥ ४१ ॥
निर्वाणास्त्रें समस्त । रामे केली वाताहत ।
मग अनिवार अति अत्यंत । तें चामुंडास्त्र घेतलें रायें ॥ ४२ ॥
पूर्वीं मर्दिले चंडमुंडासी । तें चामुंडास्त्र हातवसी ।
राम आव्हानी काळिकेसी । चामुंडा दासी तियेची ॥ ४३ ॥

चामुंडेचे माघारी येणे :

चामुंडेसी म्हणे काळिका । माझें स्वरूप तें रेणुका ।
तिच्या पतीच्या घातका । तूं आवश्यक निर्दाळीं ॥ ४४ ॥
चामुंडा काळिकेची दासी । हें सत्य न मानेल ज्यासी ।
तिहीं पहावें शप्तशतीसी । चंडमुंडांसी हेथें वधिलें ॥ ४५ ॥
काळिकेसी करोनियां नमन । घेवोनि तिचें आज्ञापन ।
चामुंडा परतली आपण । करावया निर्दळण रायाचें ॥ ४६ ॥
चामुंडा वळली उफराटी । सहस्रार्जुन देखे चृष्टीं ।
माझीं अस्त्रें लागतीं मजचिपाठीं । धाकें पोटीं गजबजिला ॥ ४७ ॥
चामुंडेचें निवारण । माझें मी नेणें आपण ।
अवश्य मज आलें मरण । धाकें संपूर्ण कांपत ॥ ४८ ॥
रामें त्याचि क्षणामाझारीं । परशु घेवोनि करीं ।
सहस्र बाहूंची कांडोरी । धरणीवरी पाडिलीं ॥ ४९ ॥

सहस्रार्जुनाचा वध, परशुरामस्तवन :

साधोनि निर्वाणीचा आवो । मग मस्तकीं घालता घावो ।
तेणें घायें महाबाहो । पडिला पहा हो क्षितितळीं ॥ ५० ॥
शिर उडालें अंतराळीं । जीवें परशुरामासी ओंवाळी ।
मग उतरलें पायांजवळीं । चरणाची धूळी वंदावया ॥ ५१ ॥
सद्‌भावें आदरिली स्तुती । मी गोब्राह्मण परमघाती।
त्या मज शस्त्रधारातीर्थीं । पापनिष्कृती निजकरें केली ॥ ५२ ॥
छेदिला सहस्रभुजांचा भार । छेदिला माझा अहंकार ।
छेदिला वासनासंभार । जीवोद्धार तुवां केला ॥ ५३ ॥
छेदिलें माझें कर्माकर्म । छेदिले माझे धर्माधर्म ।
छेदोनि माझा मोहभ्रम । ब्रह्म परम मज केलें ॥ ५४ ॥
छेदिलें माझें नांवरूप । छेदिलें माझें पुण्यपाप ।
छेदूनियां संकल्पविकल्प । ब्रह्म निर्विकल्प मज केलें ॥ ५५ ॥
छेदिलें अहंसोहंपण । निःशेष छेदिले मीपण ।
छेदोनि एकत्वाचें एकपण । ब्रह्म परिपूर्ण मज केलें ॥ ५६ ॥
ऐसें करिती स्तवन । प्रेमें पूर्ण जालें नयन ।
मस्तकीं वंदूनि चरण । सांडिला प्राण सहस्रार्जुनें ॥ ५७ ॥
मातेचि आज्ञा अति सधर । पहिले छेदावे सहस्रकर ।
मग छेदावें त्याचें शिर । तोचि प्रकार रामें केला ॥ ५८ ॥
सहस्रार्जुन पडिला रणक्षेत्रीं । सवेंचि तीन सप्तकें धरित्री ।
परशुरामें केली निःक्षत्री । आज्ञेवरी मातेच्या ॥ ५९ ॥
एकाजनार्दना शरण । जालें रेणुकापुराण ।
आतां जानकीचें लग्न । सावधान अवधारा ॥ ६० ॥
सांगतां धनुष्यप्रकरण । प्रसम्गें आलें रेणूकाआख्यान ।
कथेंसी जालें विलक्षण । श्रोतीं संपूर्ण क्षमा कीजे ॥ ६१ ॥

परशुरामाचे मिथिलेला आगमन :

रामें निःक्षत्री पृथ्वी करिता । मिथुळेसी आला अवचितां ।
ऋषिवृंदासी होय पुसता । येथें राज्यकर्ता कोण होय ॥ ६२ ॥
ऋषि सांगती परशुरामा । हा चक्रवर्ती धर्मात्मा ।
देही असोनि विदेहीधर्मा । अगाध महिमा पै याचा ॥ ६३ ॥

जनकाकडून सत्कार :

ऐसें ब्राह्मण बोलिले उत्तर । तंव जनक सामोरा आला सत्वर ।
आलिंगोनी परमादर । रामासहित ऋषीश्वर गृहा नेले ॥ ६४ ॥
जनक राजा ब्रह्माधिकारी । परशुराम त्यातें न मारी ।
एकात्मता प्रीतीकरीं । त्याचें घरीं राहिला ॥ ६५ ॥
जनकें परशुरामासी । राहविलें भोजनासी ।
रामासवें अपार ऋषी । जनकें त्यांसी निमंत्रिलें ॥ ६६ ॥
रामें ठेवोनि धनुष्यबाण । स्वयें केलें संध्यास्नान ।
भीतरीं करावया भोजन । ऋषिपंक्ति पूर्ण बैसली ॥ ६७ ॥

भोजनाचे वर्णन :

ताटें वाढिलीं चोखंडी । अवघ्या रसां एकचि गोडी ।
जनकें अत्यंत आवडीं । केली परवडी भृगुवर्या ॥ ६८ ॥
ते देखतांचि परिपक्वान्न । देखणें देखती निजनयन ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । समरसें लोचन सुखी जालें ॥ ६९ ॥
स्वानंदी भोजना देतां मिठी । शब्दीं निःशब्दता श्रवनीं उठी ।
तेणें भवणाचिये पोटीं । सुखसंतुशाह्टी स्वानंदें ॥ ७० ॥
यापरी पक्वान्नाचा वास । सबाह्य समरसीं परेश ।
तो येतांचि सुवास । सुख‌उल्लास घ्राणासी ॥ ७१ ॥
तें सदन्न स्पर्शतां । हाता आली अकर्मात्मता ।
क्षुधा तृषा नित्यतृप्तता । क्रिया चित्सत्ता । स्वयें जाली ॥ ७२ ॥
तो सेवितांचि रसास्वाद । रसनेमाजि निजानंद ।
उदरीं कोंदला परमानंद । सबाह्य स्वानंद रसास्वादीं ॥ ७३ ॥
ऐसें करितां भोजन । मनें मनचि उन्मन ।
समाधीसी समाधान । अन्नचि चैतन्य स्वयें जालें ॥ ७४ ॥
सकळ साधनेंसी वरी लवण । तंव तृप्ति जाली संपूर्ण ।
श्रीरामाचे पंक्तीस जें भोजन । अपूर्णपण असेना ॥ ७५ ॥
यापरी स्वयें तृप्त जाले । स्वयेंचि संसारा आंचवले ।
तृप्तिसुखें सुखी जालें । स्वस्थ राहिले स्वस्थानीं ॥ ७६ ॥

तांबूलवर्णन :

फळाशा फोडोनियां फोडी । वासनाशि=रा काढोनि बुडीं ।
शांतिपरिपक्वा पानाची विडी । स्वलीला तोंडें घातली ॥ ७७ ॥
जाळूनि अहंकार कथिणपणा । सोहं गाळींव शुद्ध चुना ।
लागोनि शांतिपरिपक्व पाना । तांबूलस्वादना सुस्वादु ॥ ७८ ॥
सर्व साराचें निजसार । तेंचि सेविती खदिरसार ।
श्रीरंगरंगाकार । अति पवित्र तांबूल ॥ ७९ ॥
अर्पिलें सुमन चंदन । दीपावली नीरांजन ।
यथोक्त करितां पूजन । सुखसंपन्न भार्गव ॥ ८० ॥

सीता शिवधनुष्याचा घोडा घोडा करून खेळते :

परशुरामाचा निजमेढा । सीतेनें स्वयें करोनि घोडा ।
सीताचा करोनि वोढा । बाणाचा गाधा जाणा केला ॥ ८१ ॥
त्या धनुष्यावरी बैसोनी । गोढा नाचवी राजांगणीं ।
स्वेच्छा क्रीडे राजभवनीं । राजविंदीतूनि धांवडी ॥ ८२ ॥
ठेविलें ठायीं धनुष्यबाण । राम न देखे आपण ।
मग रायावरी कोपायमान । काय वद्चन बोलिला ॥ ८३ ॥
माझ्या धनुष्याची चोरी करी । ऐसा बळिया कोण क्षत्री ।
तुवां लपविला आहे घरीं । तो झडकरी मज दावीं ॥ ८५ ॥
ऐकोनि क्रूर रामवचन । राजा जनक कंपायमान ।
आजि मज आलें पूर्ण विघ्न । राम क्षत्रघ्न कोपला ॥ ८६ ॥
राजा त्या धनुष्याचा लाग । स्वयें गिवसू लागला चांग ।
राजांगणीं देखोनि रेघ । तोचि माग घेत आला ॥ ८७ ॥
तंव धनुष्याचा करोनि घोडा । सीता खेळतां देखे पुढां ।
राजबिंदीं घेतला दवडा । बालक्रीडा क्रीडत ॥ ८८ ॥
राजा म्हणे अगे कुवारी । हा त्वां अन्याय केला भारी ।
तें धनुष्य सांडी क्षितीवर । तें राया करी उचलेना ॥ ८९ ॥
मग राजा अति प्रीतीकरीं । सीतेतें पोटासीं धरी ।
म्हणे बैस या घोड्यावरी । ते हरिखें वरी बैसली ॥ ९० ॥

सीतेचा विक्रम पाहून परशुरामास परमाश्चर्य :

करोनि धनुष्याचा घोडा । नाचवीत तडातडां ।
आली परशुरामापुढां । देखोनि गाढा तो विस्मित ॥ ९१ ॥
तो म्हणे ही आदिशक्ती । आणिकां धनुष्य नुचले हातीं ।
इसी आदिपुरुष होईल पती । आणिकासी प्राप्ती नव्हे इचे ॥ ९२ ॥
राम रायासी पुसे विचार । इसी कोण नेमिला वर ।
तो म्हणे नाहीं केला निर्धार । इचें स्वयंवर करणें आहे ॥ ९३ ॥
परशुराम म्हणे रायासी । स्वयंवर करनें सीतेसीं ।
मी सांगेन त्या प्रकारासी । जो सर्वांसी दुर्घट ॥ ९४ ॥
हे आदिईश्वरीचा अवतार । आदिपुरुष इसी वर ।
मी सांगेन तो पणप्रकार । तो सादर अवधारीं ॥ ९५ ॥
स्वयंवरीं हाचि पण । जो या धनुष्यासी वाहील गुण ।
त्यासीच द्यावी हे आपण । आज्ञा संपूर्ण ब्घार्गवाची ॥ ९६ ॥
तेणें सीतेच्या स्वयंवरासी । धनुष्य ठेविलें जनकापासीं ।
जेणें धनुष्यें त्रिपुरासी । एकें बाणेंसी छेदिलें ॥ ९७ ॥
शिवें येणेंचि धनुष्येंसी । विध्वंसिलें दक्षयागासी ।
पळवूनी सुरनरऋषी । यज्ञभंगासी पैं केलें ॥ ९८ ॥
हेंचि शिवचाप घेवोनि करीं । एकवीस वेळा निःक्षत्री ।
परशुरामें केली धरित्री । तें हे स्वयंवरीं ठेविलें चाप ॥ ९९ ॥
हे धनुष्याची मूलवार्ता । अतिशयेंसीं रसाळ कथा ।
शतानंद जाला साम्गतां । ऐकोनि समस्तां आश्चर्य ॥ १०० ॥
आतां जनकाच्या निजघरीं । स्वयंवरसभेची परी ।
जे महासभेमाझारी । रामप्रतापथोरी धनुर्भंगें ॥ १ ॥
त्या स्वयंवराचें निरूपण ।रसाळ कथेचें गोडपण ।
एकाजनार्दना शरण । श्रोते सज्ञान अवधान देत ॥ २ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
चापनिरूपणं नाम सप्तदशोध्यायः ॥ १७ ॥
॥ ओव्या १०२ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.